तेलुगु पाककृती: उग्गानी (मुरमुऱ्याचा उपमा)

Submitted by वामन राव on 30 June, 2025 - 04:10
उग्गानी (मुरमुऱ्याचा उपमा)
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तेलुगु पाककृतींच्या मालिकेत मागच्या वेळी राजस गुणाची गार-मधुर-मुलायम दुधी भोपळ्याची खीर पहिली होती. आज किंचीत तामस गुणाची गरम-तिखट उग्गानी पाकृ पाहूया.

हैद्राबादेहून बेंगळुरूला महामार्ग ४४ वरून जाताना कर्नुल हा जिल्हा आपले आंध्र प्रदेशात स्वागत करतो. आजची आपली पाककृती उग्गानी ही त्या कर्नुलचीच खासियत आहे. घरोघरी नुसती उग्गानीच करतात पण इथली रेस्टॉरंट्स उग्गानीसोबत मिरची भजेही देतात. म्हणून, जसा नांदेडला खिचडी-भजे असा एकत्र उल्लेख होतो तसाच इथे उग्गानी-बज्जी असा एकत्र उल्लेख होतो. सकाळी नऊ-साडेनऊ-दहा पर्यंत जर तुम्ही कर्नुल शहरात असाल तर उग्गानी-बज्जी चाखायला विसरू नका.

उग्गानी म्हणजे जसे आपण कांदेपोहे करतो तसा पण मुरमुऱ्याचा उपमा. उग्गानीला मराठवाडा-उत्तर कर्नाटक भागात सुशीला असेही म्हणतात. पण तिथली कृती या आंध्रा-रायलसीमा भागातील उग्गानीच्या कृतीपेक्षा वेगळी असते.

चला तर मग, सुरु करूया सर्वांना आवडेल असा, चटकमटक संपून जाणारा, आणि महत्वाचं म्हणजे झटपट होणारा नाश्त्याचा पदार्थ उग्गानी किंवा सुशीला किंवा मुरमुऱ्याचा उपमा.

साहित्य:

  • मुरमुरे: २५० ग्राम (पाऊण पाकीट)
  • कांदा: एक मध्यम, बारीक चिरून
  • टोमॅटो: एक मध्यम, लहान फोडी करून
  • हिरव्या मिरच्या: तीन-चार, चिरून
  • शेंगदाणे: दोन चमचे / आवडीनुसार

उग्गानीच्या पिठासाठी

  • दाळवं: चार चमचे
  • वाळलेल्या लाल मिरच्या: चार-पाच, तुकडे करून
  • लसूण: चार-पाच पाकळ्या
  • कढीपत्ता: एक काडी

फोडणीसाठी

  • तेल: एक-दीड चमचा
  • मोहरी: अर्धा चमचा
  • जिरे: अर्धा चमचा
  • चणाडाळ: एक चमचा
  • उडीदडाळ: एक चमचा
  • कढीपत्ता: एक काडी
  • हळद: अर्धा चमचा
  • मीठ: एक-दीड चमचा / चवीनुसार

सजावटीसाठी

  • कोथिंबीर:बारीक चिरून
  • (ऐच्छिक) लिंबू: अर्धी फोड

साहित्य १साहित्य २साहित्य ३

क्रमवार पाककृती: 

एका मोठ्या भांड्यात मुरमुरे बुडतील इतके पाणी घाला. हातांनी हलवून सर्व मुरमुरे बुडतील हे पहा. दोन-तीन मिनिटे भिजत राहू द्या. त्यानंतर हातात थोडेथोडे मुरमुरे घेऊन दाबून त्यांतील पाणी काढून टाका व दुसऱ्या भांड्यात ठेवा.

एका कढईत एक-दीड चमचा तेल घाला. गरम झाल्यावर मोहरी, जिरे, चणाडाळ, उडीदडाळ हे घाला.मोहरी तडतडू लागल्यावर शेंगदाणे व बारीक चिरलेला कांदा घाला. नीट हलवून घ्या. एक मिनिटाने त्यात चिरलेली हिरवी मिरची व कढीपत्ता घाला. मीठ व टोमॅटोच्या फोडी घाला. हळद घालून, गॅस मंद आचेवर करून झाकून ठेवा. दोन मिनिटांत सर्व शिजेल.

मिक्सरच्या जारमध्ये दाळवं, चार-पाच वाळलेल्या लाल मिरचीचे तुकडे, चार-पाच लसूण पाकळ्या व एक काडी कढीपत्ता यांचे पीठ करून घ्या. उग्गानीला तिची विशिष्ट चव येण्यासाठी हे पीठ महत्वाचे आहे.

आता कढईतील कांदा-टोमॅटो मऊ झाला असेल. एकदा हलवून घ्या. त्यात मिक्सरमधील दाळवांचे पीठ आणि भिजलेले मुरमुरे घाला. हळुवारपणे हलवून नीट एकत्र करून घ्या. चव पाहून हवे असेल तर मीठ घाला. गॅस बंद करा व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आवडत असेल तर अर्धे लिंबू पिळा.

एव्हाना अरेनं किंवा अगंनं ऑर्डर केलेली मिरची भजी आली असतीलच! 😜

प्लेटमध्ये गरमागरम उग्गानी-बज्जी वाढा आणि आस्वाद घ्या.

घ्या

पाकृ आवडली तर नक्की करून पहा व इथे फोटो टाका. काही सूचना, सल्ला, प्रश्न असतील तर प्रतिसादांत अवश्य लिहा. तुमच्या भागातही हा किंवा असा पदार्थ करत असतील तर तो कसा करतात, त्याला काय म्हणतात हे नक्की लिहा.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 
  • मुरमुरे हे चोपडे हवेत, खरखरीत नकोत. नाहीतर खरोखरचाच उपमा होऊन बसेल! घेताना पाहून घ्या.
  • मुरमुरे दोन-तीन मिनिटांपेक्षा जास्त भिजवू नका. तसेच ते भिजवल्यावर फोडणी वगैरे करायला फार वेळ लावू नका. झटपट करायला हवे म्हणजे मुरमुरे मोठ्याच आकाराचे राहतील. हवंतर पीठ आधी करून ठेवून मग पुढची कृती करा.
  • मुरमुरे आधीच मिठाळ (salted) असतात. त्यामानाने नेहमीपेक्षा थोडे कमीच मीठ घाला. हवे तर शेवटच्या पायरीला अड्जस्ट करता येईल.
  • वरील साहित्याच्या प्रमाणाने उग्गानी ही थोडी तिखटच होते. हवे असल्यास लाल व हिरव्या मिरच्या एक-एक कमी घ्या.
  • बज्जी (मिरची भजी) चा उल्लेख हा कर्नुलला रेस्टॉरंटांत उग्गानी-बज्जी एकत्र मिळते त्या सवयीमुळे केलेला आहे. मिरची भजी हवीतच असे नाही. घरोघरी नुसती उग्गानीच करतात.
  • तेलुगु पाक परंपरेत बहुतेक सगळ्या चटण्या, उपमा, चित्रान्न वगैरेंच्या फोडणीत जिरे, मोहरी, चणाडाळ, उडीदडाळ, कढीपत्ता, वाळलेल्या लाल मिरच्या, हिंग वगैरे घटक असतात.
  • अश्या फोडणींत शक्यतो गोटा उडीदडाळ वापरावी. वरील फोटोतही गोटा उडीदडाळ दिसते आहे.
  • साहित्याच्या पहिल्या फोटोत कडुलिंबाची डहाळी उगीचच ठेवलेली आहे, पाकृशी तिचा संबंध नाही. 😜

फोटो काढताना फोटोउग्गानी

यापूर्वी घरी व बाहेर काढलेले फोटो:

उग्गानी बज्जी उग्गानी बज्जी उग्गानी बज्जी

आवडलं असेल तर खाली वामन राव यांचे चाहते व्हा! हे बटन दाबा! 😜

माहितीचा स्रोत: 
निरीक्षण, चर्चा, अनुभव
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा काय फोटो आहेत…. ज ह ब ह री!!!

उपमा पण जबरीच असावा. करुन पाहते व कळवते.

चोपडे कुरमुरे म्हणजे काय ते कळले नाही. आमच्याकडे आजरा पेशल कुरमुरे मिळतात. ते ऑफ व्हाईट, जरा फुगीर व वरुन गुळगुळीत असतात. काही ठिकाणे जरा पांढरट, बारिक व वरुन खडबडीत कुरमुरे मिळतात. चोपडे म्हणजे आजरा
पेशल म्हणायचे.

व्वा , काय सुंदर फोटो आहेत !! रेसिपी पण सोपी आहे . नक्की करून बघीन. चोपडे चुरमुरे म्हणजे काय ? भडंग चुरमुरे चालतील का?

तपशीलवार पाकृ लिहीण्याची तुमची पध्दत आवडते>>+12345
फार भारी डीटेलवार लिहिता तुम्ही..खाण्यावर मनापासून प्रेम आहे तुमच असं दिसत फोटो आणि लिहिण्याच्या style वरून...फोटोतली प्लेट कुणी आयती आणून हातात दिली तर काय बहार येईल Happy

मस्त. Lol

आवडलं असेल तर खाली वामन राव यांचे चाहते व्हा! हे बटन दाबा! ..हे खूपच आवडलं आहे.

सर्व वाचकांचे आणि व्यक्त-अव्यक्त प्रतिसादकांचे आभार.

मुरमुरे म्हणजेच कुरमुरे किंवा चुरमुरे का याची खात्री नाही.‌

चोपडे मुरमुरे म्हणजे वरुन गुळगुळीत असतात. ते पाण्यात भिजवून दाबून पाणी काढून टाकल्यावर मूळच्या आकारात येतात. या पाकृ साठी ते मुरमुरे हवेत. वरुन खडबडीत असलेले मुरमुरे पाण्यात घातल्यावर त्यांचा लगदा होतो, ते चालणार नाहीत.

>>> खाण्यावर मनापासून प्रेम आहे तुमच असं दिसतं

हो. खाण्यावर, स्वयंपाकावर, खाऊ घालण्यावर माझं खरंच मनापासून प्रेम आहे. Happy

>>> (चिकना चोपडा चेहेरा)
एक नंबर!

>>> फोटोतली प्लेट कुणी आयती आणून हातात दिली तर काय बहार येईल

रेसिपी सोपीच आहे, करून प्लेटमध्ये वाढा, डाव्या हाताने उचलून उजव्या हातात आयती प्लेट आणून द्या, बहार येईल!

>>> हे सुशीला / ऊग्गानी कितीही खाल्ल तरी मन भरत नाही. अतोनात आवडता पदार्थ

#MeToo

>>> आवडलं असेल तर खाली वामन राव यांचे चाहते व्हा! हे बटन दाबा! ..हे खूपच आवडलं आहे.

हौ फिर!

इत्ते म्हेनतां करके, सामानां जमा करके, पूऽरा पकाना। वोइच टाइम पे अच्चे अच्चे फोटूआं निकालना। फिर लम्बी लम्बी रेसिपीयां लिखना। उसमें बी गलतफॅमिली नइ होना बोलके टीप्पां लिखना। जहां होना व्हाम्पे लिंका देके, पूऽरा मॅटर कम्पाइल करना। फिर हमारे इनके बातां सुनके ह्यांपे आके थ्रेडां पोष्ट करना। फिर लोगां पर्तिसादां देते उनके पर्तिपर्तिसादां देना। कूच पूचे तो जवाबां लिखना।

तो खाऽली एक बटन दबाओ इत्ता बी बोलने का हक नइ र्‍हैना हमारकु? Lol

>>> भडंग चुरमुरे चालतील का?

मला वाटतं, भडंग म्हणजे मोठमोठे मुरमुरे असतात.

हे मुरमुरे बाहेरून चोपडे / गुळगुळीत असतात. हे हवेत. 👇

चोपडे मुरमुरेहे मुरमुरे बाहेरून खडबडीत / खरखरीत असतात. चालणार नाहीत. 👇

खडबडीत मुरमुरे

भार्री फोटो असतात तुमचे. Happy
तेल लावून चप्प वेणी घालणार्‍या सुशीलाचा मेकओव्हरच एकदम! हॅलो सूश! Proud

Happy फार भारी असतात तुमचे फोटो, कृती आणि मांडणी. उग्गानी प्रकार नवीन आहे माझ्यासाठी.

स्वाती, हो ना. "सुशीला, सुशीला की जवाssनी" वाजले मनात. Proud

Happy वामन राव, बराबर बोलेरे तुम.
भोत ही मेहनत का काम है रेसिपी लिखना ....तो यू ट्यूब जैसा लाईक बटन दबाओ बोलना वाजीब है...

काय जबरदस्तं प्रेझेन्टेशन आहे , प्रत्येक स्टेप फ्हिज्युअली बोलतेय !
माबो वर पिन करून ठेवा हे रेसिपी ‘हाऊ टु व्हिज्युअली प्रेझेन्ट युअर रेसिपी’ !

डिजे +१
फार सुरेख प्रेझेटेशन आणी फोटो

पाकृमधले घटक आवडते असोत वा नावडते, तुमचे फोटो मात्र बघत रहावेत असेच असतात - खास करून घटक पदार्थांची मांडणी. अगदी रोजचे मीठ साखर कांदा टोमॅटो असेच पदार्थ असतात, पण तुमचे फोटो त्यांना भारी ग्लॅमरस बनवतात.

यात कद्दू नाहीये, म्हणजे मला करून बघता येइल Happy

देखणी आणि चविष्ट पाककृती.

फोटोवरून समजलं भडंग घ्यायचे, चुरमुरे नाही. तसंही आमच्याकडे भडंग आणतात जास्त कारण ते पचायला जास्त हलके असतात असं आई सांगायची.

अरे ही तर सुशीला! असे म्हणून वाचायला सुरुवात केली आणि नवीन रेसिपी सापडली ! पावडर तयार करुन करायला मजा येईल असे वाटतेय.

>>> ते उग्गानीचं पीठ दर वेळी ताजं करावं लागतं का? करून ठेवलं तर टिकेल का?

आम्ही कधी करून ठेवलं नाही. दरवेळी ताजे करून घेतो. पिठात लसूण व कढीपत्ता आहे त्यामुळे फ्रिजमध्ये पीठ ठेवलं तर आठवडाभर टिकायला हवे. पण जनात व मनात इतके वैविध्यपूर्ण पदार्थ असताना आठवड्याभरातच सुशीला पुन्हा भेटायला येईल का? Wink

>>> मुरमुरे न घालता पोहे घालून केले तर चालेल का?

धाग्यात म्हटल्याप्रमाणे - उग्गानी म्हणजे जसे आपण कांदेपोहे करतो तसा पण मुरमुऱ्याचा उपमा.

पण हं, यातूनच एक नवीन रेसिपी होईल असे दिसते. उग्गानीचे पीठ घालून या रेसिपीप्रमाणे कांदे पोहे! व्वा! हे नक्की करून बघीन.

>>> तेल लावून चप्प वेणी घालणार्‍या सुशीलाचा मेकओव्हरच एकदम! हॅलो सूश

>>> "सुशीला, सुशीला की जवाssनी" वाजले मनात

माबोकर / माबोकरीणींच्या प्रतिभेला बहरंच आलाय इथे तर! येऊ द्या अजून!

Pages