पक्षीनिरीक्षण - Hermit Thrush आणि अमेरिकन रॉबिन

Submitted by वर्षा on 21 October, 2025 - 22:44

Hermit Thrush

हा पक्षी माझा अजून एक लाडका पक्षी. Hermit Thrush. स्केचिंगसाठी हा योग्य होताच पण तरीही याच्याबद्दल आधी लिहावे आणि मग स्केच काढावे असे ठरवले होते. पण उलट झाले आणि माझे स्केच आधी काढून झाले आणि आत्ता त्याच्याबद्दल लिहायला घेतलेय. त्यामुळे या लेखात त्याचे स्केच आणि फोटो दोन्ही असतील.

गंमत म्हणजे मागील वर्षी काढलेल्या एका फोटो रेफरन्सवरुन स्केच करायला घेतले आणि मी मनात म्हणतच होते की ऑक्टोबर आलाय, तर आता हा दिसायला हवा. गंमत म्हणजे स्केच पूर्ण झाल्याच्या दिवशीच सिझनच्या पहिल्या हर्मिट थ्रशने मला दर्शन दिले! योगायोगच.

रंगीबेरंगी नसला तरी चॉकलेटी-विटकरी रंगाची चमकदार पिसे असलेली पाठ आणि गळ्यापासून पांढर्‍या रंगावर गडद चॉकलेटी रंगाच्या ठिपक्यांच्या नक्षीची सुरुवात होऊन ती छाती-पोटावर उतरेपर्यंत फिकट होत जाते ते फार मनोहर दिसतं. काळ्या मण्यांच्या डोळ्यांनी अंदाज घेत घेत पाण्यात डुंबायला याला फारच आवडतं.

शेपटी वर उडवत टुणटुण उड्या मारणे याची सिग्नेचर अ‍ॅक्शन आहे. त्या स्थितीतले त्याचे चोचीपासून शेपटीच्या टोकापर्यंत बाक आलेले शरीर इंग्रजी U अक्षरासारखे दिसते.

Thrush म्हणजे मराठीत कस्तूर. हा अगदी हिवाळ्याची, सुखद थंडीची चाहूल लागते तसा येऊ लागतो ते पार जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत येत राहतो.

अमेरिकन रॉबिन
पक्ष्यांसाठी पाणी ठेवायचा निर्णय घेतल्यानंतर मी एक साधारण दहा इंच व्यासाची थाळी आणली आणि त्यात काठोकाठ पाणी भरुन ठेवू लागले. फिंच, जुन्को चिमण्या वगैरे येऊ लागल्या होत्या. एक दिवस अचानक गॅलरीतून 'टोक टोक' असा आवाज येऊ लागला. बघितलं तर केशरी पोटाचा एक मोठा, ढब्बू पक्षी पाण्यात उतरुन, मान खाली करुन, पाण्यात चोच मारुन, पंख फडफडवून पाणी उडवायचा प्रयत्न करत होता. पाण्यात त्याचे पाय जेमतेम बुडत होते. पाण्याचा हा स्विमिंग पूल त्याला फारच छोटा पडत होता ते सरळच दिसत होतं. तर या थाळीसमवेत, आणखी मोठ्या व्यासाची थाळी आणायला कारणीभूत ठरला तो हाच पक्षी - अमेरिकन रॉबिन.

आता रॉबीनसाठी स्पेशल मोठी थाळी आणल्यावर न्यूटनसारखे होण्याची फारच शक्यता होती. म्हणजे, मोठ्या मांजराला यायला जायला मोठी खिडकी आणि छोट्या पिलासाठी छोटी खिडकी असे जरी केले तरी मांजरांनी ते समजून उमजून योग्य तीच खिडकी वापरण्याची शक्यता किती? त्यामुळे, मोठी थाळी - त्यात जास्त पाणी, थाळी जास्त खोल, असे जरी असले तरी रॉबिन्सना ते कळणार होते का?
पण सुदैवाने कळलं काहींना. Proud खाली फोटोत दिसतेय ती मोठ्या व्यासाची थाळी आहे. यातच मी वॉटर फाऊंटनही ठेवते. बहुतेक रॉबीन्स अंघोळीसाठी तरी यातच उतरतात.

हा माझ्याकडे येणारा एक बर्‍यापैकी मोठा आणि बोजड पक्षी आहे. हा काही ठराविक महिन्यातच येतो. आजूबाजूंच्या पार्कातही हिरवळीवर गांडुळे किंवा इतर किडेमकोडे शोधत फिरताना अनेकदा दिसतो. साधारण स्प्रिंग (एप्रिल पासून पुढे) ते समर (जुलैपर्यंत). नंतर गायबच होतो. तेव्हा कळलं की हा स्थलांतर करणारा पक्षी असल्याने हिवाळा येऊ लागला की दक्षिणेकडे स्थलांतर करतो.

याच्या डोळ्यात मला नेहमी काहीश्या अविश्वासाचे, संशयाचे भाव दिसतात. खरं म्हणजे पाण्याचा एकदा सुगावा लागल्यानंतर बरेच पक्षी नियमितपणे येताना दिसतात, निदान काही दिवस, महिने तरी. रॉबिन्सही न चुकता रोज येतातच, पण 'येऊ की नको', 'नुसतं पाणीच प्यावं की थोडं डुंबावं पण?" असले विचार करत असल्यासारखे दबकत येतात सुरुवातीस. नंतर मग जरा कॉन्फिडन्स आला की टुणटूण करीत पाण्याशी येतात.

यांचा केशरी रंग म्हणजे अगदी लाल भोपळ्याच्या फोडी असतात ना, थेट तीच शेड वाटते मला. गोल मण्यांसारख्या डोळ्यांभोवती पांढरे आयलायनर लावल्यासारखे दिसते. पिवळी चोच. छाती-पोटावर खवल्यांसारखी पिसे असतात, त्याचा पॅटर्न सुरेख दिसतो.

फोटोंपेक्षा त्यांच्या व्हिडिओ क्लीपाच (शॉर्ट्स) मी जास्त काढल्यात.
रॉबीनची टुणटुण चालआणि रॉबिनची आंघोळ पहा. Happy

क्रमशः
या सिरीजमधील आधीचे लेखः
छंद पक्षीनिरीक्षणाचा - Window birding!
पक्षीनिरीक्षण - फिंच!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आज मॉर्निंग वॉक घेताना, मर्लिन ऑन ठेवले. मला फक्त ब्लु जेय , चिमणी, कावळे, आणिकाही काळे पक्षी दिसले.
पण मर्लिनला कार्डिनल, थ्रश, काऊहेड आणि काहीकाही ऐकू आले.
हां पण इथे काऊहेडची मादी खूपदा पाहीलेली आहे. नर नाही दिसलेला.
काल तळ्याभोवती चक्कर मारली, हंस, मॅलार्ड, कासवे, ब्लु जेय व रॉबिन्स, काही बदके दिसली.

>>>>>>>>>फोटोंपेक्षा त्यांच्या व्हिडिओ क्लीपाच (शॉर्ट्स) मी जास्त काढल्यात.
रॉबीनची टुणटुण चाल व आणि रॉबिनची आंघोळ पहा. Happy
क्या बात है! आंघोळ म्हणजे आनंदाची परिसीमा दिसतेय Happy किती गोडपणा उतु चाललाय.

आउटडोअर्स, कोस्टरिका आणि कोलोम्बिया ट्रिप कोणाबरोबर केल्या होत्या त्याचा नंबर देणार का? भारतीय ट्रिप प्रोवायडर बरोबर ट्रिप करायचे मनात आहे या दोन - तीन ठिकाणांची.

काऊहेड

>>

@धनश्री, ब्राउन हेडेड काउ बर्ड म्हणायचे आहे बहुतेक तुम्हाला. नराचे डोके मानेपासून वरती चॉकलेटी रंगाचे असते. बाकी शरीर करड्या.

>>>>>त्या स्थितीतले त्याचे चोचीपासून शेपटीच्या टोकापर्यंत बाक आलेले शरीर इंग्रजी U अक्षरासारखे दिसते.
हे असे नीरीक्षण फक्त एक चित्रकार करु शकते/तो.

डार्क आइड जुन्को - कालपरवाच एका बर्ड ग्रूपवर एक बाई म्हणत होती ती की आता कॅलिफोनियात जुन्को दिसणं कठीण, सगळ्यांनी स्थलांतर केलं असेल, पण माझ्या बर्ड बाथव्र अगदी आजच आला होता एक.
आडो: सांबारवडीला करते मी फॉलो आधीपासूनच. आणि फेबमधला तुझा हा लेख माझ्या नजरेतून कसा काय सुटला देव जाणे. थॅक्स - शेअर केलीस लिंक त्याबद्दल, तिथेच प्रतिसाद देईन.
मामी, धनश्री धन्यवाद!

Pages