छंद पक्षीनिरीक्षणाचा - Window birding!

Submitted by वर्षा on 2 October, 2025 - 01:00

Window birding अर्थात पक्षी बघायला मुद्दाम कुठेही न जाता, घरबसल्या, खिडकीतून दिसणार्‍या पक्ष्यांना बघणे! नुसत्या डोळ्यांनी बघा, कॅमेर्‍यातनं बघा किंवा दुर्बिणीतून. खिडकीतून दिसतायत ना, मग अजून काय हवं?

असे हे Window birding मला तसे नवीन नव्हते. भारतात लहानपणी सोसायटीत पुष्कळ झाडे असल्याने खिडकीतून बरेच पक्षी दिसायचे. पण हे अमेरिकेत कधी नशिबात असेल असे वाटले नव्हते. कारण पक्षीनिरीक्षणासंदर्भातले सर्व मर्फीज लॉज हे कायमच लागू पडत आलेत. म्हणजे उदा. कॅमेरा किंवा दुर्बिणीसकट, मोक्याच्या ठिकाणी मोक्याच्या वेळी पोचलात की एकही पक्षी न दिसण्याची गॅरंटी. आणि सहज चालायला बाहेर पडावे (कॅमेर्‍याविना) की बरोब्बर हवे असलेले पक्षी दिसणे (विशेषतः Lifer - म्हणजे एखादा पक्षी आयुष्यात प्रथमच दिसणे) आणि त्यातही कहर म्हणजे त्यांनी बराच वेळ एकाच जागी राहून दर्शन देणे, वगैरे प्रकार घडतातच.

त्यामुळे घरबसल्या पक्षी कसे काय दिसणार असं वाटतच असे. पण आता सध्या मी त्यादृष्टीने फारच नशिबवान ठरले आहे.
सध्याच्या माझ्या अपार्टमेंटच्या Patio म्हणजे गॅलरीत मी पक्ष्यांसाठी पाणी आणि त्यात एक छोटे फाऊंटन ठेवले आहे. जवळपास वीसहून जास्त प्रकारचे नॉर्थ अमेरिकन पक्षी तिथे हजेरी लावतात! अर्थात वर्षभरात काही रोज येणारे/नेहमी आढळणारे (कॉमन) पक्षी त्यात आहेत आणि काही स्थलांतर करुन येणारे पाहुणेही आहेत! (हे वीसेक पक्षी माझ्या बर्ड बाथवर येतात. याव्यतिरिक्त काही पक्षी हे मी घरामागच्या कम्युनिटी पार्कात किंवा सिटीत नेहमी बघते. ते मात्र अजूनपर्यंत एकदाही बर्ड बाथवर आलेले नाहीत. का माहित नाही. त्यांच्याविषयीही पुढे लिहिनच.)

इतके सगळे पक्षी येण्याचे मुख्य कारण म्हणजे अर्थातच झाडे! गॅलरीच्या दोन्ही बाजूंना दोन झाडे आहेत ज्यांनी गॅलरीवर छत्र धरले आहे. (ही लेमनवुड व कॅलरी पेअरची झाडे आहेतअसं मला गूगल लेन्सने सांगितले. त्यापेकी पेअरच्या झाडाला अर्ली स्प्रिंग (फेब-मार्च) चेरी-प्लमसदृश पांढर्‍या फुलांचा बहर येतो आणि फॉलमध्ये पाने लाल-पिवळी होऊन पुढे झाडे एकदम पर्णहीन होतात. लेमनवुड मात्र वर्षभर सदाहरित असते).

तर मुख्य म्हणजे या दोन झाडांमुळे तसेच कम्युनिटीत असलेल्या एकंदरीत झाडांमुळे, हिरवळीमुळे आणि कम्युनिटीच्या अगदी मागेच असलेल्या मोठ्ठ्या पब्लिक पार्कमुळे इथे पक्षी बर्‍यापैकी आहेत हे आल्याआल्याच जाणवलं होत. त्यात हाऊसफिंच, चिकाडी पहिल्या भेटीतच ऐकू आल्या, दिसल्या. पहिल्या दिवशी, विना फर्निचरच्या त्या घरात लिविंग रुममध्ये जमिनीवरच मॅट्स टाकून झोपलो होतो. लिविंग रुमची गॅलरीला फेसिंग बाजू ही फ्रेंच विंडोंची आहे. त्यातून गॅलरीवर झुकलेले दोन्ही वृक्ष सुरेख दिसतात. सकाळी किलबिलाटानेच जाग आली. गोल्डफिंच फार गोड शीळ घालतात. ते ऐकून फार छान वाटलं. गॅलरी बर्‍यापैकी ऐसपैस आहे. त्यामुळे त्यात थोड्याफार झाडांच्या कुंड्या आणि एक बर्ड फीडर लावावे असे ठरवले.

यथावकाश झाडे आली. मागोमाग एक बर्ड फीडर आणले आणि त्यात बर्ड सीड्स भरुन ठेवल्या.

फार वाट बघावी लागली नाहीच. हाउसफिंच, गोल्डफिंच, आणखी एका प्रकारची चिमणी, या पक्ष्यांनी त्याचा ताबा घेतला आणि नळावरील भांडणे टाईप वादावादी, मार्‍यामार्‍या होऊ लागल्या. त्याहीपेक्षा सीडस, धान्य खाली प्रचंड प्रमाणात सांडू लागले. शिवाय खारीही कमी नव्हत्याच. एकदा बर्ड सीड्सची प्लॅस्टीकची पिशवी तिथेच खाली राहिली. त्याची झिप व्यवस्थित बंद होती तरीही खारुताईंनी त्यावर आक्रमण करुन भोके पाडून आपला कार्यभाग साधला होताच. त्यातच लक्षात आले की असे सांडलेले धान्य रोजच्या रोज साफ करण्यात जराजरी दिरंगाई झाली की तिथे उंदरांचे आगमन होऊ शकते! एकंदरीत विचार करता, बर्डफीडर प्रकरण हाय मेन्टेनन्स असल्याने, विचारांती काढून टाकले.

कम्युनिटीच्या मागेच पब्लिक पार्क आहे. तिथे एकदा मॉर्निंग वॉक करत असताना, तिथेल्या वॉटर फाऊंटन्सच्याभवती सांडलेल्या पाण्याजवळ दोन निळे पक्षी (Western bluebird) पाणी पिताना दिसले आणि पटकन विचार आला की अरेच्चा, गॅलरीत पक्ष्यांसाठी पाणी ठेवू शकतो की! पक्ष्यांना पाणी प्यायला, त्यात डुंबायला आवडतंच. शिवाय उन्हाळ्यात इथे कधीकधी शंभरच्या जवळपास (३५ सेल्सिअसपेक्षा जास्त) तापमान जातंच तेव्हा पाण्याच्या स्रोतांची जास्त गरज असेल.

लागलीच अ‍ॅमेझॉनवरुन एक पसरट थाळी मागवली. पाणी भरुन ठेवले आणि मग चालू झाला पक्ष्यांचा खूप आनंद देणारा, सुखावणारा सिलसिला!

या भागात सर्वसाधारणपणे आढळणारे फिंच, चिमण्या वर्गीय पक्ष्यांपासून स्थलांतर करुन येणारे हंगामी पाहुणे अगदी सोफ्यावर बसल्याबसल्या मनसोक्त पहायला, ऐकायला मिळाले, मिळत आहेत!
अजून एखादी मोठ्या व्यासाची थाळी आणावी असे वाटले आणि मग त्यात एक छोटे वॉटर फाऊंटन्/पाण्याचा पंप ठेवावा असेही वाटले आणि मग ते ताबडतोब अमलात आणले. सौर उर्जेवर चालणारे कारंजे आधी आणले. ते चांगले होते पण ढगाळ हवेत निरुपयोगी ठरले. मग हे अन ते प्रयोग करता करता एका विजेवर चालण्यार्‍या साध्या वॉटर पंपवर आता स्थिरावले आहे. त्यावर आणखी कारंज्याच्या भोकांचे टोपण लावले की छान छोटे कारंजे तयार होते. थाळ्यांवर एखादी बारकी काठी ब्रिजसारखी आडवी ठेवून दिली. एखाददोन दगड/गोटे ठेवले.

या सर्व गोष्टींनी अप्रतिम रिझल्ट्स दिलेत. मोठ्या थाळ्याचा व्यास मोठा आहे तशीच त्याची खोलीही किंचीत जास्त आहे. गोल्डफिंचसारखे बारके, नाजूक पक्षी अशा खोल पाण्यात पटकन उतरत नाहीत. त्यावर मग एखादी काठी असली किंवा दगड असला तर त्यावर उभं राहून पाण्यात फर्र फर्र करत पंख फडफडवायला त्यांना भारी आवडतं. अमेरिकन रॉबीनसारखे तुलनेने मोठ्या आकारचे पक्षी अश्या पाण्यात सहज डुंबतात. वॉटर पंपमुळे पाण्याचा जो आवाज येतो (खळखळाटासारखा) त्यामुळेही पक्षी अगदी नक्की जास्त प्रमाणात येतात. माझ्या गॅलरीचे जे ग्रील आहे, ते जिथे काटकोनात मिळते, तिथेही मी एक लांबलचक काठी ब्रिजसारखी तारेने बांधली आहे. नव्याने येणार्‍या पक्ष्यांना, खाली पाण्याच्या थाळ्यांवर थेट उतरण्यापेक्षा, आधी त्या काठीवर बसून, मान वेळावत इकडचेतिकडचे निरीक्षण करुन, सुरक्षिततेची खात्री पटल्यावर मगच खाली पाण्यावर उतरायला आवडतं. तसंच पाण्यात डुंबल्यानंतर पंखांची फडफड करुन अतिरिक्त पाणी झाडायला, अंग-पिसे साफसूफ करत बसायलाही हीच काठी काही पक्ष्यांना फार आवडते. काही पक्ष्यांना मी त्यावर चक्क व्यवस्थित विश्रांती घेतानाही बघितलंय.

थाळ्यांमध्ये अर्थातच शेवाळं जमतं, पक्ष्यांच्या आंघोळींमुळे पाणी गढूळ होतं. वरतून झाडांची पाने पडतात (पानगळीच्या दिवसात तर सततच). खारी वगैरे एका खेपेत भरपूर पाणी पिऊन जातात त्यामुळे पाण्याच्या पातळ्या कमी होतात. वॉटर पंपमध्ये, कारंज्याच्या भोकाभोकांच्या टोपणात पिसं, किंवा इतर कचरा अडकतो.
त्यामुळे या थाऴ्या वारंवार स्वच्छ घासून पसून, ताज्या पाण्याने भरुन ठेवाव्या लागतातच. वॉटर पंप साफ करावा लागतो. आसपास वरच्या झाडांची पाने सतत पडत असतात, ती साफ करत रहावी लागतात. पण पक्षीनिरीक्षणाच्या या छंदातून मिळणार्‍या आनंदापुढे हे काहीच नाही हो! सकाळी उठून लिविंग रुममध्ये आलं की प्रथम पक्ष्यांच्या थाळ्या तपासायच्या, वॉटर पंप चालू करायचा हे माझं रोजचं रुटीन. त्यांनंतर चहाचा कप घेऊन बर्ड बाथवर येणार्‍या पहिल्या गोल्डफिंचला किंवा जुन्को स्पॅरोला हॅलो म्हटलं की दिवस छान जातोच.


"American Goldfinch"

जसजसे पक्ष्यांचे प्रकार जास्त प्रमाणात दिसू लागले तसे वाटले की यांची नोंद करुन ठेवावी. एखादा नवीन पक्षी दिसला की त्याचा इंटरनेटवर शोध घेऊन नाव हुडकायचं. कधीकधी फोटो काढायलाही वेळ मिळत नाही, तेवढ्यात तो उडून जातो. तेव्हा नंतर त्याचे रंगरुप आठवून, त्या वर्णनावरुन शोध घ्यायचा. घरच्यांनाही आता याची सवय झालीय. मी बाहेर चालायला गेले असताना नेमका Western tanager हा नितांतसुंदर पक्षी बर्डबाथवर येऊन गेला. घरच्या मेंबर्सनी तत्परतेने हातातल्या मोबाईलवर फोटो काढले. यातल्या काही पक्ष्यांना त्यांच्या रंगरुपावरुन किंवा लकबींवरुन आम्ही मराठी टोपणनावेही ठेवलीत. "बर्‍याच दिवसात वेताळ पक्षी आला नाही". किंवा "तुरेवाला कुठे गेला?" किंवा "काळतोंड्या फार डॉमिनेट करतो हं" असं आम्ही जेव्हा एकमेकांशी बोलतो तेव्हा कुणाबद्दल बोलतोय हे लगेच कळतंच. या सर्व पक्ष्यांविषयी फोटोंसकट वेगवेगळ्या भागांद्वारे लिहिण्याचा मानस आहे. तेव्हा या मराठी टोपण नावांची स्टोरीही सांगेनच.


"Wilson's warbler" किंवा आमचा "टोपीवाला".

होता होता बरीच मोठी यादी झाली. हे सर्व नॉर्थ अमेरिकन खंडामध्ये आढळणारे आणि काही स्थलांतर करणारे पक्षी आहेत. मी तर अपार्टमेंटमध्ये राहते, आणि तेही एका शहरात (उपनगरा)मध्ये. तरीही इतक्या प्रकारचे पक्षी येऊ शकतात हे मला फारच नवलाचे होते. म्हणजे झाडं किती महत्त्वाची आहेत!! जे लोक शहराबाहेर, गावांत/कंट्रीसाइड आहेत किंवा शहरात असाल पण ज्यांचे घर आहे - ज्यात फ्रंटयार्ड/बॅकयार्ड आहे, त्यांना तर पक्षिनिरीक्षणाचा छंद जोपासणे अगदी सहज शक्य आहे. बॅकयार्ड बर्डींग या नावाने शोध घेतलात तर बॅकयार्डात येऊ शकणार्‍या पक्ष्यांची यादी वाचून थक्क व्हाल. अगदी सहज, सोपा छंद आहे आणि असीम आनंद मिळतो यातून.

1. Oak titmouse
2. House finch
3. Gold finch
4. Mourning dove
5. Junco sparrow
6. Chikadee
7. Hermit thrush
8. Yellow throated warbler
9. Nuttal’s Woodpecker
10. California towhee
11. American Robin
12. White crowned sparrow
13. Townsend’s warbler
14. Wilson’s warbler
15. White breasted nuthatch
16. Ruby crowned kinglet
17. American bushtit
18. Western tanager
19. American crow
20. Brown headed cow bird
21. Yellow warbler
22. Black phoebe

मला तर वाटतं या व्यतिरिक्तही इतर पक्षी येऊन गेले असावेत, कुणास ठाऊक. चोवीस तास कुठे मी बघतेय! रात्री इथे घुबडांचा आवाज येतोच. ती रात्री पाणी पीतही असतील कदाचित...
हे भाड्याचे घर आहे. इथे थोडीच मी कायम राहणारे! पुढच्या घरात असे नशोब उघडेल की नाही माहित नाही. त्यामुळे हे पक्षी फोटो, व्हिडीओ आणि जमेल तसे माझ्या कलर्ड पेन्सिल्सच्या माध्यमातून कायमचे जतन करुन ठेवणार आहे. यूट्यूब वर windowbirding नावाने एक चॅनेल उघडलेय आणि त्यात या पक्ष्यांचे शॉर्ट्स अपलोड करुन ठेवायला सुरुवात केलीय. इन्स्टावर माझ्या फोटोग्राफी अकाऊंटवर फोटो/व्हिडीओज टाकत असते. याद्वारे पुढे या क्लीपा बघणे फारच सोपे जाईल.

हे घर सोडून गेले की हे रंगीबेरंगी क्षण मला पुन्हा अनुभवता येतील. डीजीटली का होईना!!

Group content visibility: 
Use group defaults

एक ह्या ओघाने

सेंट लुईस ची बोटॅनिकल गार्डन..
तिथे छोटे छोटे खूप पक्षी होते. बाहेरच्या रखरखत्या उन्हात ( १०३ f ) इकडे वारा, झाडांची सावली त्यात उडणारे पक्षी, फुलपाखरं...

अलीकडेच शीळ मारण्यात कौशल्य (? Happy ) कमावलेल्या लेकाने, एका लपलेल्या पक्षाने घातलेल्या हाकेला तसंच प्रतिसाद दिला.

पलीकडून परत प्रतिसाद आला,.
लगेच ह्यानेही इकडून प्रतिः प्रतिसाद दिला.. ही देवाणघेवाण ४-५ वेळा झाली.. मग बहुदा पक्षी उडून गेला आणि आम्हीही चालत पुढे आलो.

छान लिहिल आहे.
बरेच पक्षी येतात तुमच्याकडे. मस्त

छंदीफंदी मस्त किस्सा.
ऋन्मेष, साळुंकीसोबत ब्रेकफास्ट असं लिहा पुढच्या वेळेस स्टेट्समध्ये..
धन्यवाद ऋतुराज.

आमच्या मुनियाच्या घरट्यात चार पिल्ले होती ती आज सकाळी आई बाबांबरोबर उडून गेली. त्यातले एक उडण्यात हळू होते त्याच्यामागे कावळा लागला पण ते दुसऱ्या इमारतीतल्या बाल्कनीत घुसले आणि कावळ्याला सापडले नाही.
Lol Lol Lol

वर्षा, अच्छा साळुंकी म्हणतात ती हीच का..
मला फक्त चिमणी कावळा पोपट कबूतर ओळखता येतात.. तरी मिनी सी शोअर आणि खाडी वरून काही वेगळे पक्षी उडत येतात. पण ओळखता येत नाही.

PXL_20250814_044900997~2.jpg

---

PXL_20250814_044914720.jpg

---
PXL_20250813_041510226.MP~2.jpg

टिपता आलेले काही पक्षी.. ( हवाई)

>>आमच्या मुनियाच्या घरट्यात चार पिल्ले होती ती आज सकाळी आई बाबांबरोबर उडून गेली.
वाह.
आता ते रिकामे घरटे दुसर्‍या मुनियांकडून वापरले जाईल का?

मुनियांचे जुने घरटे आहे बाजुलाच पण ते वेगळ्या जोडीचे आहे. तिथे ती अगोदरची जोडी अधुनमधून येऊन पाहून जाते. आताच्या घरट्याची आई आणि पिल्ले उडून गेलीत पण नर तिथे फांदीवर बसून चिव चिव आवाज करत बसून आहे. तो बहुतेक नव्या साथीदाराच्या शोधात असावा. बघू काय होते. सोसायट्यांत अशोकाची जी झाडे लावतात त्यात मुनिया घरटी करतात ( कारण त्यात कावळे घुसू शकत नाहीत.) परंतू सोसायटीवाले नेमके जून जुलै महिन्यांत झाडांची छाटणी करतात त्यामुळे सप्टेंबरमध्ये त्यात घरटी करता येत नाहीत. आता सप्टेंबर टळून गेल्यावर पुन्हा मुनिया अंडी घालतील का ते समजेल.
( धाग्याचा विषय पटला म्हणून इथेच लिहीत आहे, दुसरा धागा काढत नाही.)
----------
झेब्रा डव फारच छान दिसत आहेत.
--------------------------
संशोधक निसर्गयात्री - लेखक मिलिंद आमडेकर , ठाणे.हे पुस्तक आताच वाचले. (२०१६)पाने शंभर.
यामध्ये - फर्ले मोवेट, ब्रायन मॉरिसन, एडवर्ड ब्लिथ, सम्युअल टिकेल, स्टॅनले आणि बेलिंडा ब्रिस्बेन, मेरिन नॉर्थ, बिल लिशमन, ॲलन ह्यूम, टि. सी. जेर्डॉन, सर जोसेफ हुकर आणि इतर पक्षी प्राणी अभ्यासकांची माहिती दिली आहे.
या नामवंत निसर्ग निरीक्षकांची ओळख एकाच ठिकाणी देणारे पुस्तक मला फारच आवडले.
ISBN 978-93-80875-65-1

>> सोसायट्यांत अशोकाची जी झाडे लावतात त्यात मुनिया घरटी करतात ( कारण त्यात कावळे घुसू शकत नाहीत.)
ओह हे माहित नव्हते.
पुस्तकाच्या परिचयाबद्दल धन्यवाद. नाव लिहून घेतले आहे.

गोव्याला मुलीकडे गेले होते तिच्या खिडकीत लिफबर्ड रोज येतो. त्याला खुप जवळुन पाहता आले. गर्द हिरवा रंग अंगावर होता आणि डोक्यावर एक छोटासा त्रिकोणी पॅच फ्लोरोसंट हिरव्या रंगाचा होता.

माझ्या परीसरात रात्री आणि पहाटे घुबडांचे घूत्कार अगदी नक्की ऐकू येतात. पण काळोख असल्याने आणि घरातले दिवे घालवून बाहेर शोध घेईपर्यंत वेळ जात असे आणि ते गायब होत. पण त्यादिवशी मात्र अगदी जवळून आवाज येतोय असे वाटले. घाईने सर्व दिवे बंद केले. टीव्हीदेखील बंद केला आणि बाहेर बघितलं तर अगदी जवळच्या छपरावर एक भले थोरले घुबड बसले होते. आतपर्यंत मी छोट्या आकाराची घुबडेच पाहिली असल्याने ह्या आकाराचे प्रचंड घुबड बघणे हा एक भारी अनुभव होता. ते होते Great Horned Owl
बहुतेक पिल्लू घुबड जवळच्या झाडावर होते कारण त्याचा जरा वेगळा आवाज येत होता. किंवा ते घुबड एखाद्या भक्ष्याचा पाठलाग करीत असावे आणि तो पक्षी ओरडत असावा. मग ते घुबड जरा लांबच्या झाडावरच्या फांदीवर जाऊन बसले. त्याच्या विस्तीर्ण विंगस्पॅनचा अंदाज आला. फोटो, व्हीडीओ मात्र काहीच काढता आले नाहीत. पण चलता है. फारच मस्त अनुभव होता.

फेब १३ ते १६ बर्ड काउंट करण्याचे दिवस आहेत.
अधिक माहितीसाठी पहा: https://www.birdcount.org/

Spend time in your favorite places watching birds—then tell us about them! In as little as 15 minutes notice the birds around you. Identify them, count them, and submit your counts to help scientists better understand and protect birds around the world. If you already use eBird or Merlin, your submissions over the 4 days count toward GBBC.

वर्षा
ह्याच उपक्रमा अंतर्गत पिंपरी चिंचवड येथे दुर्गा टेकडीला bird watching walk होता
गेलो होतो.
मजा आली. त्यांनी app कसे वापरायचे हे ही दाखवले.
आज रेग्युलर दिसणारा खंड्या, बुलबुल वै होतेच, सोबत हळद्या ( golden oriel ) , दयाळ , वटवट्या, सातभाई, धनेश, कोतवाल आणि पाराडाईज फ्लाय कॅचर female दिसले.
तांबट ऐकू येत होता मात्र दिसला नाही.
तुमच्या धाग्याची आठवण आलेली.
मी आणि आबासाहेब असे 2 माबोकर होतो.

अरे वा! झकासराव मस्तच की!
अ‍ॅप कोणते मर्लिन दाखवले का?
मलाच अद्याप जमले नाहीये इथे आसपास जायला. बघते जमवायला हवे.

होय मर्लिन
आणि दुसरे app ebird विषयी सांगितले

आताच एक क्लिप समोर आली. भोर तालुक्यातील पिसावरे नावाच्या गाव पक्षांचे गाव म्हणून ओळखले जाते.
गावात पक्षांच्या १९० हून अधिक प्रजाती राहतात.

यूट्यूब वर बऱ्याच क्लिप्स मिळतील. पक्षी मित्रांसाठी सहज इकडे एक नोंद केली.

माझ्या बर्ड बाथमधील पाण्याचे कारंजे उडवणारा छोटा पंप होता तो वायर तुटल्याने निकामी झालाय. नवीन बहुतेक आणणार नाहीये कारण आता इथे काही महिनेच असणार आहे. पाण्याने भरलेल्या थाळ्या अर्थातच शेवटच्या दिवसापर्यंत ठेवेन.
हमिंगबर्ड्ज - ज्यांना पाण्याच्या अगदी स्रोतावरच जाऊन बसायची सवय होती, ते आता येणार नाहीत बहुतेक. इतर पक्ष्यांसारखे थाळीच्या कडेवर बसून खाली वाकून पाणी पिताना पाहिले फारवेळा पाहिले नाही कधी. बहुतेक वेळेस पाण्याच्या अगदी उगमावर बसून तिथेच आंघोळ, पाणी पिणे चालू असायचे.
पण बाकी पक्ष्यांची ये जा पाण्यासाठी, आंघोळीसाठी चालू आहेच, त्यामुळे हेही नसे थोडके. Happy

Pages