द ग्रेट इंडिअन किचन

Submitted by मेधावि on 1 February, 2021 - 07:00

गेल्या दहा दिवसांत तीन सिनेमे पाहीले.
1. इज लव्ह इनफ ? "सर"
2. द लास्ट कलर
3. द ग्रेट इंडिअन किचन.

पहिले दोन सिनेमे आवडले ...

तिसरा सिनेमा.. (Neestream -मल्याळी भाषेतला इंग्रजी सबटायटल्सवाला) पाहून मात्र त्रास झाला. एक सण्णसणीत मुस्काटात बसली. हा चित्रपट संपत नाही. तो मानगुटीवर बसतो आणि छळतो. "अगदी फ्रंट ऑफ द माईंड" छळत रहातो. स्वैपाकघर आणि स्वैपाक ह्या विषयातले बारीक सारीक तपशील टिपून त्यावर एका पुरुषानं हा सिनेमा बनवलाय,त्याला साष्टांग प्रणाम.

Spoiler alert - ज्यांना पहिल्या  धारेचा सिनेमा बघायचाय त्यांनी इथून पुढे वाचू नये. पण लवकर बघा...

(एक डिस्क्लेमर - मी अजिबातच स्त्रीवादी नाही. स्वतः राबून घर सजवणं, स्वच्छ आणि सुंदर ठेवणं, छान छान पदार्थ बनवून दुस-याला खाऊ घालणं हे मला आवडतं. मी माझ्या आवडीसाठी ते करते, तरीसुद्धा सिनेमा पाहून मी गोंधळले आणि भांबावले आहे)

लास्ट अॅलर्ट!!!
ह्यापुढचं लेखन प्रचंड उत्कट असेल. ते कदाचित  असंबंद्धही होईल, पण विचारांचं घोंघावीकरण न थोपवता आणि त्याचं अजिबात सुबकीकरण न करता ते जसे येतील तसे ते इथे येतील.

एखाद्या व्यक्तीला कोणी सपासप आसूडाचे फटके मारत असेल तर त्याच्या वेदना पाहून बघणाराही कळवळतो.  पण ती व्यक्ती जर खूषीत ते फटके खात असेल तर? .... आनंदानं हे फटके खाणं म्हणजेच आपल्या आयुष्याची सार्थकता, कृतार्थता, परीपूर्णता असं तिला आणि तिच्या सर्व जिवलगांना वाटत असेल तर ?

आणि....... मीही त्यातलीच एक असेन तर?????
मीच काय,  निरक्षर ते डाॅक्टरेटपर्यंत शिकलेल्या, गरीब ते गडगंज श्रीमंतीत लोळणा-या माझ्या परिचयायल्या सर्वच्या सर्व  स्त्रिया दिसतायत् मला आत्ता डोळ्यापुढे. हे सगळं आमच्या, आपल्या  हाडीमाशी इतकं रुजलंय आणि तुम्ही आम्ही सर्वांनी ह्या प्रचंड प्रचंड भीषण वर्णव्यवस्थेला किती सहजपणे आत्मसात केलंय...आणि आणि "आज" एक पुरुष बोलतोय त्यावर..हॅट्स ऑफ टू हिम.

हा सिनेमा  पितृसत्ताक पद्धतीतल्या "स्त्री" ह्या सो काॅल्ड  "देवीच्या" कर्तव्यांवर, तिच्या अधिकारांवर, सुखी आणि संपन्न आयुष्याच्या  परंपरेनं रुजवलेल्या कल्पनांवर, व्याख्यांवर आणि "घरगुती हिंसाचाराच्या प्रकारांवर बोलतो. चित्रपट पहाताना एकापाठोपाठ एक एक सण्णसणीत कोरडे बसत रहातात अंगावर खण्णं..खण्णं..खण्णं करत  !!!!   पण तो थांबत नाही, वेगवान बनतो आणि बोलतच रहातो, बोलतच रहातो. मी ..पहातच रहाते....कण न् कण् एका क्षणी  "पेटत" असतो आणि पुढल्या क्षणी "विझत" असतो. एक मोठ्ठी  हतबलता साचून रहाते. हे सगळं बदलण्यासाठी आपण फार फार दुबळे आहोत असं वाटतं.  पटो...न...पटो.... मी तीच वाट पुढे चालणार असते.

हा चित्रपट फार महत्वाचा आहे. पहायलाच हवा असा.  रोजच्या जगण्यातल्या ब-याच बेसिक गोष्टींचं भान देतो तो. मानवता शिकवतो. आपल्या मायेच्या माणसांच्या आणि प्रेमाच्या कल्पना, जेवणाचे, वागण्याचे  मॅनर्स, म्हातारपणापर्यंत बाळगलेल्या आणि  कौतुकानं जोपासलेल्या  नाठाळ आणि त्रासदायक सवयी आणी चवी-ढवी ह्या सगळ्यावर प्रश्न उभे करतो.

चित्रपटाची सुरुवात.. , केरळमधल्या एका गावात एक लग्न ठरतंय. मुलगी काळीसावळी, स्मार्ट, हसरी, टिपिकल दाक्षिणात्य सुंदर काळेभोर बोलके डोळे आणि दाट कुरळे केस. तशी पहिल्यांदा पाहताना ती सुंदर वगैरे नाही वाटत पण हसली की फार गोड दिसते. नृत्याची आवड आहे तिला. नैपुण्यही आहे त्यात. हसरी, खेळकर फुलपाखरी आयुष्य जगणारी ही मुलगी.  बघायला येणारं स्थळही  तालेवार असावं. मुलीची आई भरपूर उत्साहानं राबते आहे, गोड आणि तिखट असे भरपूर तळीव पदार्थ (घरातच) बनवते आहे. सुंदर मोठ्ठा "आधुनिक" आणि कलात्मक पद्धतीनं सजवलेला दुमजली बंगला आहे त्यांचा. संपन्नता जाणवते सगळीकडे. वडील गल्फमधे नोकरी करत असल्याचं गप्पांमधून समजतं.  नातेवाईक, हास्यविनोद, गप्पा........ छान आनंदाचं वातावरण आहे.

बघण्याचा कार्यक्रम पार पडतोय. दोन्ही बाजूंचे लोक सधन वाटतात आणि खुशीत दिसतायत्. मुलामुलीला एकट्यानं एकमेकांशी काही बोलायचं तर बोला अशी परवानगी देऊनही  घरच्या सगळ्यांनी फिल्डींग लावली आहे. अशा परिस्थितीत संकोचल्यामुळे मुलामुलीचा फार संवाद होतच नाही. स्वभाव, विचार-आचार जाणून घेणं वगैरे काही घडताना दिसत नाही. पण दोघंही एकमेकावर अनुरक्त वाटतात. 

छान थाटामाटात लग्न होतं. हुंड्यात मिळालेली एक अलिशान कार ही दिसतेय दारात.  लाजत मुरडत नव्या नवरीचा कौतुकाचा गृहप्रवेश. प्रेमळ व शांत स्वभावाचे सासूसासरे आणि नवरा.  सासरचं घर किती सुंदर!!! वडिलोपार्जित असणार. टुमदार, कौलारू, खूप मोठ्ठं पण जुन्या पद्धतीचं.  दोन मजली, मागेपुढे भलं मोठ्ठं अंगण, जुन्या पद्धतीची कडी-कोयंडे असलेली लाकडी दारं,  शिसवी लाकडाचं फर्निचर, पितळी मोठी मोठी छान छान भांडी, मागेपुढे भरपूर झाडं. स्वैपाकघर  मोठ्ठं, मात्र अंधारं आणि साधं आहे. तिथं माॅड्युलर किचन नाहीये. साधा कडप्याचा ओटा, अॅल्युमिनीयमची भांड्यांची मांडणी, भिंतीवरचं ताटाळं, फळीवरचे डबे. स्वैपाकघरातच अजून एका भिंतीशी अजून एक ओटा आहे आणि त्यावर चक्क एक ढणढणती चूल आहे. वर वखारीची लाकडं रचलेली दिसतात.  चुलीवर (केरळमधे) भात शिजवतात ते भाताचं डेचकं. इतर भांडी आणि भात ढवळायचा मोठा डाव. बाकी स्वैपाक गॅसच्या शेगडीवर होतो पण भात मात्र अजूनही चुलीवरच शिजतो. मिक्सर आहे, पण वाटण मात्र पाट्यावरच होताना दिसतं. कायमचा फिक्स केलेला एक मस्त मोठ्ठा पाटा दिसतो.

मुलीच्या संसाराचा पहिला दिवस. नवरा चांगला वाटतो. सासूही प्रेमळ, शांत आणि कामसू आहे. मुलीला हळूहळू रुळूदे. लगेच कुठे कामं सांगायची? सासराही शांत आहे. घरात फारसा बोलतही नाही.

भांडी घासणं, उष्टं खरकटं काढणं, केरवारे, फरशी, अंगण झाडणं, पुसणं , भरपूर भाज्या, निवडणं, चिरणं, फोडणीस टाकणं....मोठ्या अलीशान पाट्यावर भरपूर नारळ वाटणं, चटणी, सांबार बनवणं. मांसाहारी पदार्थ बनवणं. वेळेवर डायनिंग टेबलवर सगळं अन्न मांडणं, गरमागरम सर्व्ह करणं.... विविधरंगी, विविध चवींचा, सुग्रास, तृप्त करणारा स्वैंपाक.. गृहलक्ष्मीनं, अन्नपूर्णेनं घर सांभाळावं, सजवावं, ते उबदार ठेवावं, कुटुंबाला छान खाऊ पिऊ घालून सुखात ठेवावं.  जेवताना स्वैपाकाचं आवर्जून कौतुक करणारी घरची माणसं.  पुरुषाच्या ह्दयाचा मार्ग पोटातूनच तर जातो ना....ह्या संसारला सुखी संसारच तर  म्हणतात ना?  

रोज सकाळी बिडाच्या तव्यावरचे गरमागरम डोसे, इडिअप्पम, पुट्टु आणि कडला करी, सांबार, पदार्थाला लाल मिरच्या, उडीद डाळ, भरपूर कढीपत्याची खमंग फोडणी. दुपारच्या जेवणातल्या वेगवेगळ्या भाज्या, भात... हळूहळू डोळ्यातून  ती चव आपल्या डोक्यात, मनात, आणि मग जिभेवर उतरायला लागते. चायला, आपण फूड चॅनेल बघतोय का काय असं वाटतं.

घरच्यांच्या आवडीनिवडी आणि चवीढवींचा विचार करत करत रोजचा स्वैपाक करणं, सकाळी दूध येण्यापासून सुरू झालेला दिवस, रात्रीची जेवणं झाली की ओटा टेबल आवरून, भांडी घासून मग श्रांत तनामनानं दिवा बंद करून बिछान्यावर अंग टाकणं ही त्या गृहलक्ष्मीची आनंदाची, सार्थकतेची, तृप्तीची कल्पना. लग्नानंतर सुरुवातीला  नवरा व सासरच्यांचं सगळं व्यवस्थित करणा-या ह्या घरोघरीच्या नायिका, नंतर मुलंबाळं, नातवंडं ह्यांच्यासाठी अविरत झिजतच असतात......झिजतच रहातात....मरेपर्यंत. आणि आपण म्हणतो...माझी आई/आजी फार फार प्रेमळ होती. माझ्यासाठी खूप केलं तिनं. तो तिच्यासाठीही सन्मानच असतो.

कथानायिकाही लग्नानंतर सासूच्या बरोबरीनं  सर्व जबाबदा-या उचलायचा प्रयत्न करताना दिसते.  एक आदर्श सून, बायको बनण्याचा प्रयत्न करताना दिसते.  हे सर्व करताना तिला मजा येते आहे, आत्मिक समाधान मिळतं आहे. पण ते निभवताना तिची दमछाक होतेय.

घरातला पुरुषवर्ग शांत, अबोल....पैसे मिळवून आणणं आणि बाहेरची कामं करणं हे पुरुषांचं काम. ते किचनमधे ढवळाढवळ करत नाहीत. आणि अचानक सासूला मुलीच्या बाळंतपणासाठी परदेशी जावं लागतं. आणि संपूर्ण घराची संपूर्ण जबाबदारी सुनेवर धाप्पकन् येऊन पडते.  माहेरी
फारशी स्वैपाकघरात न  वावरलेली ही मुलगी, पटापट सगळं शिकून अपेक्षांना उतरायच्या प्रतिक्षेत.

सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, भांडी घासणं, केरवारे, अंगणाची झाडलोट, फरश्या पुसणे, जिने पुसणे..... न संपणारी आणि मारूतीच्या शेपटाप्रमाणं सतत वाढत जाणारी कामं आणि अपेक्षा. सास-यांना चुलीवरचाच भात, पाट्यावरची चटणी प्रिय आहे. कुकर, मिक्सरमधे ती चव येत नाहीये. ते प्रेमानं तिला सुचवू पहातात. तीही त्यांच्या मताचा आदर राखते, एक एक दिवस पुढे सरकतो तशी वेगवेगळ्या प्रसंगातून तिला येत जाणारी जाण, येणारा मानसिक आणि शारिरीक थकवा,  फ्रस्टेशन्, पुरुषांच्या प्रायोरिटीज,  एकत्र कुटुंबपद्धतीतल्या अपेक्षा, रोज येणारी वेगळी वेगळी आव्हानं. त्यावर मात करण्यासाठीची तिची ओढाताण आणि ह्या सगळ्यावर त्यावर तिनं दिलेलं उत्तर....ह्यावर बोलतो हा सिनेमा.

गरमागरम डोसे करून वाढायचे म्हणजे बरोबरीनं ती जेवू नाही शकत बाकीच्यांबरोबर. सगळ्यांचं खाणं झाल्यावर टेबलवर ताटाबाहेर काढून टाकलेल्या शेवग्याच्या शेंगांची सालं आणि इतर खरकटं  उचलताना तिला ढवळतं. जेवायला सुरुवात करताना नवरा व सास-यासाठी हिनं सुबकपणे मांडलेलं टेबल आणि आता ती आणि सासू जेवायला बसतानाचं टेबल ह्यात जमीन अस्मानाचं अंतर. सासू सरावलीये. तिला ह्याचं काहीच नाही वाटत. उलट ती नव-याच्या उष्ट्या ताटातच घेते वाढून. मुलीला मात्र हे जड जातंय. हाॅटेलमधे टेबल मॅनर्स पाळणारा नवरा घरात का पाळू शकत नाही? सतत भांडी घासण्याचा आणि उष्ट- खरकटं आवरण्याचा सीन येत रहातो. किती घरांमधे तुंबलेल्या सिंकमधे हात घालायचा प्रसंग घरच्या मुलांवर/ पुरुषांवर  येत असेल? दुस-या घरातनं आलेल्या मुलीनं मात्र हे पट्कन् आत्मसात करण्याची अपेक्षा ठेवली जाते.

घरोघरी नव-याच्या हातात डबा, रुमाल, पाकिट, मोबाईल देणा-या बायका आपण पहातोच की. त्यात कुठं काय वावगं वाटतं? नाॅर्मलच तर आहे की हे..
रांधा वाढा उष्टी काढा ह्यात तर मागच्या अनेक पिढ्या संपल्या. ह्यात काय एवढं मोठं? नाॅर्मलच आहे की हे सगळं..  "ह्याच" गृहितकांकडे हा सिनेमा परत एकदा नव्यानं बघायला लावतो. त्या गृहीतकांना मानवतेच्या निकषांवर परत एकदा तपासायला लावतो. मारहाण किंवा  शिवीगाळ म्हणजेच काही घरगुती हिंसाचार नाही फक्त. खूप व्यापक आहे ती कल्पना. पिढ्या न् पिढ्यांपासून होत असलेले काही अन्याय आता परंपरेच्या नावानं इतके मान्यताप्राप्त झाले आहेत की  मानवतेनच्या  दृष्टीकोनातूनही ते दूर करू शकत नाहीये आपण. म्हणून ही अस्वस्थता येते. ही अस्वस्थता कधी जाईल, कशी जाईल ते माहीत नाही पण  सिनेमाचा प्रेक्षक आपल्या ताटातलं उष्टं दुस-या कुणाला तरी साफ करायला टाकताना  दहा वेळा तरी विचार करून टाकेल  हे सुद्धा ह्या सिनेमाचं यशच म्हणावं लागेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

इथली काही निरीक्षणं वाचून पुन्हा पाहिला, तिची अँटीक्लॉकवाइज डोसा करायची स्टाइल दिसली Happy
अजुन एक गोष्ट दिसली , सुरवातीच्या लग्नं होऊन सासरी येते सीन मधे ती दूध आणून देणारी छोटी मुलगी गर्दीतून नववधूला पहायचा प्रयत्नं करतेय आणि २ पुरुष तिला कोपराने मागे ढकलतायेत असा क्लोजप आहे , प्रतीकात्मक वाटला सीन, मुलींचा आवाज दाबून टाकायची व्रूत्ति !
बाकी सैराट सारखी चर्चा चालु आहे इथे, सिनेमाचा अर्थ कदाचित डिरेक्टरने सुध्दा इतका डिटेल मधे चर्चा केला नसेल Happy

Mazya dharmat he jithe arthik swatantrya ahe tithe ghadatana disate.>> You are confusing between cause and effect. जिथे धार्मिक कट्टरता असते तिथे मुळात महीलांना आर्थिक स्वातंत्र्य जवळपास नसतेच. आधी कट्टरता कमी झाली की मग आर्थिक स्वातंत्र्य येते आणि मग कट्टरता अजून थोडी कमी होते.

स्त्रीपुरुषसमानतावाद्यांनी इतरांसाठी फूट सोल्जर न बनता आपले मुद्दे लावून धरावे.>> त्यासाठीच वेगळी स्त्रीवादी चळवळ आहे. पण इतरही चळवळी वेळोवेळी साथ देतात कारण शत्रु एक आहे- व्यवस्था.

आणि समानतावाद्यांचा दबावगट बनणार कसा? तुमच्यासारखे फेमिनिस्ट म्हणवून घेणारे उजवे लोक महीलांच्या हक्काची पायमल्ली साबरीमाला प्रकरणी होत असताना व्यवस्थेकडूनच बोलत होते ना? इतर धर्म किती वाईट याचे दाखले देत बसले होते. अरे जिथे सुप्रिमकोर्ट साथ देत होते तिथे तर ही परिस्थिती. कसले बनवताय दबावगट! मूळात तुम्ही* जोवर जातधर्माशी पहिले इमान, मग स्त्रीयांशी असे मानत असाल तर मग झालाच महीलांचा विकास! म्हणूनच उजव्यांकडून अपेक्षा ठेवण्यात पाॅइंटच नाही. त्यांचे इमान जातधर्मपैसासत्ता याच्याशी. सुधारणा क्काय होत रहातील हो हळूहळू, काय घाईये, नाही का? ह्याह्या! थोडं महिलादिनाला फुलंचाॅकलेटडिनर द्यायचे ( तेवढेच मार्केटमधे पैसा), अधनंमधनं त्यागमुर्ती, देवी असे कढ काढायचे, होममेकर म्हणजे किती महान याच्या वाॅट्सपीय आरत्या ओवाळायच्या. एवढ्यावर या बायका खुश! कशाला हक्कबिक्काच्या नादाला लागायचे..
* तुम्ही म्हणजे जे जे या विचारांचे आहेत ते सर्वच.

पण इतरही चळवळी वेळोवेळी साथ देतात कारण शत्रु एक आहे- व्यवस्था.///

येस, ती साथ गरजेपुरती- दोन्ही गटांचा सेम इंटरेस्ट असेल तेव्हा(च) असावी. हा इंटरेस्ट नेहमी सेम असेलच असं नाही.
हेच उजव्यांनाही लागू.

मूळात तुम्ही* जोवर जातधर्माशी पहिले इमान, मग स्त्रीयांशी असे मानत असाल तर मग झालाच महीलांचा विकास! //

हे असं नक्कीच नसावं. माझं तरी नाही. त्यामुळेच मी स्त्रियांचा विकास फक्त माझ्या फायद्याचा, माझ्या धर्मापुरता व्हावा असा विचार करत नाही. 5 वर्षांची पूर्ण बुरख्यातली दुसऱ्या देशातील मुलगी बघून मला त्रास होतो आणि त्याबद्दल जे बोलतात, विरोधात आहेत त्यांना सपोर्ट करावासा वाटतो मग ते उजवे असोत किंवा इतर कोणी.
सबरीमाला मंदिरात सर्व स्त्रीपुरुष भाविकांना जाऊ द्यायला हवं हे बरोबर आहे. पण आज सबरीमालाबद्दल बीजेपी काँग्रेस आणि लेफ़्ट तिन्ही पक्ष सेम पेजवरच आहेत. त्यामुळे डाव्यांना समर्थन देऊन सबरीमलाचं काम कसं होणार मला कळलं नाही.

बरीच चर्चा वाढली ईथली. छान चालू आहे.
वेळ काढून बघायला हवे आता चित्रपट .. संथ असावा आणि टिपिकल असावा या भितीने टाळत होतो.

पण आज सबरीमालाबद्दल बीजेपी काँग्रेस आणि लेफ़्ट तिन्ही पक्ष सेम पेजवरच आहेत. >> bjp, congress are on the same page. कम्युनिस्ट मुख्यमंत्र्यांनी मंदीरात महीलेने प्रवेश केला तेव्हा "हिस्टोरिक मोमेंट" अशी प्रतिक्रिया दिली होती.
दुसरं असं की सबरीमाला हा एकच इश्यु नाही महिलांचा. इतर प्रश्नां वरही कोणाची काय भुमिका आहे ते सर्वांना माहीतेय.

त्यामुळेच मी स्त्रियांचा विकास फक्त माझ्या फायद्याचा, माझ्या धर्मापुरता व्हावा असा विचार करत नाही. 5 वर्षांची पूर्ण बुरख्यातली दुसऱ्या देशातील मुलगी बघून मला त्रास होतो आणि त्याबद्दल जे बोलतात, विरोधात आहेत त्यांना सपोर्ट करावासा वाटतो मग ते उजवे असोत किंवा इतर कोणी. >>
छान. माझेही हेच मत आहे.
पण मला हिंदु धर्म सुधारणेत जास्त रस आहे कारण त्याचा फायदा मला, माझ्या मुलींना, नातींना मिळणार आहे.

bjp, congress are on the same page. कम्युनिस्ट मुख्यमंत्र्यांनी मंदीरात महीलेने प्रवेश केला तेव्हा "हिस्टोरिक मोमेंट" अशी प्रतिक्रिया दिली होती.//

मग आता काय परिस्थिती आहे ते अपडेट करून घ्या की!
https://www.thequint.com/kerala-elections/cpim-expresses-regret-over-sab..."

दुसरं असं की सबरीमाला हा एकच इश्यु नाही महिलांचा. इतर प्रश्नां वरही कोणाची काय भुमिका आहे ते सर्वांना माहीतेय.///
इतर प्रश्नांपैकी काही बाबतीत उजवे बरोबर आहेत, काही बाबतीत डावे. दोघेही आपल्या राजकीय सोयीनुसार भूमिका लवचिक ठेवतात. खऱ्या अर्थाने स्त्रीवादी यांच्यापैकी कोणीही नाही. त्यामुळेच यांच्यापैकी कोणाही एकाच्या दावणीला बांधून न घेता स्वतंत्र विचार करणं गरजेचं आहे.

बाकी सैराट सारखी चर्चा चालु आहे इथे, सिनेमाचा अर्थ कदाचित डिरेक्टरने सुध्दा इतका डिटेल मधे चर्चा केला नसेल >>> अगदी.
जावयाला , लग्नात कार मिळाली असते . :). Camera बराच वेळ रेंगाळतो.

सबरीमाला >> does it really impact in daily lives?
Yes, when someone tells me not to enter Maruti temple - mala raag yetoch and yes its injustice since i am sure Marutiraya definitely doesn't worry about the gender.
However - i feel its lesser of an issue as compared to other glaring issues about which we should talk.
Dowry, killing women in d womb, treating them as inferiors, rapes/sexual harassment, expecting them to work as slave in their own houses, deciding what they should wear/whether they should work or not, not having economic independence,, the changing status with marriage/post marriage/when widowed/divorced etc, overall safety., changing name after marriage, changing identity, kids responsibility and their "ownership", deciding when do they want kids and when not in d first place.

I personally feel people take care of these issues before jumping to sabarimala. Many of us may not even want to go their ever. At least i dont.

नानबा, काहींच्यासाठी सबरीमाला अधिक जास्त प्राधान्याने घ्यावा असा प्रश्न असेल. तेव्हा प्रत्येकाने त्याला महत्वाचा वाटणारा मुद्दा/प्रश्न घेऊन त्यावर काम करावे.
Regarding your comment on religion and financial freedom/security - समानता आधी मग आर्थिक स्वातंत्र्य असे घडले पाहिजे ना? आर्थिक स्वातंत्र्य असेल तर समानता यायला मदत होईल ही सद्यस्थिती झाली पण हा काही समानतेचा मार्ग नाही. Equality should be an independent variable. If you are offered equality because of your financial security then that's not a real case of equality IMHO.

मला एकदम fraud असल्यासारखं वाटतंय इथे लिहीताना! आता या वीकेंडला सिनेमा बघतेच वेळ काढून!

स्त्रीवादी असणं म्हणजे समतावादी, मानवतावादी असणं असं असेलच असं नाही.
white feminism racism हे शब्द एकत्र गूगल करून पहा.
काळ्या बाईला वंशभेद आणि लिंगभेद यांत एका लढ्याची निवड करायची झाली ,तर ती कोणता निवडेल? कोणत्या गोष्टीमुळे होणारा अन्याय तिला मोठा वाटेल? तिची कोणती ओळख अधिक गडद असेल?
स्वतःला स्त्रीवादी म्हणवणारी महिला वर्गभेद करत असेल , आपल्याला सेवा पुरवणा र्‍याची डिग्निटी सांभाळत असेलच असं नाही. मी काढलेल्या एका धाग्यात घरकामगार स्त्रियांना घरातलं शौचालय वापरायला मनाई करंण्याचं समर्थन झालं होतं.

भारतातला स्त्रीवाद हा मध्यमवर्गीय महिलांपुरता मर्यादित आहे, असं अनेकदा म्हटलं जातं. हा चित्रपट व त्याचा परिणाम त्याहून फार वेगळा आहे का? अ‍ॅमींच्या भूमिकेत शिरून - शिक्षण, आर्थिक क्षमता असलेल्या स्त्रीला हे सगळं उमजायला आणि त्यावर कृती करायला एवढा मोठा डोंगर चढावा लागत असेल तर ज्यांच्याकडे यातलं काहीच नाही त्या स्त्रियांचा विचार कधी करणार?

पाळीमुळे वेगळे बसावे लागणे, मंदिरप्रवेशाचा हक्क नसणे असा मुद्दा आला तर त्यावरची चर्चा धर्म हा शब्द न उच्चारता कशी होऊ शकेल ? स्वतःच्या मूलतत्त्ववादाला झाकण्यासाठी सगळे धर्म म्हणत दुसर्‍या धर्माकडे बोट दाखवणे मग सोयीचे ठरते.

---
अमितव यांनी रंगवलेलं उष्टे- खरकटे उचलायला पैसे देऊन कामगार, त्याचे हक्क हे चित्र प्रत्यक्षात उतरणंं शक्य आहे का? जगभरात विषमता वाढत असताना कामगारांच्या हक्कांचे संकोच होत आहेत. भारतात अजूनही डोक्यावर मैला वाहून नेला जातो. तसंच गृहिणीच्या कामाचं मोल केलं व दिलं जावं असं मत भारतातल्या एका न्यायालयाने मांडलं होतं. उद्या नवर्‍याने मी तुला उष्ट उचलायचे पैसे देतो म्हटलं तर चालेल का? ज्याला शारीरिकदृष्ट्या शक्य आहे त्या प्रत्येकाने आपलं स्वतःचं उष्ट उचलावं , खरकटं किमान विसळून ठेवावं हा सोपा मार्ग असताना उगाच द्राविडी प्राणायाम कशाला? मुळात तो आळसाचा मुद्दा नसून , परंपरेने हक्कस्वरूप दिलेल्या जीवनशैलीचा आणि कंडिशनिंगचा भाग आहे.

If you are offered equality because of your financial security then that's not a real case of equality IMHO. >> Happy But at least you are not disposable. कोण आपल्याला का समानतेने वागवते ह्याचे ऑडीट आपण करू शकत नाही. पण कुणी नाही वागवले समानतेने तर जायला हक्काची 'रिट्रीट' हवी. कवयित्री कोण आहेत ह्यावर मतमतांतरे आहेत पण ही एक वाचलेली चांगली कविता:

A WOMAN SHOULD HAVE
Enough money within her control to move out
And rent a place of her own
even if she never wants to or needs to
Something perfect to wear if the employer
or date of her dreams wants to see her in an hour

A WOMAN SHOULD HAVE
A youth she's content to leave behind
A past juicy enough that she's looking forward to
retelling it in her Old Age

A WOMAN SHOULD HAVE
A set of screwdrivers,
a cordless drill, and a black lace bra
One friend who always makes her laugh
And one who lets her cry

A WOMAN SHOULD HAVE
A good piece of furniture not previously owned
by anyone else in her Family
Eight matching plates,
wine glasses with stems,
And a recipe for a meal that will make
her guests feel Honored
A feeling of control over her destiny

EVERY WOMAN SHOULD KNOW
How to fall in love without losing herself
How to quit a job,
Break up with a lover,
AND confront a friend without
ruining the friendship
When to try harder
And WHEN TO WALK AWAY

EVERY WOMAN SHOULD KNOW
That she can't change the length of her calves,
The width of her hips,
or the nature of her parents
That her childhood may not have been perfect
But it's over

EVERY WOMAN SHOULD KNOW
What she would and wouldn't do for love or more
How to live alone
Even if she doesn't like it

EVERY WOMAN SHOULD KNOW
Whom she can trust,
Whom she can't,
And why she shouldn't take it personally

EVERY WOMAN SHOULD KNOW
Where to go
Be it to her best friend's kitchen table
Or a charming inn in the woods
When her soul needs soothing

EVERY WOMAN SHOULD KNOW
What she can and can't accomplish in a day
A month
And a year.

भरत.,
तुमचे मुद्दे बरोबर आहेत. एखादी व्यक्ती अमुक असेल म्हणजे तमुक असेलच असं गृहीत धरता येत नाही. यात अमुक- तमुक काहीही असू शकतं.

काळ्या बाईने कोणती चळवळ निवडायची हे तिचं तिने ठरवायचं आहे. ते काळे पुरुष तिला dictate करू शकत नाहीत. तिला तितकं स्वातंत्र्य देण्याबद्दल तुम्ही ओपन माईंडेड आहात ना?

धर्मात सुधारणा हवी हे इथे सर्वांचेच मत आहे. धर्मात सुधारणा नको असं कोणीच म्हणत नाहीये. त्यामुळे तुम्ही इथल्या चर्चेतल्या कोणाला उद्देशून मूलतत्ववादी म्हणत नाही आहात, राईट?

बाकी शेवटच्या उष्टखरकटे मुद्द्याशी सहमत आहे.

सुबत्ता आणि समानता, सन्मान यांच्या संदर्भात आपल्या व्रतांच्या कहाण्यांतली एक कहाणी आठवली. गरीब बहिणीला भावाघरी मान नसतो. तेच ती श्रीमंत होताच तिला जेवायचे आमंत्रण येते. रांगोळी समया असा थाट असतो. बहीण आपल्या अंगावरचा एकेक दागिना काढून पाटावर ठेवते. हा मान त्या दागिन्यांना मिळतोय असं सांगते.
हे असं जातीच्या संदर्भात घडलेलं ऐकलं आहे. आमच्या गावात काही जातीच्या लोकांना वर्षातला एक दिवस सोडला तर देवळांत प्रवेश नाही. गावातल्या देवळांचा जी र्णोद्धार करणं , त्यासाठी मुंबईतल्या गाववाल्यांकडून पैसे गोळा करणे हे कित्येक वर्षे दशके चालले आहे. तर त्या जातीतला मुंबईकर झालेला एक जण लाखाची देणगी देण्याइतका सधन झाला आणि त्याची देणगी चाललीही. त्याचवेळी गावातल्या त्याच्या जातभाईंचे प्राक्तन मंदिर प्रवेशाच्या बाबत तरी तसेच आहे.

मी इथे आलेले आताच 20 प्रतिसाद वाचून दुहेरी मनात आहे(इन डबल माईंडस चं चुकीचं शब्दशः भाषांतर)
एकीकडे वाटतं, धर्माचा काय संबंध, जो माणूस(किंवा बाई) स्वभावाने डुक्कर, दुसऱ्याला तुच्छ वागवणारा तो नास्तिक निरीश्वरवादी असला तरी डुक्करच राहणार.

दुसरीकडे या पिक्चर च्या संदर्भात तिच्यावर झालेल्या छुप्या अन्यायाय त्या दिवसांत अवघडून साठवणीच्या खोलीत(एका सीन मध्ये तिच्या डोक्यामागे कांदे बटाटे दिसतात.) सतरंजीवर झोपावे लागणे, त्या यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्रीचे अन्न वाढल्याबद्दल लोक पानावरुन उठून जाणे, नवऱ्याने तो गाडीवरून पडला बघून ती उचलायलक गेल्यावर तिला अक्षरशः झुरळासारखे हाड करणे यात धार्मिक भाग येतोच.

(पिक्चर मधला शबरीमला चा भाग असायला नको होता हे माझं मत.मला याबद्दल प्रॉब्लेम आहे म्हणून नव्हे, तर जो मुद्दा प्रभावीपणे सांगायचा आहे तो मागे पडून धार्मिक अधार्मिक/हिंदू विरुद्ध अदर्स/डावे उजवे/मोदी नॉन मोदी असा वेगळाच वाद जगातले प्रेक्षक चालू करतील म्हणून.त्याचबरोबर पिक्चर बघून रिव्ह्यू देणारे विदेशी जेव्हा 'हिंदूंमध्ये असंच असतं बॉ' असा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन बनवतील म्हणून वाईटही वाटतं. हिंदू अहिंदू पेक्षा मला रितिभाती कडकपणा सुशिक्षित अशिक्षित/गाव विरुद्ध शहर/एकंदरच समजूतदार माणसं विरुद्ध खाष्ट माणसं असा जास्त वाटतो.गावी जिथे आमचे नातेवाईक पुजारी आहेत तिथे या सर्व रीती बाजूला बसणे वगैरे अजून चालू आहेत.फक्त चटईवर झोपवत नाहीत इतकेच.आम्ही तिथे 3 तासांपेक्षा जास्त जात नाही, पण कधी 4-5 दिवस राहण्याची वेळ आली तर हे सर्व पाळावेच लागेल. पण इथे पुण्यात हे सर्व होत नाही. म्हणजे थोडक्यात मुंबई/पुणे/बंगलोर/परदेश इथे नवऱ्यासह राहिल्यास कुळाचारात थोडेफार इकडे तिकडे करता येईल, सूट मिळेल असा गावाकडे लग्नाच्या मुलींचा दृष्टिकोन असतो. त्यातही बरेच लोक शहरातही नोकरी धंदे चालू ठेवून सर्व कुळाचार तसेच चालू राहावे असा आग्रह धरतात.त्यांच्या सुना बहुधा नोकरी सोडून स्वतःला वाहून घेतात किंवा फ्लेक्झिबल बिझनेस करतात ज्यात हे सर्व वेळ देऊन करता येईल.एकंदरच या सणवार सगळ्यात फार वेळ घालवणे हे पूर्वीच्या काळी सोशलायझेशन ला निमित्त असल्याशिवाय ते करता न येणाऱ्या बायकांनी शोधलेले उद्योग होते असं वाटतं.त्या निमित्ताने मैत्रीण भेटीगाठी वगैरे.)

करेक्ट अनु. माझा चित्रपट पाहिल्यावरचा प्रतिसाद हाच आहे की सबरीमाला कशाला मध्येच आणलं- ते नसतं तरी चित्रपटाचा मूळ मुद्दा - द ग्रेट किचन वर्क- महत्वाचा आहेच आणि त्यावरच फोकस हवा.

कदाचित पब्लिक ने हे काय नुसतंच स्वयंपाक खरकटं दाखवतायत 100 मिनिटं म्हणून पाहिला नसता अशी भीती वाटली म्हणून एक महत्वाचा वेगळा मुद्दा आणला की काय?
की पिक्चर बनवताना हा मुद्दा ताजा इश्यू असेल, लोकांना जास्त अपील होईल म्हणून आपसूक आणला गेला?(आपण कधीकधी लिखाणात ताज्या घडामोडींचा जाता जाता उल्लेख करतो तसे)

शबरीमला आणलं नसतं तर कदाचित मुद्दाम टाळलंय असं वाटलं असतं. लग्नानंतर, मूल झाल्यावर वगैरे शबरीमलाची यात्रा करण्याची पद्धत सर्रास असते तिकडे. त्यावरून झालेलं आंदोलन घ्यायला हवं होतं असं नाही, पण तो एक छोटासा भाग आहे चित्रपटातला. कदाचित 'तिथे स्त्रिया जाऊ शकत नाहीत, पण तिथल्या यात्रेला पुरुषांना निर्वेधपणे जाता यावं म्हणून स्त्रियांना केवढी बंधनं पाळावी लागतात' हा मुद्दा मांडायचा असेल.

सासूसासरे आणि नवरा बायको एकत्र रहात असतील तर धार्मिक परंपरा पाळणं (बाजूला बसणं इत्यादी) किंवा इतर रीतिरिवाज पाळणं हे जास्त प्रमाणात होत असेल असं मला वाटतं. त्यातही जर एरवी सासू सासऱ्यांशी संबंध चांगले, प्रेमाचे असतील तर त्यांना दुखवण्यापेक्षा 'जाऊ दे, एवढी adjustment करू' असं सुनेचं होत असेल.
या सिनेमात नवऱ्याने जर तिचा सेक्सबद्दलचा मुद्दा प्रेमाने समजून घेतला असता किंवा नोकरी करायला 'परवानगी' दिली असती (आता परवानगी हा शब्दही विवादास्पद आहे, परवानगी कशाला लागायला पाहिजे? पण त्या घराच्या संदर्भात हा शब्द योग्य वाटतो) तर तिला रागाची एवढी सणक कदाचित आली नसती.
यातही प्रत्येक व्यक्तीची सहनशीलतेची मर्यादा वेगवेगळी असू शकते. 'मिक्सरमध्ये चटणी वाटायला परवानगी दिली' ही एखाद्या सासऱ्यांची 'समजून घेण्याची' कमाल मर्यादा असू शकते. या सिनेमातली नायिका तिला असह्य झाल्यावर घर सोडून निघून जाते, घटस्फोटही घेते आणि काही बायका नवऱ्याचे विवाहबाह्य संबंधही मिटल्या तोंडी सहन करत असतील. (काही नवरेही सहन करत असतीलच)

अमितव यांनी रंगवलेलं उष्टे- खरकटे उचलायला पैसे देऊन कामगार, त्याचे हक्क हे चित्र प्रत्यक्षात उतरणंं शक्य आहे का? जगभरात विषमता वाढत असताना कामगारांच्या हक्कांचे संकोच होत आहेत. भारतात अजूनही डोक्यावर मैला वाहून नेला जातो. तसंच गृहिणीच्या कामाचं मोल केलं व दिलं जावं असं मत भारतातल्या एका न्यायालयाने मांडलं होतं. उद्या नवर्‍याने मी तुला उष्ट उचलायचे पैसे देतो म्हटलं तर चालेल का? ज्याला शारीरिकदृष्ट्या शक्य आहे त्या प्रत्येकाने आपलं स्वतःचं उष्ट उचलावं , खरकटं किमान विसळून ठेवावं हा सोपा मार्ग असताना उगाच द्राविडी प्राणायाम कशाला? मुळात तो आळसाचा मुद्दा नसून , परंपरेने हक्कस्वरूप दिलेल्या जीवनशैलीचा आणि कंडिशनिंगचा भाग आहे. >> भरत + १
हेच लिहावेसे वाटले.
ज्याच्याकडे जगण्याचे साधन नाही, तो हे काम नाकारु शकेल का?

आमच्या गावात काही जातीच्या लोकांना वर्षातला एक दिवस सोडला तर देवळांत प्रवेश नाही. गावातल्या देवळांचा जी र्णोद्धार करणं , त्यासाठी मुंबईतल्या गाववाल्यांकडून पैसे गोळा करणे हे कित्येक वर्षे दशके चालले आहे. तर त्या जातीतला मुंबईकर झालेला एक जण लाखाची देणगी देण्याइतका सधन झाला आणि त्याची देणगी चाललीही. त्याचवेळी गावातल्या त्याच्या जातभाईंचे प्राक्तन मंदिर प्रवेशाच्या बाबत तरी तसेच आहे. >> अ रेरे.. इतक्या वर्षांनीही असे मुद्दे चालतात हे फारच वाईट आहे.
प ण ह्या माणसाने अ शा वेळेस देणगी द्यावी का? का प्रवेशाचा मुद्दा लावून धरावा?

If you are offered equality because of your financial security then that's not a real case of equality IMHO. >> हा आयडिअ‍ॅलिस्टिक विचार झाला. पण जगभरात सगळीकडेच जी सध्याच्या समाजात समानता आली त्यामागे आर्थिक स्वातंत्र्य हेच कार ण आहे असे मला वाटते.
भरत ह्यांनी दिलेल्या उदाहरणात पण हेच कारण दिसते त्या माणसाला मान मिळण्यामागे. जे अत्यंत दुर्देवी असले त री ह्या घडीचे सत्य आहे.
स्वतःला एनेबल कर णे उत्तम.

प्रत्येक ठिकाणी हे असेलच असे नाही आणि तसे घडल्यास उत्तम.. पण आपल्या इन्टरेस्ट ची राखण आपण करावी.
तसेही प्रत्येकाला पोटाकरता स्वैपाक करता यावा, स र्व गरजेची कामे करता यावीत (जें ड र कुठलेही असले तरी), तसेच प्रत्येकाला बाहेरची कामे करता यावीत आणि पोटापुरते कमावता यावेच.

1. पिक्चर मधला शबरीमला चा भाग असायला नको होता हे माझं मत.मला याबद्दल प्रॉब्लेम आहे म्हणून नव्हे, तर जो मुद्दा प्रभावीपणे सांगायचा आहे तो मागे पडून धार्मिक अधार्मिक/हिंदू विरुद्ध अदर्स/डावे उजवे/मोदी नॉन मोदी असा वेगळाच वाद जगातले प्रेक्षक चालू करतील म्हणून.>>> हे सर्व एकमेकांशी संबंधित आहेच आणि त्यावर चर्चा व्हायलाच हवी.

2. पिक्चर बघून रिव्ह्यू देणारे विदेशी जेव्हा 'हिंदूंमध्ये असंच असतं बॉ' असा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन बनवतील म्हणून वाईटही वाटतं>> हा आहे खरा प्राॅब्लेम!! लोग क्या कहेंगे. प्राॅब्लेम असले तरी दाखवू नका, झाकून ठेवा.
हिरोइन तिचे अंडरवेअर वाळवायला टाकते तेव्हा ती पोक्त बाई हेच म्हणते की सर्वांना कशाला दाखवायचे? मग हिरोइन म्हणते, वाळले नाही तर अनहायजिनिक नाही का?
"लोग क्या कहेंगे, आमच्या घरा/देशा/धर्माची इज्जत वाचवायला का होईना पण घाणेरडेपणा सहन करा. "

शबरीमाला इश्यू हा वरील चर्चेशी संबंधित आहे . त्याची चर्चा करायला कसली हरकत ?
भरत , तुमचे पोस्ट नेमके आहेत.

शबरीमाला इशू तर सें ट्रल आहे ना बॉस. बाकी सर्व तिची परिस्थिती व्यक्त करते. अश्या परिस्थितीतली मुलगी असेल तर आंदो लन व डिबेट हा तिच्या साठी काहीतरी कृती करण्याचा ट्रिगर होतो ना. हे सर्व शतकानुशतके चालले आहे बदलण्याची शक्ती माझ्यात नसेल पण जे माझ्या वाट्याला आले आहे त्याबाबत तरी मी निर्णय घेउ शकते. तुमच्या मंदिरात मला प्रवेश नाही . माझ्या आयु श्यातून तुम्ही हद्दपार. किस्सा खलास. पति पर मेश्वराचे खरकटे काढण्यात धन्यता मान णार्‍या असतील पण ते आपण आहोत का?! हा प्रश्न तिला पडतो व उत्तर मिळाल्यावर लगेच अ‍ॅक्षन.

ती निरागस मुलगी जिने दीक्षा घेतली आहे काही ही न समजता व म्हातारी आतेसासू ही दोन टोके आहेत पण मधला वेळ काय मोलकरीण विथ बेनिफिट्स!! नही चालसे. नीवे भूमिम गाण्यावर तीन मुलींनी नाच केलेले युट्युब वर आहे त्यात सुरुवातीला तुमच्या जीवनातली हिरॉइन बना व्हिक्टिम नाही असे वाक्य आहे. हे खूप सुशिक्षित तरुणींना भावत असावे.

सुनिती, बहुतेक मी माझे म्हणणे नीट मांडत नाहीये.घृणास्पद आहे म्हणून लाज वाटते म्हणून नव्हे.
एक महत्वाचा मुद्दा मांडला जातोय.ज्यांना आपण जुनी खोडं, बुरसटलेले म्हणतो ते लोक बघून विचारात पडतायत.आणि अचानक शेवटची 25 मिनिटं बघून परत 'ओह, म्हणजे हा छुपा अजेंडा होता होय, युजलेस' म्हणून परत विचारापासून लांब जातायत.
यावरही बरेच आर्ग्युमेंट आहेत, ते तसेही गेले असते वगैरे.
इथे मॅटर ज्या मूळ प्रेक्षकवर्गाला (जुन्या वळणाचे इत्यादी इत्यादी) हा मुद्दा सेल करायचा आहे त्याला तुम्ही एका विचाराकडे येत येत परत लांब करताय का असा वाटला.

जिथे राजकारण आलं, धर्म आला तिथे बाकी सगळे मुद्दे बॅकसीट ला आपोआप जातात.हा मुद्दा बोलूच नका, आपल्या धर्मातली किंवा कोणत्याही धर्मातली भोकं दाखवूच नका असं मी म्हणत नाहीये.तुम्ही सुरुवातीला व्यक्त करताना कोणता रस्ता घेतला, आणि नंतर शेवटी कुठे निघालाय?तुम्हाला कुठे पोहचायचंय? (इथे तुम्हाला हे इंग्लिश मधलं जनरीक 'यु' आहे, सुनीती ला उद्देशून नव्हे.) शबरीमला यात्रा, त्यातून घरचं सोवळं, त्यात तिला झालेले त्रास हेही दाखवणे कथेच्या वळणात ओके आहे.पण तो स्त्री प्रवेश, फेसबुक व्हिडीओ शेअर चा मुद्दा खरोखरच हवा होता का?

आलं लक्षात अनु. पण खरं सांगायचं तर जुनी खोडं काहीही वाचून, बघून तसंही बदलत नाहीच. जुनी म्हणजे वयानीच नाही, मनानेही.

माझं म्हणणं अमानी क्रिस्प शब्दात मांडलंय. शबरीमाला हे तिच्या केसमधे एक ट्रिगर ठरले. "आंदोलनजीवी" असा डेरोगेटरी शब्द वापरणार्यांना हे लक्षात येत नाही की अशा आंदोलनातून सामान्य मनुष्याला आयुष्याचे सार गवसु शकते. प्रत्यक्ष भाग न घेताही. म्हणून ते महत्वाचं आहे.

पण तो स्त्री प्रवेश, फेसबुक व्हिडीओ शेअर चा मुद्दा खरोखरच हवा होता का?>> हो अगदीच हवा होता. जिला घरातही प्रवेश नाही तिला तो व्हिडिओ पाहून किती एम्पावरिंग वाटले असेल. त्यातनंच तिला बळ मिळत नाही का?

Pages