थंडीच्या आठवणी

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 January, 2022 - 15:22

गेले दोनेक दिवस आमच्या मुंबईत अगदी गबरू थंडी पडली आहे. म्हणजे दुपारच्या भरगच्च उन्हातही बोचरे गारे वारे अंगापिंडाला टोचत आहेत.

या रविवारी सुट्टीच्या दिवशी भल्या पहाटे ऊठून सहपरीवार सहकुटुंब मॉर्निंग वॉकला गेलो. कपडे तेच आपले हलकेफुलके आणि स्टायलिश. कारण स्वेटर वा तत्सम जाडजूड कपडे मुंबईत कसली डोंबलाची थंडी म्हणत केव्हाच लाईफस्टाईलमधून हद्दपार झाले आहेत. त्यामुळे बाहेर पडल्यावर जेव्हा गारठलो तेव्हा मॉर्निंग वॉक एका जागीच दाटीवाटीने बसून साजरा होऊ लागला. बागेत गेल्यावर मास्क काढावा हा शिरस्ता पाळत सर्वांनी तो काढला, पण खिश्यात न टाकता कानावर चढवला. आणि त्या जागी हात खिश्यात टाकले. पण तरीही नारियलपाणीवाला दिसताच सवयीने ते प्राशन करायला खिश्यातले हात बाहेर आले. पोरं सोबत असल्याने घरी परतताना आईसक्रीमचाही एक राऊंड झाला. त्यानंतर मग व्हायचे तेच झाले...

सकाळी कानातून चोरमार्गाने शिरलेली थंडी रात्र होता होता नाकातून बाहेर पडू लागली. म्हणून सोमवारी कसलाही आगाऊपणा न करता खास थंडीचा लुत्फ उचलायला म्हणून सुट्टी टाकली. पण सकाळचा गरमागरम पोहे मिसळीचा नाश्ता झाल्यावर पुढे काय करायचा हा प्रश्न पडला. पावसाळ्यात चहा - कांदाभजी - चहा - समोसे - चहा - बटाटाभजी - चहा थालीपीठ - चहा यांव आणि त्यांव असे राऊंड घेता येतात. पण थंडीचे सुट्टी टाकून करतात काय हा प्रश्नच पडला. मग दुपारी मस्तपैकी दारे खिडक्या पडदे फॅन लाईट वगैरे सारे काही बंद करून मस्त चादर ओढून ताणून दिली.

थोडावेळ छान झोप लागली. पण त्यानंतर चादरीतही थंडी शिरू लागली. मग पाय जवळ ओढून घेतले. चादर गच्च लपेटून घेतली. पण तरीही जेव्हा असह्य झाले तेव्हा ताडकन ऊठलो आणि पाहतो तर काय... पोराने सवयीने एसी चालू करून ठेवलेला. आता त्याला बिचार्‍यालाही थंडी हा सीजन नवीनच. त्याचा तरी काय दोष. तरीही आलेला राग शांत करायला चार वर्षाच्या पोराला जितके बदडणे अलाऊड असते तितके त्याला बुकलून काढले. त्याने तो गरम झाला. पण माझी थंडी मात्र रात्र होत आली तरी जायचे नाव घेत नव्हती. उलट रात्री पुन्हा गारठू लागलो तसे मग वेळ घालवायला भूतकाळातल्या थंडीच्याच आठवणी काढून गरम होऊया म्हटले. यही मौका है, यही दस्तूर है, और बंबई की थंडी है भाई.. क्या पता, कल हो ना हो Happy

तर थंडी म्हटले की मला सर्वात पहिले माझगावच्या आमच्या चाळीतील दादरावर पेटवली जाणारी शेकोटी आठवते. आहाहा, छोटीशी होळीच म्हणा ना.. ते कॅम्पफायर वगैरे ईंग्लिश शब्द मला फार उशीरा कळले. जेव्हा कळले तेव्हाही डोक्यात हेच पहिला आले, अरे ही तर आमची शेकोटी Happy

म्हणजे नारळाच्या सुक्या करवंट्या, ज्या तेव्हा चाळीतील दर दुसर्‍या घरात सापडायच्या. अगदी आमच्या दारातही एक ड्रम भरून असायच्या. सोबत जमेल तसा लाकूडफाटा, जसे की आब्याच्या पेट्यांची फळकुटे वगैरे,. एक मोठठाला परातीईतका तवा, त्यात हा सारा लाकडी ऐवज जमा करायचा. आणि रॉकेल टाकून पेटवून द्यायचा. तेव्हा स्टोव्हच्या जमान्यात रॉकेलही प्रत्येक घरात सापडायचे. फार नाही, कपभर पुरायचे. दररोज हा कप आळीपाळीने एकेका घरातून यायचा. जेवणखान झाले की साधारण दहा-साडेदहाला शेकोटी पेटायची ते रात्री एकदिडलाच विझायची. तोपर्यंत आमच्यासारखे रातकिडे अखेरपर्यंत तिला सोबत द्यायचे. कधी मूड आला तर गाणीही व्हायची. पण खरी धम्माल शेकोटीवरील गप्पांची. आणि चाळीसारख्या जागी गप्पांच्या विषयाला कमी कधीच नसायची.

याच थंडीच्या सीजनमध्ये मग नाताळही यायचा. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत सांताक्लोजला जाळून करायची पद्धत होती आमच्यात. पाशवी प्रथाच म्हणा ना. अगदी साग्रसंगीत फटाक्यांसह हा जाळण्याचा कार्यक्रम पार पडायचा. ती सुद्धा एक शेकोटीच म्हणू शकतो. पण जाळण्याआधी ती बुजगावणी ख्रिसमसपासून बिल्डींगच्या कॉमन गॅलर्‍यांना लटकावलेली असायची. थोडीथोडकी नाही तर तब्बल दहाबारा बुजगावणी बनायची. ते बनवायला लागणारे सुके गवत तेव्हा भायखळा भाजीमार्केटमध्ये मुबलक आणि फुकटात मिळायचे. रस्त्यात पडलेले असायचे. गोणी गोणी भरून आणायचो. बरेचदा शेकोटीत त्यातलेच गवत जाळले जायचे. असा हा शेकोटी, नाताळ, थंडीचा सण जवळपास किमान महिनाभर तरी साजरा व्हायचा. आजच्या मुंबईत राहणार्‍या पिढीचा यावर विश्वास बसणे अवघडच.

मग मोठे होता होता ती थंडी हरवलीच. नाही म्हणायला कधीतरी जगाच्या पाठीवर बर्फ पडला तर वाहत्या वार्‍यांसोबत एखादी थंडीची लाट मुंबईत अवतरते. तेवढ्या काळात आम्ही मुंबईकर रजनीकांतचा फ्रिज उघडा राहिलाय वगैरे पांचट जोक मारून घेतो. झाल्यास पुण्याच्या गुलाबी थंडीचीही खिल्ली उडवायचा प्रोग्राम पार पडतो. पण बालपणीच्या थंडीच्या आता आठवणीच उरल्या आहेत. तुमच्याही असतील तर उगाळा याच धाग्यावर. तेवढेच त्या आठवणींच्या शेकोटीची ऊब.. Happy

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नको सर नव्याने लिहा की
मस्त मीठ मसाला घालून
वाचताना मज्जा येईल असं ऍड करा त्यात

नैतर मग हा किस्सा आम्हाला पोपटाच्या धाग्यावर जाऊन सांगावा लागेल Happy

हीरा, मस्त पोस्ट. मुंबईच्या आठवणी जाग्या झाल्या. सकाळी थंडीत कुडकुडत शाळेत जाणे, आणि दुपारची शाळा असताना सकाळी उत्साहि मुलांबरोबर धावायला जाणे. त्या गोष्टी आठवुन मस्त वाटलं...

ऋन्म्या, माझगांवचा कुठला डोंगर जाळलास? तुझा जन्म होइस्तोवर मुंबईतला एकतरी डोंगर/टेकडी अतिक्रमणामुळे शिल्लक राहिली होती का? काहिहि पुड्या सोडु नकोस...

९६..

तुझा जन्म होइस्तोवर मुंबईतला एकतरी डोंगर/टेकडी अतिक्रमणामुळे शिल्लक राहिली होती का? काहिहि पुड्या सोडु नकोस...
>>>>>>

joseph baptista garden
या नावाने गूगल करून बघा राजभाई

अधिक माहितीसाठी हा धागा

मॉर्निंग वॉल्क माझगावचा डोंगर
https://www.maayboli.com/node/47721

झाल्यास काही फोटो शोधून मी टाकतो Happy

मुंबईत नक्की कोणत्या भागात थंडीने कुडकुडायला होते?
>>>>
बालपणीच्या आठवणी आहेत. आता नाही होत थंडीने कुडकुडायला. गार बोचरा वारा मात्र आहे. आमच्या बिल्डींगच्या एका बाजूला मुंबईची पश्विम किनारपट्टी आहे तर एका बाजूला भाऊचा धक्का. जर खिडक्या आणि दरवाजे उघडे टाकले तर पश्विमेकडून पुर्वेला जे जबर्रदस्त वारे वाहतात की फॅनचे बटण चालू न करताच तो फिरायला लागतो. दरवाज्यांचे स्टॉपर वा कड्या हा प्रकारच नाही आमच्याकडे. सर्व भिंतीसह उखडून निघालेत.
कधी कधी कधी हे वारे ईतके बोचरे असतात की बस्स रे बस्स. मग आम्ही खिडक्या दरवाजे किंचित उघड्या ठेवून त्या पडद्याने वगैरे झाकून त्यांची तीव्रता कंट्रोलमध्ये ठेवतो. तरी आमचा फक्त १० वा माळा आहे. मुंबईत आमच्या भागात ईतक्या हायराईज बिल्डींग आहेत तिथे हा वारा किती सुसाट असेल.

https://www.mypacer.com/routes/102088/mazgaon-hill-walk-trail-mazagaon-m...
अबब ! तब्बल २०९ फूट इलेव्हेशन (समुद्रसपाटीपासूनचे) आणि ३००० पावलं लांबी असलेला हा अजस्त्र आणि उंचच डोंगर कळसूबाईच्या शिखरापेक्षा थोडासाच छोटा आहे. अठरा ते वीस मजली ईमारतीच्या गच्चीवरून भाऊचा धक्का दुर्बिणीनेच दिसतो. तळाला जी चौपाटी आहे तिचे इलेव्हेशन ३० फूट आहे. खालच्या रस्त्याचे इलेव्हेशन १०० फूट आहे.
पेसर वर मॉर्निंग वॉकसाठी अशी ठिकाणे दिली जातात. सरांचा धागा आणि पेसरवर एकाच वेळी ही माहिती योगायोगाने आली.

१००

मुंबईत अनेक छोटे छोटे डोंगर आहेत. त्यांना डोंगऱ्या म्हणतात. ब्रिटिश लोक हिल म्हणायचे. जसे गोलंजी हिल, भंडारवाडा हिल, मलबार हिल, खंबाला हिल वगैरे.
अशा डोंगऱ्या मुख्य जुन्या बेटांवर आता फारशा नाहीत. तरीही भंडारवाडा डोंगर आहे. मलबार आणि खंबाला डोंगर आहे. ताडदेव आहे.
बाकी साष्टी बेटावर अनेक आहेत. गुंदवली, बांदिवली, चांदिवली, मालपा डोंगरी, गिल्बर्ट हिल अश्या अनेक आहेत. मालाड कांदिवली भागात पूर्वेला डोंगरच आहेत.

असे सहा सात फोटोत अख्खा डोंगर आणि ऊद्यान कव्हर नाही होणार. पुढच्यावेळी मी गेलो की छान फोटो टिपतो. काही खुफिया जागा आहेत डोंगराच्या पोटात ज्या आंतरजालावरील फोटोंमध्ये कधी सापडणार नाहीत Happy

हो सामो, खरेच ही जागा रोमॅन्टीक देखील आहे. लग्नाआधी मी जेव्हा ईथे जायचो तेव्हा चप्पल काढून ईथल्या गवतात चालत आमची बरीच फोनाफोनी चालायची.
पण त्याचवेळी ईथे कपल्सचे चिकटून बसणे अलाऊडही नाही. म्हणजे चारचौघात करू नये असे करताना कोणी दिसले तर तात्काळ हटकले जाते. त्यामुळे फॅमिली सोबत नेण्यास आदर्श जागा आहे.

किंवा फिनिक्स सारखा राखेतून पुन्हा नवा डोंगर जन्मला असेल

सर हे किती द्रष्टे आहेत बघितलं का तुम्ही

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी डोंगर पेटवून दिला जेणेकरून मुंबईत येणाऱ्या आगामी पिढ्याना सुंदर उद्यान मिळेल

सर हा खरा मास्टर स्ट्रोक

सर तुमच्या किश्शावरून आठवलं.
एकदा मी कांजूरमार्गला उतरून पवईच्या डोंगरावर गेलो होतो. तिथून मग मला कळसूबाई शिखर दिसू लागलं. मग काय आम्ही कळसूबाई शिखरावर गेलो. तिथे ही थंडी ! बोललेले शब्द गोठून बाहेर पडत होते. तर एक भैय्या म्हणाला ये तो कुछ नही. म्हणून त्याने आम्हाला १८० डिग्रीत वळवलं.
बघतो तर काय.
एव्हरेस्ट शिखर.
मग काय चढलो. वर तर वेगळीच मज्जा. तिकडे तर लोक लुंगीत शेगडी घेऊन फिरतात ! बोला आता !!

मग भराभर खाली उतरलो तर येताना घसरत गेलो तर तळाला चेन्नई लागलं. तिकडे जो स्नो फॉल चालू होता कि बस्स.
आम्ही समुद्रात उड्या मारल्या आणि पोहत पोहत एका डोंगराखालून आलो. वर जायचं भुयार होतं. शिडी चडून मेन होलचं झाकण सारून बाहेर आलो तर काय !
समोर शनिवारवाडा !!---नशीबच म्हणायचं...

आम्हाला रात्रीच्या शेकोटीचा जास्त आनंद घेता येत नसे. रात्री १० ला झोपावे लागायचे. परंतु सकाळी खास शेकोटीसाठी आम्ही पहाटे पाच साडे पाचला उठायचो. पटापट आंघोळ चहापाणी करून शाळेचे दप्तर घेऊन सगळे मित्र मोठी शेकोटी करायचो. शेकोटीत झाडाचा पालापाचोळा, काड्या आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रीस, तेलाने माखलेला कॉटन वैस ( पूर्वी गॅरेजमध्ये हात पुसायला सुती धाग्यांचे गोळे वापरायचे हल्ली दिसत नाही). ह्या कॉटन वैसाने शेकोटी पेटवायला रॉकेलची गरज लागत नसे आणि त्यातील ग्रीसमुळे शेकोटी बराचवेळ पेटती राहायची. शाळेत मधल्या सुट्टीत ९ - ९.३० च्या कोवळ्या उन्हात तोंडातून सिगारेट सारखा वाफेचा धूर काढायचो. आता मुंबई ठाण्यात अशी थंडी बघायला मिळत नाही. थंडीच्या दिवसात थेटरात मॉर्निंग शोला गरम सिनेमे लागायचे ( पोस्टरवरील दृश्य आणि सिनेमाच्या नावावरून ते गरम असावेत). आता रात्र आणि दिवस सगळंच गरम .

ऋन्मेष, सुंदर फोटो!! >>> धन्यवाद शर्मिला Happy

आग्या मस्त !

तेलाने माखलेला कॉटन वैस ( पूर्वी गॅरेजमध्ये हात पुसायला सुती धाग्यांचे गोळे वापरायचे हल्ली दिसत नाही).
>>>>
येस्स येस.. हे मी कसे विसरलो. आमच्याईथे घोड्याचा तबेला म्हणून एक फेमस गल्ली होती जिथे बरेच गॅरेजेस होते. गाड्या रिपेअरींगचे काम चालायचे. ते तारगाडीच्या गाड्या शोधायलाही आम्ही तिथेच जायचो. तसेच हे ग्रीसने माखलेले सुती धाग्यांचे बोळे काही जण शेकोटीसाठी उचलून आणायचे.

चिराबाजारात बर्फ पडत असल्याच्या नोंदी आहेत(संदर्भ- खुर्च्या) त्यावरून मुंबईत एकेकाळी थंडी पडत असल्याचे सिद्ध होते.

चिराबाजारात बर्फ पडत असल्याच्या नोंदी आहेत(संदर्भ- खुर्च्या) >>> खुर्च्या पुस्तक आहे का?
बाकी थेट बर्फ.. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वात मोठा फटका मुंबईलाच बसला आहे.

थंडी मध्ये आवडन्यासारखे काय आहे ? >>> म्हणजे? मला अ‍ॅक्चुअली प्रश्नच नाही कळला.. थंड वातावरण आणि त्यातली शेकोटीची ऊब छान हवीहवीशी नाही वाटत का? लोकं उभाळ्यात फिरायलाही मुद्दाम थंड हवेच्या ठिकाणी जातात. मधुचंद्रासाठी तर हमखास..

चिराबाजारात बर्फ पडत असल्याच्या नोंदी आहेत >>>>
होय आणि बाप जनोबा त्या थंडीत चर्च मध्ये जात असत

खुर्च्या पुस्तक आहे का?
सर तुम्ही किती हो हुशार
तुम्ही तर कायदेपंडीतच व्हायला हवे होते किेवा पोपच्या खालच्या दर्जाचा अधिकारी तरी Happy

Pages