नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेबांचे नाव का देण्यात यावे?

Submitted by उरणकर on 26 June, 2021 - 02:52

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना वंदन करुन लेखाची सुरुवात करत आहे...

कुठेतरी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरण विषयी प्रत्यक्ष काय झाले आणि काय होत आहे ही माहिती येथील स्थानिक जनता सोडून महाराष्ट्रातील इतर विभागातील जनतेपर्यंत पोहोचली नाही किंवा स्थानिक पातळीवर विविध घडामोडी कश्या घडत गेल्या याची खरी माहिती बाहेरच्या दुनियेत पोहोचली नाही. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ परिसरातील स्थानिक व्यक्ती म्हणून मला येथील घडणाऱ्या तसेच घडून गेलेल्या घडामोडींचा उहापोह करणे आवश्यक वाटते. त्यासोबतच दिनकर बाळू पाटील उर्फ दि.बा.पाटील कोण? त्यांचे महाराष्ट्राच्या समाजकारणातील योगदान काय? तसेच पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील स्थानिक व नवी मुंबई विमानतळ ज्यांच्या जमीनीवर उभे राहत आहे ते लोक का नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील साहेबांच्या नावाची मागणी करत आहेत आदी गोष्टींची माहिती या लेखातून देण्याचा प्रयत्न करत आहे.

वैयक्तिक माहिती:
जन्म- 13 जानेवारी 1926 रोजी उरण तालुक्यातील जासई ह्या गावात
शिक्षण- वकिलीपर्यंत शिक्षण. बीए मुंबईतून, तर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून एलएलबी
नाना ह्या नावाने त्यांच्या समकालीन व्यक्ती त्यांना ओळखत असत

राजकिय कारकीर्द:
पाचवेळा आमदार (उरण-पनवेल विधानसभा मतदारसंघ)
दोनवेळा खासदार (पुर्वीचा कुलाबा जिल्हा आणि सध्याचा रायगड जिल्हा)
महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते- 1983
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात एक वर्ष तुरुंगवास

संघर्षाची बीजे आणि दिबा
17 मार्च 1970 रोजी सिडकोची स्थापना केली. सिडकोने पनवेल, उरण आणि आज जिथे नवी मुंबई दिसत आहे तेथील शेतकरी वर्गातील आगरी समाज बहुसंख्येने राहत असलेल्या 95 गावातील 50 हजार एकर जमीन नवी मुंबई प्रकल्प उभारण्यासाठी अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला. त्याच जोडीला जेएनपीटी बंदरासाठीही जमिन अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मुळात आगरी म्हणजे मीठ आणि शेती अशी दोन्ही प्रकारची आगर पिकवणारा कष्टकरी वर्ग. सरकारच्या या निर्णयामुळे संपूर्ण समाज नष्ट होण्याची वेळ आली होती. कारण, जमिनच शिल्लक राहिली नाही तर जगायचे कसे? त्यावेळी, पनवेल व उरण तालुक्याचे आमदार दि बा पाटील साहेब होते. अभ्यासपूर्ण नेता असलेल्या दि बा पाटील साहेबांना सिडकोच्या येणाऱ्या संकटाची जाणीव झाली आणि ज्यामुळे त्याकाळी बहुसंख्येने अशिक्षित असलेल्या त्यांचा आगरी समाज सदरील परिसरातून कुठेतरी दूरवर फेकला जाऊ शकतो हे त्यांना उमगले. त्यानंतर दिबांच्या नेतृत्वाखाली लढ्याची उभारणी होत गेली.
1970 ते 1984 काळापर्यंत विविध आंदोलनांच्या माध्यमातून कुठेतरी जनतेचा असंतोष शिगेला पोहोचला होता. जनतेला 40 हजार रूपये एकरी भाव मिळावा आणि 12.5 टक्के विकसित भुखंड मिळावेत ही दि बा पाटलांची मागणी जोर धरू लागली. 16 जानेवारी 1984 व 17 जानेवारी 1984 रोजी उरण तालुक्यातील अनुक्रमे जासई येथील दास्तान फाटा आणि पागोटे येथे जमीन संपादन करायला आलेल्या पोलिसांसोबत शेतकऱ्यांचा संघर्ष झाला. त्या संघर्षात १६ जानेवारीला दास्तानफाटा येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चिर्ले येथील नामदेव घरत तर धुतूममधील रघुनाथ ठाकूर या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. दास्तान फाटा येथील गोळीबारानंतर हे आंदोलन अजून तीव्र होत गेले. त्यानंतर 17 जानेवारी रोजी झालेल्या गोळीबारात पागोटे गावातील पिता-पुत्र महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील व कमलाकर कृष्णा तांडेल या तीन शेतकऱ्यांना आपले बलिदान द्यावे लागले. नंतर सरकारने २७ हजार रुपये एकरी मोबदला जाहीर केला आणि त्यानंतर साडेबारा टक्के योजनेअंतर्गत विकसित भूखंड देण्याचा निर्णय 1994 मध्ये झाला.
आज आगरी समाजातील सुबत्ता अनेकांना दिसतं असेल. पण, ही सुबत्ता येण्यामागे दि बा पाटील यांचे भविष्यातील घडामोडींचा विचार करणारे अभ्यासू नेतृत्व होय. 12.5% विकसित भूखंडांमुळे नवी मुंबई परिसरात आर्थिक सुबत्ता आली. जर त्या काळात ह्या नेत्याने आपल्या मातीसाठी संघर्ष केला नसता तर आज हा समाज कुठेतरी दुर फेकला गेला असता. कारण, सरकार जमिनीचा मोबदला म्हणून 15 हजार रूपये एकरी देत होते. हे 15 हजार संपायला वेळ नसता लागला. त्यांनी मिळवून दिलेले 12.5% विकसित भूखंड हे पुढच्या पिढीला उदरनिर्वाहकरीता वापरता आले. अन्यथा जमिन गेलेली होती, पैसा देखिल संपला असता...!!
दि बा पाटील त्या काळात वकील होते. अतिशय हुशार व्यक्तिमत्त्व. वकिली व्यवसाय करून देखिल खोऱ्याने पैसा कमावला असता. पण, काही माणसे ही फक्त तत्वासाठी जगतात. आजकाल साधा नगरसेवक बनतो तो देखील 2 वर्षात फोरच्युनरच्या खाली गोष्टी करतं नाही. याउलट, ह्या माणसाचे घर देखील जनतेनी बांधले. पनवेल शहरात आजही संग्राम नावाने त्यांचे घर आहे. आज असे किती नेते भेटतील?

नवी मुंबई विमानतळ नामांतराचा वाद का सुरू झाला?
कोरोना काळात लॉकडाऊन लावल्यामुळे सर्वसामान्य जनता घरात बसलेली असताना सिडको मार्फत प्रस्ताव सादर करून तो केंद्राला पाठवणे कितपत योग्य आहे? लॉकडाऊन हा आरोग्य विषयक वैद्यकीय सेवा सुविधांना वेळ मिळावा म्हणून लावला होता. असे नामकरण वैगेरे आरोग्याच्या व्याख्येत न बसणारे विषय सरकारला लॉकडाऊनच्या काळात का गरजेचे वाटले? आणि ते मंजुर करण्यासाठी इतके पटापट निर्णय का घेतले गेले? लोकशाही राज्यात सत्ताधारी वर्गाला जनतेला विचारायची गरज नाही का?
आणि इथेच संघर्षाची ठिणगी पडली....
सर्व घडामोडी होत असताना इतक्या वर्षांत शिवसेना नेत्यांकडून कुठेही नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाचा प्रस्ताव दिला नव्हता किंवा मागणीही केली नव्हती. पण, 6 महिन्यांपूर्वी या सरकारमधील एका मंत्र्याने बाळासाहेब ठाकरे साहेबांचे नाव विमानतळाला देण्यात यावे म्हणून बोलायला सुरूवात केली आणि एप्रिल 2021 ह्या महिन्यात कोरोणामुळे कडक निर्बंध लावलेले असतानाही सिडकोने एक ठराव मंजूर करून तो ठराव राज्य सरकारकडे पाठवला आणि राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पारित करून केंद्राला पाठविला. इतके पटापट निर्णय कोरोणाच्या लॉकडाऊनमध्ये घेतले गेले. मग, असे पटापट निर्णय औरंगाबादचे नामकरण प्रश्नांवर घेण्यास सरकारला का अडचणी येतात...??
ह्या सर्व प्रक्रियेत ज्या भूमिपुत्रांची घरे आणि जमिनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी अधिग्रहीत केल्या गेल्या त्यांची भूमिका काय आहे हे विचारण्याचे कष्ट ना त्या मंत्र्याने घेतले ना सिडकोने घेतले... ना सरकारने घेतले...!!

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त जनतेची मागणी आणि त्याचा पाठपुरावा
2008 रोजीच सिडको महामंडळाकडे दि बा पाटील हे नाव नवी मुंबई प्रकल्पाला देण्यात यावे याविषयी स्थानिक जनतेकडून प्रस्ताव दिला होता. 2 जानेवारी 2015 रोजी खासदार कपिल पाटील यांनी लोकभावनेचा विचार करून लोकसभेत दि बा पाटील साहेबांच्या ही मागणी केली. त्या संबंधीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष व सध्याच्या मंत्रीमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिला असता त्यांनी तो तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 19 जून 2018 रोजी पाठवला. फडणवीस साहेब यांनीसुद्धा तो प्रस्ताव उचित कार्यवाही करण्याच्या सूचनेसह प्रधान सचिव (विमानचालन) यांच्याकडे पाठविला होता. तसे 7 जुलै 2018 रोजी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांनी लेखी कळविलेही होते.
उपलब्ध प्रस्ताव आणि कागदपत्रांद्वारे हे स्पष्ट होत आहे की, स्थानिकांनी 2008 पासूनच सदरील विमानतळाच्या नामकरण प्रश्नांवर लोकशाही मार्गाने खूप प्रयत्न सुरू ठेवले होते. परंतु, सरकारला लोकशाही प्रणालीवर विश्वास नसावा हे या प्रकरणातून स्पष्ट दिसतं आहे. जेव्हा सर्वसामान्य जनता लोकशाही मार्गाने मनापासून प्रयत्न करत असते आणि राजकिय पक्ष सत्तेचा वापर करून हवे ते निर्णय घेतात. मग, अशावेळी सर्वसामान्य जनतेने काय करायचे? लोकशाहीतील नियम फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच असतात का?
विमानतळ नामांतराचा वाद हा राज्य सरकारने त्यातही एका विशिष्ट खात्याच्या मंत्री महोदयांनी स्वामी निष्ठा दाखवण्यासाठी जाणुनबुजून उकरून काढलेला वाद आहे. 6 महिन्यांपूर्वी इथे नामतरण प्रश्नांवर कोणतेही वाद नव्हते. पण, कोरोणा काळात जनतेच्या मागण्या तसेच 2008 सालापासून स्थानिकांनी सिडकोकडे दिलेल्या लेखी प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही न करता राज्य सरकारने सिडकोकडून अन्य नावाचा प्रस्ताव पारित करून घेतला आणि घाईघाईने राज्य कॅबिनेट मधून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. जो प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अजून 4 वर्षाचा कालावधी बाकी आहे तिथे नामांतराचा घाट का घातला गेला? भारतात असे किती प्रकल्प आहेत जिथे प्रकल्प पुर्ण होण्याअगोदरच त्याचे नामतरण केले गेले? कोरोना काळात राज्य सरकारला जनतेच्या हिताची कामे सोडून नामांतर प्रक्रियेत रस का आहे? सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ पुर्ण स्थितीत आहे. पण, तेथे मात्र नामांतर प्रश्नात हे मंत्री महोदय काहीच हालचाल करत नाहीत. समृद्धी महामार्गासारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे नाव दिले गेले आहेच.
जर बाळासाहेब ठाकरे साहेबांचे नाव महाराष्ट्रातील कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला दिले गेलेले नसते तर मुद्दा वेगळा होता. पण, जवळपास 55 हजार कोटी रुपये खर्च करून समृद्धी महामार्ग होणार आहे त्याला बाळासाहेबांचे नाव आहे. तसेच 400 कोटी खर्चून जुन्या महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभे राहत आहे. या सर्व गोष्टींना जनता म्हणून आम्ही पाठीबा दिलाच ना. पण, दि बा पाटील साहेबांच्या नावाने कोणत्याही स्वरूपाचे स्मारक ना सिडकोने उभारले आहे, ना जेएनपीटी ने उभारले आहे, ना राज्य सरकारने उभारले आहे. आपल्या भारतातीलच रांची विमानतळाला स्थानिकांचे नेतृत्व लाभलेल्या बिरसा मुंडा यांचे नाव दिले गेलेले आहे. मग, अश्या स्थितीत रांची विमानतळाचे उदाहरण लक्षात घेऊन नवी मुंबई विमानतळाला स्थानिकांच्या खुप वर्ष जुन्या मागणीनुसार दि बा पाटील यांचे नाव देण्यास सत्ताधाऱ्यांचा विरोध का आहे? की सत्ता आपल्याजवळ आहे त्यामूळे आपण स्थानिक जनतेच्या भावनांच्या विरोधात जाऊन महाराष्ट्रात जो जो प्रकल्प निर्माण होईल त्याला एकचं नाव देण्याचा नवीन पायंडा घातला जात आहे का?
बाळासाहेब ठाकरेंची दूरदर्शनवर एक मुलाखत झाली होती. त्यात बाळासाहेबांनी म्हटल्याचे आठवते की, राज्यात युतीचे सरकार आहे. नवलकर सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते. त्यांनी बाळासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे ठरवले होते. पण, बाळासाहेबांनी तो पुरस्कार नाकारून तो पुरस्कार पु. ल. देशपांडे यांना देण्यास सांगितले व सोबतच मुंबई पुणे रस्त्यास पुलंचे नाव देण्यास सांगितले. जो स्थानिक अस्मितेचे राजकारण करतो, तोच पक्ष स्थानिकांच्या विरुद्ध उभा आहे. ज्या आगरी समाजाने या पक्षाच्या वाढीसाठी महत्वाचे योगदान दिले त्याच आगरी समाजाच्या विरुद्ध आपण का वागत आहात? दि बा पाटील साहेबांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिल्यामुळे बाळासाहेबांचे नाव कमी होणार नाही. उलट, कोणताही वाद न होता दि बा पाटील साहेबांचे नाव दिले असते तर आगरी समाजाला देखील आपल्या कार्याचा अभिमान वाटला असता. पण, आता गोष्टी झपाट्याने बदलत आहेत. पालघर, ठाणे, रायगड येथील जनतेला कुठेतरी त्यांच्या परिसरात पक्षीय राजकारणात समाजावर दडपशाही होत आहे याची जाणीव होत आहे. तरुणाईचे आवडते आमदार राजू पाटील साहेबांनी 24 जून रोजी झालेल्या मोर्चाच्या मंचावर आणि आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये देखील मोजकेच परंतु थेट सांगितले आहे..."राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेचं माझं पहिलं प्राधान्य आहेे."

काही ठिकाणी बोलले जात आहे की, हा प्रकल्प मुंबई विमानतळाचा extension असेल. पण, ज्या रीतीने राज्य सरकार उतावीळ होऊन नामकरण करत आहे त्या अर्थी इथे विमानतळाला नवीन कोड लागणार आहे हे सध्यातरी स्पष्ट आहे. आणि जर extension असेल आणि मुंबई विमानतळासारखाच कोड असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आदर सर्व आगरी समाज करतोच. नागो पाटील सारखे आगरी मावळे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते. रायगड ठाणे कल्याण पालघरचा मुलूख महाराजांच्या सोबत होता आणि आयुष्यभर राहील.
आता फक्त एक पक्ष चालवत नसून उत्कृष्ट लोकशाही परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्याच्या उच्चस्थानी आहोत याचा विचार करणे आवश्यक आहे. सल्लागार स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी चूकीचे सल्ले देऊन जो समाज पूर्वीपासून आपल्या सोबत उभा राहिला त्या समाजाला बाजुला होण्यास भाग पाडले गेले. आयुष्यभर जो समाज आपल्या सोबत राहिला त्याला अडचणीत आणून नक्की काय साध्य होणार आहे? यातून पक्ष म्हणून तुमचा काही फायदा होणार आहे का? की भविष्यात या भूमिपुत्र समाजाची तुमच्यासाठी गरज संपलेली आहे?
आणि काही असे आहेत की, ज्यांना या भूमीचा, इथे सांडलेल्या रक्ताचा इतिहास माहिती नाही ते म्हणतात की हे नाव द्या, ते नाव द्या... त्यांच्यापैकी किती जणांची जमीन कोणत्याही प्रकल्पासाठी गेलेली आहे? प्रशासनाने दबाव टाकून, पावसाळ्यात पाणी तुंबवून, अनियंत्रित ब्लास्ट करून दगड राहत्या घरावर उडवून लोकांना राहती घरे सोडण्यास भाग पाडले? तुमच्या घरांची एक पायरी तरी कधी कोणत्या प्रकल्पासाठी तुटली आहे का? ज्यांची जमीन प्रकल्पात गेलेली असते त्यांचे दुःख तुम्ही नाही समजू शकणार. आणि कोणाला असे वाटत असेल की, ह्या जमिनी आम्ही हसत हसत दिल्या आहेत आणि पैसे कमावले. तर, तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही. सांडलेल्या रक्ताची किंमत तुम्हाला नसेल. पण, आम्हाला नक्कीच आहे.

24 जून 2021 रोजी झालेल्या आंदोलनाविषयी...
अनेक मुख्य रस्ते बंद केले होते. अनेकांना येऊन दिले नाही. त्यामुळे काही लोक रेल्वे ट्रॅकच्या बाजूने मार्ग काढत आंदोलनस्थळी पोहचू लागले तर आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी उलटी बातमी चालवली की, आंदोलकांनी रेल्वे बंद करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गर्दी केली...!!
लाखोंनी रस्त्यावर उतरून सुद्धा महाराष्ट्र पोलीस आरामात होते. 10 जून रोजी देखील साखळी आंदोलन झाले होते त्यावेळी देखील पोलीस प्रशासनाला कोणताही त्रास झाला नाही. त्यांना देखील माहिती आहे की, हा समाज जाणूनबुजून रस्त्यांवर कधीही येत नाही आणि त्यांना दिलेल्या शब्दानुसार जसे शांततेत आंदोलक जमले तसे शांततेत ते आपापल्या घरी गेले. काहीवेळ वाहतुकीचा खोळंबा झाला तो प्रशासनाने रस्ते बंद केल्यामुळे. जनता सिडको भवनावर मोर्चा नेणार होती कोणत्याही रस्त्यावर नाही.
फक्त आगरी समाजाच ह्या आंदोलनात सहभागी नव्हता तर, अनेक जाती, धर्म, समाजातील लोक या आंदोलन प्रसंगी उपस्थित होते. सर्वपक्षीय कार्यकर्ते ह्या आंदोलनात समाजसाठी सहभागी होते. हुसैन दलवाई साहेब आंदोलन प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित होते तर राजू शेट्टी साहेब, प्रकाश आंबेडकर साहेब, रामदास आठवले साहेब ह्यांनी दि बा पाटील यांचे नाव देण्याविषयी आपला पाठींबा जाहीर केला आहे.
दि बा पाटील ह्या आमच्या लोकनेत्याविषयी अजून एक महत्त्वाची माहिती स्त्री वर्गाकरिता सांगतो की, आज जो गर्भलिंग चाचणी बंदीचा कायदा अस्तित्त्वात आहे आणि त्यामुळे असंख्य स्त्री भ्रूण हत्या थांबल्या असतील तो कायदा अस्तित्वात येण्यासाठी दि बा पाटील यांचे योगदान खुप महत्वाचे आहेत...
अंतिमतः प्रश्न फक्त नावाचा नाही, भविष्यातील अस्तित्वाचा आहे. स्वतःच अस्तित्व वाढवताना आमच्या आगरी समाजाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कृपया कधीही करू नका ही मनापासून विनंती.

जाता जाता आगरी काव्य पंक्ती आठवली ती लिहितो

आमचा बापुस बी आनचा..
न आमची आस पून येच गावांची...
मंग, आमचेच जमीनीव दि बा पाटलाचा नाव देवाला हरकत का तुमची?
प्रश्न हाय यो अस्तित्वाचा...
भूमिपुत्रांचे न्याय हक्काचा...
इच्छा पुरी करा भूमिपुत्रांची...
न साथ द्यावी भूमिपुत्रांची...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्थानिक लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले ,त्यांचे हक्क त्यांना मिळवून दिले त्या दि बा पाटील साहेब ह्यांचेच नाव विमानतळ ला देणे योग्य आहे.
त्याच लोकांच्या जमिनीवर नवी मुंबई उभी आहे.
विमानतळ ला नाव देण्यास त्याच लोकांची मत प्रथम लक्षात घेतली पाहिजे.

BLACKCAT सर, भूमिपुत्र हा शब्द आपणास विनोदी वाटतं असेलही. पण, एखाद्या सरकारी प्रकल्पाकरिता ज्यांची जमिन अधिग्रहीत झाली आहे त्यांना एकदा प्रत्यक्ष विचारून बघा. त्यातही, सिडको जिथे अधिग्रहण करणारी संस्था असेल तिथे तर आवर्जून विचारा. सिडको म्हणजे ब्रिटीश. एकमेकांना फोडा, झोडा, स्थानिकांच्या जमिनी घ्या आणि नंतर त्या प्लॉट पाडून बिल्डरला विका. नवी मुंबईच्या SEZ मध्ये किती प्रकल्प उभे राहिले? किती जणांना नोकऱ्या मिळाल्या? आज हजारो एकर जमीन स्थानिकांकडून बळ जबरीने घेतली गेली उद्योग धंद्याच्या नावाने. मग, कुठे आहेत उद्योगधंदे? एकदा की विमानतळ झाले की, ह्या उद्योग धंद्यासाठी दिलेल्या जमिनी त्यांची आरक्षणे बदलून रियल इस्टेट मध्ये वापरल्या जाणार नाहीत याची कोणी खात्री देऊ शकेल? इतके मोठ मोठे डोंगर फोडून, नद्यांचे, खाडीचे नैसर्गिक प्रवाह बदलून हा प्रकल्प उभारला जात आहे. उद्या जुने पनवेल तसेच खाडी किनारी असलेल्या नवी मुंबई मधील अनेक शहरांत पाणी तुंबण्याच्या घटना वाढताना दिसू शकतील की काय अशी मला नेहमी शंका येते.

ब्लॅक कॅट.
अशा रात्री च्या वेळी असेच बडबडत असतात.सकाळी उठल्यावर(उतरल्यावर) योग्य ते मत मांडतील जे स्वतःची जमिनी,घर देवून विकास प्रकल्प व्हावा म्हणून स्वतःचे चांगले चाललेलं उद्योग ,व्यवसाय सोडून बरबाद होतात त्या भूमिपुत्र विषयी फालतू मत व्यक्त करणार नाहीत ही अपेक्षा..
मानखुर्द ला विमानतळ बांधायचा म्हणून ह्यांचं मानखुर्द चा बाजार काही न देता उठवला तर त्यांना भूमिपुत्र, चे हक्क आठवतील.

स्थानिक लोकांच्या जमिनी योग्य तो मोबदला घेऊनच मिळवल्या ना? की रेडी रेकनर पेक्षा कमी दर दिला? जर मोबदला देऊन विमानतळ उभे राहणार असेल तर "स्थानिक लोकांच्या जमिनीवर" असे कसे म्हणता येईल? जमीन दान नाही केलेली.
बाकी, विमानतळाला माणसाचे नाव नकोच, शहराचे नाव द्यावे. Mumbai International Airport. Period.

जमीन अधिग्रहण कसे होते हे तुम्हाला माहीत नसावे.
लेखात सिडको कशी जमीन अधिग्रहण करत होती त्याचा उल्लेख आहे.
दि बा पाटील साहेब ह्यांनी लढा दिल्या मुळे १२% भूखंड मिळाला.
कोयना प्रकल्पग्रस्त लोकांना अजुन भरपाई मिळाली नाही.
स्व मालकीचे जागा असे कोणी देईल का ?
बांद्रा पासून चर्चगेट पर्यंत अजुन extra raikway line असणे गरजेचे आहे .
तेथील बिल्डिंग वाले नाममात्र पैसे घेवून करतील का जागा खाली.
एवढे सोप नाही ते.

साहेब, धरणग्रस्तांचे अधिग्रहण आणि विमानताळासाठीचे अधिग्रहण ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. असो, दि बा पाटील यांच्या बद्दल आदर आहेच. लोकांच्या हक्कासाठी लढणारा राजकारणी दुर्मिळ असतात.

झांपू दमलू इथे कोणता पॅकेज दिला आहे ते तरी तुम्हाला माहिती आहे का? कोणत्याही माहिती शिवाय प्रतिसाद करत आहात. अगोदर अभ्यास करा ही विनंती. सिडकोने जनतेची 100 टक्के जमीन घेउन त्याबदल्यात 22.5% आणि त्यातही अनेक वजावट सांगुन फक्त 18.5% भुखंड दिलेले आहेत आणि ह्या भूखंडांचे काम अजूनही पुर्ण झालेले नाही. एक रुपयाही शेतजमिनीच्या बदल्यात दिलेला नाही. बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला नाही समजणार. कारण, सरकारी यंत्रणांनी तुमची जमीन बळजबरीने घेतलेली नसेल...!!

जमीन अधिग्रहण करण्यासाठी .
कारण सांगितले जाते विकास साठी.
पण विकास कोणाचा होतो ह्या मधल्या सरकारी दलालांचा,नेत्यांचा.
दहा रुपयांत जमीन अधिग्रहण करायची आणि दोनशे रुपयाला विकायची.
मध्ये काँग्रेस सरकार योग्य बदल सर्व विचार करून जमीन अधिग्रहण कायद्यात केला होता.
मोदी नी परत त्या कायद्याची तोडमोड केली.
नवी मुंबई मध्ये reliance ची किती तरी हेक्टर जमीन आहे त्यांनी बाजारभाव प्रमाणे ती खरेदी केली आहे का ?
की सरकारी दलाल लोकांनी नाम मात्र किमतीत दिली आहे उद्योगाच्या नावावर.
बाजारभावाने खरेदी केली असती तर हजारो करोड तरी त्या जागेची किंमत होईल.

धरणग्रस्तांचे अधिग्रहण आणि विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे अधिग्रहण ह्या दोन भिन्न गोष्टी नाहीत. दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत. कोणाला स्वतःचे राहते घर स्वतःच्या डोळ्यासमोर दुसऱ्या कोणाने तोडताना बघवत असेल? योगायोग बघा... सातारा जिल्ह्यातील कोयना धरणग्रस्तांना रायगड जिल्हयातील पनवेलमध्ये विस्थापित केले होते...!!

विमानतळ, रेल्वे स्टेशन्स, रस्ते, चौक किंवा कोणत्याही मोठ्या सरकारी प्रकल्पाला फक्त गांधी आणि नेहरू परिवाराचेच नाव देण्यात यावे आणि सगळीकडे फक्त यांचेच पुतळे उभारण्यात यावेत ही घटनादुरूस्ती करण्यात यावी अद्यक्श महोदय!! *

* - अद्यक्श महोद्यय असा उल्लेख फिल्मी उर्फ भास्कराचार्य करत असले तरी मूळचे पेटंट आरारा या मनोरूग्ण आयडीचे आहे.

जमीन अधिग्रहण हा खूप मोठा विषय आहे.
एकी कडे भारतीय राज्यघटना संपत्ती चा हक्क सर्व नागरिकांना देते आणि दुसरीकडे जमीन अधिग्रहण सारखे कायदे नागरिकांचा संपत्ती चा हक्क नाकारून फुकट संपत्ती (जमिनी) हडप करतात.
हे ब्रिटिश कालीन कायदे बदलणे गरजेचे आहे.
हा विषय इथेच थांबवता येईल.
ब्लॅक cat ni प्रकल्प ग्रस्तांची खिल्ली उडविली म्हणून उत्तर द्यावी लागली

मी त्यांची खिल्ली उडवली नाही
त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणा

भूमिपुत्र हा शब्द पटत नाही , इतकेच लिहिले, सगळे सजीव भूमीपुत्रच असतात.

आणि हे सगळे भूमिपुत्रही इतर सरकारी सेवा वापरत असतीलच , रेल्वे , इतर विमानतळे , बस डेपो , बाग , शाळा , रस्ते , धरण इ इ इ तेही कुणाला तरी उठवूनच झालेले असतात.

भूमीपुत्र हा शब्द बाळासाहेब ठाकरे वापरत होते. उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री आहेत. त्यांचे काय म्हणणे आहे त्याबद्दल ?

दि बा पाटील यांच्या समर्थकांनी कधी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले असेलच समजा, तरी त्यांनी त्या नावाला विरोध केल्याचे उदाहरण आहे का एखादे ? किंवा महात्मा गांधी रस्ता हा प्रत्येक शहरात असतो, नेहरू सभागृह, चौक, पुतळा, स्मारक यांना विरोध केल्याचे आठवते का ?

उद्या जुने पनवेल तसेच खाडी किनारी असलेल्या नवी मुंबई मधील अनेक शहरांत पाणी तुंबण्याच्या घटना वाढताना दिसू शकतील की काय अशी मला नेहमी शंका येते..
>>>>>>>>>

हे होणारच. गेले तीन चार वर्षे खारघर भागातही नवनवीन भागात जिथे आधी पाणी तुंबायचे नाही तिथे सुरुवात झाली आहे. डोंगर फोडून, खाड्या बुजवून प्रकल्प उभे राहताहेत तर याचे परीणाम हेच आहेत.

@ धागा,
कळकळ पोहोचली. मुद्दे पटले. ईतक्या घडामोडी अर्थातच ठाऊक नव्हत्या. पण स्थानिकांच्या जमिनी गेल्यावर त्यांची काय दशा होते हे विविध प्रकल्पांबाबत ठाऊक आहे. अश्यांसाठी कोणी काम केले असेल तर त्या लोकनेत्यांबद्दलच्या स्थानिकांच्या भावना समजू शकतो. जसे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांसाठी आदरणीय आहेत. या देशाचा अभिमान आहेत. पण एका समाजासाठी ते त्याहीपेक्षा जास्त देवासमान आहेत. कारण बाबासाहेबांमुळे त्यांचे अस्तित्व आहे, आज ते सन्मानाने जगत आहेत. साधारण त्याच स्वरुपात दि. बा. पाटील यांच्याशी स्थानिक आगरी समाजाच्या भावना जोडल्या गेल्या असाव्यात हे हा लेख वाचल्यावर जाणवले. त्यामुळे माझाही दि.बा. पाटील यांचा नावाला सपोर्ट आहे !

जिथे जिथे गांधी नेहरू नावे दिली तिथे या कुटुंबाची जमीन घेऊन प्रकल्प उभारले असतील का ?

कायच्या काय

ज्याची जमीन त्याचे नाव , मग रस्त्याला दर दहा फुटाला वेगळे नाव द्यावे लागेल

सहजराव, आमच्या परिसरात जे JNPT बंदर आहे त्याला कान्होजी आंग्रे यांचे नाव द्यावे ही मागणी दि बा पाटील साहेबांनी केली होती. मूळात तुम्हाला दि बा पाटील, आगरी समाज हा विषयच माहिती नाही. त्यामुळे जो विषय माहिती नाही त्यावर आपण अभ्यास करून बोलणे संयुक्तिक ठरेल. आणीबाणीच्या काळात महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या सोबत दि बा पाटील ह्यांना देखिल अटक केली होती. रायगडमधील त्याकाळातील प्रमुख पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या त्या काळातील काँग्रेस सोबत किती टोकाचे मतभेद होते हे आपणास नसेल माहिती. दि बा पाटील विरूद्ध अंतुले असा सामना रायगड मध्ये होत असे. आणि आपण इतके सर्व मुद्दे मांडलेत पण आजचा सत्ताधारी जो महाराष्ट्रातील प्रकल्पांना नावे देत सुटला आहे त्याविषयी काहीच बोलतं नाही. जो प्रकल्प अजूनही पुर्ण झालेला नाही त्याला नाव देऊन नक्की काय साध्य करत आहेत? त्यामुळे आपला त्यांच्या वागण्याला पाठींबा असेल तर आपण तो पाठींबा द्यावा. आम्ही आमचे काम मनापासून करत राहू.

हा धागा कुणाचे नाव द्यावे वाटते असा नसून ठाकरेंचे न देता दिबा पाटलांचेच का द्यावे असा आहे त्यामुळे बाकी नावांबद्दल चर्चा करण्याचा उपयोग नाही कारण असेही ठाकरेंचे नाव देण्याचा घाट घातल्यानेच एवढा वाद उफाळून आला आहे. जर दोघांमधील एका व्यक्तीचेच द्यायचे असेल तर दिबा हा एकच पर्याय न्याय्य आहे.
बाकी केरळात ज्यांच्या जमिनी गेल्या ते विमानतळाच्या नफ्यात भागीदार आहेत असे ऐकून आहे. तसे इथे आहे काय/करता येईल काय ?

BLACK CAT सर, मग जो प्रकल्प अजून पूर्ण नाही त्याला कोरोणाच्या परिस्थितीचा गैरफायदा उठवत लोकांना समजुन न देता नाव देणे योग्य आहे असे आपले म्हणणे आहे? आम्ही लोकशाही मार्गाचा वापर करून सुरुवातीपासून प्रस्ताव दिले आहेत. मग, तेव्हा आज जे अनेक नावे सुचवत आहेत ते कुठे झोपले होते? आज जे सांगत आहेत अमुक नाव द्या, तमुक नाव द्या. मग, तुम्ही ते नाव देण्यात यावे म्हणून काही लेखी प्रस्ताव शासनस्तरावर पाठवला का? आम्ही जर भावनेच्या आहारी जाऊन जर नावाची मागणी करत आहोत तर सरकार जी नावे पुढे करते ते भावनेच्या भरात करत नाही असे आपले म्हणणे आहे? आणि सरकार असे करत असताना स्थानिक भूमिपुत्र म्हणून आम्ही फक्त बघत बसावे आणि सरकारच्या समोर मान डुळवत राहावी अशी आपली इच्छा आहे? सरकारच्या समोर माना डुळवत राहिलो असतो तर आज सिडको नामक संस्थेने सरकारच्या सोबत मिळून कधीच सत्यानाश केला असता ह्या समाजाचा.

आणि हे सगळे भूमिपुत्रही इतर सरकारी सेवा वापरत असतीलच , रेल्वे , इतर विमानतळे , बस डेपो , बाग , शाळा , रस्ते , धरण इ इ इ तेही कुणाला तरी उठवूनच झालेले असतात

हो नक्कीच वापरतात.पण ज्यांच्या जमिनी,घरदार हिरावून वरील सर्व सोयी सुविधा बनतात त्या प्रकल्प ग्रस्तांना सन्मानाने वागविले जात नाही.भरपाई म्हणून जे दिले जाते ते अत्यंत कमी असते

भरपाई म्हणून पैसे देण्यापेक्षा कायम स्वरुपी त्यांचे पुनर्वसन आणि त्यांना प्रकल्प पूर्ण होण्याच्या अगोदर पर्यायी जमिनी सर्व सोयी युक्त देणे गरजेचे आहे.
नोकरी देवू ,रोजगार देवू ही गाजर काही कामाची नाहीत .
दोन वर्ष किरकोळ पदावर कॉन्ट्रॅक्ट मध्ये नोकरी देवून नंतर हकल जाते.
त्या पेक्षा त्या प्रकल्पात कायम स्वरुपी भागीदारी दिली पाहिजे.
योग्य तऱ्हेने पुनर्वसन केले तर कशाला कोण विरोध करेल.
मुंबई मध्ये झोपड पट्टी पडून इमारती बांधल्या कोणी विरोध केला का उलट लोक स्व खुशी नी सहभागी होते.
कायम स्वरुपी उत्तम घर त्यांना सुरवातीच्या काळात दिली गेली.
आता परत हरामखोरी चालू आहे.
एकच पंचवीस मजल्यांची buildind बांधून तिथे फेकले जात आहे

गरीब लोकांना त्या बिल्डिंग चा maintance परवडत नाही.
आणि तेथून ते बाहेर फेकले जातात.

उरणकर , काहीच्या काही
सततच्या छाती पिटून घ्यायच्या मोडमधून बाहेर या. मी लिहीले काय, तुम्ही वाचता काय, अर्थ काढता काय आणि प्रतिसाद देताय काय. माझे प्रतिसाद त्या आधीच्या ब्लॅककॅटच्या प्रतिसादाला उद्देशून आहेत. नीट वाचत जा.

BLACK CAT सर, >>>>>>>
??????????

Lol
उरणकर , इथे नवीनच दिसताय Happy
बाय द वे !
दि बा पाटलांचे नाव विमानतळास देण्यास कोणाचीही हरकत नसावी .
कदाचित छत्रपतींचे आणि बाळासाहेबांचे नाव पुढे करून वादंग माजल्यावर अनेक त्यागमूर्ती असलेल्या गरीब गांधी घराण्यातील कर्तृत्ववान व्यक्तीचे नाव ठेवण्यात येऊ शकते .
त्या निमित्ताने सोनियांच्या दारी दोन फुले वाहण्याची संधी मुम ला मिळू शकते .......

Pages