
.
साहित्य:
शेंगदाणे - दोन वाट्या
वाळलेले खोबरे - दोन अर्धगोल
तीळ - एक वाटी
चिंच - सुमारे अर्धी वाटी
लाल तिखट - चार-पाच चमचे
हळद - एक चमचा
जिरे - चार चमचे
गरम मसाला - एक चमचा
सूर्यफूल तेल - आठ-दहा चमचे
मीठ - तीन-चार चमचे
अद्रक-लसण पेस्ट - चार चमचे
मध्यम आकाराची वांगी - अर्धा किलो
हिरव्या मिरच्या - आठ-दहा
कोथिंबीर - एक जुडी (बारीक चिरून एक वाटी)
ऐच्छिक:
शहाजिरे - एक चमचा
बारीक मोहरी - अर्धा चमचा
हिरवा पुदिना - दहा-बारा काड्या (बारीक चिरून अर्धी वाटी)
.
मायबोलीवर पहिल्यांदाच लिहितो आहे. पाकृ माबोकरांना आवडेल अशी आशा आहे.
तेलंगाणा खाद्य संस्कृतीत बैंगन मसाला (बगारे बैंगन असेही म्हणतात) या भाजीचे स्थान अविभाज्य आहे. कार्य-प्रसंग, सार्वजनिक अन्नप्रसाद, घरी पै-पाहुणे आले तर, अश्या वेळी बैंगन मसाला नक्कीच केला जातो. करायला सोपी, सर्वांना आवडणारी आणि उरली तरी टिकणारी ही थोडी तिखट, किंचित आंबट अशी भाजी तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे.
चला तर मग सुरुवात करुया.
चिंच धुवून तीन वाट्या गरम पाणी घालून भिजत ठेवा. वांगी धुवून घ्या. कोथिंबीर व पुदिना निवडून धुवून ठेवा. अद्रक छिलून, लसूण सोलून पेस्ट करुन घ्या. खोबऱ्याचे चिरून बारीक तुकडे करुन घ्या.
एका मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात वा कढईत शेंगदाणे, खोबरे, तीळ याक्रमाने मध्यम आचेवर वेगवेगळे कोरडेच भाजून घ्या. करपू न देता खरपूस भाजल्यावर ताटात काढून ठेवा. पातेले कपड्याने पुसून तयार ठेवा.
वांगी कोरडी करुन घ्या. पुढची देठे किंचित कापून टाकून, दोन दोन काप देऊन ठेवा. चिरून फोडी करू नका. मिरच्या शेंडे-देठे काढून दोन भागांत उभ्या चिरून घ्या. कोथिंबीर व पुदिना बारीक चिरून घ्या.
मोठ्या आचेवर पातेल्यात दोन चमचे तेल घाला. गरम झाल्यावर थोडीशी मोहरी घाला. ती तडतडल्यावर वांगी घाला. एक चमचा मिठ घालून नीट हलवून घ्या. मंद आच करुन झाकून ठेवा. पुढे दिलेली मसाल्याची तयारी करताना अधूनमधून थोडे-थोडे हलवा. पाच-सात मिनिटात वांगी ७५% शिजतील.
मिक्सरच्या मोठ्या भांड्यात खोबरे, शेंगदाणे, तीळ याच क्रमाने फिरवून घ्या. अगदी बारीक करू नका. चिंचेचा कोळ कुस्करुन घ्या. चिंचेचे एक-दीड वाट्या पाणी मसाल्यात घालून पुन्हा थोडे फिरवून घ्या. मसाल्याची सरसरीत रवाळ पेस्ट व्हायला हवी.
पातेल्यातील वांगी दुसऱ्या भांड्यात काढून ठेवा. त्याच पातेल्यात सहा-आठ चमचे तेल घालून गरम झाल्यावर मोहरी घाला. तडतडू लागल्यानंतर जिरे घाला. लगेच अद्रक-लसूण पेस्ट घाला. दहा-वीस सेकंद परतून लगेच मसाला पेस्ट घाला. गॅस मोठा करुन मिश्रण नीट हलवून घ्या.
दोन मिनिटांनी गॅस मंद करा. पातेले झाकून ठेवा. अधूनमधून हलवत राहा नाहीतर तिळामुळे मसाला बुडाला चिकटून करपू शकतो.
आठ दहा मिनिटांनी मसाल्याचा सुगंध येऊ लागेल. आता शहाजिरे, हळद, तिखट, बारीक चिरलेला पुदिना, अर्धी कोथिंबीर व हिरव्या मिरच्या घाला. नीट हलवून घ्या. झाकून ठेवा. दोन मिनिटांनी वांगी व उरलेले चिंचेचे पाणी घाला. गरम मसाला घालून किंचित हलवून घ्या. वांगी सबंध दिसायला हवीत, शक्यतो फुटू नयेत. दोन मिनिटे झाकून ठेवा. गॅस बंद करुन अजून पाच मिनिटे झाकूनच राहू द्या. वाढण्याआधी उरलेली कोथिंबीर घाला.
वाफाळता बगारा खाना आणि बैंगन मसाला वाढा. तोंडी लावायला कांदा, काकडी, गाजर द्या. शेवटी पांढरा भात व दही वाढा.
वाफाळता पांढरा भात किंवा गरम पोळी यांसोबतही हा बैंगन मसाला चांगला लागतो.
- पाककृतीत तेलाचे प्रमाण कमी करु नये नाहीतर चांगली चव येत नाही.
- ही भाजी तेलकट वाटत असेल तर वाढताना तेलाचा तवंग एका बाजूने काढून टाका.
- मोहरी ही केवळ तेल तापले आहे का हे पाहण्यासाठी, सवय म्हणून, वापरली आहे.
- खोबळ्याऐवजी खोबऱ्याचा कीसही वापरता येतो; पण रेडिमेड कीस अगदी कोरडा वाटतो.
- तेलंगाणात (आणि एकूणच दक्षिणेत) चिंचेचे प्रमाण स्वयंपाकात जास्त असते; वरील साहित्यात चिंच जास्त वाटत असेल तर किंचित कमी करता येईल.
- ही भाजी आदल्या दिवशी करुन फ्रिजमध्ये ठेऊन दिली तर अजून चविष्ट लागते.
- चिंच आणि तेलाच्या अधिक प्रमाणामुळे ही भाजी (तसेच मिरची का सालन वगैरे) फ्रिजमध्ये तीन-चार दिवस चांगली राहते. अनेक घरी अश्या भाज्या जास्त प्रमाणात करुन ठेवतात आणि दोन-तीन दिवस भातासोबत खातात.
- या भाजीत वांग्यांऐवजी / वांग्याशिवाय मध्यम आकाराचे, लाल टोमॅटो न चिरता घालता येतात.
- वांग्यांऐवजी तोंडली घालून दोंडा-मसाला करता येतो.
- वांग्यांऐवजी मोठ्या मिरच्या घालून आणि ग्रेव्ही थोडीशी पातळ करुन मिरची-का-सालन करता येते.
- इतरही variation करता येते.
- यावेळी मी फोटोत दिसतात तशी फिक्कट जांभळी वांगी घेतली होती. पण शक्यतो बैंगन मसाल्यासाठी गडद जांभळी वांगी घेतात.
वरील पाककृतीचा तेलंगाणा भाषेत सारांश:
बैंगन मसाला कैसे बनाना पूचरैं? भोत सिम्पल है खाला।
कम तेल में बैंगनाँ तल के ल्येओ, तिल्ली-पल्ली-कोप्रा भून के, इमली का पानी डालके मिक्सी कर ल्येओ। अच्चा तेल दाल के भून ल्येओ। हरी मिरिच, पुदीना, कोतमीर दाल के, बैंगनाँ दाल के अच्चा मिक्स कर ल्येओ। गरम मसाला दाल के ग्यास बंद कर ल्येओ। हौर कुच बी नक्को करो खाला।
बगारे के सात में लगा द्येओ।
---
ता. क.: पाककृतींच्या वर्गवारीत (इतर पर्यायांशिवाय) कर्नाटकी, केरळी, दाक्षिणात्य असे पर्याय आहेत; तेलुगु, आंध्र किंवा तेलंगणा हे पर्याय नाहीत; त्यापैकी योग्य पर्याय द्यावेत असे वाटते.
खमंग!!
खमंग!!
छान आहे पाकृ
Photos सुद्धा मस्त
तों पा सु
.. मायबोलीवर पहिल्यांदाच
.. मायबोलीवर पहिल्यांदाच लिहितो आहे…
फोटोज्, features चा वापर, सादरीकरण सर्वच टॉप नॉच आहे 👌
पहिलटकरणीची धांदल अजिबात दिसेना.
खाला कू बगारे बैगन की रेसिपी बताए वो तो हौर ग़ज़ब किए. 😀
अरे वा. अनिंद्य यांना मम.
अरे वा. अनिंद्य यांना मम.
मस्त पाकृ आणि मस्त सादरीकरण.
तिकडे "रोमातले माबोकर" ही कॉमेंट काढुन टाकण्यात येत आहे.
मस्त आहे रेसिपी. मला फार
मस्त आहे रेसिपी. मला फार आवडते ही भाजी.
गेल्य्याच आठवड्यात मी रेस्टॉरंटमध्ये बैंगन मिरची का सालन ऑर्डर केलं होतं.
छान रेसिपी आणि प्रेझेंटेशन
छान रेसिपी आणि प्रेझेंटेशन
मस्त दिसतेय वांगंभाजु.
मस्त दिसतेय वांग्याची रस्साभाजी
तोंपासु एकदम!!
चवीला सुद्धा एक नंबर असणार.
फ्रिजमध्ये बैगना सो रेले..
फ्रिजमध्ये बैगना सो रेले.. उद्याच त्यांचे कल्याण करते.
फोटोमधले मसाल्याचे प्रमाण योग्य वाटतेय.
लिहिताना २ वाट्या शेंगदाणे, २ अर्धगोल खोबरे वगैरे लिहिलेय तेवढे घेतले तर किमान २ किलो बैगन लागतील. हाच मसाला वापरुन दोडकी किंवा पडवळ केली तरीही मस्त लागतील (अस्मिता आठवली
)
खाला कू बगारे बैगन की रेसिपी
खाला कू बगारे बैगन की रेसिपी बताए वो तो हौर ग़ज़ब किए. >>>>
वो भी इतवारे…
इमली झर्रा बोले तो झर्रा कमईच
इमली झर्रा बोले तो झर्रा कमईच डालना.
क्यों बोलते तो कम गिरी तो उपर से डाल सकते, ज्यादा गिरी तो क्या करते.
ईमली तो ज्यादाभी अच्छीही लगती
ईमली तो ज्यादाभी अच्छीही लगती.
तेलंगणा या नावातच तेल आहे.
तेलंगणा या नावातच तेल आहे.
फारच मस्त आहे पाककृती.
फारच मस्त आहे पाककृती. लिहिलेही आहे अगदी शिस्तीत. फोटोही जबरी.
हाच मसाला वापरुन दोडकी किंवा पडवळ केली तरीही मस्त लागतील (अस्मिता आठवली) >>>> माझ्या दोडक्यांनी समस्त माबोकरांच्या मनावर परिणाम झाला आहे.
मेरे दोडके आएंग्ये.
मेरे दोडके पडवळ आएंग्ये.
बघारे बैंगन भारीच. एकदा
बघारे बैंगन भारीच. एकदा थोडेसे शॉर्टकट मध्ये करून पाहिलेले आहे. ही कृती मस्त आहे. नीट करून बघता येईल.
सगळे फोटो झकास आहेत. शेवटचा पानाचा फोटो तर एकदम कातिल. लगेच पानावर बसावे असे वाटले
जबरी रेसिपी .. थोड्या
जबरी रेसिपी .. थोड्या प्रमाणात कमी तेल घालून करून बघणार...फोटो लालगाळू आलेत..
प्रतिसादकांचे आभार.
प्रतिसादकांचे आभार.
>>>खाला कू बगारे बैगन की रेसिपी बताए वो तो हौर ग़ज़ब किए.
वो तुमारे वास्तेइच था, बड़े भाई!
>>>तिकडे "रोमातले माबोकर" ही कॉमेंट काढुन टाकण्यात येत आहे.
धन्स्! आता मला अपग्रेड झाल्यासारखे वाटतेय!
>>> तेलंगणा या नावातच तेल आहे
>>> तेलंगणा या नावातच तेल आहे.
व्हय व्हय, खूप तेलाशिवाय इथले पदार्थ बनतच नाहीत!
अवांतर: तांदूळ हे मुख्य कार्ब अन्न असलेल्या ठिकाणी तेल खाण्याचे प्रमाण अधिक असते का? (मी मूळचा मराठवाड्यातला; ज्वारी हे मुख्य अन्न. तेलाचे प्रमाण तुलनेने कमीच. पण काही वर्षे भंडारा-गोंदिया जिल्ह्यांत राहिलो होतो. तिथलं मुख्य अन्न तांदूळ आणि तिथेही तेलाचे प्रमाण खूप जास्त असते.)
>>>लिहिताना २ वाट्या शेंगदाणे, २ अर्धगोल खोबरे वगैरे लिहिलेय तेवढे घेतले तर किमान २ किलो बैगन लागतील.
हं. (भातासोबत खाण्यासाठी) मसाला जास्त हवा असतो. म्हणून हे प्रमाण जास्त आहे. पण हो, हवे असल्यास कमी करू शकता.) तसे करुन बघा.
>>> हाच मसाला वापरुन दोडकी किंवा पडवळ केली तरीही मस्त लागतील...
दोडकी, तोंडली याआधी try केली आहेत; चांगली लागतात. पडवळ कधी केला नव्हता. करुन बघीन. तुम्हीही नक्की करुन बघा.
>>>थोड्या प्रमाणात कमी तेल घालून करून बघणार...
नक्की करुन बघा. पण, धाग्यात म्हटल्याप्रमाणे, हवं तर वाढताना तेल काढून टाका पण शक्यतो सुरुवातीला तेवढे तेल हवेच. खरंतर मी दिलेली पाकृ कमीच तेलाची आहे. Standard procedure नुसार चार काप दिलेली वांगी तेलात deep fry तळतात! तसेही करुन बघा!
धाग्यात उल्लेख केलेला बगारा
धाग्यात उल्लेख केलेला बगारा खानाची रेसिपी लवकरच इथे लिहिन म्हणजे पूर्णान्न होईल!
पाकृ मस्त.
पाकृ मस्त.
तेल कमी वापरायचे ठरवले असल्याने सध्या पास. पण कधीतरी नक्की करून पाहणार.
बाय द वे तो भातही छान दिसतोय. त्याचीही रेसिपी टाका.
व्वा मस्तच दिसतायेत तेलंगाणा
व्वा मस्तच दिसतायेत तेलंगाणा बैंगन मसाला
फोटोज् मस्त
रेसिपी लिखाण मस्त.
सादरीकरण मस्त.
बैंगन मसाला कैसे बनाना पूचरैं? भोत सिम्पल है खाला>>>>
भारी लिहिलंय
मलाही २ वाट्या शेंगदाणे, २ अर्धगोल खोबरे जास्त वाटल आधी पण लपथबीत मसाला भाकरी, भाताबरोबर पाहिजे असेल तर मग ठीक.
मायबोलीवर पहिल्यांदाच लिहितो आहे. पाकृ माबोकरांना आवडेल अशी आशा आहे.>>>> आवडली आहे. सगळ्यांना आवडणारच
आणखी तेलंगणा खाना येऊद्यात.
बाय द वे तो भातही छान दिसतोय.
बाय द वे तो भातही छान दिसतोय. त्याचीही रेसिपी टाका.<<<< +1
रेसिपी, फोटोज, सादरीकरण सगलाच
रेसिपी, फोटोज, सादरीकरण सगलाच जाम भारी हाव!
बैंगन मसालेका कलर... एकदम किर्राक 👍
शेवटच्या फोटोतला 'बगारा खाना' बघुन मी साडेतीन-पावणेचार वर्षांपुर्वी अन्यत्र लिहिलेली 'मसुर पुलाव' ची रेसिपी आठवली. चवीष्ट खाद्यपदार्थांच्या रेसिपीज कधीच 'जुन्या' होत नसल्याने तिचाही इथे नव्याने धागा काढावा म्हणतो 😀
प्रचि
प्रचि
सादरीकरण
पाकृ
एकदम झकास !
एक सुचवू का? काजळाची तीट समजा हवं तर...
मुख्य चित्र अजून थोडसं रीसाइझ करा. सध्या ते ९००x८७५ आहे. ते ७५०x७५० पिक्सेल करुन अपडेट करा. धाग्याच्या नावासमोर ते दिसू लागेल.
@सुनील, धन्स्!
@सुनील, धन्स्!
काजळाची तीट लावून घेतलीय हं. आता छान दिसतंय.
पाकृ लिहायची इश्टाईल मस्त आहे
पाकृ लिहायची इश्टाईल मस्त आहे. पाकृ पण भारी आहे.
आता कुणीतरी ऑथेंटीक मिरची का सलानची रेसिपी लिहा. नेटवरती अनेक आहेत पण ऑथेंटीक कुठली ते माहित नाही. आणि माकाचु हे फिचर फक्त मायबोलीवरच उपलब्ध आहे
बगारा खाना, कद्दू का दालचा,
बगारा खाना, कद्दू का दालचा, मिरची का सालन वगैरे पुढच्या वेळी केल्यावर इथे लिहीन.
एक-दोन आठवड्यात तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे घातल्यावर तेही लिहिणार आहे.
वामन राव,
वामन राव,
मिरची का सालन च तेवढं बघाच लवकर.
अन्यत्र लिहिलेली 'मसुर पुलाव' ची रेसिपी आठवली. चवीष्ट खाद्यपदार्थांच्या रेसिपीज कधीच 'जुन्या' होत नसल्याने तिचाही इथे नव्याने धागा काढावा म्हणतो>>>> काढा की मग.
>>"काढा की मग.">>
>>"काढा की मग.">>
काढला.... 😀
मसुर पुलाव
फ्रिजमधल्या वांग्यांचे आज
फ्रिजमधल्या वांग्यांचे आज कल्याण केले एकदाचे. छान झाला हा बैंगन मसाला.
शेंगदाणे,तिळ हे जिन्नस ग्रेवी दाट करतात म्हणुन मी वर म्हटले होते जास्त वांगी लागतील. घरात वांगेप्रेमी मी एकटीच् असल्याने त्याप्रमाणे मसाला बनवला. माझा तिखटाला थोडा कमी पडला, तिखट असता तर अजुन चव खुलली असती.
फोटो नाहीय कारण अपलोडीचा कंटाळा. एक चविष्ट पाकृ दिल्याबद्दल मनापासुन आभार.
पाकृ फोटो आणि पाकृ पण भारी
पाकृ फोटो आणि पाकृ पण भारी आहे.