नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेबांचे नाव का देण्यात यावे?

Submitted by उरणकर on 26 June, 2021 - 02:52

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना वंदन करुन लेखाची सुरुवात करत आहे...

कुठेतरी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरण विषयी प्रत्यक्ष काय झाले आणि काय होत आहे ही माहिती येथील स्थानिक जनता सोडून महाराष्ट्रातील इतर विभागातील जनतेपर्यंत पोहोचली नाही किंवा स्थानिक पातळीवर विविध घडामोडी कश्या घडत गेल्या याची खरी माहिती बाहेरच्या दुनियेत पोहोचली नाही. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ परिसरातील स्थानिक व्यक्ती म्हणून मला येथील घडणाऱ्या तसेच घडून गेलेल्या घडामोडींचा उहापोह करणे आवश्यक वाटते. त्यासोबतच दिनकर बाळू पाटील उर्फ दि.बा.पाटील कोण? त्यांचे महाराष्ट्राच्या समाजकारणातील योगदान काय? तसेच पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील स्थानिक व नवी मुंबई विमानतळ ज्यांच्या जमीनीवर उभे राहत आहे ते लोक का नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील साहेबांच्या नावाची मागणी करत आहेत आदी गोष्टींची माहिती या लेखातून देण्याचा प्रयत्न करत आहे.

वैयक्तिक माहिती:
जन्म- 13 जानेवारी 1926 रोजी उरण तालुक्यातील जासई ह्या गावात
शिक्षण- वकिलीपर्यंत शिक्षण. बीए मुंबईतून, तर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून एलएलबी
नाना ह्या नावाने त्यांच्या समकालीन व्यक्ती त्यांना ओळखत असत

राजकिय कारकीर्द:
पाचवेळा आमदार (उरण-पनवेल विधानसभा मतदारसंघ)
दोनवेळा खासदार (पुर्वीचा कुलाबा जिल्हा आणि सध्याचा रायगड जिल्हा)
महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते- 1983
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात एक वर्ष तुरुंगवास

संघर्षाची बीजे आणि दिबा
17 मार्च 1970 रोजी सिडकोची स्थापना केली. सिडकोने पनवेल, उरण आणि आज जिथे नवी मुंबई दिसत आहे तेथील शेतकरी वर्गातील आगरी समाज बहुसंख्येने राहत असलेल्या 95 गावातील 50 हजार एकर जमीन नवी मुंबई प्रकल्प उभारण्यासाठी अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला. त्याच जोडीला जेएनपीटी बंदरासाठीही जमिन अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मुळात आगरी म्हणजे मीठ आणि शेती अशी दोन्ही प्रकारची आगर पिकवणारा कष्टकरी वर्ग. सरकारच्या या निर्णयामुळे संपूर्ण समाज नष्ट होण्याची वेळ आली होती. कारण, जमिनच शिल्लक राहिली नाही तर जगायचे कसे? त्यावेळी, पनवेल व उरण तालुक्याचे आमदार दि बा पाटील साहेब होते. अभ्यासपूर्ण नेता असलेल्या दि बा पाटील साहेबांना सिडकोच्या येणाऱ्या संकटाची जाणीव झाली आणि ज्यामुळे त्याकाळी बहुसंख्येने अशिक्षित असलेल्या त्यांचा आगरी समाज सदरील परिसरातून कुठेतरी दूरवर फेकला जाऊ शकतो हे त्यांना उमगले. त्यानंतर दिबांच्या नेतृत्वाखाली लढ्याची उभारणी होत गेली.
1970 ते 1984 काळापर्यंत विविध आंदोलनांच्या माध्यमातून कुठेतरी जनतेचा असंतोष शिगेला पोहोचला होता. जनतेला 40 हजार रूपये एकरी भाव मिळावा आणि 12.5 टक्के विकसित भुखंड मिळावेत ही दि बा पाटलांची मागणी जोर धरू लागली. 16 जानेवारी 1984 व 17 जानेवारी 1984 रोजी उरण तालुक्यातील अनुक्रमे जासई येथील दास्तान फाटा आणि पागोटे येथे जमीन संपादन करायला आलेल्या पोलिसांसोबत शेतकऱ्यांचा संघर्ष झाला. त्या संघर्षात १६ जानेवारीला दास्तानफाटा येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चिर्ले येथील नामदेव घरत तर धुतूममधील रघुनाथ ठाकूर या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. दास्तान फाटा येथील गोळीबारानंतर हे आंदोलन अजून तीव्र होत गेले. त्यानंतर 17 जानेवारी रोजी झालेल्या गोळीबारात पागोटे गावातील पिता-पुत्र महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील व कमलाकर कृष्णा तांडेल या तीन शेतकऱ्यांना आपले बलिदान द्यावे लागले. नंतर सरकारने २७ हजार रुपये एकरी मोबदला जाहीर केला आणि त्यानंतर साडेबारा टक्के योजनेअंतर्गत विकसित भूखंड देण्याचा निर्णय 1994 मध्ये झाला.
आज आगरी समाजातील सुबत्ता अनेकांना दिसतं असेल. पण, ही सुबत्ता येण्यामागे दि बा पाटील यांचे भविष्यातील घडामोडींचा विचार करणारे अभ्यासू नेतृत्व होय. 12.5% विकसित भूखंडांमुळे नवी मुंबई परिसरात आर्थिक सुबत्ता आली. जर त्या काळात ह्या नेत्याने आपल्या मातीसाठी संघर्ष केला नसता तर आज हा समाज कुठेतरी दुर फेकला गेला असता. कारण, सरकार जमिनीचा मोबदला म्हणून 15 हजार रूपये एकरी देत होते. हे 15 हजार संपायला वेळ नसता लागला. त्यांनी मिळवून दिलेले 12.5% विकसित भूखंड हे पुढच्या पिढीला उदरनिर्वाहकरीता वापरता आले. अन्यथा जमिन गेलेली होती, पैसा देखिल संपला असता...!!
दि बा पाटील त्या काळात वकील होते. अतिशय हुशार व्यक्तिमत्त्व. वकिली व्यवसाय करून देखिल खोऱ्याने पैसा कमावला असता. पण, काही माणसे ही फक्त तत्वासाठी जगतात. आजकाल साधा नगरसेवक बनतो तो देखील 2 वर्षात फोरच्युनरच्या खाली गोष्टी करतं नाही. याउलट, ह्या माणसाचे घर देखील जनतेनी बांधले. पनवेल शहरात आजही संग्राम नावाने त्यांचे घर आहे. आज असे किती नेते भेटतील?

नवी मुंबई विमानतळ नामांतराचा वाद का सुरू झाला?
कोरोना काळात लॉकडाऊन लावल्यामुळे सर्वसामान्य जनता घरात बसलेली असताना सिडको मार्फत प्रस्ताव सादर करून तो केंद्राला पाठवणे कितपत योग्य आहे? लॉकडाऊन हा आरोग्य विषयक वैद्यकीय सेवा सुविधांना वेळ मिळावा म्हणून लावला होता. असे नामकरण वैगेरे आरोग्याच्या व्याख्येत न बसणारे विषय सरकारला लॉकडाऊनच्या काळात का गरजेचे वाटले? आणि ते मंजुर करण्यासाठी इतके पटापट निर्णय का घेतले गेले? लोकशाही राज्यात सत्ताधारी वर्गाला जनतेला विचारायची गरज नाही का?
आणि इथेच संघर्षाची ठिणगी पडली....
सर्व घडामोडी होत असताना इतक्या वर्षांत शिवसेना नेत्यांकडून कुठेही नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाचा प्रस्ताव दिला नव्हता किंवा मागणीही केली नव्हती. पण, 6 महिन्यांपूर्वी या सरकारमधील एका मंत्र्याने बाळासाहेब ठाकरे साहेबांचे नाव विमानतळाला देण्यात यावे म्हणून बोलायला सुरूवात केली आणि एप्रिल 2021 ह्या महिन्यात कोरोणामुळे कडक निर्बंध लावलेले असतानाही सिडकोने एक ठराव मंजूर करून तो ठराव राज्य सरकारकडे पाठवला आणि राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पारित करून केंद्राला पाठविला. इतके पटापट निर्णय कोरोणाच्या लॉकडाऊनमध्ये घेतले गेले. मग, असे पटापट निर्णय औरंगाबादचे नामकरण प्रश्नांवर घेण्यास सरकारला का अडचणी येतात...??
ह्या सर्व प्रक्रियेत ज्या भूमिपुत्रांची घरे आणि जमिनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी अधिग्रहीत केल्या गेल्या त्यांची भूमिका काय आहे हे विचारण्याचे कष्ट ना त्या मंत्र्याने घेतले ना सिडकोने घेतले... ना सरकारने घेतले...!!

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त जनतेची मागणी आणि त्याचा पाठपुरावा
2008 रोजीच सिडको महामंडळाकडे दि बा पाटील हे नाव नवी मुंबई प्रकल्पाला देण्यात यावे याविषयी स्थानिक जनतेकडून प्रस्ताव दिला होता. 2 जानेवारी 2015 रोजी खासदार कपिल पाटील यांनी लोकभावनेचा विचार करून लोकसभेत दि बा पाटील साहेबांच्या ही मागणी केली. त्या संबंधीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष व सध्याच्या मंत्रीमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिला असता त्यांनी तो तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 19 जून 2018 रोजी पाठवला. फडणवीस साहेब यांनीसुद्धा तो प्रस्ताव उचित कार्यवाही करण्याच्या सूचनेसह प्रधान सचिव (विमानचालन) यांच्याकडे पाठविला होता. तसे 7 जुलै 2018 रोजी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांनी लेखी कळविलेही होते.
उपलब्ध प्रस्ताव आणि कागदपत्रांद्वारे हे स्पष्ट होत आहे की, स्थानिकांनी 2008 पासूनच सदरील विमानतळाच्या नामकरण प्रश्नांवर लोकशाही मार्गाने खूप प्रयत्न सुरू ठेवले होते. परंतु, सरकारला लोकशाही प्रणालीवर विश्वास नसावा हे या प्रकरणातून स्पष्ट दिसतं आहे. जेव्हा सर्वसामान्य जनता लोकशाही मार्गाने मनापासून प्रयत्न करत असते आणि राजकिय पक्ष सत्तेचा वापर करून हवे ते निर्णय घेतात. मग, अशावेळी सर्वसामान्य जनतेने काय करायचे? लोकशाहीतील नियम फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच असतात का?
विमानतळ नामांतराचा वाद हा राज्य सरकारने त्यातही एका विशिष्ट खात्याच्या मंत्री महोदयांनी स्वामी निष्ठा दाखवण्यासाठी जाणुनबुजून उकरून काढलेला वाद आहे. 6 महिन्यांपूर्वी इथे नामतरण प्रश्नांवर कोणतेही वाद नव्हते. पण, कोरोणा काळात जनतेच्या मागण्या तसेच 2008 सालापासून स्थानिकांनी सिडकोकडे दिलेल्या लेखी प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही न करता राज्य सरकारने सिडकोकडून अन्य नावाचा प्रस्ताव पारित करून घेतला आणि घाईघाईने राज्य कॅबिनेट मधून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. जो प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अजून 4 वर्षाचा कालावधी बाकी आहे तिथे नामांतराचा घाट का घातला गेला? भारतात असे किती प्रकल्प आहेत जिथे प्रकल्प पुर्ण होण्याअगोदरच त्याचे नामतरण केले गेले? कोरोना काळात राज्य सरकारला जनतेच्या हिताची कामे सोडून नामांतर प्रक्रियेत रस का आहे? सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ पुर्ण स्थितीत आहे. पण, तेथे मात्र नामांतर प्रश्नात हे मंत्री महोदय काहीच हालचाल करत नाहीत. समृद्धी महामार्गासारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे नाव दिले गेले आहेच.
जर बाळासाहेब ठाकरे साहेबांचे नाव महाराष्ट्रातील कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला दिले गेलेले नसते तर मुद्दा वेगळा होता. पण, जवळपास 55 हजार कोटी रुपये खर्च करून समृद्धी महामार्ग होणार आहे त्याला बाळासाहेबांचे नाव आहे. तसेच 400 कोटी खर्चून जुन्या महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभे राहत आहे. या सर्व गोष्टींना जनता म्हणून आम्ही पाठीबा दिलाच ना. पण, दि बा पाटील साहेबांच्या नावाने कोणत्याही स्वरूपाचे स्मारक ना सिडकोने उभारले आहे, ना जेएनपीटी ने उभारले आहे, ना राज्य सरकारने उभारले आहे. आपल्या भारतातीलच रांची विमानतळाला स्थानिकांचे नेतृत्व लाभलेल्या बिरसा मुंडा यांचे नाव दिले गेलेले आहे. मग, अश्या स्थितीत रांची विमानतळाचे उदाहरण लक्षात घेऊन नवी मुंबई विमानतळाला स्थानिकांच्या खुप वर्ष जुन्या मागणीनुसार दि बा पाटील यांचे नाव देण्यास सत्ताधाऱ्यांचा विरोध का आहे? की सत्ता आपल्याजवळ आहे त्यामूळे आपण स्थानिक जनतेच्या भावनांच्या विरोधात जाऊन महाराष्ट्रात जो जो प्रकल्प निर्माण होईल त्याला एकचं नाव देण्याचा नवीन पायंडा घातला जात आहे का?
बाळासाहेब ठाकरेंची दूरदर्शनवर एक मुलाखत झाली होती. त्यात बाळासाहेबांनी म्हटल्याचे आठवते की, राज्यात युतीचे सरकार आहे. नवलकर सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते. त्यांनी बाळासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे ठरवले होते. पण, बाळासाहेबांनी तो पुरस्कार नाकारून तो पुरस्कार पु. ल. देशपांडे यांना देण्यास सांगितले व सोबतच मुंबई पुणे रस्त्यास पुलंचे नाव देण्यास सांगितले. जो स्थानिक अस्मितेचे राजकारण करतो, तोच पक्ष स्थानिकांच्या विरुद्ध उभा आहे. ज्या आगरी समाजाने या पक्षाच्या वाढीसाठी महत्वाचे योगदान दिले त्याच आगरी समाजाच्या विरुद्ध आपण का वागत आहात? दि बा पाटील साहेबांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिल्यामुळे बाळासाहेबांचे नाव कमी होणार नाही. उलट, कोणताही वाद न होता दि बा पाटील साहेबांचे नाव दिले असते तर आगरी समाजाला देखील आपल्या कार्याचा अभिमान वाटला असता. पण, आता गोष्टी झपाट्याने बदलत आहेत. पालघर, ठाणे, रायगड येथील जनतेला कुठेतरी त्यांच्या परिसरात पक्षीय राजकारणात समाजावर दडपशाही होत आहे याची जाणीव होत आहे. तरुणाईचे आवडते आमदार राजू पाटील साहेबांनी 24 जून रोजी झालेल्या मोर्चाच्या मंचावर आणि आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये देखील मोजकेच परंतु थेट सांगितले आहे..."राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेचं माझं पहिलं प्राधान्य आहेे."

काही ठिकाणी बोलले जात आहे की, हा प्रकल्प मुंबई विमानतळाचा extension असेल. पण, ज्या रीतीने राज्य सरकार उतावीळ होऊन नामकरण करत आहे त्या अर्थी इथे विमानतळाला नवीन कोड लागणार आहे हे सध्यातरी स्पष्ट आहे. आणि जर extension असेल आणि मुंबई विमानतळासारखाच कोड असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आदर सर्व आगरी समाज करतोच. नागो पाटील सारखे आगरी मावळे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते. रायगड ठाणे कल्याण पालघरचा मुलूख महाराजांच्या सोबत होता आणि आयुष्यभर राहील.
आता फक्त एक पक्ष चालवत नसून उत्कृष्ट लोकशाही परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्याच्या उच्चस्थानी आहोत याचा विचार करणे आवश्यक आहे. सल्लागार स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी चूकीचे सल्ले देऊन जो समाज पूर्वीपासून आपल्या सोबत उभा राहिला त्या समाजाला बाजुला होण्यास भाग पाडले गेले. आयुष्यभर जो समाज आपल्या सोबत राहिला त्याला अडचणीत आणून नक्की काय साध्य होणार आहे? यातून पक्ष म्हणून तुमचा काही फायदा होणार आहे का? की भविष्यात या भूमिपुत्र समाजाची तुमच्यासाठी गरज संपलेली आहे?
आणि काही असे आहेत की, ज्यांना या भूमीचा, इथे सांडलेल्या रक्ताचा इतिहास माहिती नाही ते म्हणतात की हे नाव द्या, ते नाव द्या... त्यांच्यापैकी किती जणांची जमीन कोणत्याही प्रकल्पासाठी गेलेली आहे? प्रशासनाने दबाव टाकून, पावसाळ्यात पाणी तुंबवून, अनियंत्रित ब्लास्ट करून दगड राहत्या घरावर उडवून लोकांना राहती घरे सोडण्यास भाग पाडले? तुमच्या घरांची एक पायरी तरी कधी कोणत्या प्रकल्पासाठी तुटली आहे का? ज्यांची जमीन प्रकल्पात गेलेली असते त्यांचे दुःख तुम्ही नाही समजू शकणार. आणि कोणाला असे वाटत असेल की, ह्या जमिनी आम्ही हसत हसत दिल्या आहेत आणि पैसे कमावले. तर, तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही. सांडलेल्या रक्ताची किंमत तुम्हाला नसेल. पण, आम्हाला नक्कीच आहे.

24 जून 2021 रोजी झालेल्या आंदोलनाविषयी...
अनेक मुख्य रस्ते बंद केले होते. अनेकांना येऊन दिले नाही. त्यामुळे काही लोक रेल्वे ट्रॅकच्या बाजूने मार्ग काढत आंदोलनस्थळी पोहचू लागले तर आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी उलटी बातमी चालवली की, आंदोलकांनी रेल्वे बंद करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गर्दी केली...!!
लाखोंनी रस्त्यावर उतरून सुद्धा महाराष्ट्र पोलीस आरामात होते. 10 जून रोजी देखील साखळी आंदोलन झाले होते त्यावेळी देखील पोलीस प्रशासनाला कोणताही त्रास झाला नाही. त्यांना देखील माहिती आहे की, हा समाज जाणूनबुजून रस्त्यांवर कधीही येत नाही आणि त्यांना दिलेल्या शब्दानुसार जसे शांततेत आंदोलक जमले तसे शांततेत ते आपापल्या घरी गेले. काहीवेळ वाहतुकीचा खोळंबा झाला तो प्रशासनाने रस्ते बंद केल्यामुळे. जनता सिडको भवनावर मोर्चा नेणार होती कोणत्याही रस्त्यावर नाही.
फक्त आगरी समाजाच ह्या आंदोलनात सहभागी नव्हता तर, अनेक जाती, धर्म, समाजातील लोक या आंदोलन प्रसंगी उपस्थित होते. सर्वपक्षीय कार्यकर्ते ह्या आंदोलनात समाजसाठी सहभागी होते. हुसैन दलवाई साहेब आंदोलन प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित होते तर राजू शेट्टी साहेब, प्रकाश आंबेडकर साहेब, रामदास आठवले साहेब ह्यांनी दि बा पाटील यांचे नाव देण्याविषयी आपला पाठींबा जाहीर केला आहे.
दि बा पाटील ह्या आमच्या लोकनेत्याविषयी अजून एक महत्त्वाची माहिती स्त्री वर्गाकरिता सांगतो की, आज जो गर्भलिंग चाचणी बंदीचा कायदा अस्तित्त्वात आहे आणि त्यामुळे असंख्य स्त्री भ्रूण हत्या थांबल्या असतील तो कायदा अस्तित्वात येण्यासाठी दि बा पाटील यांचे योगदान खुप महत्वाचे आहेत...
अंतिमतः प्रश्न फक्त नावाचा नाही, भविष्यातील अस्तित्वाचा आहे. स्वतःच अस्तित्व वाढवताना आमच्या आगरी समाजाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कृपया कधीही करू नका ही मनापासून विनंती.

जाता जाता आगरी काव्य पंक्ती आठवली ती लिहितो

आमचा बापुस बी आनचा..
न आमची आस पून येच गावांची...
मंग, आमचेच जमीनीव दि बा पाटलाचा नाव देवाला हरकत का तुमची?
प्रश्न हाय यो अस्तित्वाचा...
भूमिपुत्रांचे न्याय हक्काचा...
इच्छा पुरी करा भूमिपुत्रांची...
न साथ द्यावी भूमिपुत्रांची...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरपाई म्हणून पैसे देण्यापेक्षा कायम स्वरुपी त्यांचे पुनर्वसन आणि त्यांना प्रकल्प पूर्ण होण्याच्या अगोदर पर्यायी जमिनी सर्व सोयी युक्त देणे गरजेचे आहे.
नोकरी देवू ,रोजगार देवू ही गाजर काही कामाची नाहीत .
दोन वर्ष किरकोळ पदावर कॉन्ट्रॅक्ट मध्ये नोकरी देवून नंतर हकल जाते.

कुठून आणायची अशी नोकरी ? एअरपोर्टवर ह्यांना नोकर्या द्यायच्या तर मग ते स्किल आहे का ? तिथेतरी परमनंट नोकर्या असतात का आजकाल?

स्वरूप सर, प्रत्येकाची आपापली मते असतात आणि ती मांडायला हवीच. म्हणून तर मायबोलीवर ही माहिती लिहायचा प्रयत्न केला. आम्ही आगरी आपसाआपसात चर्चा करून माहिती तिकडेच फिरत होती. आज मायबोली सारख्या प्लॅटफॉर्ममुळे आपल्या पर्यंत माहिती सांगता आली. मुख्य उद्देश माहिती सांगणे होते. चर्चा होत राहील. मायबोली आवडण्याचे आणि माहिती इथे लिहिण्याचे हेचं कारण आहे. आगरी हा समाज आहे आणि त्याच जोडीला आगरी ही महाराष्ट्रातील अनेक मायबोलीपैकी एक मायबोलीच आहे... आपल्या सर्वांचे विचार आवडले. कोणाविरुद्ध कसलेही राग नाहीत. थोडेसे वाद प्रतिवाद होऊन संवाद होत राहणे ही गरज आहे.

रोजगार देवू हे ठीक आहे संबंधित प्रकल्पात गरजेच्या वस्तू,सेवा पुरवणे ह्या मध्ये त्यांना सहभागी करा .
नोकऱ्या देवू हे गाजर तर बिलकुल नको.
Pvt कंपनीत नोकरी म्हणजे फक्त पिळवणूक
हे सूत्र असते.
मालकांना नोकर बनवायची काही गरज नाही.

BLACKCAT सर, आपण आक्रमक होऊ नका. आपल्याला काय एकमेकांच्या विरूद्ध युद्ध करायचे नाही. नोकरी, व्यवसाय आपण बघूच ना. पाटील साहेबांच्या कृपेने आमच्या जुन्या पिढीला शिक्षणाची किंमत समजली आणि आमची आजची पिढी शिकली आहे, शिकते आहे आणि शिकत राहणार.

हेमंत सर, "प्रश्न फक्त नावाचा नाही. आमच्या अस्तित्वाचा आहे." यात अस्तित्व म्हणजेच भविष्यातील नोकरी व्यवसायामध्ये त्या त्या परिसरातील युवा वर्गाला कशा संधी मिळतील हे बघणे होय. फक्त आगरीच नाही तर जो जो स्थानिक असेल त्याला संधी मिळणे आवश्यक आहेत. नावामुळे समाज एकवटला. भविष्याच्या दृष्टीने समाज एकवटणे कधीही चांगले. पाटील साहेबांच्या नावासोबतच भविष्यातील संधीसाठी समाजाचे प्रयत्न चालू आहेत.

एग्रेसिव्हचा भाग नाही

पण तुमच्या घराजवळ 3 वर्षांनी एअरपोर्ट येणार तर आता तुम्ही मिळेल त्या एअरपोर्टवर 3 वर्षे नोकर्या करून अनुभव घ्या
मग तुम्हाला तिथे नोकरी आपोआपच मिळेल,
नुसतेच आंदोलन करून नोकरी कशी मिळणार ?

तुम्ही मिळेल त्या एअरपोर्टवर 3 वर्षे नोकर्या करून अनुभव घ्या
>>>
+७८६
आमच्या बिल्डींगच्या एअरपोर्टला वॅकेन्सी आहे. कोणाला अनुभव हवा असेल तर सांगा Happy

BLACKCAT सर, फक्त नोकरीच नाही तर अनेक व्यवसाय निर्माण होतील आणि तिथे संघटीत असणे आवश्यक आहे. नोकरीच्या दृष्टीने बोलायचे तर शिक्षित युवा वर्ग विविध प्रशिक्षण घेत आहेत. पण, तिथे देखील एजन्सी दिल्या जातात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकरी. मग, ह्या एजन्सी किंवा इतर व्यवसाय आपल्या लोकांच्या ताब्यात असायला हरकत काय आहे? यात मी फक्त आगरीच नाही तर या परिसरातील सर्वच स्थानिक मराठी माणसाविषयी सांगतोय.

शिवसेनेतील एका मंत्र्यांच्या हटवादी भूमिकेमुळे हे सर्व वाद सुरू झाले. काहीही कारण नसताना जुन्या मागणीला विरोध करून त्यांची मागणी रेटली गेली. हा प्रश्न शिवसेनेने मिटवावा आणि स्थानिकांच्या सोबत सुरू असलेले वाद थांबवून नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेबांचे नाव द्यावे. मी काही राजकीय तज्ञ नाही. परंतु, मोठया प्रमाणात समाजातील तरुण वर्ग शिवसेनेपासून दुरावत जात आहे.

उरणकर, तुमचा लेख पटला.
ही माहिती अजिबात नव्हती आधी.
चेंज.ऑर्ग वर काही पिटीशन असेल तर लिंक द्या
सह्या वाढवू.

Chan lekh Urankar... yat jyani negative comments kelya aahet te nehmich troll krnare ani rikame I'd ahet.. ignore kra tyana.. tumcha lekh khup chan ahe.. jyana samjun ghyaychi kuvwt nahi tyana samjavu naka.

लेख अगदि भावनेच्या आहारी जाउन लिहिलेला आहे. आगरी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न वगैरे हे जरा जास्तंच होतंय असं वाटंत नाहि का? Mr. Raj.. ekdum chukicha mudda ahe.. kahi personal ikde kadhu nka.. tumcha sarkhe 3/4 astatch aslya faltu comments dyayla.. tyane kahi Farak padat nahi..

छान आणि सविस्तर माहिती..ह्यातले काहीच माहिती नव्हते आधी...दि बा पाटील यांच्या कार्याचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.

उरण कर तुमचे व समाजाचे म्हणणे मांडता आले हे मायबोलीचे यश आहे. ह्या आधीच्या बाफ वर फक्त विषयाला तोंड फोडून चर्चा व्हावी हाच उद्देश होता. तुम्हाला शुभेच्छा. इथून पुढचा लढा तुमचा आहे.

स्थानिक समा जाच्या अस्तित्वा चा प्रशन जागतिक आहे. अमेरिकेत रेड इंडिअन; चीन मध्ये उघीर व तिबेटी लोकांचे जीवन. ऑस्ट्रेलि या व न्युझीलंड मध्ये माओरी व इतर आदि वाश्यांची संस्कृती व जगण्याचे मार्ग, कॅनडा मध्ये मूल वासियांची संस्कृती हे फार क्रूर पणे न ष्ट करून त्यावर नैसर्गिक रिसोर्स ओरबाडून उभी राहिलेली व्हाइट लोकांची जीवन पद्धती ही काही उदाहरणे आहेत. मध्यंतरी कॅनडा मधे आदिवाश्यांची मुले जी सरकाराने जबरदस्ती वेगळी करून शाळेत ठेवून त्यांना चर्च तर्फे शिक्षण देण्याची व जवळ पास कन्वर्ट करायची योजना होती - त्यांची अडीचशे ते तीनशे शवे - म्हणजे आता सांगाडेच - सापडली आहेत. शाळेची जमीन खोदल्यावर ही मुले अगदी लहान तीन वर्षांची- पुरलेली आढळलेली आहेत. त्यावर सध्याच्या सरकारने काहीतरी थातुर मातूर माफी मागितली आहे. पण त्याने अन्याय भरून येत नाही. वाचलेल्या मुलांच्या कहाण्या हृदय द्रावक अश्याच आहेत. आता इंटरनेट मुळे हे अत्याचार जनतेला समजतात तरी.

ह्या प्रत्येक विषयावर लेखमालिका लिहिता येतील असे हे अवघड विषय आहेत. व जालावर माहिती उपलब्ध आहेच.

द शॉक डॉक्ट्रिन नावाचे पुस्तक जरूर वाचा. मूलवासी आदिवासी लोकांच्या संस्कृती, त्यांचे जगण्याचे मार्ग - जसे श्रीलंकेत कोळी समाज पारंपारिक पद्धतीने मासे मारी करत असे पण सुनामी आल्यावर त्यांच्या वस्त्या न ष्ट झाल्या व उरलेल्यांवर त्यांना परत येउच दिले गेले नाही. आंदोलन मारले गेले फोर्स ने व जागा डेव्हल पर्स व मोठ्या हॉटेल चेन्स ना दिली गेली. पहिल्या जगातील श्रीमंत व्हाइट लोकांना गॉल्फ खेळता यावे व बीच वर पडून पुस्तके वाचता यावीत म्हणून मोठ मोठ्या प्रॉपर्टी डेव्हलप केल्या गेल्या. इथे मूलवासी लोकांना आता वेटर किंवा बार टेंड र हाउस कीपिन्ग किचन मध्ये महा मेहनतीची / घा णेर डी/ कमी मोबदल्याची कामे मिळतात.

ह्या एअर पोर्ट वर सुद्धा लोकल जनतेला अशीच लोडर हमाल फिटर बॅक एंड कामे मिळतील ती ही काँट्रेक्ट वर . व त्याने झालेले नुकसान भरून येत नाही. स्वाभिमानाला पोहोचलेली ठेच तर कधीच भरून येत नाही. आता ह्यांना बरा असतो स्वाभिमान जमिनी विकून पैसे घेउन अशी अ‍ॅटिट्युड असेल तर काय.

तस्मात् शिडी चढून श्रीमंत होण्याच्या मागे लागणे. एकदा पोट भरले की अस्मिता आणि हुंकाराला बळ येते. रादर ते करायची ताकद येते. रिकाम्या पोटी येतंच नाही असं नाही, पण लाखात एकाला येते. बाकीच्या सगळ्यांचा जीवनाची ससेहोलपट होते. तो एक इतिहासात अमर होतो, सो आपण (वैयक्तिक नाही, जनरली म्हणतोय) तसे असाल तर उत्तमच. बाकी शिवाजी शेजारच्या घरी प्रकार असेल तर तो तसाच चालू द्यावा. Capitalists प्रुव्हन मार्ग आहे.
रिकाम्या पोटी मुकी बिचारी कुणीही हाका आणि शेवटी ढुंगणावर दंडुका स्टेज येण्याची शक्यता अधिक. अगदीच मम झालं पण असो.

>> सध्या सत्तेत असेलेला राजकीय पक्ष महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना आपलीच नावे देत सुटला आहे ते योग्य आहे?<<
अर्थात नाहि. हा वाद सिडकोच्या अधिकार्‍यांनी सेनेच्या खुशमस्करी करता सुरु केला कि त्यानंतर तो राजकिय हेतुने पुढे पेटवला गेला हे जाणुन घेणं महत्वाचं आहे. जिथे-तिथे गांधी-नेहरु यांच्या नांवा विरोधात बाळासाहेबांनी नेहेमीच आवाज उठवला होता, त्यांच्या पश्च्यात तोच प्रकार सुरु होत असेल तर हि दुर्दैवाची बाब आहे. सेनेला तेव्हढं तारतम्य असावं/आहे, असा माझा समज आहे. या प्रकरणात त्यांच्याच पुतण्याचीच भूमिका अतिशय बोलकि आहे.

उरणकर, तुमच्या भावना पोचल्या. पण परत एकदा अस्तित्वाचा मुद्दा समजला नाहि. दिबा पाटिल यांचं नांव दिल्याने आगरी समाजाचं अस्तित्व (ग्राउंड रियॅलिटि) कसं शाबुत राहिल हा प्रश्न उरतोच. समाजाच्या पुनरुत्थानाच्या नांवाखाली लोकोपयोगी योजनां ऐवजी नामांतर, पुतळे इ. मार्गाने चळवळ पुढे नेणार्‍या नेत्यांना घरी बसवण्याची वेळ आगरी समाजाने आणावी; विकासाची हिच पहिली पायरी आहे असं समजा...

समाजाच्या पुनरुत्थानाच्या नांवाखाली लोकोपयोगी योजनां ऐवजी नामांतर, पुतळे इ. मार्गाने चळवळ पुढे नेणार्‍या नेत्यांना घरी बसवण्याची वेळ आगरी समाजाने आणावी; विकासाची हिच पहिली पायरी आहे असं समजा...>>> सहमत.

अमितव... आम्हाला आंदोलन करण्याची वेळ सरकारमुळे आली आहे. सुरूवात आम्ही केलेली नाही. आम्ही लोकशाही मार्गाने 2008 पासून आमचे प्रस्ताव मांडत होतो. 24 तारखेला आंदोलन झाले त्यात कसल्याही प्रकारचे उपद्रव झाले नाही आपण वाचलीत का एखादी बातमी की ज्यात काही उपद्रव झाला? एखाद्या निर्णयाविरुद्ध शांततेत देखील आंदोलन करू नये? आणि मी स्वतः आंदोलनात सहभागी आहे, फक्त शब्दांचे तीर चालवण्याचे काम करत नाही. सरकारने कोरोणाच्या आडून केलेला ठराव मागे घ्यावा ही आमची विनंती आहे. कोणीही आंदोलन करणार नाही.

मागे मी एक आगरी नेत्याची मुलाखत बघत होतो. तेव्हा ते बोलत होते दि बा पाटील यांचे नाव द्या. कारण जेव्हा नागरिक विमानतळावर उतरतील आणि विचारतील कोण हे दि बा पाटील? तेव्हा तिथे बाजूलाच या प्रश्नाची वाट पाहत उभे असलेले आगरी तरुण अभिमानाने छाती ठोकून सांगतील की ते आमचे आजोबा आहेत.

राज सर, कोणत्याही पुढाऱ्यांने हा मुद्दा आणला नाही. युवकांनी पक्ष वैगेरे न बघता जनजागृती केली. राजू दादा पाटील यांची अधिकृत अकाऊंट वरील फेसबुक पोस्ट नक्की वाचा. त्यांनी आपल्या पोस्ट मधून आणि प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होऊन समाज महत्वाचा आहे हेच सांगितले आहे. बाकी, शिवसेनेविषयी सांगायचे तर आगरी समाज आणि शिवसेना हे समीकरण खुप जुने होते. पण, आता एका पुढाऱ्याचे स्थानिकांना दाबण्याचे प्रकार शिवसेनेत सुरू झाले आहेत. आणि याचाच पुढचा भाग म्हणजे सिडकोमध्ये कोरोणा काळात घाई घाईत बाळासाहेबांच्या नावाचा प्रस्ताव पारित करून घेतला. हा प्रकार आम्ही बघा किती स्वामीनिष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी आगरी समाजाला दोषी दाखवण्याचा उद्योग केला. यातून शिवसेनेलाच फटका बसणार आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना उल्लेख केलेले लोक शिवसेनेचा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहेत का? शिवसेनेने विचार करायचा आहे. उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला नसता तर काहींनी मुख्यमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले होतेच.

केवळ नाव दिल्याने आगरी अस्तित्व कसे टिकते , समजले नाही, मग बाकी नावाच्या संस्थेत आगरी लोक जात नाहीत का ? आजवर इतर नावे असलेल्या शाळा, हॉस्पिटल , कंपन्या त्यांना उपयोगी पडल्याच ना ?

आमच्या गावच्या माणसाच्या नावाने मुंबईत फक्त एक चौक आहे , पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर चौक

आणि आम्ही फक्त तेवढाच चौक सोडून उरलेली मुंबई फिरत असतो
Proud

दिबा समर्थकांना जास्तीत जास्त पाठिंबा मिळेल ही आशा व्यक्त करतो नाहीतर त्या विदर्भातल्या उद्यानाच्या नामकरणाचा विरोध जसा दडपला गेला तसे काही होईल
canvas

राज सर, आगरी समाजाचे अस्तित्व... मुळातच हा आगर पिकवनारा कष्टक अशिक्षितरी समाज होता. समजा, दि बा पाटील नसतेच, तर सिडकोने उरण पनवेल आणि जिथे नवी मुंबई वसली आहे तेथील सर्वच्या सर्व गावे उठवण्याचा पुर्ण प्लॅन होता आणि अजूनही नैना, खोपटे नवीन शहर, SEZ, लॉजिस्टिक्स पार्क अश्या बऱ्याच गोष्टी गावेच्या गावे उठवून करण्याचे योजिले. जर यांना कोणताही विरोध केला नसता तर इथे आज जो आगरी माणूस दिसत आहे तो 1970 सालीच कुठेतरी सोलापूर येथे दिसला असता. सरकारची पुर्ण तयारी होती आणि आहे. मुंबई मध्ये आज किती मराठी टक्का शिल्लक राहीला? गिरणी कामगारांच्या श्रमावर उभ्या राहिलेल्या मुंबई मधुन गिरणी कामगार का हद्दपार झाले?

BLACKCAT, सर, आम्ही कुठेही इतर समाजांना वाईट बोललो नाही. प्रत्येकाचे आपले आपले योगदान आहे. मी कुठे असा उल्लेख केला आहे की, इतरांमुळे आमचे अस्तित्व धोक्यात आहे? आम्ही आमचे अस्तित्व संपू शकते यासाठी सरकारी यंत्रणाना कारणीभूत मानतो.

नैना , खोपटे , सिडको , अजूनही आहेच

मीही तिकडे दोन गुंठा बुक केला होता, रांजनपाडा स्टेशनसमोर , पण तिकडे काहीही होणार नाही,

शेवटी ते कँसल करून ठाण्याचे फायनल केले , समोर मेट्रो अन रस्ता आहे, आता नावावर करून घ्यायचा आहे
विमान घेऊन तसेही काय करणार होतो ?
Proud

बेंगलोर, हायद्राबाद इथेही असे गावाबाहेर विमानतळ उभारली आहेत , पण त्याच्या एक दोन किलोमीटर मध्येच विकास होतो , आणि परगावातून तिथे आलेले लोक 1000 रु टॅक्सीचे घालून पुन्हा जुन्या शहरातच जातात , दोन दिवसांनी काम झाले की पुन्हा 1000 रु बडवून पुन्हा विमानतळावर जातात. विमानतळ आले म्हणून कर्जत ते उरण , 200 किलोमीटर मध्ये लोक जे बोंबलत आहेत , आमचा विकास होणार होणार , ते सगळे फोल व व्यर्थ आहे.
कर्जत कल्याण पनवेल बेलापूर शीळ फाटा , उळवे , उरण.. कुठेही घर बघायला गेलं की पहिली ओळ असते , Very near to new upcoming airport !! सगळेजण जणू विमानतळाचे दार आमच्याच गल्लीत उघडणार असे म्हणत असतात. पण फायदा फक्त उळव्याला होईल , बाकी तसेच बसतील
Proud

Pages