मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वावे,
होय. वाचून बघा.
भैरप्पांच्या पौराणिक/सामाजिक विषयांवरच्या कादंबऱ्या ते संघाचे आहेत या अधिकच्या माहितीच्या उजेडात वाचल्या असल्याने त्याअर्थी फारसा अपेक्षाभंग झाला नाही. Wink

अस्मिता,
प्रतिसाद सुंदर आहे, नेहमीप्रमाणेच.
राम निरंजन न्यारा रे, अंजन सकल पसारा रे>>
ते पुस्तक वाचून झाल्यावर बरीच भजनं आठवली, एकेक करून ऐकली, नव्याने आवडली. पायो जी मैंने रामरतन धन पायो, ठुमक चलत रामचंद्र, मन हो रामरंगी रंगी रंगले, सकल हंस में रामै विराजे, राम का गुणगान करिये, रामनाम ज्याचे मुखी, मंगल भवन अमंगल हारी..‌ वगैरे

संप्रति पोस्ट आवडली. ‘अपने अपने राम’ हे शीर्षकच किती विचारप्रवर्तक आहे. कुणाला रामाची काय छटा दिसेल कुणास ठाऊक. नक्की वाचेन.

अस्मिता तू पोस्टमध्ये काय म्हणतेस ते समजलं पण राम रिलेटेबल नाही वाटत मला. मानवी सुख दुःख भोगूनही तो किंचीत अनॲप्रोचेबल, आदर्श पातळीवरच राहिला.
कृष्ण वारंवार त्याचे अवतारस्वरुप दाखवूनही कधीकधी आपल्याबरोबर खोड्या काढेल असं वाटतं. अर्थात एकेकाळी शिवाची मोहिनी पडली असताना कृष्णही आपलासा वाटू लागला होताच की. मला राम समजायला कदाचित अजून मॅचुरिटीची गरज असावी.

संप्रति, अनया, अनिंद्य, माझेमन Happy

कृष्ण खूपच गुंतागुंतीचा आहे, वरवर तो सर्वांचाच सखा आहे पण तो कुणाचाच नाही. तो खूप आकर्षक आहे, मोहक आहे पण त्याचवेळी निरासक्त आहे. त्याने गोकुळ सोडल्यावर पुन्हा तो गोकुळात कधीही गेल्याचे वाचले नाही. उद्धवा शांतवन कर जा ! स्वतः गेला नाही. एवढे भाबडे गोकुळवासी, कान्हा वर निस्सीम प्रेम करायचे पण हा गेलाच नाही.

गोकुळातून, वृंदावन, मथुरा, मग जरासंधामुळे द्वारका, हस्तिनापुर. तो मागे येत नाही कधी, पूर्णपणे वेगवेगळी आयुष्य जगला आहे. स्वतःच्या मामाला मारलं पण महाभारतात शस्त्र घेतलं नाही. सगळे आधीच मरणार आहेत, सर्वनाश होणार आहे आणि तो मी खरेतर आधीच केला आहे असं तो अर्जुनाला म्हणतो. त्याला माहीत होते की तो परमात्मा आहे. रामाच्या कुठल्याही गोष्टीतून त्याला कधी माहिती होते असे वाटले नाही, त्याला सगळ्या चिंता, भीती, विरह, दुःख या भावनांतून जावे लागले. पण कृष्णाला स्वतःच काळ असल्याने सगळे पुढचे माहिती, त्यामुळे कायम मंदस्मित. हा फार मोठा फरक आहे. भगवद्गीतेतही अर्जुन विचारतो-वासुदेवा, तूच जगन्नियता चतुर्भुज नारायण आहेस का ? तर तो म्हणतो, पार्था, सगळेच माझेच अंश आहेत आणि मी परब्रह्म परमात्मा आहे. (ममैवांशो जीवलोके) तूही परब्रह्म आहेस पण तुला माहीत नाही. तू स्वतःला ओळखत नाहीस. तसं रामाला माहिती नव्हते तो परमात्मा आहे. आपल्याला सुद्धा वाटत नाही आपण परमात्म्याचा अंश आहोत. पण भगवद्गीतेनुसार आपणही आहोतच, पण तरीही इतके दुर्बल, दुःखी हरवल्यासारखे का ?!

त्यामुळे राम आदर्श असला तरी त्याचे "टाकीचे घाव" सोसलेले माणुसपण कधीही दृष्टीआड होत नाही. तो रावणाला तर सोडाच, कधी लक्ष्मणालाही म्हणाला नाही की मी "परब्रह्म परमात्मा" आहे. त्यालाच माहीत नव्हते, तो स्वतःला शोधत होता. कैकयीला त्याने बोलून दाखवल्याचे वाचलेय कुठेतरी. रानावनात तपश्चर्या करून आत्मशोध घेण्याची इच्छा आहे वगैरे.

ह्या आध्यात्मिक आत्ममंथनातून कृष्णाला कधी जावेच लागले नाही, ज्यातून रामाला जावे लागले होते. तो नेहमीच सुखदुःखाच्या पलीकडे होता, खूप involved पण निरासक्त. सगळे नाटक आधीच माहिती असल्यासारखी भूमिका आहे कृष्णाची. बायको कुणी पळवणार नाही माहीत आहे, आपल्या कुळाचा विनाश कधी होणार माहिती आहे, भाचा अभिमन्यू कसा मरणार हे सुद्धा आधीच माहिती, गांधारी शाप देणार आहे आणि तो आपण घ्यायचा आहे हे सुद्धा आधीच माहिती. त्यामुळे त्याला भीतीच नाही. अक्षरशः नाटक उभं करून मन लावून उत्तम रोल केल्यासारखे आहे. पण नट कॅरेक्टरच्या सुखदुःखापासून अलिप्तच राहतो तसं. आपल्याला सुद्धा सहजासहजी कळत नाही, कारण ह्या नाटकापासून विभक्त असं त्याचं रूप फक्त गीतेत आहे. नेमकी गीतासुद्धा कृष्णापेक्षा मोहक नाही.

त्यातली वैचारिक भूमिका आपण समजून घ्यावी म्हणून ह्या व्यक्तिरेखा (ईश्वर माना न माना) तशाच असतील. कोण जास्त पटतं , आवडतं एवढं महत्त्वाचं नाही. कारण आपल्या स्टेजेस प्रमाणे ते बदलत जाते. पण व्यक्तिरेखांचे पृथ्थकरण केल्यास हे फार प्रकर्षाने जाणवते. राम आध्यात्मिकदृष्ट्या खूप पुढे गेलेला होता म्हणून शबरीने त्याच्या मांडीवर प्राण सोडले. ती त्याची वाट त्यासाठी पहात होती. आपण जे जन्मोजन्मीचे अध्यात्माचे लॉजिक पाहिले तर रामाच्या वरचा आहे कृष्ण, ते सुद्धा सेन्स करते. यातनांमधून गेल्यावर मिळालेलं ईशत्व. हे खूप इंटरेस्टिंग वाटल्याने मी खूप विचार केला होता दोघांचाही, त्यावरून लिहिले.

हे खूप इंटरेस्टिंग वाटल्याने मी खूप विचार केला होता दोघांचाही, त्यावरून लिहिले.>>
तुमच्या मनाला छान विचार करता येतो, अस्मिता. हे अवघड असतंय असं ऐकलेलं-वाचलेलं व्यवस्थित पचवता येणं आणि त्यातून सारासार विचार एकेक करून मांडता येणं.
तुमची पोस्ट वाचता वाचता क्षणभर मी काय लिहिलं होतं तेच विसरून गेलो. Happy

संप्रति,
नरहर कुरुंदकरांचं एक वाक्य आहे. मला ते अतिशय आवडतं. 'आपल्या बापाची सगळीच्या सगळी मतं पटणं हा मी एक प्रकारचा आंधळेपणा समजतो आणि आपल्या बापाचं कुठलंच मत न पटणं हा मी दुसऱ्या प्रकारचा आंधळेपणा समजतो.'

अर्थात कुरुंदकरांचं हे मतही आपल्याला पटलं पाहिजे असं नाही Happy
पण मला पटतं. एखादा माणूस संघाचा आहे किंवा कम्युनिस्ट आहे किंवा अजून कुठल्या विचारधारेचा आहे अशी (बरोबर किंवा चुकीची) माहिती आपल्याला असली तर त्या माणसाचं सगळं काम त्याच चष्म्यातून बघणं हे अन्यायकारक आहे. एस.एल.भैरप्पा 'संघाचे' असा शिक्का मारणं सोपं आहे. हे बरोबर की चूक ते जाऊ द्या. जरी ते खरोखरच 'संघाचे' असतील तरी त्यांच्या सामाजिक/पौराणिक विषयांवरच्या कादंबऱ्या त्याच रंगाच्या उजेडात वाचणं हे वाचक म्हणून संकुचित असण्याचं लक्षण आहे असं माझं मत आहे.
(उत्तरकांड सीतेच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं आहे आणि मला अतिशय आवडलेलं पुस्तक आहे.)

चुकून दोनदा पोस्ट झाला प्रतिसाद.

अस्मिता प्रतिसाद आवडला.

मला कृष्ण नेहमी एखाद्या संपन्न रिपब्लिकन राज्याचा लोकप्रिय श्रीमंत आणि इंटेलेक्चुअल इन्फ्लुएन्सर/नेता न्यू यॉर्क मधे जाऊन तिथल्या अभिजनांवर इन्फ्लूअन्स टाकून त्यांच्याहून मोठा आणि देशभर लोकप्रिय होतो आणि नंतर वॉशिंग्टन DC हलवून टाकतो असे काहीसे इमॅजिन होते. भले रेड इंडियन किंवा इतर नेतीव्हांचे त्याने क्रूरपणे जीनोसाईड केलेले का असेना, त्याचे उर्वरित पब्लिक खरेतर कौतुकच करते कारण सगळे नरेटिव आपल्या बाजूने करायचे कसब या कृष्णाला पुरेपूर जमलेले असते. मूळ स्वभाव क्रूर आणि हिंसक नसला तरी इंटेलेक्ट मात्र प्रचंड भारी, यारोंका यार, फ्लॅम्बॉयन्ट, अर्जुनाशी केलेला अत्यंत उत्कट ब्रोमान्स, कृष्ण अर्जुन आणि द्रौपदी हे त्रिकूट आणि त्यांची केमिस्ट्री, त्यांचे पॉवर प्ले, पांडवांना exile मधे धरून ठेवणे आणि नंतर सत्ता मिळवून देणे (by proxy ती त्याच्या शब्दाबाहेर नसणे) आणि त्यातून अलूफ होऊन स्वतः लिजंड होणे इत्यादी इत्यादी...आणि या सगळ्यात "नितांतसुंदर एकटे" होणे.

रामकथा एकूण फारच sad ड्रामा आहे.

संप्रति Happy /\
जि, ध आणि रॉय, थॅंक्यू.
रॉय, कुठलीही पौराणिक व्यक्तिरेखा त्याच्या इतकी बुद्धिमान नाही, इतर कुठलीही देवता सुद्धा त्याच्याइतकी आकर्षक आणि कुटील नाही. राम आणि सीता यांचं आयुष्य दुःखातच गेलं (individually सुद्धा). रामायण दुःखदच आहे. पुन्हा, पुन्हा पहावं वाटत नाही. महाभारत कितीही वेळा पहाता येते. कारण दुष्ट, कुटील, बुद्धिमान, छद्मी लोक भरपूर आणि महाभारत मोठ्या स्केलवर येत असल्याने दरवेळी काही तरी नवीन सापडतं. चांगली, प्रेमळ, त्याग करणारी लोक लगेच बोअर होतात, दुष्ट, इंटेलेक्च्युअली कॉम्प्लेक्स, स्वार्थी, बेभरवशाची लोक इंटरेस्टिंग वाटतात. Happy

जयवंत दळवींचे परममित्र, किरण गुरवांचे जुगाड, नितिन वैद्यांचे वाचून उरणारी पुस्तके - ही तीन पुस्तके गेल्या दोन-तीन आठवड्यात वाचली.
गुरवांचे जुगाड त्यांच्या शब्दचित्रशैलीमुळे आवडलेच आवडले. या लेखकाने कादंबरी प्रकार नेमाने हाताळायला हवा. यावर सविस्तर लिहीन.
परममित्र मध्ये दळवींच्या लेखणीची ताकद दिसते. फक्त गुडी गुडी न लिहिता ते त्यांचे मत परखडपणे पण उद्धट/मानहानी करणारे होणार नाही असे लिहितात. फक्त आता त्यातले लेखक, ते संदर्भ सर्वच फार जुने वाटू लागले आहे. एकूणच समाजाचा वेग इतका वाढला आहे की ५० वर्षांपुर्वीचे संदर्भ प्राचीन वाटू लागले आहेत.

के के मुहम्मद यांचे अ‍ॅन इन्डियन आय अ‍ॅम हे आत्मचरित्र वाचले. त्यांना एक चांगला संपादक भेटायला पाहिजे होता. त्याच त्याच गोष्टींची पुनरावृत्ती पुस्तकभर झाली आहे. तसेच पुस्तकाचा मोठा भाग हा त्यांच्या व इरफान हबीब आणि इतर डाव्या इतिहासकारांच्या वितुष्टावर खर्चलेला आहे ज्याचे अजीर्ण होते. वाटते या लोकांनी केवळ हे विद्यापिठीय राजकारणच केले की काय? के के अहमद तसेच इतर पुरातत्वशास्त्रज्ञ, इतिहासतज्ज्ञ यातून खुजे वाटू लागले. या तृटी सोडून ए एस आय सारख्या संस्थेत काय काम होते, त्याचा पर्यटन उद्योगावर होणारा थेट परिणाम, प्राचीन इतिहासाची प्रामाणिक मांडणी केली तर समाजाच्या आजच्या भीषण जिन्गोइझमला उत्तर मिळेल ही धुसर आशा असे अनेक चांगले पैलू पुस्तकातून पुढे येतात. अकबराचा इबादत खान्याचा शोध हे पहिले प्रकरण चांगलेच इंटरेस्टिंग आहे.

>>>>>> प्रेमळ, त्याग करणारी लोक लगेच बोअर होतात, दुष्ट, इंटेलेक्च्युअली कॉम्प्लेक्स, स्वार्थी, बेभरवशाची लोक इंटरेस्टिंग वाटतात. Happy
खरे आहे.गॉन विथ द विंड मधे मेलनी भयंकरच बोअर होते. याउलट स्कार्लेट काय मस्त रंगवली आहे. तिच्या स्वभावाचे, नित्यनूतन पदर उलगडत जातात.

>> कारण दुष्ट, कुटील, बुद्धिमान, छद्मी लोक भरपूर आणि महाभारत मोठ्या स्केलवर येत असल्याने दरवेळी काही तरी नवीन सापडतं. <<

अगदी अगदी.
मी एका हळव्या मनाच्या लेखकाला खूप शिव्या घातल्या तर तो मला म्हणाला तू एक नीच माणूस आहे, एवढं चांगलं लिहितोस मात्र नीच आहेस.

मी म्हणालो, च्यायला लिहिणाऱ्या माणसांनी नीच असू नये काय, काय त्रास आहे साला.
मला पण (समाजासाठी) त्याग वगैरे करणाऱ्या लोकांचा खूप लवकर उबग येतो. रेकिग्निशनची खाज त्यांच्यातही असते मात्र ते सोयीस्करपणे सतत लपवत बसायची धडपड करत राहतात ते एकदा कळलं की त्यांच्यातला इंटरेस्ट संपून जातो.

अस्मिता अफाट चिंतन करतेस गं. एकदम ओरिजनल. >>> अगदी अगदी. तुला ते मांडताही छान येतं, शब्दबद्ध छान करतेस.

रामाने सीतेचा त्याग केला ही मात्र मला न पटणारी गोष्ट आहे. असो खूप अवांतर होईल इथे.

अस्मिता, फार सुंदर लिहीले आहेस. यावरचे वाचन, त्यानंतरही केलेला विचार व पॅशन जाणवते.

रामाच्या बाबतीत मर्यादापुरूषोत्तम म्हणून "बार" वर सेट केलेला आहे. त्यामुळे मग सीतेला अग्निपरिक्षा द्यावी लागणे, त्यानंतरही तिचा त्याग वगैरेवर प्रश्न पडतात. याउलट कृष्णाच्या बाबतीत तर लक्ष्य योग्य असेल तर ते साध्य करण्याकरता काहीही केले तरी चालेल असा त्याचा अ‍ॅप्रोच वाटतो. कर्तव्याच्या बाबतीत कृष्णाने दिलेल्या उपदेशावर असलेली "माना मानव वा परमेश्वर" आणि "विमोह त्यागुनी कर्मफलांचा" ही दोन्ही गाणी मला प्रचंड आवडतात.

बाय द वे, नितीश भारद्वाजचा कृष्ण एकदा पाहिला की त्यानंतर कृष्ण म्हंटल्यावर तोच आठवतो. कृष्णाला एक मिश्किल टच त्याने फार मस्त दिला होता.

माना मानव वा परमेश्वर हे माझंही प्रचंड आवडतं गाणं. मला नितीश आणि नंतर महाभारत आलं त्याबद्दल इथे एक धागा होता, त्यातला कृष्णही आवडला, सुरुवातीला मला नवीन आवडेल की नाही शंका होती कारण नितीश भारद्वाज प्रचंड आवडलेला, नंतर दुसराही आवडला.

नीतिश भारद्वाज आपल्या पिढीचा कृष्ण. ती भुमिका त्याने आयकॉनिक केली आहे. पण लॉकडाऊनमध्ये एकता कपूर कृत महाभारत बघितलं आणि सौरभ राज जैनही आवडायला लागला कृष्ण म्हणून.

फारच अवांतर करतेय तरीपण….
मध्यंतरी एका रेस्टॉरंटच्या बाहेर नीतिश दिसला होता. जनरली मी सेलिब्रिटीबरोबर फोटो वगैरे काढत नाही पण याला रिक्वेस्ट करावी का असा विचार चालला होता. नवरा म्हणाला की तो त्याच्या पर्सनल वेळात आलाय ना मग नको. या भानगडीत त्याला समजलं की आम्ही त्याच्याविषयी बोलतोय. त्याने त्याचं खास कृष्णस्टाईल स्माईल दिलं. दिन बन गया…

>>>>>>>>>त्याला समजलं की आम्ही त्याच्याविषयी बोलतोय. त्याने त्याचं खास कृष्णस्टाईल स्माईल दिलं. दिन बन गया…
क्या बात है!! काय गोड दिसलेला तो कृष्ण म्हणुन.
आता सिएनेमा प्रोड्युस केलाय ना त्याने - तो तनुजावाला ऋणानुबंध का काहीतरी.

छान लिहिलंयस, अस्मिता. Happy
माझं मत कृष्णालाच कायमच.

बाय द वे, एरवी इतक्या निर्मम असणार्‍या कृष्णाची एकच हळवी बाजू खरंच अर्जुनच होता. इरावतीबाईंच्या 'युगान्त'मधलं याबाबतचं विवेचन मला पटतं आणि फार आवडतंही.

>> पण लॉकडाऊनमध्ये एकता कपूर कृत महाभारत बघितलं आणि सौरभ राज जैनही आवडायला लागला कृष्ण म्हणून <<

हा एकदमच तुपात घोळवून काढलेला मऊ मेणाहूनी कोरियन तरुणांचे भारतीय वर्जन छापाचा नेपो किड गुजराती स्किनटोनचा शोभेचा कृष्ण वाटतो.

माझ्याकडे बा अ भिडे आणि य गो जोशी यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरीवरची पुस्तकं आहेत. पण मला अजून एखादं वाचायचं आहे -
मूळ श्लोक्, त्यातल्या संस्कृत शब्दांचे अर्थ, मग ज्ञानेश्वरीतल्या ओव्या, त्यातल्या शब्दांचे आजच्या भाषेतले अर्थ आणि मग आजच्या मराठीतून निरुपण असे पुस्तक कोणते आहे का ? सध्या प्रिण्ट मधे असलेले आणि मुंबई किंवा पुण्यात मिळू शकेल असे कुठले आहे ?

राम, कृष्ण चर्चा वाचली. इथे अवांतर होईल.
सर्वांच्या मतांचा आदर आहे. माझी मतं कदाचित आवडणार नाहीत.
नंतर कधीतरी.

एकता कपूर कृत महाभारत बघितलं आणि सौरभ राज जैनही आवडायला लागला कृष्ण म्हणून < >>>> सौरभ जैन होता ते वेगळं महाभारत आहे. ते स्टार प्लस ने खरोखरच छान केले होते. पण ते एकता कपूर चे नव्हे.
एकता कपूर चे जे "कहानी हमारे महाभारत की" आले होते ते तिच्याच नेहमीच्या पेटंट लोकांना घेऊन केलेला एक जोक होता महाभारताच्या नावाखाली..

सौरभ जैन होता ते वेगळं महाभारत आहे. ते स्टार प्लस ने खरोखरच छान केले होते. पण ते एकता कपूर चे नव्हे. >>> अगदी अगदी. एकताबाईंचा एकही एपिसोड बघू शकले नाही मी.

मला समजलेले महाभारत,रामायण ,त्यातल्या व्यक्तिरेखा वगैरे असंख्य लेखकांनी( त्यात नावाजलेले आहेत काही) पुस्तके लिहिली आहेत. ती मी वाचत नाही.

Pages