थंडीच्या आठवणी

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 January, 2022 - 15:22

गेले दोनेक दिवस आमच्या मुंबईत अगदी गबरू थंडी पडली आहे. म्हणजे दुपारच्या भरगच्च उन्हातही बोचरे गारे वारे अंगापिंडाला टोचत आहेत.

या रविवारी सुट्टीच्या दिवशी भल्या पहाटे ऊठून सहपरीवार सहकुटुंब मॉर्निंग वॉकला गेलो. कपडे तेच आपले हलकेफुलके आणि स्टायलिश. कारण स्वेटर वा तत्सम जाडजूड कपडे मुंबईत कसली डोंबलाची थंडी म्हणत केव्हाच लाईफस्टाईलमधून हद्दपार झाले आहेत. त्यामुळे बाहेर पडल्यावर जेव्हा गारठलो तेव्हा मॉर्निंग वॉक एका जागीच दाटीवाटीने बसून साजरा होऊ लागला. बागेत गेल्यावर मास्क काढावा हा शिरस्ता पाळत सर्वांनी तो काढला, पण खिश्यात न टाकता कानावर चढवला. आणि त्या जागी हात खिश्यात टाकले. पण तरीही नारियलपाणीवाला दिसताच सवयीने ते प्राशन करायला खिश्यातले हात बाहेर आले. पोरं सोबत असल्याने घरी परतताना आईसक्रीमचाही एक राऊंड झाला. त्यानंतर मग व्हायचे तेच झाले...

सकाळी कानातून चोरमार्गाने शिरलेली थंडी रात्र होता होता नाकातून बाहेर पडू लागली. म्हणून सोमवारी कसलाही आगाऊपणा न करता खास थंडीचा लुत्फ उचलायला म्हणून सुट्टी टाकली. पण सकाळचा गरमागरम पोहे मिसळीचा नाश्ता झाल्यावर पुढे काय करायचा हा प्रश्न पडला. पावसाळ्यात चहा - कांदाभजी - चहा - समोसे - चहा - बटाटाभजी - चहा थालीपीठ - चहा यांव आणि त्यांव असे राऊंड घेता येतात. पण थंडीचे सुट्टी टाकून करतात काय हा प्रश्नच पडला. मग दुपारी मस्तपैकी दारे खिडक्या पडदे फॅन लाईट वगैरे सारे काही बंद करून मस्त चादर ओढून ताणून दिली.

थोडावेळ छान झोप लागली. पण त्यानंतर चादरीतही थंडी शिरू लागली. मग पाय जवळ ओढून घेतले. चादर गच्च लपेटून घेतली. पण तरीही जेव्हा असह्य झाले तेव्हा ताडकन ऊठलो आणि पाहतो तर काय... पोराने सवयीने एसी चालू करून ठेवलेला. आता त्याला बिचार्‍यालाही थंडी हा सीजन नवीनच. त्याचा तरी काय दोष. तरीही आलेला राग शांत करायला चार वर्षाच्या पोराला जितके बदडणे अलाऊड असते तितके त्याला बुकलून काढले. त्याने तो गरम झाला. पण माझी थंडी मात्र रात्र होत आली तरी जायचे नाव घेत नव्हती. उलट रात्री पुन्हा गारठू लागलो तसे मग वेळ घालवायला भूतकाळातल्या थंडीच्याच आठवणी काढून गरम होऊया म्हटले. यही मौका है, यही दस्तूर है, और बंबई की थंडी है भाई.. क्या पता, कल हो ना हो Happy

तर थंडी म्हटले की मला सर्वात पहिले माझगावच्या आमच्या चाळीतील दादरावर पेटवली जाणारी शेकोटी आठवते. आहाहा, छोटीशी होळीच म्हणा ना.. ते कॅम्पफायर वगैरे ईंग्लिश शब्द मला फार उशीरा कळले. जेव्हा कळले तेव्हाही डोक्यात हेच पहिला आले, अरे ही तर आमची शेकोटी Happy

म्हणजे नारळाच्या सुक्या करवंट्या, ज्या तेव्हा चाळीतील दर दुसर्‍या घरात सापडायच्या. अगदी आमच्या दारातही एक ड्रम भरून असायच्या. सोबत जमेल तसा लाकूडफाटा, जसे की आब्याच्या पेट्यांची फळकुटे वगैरे,. एक मोठठाला परातीईतका तवा, त्यात हा सारा लाकडी ऐवज जमा करायचा. आणि रॉकेल टाकून पेटवून द्यायचा. तेव्हा स्टोव्हच्या जमान्यात रॉकेलही प्रत्येक घरात सापडायचे. फार नाही, कपभर पुरायचे. दररोज हा कप आळीपाळीने एकेका घरातून यायचा. जेवणखान झाले की साधारण दहा-साडेदहाला शेकोटी पेटायची ते रात्री एकदिडलाच विझायची. तोपर्यंत आमच्यासारखे रातकिडे अखेरपर्यंत तिला सोबत द्यायचे. कधी मूड आला तर गाणीही व्हायची. पण खरी धम्माल शेकोटीवरील गप्पांची. आणि चाळीसारख्या जागी गप्पांच्या विषयाला कमी कधीच नसायची.

याच थंडीच्या सीजनमध्ये मग नाताळही यायचा. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत सांताक्लोजला जाळून करायची पद्धत होती आमच्यात. पाशवी प्रथाच म्हणा ना. अगदी साग्रसंगीत फटाक्यांसह हा जाळण्याचा कार्यक्रम पार पडायचा. ती सुद्धा एक शेकोटीच म्हणू शकतो. पण जाळण्याआधी ती बुजगावणी ख्रिसमसपासून बिल्डींगच्या कॉमन गॅलर्‍यांना लटकावलेली असायची. थोडीथोडकी नाही तर तब्बल दहाबारा बुजगावणी बनायची. ते बनवायला लागणारे सुके गवत तेव्हा भायखळा भाजीमार्केटमध्ये मुबलक आणि फुकटात मिळायचे. रस्त्यात पडलेले असायचे. गोणी गोणी भरून आणायचो. बरेचदा शेकोटीत त्यातलेच गवत जाळले जायचे. असा हा शेकोटी, नाताळ, थंडीचा सण जवळपास किमान महिनाभर तरी साजरा व्हायचा. आजच्या मुंबईत राहणार्‍या पिढीचा यावर विश्वास बसणे अवघडच.

मग मोठे होता होता ती थंडी हरवलीच. नाही म्हणायला कधीतरी जगाच्या पाठीवर बर्फ पडला तर वाहत्या वार्‍यांसोबत एखादी थंडीची लाट मुंबईत अवतरते. तेवढ्या काळात आम्ही मुंबईकर रजनीकांतचा फ्रिज उघडा राहिलाय वगैरे पांचट जोक मारून घेतो. झाल्यास पुण्याच्या गुलाबी थंडीचीही खिल्ली उडवायचा प्रोग्राम पार पडतो. पण बालपणीच्या थंडीच्या आता आठवणीच उरल्या आहेत. तुमच्याही असतील तर उगाळा याच धाग्यावर. तेवढेच त्या आठवणींच्या शेकोटीची ऊब.. Happy

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे सॉलिड धमाल सुरू आहे इथे Happy
इतके प्रतिसाद कसे वाढले म्हणून डोकावलो तर Happy

सरांचे नुसतेच भक्त झालात पण त्यांचा गुण नाही घेतलात..
अरेरे... व्यर्थ ही भक्ती...

अहो, पुण्डलिकाने उद्या मीच कंबरेवर हात ठेऊन उभा राहतो म्हणून कसे चालेल. सर शेवटी सर आहेत, ते त्यांना शिंक आली की १०० प्रतिसादांचा धागा काढतात. आपण पामर माणसे

पण सर माझा विचार करत होते हे कसला भन्नाट आहे, कॉलेज मधे असताना ज्या मुलींच्या मागे लागलो होतो त्यांनी तरी हा का बरे माझ्या मागे लागला असावा असा विचार केला असेल का माहीती नाही, पण आता या उतारवयात (माझ्या हो, सरांच्या नव्हे) सर असा विचार करतात हे किती छान आहे.

आणि सर एकदम पॉवरबाज माणूस आहेत, ते एकदम डोंगरच जाळून टाकतात, अधली मधली बातच नाही

शात माणूस तुमचे तपशील चुकलेत - ते भुयार शनिवारवाड्यापाशी नाही, त्याच्या बऱ्याच अलीकडे उघडते. मी पुण्याचा असल्याने मला माहीती आहे.
Happy

आणि सर एकदम पॉवरबाज माणूस आहेत, ते एकदम डोंगरच जाळून टाकतात, अधली मधली बातच नाही >> Lol
नाहीतर काय.. आम्ही उगाचच सांताक्लॅाज जाळला म्हणून तोंड वाकडं करतोय.. आणि एवढं करूनही पेपरात फोटो नाही आला बरा

ते भुयार शनिवारवाड्यापाशी नाही, त्याच्या बऱ्याच अलीकडे उघडते. >> करेक्ट सर. पण ज्या दिवशी आम्ही मेनहोल मधून बाहेर निघालो त्या दिवशी शनिवारवाडा चारमिनारजवळच होता. सरांनी त्यांना फोटोसाठी हवा म्हणून त्यांच्या टीमकडून ढकलत आणला होता.

धमाल चालू आहे. ह्या धाग्यावर.
पण खरंच थंडीच्याही आठवणी ऊबदार वाटतात. लहानपण मुंबईच्या एका निवांत आणि झाडझाडोरा असलेल्या उपनगरात गेलं. कोजागिरीपासूनच कडाक्याची थंडी पडायची. गच्चीवर नेऊन ठेवलेलं उकळत्या दुधाचं पातेलं हळू हळू थंडगार व्हायचं. भेळही तशीच गार गार व्हायची. पण पत्ते, भेंड्या, बैठे खेळ खेळून कंटाळा आल्यावर पहाटे पहाटे कुडकुडत ते दूध प्यायचो.
दिवाळीच्या दिवसांत पहाटे अभ्यंग स्नानाचा कार्यक्रम असे. अंगाला खोबरेल, उटणे आणि केसांना ओल्या नारळाचा थंडगार रस चोळण्याचा जंगी कार्यक्रम असे. नारळाच्या दुधाचे क्रीम होऊन ते त्यातल्या पाण्यावर तरंगत असे. खोबरेल तर पार दगड झालेले असे. पण परसदारात चूल पेटलेली असे. त्यावरच्या गरम पाण्याच्या पातेल्याच्या झाकणावर ही सगळी भांडी आम्ही ठेवून देत असू.
आई वैतागे. एक तर हे चोचले आणि शिवाय हा दर वर्षीचा प्रकार असूनही दिवाळी पहाटेच्या घाईगर्दीत तिला तेलाची कथली पटकन मिळत नसे. मग शेकत बसलेल्या आमच्यापैकी हाताला लागेल त्या कुणालाही दंडाला धरून उठवायचे आणि एक हलकासा धपाटा घालून आणि तिथेच खसाखसा डोके चोळून न्हाणीघरात ढकलायचे. प्रत्येकाला एकेक पातेले चांगलं कढत कढत पाणी मिळे. पण रासनहाण करत बसलं तर ते लगेच थंड होई. तसंही रोज डोक्याला खोबरेल चोपडलं जाईच. म्हणून डोक्याचं तेल निघालंय की नाही वगैरे विचार न करता डोक्यावर गरम पाणी ओतून मोती साबणाने फक्त अंग चोळून धुवून आम्ही पटकन बाहेर निघत असू.
पुढे मार्गशीर्ष पौषात थंडीचा कडाका असे. गावातल्या देवळात सकाळी सकाळी काकड्याला गेलेलं आठवतं. पौषात थंडी वाढू लागे तसतशी आईची हलवा करण्याची लगबग आणि उत्साहही वाढे. पहाटे थंडीत आणि नीरव निस्तब्ध वातावरणात हलव्यावर काटा छान येतो म्हणून ती पहाटे तीनपासूनच वातीचा आवाज न करणारा स्टव पुढ्यात घेऊन बसे. आवाजाने जाग नाही आली तरी तिळावर हळू हळू जमणाऱ्या पाकाचा मंद वास नाकात शिरून जाग येईच. अर्थात अंथरुणातून उठत कोणीच नसे. पुन्हा डोक्यावरून पांघरुण ओढून मस्त झोपून जात असू. सकाळी शाळेत जाताना कुडकुडतच जात असू. काही बोलू गेले की तोंडातून वाफेचे छोटे पुंजके बाहेर पडत. श्वास घेताना थंड हवेने नाक हुळहुळे. आणि ह्या दिवसांत थंडी पडसं ठरलेलं असे. नाक पुसून ओला झालेला रुमाल थंडीने सुकून आतल्या पडशासह कडक होऊन जाई...
याच दिवसांत शाळांची स्नेहसंमेलने असत. नाटुकली, नाच बसवली जात. वर्षभरातल्या स्पर्धांमधील विजेत्यांसाठी बक्षीस समारंभ असे.
मोठी मजा असे....

बाटलीतले गोठलेले खोबरेल तेल मलाही आठवले. छे. मुंबईत राहणाऱ्या या पिढीला ते कधी कळणारही नाही. Happy
दिवाळीच्या पहाटेही अभ्यंगस्नानाच्या नावावर कंपलसरी आंघोळ करावीच लागायची. तेव्हाही कुडकुड व्हायची. ईतकेच नव्हे तर उठल्याऊठल्या दारात कार्टे फोडतानाच थंडी आपला पहिला वार करायची.. पण तरीही हे घाईघाईत उरकून फटाके फोडायला कधी पळतोय असे झाले असायचे Happy

आमची शाळा, राजा शिवाजी विद्यालय. दर शनिवारी हाल्फ डे आणि पहाटेच भरायची. त्यातही शनिवारचा पहिला तास ग्राऊंडवरच शारीरीक शिक्षणाचा असायचा. स्पोर्टस डे सुद्धा याच काळात असायचे. ते देखील पहाटेच सुरुवात व्हायची जेणेकरून उन्हात मैदानी स्पर्धा होऊ नयेत. तसेच वार्षिक स्नेह संमेलनाच्या तालिमीसुद्धा सकाळी शाळा सुरु व्हायच्या आधीच असायच्या. धम्माल असायचा एकूणच डिसेंबर महिना. या सगळ्या आठवणींना थंडीची झालर आहेच.

सर ते डोंगर कसा पेटवायचा यावर एक धागा येऊ दे ना
पुण्याच्या आजूबाजूला खूप डोंगर आहेत
देऊ त्यातले काही पेटवून मस्तपैकी

रासनहाण हा लग्नातला एक समारंभ असे. वरपक्षाकडील व्याह्यांकडच्या सगळ्या मानाच्या बायकांना आपल्या घरी आंघोळीसाठी बोलवायचे. तेव्हा सगळ्या बायकांना चंदन, उटी, तेल, गरम पाणी, बसायला (असतील तर) चांदीचे किंवा चांदीच्या फुल्या असलेले पाट, स्नानासाठी मोगरा किंवा खस घातलेले सुगंधित पाणी, अत्तराचे दिवे ओवाळणे, स्नानानंतर सुगंधी गुलाबपाणी शिंपडणे, मानाची ओटी भरणे, कापड चोपड करणे, मुख्य विहिणीला एखादा छोटासा दागिना देणे वगैरे आपापल्या ऐपतीनुसार करीत असत.

ह्या मानाच्या स्नानाचे अवशेष अजूनही लग्नाच्या देण्याघेण्यातून उरलेले दिसून येतात. विहिणीला तोंड धुवायचे, वेणीफणी करायचे सामान भेट देतात. बरोबर चांदीच्या लवंगा ठेवलेले चांदीचे विड्याचे पान, चांदीची दातकोरणी - कान कोरणी वगैरे देतात. ऐपतीप्रमाणे दागिनाही देतात.

वरपक्षाकडील व्याह्यांकडच्या सगळ्या मानाच्या बायकांना आपल्या घरी आंघोळीसाठी बोलवायचे
>>>
वाह ईण्टरेस्टींग आहे हे... सूरज बडजात्याने आपली ही पोस्ट आधी वाचली असती तर एखाद्या पिक्चरमध्ये दाखवले असते हे..

सर ते आंघोळीचे सोडा हो
सूरज बदजात्या नी दाखवली तर फक्त सलमान ची अंघोळ दाखवतील
तेही लाजून लाजून चुर झालेला सलमान
हम सात आठ है मध्ये त्याला या गोडगोड हसण्याचे इतके अजीर्ण झालेकी त्यातून बाहेर यायला त्याला शूटिंग दरम्यान हरणे मारावी लागली तेव्हा कुठं तो नॉर्मल ला आला म्हणे Happy

तुम्ही ते डोंगर कसा पेटवला ते सांगा की
भक्तांची मागणी पूर्ण करत नाही तुम्ही
व्हिठला कोणता झेंडा घेऊ हाती Happy

असा मी असामीमध्ये ते रासन्हाणच आहे ना?
" माहेरी बहुधा तिच्याकडे रेडा धुण्याचे काम असावे" Rofl

वावे,. Rofl
आमच्या घरी कोणी आंघोळीला फार वेळ लावत असेल, आतमध्ये शॉवरखाली गाणी गात बसला/ उभा असेल तर आजही 'काय रास नहाण चाललंय ह्याचं ' असे उद्गार निघतात.

काळजी घ्या चँप.
बाकी सर तारुन नेतीलच.
(ते गुरु नाही का काखमांजर्‍या स्वतःवर घेवुन भक्तीणीला तारुन घेवुन गेले होते)

सरांच्या सरांना चार चार हिरविनी अंघोळ घालत असतात आणि सर एखाद्या टंच हिरविनीने द्यावा तसा मादक लुक देत असतात ते कुठलं नहाणं?
images (2).jpegimages.jpeg
सर हल्ली भक्तांना बुचकळ्यात टाकतात. शाहरुख खान आणायचा तर सूरज बडजात्या?
राजवाड्यापेक्षा मोठं बाथरूम आणि त्यातून सुरेखा सुरेखा म्हणत पळत सुटलेले शाखासर...
सर असं इमॅजिन करू शकतात.

हीरा स्त्री आहेत कि पुरुष यावर एका पानावर हाणामारी चालू होती. रासनहाण्यामुळे स्पष्ट झाले आता. माठ बाप्यांना कुठलं आलंय एव्हढं डिटेल्स माहिती असायला?

आध्यक्षमहाशय, सरांनी डोंगर जाळल्याच्या चित्तरथरारक अनुभवाबद्दल पब्लीकच्या डिमांडवरुन चार शब्द लिहावे अशी नम्र विनंती करुन मी खाली बसतो.

माफ करा. विषय भरकटला होता. अर्थात सरांचा धागा असल्याने.
मूळ विषय थंडीत डोंगर जाळणे आहे.

होय होय
शाहरुख सरांचे आगमन झाल्याने धागा 200 च्या वर जाणारच

पण तरीही डोंगर जाळणे अनुभव यायलाच हवा

सर वाटल्यास आमचे नाव घेऊ नका पण एकदा रेसिपी द्याच

ते गुरु नाही का काखमांजर्‍या स्वतःवर घेवुन भक्तीणीला तारुन घेवुन गेले >>>
त्यांनी तर राजशेखर च्या शेपटीचे फोड सुद्धा बरे केले होते
मांजऱ्याचे काय घेऊन बसलात डबल ओ सेवन Happy

रास नहाण ह्या विषयावर डॉ लीला रानडे गोखले ह्या नव्वदीच्या पुढे वय असलेल्या आणि नामवंत समृद्ध कुटुंबात वाढलेल्या डॉक्टर बाईंनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिल्यामुळे मला ते माहीत झाले. तोपर्यंत मलाही वाटत होते की हा एक मुलांच्या च्या आळशीपणाचा
अथवा खट्याळपणाचा प्रकार असावा. असेच आणखी एक पुस्तक म्हणजे सरोजिनी वैद्य ह्यांच्या आई सरस्वतीबाई अकलूजकर ह्यांच्या दीर्घ आयुष्यातल्या आठवणींचे सरोजिनी बाईंनी संकलित आणि संपादित केलेले पुस्तक. एकोणिसाव्या शतकाची शेवटची वीस वर्षे आणि विसाव्या शतकाची पहिली पंचाहत्तर वर्षे ह्या काळातल्या मराठी उच्च/ मध्यम वर्गाचे जीवन ह्या विषयीच्या अनेक हकीकती , आठवणी ह्या पुस्तकांत आहेत. अशी पुस्तके म्हणजे एका परीने त्या त्या काळातील रूढी, प्रथांचे दस्तऐवजीकरण असते.
ह्या शिवाय, ह. ना. आपटे, वामनराव जोशी, काशीबाई कानेटकर, मनोरंजन चे जुने अंक, दत्त रघुनाथ कवठेकर असे त्या त्या काळातले लेखक (त्यांचे लिखाण) वाचले असतील, अनेक लायब्रऱ्यांत अनेक तास घालवले असतील, अरुण टिकेकरसारख्यांचे एकोणिसाव्या शतकासंबंधीचे लेख वाचले असतील, मुंबई महाराष्ट्राची ब्रिटिश कालीन गझेटीअर्स डोळ्यांखालून गेलेली असतील तर तत्कालीन समाजाचे दर्शन घडते. किमानपक्षी मराठी शब्दकोश वापरावा लागत असेल किंवा तो वापरण्याची सवय असेल तरीही अशा गोष्टी कळतात. किंवा आणखी एक पर्याय म्हणजे मोठ्या एकत्र कुटुंबात, जिथे अनेक गोष्टीवेल्हाळ आजी आजोबा नातवंडांना ' आमच्या काळी ' असे होते अशा छान गोष्टी सांगत असत, अशा कुटुंबात राहाण्याची संधी मिळालेली असणे.
ह्यापैकी काहीच नसेल तर.. तर....

थंडीत शेकोटीच्या नादात डोंगर जाळायचा किस्सा या आधी मायबोलीवरच कुठेतरी लिहीला होता.
शोधतो.
सापडला तर ईथे लिंक देतो Happy

Pages