एलोमा पैलोमा गणेश देवा!

Submitted by छन्दिफन्दि on 24 September, 2022 - 13:21
#littlemoments #photocreditgoogle

भारता मध्ये नवरात्र देशभरात साजरा होतो. बंगाली लोकांची दुर्गा पूजा, गुजरातचा गरबा प्रसिध्द. पण आता त्याची जागा दांडिया, डिस्को दांडियाने घेतलीये

महाराष्ट्रात घटस्थापना. घरोघरी पारंपरिक पद्धतीने घट बसवले जातात. देवींच्या देवळांमध्ये खूप मोठा उत्सव असतो. ओटी भरण्यासाठी मोठ्या मोठ्या रांगा असतात. नऊ दिवसात नऊ रंगांनी न्हाऊन गेलेला असतो अवघा आसमंत! ह्या सगळ्यात हात न धुवून घेतील ते राजकारणी कसले. लगेच त्यांच्यात चढाओढ. मोठ मोठे मंडप. सेलेब्रिटी बरोबरचे दांडिया. हैदोस, उत्साह ज्याला जे हवं ते त्यानं म्हणावं.
थोड लहान असताना आम्ही देवी बघायला जायचो, विशेषतः अष्टमीच्या दिवशी, बिल्डिंग मधील काही जणी मिळून देवीला जात असू. मोठं कुंकू लावलेल्या, मळवट भरलेल्या बायका घागरी फुंकायच्या. तेव्हा त्यांना बघुनच माझी खूप टरकायची.

ह्या सगळ्यात अगदी मनापासून आवडणारा म्हणजे भोंडला. माझ्या आठवणीत काही वर्षांपूर्वी, विसरला जातोय की काय असं वाटतं असतानाच, परत भोंडला करायला सुरुवात झाली.
आमच्या सोासायटीतील काही वर्षांपूर्वीचा भोंडला आठवतो. खुप वर्षांनी भोंडला खेळायला मिळणार म्हणून मी खूपच उत्सुक होते.
एक दिवशी खाली नोटीस लागली, " अमुक तमुक दिवशी भोंडला आहे. नोंदणी करा. ५०रू वर्गणी.
खिरापत - वडापाव आणि खोबऱ्याची वडी "
झालं! "खिरापत - वडापाव" अरे आता कधी गंमत येणार. पण म्हटलं असू दे आताच्या नवीन पद्धती.
भोंडल्याच्या दिवशी मात्र खूप साऱ्या बायका मस्त छान जरीच्या साड्या नेसून खाली जमल्या. ज्या काकूंनी सगळं अरेंज केलेलं त्यांनी एक छोटा हत्ती आणलेला. मग तो मध्यभागी ठेवला, पूजा केली. सगळ्यांनी फेर धरला. आणि speaker वर भोंडल्याची गाणी सुरू झाली. मला वाटतं खूप कमी जणींना गाणी येत असावी. आता उत्साह अजूनच कमी झाला. भोंडला करायला जास्त करून आज्या आणि आयाच होत्या. गोल गोल फिरत फिरत शेवटी
"आडात पडला शिंपला आणि संपला आमचा भोंडला" म्हणत भोंडला संपला.
सगळ्यांनी लगेच फेर सोडला, वडापाव चे वाटप सुरू झाले. आणि मी इकडे " सर्प म्हणे मी एकला..." म्हणत बसले ( बहुदा मनातच).
त्या काकू आणि त्यांच्या मैत्रिणींनी खरंच मनापासून चांगल्या हेतूने नवीन पिढीला ओळख व्हावी म्हणून भोंडला ठेवला, सगळी तयारी केली त्याबद्दल कौतुकच! पण भोंडल्याची खरी ओळख आणि मजा नवीन पिढीला द्यायची तर मग तो भोंडला खासच झाला पाहिजे, अगदी आमच्या लहानपणी खेळायचो तसा.
सुरुवातीचे काही वर्ष, प्रत्येकीच्या घरी स्वतंत्र भोंडला असे. एकीकडाचा संपला की दुसरीकडे, कधी कधी २-३ भोंडले असायचे. पण हळू हळू अभ्यास वाढले, लगेचच सहामाही परीक्षा असायच्या मग आमचा सगळ्यांचा भोंडला वर गच्चीवर होऊ लागला.
कोणी पाट आणायचे, हत्ती आणायचे, मग फुल वगैरे वाहून व्यवस्थित पूजा करून फेर धरला जायचा.

ऐलोमा पेलमा, एक लिंबू झेलू बाई, हरीच्या नैवेद्याला, अडकित जाऊ खिडकीत जाऊ, श्रीकांता कामला कांता, कारल्याचा वेल, कोथिंबीरी बाई ग....
शेवटचं आड बाई आडोणी ... तरी अजून एक शेवटचं "सर्प म्हणे मी एकला...खिरपतीला काय ग? " म्हणून जोरात फतकल मारून खाली बसायचं.
आता खरी गंमत, ती म्हणजे खिरापती ओळखणे.
मग एक एक काकू पुढे येत.
"तिखट की गोड?", " गोल की चपटा?", "ओला की सुका" "चमच्याने खायचा की हाताने?" आमचे प्रश्न आणि त्यांची "हो" किंवा "नाही" ची उत्तरं.
कधी कधी तर " मीठ, साखर" एवढ्यावर पण गाडी येत असे.
त्या सगळ्याजणी पण दरवर्षी काहीना काही नवीन नवीन शोधून आणायच्या. जेवढ्या जास्त खिरापती, तेवढी अजूनच मजा, तेवढा जास्त वेळ. धमाल यायची.
एक तासाचा भोंडला असेल तर एक तास खिरापती ओळखणे, मग त्यांचे वाटप, आणि मग ती खिरापत स्वाहा होई.
तर अशी ही साठा उत्तराची नवरात्रीची थोडी आधुनिक थोडी पारंपरिक कहाणी संपन्न!

तुम्हाला अजून गाणी आठवत असतील तर नक्की कमेंट्स मध्ये टाका! तुमच्या गावाच्या, भोंडल्याची, हादग्याच्या आठवणी असतील तर please शेअर करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी मला आई घेऊन जायची कुठेतरी भोंडल्यासाठी.. फार आठवत नाही पण “वेड्याच्या बायकोचं” एक गाणं होतं .. ते मला फार आवडायचं. शोधून सापडत का बघते.

गूगलवर शोधलं आणि लगेच मिळालं -

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.
असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं

वेडयाच्या बायकोने केले होते लाडू
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले
वेडयाच्या बायकोने केला होता चिवडा
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
केरकचरा म्हणून त्याने बाहेर फेकला
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
होडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्या
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकल्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
बांगडया बांगडया म्हणून त्याने हातात घातल्या
वेडयाच्या बायकोने केले होते श्रीखंड
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या.
वेडयाची बायको झोपली होती
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले.

आमच्या कडे हादगा म्हणतात. फार छान आठवणी आहेत.
एका फॅशनेबल घरात खिरापत भेळ होती, पण आम्ही ओळखली तरी त्यानी
कबुल केले नीही. मग म्हणतात त्याच नाव mixture आहे, भेळ नव्हे!

म्हाळसा मला लहानपणी ते गाणे खूप मजेशीर वाटायचे आणि आवडायचेही

आमच्या कडे हादगा म्हणतात. <<< हो काही ठिकाणी हादगा म्हणतात

फार छान आठवणी आहेत.<<< थँक यु
एका फॅशनेबल घरात खिरापत भेळ होती, पण आम्ही ओळखली तरी त्यानी
कबुल केले नीही. मग म्हणतात त्याच नाव mixture आहे, भेळ नव्हे!<<< Lol Lol Lol

श्रीकांता कमलाकांता लहानपणी ऐकलेले चांगलेच आठवते.

मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले.via GIPHY
ज्याम डिप्रेसिंग आणि डार्क आहे ह्या गाण्याचा एन्ड. लहानपणी हे गाणं ऐकायला लागलं की भयंकर काहीतरी ऐकतोय असं वाटायचं कारण शेवट माहित होता.

हे एक ऐकलेलं आठवतंय- (आमच्याकडे ह्या प्रकाराला भोंडला नाही, हादगा म्हणत. शाळेत सुद्धा झालेला एकदा ! पोर पोरी सगळे खेळलेले.)

शिवाजी आमुचा राजा
त्याचा तो तोरणा किल्ला
किल्ल्यामधे सात विहिरी
विहिरीमधे सात कमळे
एक एक कमळ तोडिलं
भवानी मातेला अर्पण केलं
भवानी माता प्रसन्न झाली
शिवाजी राजाला तलवार दिली
तलवाऽऽरंऽऽ घेऊनी आला
हिंदूंचाऽऽ राजा तो झाला

सुंदर आठवणी.
आम्ही सुद्धा लहानपणी रोज आमच्या बिल्डिंगमध्ये भोंडला करत फिरायचो.. पहिल्या दिवशी 1 चं गाणं ते 9 व्या दिवशी प्रत्येक घरी 9 गाणी असं असायचं आमच्याकडे. घरोघरी मस्त मस्त आणि ओळखायला अवघड अशा खिरापती. 9 दिवस संध्याकाळी जवळजवळ त्यावरच जेवण व्हायचं.
एकदा एका काकूंनी केलेली खिरापत ओळखताच येईना. येत असलेले नसलेले सगळे पदार्थ सांगून झाले. अपेक्षा फारच वाढल्या आमच्या आणि शेवटी सगळ्या हरलो तेव्हा चिमुकल्या डब्यात तुटीफ्रूटी घेऊन आल्या त्या आणि सगळ्यांच्या हातावर 4-4 तुकडे ठेवले.. सगळ्यांची तोंडं पडली होती. हा हा हा. अजून आठवलं की हसायला येतं.
त्याउलट आमची एक मोठी ताई होती तिनं एकदा शेवटच्या दिवशी सगळ्यांना शेवटी बोलावून पोटभर मुगाची चवदार खिचडी आणि टोमॅटो सार खाऊ घातलं होतं.
हरबरा डाळ घालून साबुदाणा खिचडी असा एक डेंजर प्रकार 'वेगळी' खिरापत म्हणून खायला घातला होता कोणीतरी.
दसरा संपला की कोजागिरी ला परत एकदा मोठा भोंडला टेरेस वर आणि नंतर आजच्या भाषेत पॉटलक असायचं. तेव्हा बाकी घरोघराचे बाबा आणि दादालोक पण असायचे जेवायला.
सुंदर आठवणी वर आल्या या लेखामुळे.
माझं आवडतं गाणं म्हणजे "अक्कणमाती चिक्कणमाती" थोडा वेळाने लिहिते पूर्ण

कॉमी.
शिवाजी आमुचा राजा <<< आम्ही हे गाणं पण म्हणायचो
ज्याम डिप्रेसिंग आणि डार्क आहे ह्या गाण्याचा एन्ड. लहानपणी हे गाणं ऐकायला लागलं की भयंकर काहीतरी ऐकतोय असं वाटायचं कारण शेवट माहित होता. <<< आता तुम्ही म्हणताय तर मला पण ते जाणवलं , पण हे सगळं खोट खोटं नाटकातल्या सारखं गमतीचा वाटायचं

स्मिता श्रीपाद चिमुकल्या डब्यात तुटीफ्रूटी घेऊन आल्या त्या आणि सगळ्यांच्या हातावर 4-4 तुकडे ठेवले.. सगळ्यांची तोंडं पडली होती. <<<<:D Lol Lol
मी कल्पना करू शकते. एवढा वेळ भोंडला म्हंटल्यावर ४ त्रुटी फ्रुटी . अतरंगी लोकं

पहिल्या दिवशी 1 चं गाणं ते 9 व्या दिवशी प्रत्येक घरी 9 गाणी असं असायचं आमच्याकडे. <<<हे अस असत काही ठिकाणी ऐकून होते

कोजागिरी ला परत एकदा मोठा भोंडला टेरेस वर आणि नंतर आजच्या भाषेत पॉटलक असायचं. <<<<
पहिल्यांदाच ऐकलं. पण इंटर्स्टिंग आहे
स्मिता श्रीपाद थँक यू . तुम्ही इतक्या मस्त आठवणी सांगितल्यात

हल्ली लहान मुलींना भोंडला माहीत नाही. <<< Sad Sad Sad
तुमच्या लेखाने जुन्या आठवणी जाग्या केल्या. <<< हो लिहिताना माझंही तसाच झालं, त्यामुळे छान वाटलं

अहिराणी भाषेतील एक भोंडला गाणं
By Sneha Zagade
भुलाबाईची गाणी (आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय) – Bhondla Gani
आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय,
लेकी भुलाबाई साखऱ्या लेवून जाय
कशी लेवून जाय, कशी लेवू दादा,
घरी नंदा जावा, करतील माझा हेवा
नंदाचा बैल येईल डोलत,
सोन्याचं कारलं साजीरं बाई, गोजीरं
नंदा भावजया दोघीच जणी बाई दोघीच जणी,
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी
तेच खाल्लं वहिनींनी, वहिनींनी,
आता माझे दादा येतील गं, येतील गं,
दादाच्या मांडीवर बशील गं, बशील गं,
दादा तुमची बायको चोट्टी चोट्टी
असू दे माझी चोट्टी चोट्टी
घे काठी लगाव पाठी
घरादाराची लक्षी मोठ्ठी मोठ्ठी ॥

घे काठी लगाव पाठी
घरादाराची लक्षी मोठ्ठी मोठ्ठी ॥

यापुढे आमच्याकडे असे काही होते:

लाव लाव भेंड्या लावतील गं
आमचे मामा येतील गं
आमचे मामा व्यापारी
तोंडात चिकण सुपारी
सुपारी काही फुटेना
मामा काही उठेना
(अजून काहीतरी आणि शेवटी)
सुपारी गेली फुटून
मामा आले उठून

लाव लाव भेंड्या लावतील गं
आमचे मामा येतील गं
आमचे मामा व्यापारी
तोंडात चिकण सुपारी
सुपारी काही फुटेना
मामा काही उठेना
(अजून काहीतरी आणि शेवटी)
सुपारी गेली फुटून
मामा आले उठून
मानव थँक यु फॉर शेअरिंग , हि माहिती नवीन आहे

छान लेख. फोन वरुन वाचला होता. सत्तरच्या द्शकात पुण्यात तरी भोंडले व्हायचेच. आमच्या घरी सर्व बहिणी काकवा यायच्या प्लस बिल्डिंगच्या मैत्रिणी. हा एक असे. मग बुध वारात देवांच्या वाड्यात त्या बहिणींकडे त्यांच्या मैत्रीणी यायच्या. भरपूरच कल्ला. इथे मध्ये अंगण होते तिथे भोंडला असायचा. व बायका पायरीवर बसुन बघायच्या. ग्यालरीतून काही बघायच्या. कोणीतरी ताई पाटावर खडुने चित्र काढायची हत्तीचे व त्याला झेंडूची फुले. मग शनिवारात व नारायण पेठेत एकां कडे असायचे. इथे हे लोक एका बिल्डिंगच्या दोन गच्च्या होत्या त्या मधील बारक्याशा खोलीतच राहात. त्यांच्या दोन गोंडस मुली होत्या. व दिमतीला दोन मोठ्या गच्च्या. तिथे भोंडले घालायचो. एक शाळेत असा यचा. पण तुम्ही म्हण ता तसे दस र्‍या नंतर लगेच मोठी मिड टर्म सहामाही असायची त्यामुळे अ अभ्यासाचा वेळ बुडतो आहे त्याचे टेन्शन यायचे. पण बायका भोंड्ले पूर्ण करायलाच लावायच्या.

आई रुचिरा मध्ये बघुन नाविन्य पूर्ण खिरापती करायची. गुं टपंगलु, वर्‍याच्या तांदळाची खिचडी असे काही. - हे मी परत खाल्ले नाहीत पदार्थ. एकदा काही नाही तर पितळेच्या डब्यात रस्क ठेवले होते तो आण म्हटली आई व मी तो खड खड वाजवत आणला. मग काय लगेच ओळखले
गेले. गाणी सेमच.

इथे मी आर्या आयडीने लिहिलेले भुलाबाई बद्दल व ती गाणी असा फार जुना बाफ आहे तिथे अजून माहिती आहे.

फारच मस्त! जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी आमच्या मैत्रिणी आणि त्यांच्या आया फेर धरून भोंडला सुरू करणार असल्या की खिरापतीच्या हव्यासापोटी आम्हीही त्यात घुसत असू. त्यामुळे सगळी गाणी पाठ झाली होती. श्रीकांता कमलाकांता (आमच्याकडे कमळकांता म्हणायचे... मला ते 'श्री कांदा, कमळ-कांदा' असे ऐकू यायचे. ही गोष्ट 'चुकीची ऐकू आलेली गाणी' धाग्यावर जायला हरकत नसावी.) माझ्या आवडीचं गाणं. त्यातही काही अ‍ॅडीशन्स केल्या जायच्या. वरती म्हाळसा यांनी दिलेल्या व्हर्जनमध्येही 'श्रीखंड' आणी 'क्रीम क्रीम म्हणून त्याने लावायला घेतले' हे नवीन आहे. आम्ही 'वेड्याच्या बायकोने आणले होते लादीपाव ... गादी गादी म्हणून त्याने झोपायला घेतले' असल्या फालतू अ‍ॅडीशन्स करत असू. त्या 'पाचा लिंबाचा पानोळा'चाही मी 'पाचोळा' करत असे.

सगळ्या गाण्यांमध्ये एक छान मजेशीर गोष्ट म्हणजे एकेक वाक्यागणिक त्यातली थीम उलगडत जाते.
अशी माती सुरेख बाई, ओटा जो घालावा
असा ओटा सुरेख बाई, जातं ते रोवावं ।
असं जातं सुरेख बाई, सपीट काढावं ।
असं सपीट सुरेख बाई, करंज्या कराव्या ।
ह्यात एकेक कल्पना फुलवत फुलवत नेऊन पूर्ण चित्र उभं केलं आहे. ही तांत्रिक बाब लहानपणी कळत नसली तरी ह्या गाण्यांमध्ये आणि त्या शब्दांत काहीतरी मजा आहे हे जाणवायचं. शिवाय वरच्या गाण्यात सगळे पहिले शब्द 'अशी, असं, असा' असे न म्हणता 'अश्शी, अस्सं, अस्सा' असे म्हणायचे असतात, म्हणजे मग त्याला साजेसा ठसका येतो.

भोंडल्यांच्या गाण्यात घरकाम, सासू, नवरा, माहेर वगैरे विषय चाललेले असताना मधूनच 'शिवाजी आमुचा राजा...' असा माबोला शोभेलसा अवांतर ऐतिहासिक राजकीय विषय कुठून निघाला असेल काही कल्पना नाही. म्हणजे मला काही वावडं नाही त्याचं; मला ते आवडायचंच, पण 'अरे गच्चीचं चाल्लं, नि हा काय बोल्तो?' अशी भावना आता येते ते ऐकताना.

असं सपीट सुरेख बाई,>> आमच्या इथे अश्शी सपिटी सुरेख बाई म्हणत.

मला ते ही आठवलं एक बाबु झेलु बाई दोन बाबु झेलो. हास्पि टलची निळी गाडी बघता बघता नस तोडी.

अक्कणमाती चिक्कणमाती, खळगा तो खणावा
अस्सा खळगा सुरेख बाई, जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई, सपिटी दळावी
अश्शी सपिटी सुरेख बाई, करंज्या कराव्या
अश्श्या करंज्या सुरेख बाई, तबकी ठेवाव्या
अस्सं तबकं सुरेख बाई, शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई, पालखी ठेवावा
अश्शी पालखी सुरेख बाई, माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई, खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई, कोंडुनी मारीतं

सुंदर चित्रदर्शी वर्णन... भक्कम दगडी जातं, सुरेख मुरड घातलेल्या करंजा, सुंदर चांदीचं तबकं, त्यावर रेशमी जांभळा किंवा लाल शेला, नक्षीदार कनाती, लोड गाद्या असलेली पालखी.... असं सगळं चित्रं दिसायलाच लागायचं मला लहानपणी... माझं अतिशय आवडतं गाणं..
अस्सं माहेर सुरेख बाई...असं आता म्हणताना डोळे ओले होतात आणि आईची आठवण येते.. पण सासरं द्वाड नाहिये आणि सासुबाई आईची माया लावतात Happy .. असो खुपच विषयांतर झालं..

माझ्या आईंच एक अतिशय आवडतं गाणं जे आमच्या बिल्डींग मधे फक्त तिलाचं यायचं आणि सगळ्या जणी शेवटच्या दिवशी आग्रहाने तिला म्हणायला लावायच्या...
गाउ गजगौरीचं गाणं, घालु रिंगण
कौरव पांडव यांचा संदर्भ असलेलें हे गाणं.. त्यात कुंती आणि गांधारी ला गजगौरीचं व्रत करण्यासाठी आणी नंतर वाण देण्यासाठी हत्ती हवा असतो.. तर पांडव थेट स्वर्गात जाउन ईंद्राचा ऐरावत आणतात आईसाठी असं वर्णन आहे..
थोडा वेळाने लिहिते हे गाणं...मला पुर्ण आठवत नाहिये.. पण जमेल तेवढं लिहिन

एकेका ळी पुण्यातल्या लेडीजचा फॉर्मल वेअर नौवारी साडी व वर शेला, खोपा त्यात चांदीचे फूल कानात कुड्या ठुशी असा होता. सो स्वीट. शेल्या चे जरीचे काठ सिल्व्हरी असत. व साडीचे सोनेरी.

छान धागा आहे. लहानपणीच्या आठवणी वर आल्या अगदी ‌. आम्ही भुलाबाई / गुलाबाई बसवायचो घरी. गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलाबाईचे आगमन असायचे ते थेट कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी उठायचे. महिनाभर सगळ्या मैत्रिणींच्या घरी रोज संध्याकाळी गाणी, टिपऱ्या आणि शेवटी प्रसाद ( खिरापत) असायचा. फार सोनेरी दिवस असायचे ते. कोजागिरीच्या रात्री जागरण आणि प्रत्येकीच्या घरून काहीतरी विशेष खाऊ , सोबतीला केशरी दुध, त्यात चंद्र बिंब बघायचं आणि मगच प्राशन करायचं.

गुलाबाई म्हणजे शंकर पार्वती आणि सोबत गणपती कार्तिकेय यांची एकत्रित मूर्ती. त्याची गाणी आणि शेवटी आरती. काही आठवताय त्यातली,

१) शिंक्या वरचं लोणी खाल्लं कोणी खाल्लं कोणी
मी नाही खाल्लं वहिनींनी खाल्ल
आता माझे दादा येणार येणार
दादांच्या मांडीवर बसणार बसणार
दादा तुझी बायको चोरटी चोरटी
आणा काठी घाला पाठी,

२) हळूच गुलाबाई पाय टेका , पैंजण तुमचे भारी,
येथून दाणा पेरत जाऊ माळीयाच्या दारी.
हळूच गुलाबाई हात ठेवा, बांगड्या तुमच्या भारी,
येथून दाणा पेरत जाऊ माळीयाच्या दारी.

३)
अडावरच्या पाडावर धोबी धुण धुतो बाई ..धोबी धुण धुतो
गुलाबाईच्या साडीला लाल रंग देतो बाई...लाल रंग देतो
लाल रंगावर पडली शाई , गुलोजी आता घरी नाही.

४) आरती - भाद्रपदाचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला
पार्वती बोले शंकराला चला हो अमुच्या माहेराला
माहेरी जाता पाट बसायला विनंती करूया यशोदेला
टिपर्या खेळू गाणे गाऊ प्रसाद घेउनि घरी जाऊ .

काहींचा प्रसाद लिक्विड असायचा कधी कधी , खीर, टोमॅटो सार वगैरे तो हालवता यायचा नाही Lol मग ओळखायला सोपा व्हायचा.

वा! छान लेख आणि आठवणी !
प्रतिसाद ही मस्त!

असेच हल्ली मुलांना कळावा म्हणून मी एकदा सोसायटीत भोंडला केला होता, पण बर्‍याच आयांनाच तो माहित नव्हता आणि गाणीही त्यामुळे तो थोडा कंटाळवाणा झाला, पण खिरापची मजा आलीच!

आमच्या लहानपणी जवळपासच्या वाड्यात होतच असे भोंडला.. पण खिरापत खुप असे असं काही नाही, हाताच्या ओंजळीत मावेल इतकीच, कधी पेरुच्या फोडी, कधी केळाचे काप, भेळ, असे मुलांना नेण्यासारखे साधे सोपे पदार्थ, फार फार तर लाडू वगैरे. पण खुप मजा यायची. आणि दोन तीन भोंडले करता करता पोट भरुन जायचे.
माझी आवडती गाणि म्हणजे, शिवाजी आमुचा राजा, अक्कणमाती चिक्कण माती, कारल्याचा वेल लाव ग सुने, कॄष्ण घालितो लोळण.. यशोदा ला आली गं धावून, लहानगा हट्ट करणारा कृष्ण डोळ्यासमोर उभा रहायचा अगदी.
आणि एक असायचे त्यात सासर माहेरची तुलना होती.. आला माझा माहेरचा वैद्य.. दिसतो कसा बाई राजावाणी.. असे काहीसे
कारल्याचा वेल म्हणताना राणी असूनही सासूचे ऐकावे लागते असे वाटायचे (शेवटी म्हणतात ना गेल्या राणी माहेरा..)

ज्याम डिप्रेसिंग आणि डार्क आहे ह्या गाण्याचा एन्ड. लहानपणी हे गाणं ऐकायला लागलं की भयंकर काहीतरी ऐकतोय असं वाटायचं कारण शेवट माहित होता >> हो मलापण शेवट आवडायचा नाही, पण हे एक गाणं असे होते की पाठंतर लागायचे नाही, भरपूर वाढवायला वाव होता म्हणून प्रिय होते मुलांमधे

वाडा सोडला आणि बिल्डिंग मधे गेलो तेंव्हा वाटले आता भोंडला नाही, पण तिथेही कोजागिरीला असायचा पण भोंडला जुजबी आणि दांडिया / गरवाचे पेव फुटलेले त्यामुळे सगळे टिपर्‍या घेऊन यायचे गच्चीवर.. मग जेवण आणि मसाला दुधाने सांगता व्हायची मजा यायची

एक गाणे होते मैना तुझा खोपा गं उंदीर घेतो झोका ग. माझ्या पातळ केसांची मी कधी कधी एक अंबुडी बांधते तेव्हा हेच गाणे मनात येते.

हे गाणं ही कंटाळा येई पर्यंत वाढवता येतं, कारण सासर चे नातेवाईक आणि दागिने भरपूर

अरडी गं बाई परडी
परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं
दारी मूल कोण गं
दारी मूल सासरा
सास-याने काय आणलंय गं
सास-याने आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई

अरडी गं बाई परडी
परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं
दारी मूल कोण गं
दारी मूल सासू
सासूने काय आणलंय गं
सासूने आणल्या बांगडया
बांगडया मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई

शेवटी नवऱ्याने मंगळसूत्र आणलं की त्या कुत्र्याला बांधायचं आणि दरवाजा उघडून त्याच्याबरोबर चालू पडायचं

हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं पीठ त्याचं केलं थालीपीठ
नेऊनी वाढलं पानात, जिलबी बिघडली
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं दही त्याचं केलं श्रीखंड बाई
नेऊनी वाढलं पानात, जिलबी बिघडली
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातला उरला थोडा पाक त्याचा केला साखरभात
नेऊनी वाढला पानात, जिलबी बिघडली.
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं थोडं तूप त्याच्या केल्या पु-या छान
नेऊनी वाढल्या पानात, जिलबी बिघडली

यातल्या भात, श्रीखंड, पुऱ्या उरल्या तर त्याचं काय करायचं देवजाणे
हे म्हणताना आयांचा चेहरा आताही आठवतो

दारी मूल कोण ग. अर्थ थोडा बदलतो मूल शब्दामुळे. ते दारी मूळ कोण असे आहे. मूळ म्हणजे घरातल्या लेकी सुनांना आपल्या घरी नेण्यासाठी आलेला पाव्हणा नातलग. लेक किंवा सून कोणालाच आपापल्या सासरी जायचं नसे. मग तिची मनधरणी करायची, तिला आमिष दाखवायचे.

<<मूळ म्हणजे घरातल्या लेकी सुनांना आपल्या घरी नेण्यासाठी आलेला पाव्हणा नातलग. >>
आमच्या कडे "कारल्याचं बी पेर वं* सूनबाई"
या गाण्यात पुढे कारल्याची भाजी झाली की सासू सासऱ्याला विचार म्हणते तेव्हा पासून पुढे ती "मामंजी मामंजी मला मूळ आलं आता तरी धाडा ना, धाडा ना" असे करत एकेका विचारत जाते असे होते.
त्यातील "मूळ" चा अर्थ आता लागला. Happy
पण ते "मला मूळ आलं" असा वाक्प्रचार बरोबर आहे का?

* ग्रामीण विदर्भात गं ला वं म्हणतात.

Pages