
साहित्य - तांबाटे (टोमॅटो उच्चारले तर फाऊल), फिश करी मसाला किंवा साधी मिरची पावडर, धना, बडीशेप, हळद, आलंलसूण पेस्ट, कोथींबीर, पुदिना, कांदा, खोबरे, तेल, लसूण आणि आमच्या कोकणची शान कोकम!
तांबाट्याचे सार - टोमॅटो सार !
सारभात आणि मासे
या लेखावर ईथे बरेच जणांनी साराची रेसिपी मागितली होती. जे साहजिकच होते. पण मला स्वयंपाकातले ज्ञान शून्य. मी मुख्यत्वे इथे नेत्रसुख घ्यायला येतो. खाद्यपदार्थांचे चमचमीत फोटो बघतो आणि तृप्त होतो. काही वाचायचे झाल्यास पाककृती सोडून इतर सारे वाचतो.
बरे आईला फोन करून विचारले पाककृती देशील का? तर ती माऊली बिचारी टेन्शनमध्ये आली. म्हणाली, बाबा मला ते प्रमाण वगैरे सांगता येणार नाही.. त्यापेक्षा तू ये, तू बघ, आणि तू लिही.
तर मी गेलो, मी बघितले, आणि जमेल तितके समजून घ्यायच्या भानगडीत न पडता पुरेसे फोटो काढून पाककृती सादर करत आहे.
स्थळ - आईचे घर आणि पुरुषाचे माहेर.
काळ - निवांत सुट्टी उपभोगायचा.
वेळ - कडकडून भूक लागायच्या जर्रा आधीची..
साहित्य - वर दिले आहे. आता पाकृ सुरू करूया
१) सर्वप्रथम फोटो क्रमांक १ मध्ये दाखवल्याप्रमाणे एका ताटात खोबरे, कांदा, कोथिंबीर, पुदिना, आले लसूण पेस्ट आणि फिश करी मसाला घ्यावा.
२) जर फिशचा मसाला असेल तर प्रश्नच मिटला. पण जर साधी मिरची पावडर असेल तर आई त्यात धना, बडीशेप, हळद टाकते.
संदर्भासाठी रेडीमेड फिश करी मसाल्याच्या पाकिटाचा फोटो टाकला आहे. त्यावर लिहिल्या प्रमाणे त्यात, Chilly, Turmeric, Coriander seeds, Fennel seeds, common salt हे Ingredients आहेत. आई हेच पदार्थ मराठीत टाकते.
३) आता हा सगळा मालमसाला मिक्सरमधून फिरवून आणावा. त्याचेही फोटो शेअर केले आहेत पण फोटोच्या रंगावर जाऊ नका. कारण मिक्सर राईडचे दोन राऊंड घ्यावे लागले. एकात मसाला कमी गेला आणि एकात जास्त. त्यामुळे एकात तांबडे फुटायच्या जस्ट आधीची शेड आली आहे तर दुसर्यात लाली पसरली आहे.
४) त्यानंतर आली फोडणी. टोपात तेल. तेलात लसूण आणि कडीपत्ता. तो तडतडला की त्यात मिक्सरमधील वाटण. मिक्सरचे भांडे पाणी घालून छान विसळून घ्यावे. मागाहून येईल मीठ.
५) हे सारे प्रकरण कढ येईपर्यंत शिजवले की झाले. चव घेऊन काही कमी जास्त असेल तर ऍडजस्ट करायचे आणि सार तय्यार.
.
.
.
.
.
.
.
.
.
१) फिश सार असेल तर तिखट जास्त. तांबाटे कमी. पण त्या जागी कोकम कम्पलसरी.
२) तांबाट्याच्या सारात कोकम गरजेनुसार. चव घेऊन तांबाट्यांचा आंबटपणा कितपत आहे यावर त्याचे प्रमाण ठरवावे.
३) फोटो जरा जास्त शेअर करतोय. याचे एक कारण म्हणजे प्रत्येक फोटोत रंग थोडा वेगवेगळा भासत होता. तुम्ही एवरेज काढाल.
४) दुसरे कारण म्हणजे माझ्या आईला रेसिपी सांगता येत नाही की मला ती लिहीता येत नाही. त्यामुळे सुज्ञ लोकं फोटो बघून गाळलेल्या जागा भरतील.
तसेही कोणीतरी म्हटलेच आहे. चित्र नव्हे मित्र.
५) कोणाची काही query असेल तर ती २४ तासांच्या आत काही resolve होणार नाही याची नोंद घ्यावी. कारण मला बारक्यातल्या बारक्या प्रश्नासाठी सुद्धा आईलाच फोन करावा लागणार. त्यामुळे प्रतिसादातच सर्वांनी एकमेकांना उत्तरे देता येईल का हे बघा.
६) तपशीलवार मोजमापासह पाककृती देता आली नाही याबद्दल दिलगीर आहे. पण या बदल्यात मी एक करू शकतो. तुम्ही जेव्हा सारभात बनवाल तेव्हा तुमच्या घरी येऊन चव चाखून ते कसे झाले आहे हे सांगू शकतो. आणि याबद्दल मी कुठलेही व्हिजिटिंग चार्ज घेणार नाही. फक्त तोंडी लावायला माश्याच्या दोन तुकड्या तेवढ्या तळा. शाकाहारी असाल तर कांदाबटाटा भजी आणि अंडाहारी असाल तर आम्लेट चालेल.
टीपा थोड्या लांबलेल्या आहेत. पण त्यात टेपा मारलेल्या नाही आहेत.
तुमचा श्रावण देखील गणपतीपर्यंत लांबणार असेल तर तांबाट्याचे सार करून बघायला हरकत नाही
धन्यवाद,
तुमचा अभिषेक
पाहिला घराचा स्वाद चॅनल.
पाहिला घराचा स्वाद चॅनल.
भारी आहे. अळू वड्या पाहिल्या. बाकीचे वरवर चाळले. खूपच व्हिडिओ आहेत.
मी तंतोतंत रेसिपी फॉलो करून
मी तंतोतंत रेसिपी फॉलो करून सार केलं. मस्तच झालं. एरवी नारळाचं दूध घालून केलेलं टोमॅटो सार नवरा इतका आवडीने खात नाही. हे मस्त झणझणीत चवीच असल्याने आवडीने खाल्ल.
ग्रेट !
ग्रेट !
तंतोतंत केले तर तसेच झाले असेल जसे आमचे होते, पण चांगले झाले असेल तर त्यात तुमचा सुद्धा हातगुण आलाच..
बरेच जणांनी हे ट्राय केले आहे आणि आवडल्याचे कळवले आहे. पाककृती लिहिणे कधी केले नव्हते तरी उत्साहाने केले ते वसूल झाल्याचे बघून बरे वाटत आहे
चांगलाच पावसाळा चालु झाला आहे
चांगलाच पावसाळा चालु झाला आहे .
हे सार करण्यात येइइल .
यात अंबाड्याच्यी फळे घालून , त्याचीही आमटी करण्यात येइल .
आमच्या ईथे आम्ही मसाला न घेता
आमच्या ईथे आम्ही मसाला न घेता लाल मिरच्या ( संकेश्वरी) लावतो मिक्सरला... थोडीशी वेगळी पद्धत थोडक्यात खालीलप्रमाणे.
पाच कप साराच्या वाटपा साठी साठी ५ संकेश्वरी मिरच्या, १ टी स्पून धणे, चार लसूण पाकळ्या न सोलता, अर्ध बोट आलं सोलून, एक मिडीयम कांदा , एक मोठा टोमॅटो, कोथिंबीर ७-८ कांड्या, अर्धा कवड ( मिडीयम) नारळ कातलेला आणि मोजून ५ कोकमे पुरेशी असतात, हे प्रमाण आवश्यकतेनुसार ॲडजस्ट करतो..वाटप लावताना आधी पाणी न घालता मिरच्या + धणे व्यवस्थित बारीक करून घेतो...नंतर खोबरं सोडून इतर जिन्नस + अगदी थोडं पाणी घालू , सर्वात शेवटी कातलेलं खोबरं + पाणी पुरेसा घट्टपणा राहील वाटपात इतकं अशा क्रमाने वाटप लावतो..( फोडणी चे जिन्नस व क्रम ऋन्मेशच्या कृती प्रमाणेच).. जेव्हा फोडणीत वाटप टाकतो त्या नंतर भांड्याला चिटकलेले वाटप अगदी थोड्या पाण्यात विसळून ते पाणी त्यात ओततो. मोठ्या आचेवर ठेवून उकळी यायला सुरुवात झाल्यावर त्यात कोकम टकतो...कोकम टाकल्यानंतर एक दोन कढ वाटप आणि फोडणीचं मिश्रण रटरटू दिल्यानंतर त्यात हवे तेवढे पाणी ॲड करुन व मीठ टाकून घेतो.....पाणी ॲड करताना सार थोडे पातळसर होईस्तोवर पाणी ॲड करतो, नाहीतर थंड झाल्यावर हे वरणापेक्षा( डाळीपेक्षा) जास्त आटतं नी अगदी घट्ट होतं...दोन तीन कढ आल्यावर गॅस वरुन उतरवून ठेवतो तसंच वर ठेवलं तर आणखी जास्त प्रमाणात आटतं.
फाविद,
फाविद,
जेव्हा फोडणीत वाटप टाकतो त्या नंतर भांड्याला चिटकलेले वाटप अगदी थोड्या पाण्यात विसळून ते पाणी त्यात ओततो.
>>>>>>
हे लिहिण्याची गरज असते होय
पाकृ वाचता वाचता सार बनले डोळ्यासमोर आणि भूक लागली
>>>>>हे लिहिण्याची गरज असते
>>>>>हे लिहिण्याची गरज असते होय Happy
अगदी.
सगळे फोटो एकदम भारी..!
सगळे फोटो एकदम भारी..!
आई किती प्रेमाने जेवण बनवतेयं लेकासाठी .. फोटोत सुद्धा प्रेम दिसतेय बरं...!
आम्ही तांबोटी म्हणतो.. संकरीत टॉमेटोपेक्षा गावठी लागवडीची टॉमेटो चवीला छान लागतात. त्यांचं सार छान होते. मच्छी फ्राय असेल तर मी भातासोबत तिखट वरण बनवते. आता एखाद्या दिवशी बनवेन हे सार..!
आमच्या भागात चिचेंची कढी बनवतात . भातासोबत खायला छान लागते '.. त्यासोबत भाजलेला सुका बोंबिल किंवा भाजलेला पापड.. ! मला भाजलेला पापड आवडतो भातासोबत..
मला आठवते की फेसबुकला दिसला होता हा तुमचा लेख..!
धन्यवाद रुपाली
धन्यवाद रुपाली
भाजलेला सुका बोंबिल माझाही फार आवडीचा.. पापडासारखाच भाजून भातासोबत तोंडाला लावायला मजा येते.. कुळीथ पिठाची पिठी भात आणि सुका बोंबील हे पावसाळ्याचे आवडीचे कॉम्बिनेशन..
परी डिट्टो आजीसारखी दिसते का?
परी डिट्टो आजीसारखी दिसते का? तुम्हाला माहीत. मला तरी वाटली. अवांतराबद्दल क्षमस्व.
सामो हो, अचूक निरीक्षण
सामो हो, अचूक निरीक्षण
आपली पोरगी आपल्यासारखी दिसते यापेक्षा जास्त आनंददायी असते ते तिचे आपल्या आईसारखे दिसणे
खूपच छान. धन्यवाद.
खूपच छान. धन्यवाद.
टोमॅटो सार, सॉरी फाऊल झालं,
टोमॅटो सार, सॉरी फाऊल झालं, तांबाट्याचे सार मस्त दिसतेय! कँडिडपणे काढलेले फोटो छान दिसत आहेत.
आम्ही टोमॅटोचे सार वेगळ्या प्रकारे करतो आणि ते पातळ फुळ्ळुक असते; असे ग्रेव्ही सारखे नसते.
खोबरं वाळलेलं घेतलं आहे का? टोमॅटोच्या फोडी मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यात का? कोकमला काही पर्याय आहे का? कोकमचा स्वयंपाकात कधी उपयोग केलेला नाहीय. फक्त कोकम सरबत पिऊन माहीत आहे. चार-पाच जणांसाठी पुरेल असे साहित्य आणि पाकृ संक्षिप्त सांगाल का? टेम्प्टिंग वाटते आहे; नक्की करून बघीन.
आईंना नमस्कार सांगा.
वामनराव धन्यवाद
वामनराव धन्यवाद
खोबरे ओले
तांबाटे मिक्सरमध्येच सोबत जातील
कोकमाला पर्याय काय विचारने म्हणजे कोकणाला पर्याय काय असे झाले
तरी अधिक टिपा मध्ये लिहिले आहे की फिश सार मध्ये कम्पल्सरी आणि यात चवीनुसार.. तुम्ही न घालता करून बघा.
आमच्याकडे फिश मॅरीनेट करायला कोकम वापरतात किंवा त्याचे आगळ जे सोल कढी बनवायला देखील वापरतात.
मला पित्ताचा त्रास होतो तेव्हाही मी कधी ते गोडूस कोकम सरबत न पिता आगळमध्ये साखर घालून पितो. कारण नुसते आगळ फार आंबट असते. किंवा कोकम उकळत्या पाण्यात टाकून ते पाणी पितो. पण त्याला पर्याय शोधायच्या भानगडीत पडत नाही
@वामन राव,
@वामन राव,
कोकमाऐवजी चिंच चालायला हवी कारण ते आंबटपणासाठीच वापरलंय. ट्राय करून पहा.
सार फारच मस्त दिसतंय. फोटो पण
सार फारच मस्त दिसतंय. फोटो पण छान.
लिहिलेली पाकिटं असतात, पण ती फार बेकार आणि अगदी कोरडी ठाण असतात. साउथिंडियन भाषा म्हणजे केरळी असतील तरी शेवटी ती साउदिंडियनच! 
घरी हे अगदीच कमी तिखट बनतं, पण हे माशाच्या आमटी/ कालवणा बरोबर खाल्लेलं आहे आणि फार म्हणजे फारच आवडलेलं आहे. नक्की करुन बघेन.
र्म्द, चिंच नको. त्याने चव बदलेल वाटतं. आमसुलं नसतील आणि आंबटपणा हवा असेल तर तांबाटी वाढवा. आणि पुढच्या भेटीत आमसुलं आणा. अॅमेझॉनवर दिसत आहेत कोकमं.
आणि आंध्रात आमसुलं मिळावित. आमच्याकडे साउथिंडियन भाषेत
चिंच घातल्याने आंबट तर होते
चिंच घातल्याने आंबट तर होते पण जाणकार ( ज्यांनी नेहेमी घरगुती कोकम वापरून केलेले च सार भात खाल्लेय ) चवीत फरक ओळखू शकतात. तसेच महत्त्वाचं म्हणजे साराच रंग लालभडक न राहता काळपट होतो. कोकम पण रसरशीत हवी. खोबर ताजे असेल तर मस्त दाट होते. ( गावात धाऱ्या पेंडीचो नारळ म्हणतात बहुतेक त्याला) . मी इथे frozen खोबरे वापरून केले ते ok होते. सुके खोबरे वापरू नये असे माझे मत आहे .
रुनमेश ची रेसिपी जी मी पहिल्यांदाच बघितलiय, विस्कळीत लिहिले आहे पण आई चा प्रेमाने रांधतानाचा फोटो बघून समजून येतेय. तसेच आमच्या घरातला नेहेमीच पदार्थ असल्याने मी वाचायचे जास्त कष्ट घेतले नाहीत.
आमची आई टोमॅटो वाफवून घेते मिक्सर मधून काढण्यापूर्वी, वेळ कमी असेल तरच न वाफवता टोमॅटो मिक्सर मध्ये भिजवलेल्या लाल मिरच्या, धने व इतर पदार्थांबरोबर लावते. आमची मावशी वाफवलेल्या टोमॅटोचे साल व बिया ही काढते .
मी मांसाहार करत नसल्याने इतरांसाठी माश्या च्या सारचा बेत असेल तेव्हा माझ्यासाठी टोमॅटो च सार व त्यात तिरफळ ही माझी लहानपणaपासूनची अगदी आवडती आठवण आहे. मीही खोबऱ्याचा वाटप एकदा करते, नारळ विकत आणला की _ (कारण इथे चांगले नारळ मिळत नाहीत) आणि deep freeze करते. मग सार हवे असेल तेव्हा टोमॅटो वाफवून/ मायक्रोवेव करून / किंवा न वाफवता घेते आणि तयार वाटप घालते व फोडणी देते. पुदिना काही आमच्या गावात/ नातेवाईकात सर्रास टोमॅटोच्या सार आत कोणी घालत नाही( मीही नाही), कढीपत्ता घालतात ह बघितले आहे.
अर्थात चव बदलेल! कोकमाची सर
अर्थात चव बदलेल! कोकमाची सर चिंचेला कशी येणार? पण वामन रावांना चिंच सहज घरीच उपलब्ध होऊ शकेल असं वाटलं. शिवाय तांबाटी आंबट नसतील जास्त तर मजा नाही येणार.
मी इथे frozen खोबरे वापरून केले ते ok होते. सुके खोबरे वापरू नये असे माझे मत आहे >>> या टिपेबद्दल थँक्यू मेघा
या सारात अलगद , बोंबील किंवा
या सारात अलगद , बोंबील किंवा मांदेली सोडून द्यावीत हाय कि नाय मस्त बोंबलाचे / मांदेलीचे सार तयार .
आमच्याकडे माश्यांची डोकी
आमच्याकडे माश्यांची डोकी सारात जातात.
लहान असताना माझ्यासाठी म्हणून कोलंबी सुद्धा जायची.
आमच्याकडे माश्यांची डोकी
आमच्याकडे माश्यांची डोकी सारात जातात >>>>+१ इथे मास्यांची डोकी, हे बरोबर आहे... जर मास्यांना मान असती तर मास्यांची मुंडकी असं बोलता आलं असतं
मी चिंच घालते सार करताना..
मी चिंच घालते सार करताना.. माश्यांचे कालवण चिंचेचा कोळ आणि टॉमेटो शिवाय अपूर्ण आहे माझ्या एरियात.. !
वामनराव नांदेड मध्ये आमसु लं
वामनराव नांदेड मध्ये आमसु लं मिळतात
महालक्ष्मी oil showroom आनंद नगर
माझं नाव अजिबात सांगू नका
नाहीतर जुना मोंढा
>>>>>>>>आमच्याकडे माश्यांची
>>>>>>>>आमच्याकडे माश्यांची डोकी सारात जातात.
बगड ना? मग डोकी का म्हणताय.
अच्छा.. आमच्याकडे हा शब्द
अच्छा.. आमच्याकडे हा शब्द वापरत नसावेत
घरी तरी डोकीच.बोलतात.
त्यातही बांगडा पहिला.. सगळ्यांना नाही झेपत हा मासा
अरे ओके ओके
अरे ओके ओके
ओके कश्याला.. निघालाच आहे तर
ओके कश्याला.. निघालाच आहे तर संपवूयाच विषय
तेवढीच शब्दकोशात भर..
गूगल करता हे सापडले.
-----
माशाचे डोके (बगड) म्हणजे काय?
माशाचे डोके म्हणजे माशाच्या शरीराचा पुढचा भाग, ज्यामध्ये डोके, जबडा, डोळे आणि कल्ले यांचा समावेश असतो.
घोल माशाच्या डोक्याला विशेषतः "बगड" म्हणतात.
----
म्हणजे प्रचलित शब्द तर आहे
होय होय आई (साबा) कडून कळला.
होय होय आई (साबा) कडून कळला.
डोक्यांना टकळी म्हणतात माहिती
डोक्यांना टकळी म्हणतात माहिती आहे. बगड शब्द नवीन आहे.
येस टकळी हा शब्द घरी ऐकला आहे
येस टकळी हा शब्द घरी ऐकला आहे.
Pages