
साहित्य - तांबाटे (टोमॅटो उच्चारले तर फाऊल), फिश करी मसाला किंवा साधी मिरची पावडर, धना, बडीशेप, हळद, आलंलसूण पेस्ट, कोथींबीर, पुदिना, कांदा, खोबरे, तेल, लसूण आणि आमच्या कोकणची शान कोकम!
तांबाट्याचे सार - टोमॅटो सार !
सारभात आणि मासे
या लेखावर ईथे बरेच जणांनी साराची रेसिपी मागितली होती. जे साहजिकच होते. पण मला स्वयंपाकातले ज्ञान शून्य. मी मुख्यत्वे इथे नेत्रसुख घ्यायला येतो. खाद्यपदार्थांचे चमचमीत फोटो बघतो आणि तृप्त होतो. काही वाचायचे झाल्यास पाककृती सोडून इतर सारे वाचतो.
बरे आईला फोन करून विचारले पाककृती देशील का? तर ती माऊली बिचारी टेन्शनमध्ये आली. म्हणाली, बाबा मला ते प्रमाण वगैरे सांगता येणार नाही.. त्यापेक्षा तू ये, तू बघ, आणि तू लिही.
तर मी गेलो, मी बघितले, आणि जमेल तितके समजून घ्यायच्या भानगडीत न पडता पुरेसे फोटो काढून पाककृती सादर करत आहे.
स्थळ - आईचे घर आणि पुरुषाचे माहेर.
काळ - निवांत सुट्टी उपभोगायचा.
वेळ - कडकडून भूक लागायच्या जर्रा आधीची..
साहित्य - वर दिले आहे. आता पाकृ सुरू करूया
१) सर्वप्रथम फोटो क्रमांक १ मध्ये दाखवल्याप्रमाणे एका ताटात खोबरे, कांदा, कोथिंबीर, पुदिना, आले लसूण पेस्ट आणि फिश करी मसाला घ्यावा.
२) जर फिशचा मसाला असेल तर प्रश्नच मिटला. पण जर साधी मिरची पावडर असेल तर आई त्यात धना, बडीशेप, हळद टाकते.
संदर्भासाठी रेडीमेड फिश करी मसाल्याच्या पाकिटाचा फोटो टाकला आहे. त्यावर लिहिल्या प्रमाणे त्यात, Chilly, Turmeric, Coriander seeds, Fennel seeds, common salt हे Ingredients आहेत. आई हेच पदार्थ मराठीत टाकते.
३) आता हा सगळा मालमसाला मिक्सरमधून फिरवून आणावा. त्याचेही फोटो शेअर केले आहेत पण फोटोच्या रंगावर जाऊ नका. कारण मिक्सर राईडचे दोन राऊंड घ्यावे लागले. एकात मसाला कमी गेला आणि एकात जास्त. त्यामुळे एकात तांबडे फुटायच्या जस्ट आधीची शेड आली आहे तर दुसर्यात लाली पसरली आहे.
४) त्यानंतर आली फोडणी. टोपात तेल. तेलात लसूण आणि कडीपत्ता. तो तडतडला की त्यात मिक्सरमधील वाटण. मिक्सरचे भांडे पाणी घालून छान विसळून घ्यावे. मागाहून येईल मीठ.
५) हे सारे प्रकरण कढ येईपर्यंत शिजवले की झाले. चव घेऊन काही कमी जास्त असेल तर ऍडजस्ट करायचे आणि सार तय्यार.
.
.
.
.
.
.
.
.
.
१) फिश सार असेल तर तिखट जास्त. तांबाटे कमी. पण त्या जागी कोकम कम्पलसरी.
२) तांबाट्याच्या सारात कोकम गरजेनुसार. चव घेऊन तांबाट्यांचा आंबटपणा कितपत आहे यावर त्याचे प्रमाण ठरवावे.
३) फोटो जरा जास्त शेअर करतोय. याचे एक कारण म्हणजे प्रत्येक फोटोत रंग थोडा वेगवेगळा भासत होता. तुम्ही एवरेज काढाल.
४) दुसरे कारण म्हणजे माझ्या आईला रेसिपी सांगता येत नाही की मला ती लिहीता येत नाही. त्यामुळे सुज्ञ लोकं फोटो बघून गाळलेल्या जागा भरतील.
तसेही कोणीतरी म्हटलेच आहे. चित्र नव्हे मित्र.
५) कोणाची काही query असेल तर ती २४ तासांच्या आत काही resolve होणार नाही याची नोंद घ्यावी. कारण मला बारक्यातल्या बारक्या प्रश्नासाठी सुद्धा आईलाच फोन करावा लागणार. त्यामुळे प्रतिसादातच सर्वांनी एकमेकांना उत्तरे देता येईल का हे बघा.
६) तपशीलवार मोजमापासह पाककृती देता आली नाही याबद्दल दिलगीर आहे. पण या बदल्यात मी एक करू शकतो. तुम्ही जेव्हा सारभात बनवाल तेव्हा तुमच्या घरी येऊन चव चाखून ते कसे झाले आहे हे सांगू शकतो. आणि याबद्दल मी कुठलेही व्हिजिटिंग चार्ज घेणार नाही. फक्त तोंडी लावायला माश्याच्या दोन तुकड्या तेवढ्या तळा. शाकाहारी असाल तर कांदाबटाटा भजी आणि अंडाहारी असाल तर आम्लेट चालेल.
टीपा थोड्या लांबलेल्या आहेत. पण त्यात टेपा मारलेल्या नाही आहेत.
तुमचा श्रावण देखील गणपतीपर्यंत लांबणार असेल तर तांबाट्याचे सार करून बघायला हरकत नाही
धन्यवाद,
तुमचा अभिषेक
आमच्या ईथे टकली हा शब्द देखील
आमच्या ईथे टकली हा शब्द देखील वापरतात. पण फक्त मास्यांच्या डोक्यांनाच नव्हे तर इतरत्रही ( शिरगणती या शब्दासाठी पर्याय वाची पण निगेटिव्ह टोनसाठी किंवा खिजवायला). जसे 'मोजून तिन चार टकली व्हती' म्हणजे 'फक्त तीन चार माणसे होती . पॉझिटिव्ह शिरगणतीसाठी 'माणूस', जसं 'मेल्या माणूस किती जमला ता' म्हाणजे किती गर्दी जमलेली सांगू...
छान शब्द कळला - टकळी
छान शब्द कळला - टकळी
त्याची टकळी चालू झाली की माझी
त्याची टकळी चालू झाली की माझी टकळी फिरते
मास्यांची डोकी हाच शब्द
मास्यांची डोकी हाच शब्द ऐकिवात आहे. मी या पुर्वी लिहिले असेल पण सिंगापोरात फिश हेड करी खूप फेमस आहे. बनाना लीफ ह्या साउथ कडच्या हाटिलात मिळते.
आमच्याकडे माशांच्या टकळ्यांचे
आमच्याकडे माशांच्या टकळ्यांचे कालवण फेमस आहे. घरातील मोठ्या माणसांसाठी असतं ते. लहान मुलांना त्यात काय खायचं हे कळतच नाही. तळलेले मासे, रश्शातले मासे आणि हे कालवण झालं की रविवार सार्थकी लागला म्हणायचे. आईग्गं. तोंडाला पाणी सुटलं. आता गुरू पौर्णिमा झाल्यावरच खायला मिळणार आहे.
टाळकी टाकली- टाळकं टिकलं
टाळकी टाकली- टाळकं टिकलं
हे वाक्य भरभर १५ वेळा म्हणुन दाखवा मुलांनो.
अरे यात तांबाटे कधी घालायचे?
अरे यात तांबाटे कधी घालायचे? का वाटण्याच्या मालमसाल्यात तांबाटे पण घालायचे?
का मी काहीतरी वाचण्यात घोळ केलाय?
हो डायरेक्ट मिक्सरमध्ये जातात
हो डायरेक्ट मिक्सरमध्ये जातात...
फोटोतील ताटातल्या मालमसाल्यासोबत
सगळीकडे हाच प्रश्न बरेच लोकांना पडतो.. मला पाकृ लिहायची सवय नाही.. सांभाळून घ्या..
हे सार, मसालेभात त्यावर नारळ
हे सार, मसालेभात त्यावर नारळ आणि पोह्याचा पापड! एकदम मस्त जेवण झालं.
बरोबर मासा न्हवता फक्त.
काल केलेले बटाट्याचे रगडा पॅटीस मधले दोनदोन पॅटीस खाल्ले मग. पुढच्यावेळी दोन माशाचे तुकडे नक्की करेन हे केलं की! तिरफळं पण घालावी का यात?
अरे वाह मस्त.. केलेत सुद्धा..
अरे वाह मस्त.. केलेत सुद्धा..
तिरफळं पण घालावी का यात? >>> यावर चर्चा झाली होती. पण इथे की कुठे आठवत नाही. घालू शकतो वाटते. जाणकार उत्तर देतीलच.
हो तिरफळं घातली जातात ह्यात.
हो तिरफळं घातली जातात ह्यात. मागे मला वाटते, जागू च्या धाग्यावर उल्लेख होता.
घाला की तिरफळं… काही नुकसान
घाला की तिरफळं… काही नुकसान होत नाही. आता दारात हळदीला पाने आली असतील तर एक चतकोर तेही घाला मसाल्याला कढ यायला लागला की. . गॅस बंद केल्यावर काढले तरी चालते नाहीतर वाढताना काढुन टाका.
उद्या यात सुकी सुंगटा टाकुन मज्जा घेणार
सुकी सुंगटा म्हणजे वरच्या सालासकट सुकवलेली दिड दोन इंची कोलंबी. सारात घालताना डोकी काढुन टाकायची.
@ऋन्मेष,
@ऋन्मेष,


दुपारच्या जेवणात तुझ्या रेसिपीने केलेले तांबाट्याचे सार, भात आणि पापलेट फ्राय.
म्हणजे पापलेट फ्राय मी केले आहे आणि सार धनिने केले आहे
जबरदस्त रेसिपी आहे साराची. आम्हाला खूप आवडलं. भन्नाट झालं होतं. जास्तीचं केलंय म्हणजे उद्यासुद्धा खाता येईल
.
आमच्याकडे सुकं खोबरं वाटण
आमच्याकडे सुकं खोबरं वाटण लावतात. ते ही छान लागतं. वरून नारळाचं दूध.
हो रमड, पाहिले खाऊगलीवर..
हो रमड, पाहिले खाऊगलीवर.. मस्तच झालेले दिसत आहे! धनी यांना धन्यवाद केल्याबद्दल...
झंपी इंटरेस्टिंग.. बरेच नवीन रेसिपी कळत आहेत या निमित्ताने. अन्यथा मला वाटायचे की मी जे लहानपणापासून खात आहे तसेच सगळीकडे होत असेल, त्यात काय मुद्दाम रेसिपी टाकायची.. पण आता वाटते बरे झाले हा धागा काढला.
Pages