खगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे?

Submitted by aschig on 15 September, 2021 - 16:59

लोक फलज्योतिषाकडे धाव का घेतात?

अनेकदा लोक ज्या कारणांसाठी फलज्योतिषाकडे जातात ती कारणं जीवनातल्या नेहमीच्या अनिश्चितीततांमुळे निर्माण झालेली असतात. अनिश्चितता खरंतर सगळ्यांच्या जीवनात असतात; पण काही लोकांना त्यांचा जास्त त्रास होतो किंवा काही लोकांच्या बाबतीत त्या अनिश्चिततांची परिणती काही विशिष्ट घटनांद्वारे जास्त एकांगी वाटते. उदाहरणार्थ, घटस्फोट, कुटुंबातील अकाली मृत्यू किंवा अपंग करणारा एखादा अपघात. हे असं माझ्याच बाबतीत का व्हावं असा विचार आला की आपण अनेकदा सद्सद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून नको त्या गोष्टींच्या नादी लागू शकतो. अशावेळी खरं तर लोकांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. भारतात तो एक ठपका असल्यामुळे पंचाईत होते. या धर्तीच्या अनेक प्रसंगांमध्ये पुढील घटना टाळण्यासाठी ओळखीतल्या अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यास त्यानेही मदत होऊ शकते. अर्थात ते स्वतः अंधविश्वासू नसतील तर.

IGNOUच्या अभ्यासक्रमाबाबत

सरकारने फलज्योतिषावर योग्य असे पर्याय बनवायला हवेत; जेणेकरून लोकांना कठीण परिस्थितीतही मानसिक स्थैर्य मिळवायला मदत होईल. शाळा–कॉलेजेसमधून अशी मदत उपलब्ध हवी. याउलट सरकारी अनुदानाने विद्यापीठांमधून फलज्योतिषाचे नवीन अभ्यासक्रम सुरू केले जात आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय खुल्या विद्यापीठाने इतक्यातच असाच एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक लोक “काय हरकत आहे” असं म्हणून त्या अभ्यासक्रमाला पाठिंबा देत आहेत. “इतर अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात, त्याप्रमाणे हाही एक आणि हा तर विज्ञानशाखेत नसून कलाशाखेत आहे; त्यामुळे असाही दावा नाही की ते एक शास्त्र किंवा विज्ञान आहे” असा त्यांचा युक्तिवाद असतो. कलाशाखेत जरी हा असला तरी अभ्यासक्रमाच्या विवरणात एक वाक्य असं आहे की आम्ही या विद्यार्थ्यांना त्यांच्या उपजीविकेचे एक साधन या अभ्यासक्रमाद्वारे देऊ करणार आहोत. तसं असल्यामुळे असा अभ्यासक्रम कोण शिकवू शकेल, त्या अभ्यासक्रमामध्ये काय हवं, हे प्रश्न साहजिकच निर्माण होतात. अशा प्रश्नांना एक सरधोपट असं उत्तर नसतं कारण त्यात अनेक मिती असतात. अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक असलेल्या अनेक बाबींचा अंतर्भाव न केल्यामुळे हे अभ्यासक्रम घातक ठरतात. यासंबंधीच्या एक-दोन आवश्यक पण कदाचित अपुऱ्या बाबी पाहूया.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासक्रमात जे शिकवले जाणार आहे त्याविरुद्ध असलेले सिद्धांत आणि मतप्रवाहसुद्धा नमूद केले जायला हवे. तसे नसल्यास जे शिकवले जाणार ते एकांगीच ठरणार. अभ्यासक्रमात जे काही शिकवले जाते त्याबद्दल संख्यात्मक विश्लेषण देता यायला हवे. ज्योतिषाचा अभ्यासक्रम भाकितांबद्दल असल्यामुळे ‘कोणत्या घटकांवर आधारित किती भाकितं केली? केली त्यातील किती खरी ठरली? ती किती अंशी खरी ठरली? किती खोटी ठरली?’ वगैरे या सर्व बाबी यायला हव्यात. हा कलाशाखेत जरी असला तरी कलाशाखेतील इतर अभ्यासक्रमांमध्ये जशा परीक्षा असतात तशा इथे होतील याची काहीच चिन्ह नाहीत. उदाहराणार्थ, रंगचित्राच्या परिक्षेस बसलेला विद्यार्थी रंगचित्रे काढतात. त्या रंगचित्रांना परीक्षक गुण देतात. त्याचा जगात होऊ घातलेल्या घटनांशी संबंध नसतो. फलज्योतिषात तसा असल्याने त्याची तपासणी कशी केली जाणार? वर्ष–दोन वर्ष किंवा भकितात असतील तेवढी वर्षे थांबून?

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असे अभ्यासक्रम शिकवायला प्रशिक्षित व तज्ज्ञ शिक्षक हवेत. म्हणजे जे स्वतः केवळ पुस्तकातून शिकले ते का? तसे असतील तर कोणत्या पुस्तकांमधून? की व्यावसायिक ज्योतिषी हवेत? हे दोन्ही गट तसे कुचकामी. येथे असेच शिक्षक हवेत ज्यांना या प्रकारात कोणतेतरी प्रमाणपत्र मिळाले आहे, पदवी मिळाली आहे. आणि हे प्रमाणपत्र किंवा पदवी अशा दुसर्‍या एखाद्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून नसावी जिथले शिक्षक पदवीधर नव्हते. कोणी म्हणेल की हे तर कोंबडी आधी की अंडे याप्रमाणेच होईल. याचे कारण असे की जर अभ्यासक्रम सुरू होऊ शकणार नसेल, अभ्यासक्रम फक्त पदवीधर शिक्षक देऊ शकणार असतील तर ही पदवी ते शिक्षक मिळवतीलच कसे? विज्ञानात किंवा इतर ठिकाणी ते कसे होते ते पाहूया.

एखादं क्षेत्र जेव्हा नवीन असतं तेव्हा आधी त्यातील संशोधनाकरता काही लोक प्रस्तावांद्वारे अनुदान मिळवतात. तो प्रस्ताव एखादी विवक्षित गोष्ट करण्यासाठीचा असतो. संलग्न क्षेत्रातील तज्ज्ञ अशा प्रस्तावाची तपासणी करतात आणि मग अनुदान द्यायचं की नाही ते ठरवतात. अनुदान ज्या प्रयोगासाठी मिळाले आहे तो जाहीर केल्या जातो आणि प्रयोग झाल्यानंतर त्यातून काय निष्पन्न झालं ते पण जाहीर केलं जातं. असे काही प्रकल्प जेव्हा यशस्वी होतात तेव्हा यशस्वी गट एकत्र येऊन एखादी संघटना बनवू शकतात. त्या संघटनेद्वारे आधीचे प्रकल्प/प्रमेय जास्त काटेकोरपणे तपासून परिपूर्ण केले जाते. अशा या सर्व अग्निपरीक्षेतून गेल्यानंतर जे लोक तयार होतात ते अशा गोष्टी शिकवू शकतात.

फलज्योतिष कशावर आधारित आहे?

पत्रिका मांडणं हे पूर्णपणे गणिती आहे. पंचांगात जी ग्रहस्थिती दिलेली असते ती वापरून खरं तर कोणीही काही मिनिटांमध्ये पत्रिका मांडणं शिकू शकतो. पंचांगातली ग्रहस्थिती ही खगोलशास्त्रीय निरीक्षणांवरूनच मिळवलेली असते आणि ते तंत्र इतकं प्रगत आहे की ती स्थिती अचूक असते. पत्रिका ही खऱ्या ग्रहांची स्थिती वापरून मांडली गेली असल्यामुळे त्याचा खगोलाशी संबंध नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे. त्यामुळे पत्रिकेतील ग्रह जर खगोलीय असतील तर त्यांचा आपल्या आयुष्यावर परिणाम का होऊ शकत नाही ते आधी आपण पाहूया की.

पत्रिकेतील नवग्रह म्हणजे बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हे ग्रह, त्याचप्रमाणे सूर्य हा तारा, चंद्र हा उपग्रह आणि राहू आणि केतू हे पृथ्वी आणि चंद्र यांच्या सावल्यांपासून निर्माण झालेले काल्पनिक छेदनबिंदू. यातील मंगळ आणि शनी फलज्योतिषात वाईट समजले जातात. ग्रहांचे गुणधर्म लक्षात घेऊ लागलो तर सर्वात महत्त्वाचे ठरावेत ते त्यांचे वस्तुमान आणि त्यांचे आपल्यापासूनचे अंतर. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसेच इतर ग्रहही फिरतात आणि त्यांची गती वेगवेगळी असते त्यामुळे त्यांचे आपल्यापासूनचे अंतर सदोदीत बदलत असते. त्यामुळे त्यांचा परिणाम हा ते सूर्याशी किती अंशांचा कोन करतात यापेक्षा त्यांचे आपल्यापासून अंतर किती आहे यानुसार ठरायला हवा. भौतिकशास्त्राला ज्ञात चारच बलं आहेत. त्यातील एकच बल अर्थात गुरुत्वाकर्षणशक्ती ही लांब पल्ल्यावर काम करते. म्हणजेच जर शनी, मंगळ, गुरू यांचं एखादं बल आपल्यावर काम करत असेल तर ते गुरुत्वीय बलच असू शकतं. गुरुत्वीय बल हे वस्तुमानाप्रमाणे वाढतं. वस्तुमान दुप्पट झालं तर बलही दुप्पट होतं. त्याउलट अंतर वाढलं की बल कमी होतं आणि तेही वर्गाप्रमाणे. म्हणजेच अंतर जर दुप्पट झालं तर बल चतुर्थांश होतं.

या गणितानुसार जर आपण मंगळाचा आपल्यावर किती परिणाम होऊ शकतो हे पाहिलं आणि त्याची तुलना १०० किलोग्राम वजनाच्या, एका मीटरवर असलेल्या एका व्यक्तीच्या बलाशी केली तर ती दोन्ही बले जवळजवळ सारखीच असतात हे दिसतं. मंगळाचे वस्तुमान एकावर २४ शून्य इतके किलोग्राम आहे आणि त्याचं सरासरी अंतर साधारण एकावर ११ शून्य इतके मीटर आहे. म्हणजेच १०० किलोच्या पहलवानापेक्षा एकावर २२ शून्य इतकं बल वजनामुळे जास्त, पण अंतर एकावर ११ शून्य इतकी मीटर कमी असल्यामुळे त्याचा वर्ग अर्थात एकावर २२ शून्य इतक्या प्रमाणात कमी आणि हे दोन घटक सारखेच असल्यामुळे एकमेकांना रद्द करतात. आता जर फक्त ५० किलोग्राम वजनाचा डॉक्टर एखाद्या व्यक्तीपासून अर्ध्या मीटरवर असेल तर वस्तुमान अर्धे झाले म्हणून बल अर्धे होणार पण अंतर अर्धे झाले म्हणून बल चौपट होणार. म्हणजेच मंगळाच्या दुप्पट. या गणितानुसार एका व्यक्तीचं शेजारच्या दुसऱ्या व्यक्तीवर असलेले गुरुत्वीय बल हे दूर असलेल्या मंगळापेक्षा जास्त असतं. यामुळेच मुलाचा जन्म जेव्हा होतो तेव्हा त्याच्याजवळ असलेल्या डॉक्टरचे किंवा सुईणीचे गुरुत्वीय बल बालकावर जास्त असतं.

या निर्विवाद युक्तिवादामुळेच अनेकदा फलज्योतिषी म्हणतात की पत्रिकेतले ग्रह फक्त त्यांच्यामधील कोनांपुरते. बाकी मात्र त्यांचे गुणधर्म वेगळे असतात. क्षणभर ते खरं आहे असं मानलं, तरीदेखील त्यांचे गुणधर्म कोणते हे सांगायला हे फलज्योतिषी तयार नसल्यामुळे पुढे सगळं अडतं. थोडक्यात काय तर, फलज्योतिष हे पूर्णपणे निराधार आहे. जादूगार ज्याप्रमाणे पोतडीतून हवं तेव्हा हवं ते काढतो त्याचप्रमाणे फलज्योतिषी वाटेल तेव्हा वाटेल ते गुणधर्म या ग्रहांच्या माथी मारतात आणि त्यांच्याद्वारे त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या कपाळी काहीबाही थोपतात. खरं तर फलज्योतिषांची हि स्थिती ग्रहांनी ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं‘ अशी केलेली आहे. तरी पण लोक साधारण कोणत्यातरी परिस्थितीमुळे अगतिक झाल्यावरच ज्योतिष्यांकडे जातात. वर दिलेल्या युक्तिवादाची त्यांना माहिती नसते, किंवा त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगामुळे काहीही खरं मानण्याची त्यांची मनस्थिती असते, आणि त्यामुळेच फलज्योतिषांचे फावते.

लग्नासारखी नातीसुद्धा सामंजस्यावर, प्रेमावर न बेतता दूरवर असलेल्या निर्जिव आणि त्यामुळे निर्बुद्ध ग्रहांवर सोपवून लोक अजाणता आपल्या (व आपल्या पाल्यांच्या) पायावर कुऱ्हाड मारून घेतात. अनेकदा यातील विजोड लग्न घटस्फोटाच्या दुसऱ्या टॅबूमुळे त्रासदायक संसाराला कारणीभूत होऊ शकतात.

त्यामुळे गरज आहे ती प्रबोधनाची, वरील युक्तिवाद सगळ्यांपर्यंत पोचवण्याची. कार, कंप्युटर वगैरे घेतल्यावर जशी हमी मिळते तशी फलज्योतिषी देऊ लागले तर बहुतांश भाकिते कशी निराधार असतात हे आपसूकच सिद्ध होईल, त्याचा एक संख्याशास्त्रीय पडताळासुद्धा येईल.

खगोलशास्त्राची प्रगती

काही शतकांपूर्वीपर्यंत विजा, वादळे, पूर वगैरे दैवी प्रकोप समजले जायचे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे ठरावीक महिन्यांमध्ये ठरावीक नक्षत्रं दिसतात. पावसाळ्यात दिसणाऱ्या नक्षत्रांचा आणि पावसाचा संबंध जोडला जाणे साहजिक होतं. पण ती नक्षत्रं दिसतात तेव्हा पाऊस पडतो याऐवजी त्या नक्षत्रांमुळेच पाऊस पडतो अशी धारणा जुन्या काळी होती. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे रात्री दिसणारे तारे ठरावीक वेगाने त्यांची स्थानं बदलत. याउलट आपल्याच सौरमालेतील ग्रहांचे खगोलातील भ्रमण अनियमित वाटे. त्यामुळे त्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं. डोळ्यांनी पाच ग्रह दिसत असल्यामुळे त्यांनाच पत्रिकेत डांबलं. सोबतीला सूर्य–चंद्र होतेच. नंतर सापडलेले युरेनस नेपच्यूनसारखे ग्रह लोकांच्या पत्रिकेत फार काही उच्छाद मांडतांना दिसत नाही. पंधराव्या शतकाच्या सुमारास सौरमालेबद्दलच्या विज्ञानाच्या कल्पना नवीन ज्ञानामुळे उत्क्रांत झाल्या. पृथ्वीसकट इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात हे लक्षात आलं. तेव्हापासूनच खरंतर खगोलशास्त्राची आणि फलज्योतिषाची फारकत झाली. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला लागलेल्या दुर्बिणीच्या शोधामुळे गुरू आणि शनीभोवती अनेक चंद्र आहेत हे कळलं. मंगळ आणि गुरू यांच्या दरम्यान असलेल्या लाखो लघुग्रहांबद्दल कळलं. त्याहीपलीकडे असलेल्या आणि धूमकेतूंना जन्म देणाऱ्या ऊर्ट क्लाउडबद्दल कळलं. धूमकेतू विनाशाचे प्रेषित न राहता वैज्ञानिक कुतूहलाचे विषय बनले. विसाव्या शतकात मानव पृथ्वीभोवती उपग्रह स्थापू लागला. मानवाने अवकाशात भरारी घेतली. तो चंद्रावर जाऊन पोचला. मानवनिर्मित याने मंगळावर तर उतरलीच पण दूरच्या एका धुमकेतूवर*, तसेच एका लघुग्रहावर** देखील जाऊन पोचली. व्हॉयेजर*** याने तर सौरमालेच्या वेशीपर्यंत जाऊन पोचली आहेत. हे सर्व आपल्या सौरमालेतील. ह्यापलीकडे देखील अनेक सुरस शोध मानवाने लावले.

भारतानेही अनेक उपग्रह पृथ्वीभोवती स्थापले, चंद्र–मंगळावरील मिशन्स साध्य केल्या, आणि लवकरच भारतीय मानवालापण अवकाशात पाठवणार आहे. असं सर्व असताना भारतीयांनी, भारतीय समाजाने खगोलीय प्रगतीला प्राधान्य द्यायला हवं कि जुन्या तर्कहीन समजुतींमध्ये अडकून राहून पुढच्या पिढीला अज्ञानात लोटावे हे सुज्ञास सांगणे न लगे. पण अशा सुज्ञ लोकांनी इतरांपर्यंत हे विचार पोहोचवणे अतिशय आवश्यक झाले आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.

* https://en.wikipedia.org/wiki/Philae_(spacecraft)
** https://www.nasa.gov/osiris-rex
*** https://voyager.jpl.nasa.gov/

या लेखाचा काही भाग इतक्यातच दिलेल्या दोन भाषणांवर आणि त्यांच्यावर आलेल्या काही प्रतिक्रियांवर तसेच लोकायत ग्रुपवरील काही चर्चांवर आधारित आहे.

नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक प्रकाशन (१ ऑगस्ट २०२१) https://tinyurl.com/6vrhmj42 (मिनीट २७ पासून)
ब्राइट्स सोसायटी (७ मार्च २०२१) https://tinyurl.com/85stfbpd (मिनीट ८ पासून)

लेख सुधारक ऑगस्ट २०२१ अंकात पूर्वप्रकाशीत.

Group content visibility: 
Use group defaults

>> ज्या वाटा आहेत त्या शिक्षणाने पुसायच्या का नव्या तयार करायच्या?
अगदी बरोबर

प्रयत्नवादाची कास सोडून दैववादाची कास धरण्यास शिकवतो
सामो
प्रयत्नवादी अभ्यासक्रमाचे एक उदाहरण देता का.?

हेमंत रसायन शास्त्र, भौतिक शास्त्र, गणित, सांख्यिकी, जीवशास्त्र - हे सर्व प्रोग्रेसिव्ह विषय आहेत. यांच्या शिक्षणामुळे आणि त्यातून स्वकष्टाने लावलेल्या शोधांमुळे जीवन अतोनात समृद्ध झालेले आहे, हे तुम्ही नाकाराल का?
----------
मदरसा तसेच अमेरीकेत वगैरे 'उत्क्रांतीवरती विश्वास न ठेवणारे, पॄथ्वी गोल आहे हे मान्य न करणारे, देवाने जग निर्माण केले असे मानणारे' होम स्कुलिंग असते. या अर्थात रिलिजन/कल्चर बेस्ड शाळा असतात. त्यांच्या पठडीत जाउन बसता येइलच म्हणा.

बरेच ग्रंथ, हस्तलिखिते १६०० ते १९४५ काळात देशाबाहेर गेली आहेत. उद्या जर्मनीत त्या आधारे ज्योतिषाचा चार वर्षांचा अभ्यासक्रम निघू शकतो. मग इकडे धावाधाव, चर्चा होईल. आपणच मागे कसे. ( योगाचा अभ्यासक्रम आहे तिकडे.)

यावर कुणी विचार केला काय?
( वाराणसीत होराभूषण,होरारत्न वगैरे पदवीसाठी शिकता येते पण ते आता ओनलाईन झाले आहेत का?)

ज्योतिष आहे म्हणून मुलींना सुखासुखी नावडत्या मुलांना नकार देता येतो, नायतर उद्या कोण परत कुठे अ‍ॅसिड टाकेल, समाजात त्रास ही भीती असते. चालू द्या चाललं आहे ते. काडीचा आधार काढ्ण्याआधी बुडत्याला पायावर उभे करा.

(बाकी शरीरविक्रीचा अभ्यासक्रम नसला तरी युनिव्हर्सिटीत ह्युमन सेक्शुएलिटी, सेक्स एड, बेसिक्स ऑफ एंत्रेप्रेन्युअर्शिप ते पोल डान्सिंग सर्व प्रकारचे कोर्सवर्क असते. शरीरविक्री व्यवसायिकांनी प्रशिक्षित व्यक्तीच घेणार असे जाहीर केले तर सहा महिन्यात युनिव्हर्सिटीज कोर्सवर्क ऑफर करतील!!)

सी, अ‍ॅसिड टाकू नये या भीतीमुळे कुंडलीचं कारण कोणी देतं का? अजुन एक अ‍ॅसिड टाकणारे विकॄत लोक त्या कारणामुळे थांबतात का? तंबाखू, गुटखा, दारुसारखेच हानीकारक व्यसन आहे ज्योतिष - हे तुझे म्हणणे पटले. त्यात एकदा गेलं की माणूस ओढला जातो, चाळाच लागतो असे ऐकुन व अनुभवुन आहे. सिलेक्टीव्ह रीडींग केल्यामुळेच, ज्योतिष खरे वाटू लागते हेही तितकेच सत्य आहे.

बाकी महामारीचे भविष्य अगदी कोणीच कसे वर्तवले नाहि? मी सॅम जेप्पीला फॉलो करत होते. तेव्हा तो एवढच म्हणाला होता की '९/११ सारखी अगदी ग्रहस्थिती दिसते आहे. तसा विध्वंस होणारसे वाटते." अरे काय हे!!! कुठे ९/११ आणि कुठे हा महामारीचा उच्छाद, हैदोस, हॅवक.

अगं, अ‍ॅसिड टोकाचं उदाहरण दिलं, तेच्च धरू नकोस - अनेक घरात मुलींकडून नकार घेण्याची मानसिकता नसते. मुलींना काही ना काही रिपर्कशन्स होतात. मुलीचे आई-बाप जाणून असतात. 'आमचे गुरूजी नको म्हणाले' असे इंडिपेंडंट अडव्हायझरकडून रिपोर्ट घेऊन प्रॉजेक्ट शेल्व्ह करता येतो. त्यात गुरूजी हो म्हणाले का नाही कोण तपासतं! मुलांनाही रिस्पेक्टेबल क्लोझर मिळतं.

शिक्षणाने काही अंधश्रद्धा दूर झाल्या, जसे सोने दुप्पट करून देणे, अमुक रोग म्हणजे देवतेचा कोप, गतजन्मीचे पाप वगैरे.
पण बऱ्याच अजूनही राहिल्या. काही एअरलाईन्स विमानात १३ क्रमांकाची रो ठेवत नाहीत , हे एक पटकन आठवलं.

फल ज्योतिष आणि बाबांवर विश्वास ठेवणारे कित्येक उच्च शिक्षित आहेत. डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वैज्ञानिक संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ पदावर असलेले लोक सहज आढळतात. (हे केवळ ऐकीव नाही, माझी आधीची नोकरी आणि सध्याचा व्यवसाय निमित्ताने यांच्याशी चांगलाच संपर्क झाला/होतो.)

आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या कायप्पा ग्रुपवर BE/ME/MTech/MS/pHd झालेले, चांगल्या कॉलेज मध्ये प्रोफेसर /HOD असणारेही सहज सापडतात. कोव्हीड वाढू लागला आणि तो अमक्या तारखेला भारतातून, तमक्या तारखेला जगातून जाईल वगैरे भाकिते येऊ लागली तेव्हा तर त्यावर विश्वास ठेवणारे आपण समजतोय त्यापेक्षा कितीतरी आहेत हे लक्षात आले.

(तेव्हा लेखकांच्या IUCAA मध्येही फलज्योतिष्यावर विश्वास ठेवणारे सापडले तरी नवल वाटणार नाही. Proud )

तेव्हा केवळ शिक्षणातून प्रबोधन होईल याची शंका वाटते.
अशा मानसिक पातळीवरच्या समजुती/गैरसमजुती त्या पातळीवरील समुपदेशनाने दूर करता येतील. यासाठी शिक्षणक्रमात याचा समावेश करता येईल किंवा कसे? (म्हणजे ते नक्की कसं करावं वगैरे नाही सांगू शकत. पण सध्याच्या शिक्षणातून ते होतय असं वाटत नाही.)

फलज्योतिषवाले अजुन एक पळवाट काढतात विशेषतः पाश्चात्य महारथी. ते म्हणतात - 'ज्योतिष हे प्रेडिक्टिव्ह सायन्स नाहीच. तर स्वभान देणारे टूल आहे. तुम्हाला स्वतःची तसेच इतरांची बलस्थाने व तॄटी/ वीकनेसेस लक्षात येतात. पण माझे आता मत होत चालले आहे की - इन फॅक्ट आपण स्वतःलाच लेबल लावुन घेतो. मी कर्क राशीची आहे मी फार हळवी आहे. मी तूळेचा मी संतुलित, मी वृश्चिक फार डुख धरणार की मी धनुचा म्हणजे पार्टी अ‍ॅनिमल. या लेबल्स्मध्ये जखडले जाणे हा या स्युडोसायन्सचा पिटफॉल आहे.

वाचनीय आणि मननीय लेख.

>>> त्यासाठी नवा हमरस्ता तयार करायची गरज नाही. ज्या वाटा आहेत त्या शिक्षणाने पुसायच्या का नव्या तयार करायच्या?
सहमत.

डॉ. पुरंदर्‍यांच्या 'शल्यकौशल्य' पुस्तकात ते प्रसूतीआधी आईची कुंडली पाहाणं, रुद्राक्ष परीक्षा (नीट आठवत नाही, पण दोर्‍याला रुद्राक्ष बांधून तो आईच्या पोटावर धरून कसा फिरतो यावरून काही आडाखे) करीत असत असं वाचल्याचं आठवतं.
खूप वर्षं झाली वाचून, त्यामुळे तपशिलांत कदाचित गडबड असू शकते, पण मानव यांच्या पोस्टवरून आठवण झाली.

रिस्पेक्टेबल क्लोझर !
हे खरे तर समाजाने मुलांचे जास्त लाड केल्याचे परिणाम आहेत. एखाद्या मुलीने नकार दिला तर त्यात काय एवढे वाईट वाटून घ्ययचे ? तुम्ही नाही का काही ना काही खुस्पटे काढून मुलींना नकार देत ?

हे थोतांड आहे अशा प्रकरचे लेख शंभर वर्षे तरी आले आहेत, पण तरीही नऊ ग्रह , त्यांचे स्वभाव, त्यांचे बरे वाईट परिणाम, तेजस्वी दिसणार्‍या शुक्राचे चांगले फल, शनी मंगळ वगैरे कुरूप ग्रहांचे वाईट फल हे इतके fascinating आहे की आजपासून शंभर वर्षांनी मायबोली वर गेलो तरीही "ज्योतिष : शास्त्र की थोतांड " असा बीबी पहायला मिळेल.

मस्त लेख आहे! जुन्या माबो वर ज्योतिष एक विज्ञान की थोतांड अशी चर्चा होती ती आठवली Happy

>>काडीचा आधार काढ्ण्याआधी बुडत्याला पायावर उभे करा.>> पण लेखात काडीचा आधार काढण्याविषयी काही आहे का? मला दिसलं नाही.
असे सरकारी अनुदानप्राप्त, लेजिटिमेट महाविद्यालयात कोर्सेस शिकवल्याने त्या काडीचा खुंटा हलवुन बळकट करुन त्याचं कायमस्वरुपी मोठ्या काठीत रुपांतर करण्याचे समर्थन अनाकलनीय वाटले.
ज्यांना फ्रिंज मध्ये ज्योतिष शिकायचं आहे, पत्रिका बघायची आहेत ते बघतील बापडे. जे आज मुख्यप्रवाहात नाही, आणि जे अ‍ॅसिड हल्ल्यापासुन सुरक्षा ते नकार देण्यासाठी टूल म्हणून वापरात आहे तर ते तितकं जुजबी चालू आहेच. त्याचा लेजिटिमसीने खुंटा हलवायच्या क्रियेला समर्थनाची काय गरज?

>>>>>पण लेखात काडीचा आधार काढण्याविषयी काही आहे का?
बहुतेक सी ने कमेंट बदलली. तिने बंदी घालण्यासंदर्भात काहीतरी लिहीलेले होते 'बंदी घाला' अशा आशयाचे. असे धूसर स्मरते.

>>शिक्षणातून प्रबोधन होईल याची शंका वाटते. >> लौकिक शिक्षणाबाबत दुर्दैवाने मान्य. आपल्या लेव्हलवर कटाक्षाने पुढच्या पिढीत जाणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यायची.
ज्योतिष थोतांड आहे हे रिग्रेसिस्ववृत्तीच्या समाजामुळे लौकिक शिक्षणात समाविष्ट करणे बहुदा शक्य झाले नसावे. तर किमान ती एक कला (उद्या शास्त्र ही असेल) आहे याला समर्थन देण्यात एक पाऊल मागे तरी टाकू नये.

Lol
रिग्रेसिव्ह असलं तरी ते एक 'प्रॉडक्ट' आहे. घेणारे घेतात, विकणारे विकतात. जगभरात २ बिलियनची इंडस्ट्री आहे. थोतांड असेल तर एवढी मोठी इंडस्ट्री का झाली, का एवढ्या काळ टिकली ह्याचा विचार व्हावा. इतके लोक इतक्या मोठ्या काळ मानसोपचाराच्या गरजेत होते म्हणून? मग आग सोमेश्वरी प्रकार घडतो आहे का? असलेले रिसोर्सेस मानसोपचाराच्यासाठी लावायचे की ज्योतिष विरोधात खर्च करायचे. माझ्या दृष्टीने हे एक दारू, गुटखा सारखे प्रॉडक्ट आहे. मी समर्थन ही करत नाही, की विरोधही करत नाही. It's not a battle I'd pick. माझ्या कुठल्याही पोस्टीत मी समर्थन करते असे जाणवले असल्यास क्षमस्व!

ज्योतिषविषयक धोरणाची तुलना उत्तेजक पदार्थांबाबतच्या धोरणाशी करायची तर आधी 'ज्योतिष आरोग्यासाठी अपायकारक आहे' असा वैधानिक इशारा सरकारने शक्य तिथे द्यायला सुरुवात करायला हवी. मग सरकारमान्य ज्योतिष अभ्यासक्रमातही त्याच्या अपायांचा अंतर्भाव / उहापोह व्हायला हवा.

किमान ती एक कला (उद्या शास्त्र ही असेल) आहे याला समर्थन देण्यात एक पाऊल मागे तरी टाकू नये. >> अर्थात. अभ्यासक्रमात फल ज्योतिष घेणे याचे अजिबात समर्थन नाही.

'प्रॉडक्ट' आहे तर प्रॉडक्टवर मिळते तशी काही हमी मिळते का ज्योतिषांकडून? की भविष्य चुकीचं ठरल्यावर थातुरमातुर स्पष्टीकरणं मिळतात? मग वाया गेलेला पैसा, वेळ, योग्य उपाययोजना केली नसल्याने निघून गेलेली वेळ, आलेलं मानसिक दौर्बल्य, बौद्धिक परावलंबित्व यांचा हिशेब कसा लावायचा?

तर किमान ती एक कला (उद्या शास्त्र ही असेल) आहे याला समर्थन देण्यात एक पाऊल मागे तरी टाकू नये. >> Scientific knowledge is a body of statements of varying degrees of certainty -- some most unsure, some nearly sure, none absolutely certain. हे फाईनमन म्हणाला.

'तुम्ही ह्या विषयाचा शास्त्र म्हणून अभ्यास ऑथोराईझ करायचा नाही' हे म्हणणे, ब्रुनोला 'अंतरिक्षा बद्दल अभ्यास करू नकोस तुझी मते मांडू नकोस' असे म्हणणार्‍या चर्चच्या विधानापेक्षा किती वेगळे आहे? चर्चलाही तेव्हा 'आम्हीच बरोबर आहोत आणि ब्रुनो भाकडकथा सांगतो आहे' असा ठाम आत्मविश्वास होता. आपण ज्योतिषशास्त्राच्या भाकडपणाबद्दल आपल्या मतांवर ठाम राहू शकतो पण कुणाला ते शिकण्यापासून रोखू शकत नाही... तो अशास्त्रीय स्टान्स होईल.

खगोलशास्त्रातली प्रगती आणि विज्ञान आणि ग्रहगोलांच्या स्थितीवर आधारित फलज्योतिष ह्यात साधर्म्य वा परस्परसंबंध काय आहे? - ग्रहगोल?
फिंगरप्रिंट अ‍ॅनालिसिस हे शास्त्र आणि हस्तसामुद्रिक ह्यात साधर्म्य वा परस्परसंबंध काय आहे? - हस्तरेषा?
सबकॉन्शस माईंड (मेटाफिजिकल सायन्स) आणि सायकिक पावर ह्यात साधर्म्य वा परस्परसंबंध काय आहे? - माईंड/मेंदू?

ग्रहगोल, हस्तरेषा, मन ही फक्त शास्त्राची/विज्ञानाची मक्तेदारी नाही. कोणीही ह्या गोष्टी हव्या तशा ईंटरप्रीट करण्यास स्वतंत्र आणि कायद्याने समर्थ आहे.
माझ्या मते शास्त्राने विज्ञानाच्या आधारे प्रश्नांची ऊकल करत रहावी आणि ते ज्ञान खुले करत रहावे. समविचारी, सुज्ञ लोक त्या शास्त्राच्या आधारावर क्रिमिनल प्रोफाईलिंग, सायकॉलॉजिकल अ‍ॅनालिसिस असे अ‍ॅप्लिकेशन्स आणत राहतील.
बाकी ग्रहगोल वापरून कोणी फलज्योतिष सांगतंय की स्टारवॉर्स बनवतंय? मेलेल्या लोकांशी संवाद साधतंय की मॅचमॅकिंग करतंय अशा डॉक्ट्राईन्सनी शास्त्र आणि त्याच्या विद्यार्थ्यांनी डिस्ट्रॅक्ट होऊ नये.
वेगळे 'स्कूल ऑफ थॉट्स' सगळ्याच क्षेत्रात असतात, ते असणे, त्यांचा अभ्यास करता येणे आणि ते मांडता येणे हा विज्ञानाच्या परे व्यक्तीस्वातंत्र्याचा विषय आहे.

पण अशा सुज्ञ लोकांनी इतरांपर्यंत हे विचार पोहोचवणे अतिशय आवश्यक झाले आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. >> चांगला विचार पण फार प्रॅक्टिकल वाटत नाही. लेखातली बेस अ‍ॅझंप्शन अशी आहे की जगातल्या सगळ्या लोकांना अद्ययावत शात्रीय माहितीचा अ‍ॅक्सेस ऊपलब्ध आहे आणि ती माहिती प्रोसेस करण्यासाठी लागणारे शिक्षण, बुद्धी, वेळ, ईच्छा सगळ्यांकडे सारखी आहे. म्हणून जे विज्ञानाच्या पाईकांना कळते ते सगळ्यांना कळावे आणि त्यांनी ते आचरणात आणावे.
वेल, हे अशक्य आहे. वैज्ञानिक ज्ञानाचा सर्वदूर प्रसार नक्कीच करायला हवा पण तो करतांना त्याला छेद देऊ पाहणार्‍या ईतर समजुतींना भाकड म्हणत बडगा दाखवण्याची गरज पडू नये.

तू अश्विनी, इथे ज्योतिषावर किंवा ज्योतिष्यांवर बंदी आणण्याबद्दल (किंवा चर्चने शास्त्रज्ञांना दिलं तसं ज्योतिष्यांना सुळी देण्याबद्दल) चर्चा चाललेली नाही.

>>>>>>'तुम्ही ह्या विषयाचा शास्त्र म्हणून अभ्यास ऑथोराईझ करायचा नाही' हे म्हणणे, ब्रुनोला 'अंतरिक्षा बद्दल अभ्यास करू नकोस तुझी मते मांडू नकोस' असे म्हणणार्‍या चर्चच्या विधानापेक्षा किती वेगळे आहे?

मुद्दा अचूक आहे Sad

>>>>>>>वेगळे 'स्कूल ऑफ थॉट्स' सगळ्याच क्षेत्रात असतात, ते असणे, त्यांचा अभ्यास करता येणे आणि ते मांडता येणे हा विज्ञानाच्या परे व्यक्तीस्वातंत्र्याचा विषय आहे.
टाळ्या!!! हे असे विचार ऐकायला मिळतात ना त्याचे अप्रुप वाटते.

>> ब्रुनोला 'अंतरिक्षा बद्दल अभ्यास करू नकोस तुझी मते मांडू नकोस' असे म्हणणार्‍या चर्चच्या विधानापेक्षा किती वेगळे आहे? >> मला वाटतं संपूर्णपणे वेगळं आहे. वरच्या लेखात फंडिंग कशाला द्यावं आणि देऊ नये याचा सुंदर उहापोह आलेला आहे. इथे विषय, 'अशा प्रकारे फंडिंगच्या तराजूतुन तावुन सुलाखुन न निघता या विषयाचा विद्यापीठात फंडेड अभ्यासक्रम असावा का?' असा आहे. वैयक्तिक/ प्रायव्हेट पैशाने ज्योतिषाचा अभ्यास करा अथवा करू नका कुणाला त्याच्याशी काही घेणं देणं असू नये.

मला काळी जादू, भानामती, witchcraft यांचा अभ्यास करायचा आहे. भूतांवर नियंत्रण कसे करायचे हे शिकायचे आहे. हे वापरून लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत करायची आहे.
यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा, शास्त्र म्हणुन मान्यता देण्यात यावी.

https://youtu.be/KjkAod8YTO8 मानवदादा, ये सिर्फ आपके लिए. सूझी ऑर्मन ही वित्तीय सल्लागार आहे (?). कॅन यू अफोर्ड इट हे सेगमेंट यायचे पूर्वी.

Pages