थंडीच्या आठवणी

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 January, 2022 - 15:22

गेले दोनेक दिवस आमच्या मुंबईत अगदी गबरू थंडी पडली आहे. म्हणजे दुपारच्या भरगच्च उन्हातही बोचरे गारे वारे अंगापिंडाला टोचत आहेत.

या रविवारी सुट्टीच्या दिवशी भल्या पहाटे ऊठून सहपरीवार सहकुटुंब मॉर्निंग वॉकला गेलो. कपडे तेच आपले हलकेफुलके आणि स्टायलिश. कारण स्वेटर वा तत्सम जाडजूड कपडे मुंबईत कसली डोंबलाची थंडी म्हणत केव्हाच लाईफस्टाईलमधून हद्दपार झाले आहेत. त्यामुळे बाहेर पडल्यावर जेव्हा गारठलो तेव्हा मॉर्निंग वॉक एका जागीच दाटीवाटीने बसून साजरा होऊ लागला. बागेत गेल्यावर मास्क काढावा हा शिरस्ता पाळत सर्वांनी तो काढला, पण खिश्यात न टाकता कानावर चढवला. आणि त्या जागी हात खिश्यात टाकले. पण तरीही नारियलपाणीवाला दिसताच सवयीने ते प्राशन करायला खिश्यातले हात बाहेर आले. पोरं सोबत असल्याने घरी परतताना आईसक्रीमचाही एक राऊंड झाला. त्यानंतर मग व्हायचे तेच झाले...

सकाळी कानातून चोरमार्गाने शिरलेली थंडी रात्र होता होता नाकातून बाहेर पडू लागली. म्हणून सोमवारी कसलाही आगाऊपणा न करता खास थंडीचा लुत्फ उचलायला म्हणून सुट्टी टाकली. पण सकाळचा गरमागरम पोहे मिसळीचा नाश्ता झाल्यावर पुढे काय करायचा हा प्रश्न पडला. पावसाळ्यात चहा - कांदाभजी - चहा - समोसे - चहा - बटाटाभजी - चहा थालीपीठ - चहा यांव आणि त्यांव असे राऊंड घेता येतात. पण थंडीचे सुट्टी टाकून करतात काय हा प्रश्नच पडला. मग दुपारी मस्तपैकी दारे खिडक्या पडदे फॅन लाईट वगैरे सारे काही बंद करून मस्त चादर ओढून ताणून दिली.

थोडावेळ छान झोप लागली. पण त्यानंतर चादरीतही थंडी शिरू लागली. मग पाय जवळ ओढून घेतले. चादर गच्च लपेटून घेतली. पण तरीही जेव्हा असह्य झाले तेव्हा ताडकन ऊठलो आणि पाहतो तर काय... पोराने सवयीने एसी चालू करून ठेवलेला. आता त्याला बिचार्‍यालाही थंडी हा सीजन नवीनच. त्याचा तरी काय दोष. तरीही आलेला राग शांत करायला चार वर्षाच्या पोराला जितके बदडणे अलाऊड असते तितके त्याला बुकलून काढले. त्याने तो गरम झाला. पण माझी थंडी मात्र रात्र होत आली तरी जायचे नाव घेत नव्हती. उलट रात्री पुन्हा गारठू लागलो तसे मग वेळ घालवायला भूतकाळातल्या थंडीच्याच आठवणी काढून गरम होऊया म्हटले. यही मौका है, यही दस्तूर है, और बंबई की थंडी है भाई.. क्या पता, कल हो ना हो Happy

तर थंडी म्हटले की मला सर्वात पहिले माझगावच्या आमच्या चाळीतील दादरावर पेटवली जाणारी शेकोटी आठवते. आहाहा, छोटीशी होळीच म्हणा ना.. ते कॅम्पफायर वगैरे ईंग्लिश शब्द मला फार उशीरा कळले. जेव्हा कळले तेव्हाही डोक्यात हेच पहिला आले, अरे ही तर आमची शेकोटी Happy

म्हणजे नारळाच्या सुक्या करवंट्या, ज्या तेव्हा चाळीतील दर दुसर्‍या घरात सापडायच्या. अगदी आमच्या दारातही एक ड्रम भरून असायच्या. सोबत जमेल तसा लाकूडफाटा, जसे की आब्याच्या पेट्यांची फळकुटे वगैरे,. एक मोठठाला परातीईतका तवा, त्यात हा सारा लाकडी ऐवज जमा करायचा. आणि रॉकेल टाकून पेटवून द्यायचा. तेव्हा स्टोव्हच्या जमान्यात रॉकेलही प्रत्येक घरात सापडायचे. फार नाही, कपभर पुरायचे. दररोज हा कप आळीपाळीने एकेका घरातून यायचा. जेवणखान झाले की साधारण दहा-साडेदहाला शेकोटी पेटायची ते रात्री एकदिडलाच विझायची. तोपर्यंत आमच्यासारखे रातकिडे अखेरपर्यंत तिला सोबत द्यायचे. कधी मूड आला तर गाणीही व्हायची. पण खरी धम्माल शेकोटीवरील गप्पांची. आणि चाळीसारख्या जागी गप्पांच्या विषयाला कमी कधीच नसायची.

याच थंडीच्या सीजनमध्ये मग नाताळही यायचा. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत सांताक्लोजला जाळून करायची पद्धत होती आमच्यात. पाशवी प्रथाच म्हणा ना. अगदी साग्रसंगीत फटाक्यांसह हा जाळण्याचा कार्यक्रम पार पडायचा. ती सुद्धा एक शेकोटीच म्हणू शकतो. पण जाळण्याआधी ती बुजगावणी ख्रिसमसपासून बिल्डींगच्या कॉमन गॅलर्‍यांना लटकावलेली असायची. थोडीथोडकी नाही तर तब्बल दहाबारा बुजगावणी बनायची. ते बनवायला लागणारे सुके गवत तेव्हा भायखळा भाजीमार्केटमध्ये मुबलक आणि फुकटात मिळायचे. रस्त्यात पडलेले असायचे. गोणी गोणी भरून आणायचो. बरेचदा शेकोटीत त्यातलेच गवत जाळले जायचे. असा हा शेकोटी, नाताळ, थंडीचा सण जवळपास किमान महिनाभर तरी साजरा व्हायचा. आजच्या मुंबईत राहणार्‍या पिढीचा यावर विश्वास बसणे अवघडच.

मग मोठे होता होता ती थंडी हरवलीच. नाही म्हणायला कधीतरी जगाच्या पाठीवर बर्फ पडला तर वाहत्या वार्‍यांसोबत एखादी थंडीची लाट मुंबईत अवतरते. तेवढ्या काळात आम्ही मुंबईकर रजनीकांतचा फ्रिज उघडा राहिलाय वगैरे पांचट जोक मारून घेतो. झाल्यास पुण्याच्या गुलाबी थंडीचीही खिल्ली उडवायचा प्रोग्राम पार पडतो. पण बालपणीच्या थंडीच्या आता आठवणीच उरल्या आहेत. तुमच्याही असतील तर उगाळा याच धाग्यावर. तेवढेच त्या आठवणींच्या शेकोटीची ऊब.. Happy

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आला आला सरांचा हुकमी शतकी धागा आला

आम्हा भक्तांना काळजी लागून राहिली होती म्हणलं सर काय नाराज झाले का काय

पण आता लायनीवर आलेले पाहून हायसे वाटलं

सर्वांनी गडबड गोंधळ न करता रांगेने यावे, लहान मुलांचा हात सोडू नये, खिसेकापुपासून सावध राहावे आणि होय मास्क घातल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही (शास्त्र असतं ते Happy )

सांताक्लोजला जाळून>> ?????????????!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! >> एक ‘बुढ्ढा’ नावाचा प्रकार असायचा पूर्वी.. माझ्या बऱयाच शाळेतल्या मैत्रिणी ख्रिश्चन होत्या.. आम्ही सगळे मिळून त्यांच्याकडे असा गवताचा पुतळा बनवायचो, त्याला शर्ट पॅंट टोपी घालून सजवायचो , एखाद्या झाडावर किंवा खुर्चीवर बसवायचो आणि ३१ डिसेंबरला जाळायचो.. मला वाटायचं हे त्यांच्यात होत असावं पण नंतर कळालं मुंबईत सगळीकडे केलं जातं.. त्यामागचे कारण अजूनही माहित नाही.. पण मजा यायची

मला थंडी म्हटलं की गावची आठवण येते.. रात्री अंगणात तीन गोधड्या घेऊन झोपायचं.. सकाळी कोंबडा आरवला आणि आतून कोणी दार उघडलं की धावत सगळ्यात आतली गोधडी घेऊन स्वयपाक घरातल्या चूली समार जाऊन बसायचं.. मग तास भर हात पाय शेकायचे.. एका तूली वर चहा आणि दुसरीवर कायम आंघोळीचं पाणी तापत असायचं.. धूरामुळे त्या गरम पाण्यालाही वेगळाच वास यायचा.. मनसोक्त शेकून झाल्यावर तीच गोधडी घेऊन आत कुठेतरी जागा शोधून पुन्हा एक झोप काढायची

>>त्यामागचे कारण अजूनही माहित नाही..<<
जुन्या वर्षाचं एक प्रतिक म्हणुन "बुढ्ढ्या"ला जाळतात.

ऋन्म्या, सांताक्लॉजला जाळायचास हे वाचुन मी इथे खुर्चीवरुन खाली पडलो... Lol

हो, काही ठिकाणचे त्या बुजगावण्याला बुढ्ढा असेही म्हणायचे आणि खिश्यात दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे वगैरे ठेवायचे. म्हणजे तो एक व्यसनी बुड्ढा असायचा. वाईट सवयींना आणि दुर्गुणांना जाळले जायचे.
तसेच जुन्या वर्षाचे प्रतीक म्हणून जाळा असेही असू शकते. काही ठिकाणी त्यावर नेत्यांची नावेही लिहीली जायचे तर कुठे भ्रष्टाचार, महागाई वगैरे पाट्या लावल्या जायच्या.

पण आमच्याकडे त्याला सांताक्लॉजच म्हटले जायचे. त्याच्या डोक्याला सांताक्लोजचाच मास्क घातला जायचा. गंमत म्हणजे लहान मुले त्याला जिंगलबेलसुद्धा म्हणायचे. आणि जाळताना जिंगलबेल जिंगलबेल गाणे बोलायचे. एवढेच दोन शब्द सुरात बोलायचे. पुढचे ईंग्लिश गाणे कोणाला यायचे नाही. मग मोठी मुले त्यांना सांगायचे जिंगलबेल नाही रे येड्या याला सांताक्लॉज म्हणतात.

आता त्या गिफ्ट देणाऱ्या भला माणूस सांताक्लोजला जाळतात का वगैरे तर्कपुर्ण प्रश्न त्यावेळी आम्हाला त्या बाळबोध वयात पडायचे नाहीत. उलट हा सांताक्लोज जसे गिफ्ट वाटप करून आनंद देतो तसेच जळूनही आनंद देतो एवढा सिंपल विचार आम्ही करायचो Happy
(मला तर आताही सांताक्लोजला जाळतो हे लिहिताना काहीही वेगळं/वावगं/गमतीशीर वगैरे वाटले नाही)

असो, त्याला बनवतानाच त्यात फटाकेही ठासून भरलेले असायचे. त्यामुळे जळताना अध्येमध्ये ते फुटून आनंद द्विगुणित करायचे.
फटाक्यांनी प्रदूषण व्हायचे वगैरे कन्सेप्टच नव्हते तेव्हा. त्यासाठी फक्त त्या नागाच्या गोळीला जबाबदार धरले जायचे.

तर असे हे बुड्ढे पळवापळवीही फार चालायची. ३०-३१ तारखेला आमची पोरे सुनसान दुपारी वा रात्री माझगावभर फिरायची आणि कुठेकुठे लटकवलेले सांताक्लोज/बुढ्ढे चोरून आणायचे. सहा सात आम्ही बनवायचो, तीनचार चोरलेले असायचे. ठिक बाराला त्यांना जाळायला सुरुवात व्हायची ते एकपर्यंत हा कार्यक्रम चालायचा. हिच आमची न्यूयर पार्टी असायची. ईतर जनता जेव्हा टीव्हीवरचे नवीन वर्षांचे कार्यक्रम बघण्यात व्यस्त असायची तेव्हा माझगावभर नाक्यानाक्यावर हाच कार्यक्रम बघायला मिळायचा.

जाळायचा कार्यक्रम बाराचा असला तरी अकरा साडेअकरावाजल्यापासून त्या बुजगावण्यांना हातगाडीवर टाकून माझगावभर त्यांची वरात काढली जायची. जणू काही ईंडियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतरची मिरवणूकच. थंडीच्या त्या रात्रीत सन्नाट्याला फाट्यावर मारून ती बुजगावणी घेऊन मोठमोठ्याने ओरडत किंचाळत नाचत गात फटाके वाजवत पुर्ण एरीयाभर फिरा. एकेक अशक्य धमाल प्रथा होत्या Happy

सांताला जाळणे हे पहिल्यांदाच ऐकले Happy

शेकोट्या भरपूर केल्या आहेत लहानपणी. आजूबाजूला झाडी भरपूर असल्याने काटक्या, फांद्या, कोणाच्या घरातील जुन्या सामानातील लाकडे, टायर्स, पेपर्स काय वाट्टेल ते घेउन ती पेटवली जायची. मग रस्त्यावरच त्याच्या बाजूला चपला खाली ठेवून त्यावर बसत गप्पा चालायच्या. मग जाळ संपत आला की कोणावरतरी जबाबदारी यायची जाळायला काहीतरी शोधायची. सहज काही मिळाले नाही तर घरांच्या छपरांवर चढून कोणाच्या घरावर जुने सामान असे त्यात लाकडी काही सापडते ते का ते पाहून ते लंपास करून आणायचे. टायर्सचा भयानक घाण वास सुटत असल्याने शक्यतो टाळत.

पुण्यात तेव्हा दिवाळी ते होळी जबरी थंडी असे. आमच्या बैठ्या चाळींची सगळी घरे पुढचे व मागचे दार समोरासमोर, घरांच्या रांगांमधे प्रशस्त जागा, मागे टेकडी आणि भरपूर झाडी असे असल्याने तुफान थंडी असे. रात्री चार चार पांघरुणे, रग्ज, ब्लँकेट वगैरे अगदी डोक्यावरून घेउन झोपल्याचे आठवते. पण अगदी ३-४ डिग्री तापमानात सुद्धा टेकडीवर फिरायला पहाटे गेल्यावर इतके प्रसन्न वाटते. बहुधा थंडीला सरावल्याने असेल. पुण्यात एनीवे तेव्हा भर मे मधे सुद्धा सकाळी आल्हाददायक वगैरे म्हणतात तसा गारवा असे.

टायर्सचा भयानक घाण वास सुटत असल्याने शक्यतो टाळत.
>>>>
सुरुवातीला टायर वाचून हेच डोक्यात आले. टायर कसे? आमच्याकडे कोणीतरी किडे करायला वा शेकोटी पांगवायला टायर टाकायचे.. आणि मग जाम शिव्या खायचे.

आमच्या बिल्डींग शेजारी एक फॅक्टरी होती. त्यांच्या गच्चीवर बरेच भंगार पडलेले असायचे. आमचा क्रिकेटचा बॉल तिथे गेला की पोरे चढायची आणि भंगार ऊचलून आणायचे. लोखंड भंगारवाल्याकडे विकून बॉल यायचा आणि लाकूड शेकोटीत जायचे.

सवयीने एसी चालू करून ठेवलेला >>> काय हे सर? कळवलं नाहीत ना? किमान एसी कोणता घ्यावा हा धागा विणला असता तर कळले असते. ही पहिलीच खरेदी असेल जी माबोला आणि पर्यायाने आम्हा भक्तांना माहिती नसेल. धक्क्यातून सावरुन अभिनंदन! डिटेल्स कळवा. बाकी नंतर... धक्का ओसरला की.

गुलाबी थंडीत हीटर लागतो. पण भारतीय फारच अनरोमॅंटिक असतात असे म्हणतात.
(थंडीचा रंग गुलाबी असतो का ही शंका सर इथे उपस्थित करतील. त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा.)

पण आमच्याकडे त्याला सांताक्लॉजच म्हटले जायचे. त्याच्या डोक्याला सांताक्लोजचाच मास्क घातला जायचा????

डोक्याला सांताक्लॉजचा मास्क??
हे काय नवीन

आमच्या बैठ्या चाळींची सगळी घरे पुढचे व मागचे दार समोरासमोर, घरांच्या रांगांमधे प्रशस्त जागा, मागे टेकडी आणि भरपूर झाडी >> पर्वती / सहकारनगर?

सरच नव्हे तर सरांच्या इथे येणारे सांताक्लॉज पण किती द्रष्टे होते बघा
तेव्हापासून ते डोक्याला मास्क घालत होते

नैतर आमच्या इथले गरीब शांताराम, गोंडयाची टोपी घालून फिरायला यायचे, बावळट कुठले

सरांच्या बालपणीच्या रम्य आठवणी वाचून तर गहिवरून येते

डोक्याला सांताक्लॉजचा मास्क??
>>>
त्या बुजगावण्याला हे असले मास्क घातले जायचे.
त्याखाली कापसाची दाढीही बनवून लावायचे.
अर्थात जी बुजगावणी दर्शनी भागात टांगली जायची त्यावरच सजावटीचा खर्चा केला जायचा. बाकी नुसते जाळायचे असायचे ते असेच शाळेच्या माळ्यावर पडून असायचे.

IMG_20220111_122608.jpg

घ्या याला म्हणतात हाताच्या बांगडीला आरसा

सरांनी लगेच फोटो काढून आपल्या टिकाकरांची तोंडे बंद केली आहेत

सर तुम्हांला कसं जमतं हो हे न चिडता (हे लिहावं लागतं सरांच्या बाबत) संयमित प्रतिसाद द्यायला?

३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत सांताक्लोजला जाळून करायची पद्धत होती आमच्यात. >>> Lol

अर्ध आयुष्य मुंबईत गेलं पण हा प्रकार नाहि केला/पाहिला.. बहुतेक मी दुसर्‍या मिती मधली असावी..

काय हे सर? कळवलं नाहीत ना? किमान एसी कोणता घ्यावा हा धागा विणला असता तर कळले असते. ही पहिलीच खरेदी असेल जी माबोला आणि पर्यायाने आम्हा भक्तांना माहिती नसेल. धक्क्यातून सावरुन अभिनंदन! डिटेल्स कळवा. बाकी नंतर... धक्का ओसरला की.------ अरे तुला ए सी नाही परवडणार तु कपडे काढून बस गरम झाल्यावर
आनि हो अंगाला अंगाला शेंणाचा पो चोळ काय आहे गटाराच्या कडेला मच्छःर असतात

सरांनी स्ट्रेनजर ला काढून टाकला वाटलं अवतार यादीतून

तो भारी मनोरंजन करायचा, फार मिस करतोय त्याला

हा नवा अवतार पण छान आहे Happy

आता भक्तीचा इतका ओव्हरडोस झालाय की सर रुंडमाळा घालून कोकणी देवचाराच्या रुपात आले तरी ते छानच वाटतील Happy

कमेंट वाचण्यासाठी आलेल्या भाविकांची सोय मंडपाच्या डाव्या बाजूला करण्यात आली आहे याची सर्वानी नोंद घ्यायची आहे.

सर दुसऱ्या अवतारात
प्रकट होऊन परीक्षा घेऊन राहिले भक्तांची. शिव्या खाऊन जो टीकेल तोच खरा भक्त.

Pages