सारस शुभेच्छा

Submitted by Barcelona on 23 June, 2021 - 17:22
सारस शुभेच्छा

[चित्रः नाओकी ओनोगावा, बोअर्ड पांडा]

सारस शुभेच्छा

शुभेच्छा देणे आणि घेणे अवघड असते.

खोटं नाही - “शुभेच्छा घ्या” म्हणालो तर काय शैलीत दिल्या, का दिल्या, कुणी दिल्या, कुणाला देता, रोज का देता, इथे का देता, कैच्याकै इ सर्व प्रकारचा काथ्याकूट होतो. “धन्यवाद, थँक्यू इ” म्हणून पुढे सरकणे अनेकांना अवघड जाते. तसेच एखादा एखादा दिवस कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश बरोबर असा जातो की कुणालाही कशाच्याही शुभेच्छा देणे नको वाटते. थोडक्यात, शुभेच्छांचीही प्रॅक्टीस लागते.

म्हणून केवळ शुभेच्छा देण्या-घेण्यासाठी हा धागा!!

आता थोडं सारस विषयी - हे सारस शुभेच्छा “व्रत” स्वतःसाठी करत नाहीत, इतरांसाठी असतं. जपानी लोकं १००० ओरिगामी सारस (क्रेन्स) करून एकमेकांना देतात. कुणी खूप आजारी असेल, मोठ्या परीक्षेला किंवा स्पर्धेला जाणार असेल इ तर देण्याची प्रथा आहे. “Senbazuru” सर्च इंजिन मध्ये पाहिलं तर अधिक माहिती सापडेल.

कार्पोरेट कल्चर मध्ये याचा ‘टीमवर्क’ साठी वापर केला जातो. एक व्यक्तीने केले तर अनेक वेळा हे “व्रत” पूर्ण ही होत नाही अशी धारणा आहे. म्हणून सहसा टीम्स मिळून अशा ऍक्टिव्हिटी करतात. ह्यात “कारण” जसे आजारपण, परीक्षा इ आवश्यक नाही. पेशन्स वाढणे, सामंजस्य वाढणे, सर्जनशीलता वाढणे, एकत्र काम करणे असा काहीसा उद्देश असतो.

असंबद्ध गप्पा या वाहत्या धाग्यावर सारस चित्रांची सुरुवात झाली. मी सुरुवात करायला निमित्त ठरले पण मला रोज जमतच असं नाही. १०० सारस दिवस पूर्ण करता करता मी जिथे कमी पडले तिथे तिथे इतर आयडीनीही स्वतः केलेली ओरिगामी, इतरांची ओरिगामी, ते सारस विमान रूपातील ‘सारस चित्रे’ आणली. टीमवर्कची हीच तर मजा असते. काहींना मजा आली, काहींना बोअर झालं पण चर्चेतून वाहत्यापेक्षा कायम स्वरूपी धागा असावा असे धाडस आले. आता इथे दिवस १०१ पासून पुढे सुरु… १००० दिवसापर्यंत प्रयत्न करूया.

धाग्याचे नियम काय -

शुभेच्छा द्या आणि घ्या. मी रोज एक ओरिगामी सारस चित्र टाकायचा प्रयत्न करेन. मी स्वतः ओरिगामी फार करत नाही पण उत्तम आर्टिस्टची ओरिगामी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्हीही शुभेच्छा+चित्रे देऊ शकता. चित्र सारस/क्रेन या विषयाच्या अनुषंगाने असल्यास उत्तम. आज कॅमेरात क्रेन नसेल तरी ९०० दिवस आहेत, मंडळी. ९०० दिवस चालू राहणारा उपक्रम आहे.

शुभेच्छा स्वीकारल्या तर थँक्यू/धन्यवाद इ म्हणून जा. नाही स्वीकारल्या, नाही आवडल्या तर मुद्दामून सांगायची गरज नाही Happy

(एखादी कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश आयुष्यात असेल नि तुमच्या मनातून अजिबात शुभेच्छा येत नसतील तर… होतं असं बॉस!! तसं सांगू शकता मला आणि आप की फर्माईश छाप मी तुमच्या वतीने शुभेच्छा पोस्ट करेन. #positivevibes)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवस १३६ चित्र ६४ धन्यवाद मृ, अस्मिता !! निरू, प्रतिसाद काढून का टाकला?
moneyheist.jpeg (Credit: Pedro Joffily de Araújo) महत्त्वाचे क्षण ते असतात जेव्हा आपल्याला कळते- आता परत फिरणे नाही. ... असं मी नाय म्हणत. "मनी हाईस्ट" नावाची एक भन्नाट मालिका आहे, त्यातलं वाक्य आहे. चोर स्वतःला गावांची नावे - लंडन, नैरोबी, रियो इ इ घेतात आणि स्पेनमधली टांकसाळ लुटतात. "कोण होणार करोडपती?" जसं मराठीत केलं तसं मनी हाईस्ट मराठीत यावं... "ए सातार्‍या, झालं का खणून तुजं?" "परभणे, तुला दोन माणसे बदडता येईना व्हयं" "ए भो नगर्‍या, तुला आकार न्हाई तर उकार रफार बी काय न्हाई" असले डायलॉग भारी वाटतील. मनी हाईस्ट मराठीत येण्यासाठी शुभेच्छा!!! (बेला चाओ ऐवजी "वडा पाओ, वडा पाओ, वडा पाओ" गाऊ हो... बस्सं मराठीत मनी हाईस्ट आणा.)

सी फ्रेममध्ये अडकलेला सारस छान आहे. आणि मनिहाईस्ट मराठीत भाडिपाच बघितलंय Lol
निरु मी वाचली तुमची पोस्ट, अस्मिता ला पिक्चर सुचवत होतात ना, पण तो वाहाता धागा, त्यामुळे नाव वाहून गेलं.
हायला ऑटो करेक्शनने कायच्याकाय टायपायला होतय राव

Biggrin
वाचलं होतं मी

दिवस १३७ चित्र ६५ धन्यवाद!
couple.jpeg (Credit: Sharon Gerald) जगात पांडा प्राण्याची संख्या १८०० इतकीच आहे. 'व्हल्नरेबल' प्राणी म्हणून संवर्धनाचे प्रयत्न जगभर चालू आहेत. शिकार इ कारणे कमी पडली म्हणून की काय त्या कमतीला भरती म्हणजे पांडा भयानक आळशी असतो. म्हणजे इतका आळशी की ठराविक दिवशी बाळं तयार करायचाही आळस असतो (खोटं नाही!). झू अधिकारी बहुतेक वेळा व्हेट डॉक्टरची मदत घेऊन संवर्धन करतात. मात्र फ्रेंच झू मधली हुआन हुआन ही पांडा त्यांच्या जगातील सनी लिओनी असावी. काल तिला जुळं झालं (आता कसं नका विचारू! यूआन झी पांडाला माहित!). पांडाचे बाळ होते तेव्हा डॉक्टरांना फार लक्ष ठेवावे लागते कारण बाळापेक्षा आई ४०० पट वजनदार असते. बाळ आंधळं असतं नि मुलगा की मुलगी ते जेनेटीक टेस्ट केल्याशिवाय कळत नाही. हुआन हुआन ची बाळं सुखरूप आहेत. अजून तीन महिने त्यांचे नाव ठेवणार नाही. बाळाचे छानसे नाव ठेवण्यासाठी तेथील झू अधिकार्‍यांना शुभेच्छा!

दिवस १३८ चित्र ६६ धन्यवाद!!
Daniellee.jpeg (Credit: Daniel Lee) न खाल्लेला पदार्थ करून बघायचा म्हणजे त्यात एक सुरक्षितता असते नि जोखीमही असते. सुरक्षितता अशासाठी की कुण्णाला माहिती काय 'गोल्ड स्टँडर्ड' म्हणजे बिघडला पण आवडला तर पुरे आहे, आणि जोखीम अशासाठी की कुणाला माहिती काय गोल्ड स्टँडर्ड म्हणजे बिघडला तर काय सुधारायचे नि कसे ते चटकन कळणार नाही. असा एक पदार्थ करायचे मनात आहे - तामेया. सध्या (म्हणजे सुमारे १०० वर्षापासून) फलाफल पदार्थावरून वाद सुरू आहे. इस्रायल, पॅलेस्टाईन इ जागी हा पदार्थ छोले (चणे) वापरून केला जातो तर इजिप्त मध्ये फ्लावा बिन्स वापरून. कोणता जास्त चांगला? फ्लावा बिन्सच्या फलाफलला तामेया म्हणतात. कृती सोपी वाटते पण जमेल का? केल्याशिवाय कसं कळणार. न खाल्लेला पदार्थ करण्यासाठी आजचा 'स्प्रेड योर विंग्ज अँड फ्लाय' सारस. आजचा दिवस चांगला जावो!

सुंदर सारस!
तामेया पण मस्त चटपटीत वाटतोय.
न खाल्लेला पदार्थ बनवायची रिस्क घ्यायला पाहिजे एकदा. शुभेच्छा साठी आभार.
तुलाही शुभेच्छा! Happy

दिवस १३९ चित्र ६७ मृ धन्यवाद!!
henry.jpeg (Credit: Henry) सोम्मेलिय(र ... . हा र सायलेंट वाचावा) ह्या व्यवसायाला शिक्षक, पोस्टमन इ व्यवसायांपेक्षा जास्त पगार असतो आणि जॉब सॅटीस्फॅक्शन ही जास्तच असावं Wink . हा/ही सोम्मेलिय(र) विविध वाईन्सची चव घेऊन मोठ्या हॉटेलातील शेफ मंडळींना कुठली दारू कुठल्या जेवणाबरोबर द्यावी असले सल्ले देतो. सगळं पिणं कसं मोजून, मापून, नीटस, राजस असतं, उगाच झिंगून-बिंगून पडत नाही कुणी कुठे तरी मराठी मध्यमवर्गीय घरात 'आमच्या बंडूला मोठेपणी सॉम्मेलिय(र) व्हायचे आहे' असे ऐकू येत नाही. मराठी मनाला भावेल असा मिल्क सॉम्मेलिय(र) व्यवसायाची माहिती आज झाली. मिल्क सॉमेलिय(र)!!! आता कैच्याकै म्हणालं आणि ते बरोबरही आहे ... पण झुकती है दुनिया... पालकांनी मिल्क सॉमेलियर पदासाठी गोठ्यात भरती करायच्या आत काहीतरी करियर सुचण्यासाठी शुभेच्छा!!!

पालकांनी मिल्क सॉमेलियर पदासाठी गोठ्यात भरती करायच्या आत काहीतरी करियर सुचण्यासाठी शुभेच्छा!!!>>>> Lol ऐतेन
शुभेच्छां साठी आभार, आणि तुला नवनवीन बातम्या मिळो ह्या शुभेच्छा

दिवस १४० चित्र ६८ धन्यवाद!!
chris.jpeg (Credit: Chris Connors) सामान्यपणे मराठी घरातले पाण्याचा आस्वाद घेण्याचे प्रशिक्षण म्हणजे - 'बसून पी, असं ढसाढसा नको पिऊ', 'गडू तर घे, अशी बाटली तोंडाला लावू नये', 'उष्टा कप माठात बुडवू नको, ओगराळ आहे ना तिथे', 'गार पाण्यानेच सर्दी झाली', 'एवढं हेमामालिनीचा फिल्टर आणला तरी जागो मोहन प्यारे छाप पाणी पिणं चाललंय'... अशा वातावरणात पाण्याचा ही 'सोम्मेलिय(र)' असतो ही कल्पना मनात तरी कशी येणार. यूट्यूबने सुचवलं म्हणून कळलं तरी.. आज पाण्यातले सारस ...आणि समरसून पाणी पिण्यासठी शुभेच्छा !

बसून पी, असं ढसाढसा नको पिऊ', '>>>> हे नेहमी ऐकलय. बसून पाणी पिण्याबद्दल दोन वर्षांपूर्वी प्राजक्ता माळीचा व्हिडिओ बघितलाय.
पाण्याबरोबर गुळाचा खडा म्हणूनच देत असतील का, थोडा वेळ जावा गटागटा पाणी नको प्यायला असं
सारस छान, माझ्या कडून ही शुभेच्छा.

खूपच गोड, अनामिका!! खूप शुभेच्छा
(मी चातुर्मास करत बसले, तर इथे दोन दिवस उशीरा आले.)

हे सारस मी माझ्या मेंटरसाठी केलेत. त्यांची १६ अॉगस्टला मेजर सर्जरी आहे. त्यांची सर्जरी सुखरुप पार पडून त्यांना बरं वाटो ह्यासाठी शुभेच्छा! १-२ कझिन्सना घेऊन १००० सारस पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. बघुया.
धन्यवाद मृणाली, धनुडी आणि सीमंतिनी ताई.

Pages