प्रसंग अगदी काल घडलाय असा डोळ्यासमोर आहे...
"बाबू, ई नदिलोनि पवित्र जलालधु स्नानम चेसरा... जलालो मुनीगी रा.." नदीकाठावरच्या आणि पलीकडे गुडघाभर पाण्यात उभ्या आईच्या मातुल कुटुंबातील नातेवाईक मंडळींनी कृष्णेच्या 'पवित्र' पाण्यात मी स्नान करावे, असा एकच घोषा लावला होता. स्नानाला कधीही एका पायावर तयार असणारा मी ठामपणे 'नाही' म्हणत असल्याचे दुर्लभ दृश्य बघून आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हसू एकाच वेळी झळकत होते. अखेर बळेबळेच मला त्या गढूळ पाण्यात ओढण्यात आले आणि कृष्णा नदीतीरी दर बारा वर्षांनी भरणाऱ्या 'कृष्णापुष्करम' उर्फ 'दक्षिण कुंभ' मेळाव्यात आमचे घोडे न्हाले! 'न आवडलेले' असे आयुष्यातील ते दुर्मीळ स्नान. अन्यथा आंघोळ करणे हे माझ्या जीवनातील सर्वाधिक आनंददायक काम होते आणि आहे.
Bath is to body what laughter is to soul असे कोणीतरी म्हटलेच आहे, नसेल म्हटले तर मी म्हणतो. जन्माला आल्यावर सर्वप्रथम नर्सबाई काय करतात, तर नवजात बाळाला आंघोळ घालून स्वच्छ करतात. त्याशिवाय खुद्द आईबाबांना तरी दाखवतात का ते बाळ? जन्मल्याबरोबर जे काम आपल्याला चिकटते तेच 'आवडते' काम असेल, तर मग त्याचा मन प्रफुल्लित करणारा सोहळा होतो. त्याचे सर्व टप्पे फार आनंददायक होतात आणि हे स्नानसोहळे स्मृतींमध्ये अलगद जाऊन बसतात.

आज पाच दशके भूतलावर काढल्यानंतर कुणी आयुष्याच्या सर्वात आनंदी प्रसंगांबद्दल विचारले, तर मला माझा स्नानप्रवास आठवतो. सकाळी शाळेत जाण्याआधी गारेगार पाण्याने केलेले सचैल स्नान, कडाक्याच्या हिवाळ्यात ऊन-ऊन पाण्याने अंग शेकणारे स्नान, सुट्टीच्या दिवशी आईने खसाखसा घासूनपुसून लख्ख करीत घातलेली आंघोळ, बाबांसोबत जलतरण तलावात केलेले स्नान, सणासुदीचे - प्रसंगविशेष स्नान, आजोळी स्वच्छ नदीपात्रात डुंबत केलेले स्नान... एक ना हजारो आनंदक्षण स्नानाशी जोडले गेले आहेत.
घरी आईचा दिवस सर्वात आधी सुरू होई. तिच्या माहेरी फार धार्मिक वातावरण होते, स्नान केल्याशिवाय ती काही खात-पीत नसे. आम्ही भावंडे अर्धवट झोपेत असताना आईचे स्नान आटोपत असे. हळू आवाजात तिचे गायत्री मंत्राचे पठण ऐकू येत असे. मग चहा-दूध तयार झाले की मला पूर्ण जाग येई. शाळा सकाळची, त्यामुळे आवरून आंघोळ करूनच शाळेत जायचे, असा नियम होता. शेजारीपाजारी सर्व मुलांमध्ये आंघोळ करून वेळेत तयार होण्यात माझा नंबर नेहेमी वर असे. घरी हिरव्या रंगाचा 'हमाम' साबण आम्हा भावंडांचा सामायिक होता. हो, तेव्हा प्रत्येकाला वेगळ्या साबणाची चंगळ नव्हती. त्यामुळे कोरडा साबण मिळावा म्हणून मीच पहिला नंबर लावत असे. ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेला शुद्ध हिंदुस्तानी 'लोकल' हमाम साबण आजही ३०० कोटी रुपयाचा ब्रँड आहे! आतासारखे 'आयुर्वेदिक', 'नैसर्गिक', ‘इको-फ्रेंडली’ साबणाचे काही खास कौतुक नव्हते. त्या वेळेपासून (१९३१) नीम, तुळस, एलोवेरा अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर हे हमामचे वैशिट्य टिकून आहे हे खास. आधी टाटा आणि आता हिंदुस्थान युनिलिव्हर बनवतात. आजही महिन्याला काही कोटी हमाम साबण विकले जातात भारतात.
हिवाळ्यात गरम पाण्यासाठी स्टोव्हवर वेगळा हंडा तापत ठेवलेला असे, त्यातले हवे तेवढे गरम पाणी काढून तेवढेच गार पाणी त्या हंड्यात परत उकळण्यासाठी ठेवले जाई. जुन्या आठवणीत हमखास असणारा पाणी तापवण्याचा बंब मात्र आमच्या घरी कधीच वापरात नव्हता. नळाला पाणी ठरावीक वेळी असल्याने आणि शाळेसाठी उशीर होणे लाजिरवाणे समजले जात असल्याने टाइम वॉज ऑलवेज ऍट प्रीमियम... त्यामुळे आंघोळीची खरी मजा रविवारी असे. त्या दिवशी भरपूर पाणी आणि साबण वापरून मनसोक्त आंघोळ करायला कोणाची ना नसे. फक्त त्याआधी 'केस धुणे' हा गंभीर अत्याचार होत असे. केसांसाठी वेगळ्या 'शिकेकाई' साबणाचा प्रवेश आमच्या घरी झाला नव्हता. रोजच्याच साबणाने किंवा कधी तर सर्फसारख्या पावडरींनी आमचे 'मळके, घाण, चिपचिप' केस स्वच्छ केले जात. साबणाचे पाणी हमखास डोळ्यात जात असल्याने हे मला फार त्रासदायक वाटत असे. एकदा हे झाले की हवा तेवढा वेळ पाण्यात खेळायला परवानगी असे. आम्ही भावंडे एकमेकांवर पाणी उडवून, एकमेकांना ढकलून, दंगामस्ती करत रविवारची सकाळ सार्थकी लावत असू. कधीकधी बाबाही आमच्या कंपूत सामील होत आणि आमच्या जलपंचमीला उधाण येत असे.
उन्हाळ्याच्या सुटीत आमच्या मूळ गावी आणि आजोळी विभागून जात असू. दोन्ही ठिकाणची स्नानवैशिष्ट्ये वेगवेगळी होती. आमच्या गावी पाण्याचे दुर्भिक्षच. घरात विहीर नव्हती. गावातल्या दोन विहिरींनाच काय ते पाणी आणि उन्हाळा म्हणजे तिथेही पाणी कमी. आमचा घरगडी लच्छू विहिरीतून हंडे भरून आम्ही घरचे, गडीमाणसे, जनावरे सर्वांसाठीच पाणी आणीत असे. पाणी जपून वापरावे लागे, आंघोळीसाठी काटकसर करावी लागे. तरी त्या घरी स्नान आवडायचे, कारण विहिरीचे थंडगार पाणी आणि 'लाइफबॉय' साबण. गुलाबी रंगाचा, चौकोनी. बाबांच्या लहानपणापासून तोच एकमेव साबण गावात विक्रीला असे. लाइफबॉय आता सुमारे शंभर वर्षे भारतात विकला जात आहे, अगदी मागच्या एका वर्षातच २००० कोटी रुपयांचे लाइफबॉय साबण विकले गेले भारतात! म्हणजे आजही वट असलेला हा खरा सुपरब्रॅंड! पुढे 'लाइफबॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहाँ' या जिंगलचे मराठी भाषांतर 'लाइफबॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास मारी' असे करून खिदळणे अनेक वर्षे चालले.

* * *
तिकडे आजोळी वेगळीच तर्हा. दररोज पहाटे साधारण ५च्या सुमारास ...
नंदिनी नलिनी सीता मालती च महापगा
विष्णुपदाब्जसंभूता गंगा त्रिपथगामिनी
भागीरथी भोगवती जान्हवी त्रिदशेश्वरी
द्वादशैतानि नामानी यत्र यत्र जलाशये
स्नानोद्यत: स्मरेनित्यं तत्र तत्र वसाम्यहं…….
सर्व जण साखरझोपेत असताना बाहेर आजोबांचे मोठ्या आवाजात स्तोत्रपाठांसह स्नान सुरू असायचे. आता थोड्याच वेळात दिवस उगवणार आणि आपल्याला बिछाना सोडावा लागणार, हे दुष्ट सत्य हळूहळू मनाला स्पर्श करू लागे. बाहेर पेटवलेल्या बंबाच्या धुराचा, गरम पाण्याचा, मैसूर चंदन साबणाचा, अग्निहोत्रात टाकलेल्या अर्धवट पेटलेल्या गोवऱ्यांचा, पूजेसाठी आणवलेल्या ताज्या फुलांचा एक मिश्र दैवी सुवास पसरत असे.
त्यांच्याकडे एक जादुई कुलूपबंद कपाट होते - फक्त साबणांचे! त्यात वेगवेगळ्या ब्रँडचे अनेक साबण हारीने रचलेले असत. लांबचा प्रवास करून जबलपूरला आजोळघरी पोहोचल्यावर ते कपाट उघडून आम्हा भावंडांना प्रत्येकी एकप्रमाणे हवा तो साबण घेता येई, फक्त मैसूर संदल वगळता. मैसूरवर आजोबांचा एकाधिकार होता आणि तो अन्य कोणालाही वापरायला मिळत नसे. त्याचा राग येई.

पुढे अनेक वर्षांनी बंगळुरूला कर्नाटक स्टेट सोप फॅक्टरीत एका कामासाठी गेलो, तेव्हा तेथे मैसूर संदल साबण आणि त्याचे अनेक नवनवीन प्रकार सुंदर वेष्टनात विकायला होते. आजही पूर्वीसारखेच चंदनाचे शुद्ध तेल वापरतात त्यात. मी अधाशासारखे विकत घेतले, स्वतः भरपूर वापरले आणि घरी-दारी-मित्रांना भेट म्हणून दिले. 'छोटा बच्चा' म्हणून मला नाही म्हणतात म्हणजे काय? ते एक सोडले तर भेडाघाट, ग्वारीघाट अशा नर्मदेच्या वेगवेगळ्या घाटांवर स्वच्छ गार पाण्यात तासनतास केलेले स्नान ही आजोळची सर्वोत्तम आठवण.
सौंदर्यतारकांचा म्हणून नावाजलेला 'लक्स' साबण फार प्रसिद्ध होता. मध्यमवयीन-मध्यमवर्गीय स्त्री-पुरुष आधी फारसा वापरत नसत. शेजारपाजारच्या कॉलेजकुमारी-कुमार मात्र तो साबण खास वापरत. त्यांचा हेवा वाटत असे. मी साधारण १० वर्षांचा होतो, तेव्हा केसांसाठी वेगळा साबण दिसू लागला. श्रीमंत नातेवाईक स्त्रिया 'केशनिखार' साबण वापरत. गोदरेज आणि विप्रो ब्रँडचे 'शिकेकाई' साबण आले आणि मग केशनिखार चे कौतुक संपले. शिकेकाई साबण पुरुष मंडळी मात्र वापरत नसत, आम्हा मुलांनासुद्धा केसांसाठी शिकेकाई साबण वापरणे फार 'गर्ली' वाटत असल्यामुळे आम्ही रोजचाच साबण केसांना फासत असू.

मग काही वर्षांनी 'सनसनाती नींबू की ताजगी' देणारा लिरिल, 'सुपर फ्रेश' सिंथॉल आणि नीम की गुणवत्ता लिये 'मार्गो' असे अनेक ब्रँड बाजारात दिसू लागले. टीव्ही रंगीत झाला आणि जाहिरातीत दिसणारी बिकिनीतली सचैल लिरिल कन्या सर्वत्र चर्चेचा विषय झाली. पुढेही अनेक वर्षे लक्सचे 'फिल्मी सितारों का सौंदर्य साबुन' हे स्थान आणि लोकप्रियता कायम राहिली. ९०नंतर विप्रोच्या संतूर साबणाने लक्सच्या इंद्रासनाला बऱ्यापैकी झटके दिले. 'आप की त्वचा से आप की उमर का पता ही नही चलता' हे फार गाजलेले कॅम्पेन. पण तो 'गर्ली' आहे हे माझे मत काही बदलले नाही. आम्हा पुरुष मंडळींसाठी विशेष वेगळे साबण फारसे नव्हते. लाइफबॉय, सिंथॉल आणि ओके याच साबणांना 'पुरुषांसाठी' म्हणून मान्यता होती. पुढे सुपरस्टार शाहरुख खानने 'लक्स'साठी टबबाथ घेत हे बदलण्याचा एक प्रयत्न केला. त्यामुळे लक्स फक्त बायका वापरतात हा समज थोडा कमी झाला.
फेब्रुवारी १९८२ ह्या महिन्यात माझ्या स्नानप्रेमासाठी एक नवे युग अवतरले. आम्ही स्वतःच्या मोठ्या घरात राहायला गेलो. ह्या घरात वेगळे मोठे भिंतभर टाइल्सची सुखद रंगसंगती असलेले कोरे करकरीत स्नानघर होते. पूर्ण बंद होणारा दरवाजा, उत्तम सूर्यप्रकाश आणि मुख्य म्हणजे डोक्यावर भरपूर जलधारांचा 'शॉवर' होता! आजवर स्नान म्हणजे बादलीत किंवा घंगाळात असलेले पाणी अंगावर घ्यायचे असे स्वरूप बदलून जलौघाचे रेशमी तुषार अंगावर झेलत सचैल स्नान करायचे, असा सुखवर्धक बदल झाला. माझे आंघोळीचे तास वाढले. आमचे शहर उन्हाळ्यात प्रचंड तापत असे, पाणीटंचाई मात्र नव्हती. त्यामुळे दिवसातून दोनदा स्नानाचे सुख लुटले जाई. पुढे काही वर्षांनी पाणी तापवायला गीझर आला, गरम पाण्याचा हिवाळी स्नानसोहळा जास्तच लांबल्यामुळे पूर्ण स्नानघरात वाफेचे धुके पसरत असे. त्यातून बाहेर पडताना आपण ढगातून बाहेर पडून जमिनीवर पाय ठेवत आहोत असा फील येत असे.
१९८०पासूनच शाम्पूच्या बाटल्या आमच्या शहरातल्या दुकानांत दिसू लागल्या होत्या. हे महागडे प्रकरण आपल्यासाठी नाही असे सर्वच मध्यमवर्गीय लोक समजत, त्यामुळे ते काही आमच्या घरी आणले गेले नाही. शाम्पू प्रकरणात खरी क्रांती 'Chik' नामक शाम्पूच्या सॅशे पॅकने घडवली. १ रुपया अशी माफक किंमत, तीव्र सुगंध, भरपूर फेस असे सर्व काही त्यात होते. बहुतेक १९८३ साल असावे. हे झाले आणि मग मात्र वेगवेगळ्या सर्वच ब्रॅण्ड्सचे शाम्पू असे सॅशेमध्ये मिळू लागले, जास्त आवाक्यात आले. २-५ वर्षांतच ते स्नानाचा अविभाज्य भाग बनले. आज तर देशातील एकूण शाम्पूविक्रीपैकी ७५% विक्री फक्त 'सॅशे पॅक'ची असते.
माझ्या स्नानसोहळ्यातही शाम्पूचे कौतुक वाढतेच राहिले. साधारण १० वर्षांनी त्याचा धाकटा भाऊ 'कंडिशनर' बाजारात आला. कंडिशनरचा जन्म मात्र पुरुषांच्या गरजेपोटी झाला आहे, 'ब्रिलियंटाइन' ह्या दाढी-मिश्या चमकदार करणाऱ्या उत्पादनाचे दुसरे रूप म्हणजे कंडिशनर. काही ब्रॅंड्सनी आधी शाम्पूसोबत कंडिशनर मोफत वाटले आणि पुढे त्याची सवय कधी लागली ते समजलेच नाही.
* * *
१९९४पासून नोकरीधंद्याला सुरुवात झाली, शहर बदलले. सर्व साबण, शाम्पू स्वतःच्या आवडीचे घेता येऊ लागले. याच वेळी लिक्विड सोपचे पेव फुटले. एकापेक्षा एक सरस सुगंध असलेले हे द्रवरूपी नावीन्य, त्याचा फेसच फेस आणि त्यासाठी वेगळे 'लूफा' असा जामानिमा. एकदम राजेशाही. मुंबईतील अनेक छोट्या घरात राहिलो. इथे जागा कमी आणि बाथरूम तर मी जेमतेम उभा राहून ओला होऊ शकेन एवढीच जागा असलेले. बाहेर घाम आणि प्रदूषण भरपूर, त्यामुळे दिवसातून दोनदा स्नान हा शिरस्ता कायम राहिला, तरी स्नानसुखात व्यत्यय मात्र आला.
तोवर खास पुरुषांसाठी म्हणून साबण आणि स्नानप्रावरणे भारतीय बाजारात दिसू लागली होती, त्यांचा लाभ घेण्याएवढी ऐपत आली होती. 'एक्स्ट्राव्हॅगंटली मेल' अशी खास टॅग लाइन असलेला 'आरामस्क' साबण दिल्लीच्या दिवान वाधवा ग्रूपने आणला. तो आम्हा तरुण मुलांमध्ये फारच लोकप्रिय झाला. वेगळा, थोडा तीव्र सुवास आणि वेगळाच आकार, साबणाच्या वडीवर एक डौलदार A अक्षर कोरलेली पट्टी असे ते आकर्षक प्रॉडक्ट होते. नीश की काय म्हणतात तसे. तो अनेक वर्षे मी वापरला. पुढे क्रेझ ओसरली आणि तो ब्रँड विस्मृतीत गेला. एका मराठी मुलीने ब्रँड रिव्हायव्हल शीर्षकाखाली ह्या साबणावर शोधप्रबंध सादर केला, इतकी त्याची लोकप्रियता. जुन्या गाण्यांचे जसे रिमेक बाजारात येते, तसे काही खास ब्रॅंड्सचे व्हायला पाहिजे.
दिवाळीचा सण आणि 'मोती' साबणाने स्नान हे अद्वैत तर वर्षानुवर्षे उपभोगतोच आहे. तो सुवास आणि दिवाळी एकमेकांना पर्यायवाची जणू. मोती साबण आणि दिवाळी निदान महाराष्ट्रात तरी एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत.

पितृत्व लाभले, तेव्हा स्नानप्रेमामुळेच नवजात बाळाला आंघोळ घालायची जबाबदारी सहज स्वीकारली आणि पार पाडली. जसजसे वय वाढत गेले, तसतसे साबण आणि आइसक्रीमच्या जाहिराती सारख्याच होत गेल्या - मलाई, बदाम, फळांचे रस दोहोंत असल्याचे कानीकपाळी सांगण्यात येऊ लागले. साबणातून 'नैसर्गिक' सुगंध हळूहळू कमी होत गेला आणि साबण 'दिसायला' सुंदर होऊ लागले. आता 'खादी'सारखी दर्जेदार (आणि महाग) उत्पादने सोडली, तर 'खरे' सुवास दुष्प्राप्य झाले आहेत.

पुढे कामानिमित्त देशभर-जगभर प्रवास करता आला. आलिशान-गेलिशान सर्वच प्रकारच्या गेस्ट हाउस, लॉज, तारांकित-बिनतारांकित अशा हॉटेलातून राहण्याचे प्रसंग वाढले. जणू एक नवीन स्नान-दालन पुढ्यात आले. तेव्हा आणि आताही रूमचा ताबा मिळाला की सर्वात आधी तेथील बाथरूमचे निरीक्षण-परीक्षण करणे आणि तिथले शॉवर-तोट्या उघडबंद करण्याचे विशेष तंत्र समजून घेणे हे प्रचंड आवडीचे काम आहे. त्यामुळे नंतर होणारी फजिती होत नाही हा मोठा फायदा. त्यातही प्रचंड वैविध्य असते हे कळले. उंची हॉटेलातून स्नानागारांच्या रचनेवर भरपूर मेहनत घेतलेली दिसून येई, स्वच्छतेचा, सौंदर्याचा आणि स्नानानुभव समृद्ध करण्यासाठी लागणाऱ्या वातावरण निर्मितीवर भर दिलेला असे. स्नानाचा आनंद शतगुणित होत गेला.
वेगवेगळ्या शहरात मुक्कामात बाथ टब, बाथ सॉल्ट, बाथ बॉम्ब्स आणि बबल बाथ यासारखे नखरेल प्रकारही पुरेपूर अनुभवले. Wash away your troubles with some bubbles हे ध्येयवाक्य ठेवून स्टीम बाथ, सौना बाथ, व्हिटॅमिन फिल्टर लावलेले शॉवर, पाठीच्या कण्याला सुखद मसाज देणारे प्रेशर शॉवर, जाकुझी असे शरीराचे चोचले करण्यात मागे राहिलो नाही. अत्याधुनिक स्नानगृहांमुळे काहीदा फजितीही झाली. जपानी हॉटेल्समधली स्पेस कॅप्सुलसारखी अरुंद स्नानगृहे आणि माझे सहाफुटी धूड हे व्यस्त प्रमाण सहन न झाल्यामुळे त्यात असलेल्या असंख्य तोट्या-बटणे-रिमोट-अलार्म यांनी वात आणला होता. स्वीडन आणि जपान दोन्हीकडे पारंपरिक बाथहाउसचा अनुभव घ्यायला म्हणून गेलो असता तिथल्या 'दिगंबर ओन्ली' अटीमुळे काही क्षण अवघडलो होतोच.

सिंगापूरच्या मरीना बे सँडच्या सर्वोच्च मजल्यावर माझ्या छोट्या पिल्लाला सोबत घेऊन खिदळत केलेलं जाकुझी स्नान, गोव्यात थोड्या अप्रसिद्ध शांत समुद्रकिनाऱ्यावरचे रात्रीच्या चांदण्यातले स्नान, भोपाळला ३०० वर्षे जुन्या कादिमी हम्माम मध्ये केलेला नवाबी गुसल, धबधब्याखाली केलेली तुषारस्नाने, मे महिन्याच्या प्रचंड उकाड्यात पटियाला-अमृतसर मार्गावरील अनोळखी गावातल्या एक निर्जन ट्यूबवेलवर मनसोक्त केलेले स्नान, कडाक्याच्या थंडीत मित्रांच्या पैजेखातर तिस्ता नदीच्या उथळ पात्रात केलेले, ब्रह्मपुत्रेच्या घनगंभीर पाण्याकाठी घाबरत केलेले, सोरटी सोमनाथला समुद्राच्या प्रचंड खारट पाण्यात केलेले, उज्जयिनीत क्षिप्रा 'नदी' म्हटल्या जाणाऱ्या ओघळात जेमतेम पाय बुडवून केलेले, पुष्करच्या ब्रह्मसरोवरात भल्यापहाटे केलेले, मालदीवच्या रिसॉर्टमध्ये खाली काचेतून समुद्र आणि वर मोकळे आकाश दिसणाऱ्या राजेशाही स्नानागारात केलेले.. अशा एक ना अनेक स्नानस्मृती माझ्या मनाला आजही भिजवून काढतात. Life is a long bath, the more you stay, the more wrinkled you get हे पुरेपूर पटलंय.
स्नानमाहात्म्यात एक अध्याय टॉवेलचाही आहे. सुती पांढरा पंचा, मग थोडे बरके कोइम्बतूरच्या 'मोती' ब्रँडचे जाडसर टॉवेल, मग सुखसंवर्धक टर्किश टॉवेल, मग खास बांबूच्या/केळीच्या तंतूंपासून बनवलेले अतिमुलायम टॉवेल्स, जुन्या सिनेमातील व्हिलन मंडळी वापरीत तसले स्टायलिश बाथरोब असे सर्व चोचले पुरवायला मिळाले. तो प्रवासही आनंददायक ठरलाय.
* * *
सर्वच स्नानप्रवास आनंदी झाला असेही नाही. प्रयाग-वाराणसीला भेटी घडल्या, पण गंगास्नानाचे आलेले योग बरेचदा पाण्याच्या अस्वच्छतेमुळे नाकारले आहेत - डोक्यावर पाण्याचे शिंतोडे घेऊन प्रतीक-स्नान करून वेळ मारून नेली आहे. गंगेच्या कुशीत स्वच्छ नितळ पाण्यात स्नान करायला मिळाले, तोही प्रसंग अगदी कालच घडल्यासारखा वाटतो.
….. कुरु कृपया भवसागरपारम् ...... तीर्थपुरोहित जुळे भाऊ पंडित सुदीक्षित सुभिक्षित मंत्रपठण करीत आहेत. त्यांच्या कानात हिऱ्यांच्या कुड्या चमचमत आहेत. मावळतीचा सूर्य, नोव्हेंबर महिन्याची कडाक्याची थंडी आणि गंगेच्या स्वच्छ बर्फगार पाण्याचा तीव्र प्रवाह, त्यात भिजत उभा मी. मनाची भावविभोर अवस्था. त्यांचा आवाज टिपेला पोहोचतो ...
तव चेन्मातः स्रोतःस्नातः
पुनरपि जठरे सोऽपि न जातः
नरकनिवारिणि जाह्नवि गंगे
कलुषविनाशिनि महिमोत्तुङ्गे …..
सुदीक्षित मृदू आवाजात म्हणतात, "अनिंद्यजी, माताजी को अंतिम प्रणाम कीजिये, अस्थियों को अब गंगार्पण कीजिये..." आणि त्या एका क्षणातच आईचा हात नेहमीसाठी सुटल्याचे आलेले भान... हरिद्वारचे एकमेव गंगास्नानही कधीच न विसरता येण्यासारखे.
* * * समाप्त * * *
इतरत्र पूर्वप्रकाशित. काही चित्रे जालावरून साभार.
>>>>> मी औषधे घ्यायला मेडिकल
>>>>> मी औषधे घ्यायला मेडिकल शॉप मध्ये जाते तेव्हा मग स्वतः ला काही पण ट्रीट सुद्धा घेते.
सुंदर!!!
नवीन सभासद झालो आणि हा लेख
नवीन सभासद झालो आणि हा लेख वाचला. अप्रतिम लेख आणि प्रतिसाद.
आनिंद्य यांच्या लेखन शैलीची , आणि तपशीलवार मांडणी ची स्तुती करावी तेवढी थोडीच.....
माझी काही स्नान स्मरणरंजने इथे शेअर करत आहे.
खूप लहानपणी सुमारे चार पाच वर्षाचा असताना आजोळी भोरला राहत होतो. मोठे कुटुंब . मोठे घर. बाहेरील पडवीत एक ओटा .त्याच्या आडोशाला एक बंब त्याखाली पितळेची बादली व तांब्या. बसायला मोडका पाट. .लाईफ बॉय च्या एका साबणाचे चार तुकडे करून ठेवलेला एक चतुर्थांश तुकडा..... अर्धवट झोपेतल्या मला आजोबानी कडेवर घेऊन तेथे ठेवलेले.... झोपेतच हात वर करून बनियन काढायचा.... खाली चड्डी आपोआप गळून पडायची....
....बंबाच्या धुराने डोळे चुरचुरत
.... आणि आजोबा बादलीतले पाणी तांब्यात घेऊन तांब्या डायरेक्ट डोक्यावर पालथा करत.
"गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती....... नर्मदे सिंधू कावेरी "... आजोबांचा श्लोक सुरू. आणि डोक्यापासून पायापर्यंत पोहोचलेली तांब्यातून आलेली गरम पाण्याची धार व त्यापाठोपाठ लाईफ बॉय साबणाचा वास...
चार तांब्यात आंघोळ उरकून शंभोs म्हणत डोक्यावरून अंगभर पंचा गुंडाळून आमची रवानगी बाहेर.....
आता झोप पार उडून गेलेली..... थंडीने दात वाजतायत...अंग कुडकुडतय.....
धुतलेली कुर करीत चड्डी उडी मारून काठीने दोरीवरून पाडून हळूच पंचा सोडून कोणी बघत नाही ना हे बघत घाईघाईने घालायची....
दिवसाची सुरुवात ही अशी व्हायची..
अजून एक "शिक्षा अंघोळ" नावाचा प्रकार.....
आजोळच्या मोठ्या घरामध्ये मोठ्या कुटुंबात एक खोली बाजूला बसलेल्या बायकांची होती, लपाछपी खेळताना तिथे बसलेल्या मावशीच्या मांडीवर लपून बसलो, मावशीने मला ए "शिवू नको "म्हणून बाहेर ढकलून दिले, माझ्या रडा रडी ला न जुमानता मला ताबडतोब उचलण्यात आले, कपड्या सकट अंगावर गार पाण्याची बादली ओतण्यात आली,
त्यावेळेला अंगावर आलेला शहारा व मी पसरलेले भोकाड जन्मभर लक्षात आहे, एखाद्या गुन्हा केल्याची शिक्षा म्हणून अंघोळ का घालतात हे मला तेंव्हा आणि अजूनही कळले नाही. पण ती आठवण मेंदूत घट्ट रुतली आहे.
दुसरी अजून एक गोड आठवण आजोळी केलेल्या
आंबेन्हाणाची
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तांब्याच्या भांड्यात किंवा कळशी मध्ये आजी पाणी तापवायला घराच्या पत्र्यावर ठेवायची, दुपारी बारा एक पर्यंत पाणी कडक तापायचे, आम्ही पोरे सकाळपासून पारोशी.... घरात कैरीचे पन्हे करण्यासाठी कैऱ्या उकडलेल्या....
त्यातल्या एका कैरीची कोय काढून त्याचा गर सगळ्याच्या अंगाला फासण्यात यायचा आणि नंतर उघडे करून सर्वांच्या अंगावर ती कळशी उपडी करण्यात यायची ..त्या नंतर एका धडप्या ने खसा खसा अंग पुसण्यात यायचे... उकडलेल्या कैरीचा तो वास आणि ते वैशाखातल्या भर उन्हा तले सोलर स्नान....
भारीच...
ऐन थंडीत पहाटे उठून शिवरात्रीच्या दिवशी नीरा नदीमध्ये केलेले सचैल स्नान आणि त्यानंतर केलेले भोरेश्वराचे दर्शन...
अशी अनेक स्नान स्मरणे......
" एवढ्यात कसा बाहेर आलास? तोड तसेच पारोस
दिसतय....कावळ्याची अंघोळ केली. वाटत...गलिच्छ कुठला.."
"किती वेळ अंघोळ? बाहेर बाकीची आंघोळीला थांबलीत..
रेडा कितीही घासला तरी बैल होत नाही ...ये आता बाहेर"
"अरे मेल्या, आंघोळीला जा म्हणलं की गेला.... टॉवेल कोणी न्यायचा? "
अर्थात स्नान स्मरणामध्ये
आंघोळ आणि आई... म्हटलं की हे आलंच.
आता थांबतो ....डोळ्यातल्या पाण्यानी फेस वॉश सुरू होतोय...
.....
खूपच सुंदर लिहिलं आहे,
खूपच सुंदर लिहिलं आहे, Chhaburao. शिक्षा आंघोळ वाचून अंगावर काटा आला. आधी त्या बाईला शिक्षा आणि मग तिच्या मांडीवर खेळणार्या निष्पाप पोरांना शिक्षा.
बाय द वे, हे वाचताना तो बालभारतीतला एक धडा आठवला - माझे गाणे. तसा संदर्भ वेगळा आहे म्हणा. त्यात तो लेखक लहान असताना एक गाण्याचे मास्तर शिकवायला घरी येत. खर्ज स्वर लागावा म्हणून ते त्याच्या अंगावर भर थंडीत पहाटे गार पाण्याची बादली उलटी करत. त्याला मग पुढे हिवताप झाला वगैरे वर्णन होतं.
बापरे छबूराव, थंड पाण्याची
बापरे छबूराव, थंड पाण्याची अंघोळ भयंकर. वाचून कसंतरी वाटलं.हल्लीचा रिसर्च असा आहे की अति थंड पाणी आणि बाहेर थंड असल्यास अचानक अंगावर घेतल्यास हृदयविकार किंवा स्ट्रोक ची शक्यता असते.
कैरी वाल्या प्रकाराला झळकवणी म्हणतात.
@ छबूराव,
@ छबूराव,
अभिप्रायाबद्दल आणि तुमच्या आठवणी शेयर केल्याबद्दल आभार !
शिक्षा म्हणून अंघोळीचे वाईट वाटले कारण ऋतुमती आणि लहान मूल दोन्हींचा दोष नाही, शिक्षा कशाची आणि का ? Too bad !
....डोळ्यातल्या पाण्याबद्दल माफी द्या.
'कैरी स्नान' प्रथमच ऐकले.
'कैरी स्नान' प्रथमच ऐकले. त्याला 'झळकवणी' असा शब्द आहे हे सुद्धा नवीन कळले.
त्याचा काही विशिष्ट फायदा असतो का ?
तसं केल्यामुळे घामोळ्यांचा
तसं केल्यामुळे घामोळ्यांचा त्रास कमी होतो उन्हाळ्यात अशी समजूत आहे.
अच्छा. मला 'झळकवणी' वरून
अच्छा. मला 'झळकवणी' वरून काहीतरी झळाळी - skin glow वगैरे होत असेल असे वाटले
>>>>>>>आमचं लहानपण सनसिल्क
>>>>>>>आमचं लहानपण सनसिल्क शाम्पूतच गेलं. त्याचे सॅशेतले केशरी, गुलाबी, काळा असे रंग अजून आठवतात.
) वड्याच बर्या वाटतात. स्ट्राँग असतात.
आमच्याकडे क्वचितच सॅशे असायचा. त्याअगोदर तर साबणच किंवा शिकेकाई लावायचे केसांना. एन्गेजमेन्ट नंतर नवरा साबांना नवलाने म्हणालेला "आई ही साबण लावते केसांना" तेव्हा लक्षात आलेले की आमच्या दोघांच्या आर्थिक परिस्थितीत तफावत आहे. नंतर ते लक्षात आलेच नीट.
.
आमच्याकडे डबाभरुन साबण असत. वेगवेगळ्या वासांचे. आंघोळीचा साबण संपला की नवीन साबण निवडायचं काम मला दिलेले होते. किती आवडायचं ते काम. हा साबण हुंग, त्याचा वास घे. शेवटी एक फायनलाइझ करा.
.
आजही नवा साबण काढला की मी नवर्याकरता ठेवते. स्वतः बटण झालेल्या जुन्या साबणाने आंघोळ करते. मग त्याला सांगते आज नवा व्हर्जिन साबण काढलाय रे , उद्घाटन कर
.
मुलीला लिक्विड सोप्स आवडतात. मला श्रमजिवी असल्याने (इथे घामट प्रकृती असल्याने असे वाचावे
अगदी बरोबर, सामो.
माझ्याही मुलीला ते लिक्विड सोप आवडतात..पण मला खसखस घासून, फेस करून लावल्याशिवाय आंघोळीचा फील येतच नाही!!
शिवाय ते लिक्विड सोप लवकर निघत नाही..बराच वेळ पाण्याने धूत बसावे लागते..ते वेगळेच !
Virgin साबण माझाही वीक पॉइंट
Virgin साबण माझाही वीक पॉइंट आहे. तो दिवसच छान जातो समहाऊ
अन्यत्र तुम्ही सुचवलेली अरोमा बुफेची कल्पना मी ताबडतोब अमलात आणली आहे. जय हो.
अरोमा बुफे म्हणजे काय?
अरोमा बुफे म्हणजे काय?
ती सामोंची कसेप्ट आहे, त्याच
ती सामोंची कसेप्ट आहे, त्याच सांगतील
आंबट गोड, साबणांची रेलचेल.
आंबट गोड, साबणांची रेलचेल. विविध सुवासिक साबण स्नानगॄहात उघडून ठेवलेठेवलेले, कोणताही, कितीही साबण वापरा. एकच साबण नाही , बरेच.

@अनिंद्य - किती छान
वॉव...:-) किती मस्त कल्पना
वॉव...
किती मस्त कल्पना आहे!

मी पण करणार.
स्वतः ला तेव्हढीच रॉयल ट्रीटमेन्ट !
अजून जरा विचार करायचा तर...सात-आठ साबण रचून ठेवायला स्टीलच्या आकर्षक, चमचमत्या सोप केसेस भिंतीवर लावून घ्यायला पाहिजेत.. छान गोलाकार रचने मध्ये. ..
आणि साबण सगळे व्हर्जिन हवेत.
मंद संगीत हवे, मागे घड्याळाचा तगादा नको, भरपूर पाणी हवे आणि अजून किती वेळ आहे? झोपली आहेस का आतमधे? असे कुणी विचारणारे नको. ..
>>>>>>>>आणि साबण सगळे
>>>>>>>>आणि साबण सगळे व्हर्जिन हवेत.
हाहाहा
साबण मिळतील हो, व्हर्जिनही
साबण मिळतील हो, व्हर्जिनही मिळतील पण .....
पण ...
मंद संगीत हवे, मागे घड्याळाचा तगादा नको, भरपूर पाणी हवे आणि अजून किती वेळ आहे? झोपली/ला आहेस का आतमधे? असे कुणी विचारणारे नको. .....
हे सर्व जुळून येणे सोपे नाही
सोप 'केसेस' म्हटलं की तो
सोप 'केसेस' म्हटलं की तो चहूबाजूंनी केसांनी लथपथ सोप डोळ्यासमोर येतो. अगागागा!
साबणावर केस ? यक्क वाटते ते !
साबणावर केस ? यक्क वाटते ते ! म्हणून दुसरा वापरत असलेला नाही कधी वापरत.
जिथे डाउट असेल तिथे/ हायजीनच्या दृष्टीने लिक्विड सोप जास्त योग्य वाटतो.
हो.
हो.
एक चांगले बाथरूम कलेक्षन
एक चांगले बाथरूम कलेक्षन म्हण्जे:
१) एक किंवा दोन चांगले लुफ्फे. ते अंग घासायचे प्लास्टिक आयकियाचे किंवा नैसर्गिक एक सुकी काकडीटाइप असते त्याचे
२) एक चांगला मोठा क्रिस्टल बोल. त्यात ते सर्व साबण वडी. फक्त एकच की सर्व एकदम उघडले तर त्यांचे वास कालांतराने उडून जातील. डव्ह सोप चंदन फ्लोरल. लक्षरी सोप्स जसे कॅमे,
३) दोन किंवा तीन चांगल्या शांपू. एक हेअर फॉल, एक डव्ह, एक काहीतरी फॅन्सी
४) दोन कंडिशनर , हेअर स्पा
५) बॉडी वॉश आव्डी नुसार दोन तीन. एक पीअर्स टाइप एक ग्रीन नोटस एक कलोन टाइप. एक लवेंडर नोट
चांगले मोठे दोन टर्किश टावेल. स्वच्छ धुतलेले दोन हँड टावेल. एक धुतलेले केस पुसाय चा टावेल.
६) चांगला बाथ गाउन. व स्लिपर्स.
७) बाहेर आल्यावर चांगल्या टाल्कम पाव डरीचे डब्बे. ड्रीम फ्लाव र, लवेंडर, बॉडी लोशन. सन स्क्रीन.
आधी फेस मास्क, बॉ डी पॅक्स, हेअर डाय, ब्लीच, मसाज चे तेल. फेशिअल किट.
पहिले कढत तापलेल्या पाण्याचा
पहिले कढत तापलेल्या पाण्याचा शॉवर घ्यायचा व जाताना एकदम एक गारे गार ब्लास्ट.
जाताना एकदम एक गारे गार
जाताना एकदम एक गारे गार ब्लास्ट.
+१
हे योग्य आहे, एकदम सुपर फ्रेश वाटते. सेलिब्रिटी अमिताभ बच्चन सांगतात हा फ़ॉर्मूला. अमा पण सेलिब्रिटीच आहेत म्हणा
प्रतिसादांमधे दगडासारखा
प्रतिसादांमधे दगडासारखा लाइफ़बॉय असे अनेकांनी लिहिलेय, आज हे बघितले तर …..
https://www.facebook.com/reel/796086265631202?fs=e&s=TIeQ9V&mibextid=0NULKw
बात है बॉस
>>>>>चांगले मोठे दोन टर्किश
>>>>>चांगले मोठे दोन टर्किश टावेल. स्वच्छ धुतलेले दोन हँड टावेल.
नवे कोरे करकरीत सूत वाले द बेटर.
>>>>>>लवेंडर, बॉडी लोशन
होय लॅव्हेंडरला पर्याय नाही
सध्या मोरोक्कन रोझ लिक्विड सोप वापरते आहे. काय सुंदर वास आहे.
सामो, Tree hut ब्रँड का? फोटो
सामो, Tree hut ब्रँड का? फोटो किंवा पूर्ण नावं इथे डकवशील प्लीज?
अगदी अगदी ट्रीहट!!! बरोब्बर
अगदी अगदी ट्रीहट!!! बरोब्बर रमड.
https://www.amazon.com/Tree-Hut-Nourishing-Moisturizing-Hydrating/dp/B0C...
धन्यवाद. आणते लगेच. Rose
धन्यवाद. आणते लगेच. Rose fragrance मला तुफान आवडतो. अपवाद भारतात मिळणाऱ्या गुलाब अत्तराचा
इथे मी गुलाबाची डॅब ऑन / रोलर
इथे मी गुलाबाची डॅब ऑन / रोलर काडी घेतली होती. मलाही नाही आवडली. मिठाईचा वास वाटला.
वर काहींनी “अनुवेद” ब्राण्ड
वर काहींनी “अनुवेद” ब्राण्ड साबणाबद्दल लिहिले होते, आज एका दुकानात त्यांचे बरेच प्रकार मांडून ठेवलेले बघितले.
“पहाड़ी गुलाब” घेतला असता ऑलमोस्ट पण सुवास जास्त उग्र वाटल्याने नाही घेतला.
Pages