सारस शुभेच्छा

Submitted by Barcelona on 23 June, 2021 - 17:22
सारस शुभेच्छा

[चित्रः नाओकी ओनोगावा, बोअर्ड पांडा]

सारस शुभेच्छा

शुभेच्छा देणे आणि घेणे अवघड असते.

खोटं नाही - “शुभेच्छा घ्या” म्हणालो तर काय शैलीत दिल्या, का दिल्या, कुणी दिल्या, कुणाला देता, रोज का देता, इथे का देता, कैच्याकै इ सर्व प्रकारचा काथ्याकूट होतो. “धन्यवाद, थँक्यू इ” म्हणून पुढे सरकणे अनेकांना अवघड जाते. तसेच एखादा एखादा दिवस कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश बरोबर असा जातो की कुणालाही कशाच्याही शुभेच्छा देणे नको वाटते. थोडक्यात, शुभेच्छांचीही प्रॅक्टीस लागते.

म्हणून केवळ शुभेच्छा देण्या-घेण्यासाठी हा धागा!!

आता थोडं सारस विषयी - हे सारस शुभेच्छा “व्रत” स्वतःसाठी करत नाहीत, इतरांसाठी असतं. जपानी लोकं १००० ओरिगामी सारस (क्रेन्स) करून एकमेकांना देतात. कुणी खूप आजारी असेल, मोठ्या परीक्षेला किंवा स्पर्धेला जाणार असेल इ तर देण्याची प्रथा आहे. “Senbazuru” सर्च इंजिन मध्ये पाहिलं तर अधिक माहिती सापडेल.

कार्पोरेट कल्चर मध्ये याचा ‘टीमवर्क’ साठी वापर केला जातो. एक व्यक्तीने केले तर अनेक वेळा हे “व्रत” पूर्ण ही होत नाही अशी धारणा आहे. म्हणून सहसा टीम्स मिळून अशा ऍक्टिव्हिटी करतात. ह्यात “कारण” जसे आजारपण, परीक्षा इ आवश्यक नाही. पेशन्स वाढणे, सामंजस्य वाढणे, सर्जनशीलता वाढणे, एकत्र काम करणे असा काहीसा उद्देश असतो.

असंबद्ध गप्पा या वाहत्या धाग्यावर सारस चित्रांची सुरुवात झाली. मी सुरुवात करायला निमित्त ठरले पण मला रोज जमतच असं नाही. १०० सारस दिवस पूर्ण करता करता मी जिथे कमी पडले तिथे तिथे इतर आयडीनीही स्वतः केलेली ओरिगामी, इतरांची ओरिगामी, ते सारस विमान रूपातील ‘सारस चित्रे’ आणली. टीमवर्कची हीच तर मजा असते. काहींना मजा आली, काहींना बोअर झालं पण चर्चेतून वाहत्यापेक्षा कायम स्वरूपी धागा असावा असे धाडस आले. आता इथे दिवस १०१ पासून पुढे सुरु… १००० दिवसापर्यंत प्रयत्न करूया.

धाग्याचे नियम काय -

शुभेच्छा द्या आणि घ्या. मी रोज एक ओरिगामी सारस चित्र टाकायचा प्रयत्न करेन. मी स्वतः ओरिगामी फार करत नाही पण उत्तम आर्टिस्टची ओरिगामी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्हीही शुभेच्छा+चित्रे देऊ शकता. चित्र सारस/क्रेन या विषयाच्या अनुषंगाने असल्यास उत्तम. आज कॅमेरात क्रेन नसेल तरी ९०० दिवस आहेत, मंडळी. ९०० दिवस चालू राहणारा उपक्रम आहे.

शुभेच्छा स्वीकारल्या तर थँक्यू/धन्यवाद इ म्हणून जा. नाही स्वीकारल्या, नाही आवडल्या तर मुद्दामून सांगायची गरज नाही Happy

(एखादी कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश आयुष्यात असेल नि तुमच्या मनातून अजिबात शुभेच्छा येत नसतील तर… होतं असं बॉस!! तसं सांगू शकता मला आणि आप की फर्माईश छाप मी तुमच्या वतीने शुभेच्छा पोस्ट करेन. #positivevibes)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy मस्त शुभेच्छा, धन्यवाद !
हा सारस भरतनाट्यमसाठी पावलांची पोज घेतल्यासारखा दिसतो.
किल्ली , जांभूळ शुभेच्छा ❤

दिवस ११४ चित्र ३७ मस्त चित्र श्रवु. सर्वांना धन्यवाद.
PetriDamsten.jpeg (credit: Petri Damsten) तेरा दिवसांपूर्वी सर्फसाईड, फ्लोरिडा इथे इमारत कोसळली. आजही तिथे १०० लोकं मलब्यात अडकलेली आहेत. त्यात एल्सा नावाचे चक्रीवादळ येणार म्हणून हानी टाळण्यासाठी इमारतीचा उरलेला भाग पाडला. इस्रायल व अन्य जागी अशा सुटका मोहिम करणारे तज्ञ म्हणतात २७ दिवसांपर्यंत जिवंत माणसे सापडल्याच्या घटना आहेत. म्हणून शोध मोहिम चालू ठेवायची आहे पण वादळामुळे खंड पडणार किंवा काम अवघड होणार आहे. शोधकार्यात सहभागी सर्वांना अनुकूल परिस्थिती मिळू दे या साठी शुभेच्छा.

दिवस ११५ चित्र ३८ सर्वांना धन्यवाद!!!

Banksy.jpeg (Credit: Walt Jabsco) मी "बँक्सी" हे नाव २-३ वर्षापूर्वी ऐकले. बँक्सी हे त्याचे खरे नाव नाही पण हा ब्रिटनमधला चित्रकार. अचानक एखाद्या भिंतीवर सुरेख ग्राफिटी चित्रे काढायची ही त्याची शैली. बर्‍याच वेळा ही चित्रे इतकी सुरेख, आशयपूर्ण असत की त्या चित्राचे चित्र मिलीयन पाऊंड किमतीस विक्रीस यायचे. 'गर्ल विथ बलून' हे असेच एक साधे पण सुंदर चित्र. मात्र त्या चित्राच्या लिलावात जो स्टंट घडला त्यामुळे ती बातमी टी.व्हीवर आली आणि मला बँक्सीची माहिती कळली. बँक्सीने काढलेला एक ओरिगामी सारस आज सापडला. बँक्सीच्या इतर चित्रांचीही ओळख होण्यासाठी शुभेच्छा!!

दिवस ११६ चित्र ३९ धन्यवाद मृ.

Sharon.jpeg (credit: Sharon Gerald) विकेंड आला. मंगळवार सोडला तर जगात नेहमी कुठे ना कुठे विकेंड असतो. म्हणजे भारतात सोमवार येतो तेव्हा हवाईत अजून रविवारच असतो. काही देशात (उदा: अफगाणिस्तान) गुरूवार शुक्रवार विकेंड असतो तर काही जागी (उदा: अनेक आखाती देशात) शुक्रवार-शनिवार असतो. बुधवारी फ्रांस मध्ये अनेक शाळा बंद असतात. थोडक्यात, एक मंगळवारच असा आहे की जगात सगळीकडे विक डे असतो.... विकेंडाच्या शुभेच्छा!!

सारसाचं पेंटींग मस्तच आहे. पण लिलालातला स्टंट का केला म्हणे? चक्क पेंटिंग श्रेड केलं? कारण कळलं नाही.
आजचा यल्लो सारस पण छान.

विडियो भारी आहे. पेंटींग विकले गेल्यावर श्रेड केले. खरा कलाकार आहे हा.

विनी पूह सारखे पिवळे सारस पण मस्त दिसत आहेत.

दिवस ११७ चित्र ४० धन्यवाद सर्वांना...
mattwharton.jpeg (credit: Matt Wharton) दि ११५ मधल्या बँक्सीने चित्र श्रेड का केले? त्याच्या रेबल प्रतिमेला अनुसरून केलेला तो खोडसाळपणा (प्रँक) होता. बँक्सीला चित्र पूर्ण नष्ट करायचे असावे कारण त्याने सोशल मिडीयावर दुसर्‍या दिवशी लिहीले- 'every act of creation is first an act of destruction' पण चित्र पूर्ण श्रेड झाले नाही आणि ...आता त्याची किंमत दुप्पट झाली. मार्सेल ड्यूशाँ, रॉबर्ट रॉशेनबर्ग अशा इतर कलाकारांनीही एक चित्र नष्ट करून दुसरे चित्र निर्माण केले होते (उदा: मूळ चित्रावर काही काही जागी कागद लावून इ इ). त्यांच्या परंपरेत तो जाऊन बसला. आजचा हा तुटका-फुटका बिघडलेला सारस नि काहीतरी किरकोळ माफक तोडफोड करायला शुभेच्छा!!

दिवस ११८ चित्र ४३
मातीत ते पसरिले अतिरम्य पंख....ना. वा टिळक, आठवले..>>>> छानच >> +१
धनुडी, काय मस्त सारस केला आहे. बाबांना नमस्कार आणि शुभेच्छा दोन्ही सांग!! सर्वांना धन्यवाद.
NASA.jpeg (credit: NASA Johnson) जुलै ११ सकाळी ६ पीएसटी वाजता रिचर्ड ब्रॅन्सन हा ब्रिटीश उद्योगपती त्याच्या व्हर्जिन गॅलॅक्टीक यानातून अंतरिक्षात जाणार. बरेच टीव्ही चॅनल्स थेट प्रक्षेपण करणार आहेत. झकाsssस!! शुभेच्छांसाठी हे अंतरिक्षयात्रींनी तयार केलेले सारस चित्र!! (हे मूळात तोहोकू-कान्तो येथील भूकंपग्रस्तांना सदिच्छा देण्यासाठी केले होते. पण आज हे चित्र इथेही शोभेल). व्हर्जिन गॅलॅक्टीक टीम, शुभस्ते पंथानः सन्तु.... .

धन्यवाद सगळ्यांना! नक्की सांगते बाबांना, ओरिगामी त्यांना अतिशय आवडते.
त्यांची जेव्हा हार्ट ची बायपास झाली होती त्यावेळीही शुध्दीवर आल्यानंतर दोन-तीन दिवसांनी त्यांनी ओरिगामीसाठी कागद मागितला आणि स्कीमॅन केला. त्यांच्या रिकव्हरी मध्ये ओरिगामीची खुप मदत झाली होती. Happy असो मी बरीच मागे गेले विचार करता करता.
रिचर्ड ब्रॅन्सन ला अंतरिक्ष प्रवासासाठी शुभेच्छा

दिवस ११९ चित्र ४४ धनुडी आणि सर्वच धन्यवाद.
bethan.jpeg (credit: Bethan) सिटीयस...अल्टीयस...फोर्टीयस... म्हणजे faster, higher, stronger हे ऑलिंपिकचे घोषवाक्य आहे. करोनापायी २०२० ऐवजी २०२१ मध्ये टोकीयो ऑलिंपिक भरवण्याचे ठरले. ~८३% जपानी लोक विरोधात आहेत पण केलेली १२ बिलियन डॉलरची गुंतवणूक लक्षात घेता ऑलिंपिक होऊ देणे योग्य म्हणून विनाप्रेक्षक खेळ होणार आहेत. खेळ सुरू होण्यासाठी अजून १२ दिवस आहेत. माणूस faster, higher, stronger ठरेल का करोना?? योग्य ते निर्णय घेण्यासाठी सर्व प्रशासकांना शुभेच्छा.

दिवस १२० चित्र ४५ धन्यवाद मृ.
Simona.jpeg (Credit: Simona) लाल-काळी रंगसंगती पाहिली की ख्रिश्चन लोबुटॅन ह्या डिझायनरची गोष्ट आठवते. तो पंप शूज डिझाइन करत असताना त्याची सहायिका नखाला लालचुटूक नेलपेंट लावत होती. त्याने तेच नेलपेंट बूटाच्या तळव्यांना लावले. खरं तर बूटाची खालची बाजू कोण बघतं... पण चार इंची हिल्सचे सोल्स दिसतातच, मग ते सुरेखच हवे. अशा 'अटेंशन टू डिटेल' च्या अट्टाहासापायी त्याने ते बूट रंगवले आणि ट्रेडमार्क केले. अर्थातच ते लोकप्रिय झाले. आज काही 'अटेंशन टू डिटेल' करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी शुभेच्छा!!

Pages