ही फेसबुक पोस्ट असती तर मी याची सुरूवात "लंडन मधल्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउण्डला सगळेच लाइक करतात. पण त्याच शहरात असलेल्या या ओव्हल ला एक लाइकतरी बनतोच" अशी केली असती. हे लंडनमधेच असलेले ओव्हल क्रिकेट ग्राउण्ड. पूर्वी केनिंग्टन ओव्हल किंवा नुसतेच द ओव्हल म्हणत - आता अधिकृत नाव " "किया ओव्हल". क्रिकेटप्रेमींच्या लंडन ट्रिपमधला टीआरपी लॉर्ड्स खेचून घेते आणि हे तितकेच चांगले मैदान उपेक्षित राहते. मी लॉर्ड्स याआधीच पाहिले आहे, त्याच्या टूरबद्दल काही वर्षांपूर्वी इथे लिहीलेही आहे. पण लॉर्ड्स इतकीच याचीही परंपरा आहे - इंग्लंड मधली पहिली कसोटी इथेच खेळली गेली, हे ही जवळजवळ तितकेच जुने आहे आणि हे ही सेण्ट्रल लंडनपासून अंडरग्राउण्ड (ट्यूब)ने किंवा बसने जायला अगदी सोपे आहे. आणि लॉर्ड्सइतकेच सुंदर आहे.
जाईन त्या ठिकाणी क्रिकेटसंबंधी काही असेल तर बघण्यात इंटरेस्ट असतोच. त्यामुळे हे ओव्हल क्रिकेट ग्राउण्डही पाहायचे होतेच. मागेही एकदा थेट ग्राउण्डवर जाउन चौकशी केली होती. पण त्या दिवशी ओव्हलची टूर नव्हती. यावेळेस आधीच चौकशी करून बुक करून ठेवली. क्रिकेटप्रेमी असाल व लंडनला गेलात तर टूर घ्या. आवडेल नक्की.
लहानपणीपासून क्रिकेट बघणार्यांना इंग्लंडची सहा फेमस ग्राउण्ड तोंडपाठ असतील - लॉर्ड्स - लंडन, हेडिंग्ले - लीड्स, ट्रेण्ट ब्रिज - नॉटिंगहॅम, एजबस्टन - बर्मिंगहॅम, ओल्ड ट्रॅफोर्ड - मँचेस्टर, आणि ओव्हल - लंडन. त्यातले हे सर्वात न-इंग्लिश मैदान. इंग्लिश ग्राउण्ड्स ही भरपूर स्विंग व थोडाफार बाउन्स असलेली आहेत. पण ओव्हल हे सहसा स्पिनला साथ देणारे समजले जाते (म्हणजे इंग्लिश कंडिशन्सच्या मानाने. ८०ज किंवा ९०ज मधल्या भारतीय मैदानांत पहिल्याच दिवशी बॉल गर्रकन वळायचा, इतके नव्हे). तसेच सहसा नेहमीच्या इंग्लिश सीझनमधे शेवटची मॅच ही ओव्हलवर असते. आजकाल हे इतके पाळले जात नाही पण इंग्लिश परंपरेनुसार तसे आहे.

टूरला फारशी गर्दी नव्हती. हे मैदान "सरे" या काउण्टीच्या संघाचे असल्याने त्यांच्या कप्तानांचे फोटो तेथे लावले आहेत. पुरूष व महिला संघाच्या. बाहेरच जी माहिती देतात त्यावरून कळाले की नाव जरी ओव्हल असले तरी हे मैदान आता ओव्हल पेक्षा वर्तुळासारखेच जास्त आहे. लहानपणापासून असलेला एखादा समज चुकीचा होता हे कळाल्यावर आता सगळेच समज पडताळून पाहायला हवेत असे आपल्याला जसे वाटते तसेच काहीतरी वाटले हे ऐकून
क्रिकेट मधे ओव्हल आकाराची काही ग्राउण्ड्स फेमस आहेत - अॅडलेडचे ओव्हल, त्रिनिदादचे क्वीन्स पार्क ओव्हल आणि न्यूझीलंडचे नवीन हॅगली ओव्हल. पण ही सगळी खरोखरच त्या आकाराची आहेत. म्हणजे असावीत. आता ते ही चेक करायला पाहिजे.
पण हे ग्राउण्ड जेथे बांधले तेथे ओव्हल आकाराचे रस्ते होते व मधे एक पार्क. तेथे घरे बांधणार होते पण काही कारणाने ते बारगळले व तेथे क्रिकेट ग्राउण्ड उभारायचे ठरले. या जागेची पारंपारिक मालकी ब्रिटिश राजघराण्याकडे असते. त्यामुळे सध्या प्रिन्स विल्यम तेथील मालक आहे (म्हणजे "डची ऑफ कॉर्नवॉल" ही ट्र्स्ट ही मालक. चालू राजाचा/राणीचा थोरला मुलगा ड्यूक ऑफ कॉर्नवॉल हे नामाभिधान लावतो व तो इथला मालक असतो (मुलगी असेल तर डचेस). यापेक्षा खोलात गेलो तर ग्राउण्ड बाजूला राहून आपण इंग्लिश राजघराण्यातली टायटल्स वगैरेमधेच हरवू. सध्या विल्यम हा "ड्यूक ऑफ कॉर्नवॉल" पण आहे आणि "प्रिन्स ऑफ वेल्स" पण. ही काय भानगड आहे हे कुतूहल असेल तर विकीवर शोधा). नुकतेच तेथे नवीन LED फ्लडलाइट्स बसवण्यात आले आहेत त्यांचा आकार प्रिन्स ऑफ वेल्स या टायटलचे तीन पिसांचे चिन्ह आहे त्याच्यासारखा बनवला आहे. या लिंकवरचा रात्रीचा ते लाइट्स ऑन असतानाचा फोटो पाहिलात तर लक्षात येईल - आणि इतर मैदानांवरच्या लाइट्सच्या तुलनेत त्याचे वेगळेपणही. तर सुरूवातीला त्या पार्कच्या जागेतच मैदान बनवण्यात आले व ते खरोखरच ओव्हल आकाराचे होते. पण नंतर त्यात बदल होत गेले व आता ते वर्तुळासारखे जास्त आहे.
समर मधे जेव्हा तेथे पाऊस नसतो व लख्ख उन असते तेव्हा हे मैदान अगदी सुरेख दिसते.
काहीकाही मैदानांची सहज ओळख पटेल अशा खुणा तेथे असतात. लॉर्ड्सची ती जुनी इमारत व आता दुसर्या बाजूला असलेले मिडिया सेण्टर यावरून ते मैदान लगेच ओळखता येते. काही वर्षांपूर्वी हेडिंग्ले की ओल्ड ट्रॅफोर्ड यापैकी एका ठिकाणी स्टॅण्ड्सच्या मागून गाड्या जाताना दिसत. आता बहुधा नवीन स्टॅण्ड्स बांधले असतील. पण ओव्हलच्या एका बाजूला तारांनी बांधल्यासारखे दिसणारे गोल आकाराचे "गॅस होल्डर्स" ही या मैदानाची अगदी प्रसिद्ध ओळखीची खूण आहे. ते ज्या काय कामाकरता बांधले होते त्याकरता वापरणे कधीच बंद झाले. पण या मैदानाची ती ओळख असल्याने ते तसेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला (असे वाचले). आता तेथे ते बांधकाम तसेच ठेवून त्याच्या आत फ्लॅट्स बांधत आहेत असे दिसले.

या मैदानावर तब्बल २८ खेळपट्ट्या आहेत. मॅचकरता त्यातील मधल्या खेळपट्ट्यांपैकी एक वापरली जाते. बाकीच्या प्रॅक्टिस विकेट्स.
१९७१ साली भारताने पहिल्यांदा इंग्लंडविरूद्ध इंग्लंडमधे सिरीज जिंकली. त्यावेळच्या ओव्हलवरच्या मॅच मधे काही लोकांनी एक हत्तीचे पिल्लू मैदानावर आणले होते. बहुधा त्या दिवशी किंवा त्याच्या आसपास असलेल्या गणेश चतुर्थीशी त्याचा संबंध होता. इथे आणखी माहिती मिळेल. ही मॅच व सिरीज भारताने जिंकली त्यानंतरचे सेलिब्रेशनही प्रसिद्ध आहे. त्याशिवाय इतर काही इंटरेस्टिंग आठवणी आहेत - २००७ साली कुंबळेने मारलेले शतक, २०११ साली तेंडुलकरचे ९ धावांनी हुकलेले (व त्यानंतर ८-९ महिने लांबलेले) १०० वे शतक, कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेली मॅच आणि टेस्ट चॅम्पियनशिपची ऑस्ट्रेलियाबरोबर हरलेली फायनल. जुन्या मॅचेसमधे चौथ्या डावात ४३८ करायचे असताना गावसकरने मारलेले २२१ व फक्त ८ रन्स राहिलेले असताना अनिर्णित राहिलेली मॅच. लॉर्ड्सप्रमाणेच इथेही "ऑनर बोर्ड" आहे - शतके मारणारे व ५ पेक्षा जास्त विकेट्स घेणार्यांची नावे. आणि लॉर्ड्सप्रमाणेच इथेही त्यात सचिन तेंडुलकर नाही (मात्र इथे गावसकर आहे). कुंबळे आहे पण तो विकेट्सकरता नसून शतकाकरता आहे.
पण या मैदानावरचा एक प्रसिद्ध बोर्ड १८८२ सालचा "अॅशेस" या शब्दाचा उगम दाखवतो. त्यावेळेस इंग्लंड ऑस्ट्रेलियाविरूद्ध सिरीज हरल्यावर इंग्लिश प्रेसने इंग्लिश क्रिकेटबद्दल जे लिहीले त्यावरचा फलक इथे लावलेला आहे. इंग्लिश क्रिकेटची राख - अॅशेस- ऑस्ट्रेलियाला गेल्या असे तेव्हा त्यात लिहीले गेले होते. तेव्हा नंतर पुढच्या कप्तानांनी त्या अॅशेस आपण जिंकून आणू असे म्हणायला सुरूवात केली व ते नाव प्रचलित झाले. असा इतिहास तेथे सांगितला जातो.
टूरच्या दिवशी बहुतांश मोकळे असलेले स्टॅण्ड्स (आणि खाण्याचे स्टॉल्स) लौकरच असलेल्या भारत-इंग्लंड सामन्याच्या वेळेस तुडुंब भरतील असे टूर गाइडने सांगितले आणि आज तसेच चित्र दिसले. पूर्वीच्या मॅचेससचे हायलाइट्स पाहताना कोणत्यातरी एखाद्या कोपर्यात सूट्/कोट घालून आलेले जेमतेम ५०-६० भारतीय प्रेक्षक दिसत. त्यांनी चीयर करावे असे फार काही आपले लोक मैदानातही करत नसत. आता हे चित्र पूर्ण पालटले आहे. जगातील कोणत्याही क्रिकेट ग्राउण्डवर अगदी सहज उठून दिसणारे, खूप आवाज करणारे भारतीय प्रेक्षक खूप संख्येने दिसतात. पूर्वीच्या (२००० च्या आधीच्या) तुलनेत आपली मैदानातही कामगिरी चांगली होतेच. पण केसरी, वीणा किंवा अशा अनेक टूर्समधून प्रचंड संख्येने प्रवास करणारे असंख्य लोक या मैदानांना सुद्धा भेटी देतात. लॉर्ड्सच्या टूरचा प्रमुख कस्टमर हा भारतीय आहे हे तेथीलच एका स्टाफने आम्हाला सांगितले होते. यावेळेस तेथे गेलो तेव्हा एका गेटच्या बाजूला एका देशी टूर कंपनीने तेथे फूटपाथवरच टेबलवर बुफे लावला होता व देसी पब्लिक तेथे साग्रसंगीत जेवत होते. हे जरा अवांतर झाले पण गेल्या काही वर्षांत हे बदल अगदी सहज जाणवतात.
आजच्या भारत-इंग्लंड सामन्याची वेळ साधून ही या थोड्याफार उपेक्षित पण दिसायला सुंदर मैदानाची ही एक ओळख!
"हे तितकेच चांगले मैदान
"हे तितकेच चांगले मैदान उपेक्षित राहते".. हे अगदी खरं आहे. मी इतकी वर्षं इथे राहून एकदाही या मैदानाजवळून देखील गेलो नाही.
मस्त झालाय लेख. अघळपघळ गप्पा
मस्त झालाय लेख. अघळपघळ गप्पा मारताना आजुबाजूची माहिती सांगत लिहिल्याने वाचायला आणखी मजा आली.
मस्त वाटलं वाचताना, फारएंडजी
मस्त वाटलं वाचताना, फारएंडजी , धन्यवाद !
*क्रिकेट मधे ओव्हल आकाराची काही ग्राउण्ड्स फेमस आहेत * - आमचं मुंबई हायकोर्टासमोरचं ' ओव्हल ' पण खासच, नांवाला शोभेल अशा आकाराचं !
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
आमचं मुंबई हायकोर्टासमोरचं ' ओव्हल ' पण खासच, नांवाला शोभेल अशा आकाराचं ! >> डबल डेकर च्या वरच्या डेक मधून परफेक्ट ओव्हल आकार दिसतो. हायकोर्ट साइडला कडेने उभी असलेली नारळाची झाडं, त्यामागे राजाबाई टॉवर आणि विरूद्ध बाजूच्या आर्ट डेको इमारती... पावसाळ्यात तर फारच सुंदर दिसत.
अश्याच एका भारत पाक सामन्याच्या वेळी भरलेले मैदान... फोटो मुलाने काढलेला आहे. तो सामना भारत जिंकला होता.

छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
आमचं मुंबई हायकोर्टासमोरचं ' ओव्हल ' >>> हेच लिहून माझ्या प्रतिसादाची सुरुवात करणार होतो कारण मुंबईतील ओव्हलमुळे या लंडन ओवलबद्दल सुद्धा एक आपलेपणा वाटतो.
आणि मनीमोहोर यांच्या नारळाची झाडे राजाबाई टॉवर ओव्हल सौंदर्याच्या पोस्टला सुद्धा +७८६ तसेच ते डोळ्यासमोर येते..
आणि लेखातील उपेक्षित सौंदर्याला सुद्धा +७८६
लंडनचे लॉर्डस आणि ओव्हल मला मुंबईचे वानखेडे आणि ब्रेबर्न वाटते.. अर्थात इथे इतिहास वेगळा आहे. पण मुख्य शहरातील जोडीमुळे तसे वाटते...
नुकतेच माझा शाळेतला मित्र इंग्लंड क्रिकेट टूर स्वतः प्लान करून जाऊन आला आणि या मालिकेत खेळले जाणाऱ्या पाचही कसोटी स्थळांना भेट देऊन आला. फार निवडक गोष्टी आहेत ज्यांचा मला हेवा वाटतो. त्यापैकी हे एक.
मस्त लेख फारेंड. माझे पण
मस्त लेख फारेंड. माझे पण आवडते ग्राऊंड. ट्रेन मधून जाताना नेहमी नजर जातेच. मी इथे आपली ऑस्ट्रेलिया बरोबरची फायनल पाहिली आहे.
तिथेच खाली केन बॅरिंग्टन एकेडमी आहे. तिथे बॉलिंग मशीन समोर खेळलेलो सुद्धा आहे.
शिवाय c. Solkar b. Chandrashekhar,
सनी च्या 221या सुखद मेमरी आहेतच.
यावेळेस तिकीट मिळाल्यास आणि मॅच चालू असल्यास
पाचव्या दिवशी जायचा विचार आहे.
छान लेख फारएण्ड!!
छान लेख फारएण्ड!!
छाया चित्रेही सुरेख!
सनी च्या 221या सुखद मेमरी आहेतच. Happy>>>>
येस! आणि मला आठवतयं तो सामना जवळपास जिंकत आलो होतो आपण थोडक्यात अनिर्णित राहिला!
मस्त लेख, फारेण्ड.
मस्त लेख, फारेण्ड.
लहानपणापासून असलेला एखादा समज चुकीचा होता हे कळाल्यावर आता सगळेच समज पडताळून पाहायला हवेत असे आपल्याला जसे वाटते तसेच काहीतरी वाटले हे ऐकून <<<
छान माहिती.
छान माहिती.
खूप छान लेख, फारएण्ड!!
खूप छान लेख, फारएण्ड!!
छान माहिती, फोटोही मस्तच.
मस्तच लिहिलंयस फा. वर अमितने
मस्तच लिहिलंयस फा. वर अमितने म्हटलंय तसं गप्पांच्या ओघात माहिती मिळतीय. क्रिकेटच्या आठवणी तर खासच आहेत.
मस्तच लिहिलंय. फोटोही सुरेख.
मस्तच लिहिलंयस!
मस्तच लिहिलंयस!


'अॅशेस'चा बोर्ड आणि इतिहास भारी!! ब्रिटिश ह्यूमर अॅट इट्स बेस्ट!!
विजय स्मृतीपटलावर कोरून बिरून सगळेच ठेवतात - पराजय असा इम्मॉर्टलाइज करून ठेवणं मजेशीर आहे!
हो! तो ऍशेस फलक आणि नावाचा
हो! तो ऍशेस फलक आणि नावाचा इतिहास फार मजेशीर वाटला.