कालचा दिवसच 'विराट' होता

Submitted by फेरफटका on 25 October, 2022 - 14:49

काल कुठलीही ईडा-पीडा भारतीय संघाला छळणार नव्हती, कुठल्याही अतृप्त आत्म्याची बाधा होणार नव्हती, कुणाचे शिव्या-शाप भोवणार नव्हते कारण कालचा दिवसच भारतीय संघासाठी 'विराट' होता.

ह्या सगळ्या नाट्याची सुरुवात भुवी - अर्षदिप ने केली. तो अर्षदिप केव्हढा शांत आहे! किंबहुना भारतीय वेगवान गोलंदाज इतके'सुशील'
आणी 'संस्कारी' वाटतात कि बॅट्समनला आउट केल्यावर प्रेमळपणे 'अरे, असा कसा खेळलास रे, तू?' म्हणून प्रेमाने दटावतील असंच वाटतं. भुवनेश तर आईने भांग पाडून, युनिफॉर्म घालून शाळेत पाठवलेल्या गुणी बाळासारखा दिसतो. पण ह्यांच्या हातात बॉल दिला आणि हवेत थोडासा जरी स्विंग असला कि सळसळणाऱ्या आणि झपकन फणा काढणाऱ्या नागासारखा तो बॅट्समनकडे झेपावतो.

'अनुभवाला पर्याय नाही' हे सिद्ध करणारे बरेच क्षण कालच्या मॅच ने दिले. शान मसूद आणि इफ्तीकार ची भागीदारी जमल्यावर शामी - पंड्या ने जो मिनी कोलॅप्स घडवला, ४/३१ वरून विराट - हार्दिकने जी भागीदारी रचली, एका बॉल मध्ये दोन रन्स हवे असताना अश्विनने क्रिझवर आल्या आल्या जो वाईड बॉल सोडला आणि शेवटच्या बॉल साठी सगळे फिल्डर्स जवळ आल्यावर मिड ऑफ च्या डोक्यावरून बॉल स्कुप करत जी विजयी धाव घेतली, ह्या सगळ्या गोष्टींना प्रचंड अनुभवाचं संचित असावं लागतं. आणि विराट...

काय आणि किती लिहावं ह्या 'मॉडर्न डे लिजंड' विषयी? वडिलांच्या मृत्यूनंतर टीमसाठी एक मॅच सेव्हिंग इनिंग खेळून नंतर वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाणारा विराट आणि कालच्या मॅच नंतर भावविवश होऊन डोळे पाणावलेला विराट ह्या दोघांमध्ये एका खडतर परिश्रमांची, यशापयशाची, मानसन्मान आणि मानहानीची एक प्रचंड मोठी गाथा आहे. गेली तीन वर्षं विराट सारख्या खेळाडूच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं ही बाबच अविश्वसनीय आहे.

सगळा दबाव शोषून घेत स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवून धीरोदात्तपणे त्या मेलबर्न च्या विकेटवर उभा असलेला विराट काल पाकिस्तानी टीम आणि विजयाच्या मध्ये पावनखिंडीतल्या बाजीप्रभूसारखा उभा राहिला. फरक इतकाच कि तोफांचे आवाज ऐकल्यावर हा बाजी पडला नाही तर त्याने प्रतिक्रमण केलं. त्या प्रतिक्रमणाचा आवेग इतका होता कि पाकिस्तानी संघाच्या विजयाच्या आशा त्यात पाचोळ्यासारख्या उडून गेल्या. रौफ च्या पाचव्या बॉल वर विराटने बॅकफूटवरून मारलेली सिक्स हि निव्वळ अविश्वसनीय होती. २००३च्या वर्ल्डकपमध्ये वसीमच्या पहिल्या ओव्हरमध्ये सचिनने बॅकफूट पंच करून कव्हर्स मधून मारलेली बाउंड्री किंवा शोएब अख्तरला पॉईंटवरून मारलेली अप्परकट ची सिक्स ह्याच तोडीची विराटने रौफला मारलेली ती सिक्स होती. हे असे काही शॉट्स असतात ज्याने प्रतिस्पर्ध्याच्या मनात पराभवाच्या शंकेची पाल चुकचुकते आणि त्यांचा विश्वास ढासळत जातो. त्यानंतर नवाझवर शेवटच्या ओव्हरमध्येदबाव टाकणं, फ्री हिट चा बॉल स्टम्पला लागून थर्डमॅन कडे गेल्यावर तीन रन्स पळून काढणे वगैरे गोष्टी म्हणजे त्याचं मॅच अवेअरनेस, फिटनेस आणि अनुभव ह्या गोष्टींचं अत्युत्कृष्ट दर्शन होतं.

दिवाळीच्या मुहूर्तावर मागच्या वर्ल्डकप मधल्या मानहानीकारक पराभवाची जळमटं काढून विराटने विजयाचा दीपोत्सव साजरा केला. हॅपी 'विराट' दिवाळी!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले लिहिलयस , थोडा भावनाविवश झाल्याचा टच आलाय रे Happy

विराट ह्या दोघांमध्ये एका खडतर परिश्रमांची, यशापयशाची, मानसन्मान आणि मानहानीची एक प्रचंड मोठी गाथा आहे. गेली तीन वर्षं विराट सारख्या खेळाडूच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं ही बाबच अविश्वसनीय आहे. >> +१ सो मी मुळे कोणीही सोम्या गोम्या उठतो नि .....

वरती त्याच्या फिटनेस बद्दलही अ‍ॅड कर रे.

जबरी! मस्त लिहीले आहेस.

ही खेळी नक्कीच पुढे बरीच वर्षे लक्षात राहील. अशा डावांना स्पर्धेचा, एखाद्या खेळाडूच्या कमबॅकचा किंवा अपयशातून पुन्हा बाहेर येण्याचे प्रयत्न करण्याचा, किंवा दोन संघातील/खेळाडूंमधल्या खुन्नस चा एक कॉण्टेक्स्ट लागतो. नाहीतर आयपीएल मधे बॅटी सगळेच फिरवतात. जुन्या लोकांचे डाव त्या कॉण्टेक्स्ट मुळे लक्षात राहिले आहेत. ही खेळी सुद्धा तशीच आहे!

फारएण्ड, अगदी हेच लिहणार होतो.
Virat was playing to prove something आणि म्हणूनच तो सामन्यानंतर इतका भावनाविवश झाला!
क्रिकेटर (किंवा for that matter कुठलाही खेळाडू) खेळायला लागल्यापासून शिकतच असतो, दिवसागणिक पारंगत होत असतो पण वाईट वेळ/वाईट फॉर्म/बॅडपॅच त्याला माणूस म्हणून (बहुतांश वेळा) अधिक प्रगल्भ बनवतो..... त्याचे पाय जमिनीवर राहतील याची काळजी घेतो!
तीन वर्षापुर्वीचा विराट असता तर कालच्या खेळीनंतर/विजयानंतर इतका मॅच्युअर्ड रिॲक्ट झाला असता का?
हा असा विराट आवडतो आपल्याला Happy

मस्त लिहलयस फेफ Happy

मस्त लिहिले आहे फेरफटका.
कालचा विजय विराट होता. कालचा दिवस विराटचाच होता.

आधी वाटलेले की हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक कदाचित मारतीलही पण विराट बॉल खाऊन सामन्याची वाट लावेल. आणि त्याच्या खेळीची सुरुवात तशीच झालेली. हळूहळू थोडे मारायला लागला तसे बरे वाटले चला हा सुद्धा मारतोय. आणि बघता बघता हार्दिक स्ट्रगल करतोय आणि हा मारतोय असे चित्र दिसू लागले. शेवटी त्यांच्या फास्टरना एक्स्ट्रा बाऊन्स मिळत होता तेव्हा तर स्ट्राईकला हार्दिक नको, तिथे विराटचाच क्लास हवा असे वाटत होते. विराट कोहलीच्या खेळीने केवळ सामनाच नाही जिंकला तर हळूहळू चाहत्यांचा विश्वासही जिंकला जो मधल्या काळात डळमळीत झालेला. जिओ! आता मजा येणार आहे वर्ल्डकप बघायला !

अवांतर -
कालच्या त्याच्या खेळीची तुलना २०१६ वर्ल्डकपच्या ऑस्ट्रेलिया खेळीसोबत केली जात होती. मी माझ्या आयुष्यात पाहिलेली ती सर्वात क्लास फटक्यांनी नटलेली २०-२० ईनिंग होती.

योगायोग बघा. त्याच खेळीवर मी विराट कोहलीवर हा धागा काढलेला. काल ही खेळी आली.

..

विराट कोहली फॅन क्लब !
Submitted by ऋन्मेऽऽष on 28 March, 2016 - 02:57
https://www.maayboli.com/node/58174

मस्त लिहिले आहे फेरफटका.
कालचा विजय विराट होता. कालचा दिवस विराटचाच होता.

आधी वाटलेले की हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक कदाचित मारतीलही पण विराट बॉल खाऊन सामन्याची वाट लावेल. आणि त्याच्या खेळीची सुरुवात तशीच झालेली. हळूहळू थोडे मारायला लागला तसे बरे वाटले चला हा सुद्धा मारतोय. आणि बघता बघता हार्दिक स्ट्रगल करतोय आणि हा मारतोय असे चित्र दिसू लागले. शेवटी त्यांच्या फास्टरना एक्स्ट्रा बाऊन्स मिळत होता तेव्हा तर स्ट्राईकला हार्दिक नको, तिथे विराटचाच क्लास हवा असे वाटत होते. विराट कोहलीच्या खेळीने केवळ सामनाच नाही जिंकला तर हळूहळू चाहत्यांचा विश्वासही जिंकला जो मधल्या काळात डळमळीत झालेला. जिओ! आता मजा येणार आहे वर्ल्डकप बघायला !

अवांतर -
कालच्या त्याच्या खेळीची तुलना २०१६ वर्ल्डकपच्या ऑस्ट्रेलिया खेळीसोबत केली जात होती. मी माझ्या आयुष्यात पाहिलेली ती सर्वात क्लास फटक्यांनी नटलेली २०-२० ईनिंग होती.

योगायोग बघा. त्याच खेळीवर मी विराट कोहलीवर हा धागा काढलेला. काल ही खेळी आली.

..

विराट कोहली फॅन क्लब !
Submitted by ऋन्मेऽऽष on 28 March, 2016 - 02:57
https://www.maayboli.com/node/58174

आवडलं… मॅच आयुष्यभर लक्षात राहिल अशी झाली…
विराटने अक्षरला इन्वाईट करून माघार घेतली, आणी अक्षर रनाऊट झाला; त्यावेळी जर आज विराटने मॅच नाही जिंकवली, तर तो खूप शिव्या खाणार हे वाटलं होतं. मग पंड्यानेसुद्धा एक-दोनदा रन घेण्यापासून विराटला मना केलं.
१७व्या ओव्हरनंतर मात्र, विराटने शाहिनला लगावलेले ३ चौके आणी हॅरीसला लगावलेल्या दोन खणखणीत षटकारांनी विराटबद्दलच्या सर्व शंका-कुशंका दूर करत, मॅच आपल्याबाजूने झुकवली. Heart had come to mouth till the last ball of the last over, but ultimately we came out winning!!! Hats off!!!

सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद!!

“ थोडा भावनाविवश झाल्याचा टच आलाय” - खरंय. त्या मॅचची झिंग उतरतच नव्हती. ४/३१ च्या पुढे फक्त विराट-हार्दिक जोडीवर विश्वास ठेवून मॅच पहात होतो आणि शेवटी जे पाहिलं ते क्रिकेटची ‘ग्लोरियस अनसर्टनिटी‘ लक्षात घेऊनही विरळा म्हणावं असं दृष्य होतं. शेवटी जे ‘वाटत होतं’, ते लिहीलं आणि बरं वाटलं.

फिटनेसचा उल्लेख शेवटी केलाय. फिटनेस तर महत्वाचा होताच आणि टेंपरामेंट कमालीचं होतं.

“ एक कॉण्टेक्स्ट लागतो” - नक्कीच. it was a big stage and he chose that to announce his master act.
बिग मॅच प्लेयर्स आणि इतर ह्यातला फरक अशा वेळी अधोरेखीत होतो.

“ आधी वाटलेले की हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक कदाचित मारतीलही पण विराट बॉल खाऊन सामन्याची वाट लावेल. आणि त्याच्या खेळीची सुरुवात तशीच झालेली. ” - धोनी स्टाइल इनिंग होती विराटची. सुरूवातीला डाव संभाळत, प्रेशर soak करून शेवटी knock out punch मारला.

आणखी एक मुद्दा जो वर लिहीला नाहीये: शर्मा, राहूल, विराट हे तिघं बरेचदा एका पद्धतीचे प्लेयर्स वाटतात. पण काल जे कोहलीने केलं ते करण्याच्या बाबतीत तो इतर दोघांपेक्षा सरस आहे.

अस्सल क्रिकेटप्रेमीच त्या खेळाचं असं अप्रतिम वर्णन करूं शकतो !! पुन:प्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद !
( *भुवनेश तर आईने भांग पाडून, युनिफॉर्म घालून शाळेत पाठवलेल्या गुणी बाळासारखा दिसतो.... * Wink )

पण काल जे कोहलीने केलं ते करण्याच्या बाबतीत तो इतर दोघांपेक्षा सरस आहे. >>> हो मलाही असेच वाटते.

भुवनेश तर आईने भांग पाडून, युनिफॉर्म घालून शाळेत पाठवलेल्या गुणी बाळासारखा दिसतो. >>> Lol त्या विराटच्या नादात हे राहिलंच. टोटली.

काल मी शेवटच्या पाच ओव्हर्स पुन्हा बॉल टू बॉल पाहिल्या. एखाद्या ड्रामा सिरीज्/पिक्चर प्रमाणे पुन्हा पुन्हा पाहण्यासारख्या आहेत. कोहलीची ती सिक्स मारल्यावर जे रिप्ले आहेत, त्यात एक कव्हरच्या अँगलने आहे. थोडा "Walking into the shot" म्हणतात तसा तो एक दोन पावले पुढे येतो मारताना - आणि बहुधा त्यामुळेच जरी तो सुरूवातीला बॅकफूट वर असला तरी थोडा जोर आला त्या शॉट मधे- आणि मागे प्रेक्षक हळुहळू उभे राहात जातात त्या शॉटला दाद द्यायला. जबरी "सीन" आहे तो Happy तो सगळा १९-२० ओव्हरचा ड्रामा भारी आहे एकदम. पण ती स्पेसिफिक "फ्रेम" फोटोसारखी लक्षात राहील, सचिनच्या अनेक अशा फ्रेम्स प्रमाणे.

विजयाचेही analysis करणे योग्य ठरते. हा विजय सहज मिळवलेलाच होता असे नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज गेली. जिंकलो याचा उन्माद आणि का जिंकलो याची कारणमीमांसा यात फरक करणे बरे ठरावे. पाकिस्तानी गोलंदाज काही क्षणी अयशस्वी ठरले, भारतीय गोलंदाज काही क्षणी प्रचंड यशस्वी ठरले, विराटने विराट खेळी खेळली, हार्दिकने चांगली साथ दिली, विराटचे बॉल डेड झाला की नाही याबद्दलचे ज्ञान सरस ठरले, बॅकफूटवर जाऊन मेलबोर्नवर सरळ सिक्स मारण्यातील दर्जा व temperament निर्णायक ठरले, ३१ धावा करण्यासाठी चार गडी गमवावे लागले, शेवटच्या बॉलच्या आधीचा बॉल wide आहे म्हणून सोडून देण्यामागील धाडस, मीडियाने स्वतःच्या फायद्यासाठी अतिमहत्वाचा ठरवलेला सामना जिंकण्याचे प्रेशर इत्यादी गोष्टी आहेतच.

बाकी, सचिन आणि विराट ही तुलना मनाला पटत नाही हे माझे फक्त माझ्यापुरते मत नोंदवतो, कारण मला विराट खूपच सुपिरियर आहे असे वाटते.

आजच वाचले नि मग पाहिलेही कि कोहली ने राऊफ ला मारलेल्या सिक्स सारखीच सिक्स त्याने पुण्याला क्रिस वोक्स ला वन डे मधे म्राली होती. असाच शॉर्ट आर्म जॅब होता. एक्स्ट्रा बाउन्स पण ऑफ वर असलेल्या बॉल्स ला थोडी रूम घेऊन असलेला स्टान्स असताना टायमिंग च्या जोरावर त्याने तो जॅब केलाय हे जाणवते. रविवारी पण तसेच केलेय. आपण नेहमी गांगूली च्या ऑफ बाहेरचे टायमिंग, सचिनच्या , रोहित च्या कव्हर ड्राईव्ह चे टायमिंग, बद्दल बोलतो - कोहलीचे हे टायमिंग पण क्रिकेट बूक मधे न बसणारे असले तरी त्याच लेव्हल आहे .

तो डेड बॉल आहे आणि आपण पळू शकतो हे बहुधा पटकन आधी कार्तिकने नोटिस केले व मग दोघे पळाले. रिप्ले पाहताना तरी वाटले.

डिके चे कौतुक आहेच... पटापट दोन आणि तीन रन पळून काढले... अश्विन चे जास्त कौतुक- बॉल असा सोडला जसा ओपनिंग ला आलाय आणि अजून 20 ओव्हर खेळायच्या आहेत...
अमेझिंग...

९०,०००+ प्रत्यक्ष लोंक, अब्जावधी अप्रत्यक्ष लोकांसमोर, अत्यंत महत्त्वाची लढत, जगातील अत्यूच्च गोलंदाजी, १० षटके ४ बाद आणी फक्त ४५ धावा.
लक्ष १६० धावा, केवळ अशक्य. आणी तो लढला 'विराट' विजयासाठी. कदाचीत त्याला ही कळले नसेल तो ईतिहास रचत आहे !!!

विराट कोहलीच्या खेळीने केवळ सामनाच नाही जिंकला तर हळूहळू चाहत्यांचा विश्वासही जिंकला जो मधल्या काळात डळमळीत झालेला. >> कशावरून?

भुवनेश तर आईने भांग पाडून, युनिफॉर्म घालून शाळेत पाठवलेल्या गुणी बाळासारखा दिसतो. >>> १००%