"आसरा"- एक वृद्धाश्रम!

Submitted by चंद्रमा on 7 July, 2021 - 13:15

....................... सह्याद्रीच्या गर्भामध्ये दडलेलं मानवी लोकवस्तीपासून दूर असलेलं जणू काही या मानवरूपी जनावराच्या माणसाळलेल्या प्रवृत्ती पासून सावध राहण्यासाठी हा 'आसरा' काही दैवी दानशूरांनी निर्माण केला होता. दुतर्फा अशोक आणि शाल वृक्षांची गर्दी असलेलं, सभोवताली 'कदंब', 'किकर', 'मधुक', 'पिंपळ', 'किथुक' वृक्षांनी बहरलेलं 'आसरा' हे एक नीरव शांततेचं सौख्य होतं! या वृक्षावर आपले पंख फडफडवणाऱ्या 'तितिर', 'चक्रवाक', 'सारंग','धनछडी','रानराघू' यांच्या मंजुळ ध्वनींनी सदासर्वदा फुललेलं असायचं!

'आनंद' हा एक 'नागरिक' मासिकामध्ये 'पत्रकार' होता. जन्मत:च अनाथ! त्याचं संगोपन एका अनाथालयात झालं होतं! त्यामुळे त्याची नात्यांची वीण घट्ट कुठे बसलीच नाही. सदासर्वकाळ तो मायेच्या शोधात असायचा! 'बालपण' हे काय असतं हे त्याला कधीही न उलगडलेलं कोडं होतं! खरच 'बालपण' असतं तरी काय? "भावी आयुष्याचं वाळवंट तुडविताना घायाळ होऊ पाहणाऱ्या जीवासाठी पूर्ण तरतूद म्हणून निसर्गानं निर्माण केलेला शीतल पाण्याचा तो चशकच नाही काय! असे कितीतरी असंख्य विचार त्याच्या मनोमनावर आदळायचे‌ मग तो उगाचच हसायचा!

पत्रकारीतेमध्ये तो समाजमनाच्या निरनिराळ्या छटांमध्ये तऱ्हेतऱ्हेचे रंग भरायचा! एके दिवशी त्याला 'आसरा' या वृद्धाश्रमाची माहिती मिळाली. आई बाबांच्या मायेपासून आधीच पोरका असलेल्या आनंदला त्या वृद्धाश्रमाची ओढ असणं सहाजिक होतं, मग त्याने रविवारी आश्रमाला भेट देण्याचे ठरविले.

प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करताच असीम निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेलं ते आश्रम जणुकाही एक रमणीय, प्रेक्षणीय स्थळच आहे असा त्याला भास झाला. आतमध्ये जाण्यासाठी किमान एक किलोमीटर तरी त्याला पायपीट करावी लागली. हिरव्या हिरव्या गवताचे गार गालिचे सुंदर सुशोभित सजलेले होते. जवळच फुलांची एक बाग होती. 'राणचाफा','केवडा', 'जाई-जुई', 'शेवंती', 'मोगरा' आणि लाल-गुलाबी गुलाबपुष्पांनी ती बहरलेली होती. एक दिव्य परिमळ त्या आसमंतात पसरला होता. त्या मुग्धं वातावरणानेच तो अतिप्रसन्न झाला.

सर्वप्रथम त्याने संचालकांची भेट घेतली आणि त्यांना रीतसर माहिती देऊन तो वृद्धाश्रमातल्या आश्रीतांना भेटण्यासाठी निघाला. सहा-सहा फुटांच्या अंतरावर लहान लहान पर्णकुट्या होत्या. त्यांची बांधणी वनातील आश्रमाच्या पर्णकुटी सारखीच होती. एका पर्णकुटी मध्ये दोन व्यक्ती राहत! तो पहिल्या पर्णकुटी समीप आला. आतमध्ये जवळ-जवळ पंच्याहत्तरीच्या वयामधले गृहस्थ सूर्य स्त्रोताचे स्मरण करीत होते. आनंदाची चाहूल लागताच त्यांनी नेत्र उघडले आणि एक मंद स्मित करून त्याला जवळ बोलाविले. "बोला काय मदत करू शकतो मी आपली!" या आपुलकीने आनंदचे काळीज भारावून गेले. क्षणभर तो त्या सजीव मूर्तीकडे एकटक बघतच राहिला. त्यांनी आनंदला परत तोच प्रश्न केला. तेव्हा कुठे 'आनंद' भानावर आला. 'आनंद' म्हणाला,"नमस्कार बाबा मी एक पत्रकार आहे. 'नागरिक' मासिकासाठी मला काही माहिती हवी आहे म्हणून मी आलो!" खरं तर तो मासिकासाठी नव्हता आला. त्याला जवळून त्या व्यक्तीचे जीवनदर्शन अनुभवायचे होते. "विचारा काय विचारायचे ते!" "बाबा आपलं नाव काय? आपण वृद्धाश्रमात कशे आलात? आपली मुले कुठे आहेत?" अशी कितीतरी प्रश्न आनंदनी एकादमातच विचारले.

........ बाबांनी मंद स्मित केलं आणि बोलले मी 'गजाननराव' आयुष्याची संपूर्ण हयात गिरणीमध्ये कामातच गेली. पत्नी होती 'कल्याणी' ती पण कर्करोगाने काळाच्या पडद्याआड गेली. मला दोन मुलगे आहेत. एक 'विकास' आणि छोटा 'कल्याण' दोघेही कर्तबगार! एक चांगला 'कलेक्टर' आहे आणि दुसरा 'इंजिनियर'!

आनंदने प्रश्न केला, "मग तुम्ही त्यांच्याकडे का नाही राहत?" "हे बघ बेटा! मी त्यांच्याकडे नाही राहत ती माझ्याकडे राहायची." आम्ही सगळे एकाच घरात गुण्यागोविंदाने राहायचो! मुलांना छान शिक्षण दिले. त्यांच्या शिक्षणासाठी लागेल तेवढा पैसा मी लावला नंतर ते दोघेही आपआपल्या व्यवसायात व्यस्त झाले आणि मग त्यांची लग्न लावून दिली. मोठा 'विकास' कलेक्टर असल्या कारणामुळे त्याला नगरात सरकारी कॉर्टर मिळाले. तो बायकोला घेऊन निघून गेला आणि धाकटा 'कल्याण' त्याची पण बदली बंगळूरला झाली आणि तो तिथेच विसावला. कल्याणीचे आजारपण वाढत होते.कॅन्सर थर्ड स्टेजला गेला होता आणि एके दिवशी 'ती' मला या जीवन प्रवासात एकटा सोडून चालली गेली. सर्व काही काळाचा महिमा! काळाचा महिमा हा काही औरच असतो. काळ म्हणजे काय? एक सारथीच नाही का! मानवरूपी घोड्यांच्या पाठीवर आपल्या संकेताचे आसूड मारीत केव्हा केव्हा किती गतीने पिटाळतो हे घोडे!" "क्षणातच मी या संसारात पोरका झालो." हे उद्गार काढताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
आनंदने पुन्हा प्रश्न केला, "मग तुम्ही 'विकास' किंवा कल्याणकडे का नाही गेले राहायला?" या माझ्या प्रश्नाने ते स्तब्ध झाले. कदाचित मी त्यांच्या जुन्या कटु स्मृतींना हात घातला होता. क्षणभर त्यांनी डोळ्यांच्या पापण्या मिटल्या आणि नेत्रात जमा झालेले आसवांचे थेंब त्यांच्या पांढरीशुभ्र दाढीवर घरंगळले. कल्याणीच्या अंत्ययात्रेला आली होती दोघे! मग सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर मी आपला निर्णय त्यांना सांगितला की, "आता माझं वय झालेलं आहे आणि माझी काळजी घेणारं आपलं म्हणून येथे कोणीही नाही तर मी तुमच्या दोघांपैकी कोणा एकाकडे शेवटचा श्‍वास घेईल." माझ्या निर्णयावर ते खूश होतील असं मला वाटलं! दोघांमध्ये वाद होतील की बाबा माझ्याकडे राहायला हवेत, नाही बाबा माझ्याकडे राहतील! रात्रभर त्यांनी काही निर्णय दिला नाही मी या आनंदी विचारातच निद्राधीन झालो. सकाळी उठल्यानंतर मी, 'विकास' आणि 'कल्याण' दोघांनाही बोलावलं आणि विचारलं, "काय रे बाळांनो काय निर्णय घेतलात तुम्ही!" पण ते दोघेही काही बोलायला तयारच नव्हते. थोरली सून 'साधना' समोर आली आणि म्हणाली बाबा आमचं ठरलं आहे की तुम्ही सहा महिने आमच्याकडे आणि सहा महिने भावोजींकडे राहायचे. तिच्या या बोलण्याने मला धक्काच बसला. मी धीरगंभीर होऊन विचारलं, "असं का?" "तुमच्यापैकी कुणी एक माझी जबाबदारी नाही घेऊ शकत का? तर धाकटी सून 'मालिनी' म्हणाली, "एकानेच का म्हणून जबाबदारी घ्यायची? बाबा तर तुम्ही दोघांचेही आहात ना! मग खर्च पण दोघेही वाटून घेणार!" "अरे पण पोरी दोघेही माझ्या काळजाचे तुकडे आहेत. तळहाताच्या फोडासारखं जपलं आहे मी त्यांना! कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. आली वेळ तेव्हा कर्ज काढून या मुलांचे शिक्षण केले आणि आता तुम्ही माझ्या दोन वेळच्या जेवणाचा खर्च वाटून घेतात. धिक्कार असो तुमचा!"
"अरे एक वेळ उपाशी राहून मी तुम्हाला दोन वेळचं अन्न खाऊ घातलं आहे. असली औलाद असण्यापेक्षा मी बेऔलादच समजेल स्वतःला!" 'विकास' म्हणाला, बाबा तुम्ही जसं समजत आहात तसं काही नाही!" "मग कसं आहे? ते तरी सांग!" 'कल्याण' पुढे होऊन म्हणाला 'बाबा' तुम्हाला आमच्याकडे सहा-सहा महिने राहणे पसंत नसेल तर मग... बोलतांनी तो थोडा कचरला, मी जोरात ओरडलो "मग काय पुढे बोल!" 'विकास' म्हणाला,
"तुम्ही वृद्धाश्रमात राहावं!" हे त्याचे शब्द ऐकताच कोणीतरी कानात तप्त शिशरस ओतावा असं जाणवलं! सौदामिनी कडाडून अंगावर आदळावी आणि वादळी वाऱ्याच्या चाबकाने अंग सोलून काढावे असा अंर्तभास सखोल मनाला झाला. "वृद्धाश्रम" या एकाच शब्दाने त्यांनी माझ्या नात्याची सांगता केली होती.

मी क्रुद्ध नजरेने त्यांच्याकडे बघितले. माझे डोळे लालबुंदं झाले होते. नाकपुड्या फुगल्या होत्या. श्वासांची गती तीव्र झाली होती. अंग थरथरत होते मी सरळ त्यांना म्हटले, "चालते व्हा माझ्या दारातून आणि पुन्हा कधी आपले काळे तोंड मला दाखवू नका."
काही दिवस माझे मन थाऱ्यावर नव्हते. मग एके दिवशी गिरणीतील माझा मित्र 'प्रकाश' मला भेटला. मी माझी कहाणी त्याला सांगितली तर तो म्हणाला, "असं एक नंदनवन आहे जिथे तुला जिव्हाळ्याची, जीवाभावाची नाती भेटतील. ते तुला कधीच एकटं नाही भासू देणार! प्रकाशच्या मदतीने मी 'आसरा' मध्ये आलो आणि इथेच रममाण झालो. माणसाच्या दैवाचा समुद्र कधी कधी भरती आल्यासारखा फेसाळत असतो हेच खरं!"

त्यांची ही काळजाला चटका लावून जाणारी हकीगत जाणून मी शांत चित्ताने त्यांच्या चरणांची धूळ मस्तकी लावून बाहेर पडलो. "सूर्य जसा उगवतो तसा तो मावळतो अस्ताचलाला गेलेल्या सूर्याचं मावळणं जसं विलोभनीय असतं तसं माणसाचं मावळणनही विलोभनीय झालं पाहिजे. आपण सर्वच आयुष्यभर आत्मनंदाच्या शोधात असतो. नवीन पालवी आल्यानंतर जुनी पानं गळून पडणारच पण आपण आपल्या मानवी सौहार्दाचा कल्पवृक्ष असाच बहरत ठेवायचा. कितीतरी वेळ मी वर असलेल्या नीरभ्र आकाशाकडे बघत राहिलो आणि एक विचार माझ्या मनाला शिवून गेला. जीवनाचा सार उलगडणारा!

"किती क्षणांचं हे जीवन असतं,
उपकार भूतकाळातलं भविष्यात नसतं!
मग जगावं तरी कोणासाठी;
कारण कोणीच कोणाच नसतं!!"

(प्रिय मायबोलीकरांनो आपल्याही आयुष्यात उतारवयात आलेल्या अशा वृद्धांचे काही प्रसंग आपण बघितले किंवा अनुभवले असतील तर कृपया प्रतिसाद रूपाने त्यांची येथे नोंद करावी ही नम्र विनंती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक हळवा आणि सामाजिक विषय तुम्ही कथेत हाताळला आहे... चंद्रमा..!
नेहमीप्रमाणे अलंकारीक भाषेचा वापर असलेले लेखन छान..!!

वृदधाश्रम हा भयंकर प्रकार आहे व मुले तिथे धाडताह्त तर ती मुले नालायक ह्या मानसिकतेतुन आता बाहेर यायला हवे. ज्याना परवडते त्यान्च्यासाठी ही खुप चान्गलि सोय आहे. ज्याना परवडत नाही त्यान्च्यासाठी काहितरी सोय व्हाय्ला हवी..

अलंकारिक भाषा पूर्ण मार्क...
हा चावून चोथा झालेला विषय आ हे>>. +१

जुनी दळणे नव्या डब्यात भरून येत आहेत.

लिखा अच्छा है पर एक बात तो है, ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या.. जिस के हात मे पैसे की लाठी उसी की घर मे चलती है.
म्हणून आईवडिलांनीच आपल्या घराची सोय करून ठेवावी अन्यथा पोरांकडे आश्रितासारखे राहावे लागते.
तसे पोरांनीही आपल्या पायावर उभे राहताच स्वत:चे घर घेण्याची क्षमता राखावी, आणि ती तयारी ठेवावी. अन्यथा त्यांनाही आईवडीलांच्या घरात त्यांच्या मर्जीनुसारच जगावे लागते.

मुल कशा साठी हवी आहेत?
मस्त लिव्ह इन मध्ये आयुष्य काढायचे पैसे कमवायचे.आणि भरपूर पैसा कमवून. ठेवायचा .
तोच पैसा म्हातारपणी उपयोगी पडेल.
मुल नकोत ,त्यांची जबाबदारी नको.आणि फुकट पैसे खर्च करून त्यांचे पालन पोषण नको.
सर्व व्यर्थ आहे.

अमा छान! पण "जुनं ते सोनं" अशी म्हण आहे ना!त्याच्याच पाऊलखुणा कधी-कधी ओढ लावतात!
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

ऋन्मेष आपला प्रतिसाद हा खूप मोलाचा असतो मायबोलीकरांसाठी! आपल्या विचारांशी मी सहमत आहे!आपणच आपल्या भविष्याची तरतूद करून ठेवावी!

स्वार्थ दोन्ही कडून असतो.आणि स्वार्थ नुसार प्रत्येकाची मत आहेत.असता जे नवं श्रीमंत मध्यम वर्ग आहे ह्या वर्गाला परिवर्तनाचा फायदा मिळून थोडेफार पैसे मिळाले आहेत.त्या मध्ये गाडी,घर घेतले आहे.पहिल्यांदाच थोडाफार पैसा ह्यांच्या कडे
आला आहे.आणि तो आम्ही स्वतः कमावला आहे असा ह्यांचा गोड गैर समज आहे.
ह्यांचे आई वडील संपत्ती निर्माण करू शकलेले
नाहीत मुल हीच संपत्ती असला भोळा भाव असणाऱ्या पिढी मधील ते आहे.

त्या मुळे गरीब आई वडील ह्यांना नको असे वाटते.
पण ज्या पहिल्या पिढीतील लोकांनी उद्योग उभे केले आहेत,प्रचंड स्थावर मालमत्ता निर्माण केली आहे.त्यांच्या मुलांनी किती ही कष्ट घेतले तरी ते बापाची बरोबरी कधीच करू शकणार नाहीत.
त्यांची मुल मात्र आई वडिलांना सांभाळतात.अगदी त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाण्याची हिंमत पण ठेवत नाहीत.
दोन्ही प्रकार chya लोकांचा एकच स्वार्थी विचार असतो संपत्ती च उपभोग आपल्याला च घेता आला पाहिजे.

हेमंत आपल्या विषयाला कलाटणी देणाऱ्या अभिप्रायासाठी आपले आभार!
तसं करताही येईल पण व्यक्तीला सर्व बाबींवर मात करता यायला हवी‌.उदाहरणार्थ घरच्यांना पटवून देणे,सामाजीक व्यवस्थेला झुगारण्याचं बळपण अंगी असायला हवं.हे सगळं साध्य केलं तर मग लिव्ह इन मध्ये राहण्यात काही गैर नाही;

वृद्ध आश्रमात कोणाचे आई वडील आहेत?
जास्त प्रमाणात मध्यम वर्गीय नोकरदार लोकांचे.
उद्योगपती,व्यापारी,राजकारणी,शेतकरी,आणि गरीब समाज ह्यांचे आई वडील वृध्द आश्रमात नाहीत.
ह्याचे काय कारण असेल.

एका मुलाला लहानपणा पासून त्याला डॉक्टर ,किंवा उच्च शिक्षित बनवण्यासाठी किती पैसे आई वडील खर्च करतात.
शिक्षण,सर्व सुविधा,आई वडील जो वेळ देतात त्याची किंमत .
ह्याचा एकत्रित विचार केले तर कमीत कमी १ कोटी रुपये खर्च होतो.
मुलगा हुशार नसेल खासगी संस्थेत शिक्षण दिले असेल तर डॉक्टर होण्यास च १ कोटी जातील बाकी खर्च वेगळा.
इतके पैसे खर्च केल्यानंतर ही मंडळी जेव्हा स्थिर होतात तेव्हा ह्यांना वाटते मी स्वतः कमवत आहे.
पण ह्या स्थितीत येण्यासाठी करोडो रुपयाचे बीन व्याजी भांडवल ज्यांनी टाकले आहे त्यांची ह्यांना आठवण येत नाही.
प्रतेक व्यक्ती फक्त शेवटची पाच दहा वर्ष च दुसऱ्यावर अवलंबून राहण्या मध्ये जातात.
जबाबदारी नको म्हणून फालतू तत्व ज्ञान सांगणाऱ्या लोकांकडे किती गंभीर पने बघितले पाहिजे हे ज्यांनी त्यांनी ठरवावे.

चंद्रमा, तुमचे लेख 'सकाळ' वर्तमानपत्राच्या ' मुक्तपीठ' सदरासाठी पाठवून बघा. तुमच्या लेखनकलेचे चीज होईल..

बाकी हा लेख थोडा abruptly संपवल्या सारखा वाटतोय. थोडं अजून सविस्तर लिहाल का प्लीज..
उदा. गजानन रावांना सहा सहा महिने दोन ठिकाणी राहायचे नव्हते म्हणून ते वृद्धाश्रमात राहावयास गेले. हे समजल्याने अनाथ आनंदाला जीवनाचे सार कसे काय गवसले ते काही नीट उमजले नाही.

हेमंतजी आपला आई-वडील या नात्यांमधला व्यासंगं खोल आहे.तुम्ही जे म्हणालात ते शाश्वत आहे.व्यापारी,राजकारणी,शेतकरी मंडळींचे आई-वडील वृद्धाश्रमात राहत नाही.त्याला कारण आहे 'प्रतिष्ठा'! जर या व्यक्तींचे माता-पिता जर वृद्धाश्रमात गेलेत तर ही वस्तुस्थिती समाजामध्ये लवकर पसरते.आपला मानमरातब समाजात टीकावा म्हणून ही मंडळी असा टोकाचा निर्णय घेतं नाही.तसं म्हणालं तर अंर्तयुद्ध बहुतांश घरांमध्ये असतेच!

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद चिन्मय!आपण लेखणाचे कौतुक केले त्याकरीता आभारी आहे.लेख,कथा लिहण्याची गोडी मायबोलीच्या माध्यमातूनच वृद्धिंगत झाली.या अथांग सागरात मनसोक्त बुडवून घ्यायचं स्वतःला कधी-कधी!
आनंद हा जन्मत:च अनाथ असल्यामुळे त्यांच्या हळव्या मनाला मातापित्याच्या प्रेमाची ओढ होती.पण वृद्धाश्रमात आल्यानंतर त्याला प्रत्यक्षात अनुभवलेल्या गजाननरावांच्या जीवनाचा साक्षात्कार झाला.ज्या मातापित्याने खेळविले अंगाखांद्यावर,पोषण केले आयुष्यभर त्यांचे ओझे उचलण्यास विकास आणि कल्याणचा खांदा असमर्थ झाला होता.इतक्या हालअपेष्टा सहन करणाऱ्या आपल्या पित्याला ही मुलं कृतघ्न झाली होती.त्याचा आनंदच्या मनोमनावर सखोल परिणाम झाला आणि अशाच विचारांच्या तंद्रीत आनंदच्या मनाचं रोपटं विचारांच्या वादळी वाऱ्यात इकडे-तिकडे डोलू लागलं आणि त्याला जीवनाचे रहस्य उलगडणारा सार मिळाला की "कोणीच कोणाचं नसतं!"

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद चिन्मय!आपण लेखणाचे कौतुक केले त्याकरीता आभारी आहे.लेख,कथा लिहण्याची गोडी मायबोलीच्या माध्यमातूनच वृद्धिंगत झाली.या अथांग सागरात मनसोक्त बुडवून घ्यायचं स्वतःला कधी-कधी!
आनंद हा जन्मत:च अनाथ असल्यामुळे त्यांच्या हळव्या मनाला मातापित्याच्या प्रेमाची ओढ होती.पण वृद्धाश्रमात आल्यानंतर त्याला प्रत्यक्षात अनुभवलेल्या गजाननरावांच्या जीवनाचा साक्षात्कार झाला.ज्या मातापित्याने खेळविले अंगाखांद्यावर,पोषण केले आयुष्यभर त्यांचे ओझे उचलण्यास विकास आणि कल्याणचा खांदा असमर्थ झाला होता.इतक्या हालअपेष्टा सहन करणाऱ्या आपल्या पित्याला ही मुलं कृतघ्न झाली होती.त्याचा आनंदच्या मनोमनावर सखोल परिणाम झाला आणि अशाच विचारांच्या तंद्रीत आनंदच्या मनाचं रोपटं विचारांच्या वादळी वाऱ्यात इकडे-तिकडे डोलू लागलं आणि त्याला जीवनाचे रहस्य उलगडणारा सार मिळाला की "कोणीच कोणाचं नसतं!"

मी चिन्मयी धन्यवाद आपल्या प्रतिसादासाठी!
मराठी व्याकरण विशेष नामांना एकेरी अवतरण चिन्ह
द्यावं लागतं!सामान्य नामाला गरज नसते जसं तू,तो,हे,तुम्ही,आपण,सर्व
आणि अवतरण चिन्ह दिल्यानंतर त्या शब्दावर विशेष भर असतो.

पत्रकारीतेमध्ये तो समाजमनाच्या निरनिराळ्या छटांमध्ये तऱ्हेतऱ्हेचे रंग भरायचा! >>म्हंजे नेमकं काय करायचा??

अलंकारिक भाषा पूर्ण मार्क... +१

सखाराम गटणे आणि नानू सरांजमे आठवले,
हे दोघे कोण ते विचारू नका plz Lol

कथेमध्ये नावीन्य नसले तरी तुमचा स्वतःचा touch आहे
तो आणखी develop करा
शुभेच्छा Happy

पत्रकारीतेमध्ये तो समाजमनाच्या निरनिराळ्या छटांमध्ये तऱ्हेतऱ्हेचे रंग भरायचा! >>म्हंजे नेमकं काय करायचा??
Submitted by वीरु on 9 July, 2021 - 12:45 >>
You-Are-A-Good-Question-meme-template-of-Tanu-Weds-Manu-Returns-1024x576

समाज परिवर्तन मधून जात आहे.पण हे परिवर्तन मजबुत पायावर उभे नाही.भ्रामक कल्पना,भ्रामक विचार,सत्य परिस्थिती ल छेद देणारे कल्पनिक विश्व ह्या वर अवलंबून आहे.
मुळात माणसाचा प्रवास च चुकीच्या दिशेने चालू आहे.
मानवी जीवन सुखकर होण्या ऐवजी अस्थिर,दुःखी,बे भरवशा चे झाले आहे
मुलांनी जन्म घेतला की त्याला शर्यतीत उतरावे लागत आहे.
बालपण कोमजून जात आहे.
आणि शर्यत जिंकण्याची शक्यता झीरो आहे अगोदर च विजेते जाहीर आहेतं
जगात निराशेने ग्रासलेल्या लोकांचे प्रमाण नक्कीच वाढलेले दिसेल.
ऐन तारुण्यात मुल ,मुली पुढच्या संकट ची चाहूल लागल्या मुळे बिथरली आहेत.
काही दोन चार लोकांचा डंका मध्यम वाजवत आहेत.
पण ती खरी समाजाची स्थिती नाही

सह्याद्रीचा गर्भ, मधुक किकर वैगेरे वाचुन पुढे वाचलंच नाही. एवढं अलंकारीक झेपत नाही. दागिने पण मोजकेच वापरते मी.
अमांच्या अलंकारीक प्रतिसादावरून आयडिया आली काय असेल लेखात.
लिहित रहा.

वीरू आपल्या कल्पक बुद्धीमत्तेला पडलेला प्रश्न साहजिक आहे.आनंद हा सामाजिक समस्यांची उकल करणारा पत्रकार आहे.जसे
साक्षरता निर्मूलन,गरीबी,रोजगार,वृक्षसंवर्धन,आदीवासी उद्धार,माहीती अधिकार या सर्व समस्या तो आपल्या पत्रकारीतेत तळमळीने मांडायचा. प्रत्यक्षात वृद्धाश्रम ही पण त्यांच्यासाठी एक सामाजिक समस्या होती.या सर्व समस्यांना तो आपल्या पत्रकारीतेमध्ये रंगं द्यायचा म्हणजे त्याबद्दल सविस्तर लिखाण करायचा.समाजामध्ये जागरुकता आणणे हेच त्याचे अंतिम ध्येय होते.

किल्ली आपला प्रतिसाद माझ्यासाठी स्वागतान्मुख आहे!
स्वतःचा विकास हेच आपलं अंतिम ध्येय असायला हवं!

Pages