लहानपणापासून ते आतापर्यंत वाचन हा माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. बालपणी त्याची सुरवात छोट्याशा रंगीबेरंगी गोष्टीच्या पुस्तकांनी झाली. पुढे माध्यमिक शाळेत अभ्यासेतर अवांतर वाचन चालू झाले. तेव्हापासून ते थेट कमावता होईपर्यंत जे काही असे वाचन झाले त्यासाठी विविध वाचनालयांचा आधार घेतला. पुढे कमावता झाल्यानंतर काही प्रमाणात पुस्तक खरेदी करीत राहिलो. तरीही पुस्तकांचा मुख्य स्त्रोत हा वाचनालय हाच राहिला होता. ३०-४० वर्षांपूर्वी वाचनालये ही सुसंस्कृत शहरांचे वैभव असायची. आज त्यांचे प्रमाण आणि सर्वसाधारण दुरवस्था आपण जाणतोच. त्या अनुषंगाने माझा आजपर्यंतचा वाचनालय-प्रवास आणि तिथले काही अनुभव सादर करतो. ते वाचकांना रोचक वाटतील अशी आशा आहे.
माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर मोठ्या व आकर्षक अक्षरात लिहिलेले ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन नजरेत भरे. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. त्या काळात वयानुरूप असे वाचन झाले, जसे की अद्भूत गोष्टी, प्रवासवर्णने, इ. तिथल्या कपाटांत काही भले मोठे ग्रंथ देखील रचून ठेवलेले असायचे. ‘गीतारहस्य’, ‘ कर्हेचे पाणी ’सारखी पुस्तके लांबून पाहिली पण त्यांना हात लावायचे काही धाडस झाले नाही. एका नियतकालिकाने मात्र तेव्हा चांगलेच आकर्षून घेतलं होते. त्या मासिकाचे नाव ‘अमृत’. त्याच्या मुखपृष्ठावर ‘ज्ञान आणि मनोरंजन’ हे ब्रीदवाक्य अगदी ठळकपणे लिहीले असायचे. त्या वाक्यास अनुसरून सर्व वयोगटांना आवडेल असे काही ना काही त्यात होते. पुढे मोठे झाल्यावर समजले की अमृतला मराठीतील ‘डायजेस्ट’ (RD च्या धर्तीवर) म्हटले जाई. हे मासिक सुमारे ६३ वर्षे चालल्यावर बंद पडले तेव्हा हळहळ वाटली. माझ्या शालेय वयात वाचायला सुरवात केलेले हे मासिक मी माझ्या मुलांचे कॉलेजचे शिक्षण संपून गेल्यावरही वाचत होतो. इतका त्याचा दीर्घ सहवास होता.
त्या वयात असेच एकदा रस्त्याने भटकत होतो आणि एक मित्र भेटला. म्हणाला, काय करतो आहेस ? मी म्हणालो, काही खास नाही. त्यावर तो म्हणाला की चल माझ्याबरोबर, आपण जरा पुस्तके पाहू आणि वाचत बसू. तिथे जवळच एका इमारतीवर ‘शासकीय विभागीय ग्रंथालय’ अशी भली मोठी पाटी होती. मी जरा बुचकळ्यात पडलो आणि त्याला सांगितले, की मी काही याचा सभासद नाही. त्यावर तो मोठ्याने हसला आणि म्हणाला, “अरे येड्या, मी तरी कुठे आहे. अरे, हे नुसते तिथे बसून वाचायला फुकट असते, अगदी कुणाला पण !” तेव्हा मला अगदी धक्काच बसला होता. जनतेसाठी असे फुकटचे वाचनालय असू शकते, हे प्रथमच समजले. मग आम्ही तिथे आत गेलो. एका मोठ्या नोंदणी वहीत फक्त आपले नाव, पत्ता आणि आल्याची वेळ असे लिहायचे होते. आत खूप मोठी जागा, त्यात असंख्य पुस्तके मांडून ठेवलेली होती. ते बघून अगदी हरखून गेलो. ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांची सूची देखील बघायला उपलब्ध होती. पुन्हा ३-४ कर्मचारी आपल्याला हवे ते पुस्तक शोधून देण्यासाठी हजर होते. एकंदरीत त्या ग्रंथालयावर खूष झालो.
पुढे लवकरच घरच्यांनी त्याचे सभासदत्व घेतले, जे अगदी नाममात्र शुल्कात मिळाले आणि ते शुल्कही फक्त एकदाच भरायचे होते ! इथली बहुतेक पुस्तके जुनीपानी होती. अगदी नवे पुस्तक मी क्वचितच पाहिले. आपल्याला हवे ते पुस्तक मिळण्यासाठी प्रतीक्षा यादीत नाव नोंदवण्याची सोयही होती. पण त्या योजनेचा अनुभव यथातथाच आला. कालांतराने शासनाने तो कायम- सभासदत्व प्रकार रद्द केला. त्याचे नूतनीकरण करण्यासाठी काही अटी घातल्या – अमुकतमुक दाखला जोडा वगैरे. तसेही एकूण त्या वाचनालयावर कायम (सरकारी) उदासीनतेची छाया असायची. मग मी त्या वाचनालयाला रामराम करून टाकला. पण त्याला मला एक मोठे श्रेय नक्की द्यावे लागेल. माझ्या किशोरावस्थेतील वाचनाची बैठक या ग्रंथालयामुळे झाली. तत्कालीन दिग्गज लेखक – अत्रे, खांडेकर, फडके, इत्यादी हे वाचायला लागलो. त्याचे स्वतःला फार अप्रूप वाटायचे. अत्र्यांची नाटके वाचताना उत्स्फूर्तपणे मोठमोठ्यांदा हसू आलेले आजही आठवते.
आता आमच्या कुटुंबाने वाट धरली एका खाजगी वाचनालयाची. ते तर प्रेमात पडावे असेच होते. सुसज्ज दुमजली इमारत आणि प्रसन्न वातावरण. तिथे एका वेळेस दोन पुस्तके मिळायची. मग एक मोठ्यांसाठी तर एक मुलांसाठी आणले जाई. मोठ्यांचे बहुतेक करून असायचे एखादी रहस्य कादंबरी, तर मुलांसाठी ऐतिहासिक, बोधप्रद वगैरे ! मला आजही त्या रहस्यकथांची पुस्तके आठवतात. तेव्हा बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक ही मंडळी जोरात होती. कुणाच्या ‘झुंजार’ तर कुणाच्या ‘गरुड’ कथा असायच्या. आमच्या घरी मात्र हे असले काही मुलांना वाचायला बंदी होती. आता कुठलीही बंदी घातली की चोरटा उद्योग सुरु होणारच की ! सगळे मोठे घराबाहेर गेले की हळूच त्या रहस्यकथांवर झडप घातली जाई. कधीकधी तर मोठे घरात असतानाही आम्ही अभ्यासाच्या पुस्तकात ते पुस्तक लपवून वाचत असू. आजही मला त्या पुस्तकांतील शृंगार वर्णने, नग्नता आणि हिंसा व्यवस्थित आठवते. हे असले काही आम्ही त्या वयात वाचू नये, यासाठी मोठ्यांचा तो आटापिटा. आता हे वाचून सध्याची मुले तर खो खो हसतील की नाही? असो. जी पुस्तके आम्ही वाचावीच असा मोठ्यांचा आग्रह होता त्यानुसार नाथमाधवांचे ऐतिहासिक ठोकळे आणि भा रा भागवतांची अनेक पुस्तके डोळ्यांखालून गेलेली आठवतात. शेरलॉक होम्सचे अनुवाद प्रा. भालबा केळकरांनी केलेले असल्याने ही पुस्तके मुलांसाठी अगदी ‘कुटुंबमान्य’ अशी होती.
अशा तऱ्हेने हे सुंदर ग्रंथालय इयत्ता १०वीची उन्हाळी सुटी संपेपर्यंत उपभोगता आले. पुढे ११वीत विज्ञान शाखेला गेल्यामुळे “आता २ वर्षे फक्त अभ्यास एके अभ्यास, आता बास झाली गोष्टींची पुस्तके”, असा वटहुकूम घरून निघाला. तो गुमान आचरणात आणावा लागला.
यापुढचा दीर्घ शैक्षणिक टप्पा होता वैद्यकीय महाविद्यालय. त्या अभ्यासाचे एक वैशिष्ट्य असते. आता एका विषयासाठी फक्त एकच पुस्तक असे वाचून चालत नाही. अनेक संदर्भग्रंथ चाळावे लागतात. मग वरिष्ठांनी सल्ला दिला की आता ‘ब्रिटीश कौन्सिल लायब्ररी” (बीसीएल, सध्या फक्त ब्रिटीश लायब्ररी म्हणतात) लावलीच पाहिजे. त्याची एक विशेष आठवण सांगतो. तेव्हा या ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना सभासदत्व घेताना, कॉलेजच्या प्राचार्यानी दिलेला ‘चांगल्या वर्तणुकीचा’ दाखला देणे आवश्यक होते. त्या धोरणाला एक सामाजिक घटना कारणीभूत ठरली होती. तेव्हा महाराष्ट्रात एक भयानक हत्याकांड घडले होते. त्यातील आरोपींनी पोलीस जबाबात सांगितले होते, की खून करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी ‘बीसीएल’ मधील पुस्तकांतून वाचल्या होत्या !
अशा प्रकारे सर्व सोपस्कार करून बीसीएलचे सभासदत्व घेतले. विद्यार्थ्यांसाठी शुल्कात थोडी सवलत होती. अतिशय शिस्तबद्ध आणि नीटनेटके असे हे ग्रंथालय होते. इथे अर्थातच फक्त ब्रिटीश साहित्य ठेवले होते. त्यात अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्याचाही समावेश होता. बऱ्याच जगप्रसिद्ध इंग्लीश लेखकांची पुस्तके उपलब्ध होती. सभासदाला एका वेळेस ३ पुस्तके मिळत आणि ती २६ दिवसांत परत करायची असत. ही मुदत टळून गेल्यास दर दिवसाला ठराविक दंड होता (बहुतेक १-२ रुपये). तो दंड भरण्यासाठी मुख्य काउंटरवर एक मजेदार सोय होती. एका टेबलावर २ इंच आकाराची खाच पाडलेली होती. त्यातून दंडाची रक्कम टाकायची असायची. यातून त्यांनी पावती फाडा वगैरे कारकुनी वाचवली होती. या खाचेचे तेव्हा फार अप्रूप वाटले होते. ग्रंथालयातील शांतता वाखाणण्याजोगी होती. जरी बरेच मराठी भाषिक इथले सभासद असले, तरी इथे असणाऱ्या ग्राहक आणि कर्मचारी यांनी एकंदरीत देहबोलीतून ‘इंग्लीश वातावरणाचा’ आभास निर्माण केलेला असायचा ! आपल्याला हवे ते पुस्तक मिळवण्यासाठी प्रतीक्षा यादीची सोय अर्थातच होती आणि आपला नंबर लागल्यावर शिस्तीत त्यांचे पोस्टकार्ड घरी येई.
हे ग्रंथालय शहरातील प्रतिष्ठित भागात होते. त्याच्या आजूबाजूस एक प्रसिद्ध कॉलेज आणि खास खवय्यांची उपाहारगृहे होती. एकूणच त्या वातावरणात तरुणाई नुसती सळसळत असायची. तेव्हा पुस्तकांच्या २६ दिवसांच्या मुदतीची कोण वाट पाहत बसणार? दर १५ दिवसाला इथे चक्कर मारणे नक्कीच सुखावह होते. पुस्तके घेण्याबरोबरच तिथली रंगीबेरंगी तरुणाई ‘वाचणे’ हाही आम्हा मित्रांचा एक कार्यक्रम असायचा !
सुमारे ५ वर्षे मी या ग्रंथालयाचा सभासद होतो. त्या काळात ठरवून ३ इंग्लिश लेखकांचा फडशा पाडला. ते लेखक असे:
१. शेक्सपिअर
२. सॉमरसेट मॉम
३. पी. जी. वुडहाउस
शेक्सपिअरबद्दल मनात खूप कुतूहल होतेच आणि आता तर सुरेख संधी चालून आलेली. त्यांची तिथे असलेली बहुतेक नाटके वाचली. वाचन अजिबात सोपे नव्हते. वाचताना you shall विसरून जायचे असते आणि thou shalt ची सवय लावावी लागते !
सॉमरसेट मॉम यांच्याबद्दल दोन कारणांनी कुतूहल होते. ते स्वतः वैद्यकीय पदवीधर होते पण त्यांनी लेखन हाच व्यवसाय केला. अजून एक कारण असे. माझे एक नातेवाईक मराठी कथालेखक होते. ते स्वतःला मार्गदर्शक म्हणून
मॉम यांची पुस्तके वाचत. त्यांनी मला एकदा वाढदिवसाला मॉमचे पुस्तक भेट दिले होते. त्यामुळे ती उत्सुकता. मॉम त्यांच्या कथांतून वाचकाला जगाच्या पश्चिम ते पूर्व अशा दोन्ही टोकांना नेऊन आणत. तसेच मानवी स्वभावाचे अनेक पैलू छान उलगडून दाखवत.
पी. जी. वुडहाउस हे प्रसिद्ध विनोदी लेखक. मला काही बुजुर्गांनी सांगितले, की ज्यांना पुलं आवडतात त्यांनी ‘पीजी’ जरूर वाचावेत. म्हणून मग त्यांची पुस्तके आवडीने वाचून काढली. तो अगदी प्रसन्न विनोदाचा शिडकावा असतो. त्यातल्या ‘जीव्ज’ या व्यक्तीच्या तर आपण प्रेमातच पडतो.
अशा तऱ्हेने ‘बीसीएल’ चे हे तारुण्यातील गोडगुलाबी दिवस मजेत गेले. त्यातून इंग्लीश साहित्याची झलक चाखता आली. पदवीचे शिक्षण संपल्यावर माझे राहायचे ठिकाणही बदलले होते. तिथून हे ग्रंथालय फारच लांब असल्याने आता ते बंद केले.(अलीकडे हे ग्रंथालय निव्वळ छापील पुस्तकांचे राहिलेले नसून तिथे अनेक इ-सुविधाही उपलब्ध असतात). माझ्या तेव्हाच्या ५ वर्षांच्या कालावधीत वेगळे मराठी वाचनालय लावायला मात्र घरून परवानगी नव्हती कारण इथले शुल्क बऱ्यापैकी होते. मग मित्रपरिवारात जी काही मराठी पुस्तके होती, ती एकमेकांत फिरवून वाचत असू. अशा या ‘फिरत्या’ आणि फुकट वाचनालयातून काही वाचन झाले. त्यापैकी ‘ययाती’ आणि ‘कोसला’ आठवतात. हा लेख लिहिताना कोसलामधल्या ‘लायब्री’ ची आठवण येणे अपरिहार्य आहे !
पुढे लग्नानंतर शहराच्या उपनगरात स्थिरावलो. आता सांसारिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असल्याने वाचनालय घरानजीकचेच शोधणे भाग होते. असेच फिरताना त्याचा शोध लागला. आमच्या जवळच्याच एका गृहसंकुलात एका कुटुंबाने त्यांच्या घरातच वाचनालय चालवले होते. त्या जोडप्यातील गृहस्थ नोकरीत होते आणि त्यांची पत्नी गृहिणी. आपल्या ३ खोल्यांच्या सदनिकेतील बाहेरच्या खोलीत त्यांनी वाचनालय उभे केले होते. दिवसातील ४ तास ही खोली ग्राहकांसाठी उघडी असायची. त्यांच्या या पुस्तक प्रेमाबद्दल मला मनापासून कौतुक वाटले. त्या जागेच्या मर्यादेत त्यांनी जी पुस्तकांची निवड केली होती ती पांढरपेशांना अगदी अनुरूप होती. त्यामध्ये ‘पुलं- वपु -हमो- सुशि’ अगदी उठून दिसणारे होते. जोडीला नारायण धारप- रत्नाकर मतकरी हे गूढखाद्यही होते. त्याचबरोबर ‘व्यंमा- दमा- शंपा’ यांचाही एक सुरेख कप्पा होता. उच्च मध्यम वर्गाला आवडणारे खुशवंतसिंगांचे अनुवादित साहित्यही इथल्या संग्रहाला चविष्ट बनवायचे. वपुंचे एखादे नवे पुस्तक जर आपल्या हाती ६ महिन्यांनी पडले, तर त्यात त्या खास ‘वाक्यां’च्या खाली पेनाने ओढलेल्या रेघा असायच्या. असे सगळे पुस्तक शाईमय करून टाकणार्यांचा अगदी राग यायचा.
इथला अजून एक मुद्दा दखलपात्र आहे. त्या सुमारास उपनगरांत अशी जी घरगुती वाचनालये चालवली जात, त्यांना फक्त पुस्तके ठेवून चालणार नव्हते. त्याला नियतकालिकांची जोड देणे आवश्यक होते. नियतकालिके ही बऱ्याच गृहिणी सभासदांची विशेष आवड होती. इथे सभासदांना एका वेळेस एक पुस्तक आणि दोन नियतकालिके दिली जात. वाचनालय जरी मराठी पुस्तकांचे असले तरी नियतकालिकांत मात्र मराठीच्या जोडीने हिंदी व इंग्लीशमधले चित्रपट व सौदर्यप्रसाधनविषयक अंक हटकून ठेवावे लागत. हे जरी घरात चालवलेले वाचनालय असले, तरी त्यांनी त्यात ‘Debonair’ चे अंक ठेवण्याचे धाडस दाखवले होते. ते मासिक उघडून पाहिल्यावर पहिल्याच पानावर
“कृपया पाने फाडू नयेत, अंक जुना झाल्यावर विकत घ्यावा !"
ही प्रेमळ सूचना पेनाने लिहिलेली असायची. आमच्या कॉलेजच्या दिवसांत हे मासिक ठरवून वसतिगृहातच ‘बघावे’ लागे; ते वाचण्यात कुणालाच रस नसायचा ! अर्थातच ते घरी आणायची कुणाची टाप नव्हती. आता या वाचनालयात ते खुले आम मिळत असल्याने त्याच्याबद्दल उगाचच वाटणारा चोरटेपणा नष्ट झाला. त्यात आता विवाहित असल्याने ते घरी आणण्यात संकोच तो कसला ? या वाचनालयाच्या मालक असलेल्या त्या बाई पुस्तक नोंदणी वगैरे कामे घरकाम सांभाळून अगदी मन लावून करत. पुस्तक बदलण्यास आलेल्या माणसांना त्यांच्या स्वयंपाकघरातील फोडण्यांचे वास अगदी पाठ झालेले होते ! संध्याकाळच्या वेळात कधीकधी त्यांची आठवीत असलेली मुलगी ग्राहकाच्या पुस्तक नोंदीचे काम करी. कार्डावर लिहिताना मराठी पुस्तकाचे नाव देखील ती हटकून रोमन लिपीत लिही. तिच्या या कृतीतून लिखित मराठीला भविष्यात ओहोटी लागणार असल्याची झलक दिसून आली.
या वाचनालयामुळे आयुष्यात एक महत्वाची घटना घडली. साधारण १९९५च्या सुमारास तिथे पुस्तक बदलायला गेलो असता एका नव्या मासिकावर नजर पडली. त्याचे मुखपृष्ठ आकर्षक होते आणि मासिकाचे नावही उत्कृष्ट सुलेखानात होते. ते मासिक म्हणजे ‘अंतर्नाद.’ तेव्हा ते नव्याने सुरु झाले होते. ते सहज चाळताना एक गोष्ट नजरेत भरली. या ४२ पानी मासिकात तब्बल ६ पाने ही वाचकांच्या प्रतिसादासाठी राखलेली होती. या प्रतिसाद सदराचे प्रारंभी अशी संपादकीय टीप होती:
‘वाचकांच्या प्रतिसादांना या मासिकात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. वाचकांनी आपले प्रतिसाद सविस्तर आणि मोकळेपणाने लिहावेत”.
हा भाग माझ्यासाठी फारच आकर्षक होता कारण तोपर्यंत मी दैनिकांतील पत्रलेखन आवडीने व हिरीरीने करीत होतोच. आता हे मासिक तिथून दरमहा घेऊन वाचू लागलो. मग त्यात नियमित प्रतिसाद लिहीले. त्यातूनच स्वतंत्र लेखन करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे वाचकांच्या प्रोत्साहनातून त्यात गती येत गेली. यास्तव या घरगुती प्रेमळ वाचनालयाचा मी कायम ऋणी आहे. कालांतराने हे संचालक कुटुंब ते घर सोडून दुसरीकडे गेले. त्यामुळे हे २० वर्षे चाललेले वाचनालय बंद झाले. या घटनेने याच्या सभासद असलेल्या एक वाचनप्रेमी गृहिणी खूपच अस्वस्थ झाल्या. त्यांनी १-२ महिने कसेबसे काढले. मग त्यांनी स्वतःच नवे वाचनालय स्वतंत्र जागेत काढले. मग माझ्यासह बहुतेक सगळे पूर्वीचे सभासद त्यांना मिळाले. त्यांनी याचे नावही छान ठेवले – ‘आपले वाचनालय’. इथेही पूर्वीची लेखक परंपरा जपलेली होती. आता कालानुरूप त्यात काही विशेष भर घातली गेली. त्यात चरित्रे, वलयांकित व्यक्तींचे अनुभवकथन, माहितीपर आणि प्रेरणादायी पुस्तके यांचा समावेश होता. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे इथे ‘अमृत’ मासिक देखील होते. बऱ्याच काळाने त्याची पुनर्भेट झाली. इथल्या एका छोट्या कप्प्यात त्यांनी जुनीपानी इंग्लीश पुस्तके कोंबून ठेवली होती. ती सर्व त्यांनी ओळखीच्यांकडून गोळा केलेली होती. ती वाचण्यासाठी दर उन्हाळी शालेय सुटीत २-४ मुले फिरकत. एरवी तो कप्पा उदास आणि धुळीने माखलेला असायचा.
सुमारे १० वर्षे मी इथला सभासद होतो. इथे सभासदांसाठी एक विशेष सोय अशी होती. जर आपल्याला नव्याने प्रकाशित झालेले एखादे पुस्तक वाचायची इच्छा असल्यास आपण त्या संचालकांना सुचवायचे. मग त्यांना जर ते पटले तर ते खरेदी करत. अशी पाच पुस्तके मी त्यांना माझ्या शेवटच्या २ वर्षांच्या काळात सुचवली होती. पण, त्यांनी एकदाही माझी मागणी पुरी केली नाही. एव्हाना मी त्यांच्या निवडीच्या पुस्तकांना कंटाळलो होतो. वयानुरूप आता ठराविक पठडीतील साहित्य वाचायचा कंटाळा येत होता. तरी पण वाचनालय या संस्थेशी दीर्घकाळ असलेला संपर्क एकदम तोडवत नव्हता. दरम्यान अंतर्नाद, अमृत आणि अन्य काही मासिके बंद पडली. माझे पुस्तकांचे दीर्घवाचन आता होईनासे झाले. दिवाळी अंकांचेही अप्रूप वाटेना. दुसरीकडे आंतरजालावरचे निवडक वाचन वाढू लागले होते. हे सर्व पाहता निव्वळ साप्ताहिकांसाठी हे वाचनालय चालू ठेवण्यात मतलब नव्हता. तशीही ती जालावर बघता येतातच. आता आपल्या आवडीचे एखाद दुसरे पुस्तक अधूनमधून विकत घेतलेले बरे, असे प्रकर्षाने वाटू लागले. एक वर्षभर विचार करीत अखेर ते वाचनालय बंद करण्याचा निर्णय घेतला.
आज समाजात अनेक प्रकारे इ-माध्यमे ओसंडून वाहत आहेत. शहरी तरुण पिढी मराठी छापील वाचनापासून बरीच दुरावली आहे. तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीत काही उत्साही लोक व्यक्तिगत पातळीवर वाचनालये चालवत आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो. त्या कृतज्ञतेपोटी मी माझ्या शेवटच्या वाचनालयाकडून ते बंद करताना माझी अनामत रक्कम परत घेतली नाही. ज्येष्ठ पिढीतील थोड्याफार लोकांसाठी अशी वाचनालये – पुस्तकांची घरे- अजूनही गरजेची आहेत. ती शक्य तितका काळ टिकोत, या सदिच्छेसह या लेखाचा समारोप करतो.
………..
तुमचेही अनुभव वाचण्यास उत्सुक.
***********************************************************************************************
युगांत ची इंग्रजी आवृत्तीतील
युगांत ची इंग्रजी आवृत्तीतील pdf खालील लिंकवर उपलब्ध आहे.
मिळाली म्हणून ही नोंद
https://dn790003.ca.archive.org/0/items/Yuganta-TheEndOfAnEpoch-IrawatiK...
अच्छा ! चांगली माहिती
अच्छा ! चांगली माहिती
येथे पुस्तके राहतात.
येथे पुस्तके राहतात. Tsundoku
“आजकाल (पुस्तक) कोणी वाचत
“आजकाल (पुस्तक) कोणी वाचत नाही” हे रडगाणं जरी सनातन असले तरी भारतीय प्रकाशन व्यवसायाची सध्याची स्थिती या वाक्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे चांगली दिसते आहे. या परिस्थितीचा कानोसा घेणारा हा लेख चांगला आहे : https://www.outlookindia.com/books/if-reading-is-dead-why-is-publishing-...
भारतीय पुस्तक प्रकाशन व्यवसाय उतरणीला लागलेला नसून उलट तो कात टाकून नव्या स्वरूपात आणि नव्या दमात बहरतो आहे असा या लेखाचा मथितार्थ. तसेच, वाचक आता डिजिटल दमछाक झाल्यामुळे पुन्हा छापील पुस्तकांकडेही वळत आहेत हा पण एक त्यातला एक मुद्दा.
नव्या जाणिवेचे प्रकाशक
नव्या जाणिवेचे प्रकाशक
लोकसत्ता - लोकरंग
पुस्तकांची विक्री होत नाही... लोक वाचत नाहीत... आवृत्त्या संपायला कित्येक वर्षे लागतात... या पारंपरिक समस्या अलीकडे विक्रीच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन यंत्रणेद्वारे ग्रंथनिर्मितीत उतरलेल्या प्रकाशकांच्या नव्या पिढीला बिलकूल भेडसावत नाहीत. या नव्या जाणिवेच्या प्रकाशकांची दखल घेणारे सदर... दर पंधरवड्याने
पुस्तकांवरील पुस्तके या सदरात
पुस्तकांवरील पुस्तके या सदरात
https://divyamarathi.bhaskar.com/opinion/news/anurag-lavekar-pustake-sad...
डॉ. अनुराग लव्हेकर यांचे 'पुस्तके साद आणि दाद' हे पुस्तकावरचे पुस्तक आले आहे.
पुस्तकाचा परिचय वाचून इथे नोंद करावीशी वाटली. वरील लिंकवर पूर्ण परिचय मिळेल.
बँकेचे छोटेसे पुस्तकही लोक (
बँकेचे छोटेसे पुस्तकही लोक ( ग्राहक) डिजिटली वाचतात. [काही खवट म्हातारे सोडून]
* नव्या जाणिवेचे प्रकाशक >>>
* नव्या जाणिवेचे प्रकाशक >>>
या सदरात मागच्या आठवड्यात 'वॉल्डेन प्रकाशनाच्या अभिषेक धनगर यांचा परिचय वाचला होता.
योगायोगाने यंदाच्या एक जानेवारीला मी याच प्रकाशनाचे 'द लायब्ररी' हे अनुवादित पुस्तक विकत घेतलेले होते. तेव्हा या प्रकाशनाचे नाव मी आयुष्यात प्रथमच वाचले.
. .
अन्य पूरक माहिती छान !
‘वॉल्डेन’ हे नाव एका मराठी
‘वॉल्डेन’ हे नाव एका मराठी प्रकाशने का निवडले असावे याचे कुतूहल लोकसत्तातील तो लेख वाचल्यावर शमले.
वॉल्डेन हे थोर अमेरिकी लेखक Henry David Thoreau यांच्या एका पुस्तकाचे नाव आहे. अमेरिकेतल्या Massachusetts या राज्यात Walden Pond या नावाचे ठिकाण असून तिथे थोरो यांनी दोन वर्ष, दोन महिने आणि दोन दिवस एका झोपडीत वास्तव्य केले होते.
https://en.wikipedia.org/wiki/Walden
नुकत्याच झालेल्या लोकसत्ता
बरोबर. नुकत्याच झालेल्या लोकसत्ता लीटफेस्ट मध्ये वॉल्डन चा पुस्तकांचा स्टॉल होता, तिथून मी त्याच दिवशी प्रकाशित होणारे वीणा गवाणकर यांचे "द्रष्टा" हे पुस्तक घेतले होते.
'द लायब्ररी' ही कथा ज्या
'द लायब्ररी' ही कथा ज्या कथासंग्रहात आहे (impossible stories) त्यातल्या इतर कथा वाचत आहे. त्यात सहा एकेक वेगळ्या संकल्पनाविषयक कथा असून त्या प्रत्येक संकल्पनांमध्ये इतर उपकथा आहेत.
Impossible Stories by
Zoran Zivcovic
INTRODUCTION
TIME GIFTS
1. The Astronomer
2. The Paleolinguist
3. The Watchmaker
4. The Artest
IMPOSSIBLE
ENCOUNTERS
5. The Window
6.The Cone
7. The Bookshop
8. The Train
9. The Confessional
10.The Atelier
SEVEN TOUCHES OF MUSIC
11. The Whisper
12. The Fire
13. The Cat
14. The Waiting Room
15. The Puzzle
16. The Violinist
17. The Violin-Maker
THE LIBRARY
18. Virtual Library
19. Home Library
20. Nignt Library
21. Infernal Library'
22. Smallest Library
23. Noble Library
STEPS THROUGH THE MIST
24. Disorder in the Head
25. Hole in the Wall
26. Geese in the Mist
27. Line on the Palm
28. Alarm clock on the Night Table
---------
Time gifts आणि इतर काही कथांमध्ये फुलपाखरू एकच रूपक वापरले आहे आणि त्यामुळे कंटाळवाण्या वाटल्या. कथांमध्ये नावाप्रमाणे अशक्य गोष्टी आहेतच पण कथावस्तूंमध्ये केलेली वर्णने वाचायला आवडतात.
---------
प्रवासात वाचण्यासाठी कथा चांगल्या आहेत. The cat कथा आवडली. घरामध्ये काही वस्तू असतात त्या बायकोने ( कतरिना)बाजारातून स्वस्तात मिळाल्या म्हणून आणलेल्या. तसेच एक बोका ( संदिग्ध वंशावळीचा असल्याने तोही स्वस्तातला). हा नवरा (Oliver)कधी बायकोबरोबर तसल्या दुकानात गेलेला नसतो आणि तिने आणलेल्या वस्तुंबद्दल त्याला आदर नसतो, थोडासा तिटकारा असतो कारण दुसऱ्याने वापरलेल्या त्याला आवडत नाहीत. खरं म्हणजे तो बोका ( Oscar) ओलिवरच्याच खोलीत झोपत असतो. पण कतरिनाचा मृत्यू होतो आणि त्या बायकोने जमवलेल्या वस्तू आणि बोका ओस्कर यांचे करायचे काय हा प्रश्न निर्माण होतो. तरीही त्यांच्यातले संबंध कसे बदलत जातात ते वाचायला आवडले. ......
* impossible stories >>>>
* impossible stories >>>> रोचक दिसते आहे.
पूर्वी Believe It or Not! बद्दल ऐकले होते. (https://en.wikipedia.org/wiki/Ripley%27s_Believe_It_or_Not!)
तसाच प्रकार का ?
नाही. एक गंमत म्हणून अशक्य
नाही. एक गंमत म्हणून अशक्य घटना गोष्टीत येतात परंतू वाचक त्यातले मर्म समजतोच. मनातले विचार, स्वप्न आणि इच्छा पात्रांना जाणवतात एवढेच. लहानपणी Alice in wonderland पुस्तक वाचल्यावर करमणूक होते बालमनाची तरीही आपण त्या घटना खऱ्या म्हणून कुणी पाहात नाही तसेच.
काही कथांमध्ये फुलपाखरू रूपक आहे त्याबद्दल.. पात्रांची इच्छा व्यक्त करण्यासाठी आहे. एका ठिकाणी बंद काचेच्या तावदानावर धडपडणारे आणि बाहेर पडू पाहणारे फुलपाखरू आपण पाहतोय. तो उल्लेख कथेत काय सुचवतो? तर पात्राला आहे त्या परिस्थितीतून सुटका करून घ्यायची आहे. बरं कथा अशा आहेत की आपण १६-१७-१८-१९-२० व्या शतकांत जात नाही, आताही लागू आहेत.
एक दीड तासाच्या वाचनाची एक एक कथा प्रवासात वाचण्यासाठी उत्तम. मोठ्या कथा कादंबरीत आपल्याला सर्व संदर्भ लक्षात ठेवत वाचन करावे लागते आणि ते दोन चार भागात करावे लागते तेव्हा कधीकधी गाभाही हरवतो.
अच्छा ! समजले
अच्छा ! समजले
आताही लागू आहेत. >>> हे छान.
मागच्या पानावर ज्यांचं नाव
मागच्या पानावर ज्यांचं नाव आलं आहे त्या अंके गौडांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
शेतकर्याचा मुलगा - बस कंडक्टर - कन्नड साहित्यात मास्टर्स पदवी - साखर कारखान्यांत नोकरी - विनाशुल्क असे सर्वात मोठे ग्रंथालय - त्यासाठी घरही विकले
* अंके गौडांना पद्मश्री
* अंके गौडांना पद्मश्री
वा वा ! हार्दिक अभिनंदन
काय जबरदस्त ग्रंथालय केले आहे त्यांनी. हे खरे पुस्तकप्रेम व असोशी.
त्रिवार सलाम !
मराठीतले एक नामवंत पण
मराठीतले एक नामवंत पण लोकप्रिय म्हणता येणार नाही असे एक लेखक निर्वतले, तेव्हा त्यांच्या घरचा पुस्तक संग्रह त्यांच्या मित्रपरिवाराने वाटून घेतला होता अशी बातमी आठवते. नाव आठवत नाही.
माझं बुकशेल्फ अगदी दारासमोरच आहे. तर लोक मला तुम्ही लॉयर आहात का? प्रोफेसर आहात का? लेखक आहात का? असं विचारतात. इतकं घरी मोठ्या संख्येने पुस्तकं असणं तुरळक आहे.
पैसे गोळा करायला येणारी शाळकरी मुलं तर फार इम्प्रेस होतात.
कोणीतरी यातली किती पुस्तकं तू वाचली आहेत, असं विचारल्यावर मात्र मी खरं सांगतो. की निम्म्यापेक्षा जास्त वाचली नसावीत.
लॉकडाउनपासून पुस्तकांची यादी अपडेट करायची राहून जाते आहे.
कॉन्व्हेंट शाळेशी संलग्न असलेल्या एका boys home मध्ये मी शिकवण्या द्यायचो. तर तिथल्या मुलांसाठी मी साधारण ५० पुस्तकांचा एक संग्रह केला होता. मोजकीच चार पाच मुलं पुस्तकं वाचायची. ती पुस्तकं माझ्या मायबोलीवरच्या मित्राला त्याच्या मुलीसाठी दिली. योग्य स्थळी पडली.
घरात पुस्तकांची वेगळी खोली असलेलं मराठी मध्यमवर्गीय घर मला माहीत आहे. वर म्हटलेल्या मित्राकरवी त्यांच्याशी ओळख झाली. त्यातल्या एकाच्या काही कविता मायबोलीवर आहेत. त्या घरी यायचं आमंत्रण कधीपासून पडून आहे.
>>>>He later completed a
>>>>He later completed a Master’s degree in Kannada literature and went on to work at a sugar factory, where he spent nearly three decades. During these years, Gowda made a choice that defined his legacy, he spent nearly 80 per cent of his salary on books.
एकेक जण वल्ली असतात. वाचनाबद्दल, किती आस्था असेल त्यांना.
आपण स्वतः खूप पुस्तके विकत
आपण स्वतः खूप पुस्तके विकत घेऊन ठेवायची या विचारांचा मी अजिबात नाही तरीही काही दीडशे तरी आहेत. कादंबऱ्या पद्धतीची फारतर दहा पंधराच असतील. बाकीची पर्यटन माहिती, भाषेचा अभ्यास अशाप्रकारची. म्हणजे ती अधुनमधून संदर्भ माहितीसाठी लागतात म्हणून घेतलेली. पुस्तकांचा संग्रह किंवा वाचनालय हे सार्वजनिक , सामाजिक गट पद्धतीनेच वाढवायला हवे. मालक बदलणे वाचक बदलणे हे होत राहणार पण सहकारी आयोजनामुळे सातत्य राहते. निधी वाढतो, पुस्तके वाचतात, आयोजन वाटले जाते.
आपापली आवड आणि पुस्तकांची
आपापली आवड आणि पुस्तकांची निगा राखण्यासाठी आपण देऊ शकणारा वेळ यावर व्यक्तिगत ग्रंथसंग्रह अवलंबून राहील.

वाचन - छापील की ऑनलाईन की दोन्हींचा समतोल, यावर
'पसंद अपनी अपनी' . . . एवढेच म्हणता येईल !
१.पुस्तकांची निगा
१.पुस्तकांची निगा
लोखंडी कपाटात ठेवतो . चाळीस वर्षे आहेत, जशीच्या तशी राहतात. आडवीच ठेवतो . सर्वच पुस्तके पुठ्ठा बांधणी नसतात. इतर प्रकार असतात ती उभी ठेवली तर वाटतात, पाने दुमडली जातात. फक्त ती एक साठवण आहे, फोटो काढण्यासाठी नाहीत. वाळवी, असतं काही त्रास होत नाही.
२. महिन्याला चार पुस्तके विकत घेतली तर कमीतकमी पंधराशेचं बजेट हवं. महागडी घेतली तर तीन हजाराचं होईल . वर्षाला तीस हजार हवेत . ( Online free मिळणारी डिजिटल भरपूर आहेत. ती वाचून झाली आहेत आणि अडचण अजिबात नाही.
* आडवीच ठेवतो . >>>> चांगली
* आडवीच ठेवतो . >>>> +१ . चांगली सवय. मी पण
. .
रच्याकने ,
एखाद्या पुस्तकांच्या दुकानात ( 'घरात' ) तरुण-तरुणीचे प्रेम कसे जमते व फुलत राहते (पण . . . ) हे या लघुपटात छान दाखवले आहे :
https://www.youtube.com/watch?v=irruQJtGhMQ
'गाव तेथे ग्रंथालय'
'गाव तेथे ग्रंथालय' पोचवणारा लोकनेता हरपला : माजी आमदार गंगाधर पटणे यांच्या कार्याला मानाचा मुजरा
https://www.lokmat.com/editorial/the-foundation-of-the-library-movement-...
ग्रंथालय क्षेत्रातील लोक त्यांना ‘ग्रंथालयाचे आमदार’ म्हणून ओळखत असत.
लेख वाचला.
लेख वाचला.
बुकस्टोर क्लर्कच्या अनुभवाची
बुकस्टोर क्लर्कच्या अनुभवाची इन्स्टा स्टोरी
खोटी असेलही. पण आवडली.
* आवडली. >>> +१ होय.
* आवडली. >>> +१ होय.
मोठ्या शहरांत होणाऱ्या
मोठ्या शहरांत होणाऱ्या पुस्तक महोत्सवांवर टिपणी करणारा लेख :
https://www.aksharnama.com/client/article_detail/7604
पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे?
“ . . . पण या अशा कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्यांत खऱ्या वाचकांची संख्या किती असते?” . . .
एआयद्वारा पुस्तकांचा बळी
एआयद्वारा पुस्तकांचा बळी
अमेरिकेतील एंथ्रोपिक ए आय या कंपनीचा 'प्रोजेक्ट पनामा' उपक्रम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे.
यामध्ये एआयला प्रगल्भ करण्यासाठी लाखो पुस्तके स्कॅन करून नष्ट करण्यात आली. यानंतर उद्भवलेल्या कायदेशीर वाद आणि लेखकांच्या तीव्र विरोधामुळे आता ते काम थांबवण्यात आलेले आहे आणि लेखकांच्या संघटनेशी समझोता करून त्यांना तडजोडीसाठी दीड अब्ज डॉलर्सची भरपाई देण्याचे कंपनीने मान्य केले आहे
https://timesofindia.indiatimes.com/etimes/trending/inside-project-panam...
१. >>मोठ्या शहरांत होणाऱ्या
१. >>मोठ्या शहरांत होणाऱ्या पुस्तक महोत्सवांवर टिपणी करणारा लेख >>
जयपूर फेस्टिवल खरा पहिला. William Darlymple याचं लेखक म्हणून नाव मोठं आहे. एवढंच काय तर त्याने लिहिलेल्या एका पुस्तकाचं संपादन त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीने करून दिलेलं. ते जाऊ दे तो मोठमोठ्या चर्चेत असलेल्या लेखकांना बोलावतो. त्याच्याशी लोक गप्पा मारतात. निधी फार लागतो. दमदार प्रायोजक लागतात.
२. अक्षरनामाने आवाहन केलेलं दिसलं साईटवर की वाचकांच्या आर्थिक पाठबळावरच प्रकल्प चालवणे शक्य आहे. ( Pay now) ती लिंक उघडल्यावर कळलं की अमूक अमूक एक रक्कम दान द्यायची नसून महिना. सहा/ बारा महिन्याची वर्गणी भरायची आहे.
३. विकीपिडियासुद्धा देणगी मागते. शंभर रुपयांपासून कितीही द्या. ती दिली एकदा. पण नंतर डॉलर किंवा युअरोचा आकडा लिहून येतो तर ते पेमेंट आपल्या पेटिएमने कसे करतात?
* नंतर डॉलर किंवा युरोचा आकडा
* नंतर डॉलर किंवा युरोचा आकडा लिहून येतो
>>> हे काहीतरी नवीन आलेले दिसतंय.
मी पण गेली तीन वर्षे देणगी दिलेली होती तेव्हा आकडे रुपयात टाकूनच दिल्याचे आठवते. त्यांचे जे आवाहन वरच्या भागात होते त्यावर क्लिक करून पुढे गेलो होतो.
Pages