प्रसंग अगदी काल घडलाय असा डोळ्यासमोर आहे...
"बाबू, ई नदिलोनि पवित्र जलालधु स्नानम चेसरा... जलालो मुनीगी रा.." नदीकाठावरच्या आणि पलीकडे गुडघाभर पाण्यात उभ्या आईच्या मातुल कुटुंबातील नातेवाईक मंडळींनी कृष्णेच्या 'पवित्र' पाण्यात मी स्नान करावे, असा एकच घोषा लावला होता. स्नानाला कधीही एका पायावर तयार असणारा मी ठामपणे 'नाही' म्हणत असल्याचे दुर्लभ दृश्य बघून आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हसू एकाच वेळी झळकत होते. अखेर बळेबळेच मला त्या गढूळ पाण्यात ओढण्यात आले आणि कृष्णा नदीतीरी दर बारा वर्षांनी भरणाऱ्या 'कृष्णापुष्करम' उर्फ 'दक्षिण कुंभ' मेळाव्यात आमचे घोडे न्हाले! 'न आवडलेले' असे आयुष्यातील ते दुर्मीळ स्नान. अन्यथा आंघोळ करणे हे माझ्या जीवनातील सर्वाधिक आनंददायक काम होते आणि आहे.
Bath is to body what laughter is to soul असे कोणीतरी म्हटलेच आहे, नसेल म्हटले तर मी म्हणतो. जन्माला आल्यावर सर्वप्रथम नर्सबाई काय करतात, तर नवजात बाळाला आंघोळ घालून स्वच्छ करतात. त्याशिवाय खुद्द आईबाबांना तरी दाखवतात का ते बाळ? जन्मल्याबरोबर जे काम आपल्याला चिकटते तेच 'आवडते' काम असेल, तर मग त्याचा मन प्रफुल्लित करणारा सोहळा होतो. त्याचे सर्व टप्पे फार आनंददायक होतात आणि हे स्नानसोहळे स्मृतींमध्ये अलगद जाऊन बसतात.
आज पाच दशके भूतलावर काढल्यानंतर कुणी आयुष्याच्या सर्वात आनंदी प्रसंगांबद्दल विचारले, तर मला माझा स्नानप्रवास आठवतो. सकाळी शाळेत जाण्याआधी गारेगार पाण्याने केलेले सचैल स्नान, कडाक्याच्या हिवाळ्यात ऊन-ऊन पाण्याने अंग शेकणारे स्नान, सुट्टीच्या दिवशी आईने खसाखसा घासूनपुसून लख्ख करीत घातलेली आंघोळ, बाबांसोबत जलतरण तलावात केलेले स्नान, सणासुदीचे - प्रसंगविशेष स्नान, आजोळी स्वच्छ नदीपात्रात डुंबत केलेले स्नान... एक ना हजारो आनंदक्षण स्नानाशी जोडले गेले आहेत.
घरी आईचा दिवस सर्वात आधी सुरू होई. तिच्या माहेरी फार धार्मिक वातावरण होते, स्नान केल्याशिवाय ती काही खात-पीत नसे. आम्ही भावंडे अर्धवट झोपेत असताना आईचे स्नान आटोपत असे. हळू आवाजात तिचे गायत्री मंत्राचे पठण ऐकू येत असे. मग चहा-दूध तयार झाले की मला पूर्ण जाग येई. शाळा सकाळची, त्यामुळे आवरून आंघोळ करूनच शाळेत जायचे, असा नियम होता. शेजारीपाजारी सर्व मुलांमध्ये आंघोळ करून वेळेत तयार होण्यात माझा नंबर नेहेमी वर असे. घरी हिरव्या रंगाचा 'हमाम' साबण आम्हा भावंडांचा सामायिक होता. हो, तेव्हा प्रत्येकाला वेगळ्या साबणाची चंगळ नव्हती. त्यामुळे कोरडा साबण मिळावा म्हणून मीच पहिला नंबर लावत असे. ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेला शुद्ध हिंदुस्तानी 'लोकल' हमाम साबण आजही ३०० कोटी रुपयाचा ब्रँड आहे! आतासारखे 'आयुर्वेदिक', 'नैसर्गिक', ‘इको-फ्रेंडली’ साबणाचे काही खास कौतुक नव्हते. त्या वेळेपासून (१९३१) नीम, तुळस, एलोवेरा अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर हे हमामचे वैशिट्य टिकून आहे हे खास. आधी टाटा आणि आता हिंदुस्थान युनिलिव्हर बनवतात. आजही महिन्याला काही कोटी हमाम साबण विकले जातात भारतात.
हिवाळ्यात गरम पाण्यासाठी स्टोव्हवर वेगळा हंडा तापत ठेवलेला असे, त्यातले हवे तेवढे गरम पाणी काढून तेवढेच गार पाणी त्या हंड्यात परत उकळण्यासाठी ठेवले जाई. जुन्या आठवणीत हमखास असणारा पाणी तापवण्याचा बंब मात्र आमच्या घरी कधीच वापरात नव्हता. नळाला पाणी ठरावीक वेळी असल्याने आणि शाळेसाठी उशीर होणे लाजिरवाणे समजले जात असल्याने टाइम वॉज ऑलवेज ऍट प्रीमियम... त्यामुळे आंघोळीची खरी मजा रविवारी असे. त्या दिवशी भरपूर पाणी आणि साबण वापरून मनसोक्त आंघोळ करायला कोणाची ना नसे. फक्त त्याआधी 'केस धुणे' हा गंभीर अत्याचार होत असे. केसांसाठी वेगळ्या 'शिकेकाई' साबणाचा प्रवेश आमच्या घरी झाला नव्हता. रोजच्याच साबणाने किंवा कधी तर सर्फसारख्या पावडरींनी आमचे 'मळके, घाण, चिपचिप' केस स्वच्छ केले जात. साबणाचे पाणी हमखास डोळ्यात जात असल्याने हे मला फार त्रासदायक वाटत असे. एकदा हे झाले की हवा तेवढा वेळ पाण्यात खेळायला परवानगी असे. आम्ही भावंडे एकमेकांवर पाणी उडवून, एकमेकांना ढकलून, दंगामस्ती करत रविवारची सकाळ सार्थकी लावत असू. कधीकधी बाबाही आमच्या कंपूत सामील होत आणि आमच्या जलपंचमीला उधाण येत असे.
उन्हाळ्याच्या सुटीत आमच्या मूळ गावी आणि आजोळी विभागून जात असू. दोन्ही ठिकाणची स्नानवैशिष्ट्ये वेगवेगळी होती. आमच्या गावी पाण्याचे दुर्भिक्षच. घरात विहीर नव्हती. गावातल्या दोन विहिरींनाच काय ते पाणी आणि उन्हाळा म्हणजे तिथेही पाणी कमी. आमचा घरगडी लच्छू विहिरीतून हंडे भरून आम्ही घरचे, गडीमाणसे, जनावरे सर्वांसाठीच पाणी आणीत असे. पाणी जपून वापरावे लागे, आंघोळीसाठी काटकसर करावी लागे. तरी त्या घरी स्नान आवडायचे, कारण विहिरीचे थंडगार पाणी आणि 'लाइफबॉय' साबण. गुलाबी रंगाचा, चौकोनी. बाबांच्या लहानपणापासून तोच एकमेव साबण गावात विक्रीला असे. लाइफबॉय आता सुमारे शंभर वर्षे भारतात विकला जात आहे, अगदी मागच्या एका वर्षातच २००० कोटी रुपयांचे लाइफबॉय साबण विकले गेले भारतात! म्हणजे आजही वट असलेला हा खरा सुपरब्रॅंड! पुढे 'लाइफबॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहाँ' या जिंगलचे मराठी भाषांतर 'लाइफबॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास मारी' असे करून खिदळणे अनेक वर्षे चालले.
* * *
तिकडे आजोळी वेगळीच तर्हा. दररोज पहाटे साधारण ५च्या सुमारास ...
नंदिनी नलिनी सीता मालती च महापगा
विष्णुपदाब्जसंभूता गंगा त्रिपथगामिनी
भागीरथी भोगवती जान्हवी त्रिदशेश्वरी
द्वादशैतानि नामानी यत्र यत्र जलाशये
स्नानोद्यत: स्मरेनित्यं तत्र तत्र वसाम्यहं…….
सर्व जण साखरझोपेत असताना बाहेर आजोबांचे मोठ्या आवाजात स्तोत्रपाठांसह स्नान सुरू असायचे. आता थोड्याच वेळात दिवस उगवणार आणि आपल्याला बिछाना सोडावा लागणार, हे दुष्ट सत्य हळूहळू मनाला स्पर्श करू लागे. बाहेर पेटवलेल्या बंबाच्या धुराचा, गरम पाण्याचा, मैसूर चंदन साबणाचा, अग्निहोत्रात टाकलेल्या अर्धवट पेटलेल्या गोवऱ्यांचा, पूजेसाठी आणवलेल्या ताज्या फुलांचा एक मिश्र दैवी सुवास पसरत असे.
त्यांच्याकडे एक जादुई कुलूपबंद कपाट होते - फक्त साबणांचे! त्यात वेगवेगळ्या ब्रँडचे अनेक साबण हारीने रचलेले असत. लांबचा प्रवास करून जबलपूरला आजोळघरी पोहोचल्यावर ते कपाट उघडून आम्हा भावंडांना प्रत्येकी एकप्रमाणे हवा तो साबण घेता येई, फक्त मैसूर संदल वगळता. मैसूरवर आजोबांचा एकाधिकार होता आणि तो अन्य कोणालाही वापरायला मिळत नसे. त्याचा राग येई.
पुढे अनेक वर्षांनी बंगळुरूला कर्नाटक स्टेट सोप फॅक्टरीत एका कामासाठी गेलो, तेव्हा तेथे मैसूर संदल साबण आणि त्याचे अनेक नवनवीन प्रकार सुंदर वेष्टनात विकायला होते. आजही पूर्वीसारखेच चंदनाचे शुद्ध तेल वापरतात त्यात. मी अधाशासारखे विकत घेतले, स्वतः भरपूर वापरले आणि घरी-दारी-मित्रांना भेट म्हणून दिले. 'छोटा बच्चा' म्हणून मला नाही म्हणतात म्हणजे काय? ते एक सोडले तर भेडाघाट, ग्वारीघाट अशा नर्मदेच्या वेगवेगळ्या घाटांवर स्वच्छ गार पाण्यात तासनतास केलेले स्नान ही आजोळची सर्वोत्तम आठवण.
सौंदर्यतारकांचा म्हणून नावाजलेला 'लक्स' साबण फार प्रसिद्ध होता. मध्यमवयीन-मध्यमवर्गीय स्त्री-पुरुष आधी फारसा वापरत नसत. शेजारपाजारच्या कॉलेजकुमारी-कुमार मात्र तो साबण खास वापरत. त्यांचा हेवा वाटत असे. मी साधारण १० वर्षांचा होतो, तेव्हा केसांसाठी वेगळा साबण दिसू लागला. श्रीमंत नातेवाईक स्त्रिया 'केशनिखार' साबण वापरत. गोदरेज आणि विप्रो ब्रँडचे 'शिकेकाई' साबण आले आणि मग केशनिखार चे कौतुक संपले. शिकेकाई साबण पुरुष मंडळी मात्र वापरत नसत, आम्हा मुलांनासुद्धा केसांसाठी शिकेकाई साबण वापरणे फार 'गर्ली' वाटत असल्यामुळे आम्ही रोजचाच साबण केसांना फासत असू.
मग काही वर्षांनी 'सनसनाती नींबू की ताजगी' देणारा लिरिल, 'सुपर फ्रेश' सिंथॉल आणि नीम की गुणवत्ता लिये 'मार्गो' असे अनेक ब्रँड बाजारात दिसू लागले. टीव्ही रंगीत झाला आणि जाहिरातीत दिसणारी बिकिनीतली सचैल लिरिल कन्या सर्वत्र चर्चेचा विषय झाली. पुढेही अनेक वर्षे लक्सचे 'फिल्मी सितारों का सौंदर्य साबुन' हे स्थान आणि लोकप्रियता कायम राहिली. ९०नंतर विप्रोच्या संतूर साबणाने लक्सच्या इंद्रासनाला बऱ्यापैकी झटके दिले. 'आप की त्वचा से आप की उमर का पता ही नही चलता' हे फार गाजलेले कॅम्पेन. पण तो 'गर्ली' आहे हे माझे मत काही बदलले नाही. आम्हा पुरुष मंडळींसाठी विशेष वेगळे साबण फारसे नव्हते. लाइफबॉय, सिंथॉल आणि ओके याच साबणांना 'पुरुषांसाठी' म्हणून मान्यता होती. पुढे सुपरस्टार शाहरुख खानने 'लक्स'साठी टबबाथ घेत हे बदलण्याचा एक प्रयत्न केला. त्यामुळे लक्स फक्त बायका वापरतात हा समज थोडा कमी झाला.
फेब्रुवारी १९८२ ह्या महिन्यात माझ्या स्नानप्रेमासाठी एक नवे युग अवतरले. आम्ही स्वतःच्या मोठ्या घरात राहायला गेलो. ह्या घरात वेगळे मोठे भिंतभर टाइल्सची सुखद रंगसंगती असलेले कोरे करकरीत स्नानघर होते. पूर्ण बंद होणारा दरवाजा, उत्तम सूर्यप्रकाश आणि मुख्य म्हणजे डोक्यावर भरपूर जलधारांचा 'शॉवर' होता! आजवर स्नान म्हणजे बादलीत किंवा घंगाळात असलेले पाणी अंगावर घ्यायचे असे स्वरूप बदलून जलौघाचे रेशमी तुषार अंगावर झेलत सचैल स्नान करायचे, असा सुखवर्धक बदल झाला. माझे आंघोळीचे तास वाढले. आमचे शहर उन्हाळ्यात प्रचंड तापत असे, पाणीटंचाई मात्र नव्हती. त्यामुळे दिवसातून दोनदा स्नानाचे सुख लुटले जाई. पुढे काही वर्षांनी पाणी तापवायला गीझर आला, गरम पाण्याचा हिवाळी स्नानसोहळा जास्तच लांबल्यामुळे पूर्ण स्नानघरात वाफेचे धुके पसरत असे. त्यातून बाहेर पडताना आपण ढगातून बाहेर पडून जमिनीवर पाय ठेवत आहोत असा फील येत असे.
१९८०पासूनच शाम्पूच्या बाटल्या आमच्या शहरातल्या दुकानांत दिसू लागल्या होत्या. हे महागडे प्रकरण आपल्यासाठी नाही असे सर्वच मध्यमवर्गीय लोक समजत, त्यामुळे ते काही आमच्या घरी आणले गेले नाही. शाम्पू प्रकरणात खरी क्रांती 'Chik' नामक शाम्पूच्या सॅशे पॅकने घडवली. १ रुपया अशी माफक किंमत, तीव्र सुगंध, भरपूर फेस असे सर्व काही त्यात होते. बहुतेक १९८३ साल असावे. हे झाले आणि मग मात्र वेगवेगळ्या सर्वच ब्रॅण्ड्सचे शाम्पू असे सॅशेमध्ये मिळू लागले, जास्त आवाक्यात आले. २-५ वर्षांतच ते स्नानाचा अविभाज्य भाग बनले. आज तर देशातील एकूण शाम्पूविक्रीपैकी ७५% विक्री फक्त 'सॅशे पॅक'ची असते.
माझ्या स्नानसोहळ्यातही शाम्पूचे कौतुक वाढतेच राहिले. साधारण १० वर्षांनी त्याचा धाकटा भाऊ 'कंडिशनर' बाजारात आला. कंडिशनरचा जन्म मात्र पुरुषांच्या गरजेपोटी झाला आहे, 'ब्रिलियंटाइन' ह्या दाढी-मिश्या चमकदार करणाऱ्या उत्पादनाचे दुसरे रूप म्हणजे कंडिशनर. काही ब्रॅंड्सनी आधी शाम्पूसोबत कंडिशनर मोफत वाटले आणि पुढे त्याची सवय कधी लागली ते समजलेच नाही.
* * *
१९९४पासून नोकरीधंद्याला सुरुवात झाली, शहर बदलले. सर्व साबण, शाम्पू स्वतःच्या आवडीचे घेता येऊ लागले. याच वेळी लिक्विड सोपचे पेव फुटले. एकापेक्षा एक सरस सुगंध असलेले हे द्रवरूपी नावीन्य, त्याचा फेसच फेस आणि त्यासाठी वेगळे 'लूफा' असा जामानिमा. एकदम राजेशाही. मुंबईतील अनेक छोट्या घरात राहिलो. इथे जागा कमी आणि बाथरूम तर मी जेमतेम उभा राहून ओला होऊ शकेन एवढीच जागा असलेले. बाहेर घाम आणि प्रदूषण भरपूर, त्यामुळे दिवसातून दोनदा स्नान हा शिरस्ता कायम राहिला, तरी स्नानसुखात व्यत्यय मात्र आला.
तोवर खास पुरुषांसाठी म्हणून साबण आणि स्नानप्रावरणे भारतीय बाजारात दिसू लागली होती, त्यांचा लाभ घेण्याएवढी ऐपत आली होती. 'एक्स्ट्राव्हॅगंटली मेल' अशी खास टॅग लाइन असलेला 'आरामस्क' साबण दिल्लीच्या दिवान वाधवा ग्रूपने आणला. तो आम्हा तरुण मुलांमध्ये फारच लोकप्रिय झाला. वेगळा, थोडा तीव्र सुवास आणि वेगळाच आकार, साबणाच्या वडीवर एक डौलदार A अक्षर कोरलेली पट्टी असे ते आकर्षक प्रॉडक्ट होते. नीश की काय म्हणतात तसे. तो अनेक वर्षे मी वापरला. पुढे क्रेझ ओसरली आणि तो ब्रँड विस्मृतीत गेला. एका मराठी मुलीने ब्रँड रिव्हायव्हल शीर्षकाखाली ह्या साबणावर शोधप्रबंध सादर केला, इतकी त्याची लोकप्रियता. जुन्या गाण्यांचे जसे रिमेक बाजारात येते, तसे काही खास ब्रॅंड्सचे व्हायला पाहिजे.
दिवाळीचा सण आणि 'मोती' साबणाने स्नान हे अद्वैत तर वर्षानुवर्षे उपभोगतोच आहे. तो सुवास आणि दिवाळी एकमेकांना पर्यायवाची जणू. मोती साबण आणि दिवाळी निदान महाराष्ट्रात तरी एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत.
पितृत्व लाभले, तेव्हा स्नानप्रेमामुळेच नवजात बाळाला आंघोळ घालायची जबाबदारी सहज स्वीकारली आणि पार पाडली. जसजसे वय वाढत गेले, तसतसे साबण आणि आइसक्रीमच्या जाहिराती सारख्याच होत गेल्या - मलाई, बदाम, फळांचे रस दोहोंत असल्याचे कानीकपाळी सांगण्यात येऊ लागले. साबणातून 'नैसर्गिक' सुगंध हळूहळू कमी होत गेला आणि साबण 'दिसायला' सुंदर होऊ लागले. आता 'खादी'सारखी दर्जेदार (आणि महाग) उत्पादने सोडली, तर 'खरे' सुवास दुष्प्राप्य झाले आहेत.
पुढे कामानिमित्त देशभर-जगभर प्रवास करता आला. आलिशान-गेलिशान सर्वच प्रकारच्या गेस्ट हाउस, लॉज, तारांकित-बिनतारांकित अशा हॉटेलातून राहण्याचे प्रसंग वाढले. जणू एक नवीन स्नान-दालन पुढ्यात आले. तेव्हा आणि आताही रूमचा ताबा मिळाला की सर्वात आधी तेथील बाथरूमचे निरीक्षण-परीक्षण करणे आणि तिथले शॉवर-तोट्या उघडबंद करण्याचे विशेष तंत्र समजून घेणे हे प्रचंड आवडीचे काम आहे. त्यामुळे नंतर होणारी फजिती होत नाही हा मोठा फायदा. त्यातही प्रचंड वैविध्य असते हे कळले. उंची हॉटेलातून स्नानागारांच्या रचनेवर भरपूर मेहनत घेतलेली दिसून येई, स्वच्छतेचा, सौंदर्याचा आणि स्नानानुभव समृद्ध करण्यासाठी लागणाऱ्या वातावरण निर्मितीवर भर दिलेला असे. स्नानाचा आनंद शतगुणित होत गेला.
वेगवेगळ्या शहरात मुक्कामात बाथ टब, बाथ सॉल्ट, बाथ बॉम्ब्स आणि बबल बाथ यासारखे नखरेल प्रकारही पुरेपूर अनुभवले. Wash away your troubles with some bubbles हे ध्येयवाक्य ठेवून स्टीम बाथ, सौना बाथ, व्हिटॅमिन फिल्टर लावलेले शॉवर, पाठीच्या कण्याला सुखद मसाज देणारे प्रेशर शॉवर, जाकुझी असे शरीराचे चोचले करण्यात मागे राहिलो नाही. अत्याधुनिक स्नानगृहांमुळे काहीदा फजितीही झाली. जपानी हॉटेल्समधली स्पेस कॅप्सुलसारखी अरुंद स्नानगृहे आणि माझे सहाफुटी धूड हे व्यस्त प्रमाण सहन न झाल्यामुळे त्यात असलेल्या असंख्य तोट्या-बटणे-रिमोट-अलार्म यांनी वात आणला होता. स्वीडन आणि जपान दोन्हीकडे पारंपरिक बाथहाउसचा अनुभव घ्यायला म्हणून गेलो असता तिथल्या 'दिगंबर ओन्ली' अटीमुळे काही क्षण अवघडलो होतोच.
सिंगापूरच्या मरीना बे सँडच्या सर्वोच्च मजल्यावर माझ्या छोट्या पिल्लाला सोबत घेऊन खिदळत केलेलं जाकुझी स्नान, गोव्यात थोड्या अप्रसिद्ध शांत समुद्रकिनाऱ्यावरचे रात्रीच्या चांदण्यातले स्नान, भोपाळला ३०० वर्षे जुन्या कादिमी हम्माम मध्ये केलेला नवाबी गुसल, धबधब्याखाली केलेली तुषारस्नाने, मे महिन्याच्या प्रचंड उकाड्यात पटियाला-अमृतसर मार्गावरील अनोळखी गावातल्या एक निर्जन ट्यूबवेलवर मनसोक्त केलेले स्नान, कडाक्याच्या थंडीत मित्रांच्या पैजेखातर तिस्ता नदीच्या उथळ पात्रात केलेले, ब्रह्मपुत्रेच्या घनगंभीर पाण्याकाठी घाबरत केलेले, सोरटी सोमनाथला समुद्राच्या प्रचंड खारट पाण्यात केलेले, उज्जयिनीत क्षिप्रा 'नदी' म्हटल्या जाणाऱ्या ओघळात जेमतेम पाय बुडवून केलेले, पुष्करच्या ब्रह्मसरोवरात भल्यापहाटे केलेले, मालदीवच्या रिसॉर्टमध्ये खाली काचेतून समुद्र आणि वर मोकळे आकाश दिसणाऱ्या राजेशाही स्नानागारात केलेले.. अशा एक ना अनेक स्नानस्मृती माझ्या मनाला आजही भिजवून काढतात. Life is a long bath, the more you stay, the more wrinkled you get हे पुरेपूर पटलंय.
स्नानमाहात्म्यात एक अध्याय टॉवेलचाही आहे. सुती पांढरा पंचा, मग थोडे बरके कोइम्बतूरच्या 'मोती' ब्रँडचे जाडसर टॉवेल, मग सुखसंवर्धक टर्किश टॉवेल, मग खास बांबूच्या/केळीच्या तंतूंपासून बनवलेले अतिमुलायम टॉवेल्स, जुन्या सिनेमातील व्हिलन मंडळी वापरीत तसले स्टायलिश बाथरोब असे सर्व चोचले पुरवायला मिळाले. तो प्रवासही आनंददायक ठरलाय.
* * *
सर्वच स्नानप्रवास आनंदी झाला असेही नाही. प्रयाग-वाराणसीला भेटी घडल्या, पण गंगास्नानाचे आलेले योग बरेचदा पाण्याच्या अस्वच्छतेमुळे नाकारले आहेत - डोक्यावर पाण्याचे शिंतोडे घेऊन प्रतीक-स्नान करून वेळ मारून नेली आहे. गंगेच्या कुशीत स्वच्छ नितळ पाण्यात स्नान करायला मिळाले, तोही प्रसंग अगदी कालच घडल्यासारखा वाटतो.
….. कुरु कृपया भवसागरपारम् ...... तीर्थपुरोहित जुळे भाऊ पंडित सुदीक्षित सुभिक्षित मंत्रपठण करीत आहेत. त्यांच्या कानात हिऱ्यांच्या कुड्या चमचमत आहेत. मावळतीचा सूर्य, नोव्हेंबर महिन्याची कडाक्याची थंडी आणि गंगेच्या स्वच्छ बर्फगार पाण्याचा तीव्र प्रवाह, त्यात भिजत उभा मी. मनाची भावविभोर अवस्था. त्यांचा आवाज टिपेला पोहोचतो ...
तव चेन्मातः स्रोतःस्नातः
पुनरपि जठरे सोऽपि न जातः
नरकनिवारिणि जाह्नवि गंगे
कलुषविनाशिनि महिमोत्तुङ्गे …..
सुदीक्षित मृदू आवाजात म्हणतात, "अनिंद्यजी, माताजी को अंतिम प्रणाम कीजिये, अस्थियों को अब गंगार्पण कीजिये..." आणि त्या एका क्षणातच आईचा हात नेहमीसाठी सुटल्याचे आलेले भान... हरिद्वारचे एकमेव गंगास्नानही कधीच न विसरता येण्यासारखे.
* * * समाप्त * * *
इतरत्र पूर्वप्रकाशित. काही चित्रे जालावरून साभार.
Submitted by सीमंतिनी
Submitted by सीमंतिनी
बाबू आंघोळ केलीस का ? …. हा हा
हे धमाल आहे.
आज अनेक दिवसांनंतर घरात
आज अनेक दिवसांनंतर घरात यार्डली साबणांचा पुनःप्रवेश झाला.
*
यार्डली लंडन ब्रँड आणि त्याच्या सुगंधी विश्वाला ब्रिटिश जीवनात पिढ्यांपिढ्या अढळपद मिळाले आहे, नेमकेच सांगायचे तर १७७० सालापासून. म्हणजे साधारण २५०+ वर्षे !
इंग्लिश रोझ, इंग्लिश लॅवेंडर, इंग्लिश रेड रोझ असे खास ब्रिटिश नेटिव्ह फुलांचे सुगंध असलेले साबण. १९२७ सालापासून ब्रिटिश सम्राट-सम्राज्ञी कडून 'Royal Warrant of Appointment " असे मानाचे पान मिळालेल्या ब्रँडची मालकी भारतात अझीम प्रेमजींच्या विप्रोकडे आहे.
दिवस आजचा सुगंधी झाला !
शॉवरच्या डिझाईनवरही चर्चा
शॉवरच्या डिझाईनवरही चर्चा व्हावी. आमच्याकडे असलेला शॉवर त्याचा हॅण्ड शॉवरही होत असल्यामुळे मला आवडतो. त्यात बाजूला एक बटण आहे, जे एकदा दाबल्यास पाणी सगळीकडून न येता फक्त मधल्या काही भोकांतून येते आणि तो भाग पाण्याच्या दाबाने गोल फिरतो. दोनदा दाबल्यास सर्व भोके बंद होऊन शॉवरच्याच वरच्या भागातून नळासारखे पाणी पडते. हा वापरायला लागल्यापासून मी आनंदात होतो. पण मध्यंतरी एका मित्राकडे अंघोळीचा योग आला. तिथे शॉवरचं डोकं हे मोठ्या ताटभर आकाराचं होतं. त्याची भोकंही थोडी जाड असावीत. त्यामुळे पाण्याची धार अगदी बारीक आणि धारदार न पडता पावसाच्या पाण्यासारखी थोडी जाड आणि गुळगुळीत पडते. अशा प्रकारच्या पाण्याचा स्पर्श काय सुखद असतो सांगू! माझा प्रवासाने आलेला शीण एका क्षणात नाहीसा झाला. आता घरी आल्यावर आमच्याच शॉवरचं पाणी मला गोड लागेनासं झालं आहे.
पावसाच्या पाण्यासारखी शॉवरची
पावसाच्या पाण्यासारखी शॉवरची धार ! फारच छान.
हॅन्ड शॉवर थोडे जास्त फोर्सने पाणी फेकणारा आवडतो. पाठदुखीवर गरम पाण्यानी सुखद मसाज घडतो.
मध्यंतरी एका मित्राकडे
मध्यंतरी एका मित्राकडे अंघोळीचा योग आला. तिथे शॉवरचं डोकं हे मोठ्या ताटभर आकाराचं होतं. त्याची भोकंही थोडी जाड असावीत. त्यामुळे पाण्याची धार अगदी बारीक आणि धारदार न पडता पावसाच्या पाण्यासारखी थोडी जाड आणि गुळगुळीत पडते. अशा प्रकारच्या पाण्याचा स्पर्श काय सुखद असतो सांगू! माझा प्रवासाने आलेला शीण एका क्षणात नाहीसा झाला. आता घरी आल्यावर आमच्याच शॉवरचं पाणी मला गोड लागेनासं झालं आहे. >> पुण्या चॅ मॅरिआट आहे नं तिथे पण रूम मध्ये असलाच ताटभर मोठा शावर हेड आहे. तो ही पार डोक्यावर लैच भारी. प्लस तिथे हँड शावर देखील आहे.
मला इंग्लिश लव्हेंडर फार आव्डते पण सध्या पीअर्स.
सुगंधी लेख आणि प्रतिसाद!
सुगंधी लेख आणि प्रतिसाद!
तो बाळाचा फोटो तर किती गोडू आहे. सगळ्या प्रवासाशी रिलेट झाले.
लेखातील आणि प्रतिसादातील बहुतेक साबण वापरलेले आहेत. पण जेंव्हापासून घरी उटणे करता यायला लागले, तेंव्हा पासून उटण्यावर येऊन थांबले आहे.
मनसोक्त आंघोळीसाठी सुटीचा एक वार अजूनही राखीव आहे! निवांत आंघोळ करायला मिळाल्याशिवाय सुट्टी मिळाली असे वाटतच नाही.
खूप सुंदर लेख...एका दमात
खूप सुंदर लेख...एका दमात वाचून काढला...पाणी काढलत शेवटी डोळ्यातून...माझ्या माहेरी रोजच्या वापरासाठी कायम लाईफबॉय आणि दिवाळीत मोती..
सासरी मात्र कायम लक्स ..अगदी दिवाळीत सुद्धा...मग मीच एका दिवाळीत मोती साबण घेऊन आले....
>>> शॉवरच्या डिझाईनवरही चर्चा
>>> शॉवरच्या डिझाईनवरही चर्चा व्हावी
करा, पण एखाद्या विषयाच्या किती खोलात शिरायचं म्हणते मी!
वर आंघोळीच्या नावडीबद्दल वाचून आठवलं - माझी लेक तान्ही असताना तिला होती नावड. तेल/मसाज खूप एन्जॉय करायची, पण अंगावर पाण्याचा पहिला तांब्या उपडा झाला की एकदम विश्वासघात झाल्यासारखा चेहरा करून भोकाड पसरायची!
मला एकदम “what’s wrong with this woman! She seemed ok, like two minutes ago!” वगैरे ॲक्च्युअली ऐकू यायचं त्या रडण्यात.
आता आमच्या cockatiel चिकूलाही आवडत नाही आंघोळ. पण पालेभाजी धुवून ओली पानं पसरून ठेवली की त्यात लोळायला आवडतं. तीच त्याची आंघोळ!
विश्वासघात
विश्वासघात
एकदम विश्वासघात
एकदम विश्वासघात
पालेभाजी आंघोळ
पालेभाजी धुवून ओली पानं पसरून
पालेभाजी धुवून ओली पानं पसरून ठेवली की त्यात लोळायला आवडतं. तीच त्याची आंघोळ!>> पण मग ती खातात का पाले भाजी? वर जर्म्स असतील ना त्या कोकाटिएल चे? खडूस पणे नाही विचारले. शास्त्रीय माहिती हवी म्हणू न विचारले.
नाही खात, एखादा लेट्यूस हेड
नाही खात, एखादा लेट्यूस हेड त्यासाठीच घेते.
... इंग्लिश लव्हेंडर आवडते ..
... इंग्लिश लव्हेंडर आवडते ...
अमा, मला त्यांच्या प्रत्येक प्रॉडक्टवर लिहिलेले वाक्य आवडते
Meilleures fragrances d’Angleterre depuis 1770
किती म्हणजे कित्ती जुने, इंग्रजी भाषेचे फॉसिल जणू
@ निलाक्षी
@ निलाक्षी
निवांत आंघोळ = सुट्टी,
अगदी बरोबर !
@ Ashwini_९९९
आभार.
मला फार आवडतो लव्हेंडर
मला फार आवडतो लव्हेंडर यार्ड्ली साबण . पण मी इथे घेतलेला तेव्हा वास बराच बदलला आहे अस वाटल. माहित नाही पण न्युटेलाच भारतासाठीच व्हर्जन वेगळ आहे तस असेल मे बी.
England's finest fragrances
England's finest fragrances since 1770
इन्ग्लिश लवेंड र चा वास घेताना खूप लांब श्वास घ्या. वास घ्यायची पद्धत पहिले ओपनिन्ग नोट मग मध्य नोट व खाली बेस नोट.
व गरम पाण्याचा शावर घेउन साबण वापरून बाहेर आल्यावर दार बंद कराय्चे. दोन तासांनी दार उघड ल्यावर येतो तो एक वास.
@ सीमा,
@ सीमा,
भारतात आणि तुर्की / अन्य देशात उत्पादित यार्डलीच्या सुवासात सूक्ष्म फरक असल्याचे मलाही जाणवते, पण बाकी लोक त्याला अंधश्रद्धा समजतात
उदा. वर चित्रातल्या इंग्लिश रोज मध्ये यावेळी मला हलकासा mint undertone जाणवला.
@ अमा,
... दोन तासांनी दार उघडल्यावर ..... येस्स्स, माझ्यामते तो बेस्ट सुवास - सॉफ्ट, सौम्य
सुवासिक स्नानसफर आवडलीच! मला
सुवासिक स्नानसफर आवडलीच! मला (खास करून हिवाळ्यात/ after a hectic day) शॉवर अँड बाथ ऑइलही आवडतं. एकदम ताजेतवाने, प्रफुल्लित वाटतं.(plus skin nourishment also)
पहिल्या फोटोतील बाळ फार म्हणजे फारच गोड आहे.
लेखाचा शेवट मात्र चटका लावून गेला...
थँक्यू राधिका.
थँक्यू राधिका.
अनिंद्यजी,
अनिंद्यजी,
नेहमीप्रमाणे हृद्य लेख आहे, आठवणींचा आलाप आवडला, शक्यतो आठवणी खुद से शूरु खुद पे खतम होतात, पण वैयक्तिक अनुभव त्यातही अंघोळीसारख्या गोष्टीचे अन त्याच्यात होत जाणारी सामाजिक स्थित्यंतरे सटलपणे हाताळण्याचे तुमचे कसब मला आता वाटते की वादातीत आहे.
अंघोळीच्या प्रवासात आमचे पोहायला शिकणे पण जोडायला हवे, गाव दुष्काळी पण आजोळ संपन्न सांगली जिल्ह्यातील त्यामुळे मामांसोबत रोज नरसोबाच्यावाडीला जाणे पोहायला शिकणे वगैरे धंद्यांना उन्हाळ्यात उत येत असे, गावातील गवळी समाजाच्या मित्रांसोबत म्हशी वळत वळत एका पाणवठ्यावर पोचणे, तिथे कॅन भोपळा काहीही नसणे अन त्या प्रसंगी डुंबत्या म्हशीचे शेपूट धरून पोहायला शिकण्याचा आव आणणे ह्या काही वैयक्तिक आठवणी मनात सहज येतात.
माझ्या वाचण्यातून सुटलं का माहिती नाही पण लेखात लिरील साबणाचा उल्लेख सापडला नाही, लिरील हा मोठा ब्रँड तर होताच पण त्याहून महत्वाचे म्हणजे पुढे भविष्यात प्रथितयश म्हणून नावारूपाला आलेल्या कैक सौंदर्यवती अभिनेत्री ह्या "लिरील गर्ल्स" होत्या, त्या अनुषंगाने लिरील साबण/ लिरील गर्ल असणे ग्लॅमर इंडस्ट्री मध्ये प्रतिष्ठेचे मानले गेले होते, माझ्या आठवणीप्रमाणे प्रीती झिंटा ही लिरील गर्ल होती, इतर आता आठवत नाहीत. सेम कथा लक्सची फक्त लक्स नवीन मुलींना लाँच करत नसे तर ती मुलगी आघाडीची नायिका झाली का तिला जाहिरातीत घेत असे, आपले "प्रिमियम" स्वरूप जाहिरात करण्याचा हा प्रकार असावा, "सौंदर्य साबून निर्मा" मधील सोनाली बेंद्रे नजरेसमोरून हटत नाही ते एक असो.
म्हैसूर सँडल सोप अन आजोबा लोक हे द्वैत म्हणा का अद्वैत कैक घरांत कायम बघायला मिळत असे, आमच्याकडे पण आबांचा साबण म्हैसूर सँडल, कधीतरी पोरे बरी दिसावी वाटली का आबा त्यांच्या स्टॉक सोबत आमच्यासाठी एखाद वडी पियर्स आणत, तो कोरडाच ठेवण्यावर कटाक्ष असे, शाळेत गॅदरिंग असले किंवा एखाद मित्राच्या बर्थ डे पार्टीला संध्याकाळी शाळेतून आल्यावर जाताना अंघोळ करून जायचे असल्यास (पेन गिफ्ट म्हणून घेऊन) तर पियर्स काढून अंघोळ केली जाई.
म्हैसूर सँडलचा लोगो पण इंडियन सिम्बॉलॉजी मध्ये किंवा चिन्हशास्त्रात महत्वाचा आहे, त्यांचा लोगो म्हणजे पुराणकालीन शरभ हा हत्तीचे मुंडके अन सिंहाचे शरीर असणारा प्राणी होय, कायमेरा ह्या ग्रीक चिन्ह वजा प्राण्याप्रमाणे शरभ हा अवतार शिवापासून तयार झाला आहे असे मानले जाते, नरसिंह अवतारात कधी नाही ते संतप्त झालेल्या शेषशायी विष्णू भगवंताला शांत करून त्याला मूळ स्वरूपात आणण्याच्या कामावर शरभ अथवा शरभेश्वर ह्यांची नेमणूक झाल्याचे पण वाचले होते. लोगो पाहून सहज आठवले ते लिहीत गेलो.
@ जेम्स
@ जेम्स
लिरिल आणि सचैल ला रा ला रा बिकिनी गर्ल आहे की लेखात, तिला कसे विसरीन?
वैयक्तिक अनुभव ते सामाजिक स्थित्यंतरे ….. हे मात्र आपसूक झाले असावे, त्यात माझे काही विशेष प्रयत्न नाहीत
मैसूर चंदन चा लोगो, भारतीय
मैसूर चंदन चा लोगो, भारतीय चिन्हशास्त्रातले शरभाचे महत्व ही माहितीत सुयोग्य भर, अनेक आभार !
Chimera सिंह आणि बोकड एकत्र असे असते ना ? म्हणजे शिकारी आणि त्याची शिकार एकत्र अशी काहीतरी स्टोरी आहे बहुतेक
सॉरीच, माझ्या वाचण्यातून मिस
सॉरीच, माझ्या वाचण्यातून मिस झाले असावे असे वाटते.
लेखनाकरता धन्यवाद.
कायमेरा बद्दल ही खालील माहिती
कायमेरा बद्दल ही खालील माहिती नेटवर सापडली
according to Greek mythology,[2] was a monstrous fire-breathing hybrid creature, composed of different animal parts from Lycia, Asia Minor. It is usually depicted as a lion, with the head of a goat protruding from its back, and a tail that might end with a snake's head.[3] It was an offspring of Typhon and Echidna and a sibling of such monsters as Cerberus and the Lernaean Hydra.
बाकी कायमेरा हा प्राणी / पौराणिक संकल्पना मिशन इम्पोसीबल ह्या टॉम क्रूझ पटाच्या दुसऱ्या सिनेमात फारच ऐकण्यात आली होती, त्या सिनेमात व्हिलन कायमेरा नावाचा anthrax सदृष्य एलिमेंट आणि त्याचे anti-dote असणाऱ्या belorophone नावाच्या औषधाच्या भोवती खेळत असतो.
कायमेरा (ग्रीक पुराणानुसार)
जेम्स वांड, जबरीच
जेम्स वांड, जबरीच
आभार हपा,
आभार हपा,
धागा बावनकशी आहेच, त्यामुळे अश्या आगंतुक विटा लेखाला लावण्याचा मोह टाळला जात नाही.
विताच खऱ्या, पण पक्क्या
विटाच खऱ्या, पण पक्क्या भाजलेल्या आणि glaze केलेल्या. त्यांच्यामुळे इमारतीचे सौंदर्य वाढते...
@ जेम्स,
@ जेम्स,
Chimera दोन ऐवजी तीन प्राण्यांचा संगम आहे तर ! मला माहिती नव्हते.
@ जेम्स, हिरा, हपा,
विटा नाही हो, अशी मौलिक पूरक माहिती तर Enhancer आहे
... आघाडीची नायिका आणि
... आघाडीची नायिका आणि लक्सची जाहिरात...
ही प्रथा साधारण ७५ वर्षे जुनी आहे हे माहित होते, आज काकांनी हा पुरावाच पाठवला - इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित ही जाहिरात एप्रिल १९४२ ची आहे.
हुस्न बानो हे नाव आमच्या जन्माआधीच्या पिढीलाच माहित असेल. १९३४ (डाकू मन्सूर) ते १९७२ (भारत के शहीद) असा प्रदीर्घ काळ हिंदी सिनेमात काम केलेय असे समजले.
ता. क. दिलीप कुमारच्या
ता. क. दिलीप कुमारच्या प्रसिद्ध 'गंगा जमना' मध्ये हुस्न बानोने 'तारिका' हे पात्र साकार केल्याचे पिताश्री सांगतात
Pages