एलोमा पैलोमा गणेश देवा!

Submitted by छन्दिफन्दि on 24 September, 2022 - 13:21
#littlemoments #photocreditgoogle

भारता मध्ये नवरात्र देशभरात साजरा होतो. बंगाली लोकांची दुर्गा पूजा, गुजरातचा गरबा प्रसिध्द. पण आता त्याची जागा दांडिया, डिस्को दांडियाने घेतलीये

महाराष्ट्रात घटस्थापना. घरोघरी पारंपरिक पद्धतीने घट बसवले जातात. देवींच्या देवळांमध्ये खूप मोठा उत्सव असतो. ओटी भरण्यासाठी मोठ्या मोठ्या रांगा असतात. नऊ दिवसात नऊ रंगांनी न्हाऊन गेलेला असतो अवघा आसमंत! ह्या सगळ्यात हात न धुवून घेतील ते राजकारणी कसले. लगेच त्यांच्यात चढाओढ. मोठ मोठे मंडप. सेलेब्रिटी बरोबरचे दांडिया. हैदोस, उत्साह ज्याला जे हवं ते त्यानं म्हणावं.
थोड लहान असताना आम्ही देवी बघायला जायचो, विशेषतः अष्टमीच्या दिवशी, बिल्डिंग मधील काही जणी मिळून देवीला जात असू. मोठं कुंकू लावलेल्या, मळवट भरलेल्या बायका घागरी फुंकायच्या. तेव्हा त्यांना बघुनच माझी खूप टरकायची.

ह्या सगळ्यात अगदी मनापासून आवडणारा म्हणजे भोंडला. माझ्या आठवणीत काही वर्षांपूर्वी, विसरला जातोय की काय असं वाटतं असतानाच, परत भोंडला करायला सुरुवात झाली.
आमच्या सोासायटीतील काही वर्षांपूर्वीचा भोंडला आठवतो. खुप वर्षांनी भोंडला खेळायला मिळणार म्हणून मी खूपच उत्सुक होते.
एक दिवशी खाली नोटीस लागली, " अमुक तमुक दिवशी भोंडला आहे. नोंदणी करा. ५०रू वर्गणी.
खिरापत - वडापाव आणि खोबऱ्याची वडी "
झालं! "खिरापत - वडापाव" अरे आता कधी गंमत येणार. पण म्हटलं असू दे आताच्या नवीन पद्धती.
भोंडल्याच्या दिवशी मात्र खूप साऱ्या बायका मस्त छान जरीच्या साड्या नेसून खाली जमल्या. ज्या काकूंनी सगळं अरेंज केलेलं त्यांनी एक छोटा हत्ती आणलेला. मग तो मध्यभागी ठेवला, पूजा केली. सगळ्यांनी फेर धरला. आणि speaker वर भोंडल्याची गाणी सुरू झाली. मला वाटतं खूप कमी जणींना गाणी येत असावी. आता उत्साह अजूनच कमी झाला. भोंडला करायला जास्त करून आज्या आणि आयाच होत्या. गोल गोल फिरत फिरत शेवटी
"आडात पडला शिंपला आणि संपला आमचा भोंडला" म्हणत भोंडला संपला.
सगळ्यांनी लगेच फेर सोडला, वडापाव चे वाटप सुरू झाले. आणि मी इकडे " सर्प म्हणे मी एकला..." म्हणत बसले ( बहुदा मनातच).
त्या काकू आणि त्यांच्या मैत्रिणींनी खरंच मनापासून चांगल्या हेतूने नवीन पिढीला ओळख व्हावी म्हणून भोंडला ठेवला, सगळी तयारी केली त्याबद्दल कौतुकच! पण भोंडल्याची खरी ओळख आणि मजा नवीन पिढीला द्यायची तर मग तो भोंडला खासच झाला पाहिजे, अगदी आमच्या लहानपणी खेळायचो तसा.
सुरुवातीचे काही वर्ष, प्रत्येकीच्या घरी स्वतंत्र भोंडला असे. एकीकडाचा संपला की दुसरीकडे, कधी कधी २-३ भोंडले असायचे. पण हळू हळू अभ्यास वाढले, लगेचच सहामाही परीक्षा असायच्या मग आमचा सगळ्यांचा भोंडला वर गच्चीवर होऊ लागला.
कोणी पाट आणायचे, हत्ती आणायचे, मग फुल वगैरे वाहून व्यवस्थित पूजा करून फेर धरला जायचा.

ऐलोमा पेलमा, एक लिंबू झेलू बाई, हरीच्या नैवेद्याला, अडकित जाऊ खिडकीत जाऊ, श्रीकांता कामला कांता, कारल्याचा वेल, कोथिंबीरी बाई ग....
शेवटचं आड बाई आडोणी ... तरी अजून एक शेवटचं "सर्प म्हणे मी एकला...खिरपतीला काय ग? " म्हणून जोरात फतकल मारून खाली बसायचं.
आता खरी गंमत, ती म्हणजे खिरापती ओळखणे.
मग एक एक काकू पुढे येत.
"तिखट की गोड?", " गोल की चपटा?", "ओला की सुका" "चमच्याने खायचा की हाताने?" आमचे प्रश्न आणि त्यांची "हो" किंवा "नाही" ची उत्तरं.
कधी कधी तर " मीठ, साखर" एवढ्यावर पण गाडी येत असे.
त्या सगळ्याजणी पण दरवर्षी काहीना काही नवीन नवीन शोधून आणायच्या. जेवढ्या जास्त खिरापती, तेवढी अजूनच मजा, तेवढा जास्त वेळ. धमाल यायची.
एक तासाचा भोंडला असेल तर एक तास खिरापती ओळखणे, मग त्यांचे वाटप, आणि मग ती खिरापत स्वाहा होई.
तर अशी ही साठा उत्तराची नवरात्रीची थोडी आधुनिक थोडी पारंपरिक कहाणी संपन्न!

तुम्हाला अजून गाणी आठवत असतील तर नक्की कमेंट्स मध्ये टाका! तुमच्या गावाच्या, भोंडल्याची, हादग्याच्या आठवणी असतील तर please शेअर करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाळेकडून मिळालेल्या भा.र.भागवतांच्या,' बाबूराजांचा ग्रंथराज ' या पुस्तकातून हादगा/खिरापत या शब्दांची ओळख झाली.म्हणजे काय ते आईने यथाशक्ती सांगितले होते.
मात्र भोंडल्याची म्हणून म्हटली जाणारी गाणी,आईमुळे आधीच माहीत होती.
बाकी लेख,प्रतिसाद मस्त आहे.ज्यांनी ही मजा प्रत्यक्ष अनुभवली असेल ते/त्या भाग्यवान!

आमच्याकडे भूलाबाई , दसर्याला बसवतात .कोजागिरीला मातीचे भूलाबाई,भूलोजी बनवतात, मातीचे पाच दिवे बनवतात त्याला माडी म्हणतात. वरील बरीचशी गाणी म्हटली जातात.खिरापत ओळखताना खरंच खूप मजा येते.

मला स्वतःला भोंडला म्हणजे काय हे आता आता सगळीकडे वाचुन कळायला लागलं. कधीच बघितला नाही. आमच्या कॉलनी मध्ये कधीच कुणी लहानपणी केलेला हि आठवत नाही .

मला मूळ आलं हे बरोबर आहे. मला बोलावणं आलं.
कार्टी आईच्या मुळावर आली किंवा पोरगं बापाच्या मुळावर आलं म्हणजे तिच्या/ त्याच्या येण्याने आई/ वडील ह्यांना जावं लागलं. त्यांना यमाचं बोलावणं आलं.
मूळ नक्षत्रात जन्म यासाठीच अशुभ मानतात. घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तीवर घाला येतो अशी समजूत आहे.

भोंडल्यांच्या गाण्यात घरकाम, सासू, नवरा, माहेर वगैरे विषय चाललेले असताना मधूनच 'शिवाजी आमुचा राजा...' असा माबोला शोभेलसा अवांतर ऐतिहासिक राजकीय विषय कुठून निघाला असेल काही कल्पना नाही. म्हणजे मला काही वावडं नाही त्याचं; मला ते आवडायचंच, पण 'अरे गच्चीचं चाल्लं, नि हा काय बोल्तो?' अशी भावना आता येते ते ऐकताना.<<<<<

मलादेखील पारंपारिक , सामाजिक गाण्यां मधे शिवाजी महाराज ही अली कडंची addition असावी असच वाटतं. For the record, शिवाजी महाराजांबद्दल अतीशय आदर वाटतो.

आमच्या शाळेत व्हायचा भोंडला दर वर्षी. त्याची आठवण आली. त्या दिवशी अर्ध्या दिवसाची शाळा असायची. खिरापती पण भन्नाट असायच्या - बॉबी, पापडाच्या लाट्या वगैरे. बाकी सगळी गाणी येतात पण हे शिवाजी महाराजांचं मात्र नवीन आहे. याआधी नव्हतं ऐकलं कधी.

'श्रीखंड' आणी 'क्रीम क्रीम म्हणून त्याने लावायला घेतले' >>> ही अ‍ॅडीशन घेतलेली आठवत आहे. क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले अशी.

हादगा/भोंडला मीपण लहानपणी कधीच बघितला नाही.
मात्र अकरावी की बारावीला वासंती मुझुमदारांचा 'हादगा' नावाचा सुंदर धडा होता मराठीच्या पुस्तकात. त्यामुळे हादगा म्हटल्यावर तेच आठवतं.
लेख छानच आहे. वाचायला मजा आली.
काळानुरूप परंपरा बदलणार हे आहेच.

मस्त आठवणी. मागच्या अंगणात होणारा भोंडला आठवला. शेजारी एक मोठा पाट होता, त्यावर खडूने सुबक हत्ती काढून तो पाट मधोमध ठेवला जाई. त्यावर दोन चार फुले वाहिली जात आणि मग तासभर भोंडला असे. ह्या लेखामुळे सगळ्यात जास्त काय आठवल तर तो छानसा पाट आणि त्यावरचा तो खडूने काढलेला सुबक हत्ती Happy वाड्यात अगदी दार खिडक्या लावून खिरापत बनत असे, ओळखता येऊ नये म्हणून Happy तिखट की गोड अशीच सुरुवात होई, एकदम गलका होत असे ओळ्खताना Happy आणि अगदी जुने ठेवणीतले पदार्थ बनत Happy नन्तर येणारी कोजागिरी होत असेच, पण अश्विनी पण मोठ्या प्रमाणात होत असे. ह्या कशाचे फोटोच नाहीत, सगळ्या आठवणी फक्त मनात.. फोटो हवे होते थोडेतरी असे खूप वाटते.

अरडी गं बाई परडी
परडी एवढं काय गं<<< आम्ही पण म्हणायचो

भुलावाई किंवा हादगा हा भाद्रपदात नेमका कधी खेळतात ? की नवरात्रात खेळतात ?<<<माझ्या माहितीप्रमाणे नवरात्रात (भोंडला तरी)

भाग्यश्री१२३ ताई थँक यू
गुलाबाई म्हणजे शंकर पार्वती आणि सोबत गणपती कार्तिकेय यांची एकत्रित मूर्ती. त्याची गाणी आणि शेवटी आरती. काही आठवताय त्यातली,<<< नवीन माहिती कळली

दारी मूल कोण ग. अर्थ थोडा बदलतो मूल शब्दामुळे. ते दारी मूळ कोण असे आहे. <<<< म्हणून वेग वेगळी नावं घेतली जायची का ते आता कळले
हीरा ताई थँक यू

'शिवाजी आमुचा राणा ...'<<< मला आठवतंय एका कोणी ताईने आम्हाला एका भोंडल्यात शिकवलेलं . पण तेव्हापासून म्हणायला लागलो

फोटोच नाहीत, सगळ्या आठवणी फक्त मनात.. फोटो हवे होते थोडेतरी असे खूप वाटते<<<< खरी गोष्ट आहे. आता सारखी त्या वेळी फोटो ची सवय नव्हती. त्यामुळे बऱ्याच आठवणी अगदी चलत चित्रा सारखं मनात जपून ठेवलंय

लपून छापून खिरापती करायचे <<<<<< Lol Lol Lol Lol Lol Lol

इतकी वेगवेगळी आणि विशेष माहिती मिळाली. सगळ्यांना मनापासून धन्यवाद.

रानजाईतील 'ऐलमा पैलमा' हा भाग . छान आठवणी.

आमच्याकडे याला भुलाबाई म्हणायचे. नवरात्रात शंकर-पार्वती सारिपाट खेळतात असे मानतात, एकदा सारिपाटात हरल्याने शंकर रूसून बसले म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी पार्वतीने भिल्लीणीचे रूप घेतले. पार्वती भिल्लीण/भुलाबाई म्हणून महादेव तिचे भुलोजी. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घट बसतात व हा १६(?) दिवसांचा उत्सव सुरू होतो . सूर्याचे एक नाव 'हस्तग' आहे .'हादगा' शब्द कदाचित त्यातूनच आला असावा. शिवाय तेव्हा सूर्य 'हस्त' नक्षत्रातून जात असतो. हत्ती संपन्नतेचे व मेघांचेही प्रतिक आहे, म्हणून 'भरपूर पाऊस(हत्ती पाण्यात बुडेल इतका) पडून चांगले पीक येऊ दे' ही प्रार्थना पाटावर हत्ती काढून करतात. आमच्याकडे कित्येक दिवसात घडी न मोडलेल्या साड्याही हस्तातल्या कोवळ्या उन्हात ठेवायची पद्धत होती. माझ्या आजोळी तर सारीपाटही फक्त नवरात्रातच खेळतात. नवरात्राखेरीज मनाई आहे.

१. मामंजी मामंजी मायमूळ आलं आतातरी जाऊ द्या माहेरा माहेरा
मला काय पुसतीस बरीच दिसतीस पुस आपल्या सासूला सासूला
आत्याबाई आत्याबाई मायमूळ आलं आतातरी जाऊ द्या माहेरा माहेरा
मला काय पुसतीस बरीच दिसतीस पुस आपल्या दिराला दिराला

('मायमूळ' म्हणजे माहेरहून भाऊ, काका किंवा वडील ई पुरूष माणूस येऊन घरच्या मोठ्यांना औपचारिक विनंती करणे , नाहीतर एकटं जायची काय बिशाद  पोरींची )

२.कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

कारल्याला कारली येऊ देत गं सुने येऊ देत गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याला कारली आली हो सासूबाई आली हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा

असं करत सगळ्यांची परवानगी घेत , कधी कारल्याला फूल येऊ दे मगं जा करत, करत यात दीर, नणंद व शेवटी नवरा एकदाचा 'हो' म्हणतो. कारल्याचा वेलही मुलींच्या मनात असलेल्या सासरच्या कडवटपणासाठी वापरलेले रूपक आहे.

 माहेरी आलेल्या भुलाबाईच्या चित्रानंतर आंचेवर तापणाऱ्या दूधाचे आणि पिवळ्या सायीचे चित्र गाण्यातून येते. दूधावरची पिवळी साय, सुखसमृद्धी ओतप्रोत भरल्याचे सुचवते. भुलाबाई लेकीला साखळ्या लेवून जाण्याचा आग्रह होतो. पण ती म्हणते -

. कशी लेऊ दादा?
घरी नंदा जावा
करतील माझा हेवा
हेवा पदोपदी
नंदा घरोघरी

 नणंद-भावजय, सासूसून, जावाजावा ही नाती 'खडतर' म्हणून ओळखली जातात. भावाबहिणीच्या निर्मळ प्रेमाचे प्रतिबिंब लोकसाहित्यात पाहायला मिळते . तसेच सासू नणंद यांच्या बद्दलच्या भावनांचे चित्र अत्यंत संयमाने रेखाटलेले दिसते.
 

४. सासरी वस वस नका करू सासूबाई
  दारीच्या चाफ्यापाई दूर देशाची आली जाई

५. सासू हाय रागीट भारी
  परपंचाची करती वडी
  इथून करी लई तातडी
  पल्याड मूळ धाडा..मी जाती बगा म्हायाराला

  नंदा दुष्ट आठजणी

काही संदर्भ

ही गाणी गोड, गेय तर आहेतच पण त्यांत एक ठेकाही आहे त्यामुळे ती मौखिक रूपांत टिकलीयेत. हे गमतीदार आहे तरी थेरॅप्यूटीकही असावं. मुलींची लग्नंलहान वयात व्हायची. तेव्हा होणाऱ्या भावनिक कोंडमाऱ्यावर बोलतं करणारा हा सण आहे. सपोर्ट ग्रूप असल्यासारखा, आता रिईन्वेंन्ट करायला हवे पण रहायला हवे. Happy आता या गाण्यांशी रिलेट करता येत नाही, ही अत्यंत चांगली गोष्टं आहे. Kudos to those people , who worked hard for that!

माझीही धमाल आठवण सांगते .

खिरापत ओळखता आली नाही तर उखाणा घ्यावा लागायचा. बाकी मुली तरबेज होत्या. मला मात्र एकच यायचा 'लोणच्यात लोणचं नाव घेऊ कोणचं' Lol एकेवर्षी तर माझ्यावर खिरापतींचं कर्ज झालं होतं मगं मलाही भुलाबाई बसवावीच लागली.

अडकित जाऊ बाई खिडकीत जाऊ खिडकीत होतं बुच्चन
भुलाबाईला मुलगा झाला नाव ठेवा अमिताभ बच्चन

हे म्हणायचे आमच्याकडे Lol
मी चौथीपाचवीत असेल तेव्हा वाड्यातल्या मैत्रीणींना जीव तोडून सांगितले की भुलाबाई आपल्या बाळाचे नाव आडनावासहीत का ठेवेल. म्हणजे कार्तिकेय, गणपती आणि अमिताभ बच्चन असं का असेल फारफार तर अमिताभ असेल. पण सगळ्यांनी मलाच गप केलं , मगं मी पण तसंच म्हणू लागले.

कॉमी +१ . जिफ Lol
टूटीफ्रूटी Lol
सगळीच गाणी व प्रतिसाद छान आहेत. म्हणून मीही वहावत गेले. Happy
मूळ नक्षत्राचा संदर्भ माहिती होता पण हे कनेक्शन माहिती नव्हते.

खूप छान लेख. भोंडला आणि खिरापत ओळखणे, खूप मज्जा यायची. आमच्या शाळेत पण असायचा भोंडला Happy

माझ्या मैत्रिणीच्या आईने सौ.वृषाली वैशंपायन) यांनी भोंडल्याचं नवीन गाणं रचलंय. त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेसह पाठवत आहे.----
भोंडल्याचं एक गाणं , नवीन शब्दात तयार केलंय..
आता काही कोणाचंच सासर द्वाड आणि कोंडून घालणारं नसतं , मग तसं गाण्यात तरी कशाला म्हणायचं ??
म्हणून हे नवीन गाणं , मूळ पारंपरिक गाभा तसाच ठेवून रचलंय...
बघा आवडतंय का...
अक्कण माती चिक्कण माती..
अश्शी माती सुरेख बाई ,
खड्डा तो खणावा..
अस्सा खड्डा सुरेख बाई
रोप ते लावावं..
अस्सं रोप सुरेख बाई
वेल तो चढावा..
अस्सा वेल सुरेख बाई
मांडव तो बहरावा..
अस्सा मांडव सुरेख बाई
निवांत बसावं..
निवांतक्षण सुरेख बाई
वाचन करावं...
अस्सं वाचन सुरेख बाई
चिंतन करावं...
अस्सं चिंतन सुरेख बाई
मनात रुजावं...
अस्सं मन सुरेख बाई
श्रीचरणी नमावं..
अस्से श्रीचरण सुरेख बाई
सद्बुद्धी मिळावी..
अश्शी बुद्धी सजग बाई
समाजी वापरावी..
अस्सा समाज जागरूक बाई
भोवताली असावा....
-----
सौ. वृषाली वैशंपायन, डोंबिवली.

अस्मिता छान प्रतिसाद.
सासू सासऱ्यांना आत्याबाई आणि मामाजी म्हणत असत. मामेबहिणीशी लग्न करण्याची प्रथा होती. वराचा सासरा हा मामाच असे. तसेच नवरीची सासू ही आत्या असे.

सौ. वृषाली वैशंपायन, डोंबिवली. <<< गाणं मस्त

ही गाणी गोड, गेय तर आहेतच पण त्यांत एक ठेकाही आहे त्यामुळे ती मौखिक रूपांत टिकलीयेत.<<< १००% खरं आहे

भुलाबाईला मुलगा झाला नाव ठेवा अमिताभ बच्चन<<<<वा ! काय creativity आहे Lol Lol Lol

गोव्यात आणि सिंधुदुर्गात सासऱ्याला आणि मामाला जुने लोक मावळा (मावळो) म्हणतात हे ऐकून थोडेसे आश्चर्य वाटले होते. शेलार मामांची आठवण झाली होती.
कोंकणात कुणाही वयस्क माणसाला आदराने संबोधताना मामा जोडतात. काका क्वचित्. गोव्यात बाब म्हणतात. दक्षिण कोंकणात तात अथवा ताता. पुण्यात आणि परिसरात तात्या.

खिरापत ओळखण्याबद्दलची एक गमंत आमच्या आजीने आम्हाला सांगितली तिच्या गावची. "श्री बालाजीची सासू " असे सांगायचे. म्हणजे श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी चिवडा साखर सुकामेवा. मग आम्ही पण ही पद्धत सुरू केली यातलं काही निघालं नाही की मग पुढे "खाराणी की गोडाणी?" पासुन सुरू.

मस्त लेख , प्रतिसाद ही मस्तच.
आणि ते खिरापत ओळखताना चुकली की "नाहीच्च.. नाहीच्च" करत हातात डबा घेऊनच उड्या मारायच्या.

आमच्या परीसरात मराठी वस्ती बर्यापैकी असल्यामुळे ७-८बिल्डींगचा मिळून भोंडला होतो. इच्छूक लोक खिरापत आणायचे. यावर्षी बिल्डींगवाईज खिरापत आणायची आहे. जेंडर निरपेक्ष भोंडला होतो आणि आजूबाजूच्या बिल्डींग, चाळीमधली मुलंही येतात. तर दांडियाइतका क्राऊड होतो. त्यामुळे खिरापत ओळखण्याची गम्मत करता येत नाही. पण मुलं जाम एन्जॉय करतात. गेली २ वर्षे झाला नाही. यावर्षी मी जाणार आहेच पिल्लूला घेऊन.

कॉमींचं म्हणणे पटते की श्रीकांता कमलाकांता गाणं डिप्रेसिंग आहे. रादर बरीचशी गाणी सासर माहेर, त्रासदायक सासर वगैरे स्टीरीओटाईप सेट करणारी आणि आताच्या काळात इरिलेवंट आहेत. याऐवजी भोंडल्याचं महत्व सांगणारी किंवा नुसतीच फन गाणी पाहिजेत.

पल्लवी>> नवं गाणं आवडलं.

गाउ गजगौरीचं गाणं, घालु रिंगण
कौरव पांडव यांचा संदर्भ असलेलें हे गाणं.. त्यात कुंती आणि गांधारी ला गजगौरीचं व्रत करण्यासाठी आणी नंतर वाण देण्यासाठी हत्ती हवा असतो.. तर पांडव थेट स्वर्गात जाउन ईंद्राचा ऐरावत आणतात आईसाठी असं वर्णन आहे..
थोडा वेळाने लिहिते हे गाणं...मला पुर्ण आठवत नाहिये.. पण जमेल तेवढं लिहिन >>

गाऊ गजगौरीचं गाणं घालु रींगणं
गाऊ गजगौरीचं गाणं घालु रींगणं

कौरव भाऊ सर्व मिळोनी,करीती हत्ती माती आणोनी
गांधारीला वरी बसवोनी ,वाटीयली वाणे

कुंती माता कष्टी झाली,भीम पुसे मग येउन जवळी
शोक कशाचा चिंता कसल,सांग सांग आई

सांगे वाणाचा वॄतांत,भीम कोपला मग चित्तात
अणितो हत्ती म्हणे क्षणात,आला नदीतीरी,

_______________, चिखल करी मग खळे करोनी,
फेकी भराभर गोळे करुनी,व्यापियल्या वेशी

अर्जुन बोले मग भीमाला, खटाटोप हा उगीच कशाला
आणु ऐरावत ईंद्राचा, वाटाया वाणे

बाणांचा मग जिना रचियला, भीम वरी स्वर्गात निघाला
ईंद्राला वॄतांत कळाला, झाला संचित.

ईंद्र म्हणे स्वर्गीचा हत्ती, यावा कैसा भूमी वरती,
________________, ___________.

पळतो हत्ती ची ची करुनी, भीम ओढतो सोंड धरोनी
खांद्यावरती मग उचलोनी, आणला धरणी वरी.

धन्य धन्य ती कुंती माता, स्वर्ग आणिला भुवरी आता
गजगौरीचे व्रत आचरिता, वाटायली वाणे

गाऊ गजगौरीचं गाणं घालु रींगणं
गाऊ गजगौरीचं गाणं घालु रींगणं

आई असतानाच लिहुन घ्यायला हवं होतं Sad
असो....आता आठवेल तितकं लिहिलंय... कोणाला गाळलेल्या जागा येत असतील तर भरा प्लीज

यादवराया.. या ...राणी rusun बैसली कैसी
सासुरवाशीण सुन घरास येईना कैसी|
सासू गेली समजावायला
चला चला सूनबाई आपुल्या घराला
पाटल्यांचा जोड देते तुम्हाला
तुमच्या पाटल्या नक्कोत मला
मी नाही यायची तुमच्या घराला||

ह्या गाण्यात सासू, सासरे,दीर.. असे एक एक नातेवाईक येतात सुनेला समजावायला.. एकेक दागिना देऊ करतात. पण ती अगदी ठेक्यात नाही म्हणते. शेवटी नवरा येतो आणी ‘लाल चाबूक’ (म्हणजे माराची भीती) दाखवतो आणी रणीसरकार तयार होतात सासरी जायला.

अरे वा. खूप दुर्मीळ गाणं. धन्यवाद स्मिता श्रीपाद.
पन्नास साठ वर्षांपूर्वी प्रभात कंपनीने गजगौरी नावाचा एक चित्रपट काढला होता.
.

छान लेख आणि प्रतिसाद!
माझ्या लहानपणी घरी भोंडला होई. शाळेतही भोंडला असे. मी अगदी ९वी-१०वी पर्यंत भोंडल्याला जात असे. काही वेळा एकाच संध्याकाळी ३-४ ठिकाणी भोंडला असे. पावसाळा सरत आला की अंगणात कुठे गरज असेल तर मातीची भर घालून छान चोपून चापून अंगण केले जाई. मग एक दिवस दुपारी शेणाने छान सारवून घेतले की पुढे घट्स्थापनेला सुरु होणार्‍या भोंडल्यापासून पार चैत्राच्या चैत्रांगणापर्यंत या ना त्या निमित्ताने अंगण सजत , हसत-खेळत राही.

पल्लवी, नवी गाणे आवडले!

स्मिता, जालावर शोधले तर ब्लॉग मिळाला ज्यात तुम्ही वर दिलेले गाणे आहे. https://geetgunjanfamily.blogspot.com/2019/10/blog-post_55.html

स्मिता, जालावर शोधले तर ब्लॉग मिळाला ज्यात तुम्ही वर दिलेले गाणे आहे. https://geetgunjanfamily.blogspot.com/2019/10/blog-post_55.html >>

स्वाती२ तुमचे किती आभार मानु मी. खूप खूप खूप धन्यवाद

यादवराया.. या ...राणी rusun बैसली कैसी
सासुरवाशीण सुन घरास येईना कैसी|
सासू गेली समजावायला
चला चला सूनबाई आपुल्या घराला
पाटल्यांचा जोड देते तुम्हाला
तुमच्या पाटल्या नक्कोत मल<<<<आठवलं

स्मिता श्रीपाद <<< दोन्ही गाणी पहिल्यांदा ऐकली. शेअर केल्या बद्दल थँक यू

कॉमींचं म्हणणे पटते की श्रीकांता कमलाकांता गाणं डिप्रेसिंग आहे. रादर बरीचशी गाणी सासर माहेर, त्रासदायक सासर वगैरे स्टीरीओटाईप सेट करणारी आणि आताच्या काळात इरिलेवंट आहेत<<<<< खरं आहे

पण अस बघा हि गाणी बालविवाह होत त्या काळातील असावीत असा गाण्यावरून अंदाज बांधता येतो. म्हणजे क दाचित १९व्य वगैरे शतकातील असावीत . आपल्या आजीच्या आज्जीच्या काळातील वगैरे . आणि ती एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे आलेली आहेत. त्यामुळे ते संदर्भ ह्या काळात लागू न पडणं एका दृष्टीने चांगलंच. समाज सुधारणेचे प्रतीक आहे ते.
जस्ट एक विचार आला

भोंडल्याच्या असंख्य आठवणी आहेत, भोंडल्याबरोबर डोंबिवलीत आम्ही वाढलो म्हणायला हरकत नाही. तेव्हा गरबा, दांडिया नगण्य आणि भोंडला सर्रास होता.

ऐलोमा पैलोमा गणेशदेवा ते शिवाजी आमुचा राणा, किल्ला तो त्याचा तोरणा पर्यंत भोंडला रंगायचा. असंख्य गाणी यायची. खिरापत ओळखायची मजाच और.

चाळीत व्हायचा तेव्हा आमच्याकडे भोंडला लाभत नाही म्हणून करत नसत, त्याचं वाईट वाटायचं, सगळीकडे आमंत्रण, आम्ही बहिणी जायचो आणि आमच्याकडे नाही ही खंत वाटायची.

शाळेत भोंडला व्हायचा तेव्हा मात्र वर्गणी द्यायचो.

एकदा सोसायटीतल्या मराठी लोकांनी पुढाकार घेऊन नालासोपारा इथे केलेला, रोज गरबा दांडिया असायचे पण भोंडला होत नव्हता तेव्हा बरीच गाणी मी कॉम्प्युटरवर type करून, प्रिंटर वर प्रिंटस (तो होता आमच्याकडे तेव्हा) काढून वाटलेल्या, मग सगळ्यांनी गाणी म्हटली. 2000 सालाच्या आधीची गोष्ट, कॉम्प्युटर तसे नवीनच होते.

डोंबिवलीत आता भोंडला नगण्यच, इथे सोसायटीत गरबा दांडिया असायचा, एकच वर्ष भोंडला केलेला. नंतर नाहीच आता गरबा दांडियाही होत नाही सोसायटीत.

अशक्य सुंदर धागा आहे हा. निवडक १०.
एकदा आम्ही भोंडला खेळल्यानंतर त्या मुलीच्या आईने प्राऊडली सांगीतले की तुम्हाला ओळखूच येणार नाही खिरापत आणि झालेही तसेच. खिरापत होती पुडिंग अरे बापरे किती पूर्वी हे पुडिंग प्रकरणच माहीत नव्हते तेव्हाची गोष्ट आहे ही.
.
आता हे अवांतर होतय पण त्याच मावशींनी पुढे आत्महत्येचा सुदैवाने फसलेला प्रयत्न केला नंतर. तेव्हा लहान होते मी आणि कुठेतरी त्यांचं ते प्राऊडली बोलणं, तोरा आणि प्रेमळ स्वभाव आठवुन हलायला झाले.

कोणे एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला
त्याने एक उंबर तोडले बाई उंबर तोडले
सईच्या दारात नेऊन टाकले बाई नेऊन टाकले
सईने उचलून घरात आणले बाई घरात आणले
कांडून कांडून राळा केला बाई राळा केला
राळा घेऊन बाजारात गेली बाई बाजारात गेली
त्याच पैशाची घागर आणली बाई घागर आणली
घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली
उजव्या हाताला मधल्याच बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला
आणा माझ्या सासरचा वैद्य
अंगात अंगरखा फाटका-तुटका
डोक्याला पागोटे फाटके-तुटके
पायात वहाणा फाटक्या-तुटक्या
कपाळी टिळा शेणाचा
तोंडात विडा पादरा किडा
हातात काठी जळकं लाकूड
दिसतो कसा बाई भिकार्‍यावाणी बाई भिकार्‍यावाणी

आणा माझ्या माहेरचा वैद्य
अंगात अंगरखा मखमली
डोक्याला पागोटे भरजरी
पायात वहाणा कोल्हापूरी
कपाळी टिळा चंदनाचा
तोंडात विडा केशराचा
हातात काठी चंदनाची
दिसतो कसाबाई राजावाणी बाई राजावाणी

हे गाणे त्या 'पादरा किडा' या उल्लेखामुळे आवडत असे आणी ईईईईईईई होत असे Happy

Pages