पक्षीनिरिक्षण - अमेरिकन वुडकॉक

Submitted by वर्षा on 23 April, 2026 - 23:44

अमेरिकन वुडकॉक या पक्ष्याकडे एरवी लक्ष जाण्याचं काही कारण नव्हतं. हौशी पक्षीनिरीक्षक असले तरी अजून चिक्कार पक्षी हे माझ्या 'कधीही न पाहिलेल्या' (लाईफर) यादीत आहेत. त्यात हा असणारच होता आणि आजपर्यंत कधीही त्याच्याविषयी ना कुठे स्पेशल फोटो बघण्यात आले की कुठे काही वाचले. यंदाचा मार्च येईपर्यंत या परिस्थितीत काही बदल नव्हता. पण अचानक मार्च अखेरीस इथल्या बातम्यांमधे हा पक्षी खूपच झळकू लागला. मला वाटतं, याची सुरुवात न्यूयॉर्क सिटीतल्या ब्रायंट पार्कच्या इन्स्टाग्रॅम हॅन्डलने केली असा माझा अंदाज आहे. त्यांनी मार्च अखेरीस या पक्ष्याची जोडी पार्कात दाखल झाल्याची रिल टाकली आणि झालं, लोकांचे जथ्थेच्या जथ्थे पार्कात दाखल झाले! मोबाईलपासून महागड्या लेन्सवाले कॅमेराधारक अशा सर्व लहान-थोरांनी घोळक्याने पार्कात हजेरी लावली. डेविल वेअर्स प्राडा २ कास्ट खालोखाल या पक्ष्याने पापाराझींना आकर्षित केलं आणि बहुतेक लोकांनी त्याचे फोटो/व्हिडिओ काढून शेअर केले. वर्तमानपत्रे/मासिके/वृत्तवाहिन्या वगैरे भरीस होतेच.

असं काय आहे या पक्ष्यात? बघितला तर खूप आकर्षक आहे असे तर अजिबातच नाही. ब्राऊन/चॉकलेटी, क्रीम, मातकट, काळसर रंगाच्या छटांचे अंग. काळे टपोरे डोळे. गातो-बितो, मधुर शीळ वगैरे नसावी. हं लांबुळकी चोच थोडी गंमतीशीर दिसते. पण तरीही इतकं काय आहे असं? तर याचे उत्तर आहे की, याची चालण्याची एक विशिष्ट लकब! की नाच म्हणूया? की मुरडत चालणे? काहीही असेल. पण जे काही आहे ते अतिशय विनोदी आहे नक्की!! Proud खत्रुडातला खत्रूडही याची चाल बघून पटकन हसेल. इथे बघून घ्या.

न्यूयॉर्कसिटीसारख्या कॉंक्रीटच्या जंगलात जाणीवपूर्वक केलेल्या छोट्यामोठ्या बागा बरीच आहेत आणि वुडकॉकसारख्या स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांना त्यांच्या स्थलांतराच्या वाटेवरील एक थांबा म्हणून या बागा उपयोगी पडतात. मी वाचलं की हा पक्षी प्रत्येक वर्षी या सुमारास शहरात दाखल होतो पण आताच तो इतका वलयांकित झालाय. त्यामागची कारणं बघितली तर ती मला पटण्यासारखी वाटली. कोविडमध्ये घरी अडकलेल्या जनतेतून बरेच हौशी पक्षीनिरीक्षक तयार झाले. एकीकडे सोशल मिडीया वापर अधिकाधिक वाढत जातच होता आणि अशाच कुणी हौशी पक्षीनिरीक्षकांनी camouflage उत्तमप्रकारे करु शकणार्‍या या वुडकॉकचे फोटो शेअर करायला सुरुवात केली. ते बघून आजूबाजूच्या हौशी लोकांनी, पक्षीनिरीक्षकांनी आणि प्रवाश्यांनी आणखीनच या पक्ष्याच्या मागावर राहणे चालू केले. वरवर नीरस वाटणार्‍या या पक्ष्याने त्याची वैशिष्ट्यपूर्ण लकब दाखवल्यामुळे तो आणखी 'शेअरेबल' झाला असणार यात शंका नाही. मग ब्रायंट पार्क किंवा न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी (जी या पार्काला चिकटूनच आहे) यांनी आपापल्या हॅन्डलवर या पक्ष्याला झळकवल्यावर हा लाईमलाइटमध्ये येणार हे सरळच होतं.

या वैशिष्ट्यपूर्ण चालण्यामुळे जमिन भुसभुशित होऊन त्यातले किडे खाणे सोपे होते, अशी एक थिअरी वाचली. सकाळी किंवा सूर्यास्ताच्या सुमारास या डान्स मूव्ह बघायला मिळू शकतात. मधल्या काळात "हे वागणं बरं न्हवं" ची आठवण या पक्ष्याला होते की काय कोण जाणे पण हा पक्षी तेव्हा बराच काळ निश्चल, स्तब्ध बसतो. आणि camouflage मध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्यासारखे भोवतालच्या वाळक्या पाना-काटक्यात, मातीत इतका बेमालूम मिसळून जातो की हलला नाही तर तुमच्यापासून दहा पावलांवर असला तरी तिथे तो आहे हे कळायला तुम्हाला दहा मिनिटे लागतील.

मार्चमध्ये या पक्ष्याचे सोशल मिडीया/बातम्यांद्वारे वारंवार दर्शन होत होते. एप्रिलचा पहिला आठवडाभर न्यूयॉर्कलाच असणार होते. मुक्कामाचे हॉटेलही ब्रायंट पार्कपासून हाकेच्या अंतरावर होते. त्यामुळे एक फेरी यासाठी झालीच पाहीजे हे ठरवलेच होते. एका सकाळी पार्कात पोचल्यावर अपेक्षेनुसार एका भागात मोबाईल आणि कॅमेरे सरसावलेल्या मंडळींनी एका भागात रिंगण केलेले दिसले आणि कळलेच की इथे वुडकॉकसाहेब/बाईसाहेब असतील. मला एकच पक्षी बघायला मिळाला. जमतील तेवढे मोबाईलमधून फोटो काढले. खूपच जवळून बघायला मिळाला. इतक्या लोकांच्या गराड्याने जराही विचलीत न होता तो त्याचे काम करत होता हे पाहून कौतुक वाटले. (तसंच त्या गराड्यातल्या कुणीही स्वतःला जास्त चांगले फोटो मिळावे, जास्तीत जास्त जवळून बघता यावा, यासाठी कुठलाही बेशिस्तपणा न केल्याबद्दल त्यांचेही कौतुक वाटले). पक्षी 'तो' होता का 'ती' हे कळायला मार्ग नव्हता. जोडीदार पक्षी कदाचित पार्काच्या दुसर्‍या कुठल्या भागात असेल. सुदैवाने पक्षी बराच वेळ अ‍ॅक्टिव होता. त्याच्या प्रसिद्ध डान्स मूव्हची अगदी काही सेकंद झलक बघायला मिळाली. पण जी काही होती ती विनोदीच होती. नंतर दिवसभर मधूनमधून ते आठवून हसू येत राहिलं.

हसण्याने आयुष्य वाढतं म्हणतात. नकळत पुष्कळ लोकांच्या चेहेर्‍यावर हसू फुलवल्याबद्दल वुडकॉक कुटुंबाने बरेच पुण्य कमावले असणार!
हॅपी बर्डींग!

क्रमशः

या सिरीजमधील आधीचे लेखः
छंद पक्षीनिरीक्षणाचा - Window birding!
पक्षीनिरीक्षण - फिंच!
पक्षीनिरीक्षण - Hermit Thrush आणि अमेरिकन रॉबिन
पक्षीनिरीक्षण - Cedar Waxwing!
"पक्षीनिरिक्षण - Warbler अध्याय

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol
मस्त! खालच्या क्लिप मध्ये ती चाल पाचोळ्यामुळे पटकन काळात नाही. पण आधीची क्लिप बघून परत खालची बघितली की कळतं

हो हो तीच क्लीप मेन आहे गं.
मी पोचले तेव्हाही चालूच होत्या मूव्हज पण माझा मोबाईल काढून फोकस करण्यात वेळ गेला थोडा त्यामुळे त्या माझ्या खालच्या क्लीपेत फार काही नाहीये. आणि नंतर तर काही वेळाने त्याने विश्रांतीही घ्यायची ठरवली. ब्रेक के बाद कंटिन्यू केलं असणार हाहा

मस्त आहे चाल या वुडकॅाकची.
ही सिरीज आवडते आहे.
ब्रायंट पार्क तसे फार गजबजलेले असते. त्यातही वुडकॅाक अगदी आरामात डुलत डुलत वावरतोय म्हणजे लाजाळू अजिबात नाही.
सेंट्रल पार्कात पण दिसेल बहुतेक.

मस्त डान्स आहे
बॉलिवूड मधून शिकलाय की।काय

हाय हुक्कु हाय हुकू
गाणे लावून चांगले meme तयार होईल
Lol

भारीच आहे ह्याची चाल . चाल बघून हृतिकच्या कहो ना प्यार है मधील डान्स मूव्ह ची आठवण झाली. हृतिक तो मूव्ह हाताने करतो आणि हा भाई पायाने .

अरे वाह. फार मजेदार चाल आहे या पक्ष्याची. खूप व्हिडिओज आहेत यू ट्यूब वर याचे वेगवेगळी गाणी वापरून केलेले.

धन्यवाद वावे, आडो, ऋतुराज, जाई, किल्लेदार, झकास, रायगड
हो ना चिक्कर हिंदी डान्स नंबर्स आणि इंग्लिश गाणी चपखल बसतात या मूव्ह्ज ना Lol
ऋतुराज, तेच तर! ब्रायंट पार्कात कायम पुष्कळ गर्दी असते, काहीना काही कार्यक्रमही चालू असतात बर्‍याचदा, पण या पक्ष्याला ढिम्म काही फरक पडत नाही असं दिसतंय
हो सेंट्रल पार्कात पण येत असतीलच हे पक्षी पण ते पार्क एवढे मोठे आहे की लोकांच्याच नजरेत आले नसावेत अद्याप Wink

वर्षा मी सेंट्रल मध्ये तूफान रॉबिन्स पाहीलेत. पण खूप बर्ड वॉचर्स तिथे येतात तेव्हा बरेच पक्षी असणारच.
तुझा हा व्हिडीओ मी यु ट्युबवरती पाहीलाय कारण तो चॅनल सबस्क्राईब केलेला आहे. कीप अप द गुड वर्क.

थॅम्क्स सामो.
हो आता पुढे बर्ड बाथचे योग जमणे कठीणच आहे त्यामुळे लिबर्टी स्टेट पार्क आणि सेन्ट्रल पार्कावर माझी भिस्त असेल. Happy न्यूजर्सी/न्यूयॉर्क बर्ड वॉचिंग फेबु ग्रूप्स जॉईन करायला सुरुवात केली आहे त्यातूनही अंदाज येईल बर्डर्स कुठे जातात ते आणि अ‍ॅप्स आहेतच.

आत्ता मी एक व्हीडिओ पाहिला त्यात हे पक्षी चक्क रस्त्यावर हा डान्स करीत रस्ता क्रॉस करीत होते, तिथे कुठली भुसभुशीत जमिन आणि किडे असायला Proud त्यांची ती चालण्याची सर्वसामान्य पद्धतच असावी Happy