शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अलका
हा शब्द मुलीचे विशेषनाम म्हणून नाही लिहिलेला !
. .
. .
. .
हे घ्या त्याचे अर्थ :
१. जिचे वय आठ व दहाच्या दरम्यान आहे अशी मुलगी.
२. कुबेराच्या राजधानीचे नाव.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जिचे वय आठ व दहाच्या दरम्यान आहे अशी मुलगी.>>>> हा अर्थ पहिल्यांदा कळला.
अलका नगरीचे वर्णन मेघदूतात वाचले आहे

अलका नगरी / अलकापुरी ठाऊक होते. ८-१० वर्षाची कन्या हा अर्थ नवीन समजला.

मराठी संतसाहित्यात “अलंका पुरी” असे उल्लेख असतात. तो अपभ्रंश की निराळा शब्द ?

हिंदीत 'अलक'चा अर्थ कान किंवा कानांच्या आसपास रुळणार्‍या बटा असाही वाचला आहे.
'एरी जाने ना दूँगी' गाण्यात 'अलकों में कुंडल डालो और देह सुगंध रचाओ' अशी ओळ आहे.

* मराठी संतसाहित्यात “अलंका पुरी”
>>>
अलकापुरी
= १. आळंदी; ज्ञानेश्वरांच्या समाधीचे गाव.
२. आळे (जि. पुणे)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अलंकापुरी >>> 'लं' हा अपभ्रंश ?

अलकों में कुंडल डालो और देह सुगंध रचाओ ❤

किशोरीताईंनी गायलेल्या मीरा भजनातही आहे -
कुंडल अलका कारी जी, म्हारो प्रणाम बॉंके बिहारी जी …

आपण टायपो समजावा तर तो अलंकारिक निघावा आणि आपण अलंकारिक म्हणून गोंजारत बसावं तर टायपो निघावा अशी गत आहे. Lol

अल् धातुचा अर्थ सजणे, नटणे असा आहे आणि सक्षम होणे असाही आहे.
याला कर्तृवाचक अक प्रत्यय लावुन अलक, आणि त्याचे स्त्रीलिंगी: अलका
म्हणजे सजवणारी/नटवणारी किंवा सक्षम करणारी
असाही करता येईल.

>>> सक्षम होणे असाही आहे.
'अस' प्रत्यय लागल्यामुळे अर्थाचा विरुद्धार्थ झालेलं हे एकमेव मूळ असेल मग. Proud

छान चर्चा.

काव्यात वृत्तपूर्तीसाठी >> बरोबर. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र - इथे अलकापुरी केलं तर भुजंगप्रपात होईल Wink

हिंदीत 'अलक'चा अर्थ कान किंवा कानांच्या आसपास रुळणार्‍या बटा असाही वाचला आहे.
अलक हा शब्द मूळ संस्क्रुत आहे.
अलकनंदा = गंगा = (शंकराच्या) जटांमधून जन्मलेली

अलक शब्द आंतरराष्ट्रीय आहे. कुराणातही आहे. मध्य पूर्वेत अनेक खेड्यांची नावे आहेत अलक.
अलक म्हणजे अति लघु कथा. एक नवीन वाङ्मय प्रकार.
अलक /अलख निरंजन ही नाथ पंथीय योग्यांचं आवाहन. इथे अलक शब्दाचा अर्थ आहे ईश्वर.

जपानी रमलाची रात्र

तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात

रतीरत कुक्कुट साकुंडीवर आरोहूनी माड
चोच खुपसुनी फुलवीत होता पंखांचे झाड

अद्भुत पंख्यासम भिंतीवर आंदोलुनी छाया
लावित होत्या ताप जगाचा नकळत विसराया

धूप ऊसासत होता कोनि रजताच्या पात्री
विचित्र रेशिमचित्रे होती रसावली गात्री

तुझा पियानो यक्ष जळातील होता निजलेला
मनात गुंफित स्पर्श-सुखांच्या स्वप्नांचा झेला

अन् म्युसेची कवने होती माझ्या हातात
प्रतिचरणाला करित होती धूम्रवेल साथ

जळत ऊसासत होते त्यासह अंतरात काही
होता चिमणा श्वान लोकरी घोटाळत पायी

तोच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ
आलीस मिरवीत जाळीमधुनी नागिणीचा डौल

करांतुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले
जळता गंधक पांच उकळता याही रंगलेले

अभिष्ट चिंतुनी आम्ही त्यांचे भिडवियले काठ
सुरेहुनी तु गडे भाजिले ओठांनी ओठ

स्पर्शे तुझिया आणि पियानो थरारला सारा
मज सम त्याच्या कानशिलाच्या झणाणल्या तारा

गंधर्वांच्या दुहिता जमल्या करित पुष्पवृष्टी
हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी

पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे
हवा जाहली जड पा-यासम अंगातील वासे

आणि तरंगत डुलु लागली नौकेसम शेज
तो कांतितुन तुझ्या निथळले फेनाचे तेज

नखे लाखिया दात मोतिया वैडूर्यी नेत्र
अवयव गमले चपल चिवट की मयवनीचे वेत्र

कात सोडिल्या नागिणिचे ते नवयौवन होते
विळख्याविळख्यातुनि आलापित ज्वालांची गीते

गरळ तनुतील गोठुन झाले अंतरात गोड
कळले का मज जडते देवा नरकाची ओढ

डोळे बांधुन खेळत होते जीवन मायावी
अंधपणातच वितळत होते भूत आणि भावी

तुझ्या जपानी भाषालिपिसम अगम्य सुन्दरता
असुनि हाती उरली दुर्लभ आली ना हाता

आजही तुज शोधता कधी ती रमलाची रात्र
पाठितुनि जंबिया मधाचा घाली काळजात!

__ बा. भ. बोरकर

Pages