तेलुगु पाककृती: उग्गानी (मुरमुऱ्याचा उपमा)

Submitted by वामन राव on 30 June, 2025 - 04:10
उग्गानी (मुरमुऱ्याचा उपमा)
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तेलुगु पाककृतींच्या मालिकेत मागच्या वेळी राजस गुणाची गार-मधुर-मुलायम दुधी भोपळ्याची खीर पहिली होती. आज किंचीत तामस गुणाची गरम-तिखट उग्गानी पाकृ पाहूया.

हैद्राबादेहून बेंगळुरूला महामार्ग ४४ वरून जाताना कर्नुल हा जिल्हा आपले आंध्र प्रदेशात स्वागत करतो. आजची आपली पाककृती उग्गानी ही त्या कर्नुलचीच खासियत आहे. घरोघरी नुसती उग्गानीच करतात पण इथली रेस्टॉरंट्स उग्गानीसोबत मिरची भजेही देतात. म्हणून, जसा नांदेडला खिचडी-भजे असा एकत्र उल्लेख होतो तसाच इथे उग्गानी-बज्जी असा एकत्र उल्लेख होतो. सकाळी नऊ-साडेनऊ-दहा पर्यंत जर तुम्ही कर्नुल शहरात असाल तर उग्गानी-बज्जी चाखायला विसरू नका.

उग्गानी म्हणजे जसे आपण कांदेपोहे करतो तसा पण मुरमुऱ्याचा उपमा. उग्गानीला मराठवाडा-उत्तर कर्नाटक भागात सुशीला असेही म्हणतात. पण तिथली कृती या आंध्रा-रायलसीमा भागातील उग्गानीच्या कृतीपेक्षा वेगळी असते.

चला तर मग, सुरु करूया सर्वांना आवडेल असा, चटकमटक संपून जाणारा, आणि महत्वाचं म्हणजे झटपट होणारा नाश्त्याचा पदार्थ उग्गानी किंवा सुशीला किंवा मुरमुऱ्याचा उपमा.

साहित्य:

  • मुरमुरे: २५० ग्राम (पाऊण पाकीट)
  • कांदा: एक मध्यम, बारीक चिरून
  • टोमॅटो: एक मध्यम, लहान फोडी करून
  • हिरव्या मिरच्या: तीन-चार, चिरून
  • शेंगदाणे: दोन चमचे / आवडीनुसार

उग्गानीच्या पिठासाठी

  • दाळवं: चार चमचे
  • वाळलेल्या लाल मिरच्या: चार-पाच, तुकडे करून
  • लसूण: चार-पाच पाकळ्या
  • कढीपत्ता: एक काडी

फोडणीसाठी

  • तेल: एक-दीड चमचा
  • मोहरी: अर्धा चमचा
  • जिरे: अर्धा चमचा
  • चणाडाळ: एक चमचा
  • उडीदडाळ: एक चमचा
  • कढीपत्ता: एक काडी
  • हळद: अर्धा चमचा
  • मीठ: एक-दीड चमचा / चवीनुसार

सजावटीसाठी

  • कोथिंबीर:बारीक चिरून
  • (ऐच्छिक) लिंबू: अर्धी फोड

साहित्य १साहित्य २साहित्य ३

क्रमवार पाककृती: 

एका मोठ्या भांड्यात मुरमुरे बुडतील इतके पाणी घाला. हातांनी हलवून सर्व मुरमुरे बुडतील हे पहा. दोन-तीन मिनिटे भिजत राहू द्या. त्यानंतर हातात थोडेथोडे मुरमुरे घेऊन दाबून त्यांतील पाणी काढून टाका व दुसऱ्या भांड्यात ठेवा.

एका कढईत एक-दीड चमचा तेल घाला. गरम झाल्यावर मोहरी, जिरे, चणाडाळ, उडीदडाळ हे घाला.मोहरी तडतडू लागल्यावर शेंगदाणे व बारीक चिरलेला कांदा घाला. नीट हलवून घ्या. एक मिनिटाने त्यात चिरलेली हिरवी मिरची व कढीपत्ता घाला. मीठ व टोमॅटोच्या फोडी घाला. हळद घालून, गॅस मंद आचेवर करून झाकून ठेवा. दोन मिनिटांत सर्व शिजेल.

मिक्सरच्या जारमध्ये दाळवं, चार-पाच वाळलेल्या लाल मिरचीचे तुकडे, चार-पाच लसूण पाकळ्या व एक काडी कढीपत्ता यांचे पीठ करून घ्या. उग्गानीला तिची विशिष्ट चव येण्यासाठी हे पीठ महत्वाचे आहे.

आता कढईतील कांदा-टोमॅटो मऊ झाला असेल. एकदा हलवून घ्या. त्यात मिक्सरमधील दाळवांचे पीठ आणि भिजलेले मुरमुरे घाला. हळुवारपणे हलवून नीट एकत्र करून घ्या. चव पाहून हवे असेल तर मीठ घाला. गॅस बंद करा व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आवडत असेल तर अर्धे लिंबू पिळा.

एव्हाना अरेनं किंवा अगंनं ऑर्डर केलेली मिरची भजी आली असतीलच! 😜

प्लेटमध्ये गरमागरम उग्गानी-बज्जी वाढा आणि आस्वाद घ्या.

घ्या

पाकृ आवडली तर नक्की करून पहा व इथे फोटो टाका. काही सूचना, सल्ला, प्रश्न असतील तर प्रतिसादांत अवश्य लिहा. तुमच्या भागातही हा किंवा असा पदार्थ करत असतील तर तो कसा करतात, त्याला काय म्हणतात हे नक्की लिहा.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 
  • मुरमुरे हे चोपडे हवेत, खरखरीत नकोत. नाहीतर खरोखरचाच उपमा होऊन बसेल! घेताना पाहून घ्या.
  • मुरमुरे दोन-तीन मिनिटांपेक्षा जास्त भिजवू नका. तसेच ते भिजवल्यावर फोडणी वगैरे करायला फार वेळ लावू नका. झटपट करायला हवे म्हणजे मुरमुरे मोठ्याच आकाराचे राहतील. हवंतर पीठ आधी करून ठेवून मग पुढची कृती करा.
  • मुरमुरे आधीच मिठाळ (salted) असतात. त्यामानाने नेहमीपेक्षा थोडे कमीच मीठ घाला. हवे तर शेवटच्या पायरीला अड्जस्ट करता येईल.
  • वरील साहित्याच्या प्रमाणाने उग्गानी ही थोडी तिखटच होते. हवे असल्यास लाल व हिरव्या मिरच्या एक-एक कमी घ्या.
  • बज्जी (मिरची भजी) चा उल्लेख हा कर्नुलला रेस्टॉरंटांत उग्गानी-बज्जी एकत्र मिळते त्या सवयीमुळे केलेला आहे. मिरची भजी हवीतच असे नाही. घरोघरी नुसती उग्गानीच करतात.
  • तेलुगु पाक परंपरेत बहुतेक सगळ्या चटण्या, उपमा, चित्रान्न वगैरेंच्या फोडणीत जिरे, मोहरी, चणाडाळ, उडीदडाळ, कढीपत्ता, वाळलेल्या लाल मिरच्या, हिंग वगैरे घटक असतात.
  • अश्या फोडणींत शक्यतो गोटा उडीदडाळ वापरावी. वरील फोटोतही गोटा उडीदडाळ दिसते आहे.
  • साहित्याच्या पहिल्या फोटोत कडुलिंबाची डहाळी उगीचच ठेवलेली आहे, पाकृशी तिचा संबंध नाही. 😜

फोटो काढताना फोटोउग्गानी

यापूर्वी घरी व बाहेर काढलेले फोटो:

उग्गानी बज्जी उग्गानी बज्जी उग्गानी बज्जी

आवडलं असेल तर खाली वामन राव यांचे चाहते व्हा! हे बटन दाबा! 😜

माहितीचा स्रोत: 
निरीक्षण, चर्चा, अनुभव
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

^^त्यापेक्षा पोहे काय वाईट?
चुरमुऱ्यांचा यूएसपी हा त्यांचा कुरकुरीतपणा आहे. तो का घालवायचा?^^
मला पण आधी असे वाटले होते ,पण एकदा करून खाल्ल्यावर कळले की पोहे आणि ही चव वेगळी आहे.
मला तर खूप आवडली.

डाळव ची चव वेगळी मजा आणते यात.
खाऊन बघा मग ठरवा, शेवटी पसंद अपनी अपनी...

भिजवलेले पोहे आणि चुरमुरे याची चव ,टेक्स्चर, स्वाद वेगळा असतो !
मेन फरक असा कि पोहे भिजवल्यावर थोडे फुगतात आणि चुरमुरे मात्रं बरेच श्रिंक होतात !
मला पोह्यांपेक्षा ही रेसिपी आवडते पण चुरमुरे कायम आणले जात नाहीत ग्रोसरी मधे आणि असले तरी एक अख्खी भरलेली बॅग असेल तरच भरपूर होतात , नाहीतर आकार कमी झाल्याने कमी बनतात .. म्हणून इतके फ्रिक्वेन्टली बनत नाहीत Happy

ती पावडर इंटरेस्टिंग आहे. चवीचा अंदाज आला. कारण भडंग करताना त्यात लसूण, मेतकूट घातलं जातं. लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता असतोच. तोच खमंगपणा येणार.

बाकी, सुशिलाचा पुल्लिंगी वापर वाचला की मला का-य-म 'हा माझा बायको' आठवतं. Lol

कर्नाटकात बेळ्ळारी रायचूर भागात ही सिग्नेचर डिश आहे. सगळ्या हॉटेल, टपर्‍या, चहाच्या गाड्यांवर असतोच हा जिन्नस.

सुस्ला हे कानडी नाव. चटनीपुडी भुरभुरुन दिला जाणारा. सोबत मिर्चीबज्जे हवंच.

मराठीत त्याचा सुशीला झाला Happy

>>> कर्नाटकात बेळ्ळारी रायचूर भागात ही सिग्नेचर डिश आहे.

हं. ईशान्य कर्नाटकचा भाग

>>> कर्नूल जिल्ह्यामध्ये करनाल आडनावाची असतात का?

मी तरी ऐकलं नाहीय. बाकी, राव, रेड्डी, नायडू परीचयात आहेत.

Pages