नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेबांचे नाव का देण्यात यावे?

Submitted by उरणकर on 26 June, 2021 - 02:52

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना वंदन करुन लेखाची सुरुवात करत आहे...

कुठेतरी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरण विषयी प्रत्यक्ष काय झाले आणि काय होत आहे ही माहिती येथील स्थानिक जनता सोडून महाराष्ट्रातील इतर विभागातील जनतेपर्यंत पोहोचली नाही किंवा स्थानिक पातळीवर विविध घडामोडी कश्या घडत गेल्या याची खरी माहिती बाहेरच्या दुनियेत पोहोचली नाही. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ परिसरातील स्थानिक व्यक्ती म्हणून मला येथील घडणाऱ्या तसेच घडून गेलेल्या घडामोडींचा उहापोह करणे आवश्यक वाटते. त्यासोबतच दिनकर बाळू पाटील उर्फ दि.बा.पाटील कोण? त्यांचे महाराष्ट्राच्या समाजकारणातील योगदान काय? तसेच पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील स्थानिक व नवी मुंबई विमानतळ ज्यांच्या जमीनीवर उभे राहत आहे ते लोक का नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील साहेबांच्या नावाची मागणी करत आहेत आदी गोष्टींची माहिती या लेखातून देण्याचा प्रयत्न करत आहे.

वैयक्तिक माहिती:
जन्म- 13 जानेवारी 1926 रोजी उरण तालुक्यातील जासई ह्या गावात
शिक्षण- वकिलीपर्यंत शिक्षण. बीए मुंबईतून, तर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून एलएलबी
नाना ह्या नावाने त्यांच्या समकालीन व्यक्ती त्यांना ओळखत असत

राजकिय कारकीर्द:
पाचवेळा आमदार (उरण-पनवेल विधानसभा मतदारसंघ)
दोनवेळा खासदार (पुर्वीचा कुलाबा जिल्हा आणि सध्याचा रायगड जिल्हा)
महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते- 1983
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात एक वर्ष तुरुंगवास

संघर्षाची बीजे आणि दिबा
17 मार्च 1970 रोजी सिडकोची स्थापना केली. सिडकोने पनवेल, उरण आणि आज जिथे नवी मुंबई दिसत आहे तेथील शेतकरी वर्गातील आगरी समाज बहुसंख्येने राहत असलेल्या 95 गावातील 50 हजार एकर जमीन नवी मुंबई प्रकल्प उभारण्यासाठी अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला. त्याच जोडीला जेएनपीटी बंदरासाठीही जमिन अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मुळात आगरी म्हणजे मीठ आणि शेती अशी दोन्ही प्रकारची आगर पिकवणारा कष्टकरी वर्ग. सरकारच्या या निर्णयामुळे संपूर्ण समाज नष्ट होण्याची वेळ आली होती. कारण, जमिनच शिल्लक राहिली नाही तर जगायचे कसे? त्यावेळी, पनवेल व उरण तालुक्याचे आमदार दि बा पाटील साहेब होते. अभ्यासपूर्ण नेता असलेल्या दि बा पाटील साहेबांना सिडकोच्या येणाऱ्या संकटाची जाणीव झाली आणि ज्यामुळे त्याकाळी बहुसंख्येने अशिक्षित असलेल्या त्यांचा आगरी समाज सदरील परिसरातून कुठेतरी दूरवर फेकला जाऊ शकतो हे त्यांना उमगले. त्यानंतर दिबांच्या नेतृत्वाखाली लढ्याची उभारणी होत गेली.
1970 ते 1984 काळापर्यंत विविध आंदोलनांच्या माध्यमातून कुठेतरी जनतेचा असंतोष शिगेला पोहोचला होता. जनतेला 40 हजार रूपये एकरी भाव मिळावा आणि 12.5 टक्के विकसित भुखंड मिळावेत ही दि बा पाटलांची मागणी जोर धरू लागली. 16 जानेवारी 1984 व 17 जानेवारी 1984 रोजी उरण तालुक्यातील अनुक्रमे जासई येथील दास्तान फाटा आणि पागोटे येथे जमीन संपादन करायला आलेल्या पोलिसांसोबत शेतकऱ्यांचा संघर्ष झाला. त्या संघर्षात १६ जानेवारीला दास्तानफाटा येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चिर्ले येथील नामदेव घरत तर धुतूममधील रघुनाथ ठाकूर या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. दास्तान फाटा येथील गोळीबारानंतर हे आंदोलन अजून तीव्र होत गेले. त्यानंतर 17 जानेवारी रोजी झालेल्या गोळीबारात पागोटे गावातील पिता-पुत्र महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील व कमलाकर कृष्णा तांडेल या तीन शेतकऱ्यांना आपले बलिदान द्यावे लागले. नंतर सरकारने २७ हजार रुपये एकरी मोबदला जाहीर केला आणि त्यानंतर साडेबारा टक्के योजनेअंतर्गत विकसित भूखंड देण्याचा निर्णय 1994 मध्ये झाला.
आज आगरी समाजातील सुबत्ता अनेकांना दिसतं असेल. पण, ही सुबत्ता येण्यामागे दि बा पाटील यांचे भविष्यातील घडामोडींचा विचार करणारे अभ्यासू नेतृत्व होय. 12.5% विकसित भूखंडांमुळे नवी मुंबई परिसरात आर्थिक सुबत्ता आली. जर त्या काळात ह्या नेत्याने आपल्या मातीसाठी संघर्ष केला नसता तर आज हा समाज कुठेतरी दुर फेकला गेला असता. कारण, सरकार जमिनीचा मोबदला म्हणून 15 हजार रूपये एकरी देत होते. हे 15 हजार संपायला वेळ नसता लागला. त्यांनी मिळवून दिलेले 12.5% विकसित भूखंड हे पुढच्या पिढीला उदरनिर्वाहकरीता वापरता आले. अन्यथा जमिन गेलेली होती, पैसा देखिल संपला असता...!!
दि बा पाटील त्या काळात वकील होते. अतिशय हुशार व्यक्तिमत्त्व. वकिली व्यवसाय करून देखिल खोऱ्याने पैसा कमावला असता. पण, काही माणसे ही फक्त तत्वासाठी जगतात. आजकाल साधा नगरसेवक बनतो तो देखील 2 वर्षात फोरच्युनरच्या खाली गोष्टी करतं नाही. याउलट, ह्या माणसाचे घर देखील जनतेनी बांधले. पनवेल शहरात आजही संग्राम नावाने त्यांचे घर आहे. आज असे किती नेते भेटतील?

नवी मुंबई विमानतळ नामांतराचा वाद का सुरू झाला?
कोरोना काळात लॉकडाऊन लावल्यामुळे सर्वसामान्य जनता घरात बसलेली असताना सिडको मार्फत प्रस्ताव सादर करून तो केंद्राला पाठवणे कितपत योग्य आहे? लॉकडाऊन हा आरोग्य विषयक वैद्यकीय सेवा सुविधांना वेळ मिळावा म्हणून लावला होता. असे नामकरण वैगेरे आरोग्याच्या व्याख्येत न बसणारे विषय सरकारला लॉकडाऊनच्या काळात का गरजेचे वाटले? आणि ते मंजुर करण्यासाठी इतके पटापट निर्णय का घेतले गेले? लोकशाही राज्यात सत्ताधारी वर्गाला जनतेला विचारायची गरज नाही का?
आणि इथेच संघर्षाची ठिणगी पडली....
सर्व घडामोडी होत असताना इतक्या वर्षांत शिवसेना नेत्यांकडून कुठेही नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाचा प्रस्ताव दिला नव्हता किंवा मागणीही केली नव्हती. पण, 6 महिन्यांपूर्वी या सरकारमधील एका मंत्र्याने बाळासाहेब ठाकरे साहेबांचे नाव विमानतळाला देण्यात यावे म्हणून बोलायला सुरूवात केली आणि एप्रिल 2021 ह्या महिन्यात कोरोणामुळे कडक निर्बंध लावलेले असतानाही सिडकोने एक ठराव मंजूर करून तो ठराव राज्य सरकारकडे पाठवला आणि राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पारित करून केंद्राला पाठविला. इतके पटापट निर्णय कोरोणाच्या लॉकडाऊनमध्ये घेतले गेले. मग, असे पटापट निर्णय औरंगाबादचे नामकरण प्रश्नांवर घेण्यास सरकारला का अडचणी येतात...??
ह्या सर्व प्रक्रियेत ज्या भूमिपुत्रांची घरे आणि जमिनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी अधिग्रहीत केल्या गेल्या त्यांची भूमिका काय आहे हे विचारण्याचे कष्ट ना त्या मंत्र्याने घेतले ना सिडकोने घेतले... ना सरकारने घेतले...!!

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त जनतेची मागणी आणि त्याचा पाठपुरावा
2008 रोजीच सिडको महामंडळाकडे दि बा पाटील हे नाव नवी मुंबई प्रकल्पाला देण्यात यावे याविषयी स्थानिक जनतेकडून प्रस्ताव दिला होता. 2 जानेवारी 2015 रोजी खासदार कपिल पाटील यांनी लोकभावनेचा विचार करून लोकसभेत दि बा पाटील साहेबांच्या ही मागणी केली. त्या संबंधीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष व सध्याच्या मंत्रीमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिला असता त्यांनी तो तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 19 जून 2018 रोजी पाठवला. फडणवीस साहेब यांनीसुद्धा तो प्रस्ताव उचित कार्यवाही करण्याच्या सूचनेसह प्रधान सचिव (विमानचालन) यांच्याकडे पाठविला होता. तसे 7 जुलै 2018 रोजी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांनी लेखी कळविलेही होते.
उपलब्ध प्रस्ताव आणि कागदपत्रांद्वारे हे स्पष्ट होत आहे की, स्थानिकांनी 2008 पासूनच सदरील विमानतळाच्या नामकरण प्रश्नांवर लोकशाही मार्गाने खूप प्रयत्न सुरू ठेवले होते. परंतु, सरकारला लोकशाही प्रणालीवर विश्वास नसावा हे या प्रकरणातून स्पष्ट दिसतं आहे. जेव्हा सर्वसामान्य जनता लोकशाही मार्गाने मनापासून प्रयत्न करत असते आणि राजकिय पक्ष सत्तेचा वापर करून हवे ते निर्णय घेतात. मग, अशावेळी सर्वसामान्य जनतेने काय करायचे? लोकशाहीतील नियम फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच असतात का?
विमानतळ नामांतराचा वाद हा राज्य सरकारने त्यातही एका विशिष्ट खात्याच्या मंत्री महोदयांनी स्वामी निष्ठा दाखवण्यासाठी जाणुनबुजून उकरून काढलेला वाद आहे. 6 महिन्यांपूर्वी इथे नामतरण प्रश्नांवर कोणतेही वाद नव्हते. पण, कोरोणा काळात जनतेच्या मागण्या तसेच 2008 सालापासून स्थानिकांनी सिडकोकडे दिलेल्या लेखी प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही न करता राज्य सरकारने सिडकोकडून अन्य नावाचा प्रस्ताव पारित करून घेतला आणि घाईघाईने राज्य कॅबिनेट मधून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. जो प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अजून 4 वर्षाचा कालावधी बाकी आहे तिथे नामांतराचा घाट का घातला गेला? भारतात असे किती प्रकल्प आहेत जिथे प्रकल्प पुर्ण होण्याअगोदरच त्याचे नामतरण केले गेले? कोरोना काळात राज्य सरकारला जनतेच्या हिताची कामे सोडून नामांतर प्रक्रियेत रस का आहे? सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ पुर्ण स्थितीत आहे. पण, तेथे मात्र नामांतर प्रश्नात हे मंत्री महोदय काहीच हालचाल करत नाहीत. समृद्धी महामार्गासारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे नाव दिले गेले आहेच.
जर बाळासाहेब ठाकरे साहेबांचे नाव महाराष्ट्रातील कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला दिले गेलेले नसते तर मुद्दा वेगळा होता. पण, जवळपास 55 हजार कोटी रुपये खर्च करून समृद्धी महामार्ग होणार आहे त्याला बाळासाहेबांचे नाव आहे. तसेच 400 कोटी खर्चून जुन्या महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभे राहत आहे. या सर्व गोष्टींना जनता म्हणून आम्ही पाठीबा दिलाच ना. पण, दि बा पाटील साहेबांच्या नावाने कोणत्याही स्वरूपाचे स्मारक ना सिडकोने उभारले आहे, ना जेएनपीटी ने उभारले आहे, ना राज्य सरकारने उभारले आहे. आपल्या भारतातीलच रांची विमानतळाला स्थानिकांचे नेतृत्व लाभलेल्या बिरसा मुंडा यांचे नाव दिले गेलेले आहे. मग, अश्या स्थितीत रांची विमानतळाचे उदाहरण लक्षात घेऊन नवी मुंबई विमानतळाला स्थानिकांच्या खुप वर्ष जुन्या मागणीनुसार दि बा पाटील यांचे नाव देण्यास सत्ताधाऱ्यांचा विरोध का आहे? की सत्ता आपल्याजवळ आहे त्यामूळे आपण स्थानिक जनतेच्या भावनांच्या विरोधात जाऊन महाराष्ट्रात जो जो प्रकल्प निर्माण होईल त्याला एकचं नाव देण्याचा नवीन पायंडा घातला जात आहे का?
बाळासाहेब ठाकरेंची दूरदर्शनवर एक मुलाखत झाली होती. त्यात बाळासाहेबांनी म्हटल्याचे आठवते की, राज्यात युतीचे सरकार आहे. नवलकर सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते. त्यांनी बाळासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे ठरवले होते. पण, बाळासाहेबांनी तो पुरस्कार नाकारून तो पुरस्कार पु. ल. देशपांडे यांना देण्यास सांगितले व सोबतच मुंबई पुणे रस्त्यास पुलंचे नाव देण्यास सांगितले. जो स्थानिक अस्मितेचे राजकारण करतो, तोच पक्ष स्थानिकांच्या विरुद्ध उभा आहे. ज्या आगरी समाजाने या पक्षाच्या वाढीसाठी महत्वाचे योगदान दिले त्याच आगरी समाजाच्या विरुद्ध आपण का वागत आहात? दि बा पाटील साहेबांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिल्यामुळे बाळासाहेबांचे नाव कमी होणार नाही. उलट, कोणताही वाद न होता दि बा पाटील साहेबांचे नाव दिले असते तर आगरी समाजाला देखील आपल्या कार्याचा अभिमान वाटला असता. पण, आता गोष्टी झपाट्याने बदलत आहेत. पालघर, ठाणे, रायगड येथील जनतेला कुठेतरी त्यांच्या परिसरात पक्षीय राजकारणात समाजावर दडपशाही होत आहे याची जाणीव होत आहे. तरुणाईचे आवडते आमदार राजू पाटील साहेबांनी 24 जून रोजी झालेल्या मोर्चाच्या मंचावर आणि आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये देखील मोजकेच परंतु थेट सांगितले आहे..."राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेचं माझं पहिलं प्राधान्य आहेे."

काही ठिकाणी बोलले जात आहे की, हा प्रकल्प मुंबई विमानतळाचा extension असेल. पण, ज्या रीतीने राज्य सरकार उतावीळ होऊन नामकरण करत आहे त्या अर्थी इथे विमानतळाला नवीन कोड लागणार आहे हे सध्यातरी स्पष्ट आहे. आणि जर extension असेल आणि मुंबई विमानतळासारखाच कोड असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आदर सर्व आगरी समाज करतोच. नागो पाटील सारखे आगरी मावळे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते. रायगड ठाणे कल्याण पालघरचा मुलूख महाराजांच्या सोबत होता आणि आयुष्यभर राहील.
आता फक्त एक पक्ष चालवत नसून उत्कृष्ट लोकशाही परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्याच्या उच्चस्थानी आहोत याचा विचार करणे आवश्यक आहे. सल्लागार स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी चूकीचे सल्ले देऊन जो समाज पूर्वीपासून आपल्या सोबत उभा राहिला त्या समाजाला बाजुला होण्यास भाग पाडले गेले. आयुष्यभर जो समाज आपल्या सोबत राहिला त्याला अडचणीत आणून नक्की काय साध्य होणार आहे? यातून पक्ष म्हणून तुमचा काही फायदा होणार आहे का? की भविष्यात या भूमिपुत्र समाजाची तुमच्यासाठी गरज संपलेली आहे?
आणि काही असे आहेत की, ज्यांना या भूमीचा, इथे सांडलेल्या रक्ताचा इतिहास माहिती नाही ते म्हणतात की हे नाव द्या, ते नाव द्या... त्यांच्यापैकी किती जणांची जमीन कोणत्याही प्रकल्पासाठी गेलेली आहे? प्रशासनाने दबाव टाकून, पावसाळ्यात पाणी तुंबवून, अनियंत्रित ब्लास्ट करून दगड राहत्या घरावर उडवून लोकांना राहती घरे सोडण्यास भाग पाडले? तुमच्या घरांची एक पायरी तरी कधी कोणत्या प्रकल्पासाठी तुटली आहे का? ज्यांची जमीन प्रकल्पात गेलेली असते त्यांचे दुःख तुम्ही नाही समजू शकणार. आणि कोणाला असे वाटत असेल की, ह्या जमिनी आम्ही हसत हसत दिल्या आहेत आणि पैसे कमावले. तर, तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही. सांडलेल्या रक्ताची किंमत तुम्हाला नसेल. पण, आम्हाला नक्कीच आहे.

24 जून 2021 रोजी झालेल्या आंदोलनाविषयी...
अनेक मुख्य रस्ते बंद केले होते. अनेकांना येऊन दिले नाही. त्यामुळे काही लोक रेल्वे ट्रॅकच्या बाजूने मार्ग काढत आंदोलनस्थळी पोहचू लागले तर आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी उलटी बातमी चालवली की, आंदोलकांनी रेल्वे बंद करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गर्दी केली...!!
लाखोंनी रस्त्यावर उतरून सुद्धा महाराष्ट्र पोलीस आरामात होते. 10 जून रोजी देखील साखळी आंदोलन झाले होते त्यावेळी देखील पोलीस प्रशासनाला कोणताही त्रास झाला नाही. त्यांना देखील माहिती आहे की, हा समाज जाणूनबुजून रस्त्यांवर कधीही येत नाही आणि त्यांना दिलेल्या शब्दानुसार जसे शांततेत आंदोलक जमले तसे शांततेत ते आपापल्या घरी गेले. काहीवेळ वाहतुकीचा खोळंबा झाला तो प्रशासनाने रस्ते बंद केल्यामुळे. जनता सिडको भवनावर मोर्चा नेणार होती कोणत्याही रस्त्यावर नाही.
फक्त आगरी समाजाच ह्या आंदोलनात सहभागी नव्हता तर, अनेक जाती, धर्म, समाजातील लोक या आंदोलन प्रसंगी उपस्थित होते. सर्वपक्षीय कार्यकर्ते ह्या आंदोलनात समाजसाठी सहभागी होते. हुसैन दलवाई साहेब आंदोलन प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित होते तर राजू शेट्टी साहेब, प्रकाश आंबेडकर साहेब, रामदास आठवले साहेब ह्यांनी दि बा पाटील यांचे नाव देण्याविषयी आपला पाठींबा जाहीर केला आहे.
दि बा पाटील ह्या आमच्या लोकनेत्याविषयी अजून एक महत्त्वाची माहिती स्त्री वर्गाकरिता सांगतो की, आज जो गर्भलिंग चाचणी बंदीचा कायदा अस्तित्त्वात आहे आणि त्यामुळे असंख्य स्त्री भ्रूण हत्या थांबल्या असतील तो कायदा अस्तित्वात येण्यासाठी दि बा पाटील यांचे योगदान खुप महत्वाचे आहेत...
अंतिमतः प्रश्न फक्त नावाचा नाही, भविष्यातील अस्तित्वाचा आहे. स्वतःच अस्तित्व वाढवताना आमच्या आगरी समाजाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कृपया कधीही करू नका ही मनापासून विनंती.

जाता जाता आगरी काव्य पंक्ती आठवली ती लिहितो

आमचा बापुस बी आनचा..
न आमची आस पून येच गावांची...
मंग, आमचेच जमीनीव दि बा पाटलाचा नाव देवाला हरकत का तुमची?
प्रश्न हाय यो अस्तित्वाचा...
भूमिपुत्रांचे न्याय हक्काचा...
इच्छा पुरी करा भूमिपुत्रांची...
न साथ द्यावी भूमिपुत्रांची...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकास होणार पण सर्वसामान्यांचा नाही. SEZ चा होणार. हजारो एकर जमीन ताब्यात आहे.

BLACKCAT, रांजणपाडा स्टेशन म्हणजे तुम्ही चिर्ले गावानजिक जे प्लॉट पाडले होते तेथील बोलतं असाल. नाही घेतलात ते चांगले आहे. भविष्यात तेथून ही अलिबाग पर्यंत रस्ता जाणार.

हो तेच , मी तिथे गेली चार वर्षे फिरून आलो आहे , पण त्या विमाणतलामुळे रांजनपाडाचे काही होईल , असे वाटत नाही

जिथे शिवस्मारक आहे त्या दास्तान फाटा परिसरात जेएनपीटी प्लॉट डेव्हलपमेंट होणार आहेत. म्हणूनच तेथील गावांवर सिडकोचा डोळा आहे. लॉजिस्टिक्स पार्कच्या नावाखाली गावे उठवण्याचे कारस्थान चालू आहेत सिडकोचे. रांजणपाडा रेल्वे स्टेशन त्या होणाऱ्या प्लॉटच्या समोर आहे.

ते रांजनपाडा अन ते प्लॉट ह्यांच्या मध्ये 8 पदरी रस्ता आहे , त्यावरून अतिबोजड वाहने फिरत असतात, ट्रकच्या मैल मैल रांगा असतात , शिवाय हा रस्ता अन ते प्लॉट ह्यांच्या मध्ये एक 300 मीटर रुंदीची लांबलचक खाडी आहे , जी बुजवणे शक्य नाही , म्हणजे रेल्वे स्टेशन अन ते प्लॉट ह्यांच्यामध्ये ब्रिज तरी व्हावेत नैतर जमिनीअंतर्गत बोगदे तरी व्हावेत , अन्यथा समोर दिसत असलेले स्टेशन गाठायला 20 किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते, त्या आतील रस्त्यावर कुठलीही बस सर्व्हिस नाही, खेड्यातून लहान लहान रस्ते आहेत

ब्रिज होत आहे , असे बिल्डर सांगतात , प्रत्यक्षात त्या ऑफीसात असलेले ते फोनवाले , ह्यांना सिलिंक ब्रिज , रांजनपाडा ब्रिज , अजून कुठला फुटपाथ , रामसेतू , लंडन ब्रिज ह्यांना तिथे बसून सगळे सारखेच वाटत असते, हे काय , ब्रिज तयार आहे , म्हणून सांगत असतात !! Proud मी दोनदा ओला करून फिरून आलो , एकदा ओलावाल्याला ते रांजनपाडा स्टेशनच सापडले नाही , ट्रकचा रोड , सर्व्हिस रोड , बोजडचा रोड , इतकी मिसळ आहे तिकडे रस्त्याची , शिवाय कधी ह्याचे काम म्हणून हा बंद , कधी तो बंद , की गुगलमॅपवरही नीट समजत नाही,

उळवे बामनडोंगरी ठीक आहे, पण तिथे ऑलरेडी गगनभेदी किमती आहेत ,

पण ते रांजनपाडा फारच अवघड वाटते, कदाचित वेळ लागेल

BLACK CAT, सर, तुमचे प्रतिसाद बघता. तुम्हाला हा परिसर थोड्याफार प्रमाणात माहिती आहे. तरीही तुम्ही विरोध करत आहात...!! ज्या रांजण पाडा रेल्वे स्टेशन परिसराचा तुम्ही उल्लेख केला आहे तो परिसर आता सिडको लॉजिस्टिक्स पार्क च्या सावटाखाली आहे आणि येथील बहुसंख्य जनता आगरी आहे आणि ह्यामुळेच मी आगरी समाजाच्या अस्तित्वाचा उल्लेख केला आहे. ज्या रांजणपाडा गावाचा उल्लेख केला आहे तो गाव देखील जेएनपीटी वसवताना निशाण्यावर होता. पण, दि बा पाटील साहेबांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. पण, शेवा आणि हनुमान कोळीवाडा या गावांना स्थलांतरित व्हावे लागले. उरणचे शिवसेनेने माजी आमदार श्री.मनोहर भोईर यांचे हे गाव. येथील हनुमान कोळीवाडा ह्या स्थलांतरित गावाची इतकी दुर्दशा झाली आहे की प्रत्येक घराला वाळवी लागली आहे आणि घरे हळूहळू तुटतं आहेत. ही आहे स्थलांतरितांची शोकांतिका...

तुम्ही जे प्लॉट बोलतं आहात ते चीर्ले येथे आहेत. मध्ये असणारा 8 पदरी रस्ता हा नॅशनल हायवे आहे आणि तो जेएनपीटी बंदरात जातो. रेल्वे स्टेशन पासून पूर्वेला. आणि जेएनपीटी 12.5% प्लॉट होणार आहेत ते रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला शिवस्मारक आहे तेथे. त्या जेएनपीटी 12.5% प्लॉट साठी तो रेल्वे स्टेशन बनवला आहे.

खाडी बुजवून विकास चालू आहे सर्व...!! विमानतळाचे बांधकाम देखिल त्याच रीतीने, MTHL देखील तिचं अवस्था... भविष्यात पाणी तुंबण्याच्या समस्या मुंबई, अलिबाग आणि नवी मुंबईला मोठ्या प्रमाणात भेडसावू शकतात इतक्या प्रमाणात समुद्रात भराव टाकला आहे सिंगापूर पोर्ट वेळी आणि आता खाड्या बुजवल्या जात आहेत.

गेल्या 3-4 वर्षात येथील सर्वच परिसरात मोठा पाऊस झाला की पाणी तूंबण्याच्या घटना वाढत आहेत. लहानपणा पासून इथेच राहत आहोत पण तेव्हा पाणी अजिबात तुंबत नसे कुठेही. कारण, तेव्हा भरतीचे आणि पावसाचे पाणी खाडीच्या क्षेत्रात पसरत असे. आता खाड्या बुजवत आणल्यात फक्त दाखवायला नाले शिल्लक ठेवलेत. सिडको विकासाच्या नावाखाली निसर्गाला चॅलेंज देत आहे. निसर्ग देखील पलटून सर्वात मोठे उत्तर देईल एक दिवस...

दहशत वादाचे उगम स्थान च समाजातील takatvan लोकांकडून होणारे कमजोर लोक, समाज ह्यांच्या वर होणारा अन्याय हा आहे.

हेमंत सर, दहशदवादाचे समर्थन कोणीच करू शकत नाही. आम्ही 24 जून रोजी केलेले आंदोलन शांततेत होते आणि आगामी काळात देखील महाराष्ट्रातील इतर जनतेला कोणताही त्रास न देता आंदोलनाची रूपरेखा ठरेल. पण, त्या अगोदरच जर सरकारने स्थानिक जनतेची विनंती मान्य करून दि बा पाटील साहेबांचे नाव जाहीर केले तर आपण सरकारचे मनापासून अभिनंदन करु.

मी कसला विरोध करत नाही , तुम्ही नावही तुमचे ठेवा , सगळ्या नोकऱयाही तुम्हीच घ्या>>>>>> हे उपहासात्मक बोलणे झाले. उपकार करतयं का राज्य सरकार स्थलांतरीतांवर? आपला तो बाब्या सोडुन द्या. समृद्धी महामार्गाला विरोध केला तर तो न्याय आणी आगरी लोकांनी केला तर तो अन्याय हा काय डबल ढोलकीपणा?

मी कसला विरोध करत नाही , तुम्ही नावही तुमचे ठेवा , सगळ्या नोकऱयाही तुम्हीच घ्या Mr. Blackcat ... tumhi je comment kartat na tyavrun tumchi nitimatta kalte.. kiti jealousy ahe .. srv nokrya aagri lokana det ka sarkar?.. baki lok pn ahet job sathi.. asa chukicha vichar krun wrong intuition dyaych stop kra.

मग सरकार सगळ्या नोकर्या नॉन आगरी लोकांना देईल का ? नाही ना ? आगरी लोकांनाही देईलच की

एवढा सरकारवर विश्वास नाही का ? की नीतिमत्ता नाही ?

ब्लॅक cat
तुम्हाला स्थिती चा गंभीर पना समजत नाही तुम्ही डॉक्टर कसे झालात हे मोठे कोडे आहे .
डिग्री तरी खरी आहे का?

BLACKCAT यांच्यासकट इथल्या बहुतेकांचा दिबा नावाला पाठिंबा असेल किंवा निदान विरोध तरी नसेल. नवीन मंडळींना त्यांच्या खट्याळ शैलीची कल्पना नसल्याने असा समज होत असावा. त्यांची प्रतिसाद शैली तशीच असल्याने त्यांचे फार मनावर घेऊ नका. हेमावैम Proud

लोकशाही मार्गाने ज्याने त्याने आपली मागणी सरकारला द्यावी , कुणाला वाटले ठाकरे , त्यांनी तसा अर्ज दिला , कुणाला वाटले पाटील , त्यांनी तसा अर्ज द्यावा

उद्या मला वाटले तर मी माझ्या एकट्याच्या नावाने माझे नाव द्या असाही अर्ज देईन
अजून दहा वीस नावाचे अर्ज इतरांनी केलेही असतील,
शेवटी सरकार निर्णय देते.

BLACKCAT यांच्यासकट इथल्या बहुतेकांचा दिबा नावाला पाठिंबा असेल किंवा निदान विरोध तरी नसेल. नवीन मंडळींना त्यांच्या खट्याळ शैलीची कल्पना नसल्याने असा समज होत असावा. त्यांची प्रतिसाद शैली तशीच असल्याने त्यांचे फार मनावर घेऊ नका. हेमावैम>>> +++११११ हेमापवैम

ज्यांनी ज्यांनी लेख वाचून दि बा पाटील साहेबांचे नाव द्यावे या मागणीला समर्थन दिले त्यांचे धन्यवाद. तसेच अनेकांनी याठिकाणी काही वेगळे मुद्दे मांडून आपली प्रतिक्रिया नोंदवून चर्चेत भाग घेतला त्यांचे देखील धन्यवाद. कारण, आपल्या याच चर्चेतून फक्त वाचनीय असणाऱ्या सदस्यांना देखिल काही गोष्टी नव्याने समजल्या असतील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आणि मायबोलीचे मनापासून धन्यवाद.

Urankar Anil thatte has made a show on the naming of the airport. Check on YouTube

अमा ताई, अनिल थत्ते सरांनी अतिशय शांतपणे विश्लेषण केले आहे. रायगड किल्ल्याचे समर्पक उदाहरण देऊन थत्ते सरांनी तटस्थ भूमिकेतून पाहताना आपली नवी मुंबई विमानतळाच्या नावाविषयी भूमिका मांडली आहे.
खालील लिंकवर थत्ते सरांचे विश्लेषण बघू शकता.
https://youtu.be/jscMTdnGNB0

तसेच अनेकांनी याठिकाणी काही वेगळे मुद्दे मांडून आपली प्रतिक्रिया नोंदवून चर्चेत भाग घेतला त्यांचे देखील धन्यवाद. कारण, आपल्या याच चर्चेतून फक्त वाचनीय असणाऱ्या सदस्यांना देखिल काही गोष्टी नव्याने समजल्या असतील. >>>>>>>>
+++++11111111
अगदी बरोबर .....

आमदार राजू दादा पाटील साहेबांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पोस्ट वर 23 जून 2021 रोजी रात्री लिहिलेली पोस्ट...

जय महाराष्ट्र,

मा. राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यानंतर अनेकजण विपर्यास करुन त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला.
राहता राहिला प्रश्न २४ जूनच्या आंदोलनाचा. तर मी नम्रपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो की हा मोर्चा आगरी, कोळी, कुणबी, कऱ्हाडी आणि शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या भूमीपुत्रांनी काढलेला मोर्चा आहे.
राज्यभर जेव्हा मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मूकमोर्चे निघत होते, तेव्हा जनभावना आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आंदोलनात सहभागी झालो होतो.
आताच्या घडीला तर माझा पूर्ण समाज या आंदोलनात उतरला आहे. त्यांच्या भावनेचा आणि विचारांचा कुटुंबातील एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला आदर आहे. कारण त्यांच्या प्रेमामुळेच आपण इथवर पोहोचलो आहोत.
त्यामुळे राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेच माझं पहिलं प्राधान्य आहे.
म्हणूनच ज्यांनी माझ्या संपूर्ण समाजाला आणि भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडलंय, त्यांचा निषेध करण्यासाठी आणि भूमीपुत्रांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होणार आहोत.

आपला,
राजू पाटील.

लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांनी नवी मुंबईतील स्थानिकांसाठी आयुष्याच्या अखेर पर्यंत लढा दिला आहे. आमच्यासाठी स्व. दि. बा. पाटील हे आदरस्थानी आहेत.

अहो उरण कर मी काल हपिसातून आल्यावर व्हिडीओ बघितला म्हणून तर तुम्हाला मेसेज टाकला.

https://www.loksatta.com/mumbai-news/bjp-ignores-demand-for-db-patil-nam...

हा आजचा अप्डेट. २०१८ सालीच फडणवीस ह्यांच्याकडे नावाचा प्रस्ताव दिला होता. पण प्रकल्प पूर्ण होईपरेन्त नाव फिक्स करायचे नाही म्हणून नाव प्रस्ताव पुढे पाठवला नाही असे म्ह टले फडणवीस.

जागुताई तुम्हाला परत बघून छान वाटले. एखादी फर्मास नवी रेसीपी टाका.

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बहुतेक ठिकाणी दिलेले आहे. त्यामुळे एका ठिकाणी नाही दिलं तर काय बिघडतं ? सारख सारख तेच ते कशाला ?
दि बा पाटील यांचे कार्य स्थानिकांसाठी मोठे आहे. तेव्हा त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारने वाद मिटवून टाकावा.

सारख सारख तेच ते कशाला ? > कालौघात आपला लोकांना विसर पडू नये याची तजवीज करत असतात सगळे सत्ताधारी. हे पुर्वीपासून चालु आहे. आधीचे राजेरजवाडे नाहीका एखादे मंदिर-घाट बांधून त्याचा शिलालेख बनवत असत, आता त्यांची जागा रस्ते,विमानतळे,उद्याने यांनी घेतली आहे. घराणेशाहीची प्रतीके म्हणूनही पाहू शकतो आपण या गोष्टींना. बारामतीकरांसाठी राहूद्या म्हणावं काही बाकी.

Pages