द ग्रेट इंडिअन किचन

Submitted by मेधावि on 1 February, 2021 - 07:00

गेल्या दहा दिवसांत तीन सिनेमे पाहीले.
1. इज लव्ह इनफ ? "सर"
2. द लास्ट कलर
3. द ग्रेट इंडिअन किचन.

पहिले दोन सिनेमे आवडले ...

तिसरा सिनेमा.. (Neestream -मल्याळी भाषेतला इंग्रजी सबटायटल्सवाला) पाहून मात्र त्रास झाला. एक सण्णसणीत मुस्काटात बसली. हा चित्रपट संपत नाही. तो मानगुटीवर बसतो आणि छळतो. "अगदी फ्रंट ऑफ द माईंड" छळत रहातो. स्वैपाकघर आणि स्वैपाक ह्या विषयातले बारीक सारीक तपशील टिपून त्यावर एका पुरुषानं हा सिनेमा बनवलाय,त्याला साष्टांग प्रणाम.

Spoiler alert - ज्यांना पहिल्या  धारेचा सिनेमा बघायचाय त्यांनी इथून पुढे वाचू नये. पण लवकर बघा...

(एक डिस्क्लेमर - मी अजिबातच स्त्रीवादी नाही. स्वतः राबून घर सजवणं, स्वच्छ आणि सुंदर ठेवणं, छान छान पदार्थ बनवून दुस-याला खाऊ घालणं हे मला आवडतं. मी माझ्या आवडीसाठी ते करते, तरीसुद्धा सिनेमा पाहून मी गोंधळले आणि भांबावले आहे)

लास्ट अॅलर्ट!!!
ह्यापुढचं लेखन प्रचंड उत्कट असेल. ते कदाचित  असंबंद्धही होईल, पण विचारांचं घोंघावीकरण न थोपवता आणि त्याचं अजिबात सुबकीकरण न करता ते जसे येतील तसे ते इथे येतील.

एखाद्या व्यक्तीला कोणी सपासप आसूडाचे फटके मारत असेल तर त्याच्या वेदना पाहून बघणाराही कळवळतो.  पण ती व्यक्ती जर खूषीत ते फटके खात असेल तर? .... आनंदानं हे फटके खाणं म्हणजेच आपल्या आयुष्याची सार्थकता, कृतार्थता, परीपूर्णता असं तिला आणि तिच्या सर्व जिवलगांना वाटत असेल तर ?

आणि....... मीही त्यातलीच एक असेन तर?????
मीच काय,  निरक्षर ते डाॅक्टरेटपर्यंत शिकलेल्या, गरीब ते गडगंज श्रीमंतीत लोळणा-या माझ्या परिचयायल्या सर्वच्या सर्व  स्त्रिया दिसतायत् मला आत्ता डोळ्यापुढे. हे सगळं आमच्या, आपल्या  हाडीमाशी इतकं रुजलंय आणि तुम्ही आम्ही सर्वांनी ह्या प्रचंड प्रचंड भीषण वर्णव्यवस्थेला किती सहजपणे आत्मसात केलंय...आणि आणि "आज" एक पुरुष बोलतोय त्यावर..हॅट्स ऑफ टू हिम.

हा सिनेमा  पितृसत्ताक पद्धतीतल्या "स्त्री" ह्या सो काॅल्ड  "देवीच्या" कर्तव्यांवर, तिच्या अधिकारांवर, सुखी आणि संपन्न आयुष्याच्या  परंपरेनं रुजवलेल्या कल्पनांवर, व्याख्यांवर आणि "घरगुती हिंसाचाराच्या प्रकारांवर बोलतो. चित्रपट पहाताना एकापाठोपाठ एक एक सण्णसणीत कोरडे बसत रहातात अंगावर खण्णं..खण्णं..खण्णं करत  !!!!   पण तो थांबत नाही, वेगवान बनतो आणि बोलतच रहातो, बोलतच रहातो. मी ..पहातच रहाते....कण न् कण् एका क्षणी  "पेटत" असतो आणि पुढल्या क्षणी "विझत" असतो. एक मोठ्ठी  हतबलता साचून रहाते. हे सगळं बदलण्यासाठी आपण फार फार दुबळे आहोत असं वाटतं.  पटो...न...पटो.... मी तीच वाट पुढे चालणार असते.

हा चित्रपट फार महत्वाचा आहे. पहायलाच हवा असा.  रोजच्या जगण्यातल्या ब-याच बेसिक गोष्टींचं भान देतो तो. मानवता शिकवतो. आपल्या मायेच्या माणसांच्या आणि प्रेमाच्या कल्पना, जेवणाचे, वागण्याचे  मॅनर्स, म्हातारपणापर्यंत बाळगलेल्या आणि  कौतुकानं जोपासलेल्या  नाठाळ आणि त्रासदायक सवयी आणी चवी-ढवी ह्या सगळ्यावर प्रश्न उभे करतो.

चित्रपटाची सुरुवात.. , केरळमधल्या एका गावात एक लग्न ठरतंय. मुलगी काळीसावळी, स्मार्ट, हसरी, टिपिकल दाक्षिणात्य सुंदर काळेभोर बोलके डोळे आणि दाट कुरळे केस. तशी पहिल्यांदा पाहताना ती सुंदर वगैरे नाही वाटत पण हसली की फार गोड दिसते. नृत्याची आवड आहे तिला. नैपुण्यही आहे त्यात. हसरी, खेळकर फुलपाखरी आयुष्य जगणारी ही मुलगी.  बघायला येणारं स्थळही  तालेवार असावं. मुलीची आई भरपूर उत्साहानं राबते आहे, गोड आणि तिखट असे भरपूर तळीव पदार्थ (घरातच) बनवते आहे. सुंदर मोठ्ठा "आधुनिक" आणि कलात्मक पद्धतीनं सजवलेला दुमजली बंगला आहे त्यांचा. संपन्नता जाणवते सगळीकडे. वडील गल्फमधे नोकरी करत असल्याचं गप्पांमधून समजतं.  नातेवाईक, हास्यविनोद, गप्पा........ छान आनंदाचं वातावरण आहे.

बघण्याचा कार्यक्रम पार पडतोय. दोन्ही बाजूंचे लोक सधन वाटतात आणि खुशीत दिसतायत्. मुलामुलीला एकट्यानं एकमेकांशी काही बोलायचं तर बोला अशी परवानगी देऊनही  घरच्या सगळ्यांनी फिल्डींग लावली आहे. अशा परिस्थितीत संकोचल्यामुळे मुलामुलीचा फार संवाद होतच नाही. स्वभाव, विचार-आचार जाणून घेणं वगैरे काही घडताना दिसत नाही. पण दोघंही एकमेकावर अनुरक्त वाटतात. 

छान थाटामाटात लग्न होतं. हुंड्यात मिळालेली एक अलिशान कार ही दिसतेय दारात.  लाजत मुरडत नव्या नवरीचा कौतुकाचा गृहप्रवेश. प्रेमळ व शांत स्वभावाचे सासूसासरे आणि नवरा.  सासरचं घर किती सुंदर!!! वडिलोपार्जित असणार. टुमदार, कौलारू, खूप मोठ्ठं पण जुन्या पद्धतीचं.  दोन मजली, मागेपुढे भलं मोठ्ठं अंगण, जुन्या पद्धतीची कडी-कोयंडे असलेली लाकडी दारं,  शिसवी लाकडाचं फर्निचर, पितळी मोठी मोठी छान छान भांडी, मागेपुढे भरपूर झाडं. स्वैपाकघर  मोठ्ठं, मात्र अंधारं आणि साधं आहे. तिथं माॅड्युलर किचन नाहीये. साधा कडप्याचा ओटा, अॅल्युमिनीयमची भांड्यांची मांडणी, भिंतीवरचं ताटाळं, फळीवरचे डबे. स्वैपाकघरातच अजून एका भिंतीशी अजून एक ओटा आहे आणि त्यावर चक्क एक ढणढणती चूल आहे. वर वखारीची लाकडं रचलेली दिसतात.  चुलीवर (केरळमधे) भात शिजवतात ते भाताचं डेचकं. इतर भांडी आणि भात ढवळायचा मोठा डाव. बाकी स्वैपाक गॅसच्या शेगडीवर होतो पण भात मात्र अजूनही चुलीवरच शिजतो. मिक्सर आहे, पण वाटण मात्र पाट्यावरच होताना दिसतं. कायमचा फिक्स केलेला एक मस्त मोठ्ठा पाटा दिसतो.

मुलीच्या संसाराचा पहिला दिवस. नवरा चांगला वाटतो. सासूही प्रेमळ, शांत आणि कामसू आहे. मुलीला हळूहळू रुळूदे. लगेच कुठे कामं सांगायची? सासराही शांत आहे. घरात फारसा बोलतही नाही.

भांडी घासणं, उष्टं खरकटं काढणं, केरवारे, फरशी, अंगण झाडणं, पुसणं , भरपूर भाज्या, निवडणं, चिरणं, फोडणीस टाकणं....मोठ्या अलीशान पाट्यावर भरपूर नारळ वाटणं, चटणी, सांबार बनवणं. मांसाहारी पदार्थ बनवणं. वेळेवर डायनिंग टेबलवर सगळं अन्न मांडणं, गरमागरम सर्व्ह करणं.... विविधरंगी, विविध चवींचा, सुग्रास, तृप्त करणारा स्वैंपाक.. गृहलक्ष्मीनं, अन्नपूर्णेनं घर सांभाळावं, सजवावं, ते उबदार ठेवावं, कुटुंबाला छान खाऊ पिऊ घालून सुखात ठेवावं.  जेवताना स्वैपाकाचं आवर्जून कौतुक करणारी घरची माणसं.  पुरुषाच्या ह्दयाचा मार्ग पोटातूनच तर जातो ना....ह्या संसारला सुखी संसारच तर  म्हणतात ना?  

रोज सकाळी बिडाच्या तव्यावरचे गरमागरम डोसे, इडिअप्पम, पुट्टु आणि कडला करी, सांबार, पदार्थाला लाल मिरच्या, उडीद डाळ, भरपूर कढीपत्याची खमंग फोडणी. दुपारच्या जेवणातल्या वेगवेगळ्या भाज्या, भात... हळूहळू डोळ्यातून  ती चव आपल्या डोक्यात, मनात, आणि मग जिभेवर उतरायला लागते. चायला, आपण फूड चॅनेल बघतोय का काय असं वाटतं.

घरच्यांच्या आवडीनिवडी आणि चवीढवींचा विचार करत करत रोजचा स्वैपाक करणं, सकाळी दूध येण्यापासून सुरू झालेला दिवस, रात्रीची जेवणं झाली की ओटा टेबल आवरून, भांडी घासून मग श्रांत तनामनानं दिवा बंद करून बिछान्यावर अंग टाकणं ही त्या गृहलक्ष्मीची आनंदाची, सार्थकतेची, तृप्तीची कल्पना. लग्नानंतर सुरुवातीला  नवरा व सासरच्यांचं सगळं व्यवस्थित करणा-या ह्या घरोघरीच्या नायिका, नंतर मुलंबाळं, नातवंडं ह्यांच्यासाठी अविरत झिजतच असतात......झिजतच रहातात....मरेपर्यंत. आणि आपण म्हणतो...माझी आई/आजी फार फार प्रेमळ होती. माझ्यासाठी खूप केलं तिनं. तो तिच्यासाठीही सन्मानच असतो.

कथानायिकाही लग्नानंतर सासूच्या बरोबरीनं  सर्व जबाबदा-या उचलायचा प्रयत्न करताना दिसते.  एक आदर्श सून, बायको बनण्याचा प्रयत्न करताना दिसते.  हे सर्व करताना तिला मजा येते आहे, आत्मिक समाधान मिळतं आहे. पण ते निभवताना तिची दमछाक होतेय.

घरातला पुरुषवर्ग शांत, अबोल....पैसे मिळवून आणणं आणि बाहेरची कामं करणं हे पुरुषांचं काम. ते किचनमधे ढवळाढवळ करत नाहीत. आणि अचानक सासूला मुलीच्या बाळंतपणासाठी परदेशी जावं लागतं. आणि संपूर्ण घराची संपूर्ण जबाबदारी सुनेवर धाप्पकन् येऊन पडते.  माहेरी
फारशी स्वैपाकघरात न  वावरलेली ही मुलगी, पटापट सगळं शिकून अपेक्षांना उतरायच्या प्रतिक्षेत.

सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, भांडी घासणं, केरवारे, अंगणाची झाडलोट, फरश्या पुसणे, जिने पुसणे..... न संपणारी आणि मारूतीच्या शेपटाप्रमाणं सतत वाढत जाणारी कामं आणि अपेक्षा. सास-यांना चुलीवरचाच भात, पाट्यावरची चटणी प्रिय आहे. कुकर, मिक्सरमधे ती चव येत नाहीये. ते प्रेमानं तिला सुचवू पहातात. तीही त्यांच्या मताचा आदर राखते, एक एक दिवस पुढे सरकतो तशी वेगवेगळ्या प्रसंगातून तिला येत जाणारी जाण, येणारा मानसिक आणि शारिरीक थकवा,  फ्रस्टेशन्, पुरुषांच्या प्रायोरिटीज,  एकत्र कुटुंबपद्धतीतल्या अपेक्षा, रोज येणारी वेगळी वेगळी आव्हानं. त्यावर मात करण्यासाठीची तिची ओढाताण आणि ह्या सगळ्यावर त्यावर तिनं दिलेलं उत्तर....ह्यावर बोलतो हा सिनेमा.

गरमागरम डोसे करून वाढायचे म्हणजे बरोबरीनं ती जेवू नाही शकत बाकीच्यांबरोबर. सगळ्यांचं खाणं झाल्यावर टेबलवर ताटाबाहेर काढून टाकलेल्या शेवग्याच्या शेंगांची सालं आणि इतर खरकटं  उचलताना तिला ढवळतं. जेवायला सुरुवात करताना नवरा व सास-यासाठी हिनं सुबकपणे मांडलेलं टेबल आणि आता ती आणि सासू जेवायला बसतानाचं टेबल ह्यात जमीन अस्मानाचं अंतर. सासू सरावलीये. तिला ह्याचं काहीच नाही वाटत. उलट ती नव-याच्या उष्ट्या ताटातच घेते वाढून. मुलीला मात्र हे जड जातंय. हाॅटेलमधे टेबल मॅनर्स पाळणारा नवरा घरात का पाळू शकत नाही? सतत भांडी घासण्याचा आणि उष्ट- खरकटं आवरण्याचा सीन येत रहातो. किती घरांमधे तुंबलेल्या सिंकमधे हात घालायचा प्रसंग घरच्या मुलांवर/ पुरुषांवर  येत असेल? दुस-या घरातनं आलेल्या मुलीनं मात्र हे पट्कन् आत्मसात करण्याची अपेक्षा ठेवली जाते.

घरोघरी नव-याच्या हातात डबा, रुमाल, पाकिट, मोबाईल देणा-या बायका आपण पहातोच की. त्यात कुठं काय वावगं वाटतं? नाॅर्मलच तर आहे की हे..
रांधा वाढा उष्टी काढा ह्यात तर मागच्या अनेक पिढ्या संपल्या. ह्यात काय एवढं मोठं? नाॅर्मलच आहे की हे सगळं..  "ह्याच" गृहितकांकडे हा सिनेमा परत एकदा नव्यानं बघायला लावतो. त्या गृहीतकांना मानवतेच्या निकषांवर परत एकदा तपासायला लावतो. मारहाण किंवा  शिवीगाळ म्हणजेच काही घरगुती हिंसाचार नाही फक्त. खूप व्यापक आहे ती कल्पना. पिढ्या न् पिढ्यांपासून होत असलेले काही अन्याय आता परंपरेच्या नावानं इतके मान्यताप्राप्त झाले आहेत की  मानवतेनच्या  दृष्टीकोनातूनही ते दूर करू शकत नाहीये आपण. म्हणून ही अस्वस्थता येते. ही अस्वस्थता कधी जाईल, कशी जाईल ते माहीत नाही पण  सिनेमाचा प्रेक्षक आपल्या ताटातलं उष्टं दुस-या कुणाला तरी साफ करायला टाकताना  दहा वेळा तरी विचार करून टाकेल  हे सुद्धा ह्या सिनेमाचं यशच म्हणावं लागेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

स्त्री प्रवेश हा तर मेन मुद्दा आहे. जी बाई तुमच्या सर्व सुखां साठी दिवस रात्र राबत असते. नव्हे तिने वाहूनच घेतले आहे तुमचे जीवन कमी मेहनतीचे व्हावे म्हणून , ती तुम्हाला शरीर सुखासाठी चालते. पण त्याच तिच्या शरीराचा एक नैसर्गिक भाग् मात्र तुम्हाला अपवित्र वाटतो. इतके की स्त्री म्हणजे घाण आता देवच आम्हाला वाचवो असे. मग संपूर्ण वैराग्य घेउन ब्रम्हचर्यच पाळा वे. तीन महिने दीक्षा घेउन मग व्रत सोडल्याव र हपापल्यासारखे करायचे ह्याला अर्थ नाही. किंवा त्या धार्मिक व्रतातून काही शिकले डोक्यात गेले असे झाले नाही आहे. हा अजेंडा नाही त्यांच्या वागणुकीतील विसंग ती फक्त समोर ठेवली आहे. फेसबुक वर व्हिडीओ शेअर करायचे पण स्वातंत्र्य नाही! हेल पॅट्रार्की.

समाज धर्म पॅट्रार्की हे कोणाच्या तरी बलिदानावर च खंबीर पणे मुळे रुजवून उभे आहेत. ती ते बंद झाले तर इट इज जस्ट अ काँन्स्ट्रक्ट. जोखड जे तुम्ही आपण हून गळ्यात बांधून घेतले आहे. म्हणून स्त्रियांची व शूद्रांची जागा पायताणाशी च हवी हे नेकेड सत्य आहे ह्या विचारसरणी मागचे. तुम्ही सिस्टिम बदलू शकत नाही पण स्वतःचा मार्ग तर शोधू शकता.

अनु, exactly!

वडाचं झाड खूप पसरलं की पारंब्या जमिनीत घुसतात, त्यांचीच नवी खोडं बनतात. मग मूळ खोड कोसळलं तरी पारंब्यांनी बनलेला पसारा शिल्लक राहतो. तो मरत नाही.
आपल्याला झेपेल तेवढ्या भागावर घाव घालत राहणं एवढंच आपल्या हातात राहतं.
हे फारच अलंकारिक झालं!

Happy
या चर्चेचा सैराट धागा बनेल असे दिसते
विशाल पारंब्या इथे तेथे पसरलेला.पण ही सर्व चर्चा छान होतेय.
मी आज स्वयंपाकघरात काम करत विचार करत होते याच धाग्याचा.

शबरिमाला या विषयावर पूर्ण मुव्ही बनवता आला असता. टायटलमध्येही द ग्रेट टेम्पल इश्यू असं लिहून.

पण चित्रपट ग्रेट इंडियन किचन आहे. सुरुवातीच्या भागात त्यावरच फोकस आहे. मग मध्येच ट्रॅक बदलणं गरजेचं नव्हतं.
या धाग्यावर मूळ परिक्षणातही शबरीमाला उल्लेख नाहीये.
सो मे बी जो जसा चष्मा लावतो त्याला ते तसं दिसत असावं.
माझ्या सासूबाईंची मैत्रीण केरळी ख्रिश्चन आहे. तिनेही खूप हाल काढलेत, असंच प्रत्येकाच्या आवडीचा स्वयंपाक करा, डोसे घालत उभं राहा, सकाळी 4 वेळा चहा करा कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या वेळी पिणार. इथे अर्थात सबरीमाला टाईप इश्यू नाही, पण बाकी किचनची समस्या सेम आहे.

असो. प्रत्येक गोष्टीला ठरलेल्या अजेंड्यावर न्यायला तर चित्रपट बघितलेलाही असावा लागत नाही तेव्हा चालू दे.

चित्रपट ज्या दिग्दर्शकाचा आहे त्यांचं म्हणणं
In 2018, the Supreme Court’s order came but even after that some political parties… we know how they reacted to the order and they did not allow women (in)to Sabarimala and they want women to be confined to their homes. They won’t allow this kind of freedom. It is related to women’s rights, menstruation and everything begins from the house. This is why it’s in my film,” he explained.

चित्रपटात असला तरी इथल्या धाग्यात नाही म्हणून त्यावर चर्चा नको हा काय पॉइंट आहे?

https://indianexpress.com/article/entertainment/malayalam/discrimination...
त्या इश्यू मुळे मला अवघड होतं म्हणून तो चित्रपटातच नको?

सबरीमाला हा इश्यू स्त्रीत्व, ती पुरुषांची भोगदासी आणि त्याचवेळी त्यांच्या मुक्तीच्या मार्गातील धोंड असणं, अपवित्र असणं हे मुद्दे अधोरेखित होतात.

शबरीमाला आणि धर्म बद्दल चर्चा करून किचनचा इश्यू मागे पडतोय याची चिंता आहे. तो इश्यू धर्मापलीकडे आहे.
मला अवघड कशाला होईल? सर्वाना जाऊ दे मंदिरात, मला काही हरकत नाही. पण अगदी कोंग्रेस किंवा लेफ़्टसुद्धा त्या गोष्टीला तयार नाही.
पण यावर बोलून मला जास्त महत्वाचा वाटणारा किचन वर्कचा विषय मागे पडतोय. असो.

Bringing it back , स्वतःसाठी काही करून खाणं मला नाही जमत. पण मी माझ्यापुरतं विकत आणून खाते, ते जमतं!
पण किचनमध्ये पुरणपोळी एकटीने करून खायला नाही जमणार. त्यापेक्षा विकत आणीन!

किचनच्या इश्युवर मी कोथिंबीर वड्या कथेवर चर्चा करत होतो तेव्हा तो नॉन इश्यू होता. आता तो इश्यू झाला.

Jeo baby चं स्पेशल अभिनंदन.

करा चर्चा.

आताच हा चित्रपट पाहिला. नॉर्मली चित्रपट पाहण्याआधी मी चर्चा वाचन टाळते. पण ही चर्चा वाचून चित्रपट अधिकच समजला.

मला उमजलेलं काही : हा चित्रपट नुसता किचनपूरता मर्यादित नसून एकंदरीतच पितृसत्ताक पद्धतीवर भाष्य करतो. किचन हे केवळ रूपक आहे. दोन वेळच अन्न पुरवलं , निवाऱ्याची सोय केली की स्त्रीने आपल्याला हवं तसं वागलं पाहिजे ही सर्वत्र असणारी भावना. या भावनेवर चित्रपट बोट ठेवतो. आता ह्यात धर्म कुठून आला तर या भावनेला धर्माधिष्ठित कोंदण दिलं गेलं. ते कोंदण कायम राहण्यात पितृसत्ताक पद्धतीचा फायदा . त्यामुळे धर्म आणि स्त्रीवाद वेगळे करता येणार नाहीत. इथेच सुनीतीने मांडलेला शबरीमला इश्यू येतो. काही वर्षांनी शबरीमाळा हा इश्यू राहणार नाही. पण आता तो लढा काहीतरी करू पाहण्याऱ्या व्यक्तीला निश्चितच बळ देईल.भव्य काही करण्यासाठी दिंडोरा पिटायची गरज नाही. एक छोटेसे पाऊलही पुरेसे आहे. तो फेसबुक व्हिडीओ याचेच प्रतीक वाटला मला.
काहीसे वर्षेपर्यंत स्त्री शिकली /अर्थाजन केलं तर नवरा मरेल ही समजूत होती. त्यासाठी धर्माचे दाखले दिले जायचे. या रूढींना आव्हान दिले गेले आणि आजची परिस्थिती आली. अमानी म्हटलं तस धर्म मला जर मनःपुत जगण्याची संधी देत नसेल तर असा धर्म काय कामाचा ?
धर्म साचून राहिला तर त्याच डबकं होतं. मध्यपूर्वेत असलेली स्थिती अनुभवत आहोतच. धर्म सतत चिकित्सक बुद्धीने पाहता यायला हवा. इथे सुनीती म्हणतेय तस धर्म सुधारणा व्हायला हव्यात कारण त्याच्या फायदा माझ्या मुलीबालिना होतो. निकोप दृष्टीने पाहिलं तर सगळं स्वच्छ दिसत नाहीतर ज्यात त्यात धर्म खतरे मैं है म्हणून ओरडताही येतं

इथे झालेली चर्चा खरंच चांगली होतेय. नवीन दृष्टीकोन कळत आहेत.

इथे- 1. धार्मिक सुधारणा व्हायला हव्यात 2. सबरीमालामध्ये मुक्तद्वार असावं- याला कोणीही विरोध केला आहे का?

मग फक्त याच मुद्द्यांवर बोलत राहण्यात काय अर्थ आहे?
आता दुसरे मुद्दे घेऊयात का?
अर्थात किचनचा मुद्दा सर्वाना रिलेट होणार नाही हे मान्य आहे.
लग्न होऊन स्वतःच्या किचनची पूर्ण जबाबदारी घेईपर्यंत मलाही नसता झाला. तरी यातली नायिका मूल व्हायच्या आधी बाहेर पडली. अन्यथा ते जजिंग वेगळं- तुम्ही तुमच्या मुलीला शुगर खायला देता? माझा मुलगा कारल्याचे पराठे आवडीने खातो, चॉकोलेट नक्को म्हणतो. Etc.

थँक्स हीरा!

चित्रपटाने ढवळून काढल अगदीच. हे मुद्दे 'आपले' नाहीत असे मानतो ते मुद्दे सुळकन कसे रिलेट होतात ते लक्षात आलं. धर्म , स्त्री , पुरुष हे सगळं एकमेकांशी इतक्या साटल्यपणे जोडल गेलेय की वेगळं काढायचं म्हणूनही काढता येणार नाही.

लॉकडाऊनमध्ये माझी मैत्रीण अक्षरशः वैतागलेली . कारण सतत काय खायला आहे ह्याची विचारणा, तिन्ही त्रिकाल स्वयंपाक , ती भांडीकुंडी , धुणं ! बरं , मुलगा आहे म्हणून कानाचा घरातील काम करायला पण अडथळा . आता हे त्या कानांवर झालेले संस्कार. मूलग्याने कशी काम करायची घरातील ? आमच्यात नै बे असलं काही करत ! ही रीत नाही आमच्यात. हे संस्कार कुठून येतात ? आकाशातून ? नाही , हे आमच्यात चालत , हे आमच्या धर्मात आहे असं argument केलं जातं. ह्यासाठीच मला हे तिन्ही घटक एकमेकांपासून वेगळे काढता येत नाहीत अस वाटतं

चित्रपट बघून झालाय तर आता भरत. नी उल्लेख केलेली कोथिंबीर वडीची गोष्ट वाचते परत. अजून काही मुद्दे सुचतील

भरत, कोथिंबीर वडी हे काय आहे? वाचलेलं आठवत नाही. लिंक मिळेल का?
>>अमितव यांनी रंगवलेलं उष्टे- खरकटे उचलायला पैसे देऊन कामगार, त्याचे हक्क हे चित्र प्रत्यक्षात उतरणंं शक्य आहे का? >> बहुतेक नाही. पण भारतात कपडे, भांडी, केर इ. करणार्‍या व्यक्तींना पगार मिळतो तसाच एक पाऊल पुढे जाऊन खरकटं उचलणे म्हटलेलं. त्या भांडी घासणार्‍यांचे शोषण होतेच. रादर भारतात प्रिव्हलेज आणि शोषण ही उतरंड फारच ठळक दिसते आणि ती साखळी पार तळापर्यंत तुटता तुटत नाही. आता विचार करताना लाज वाटते, पण भारतात रहात असताना घरच्या भांडीवालीला आठवडी सुट्टी मिळावी हा विचारही माझ्या मनाला कधी शिवलेला न्हवता.
लग्नाच्या बायकोला जर डोमेस्टिक हेल्पर सारखं राबवुन घेतलं जात असेल तर प्रथमदर्शनी तरी उष्टं उचलण्याचे पैसे हे तार्किकदॄष्टा चूक वाटत नाही. किमान लग्नानंतर काय वाढून ठेवलं आहे ( रादर वाढायचं आहे Wink ) याची लग्नाच्यापूर्वी कल्पना आलेली कधीही चांगलीच. अर्थात अजुन विचार केला तर दुसरी बाजू दिसून मत बदलेलं माझं. आपणं उपहारगृहात ताट स्वच्छ करणे जसे अपेक्षित नसते, चित्रपटातही तो (आणि ती) टेबलावर चोथा ठेवत नसले तरी चिकनची हाडं कचर्‍यात टाकत नाहीत, का आपलं पान विसळून ठेवत नाहीत. अर्थात ते अपेक्षितही नाही. ते करायला तिकडे माणसे मोल देऊन ठेवलेली आहेत, आणि ती सेवा द्यायला आपण त्यांना मोबदला देत असतो. थोडंफार ते डोक्यात होतं म्हणून तसं लिहिलं होतं. वैयक्तिक जीवनात कंटाळा आला की घरी भांडी घासायला आणि नंतर पसारा आवरायला लागू नये म्हणून आम्ही बाहेर जेवतो.

मेन्स्टुएशन मध्ये वेगळी वागणूक... मग ते स्पर्ष न करणे असेल, बाकी चालेल पण देवाची पूजा नको, बाकी चालेल पण सणाचा नैवेद्य नको.... असं आजही सर्रास बघितलेलं आहे. त्याचा अर्थातच माझ्या धर्माशी संबंध आहे. पण ती प्रथा बंद झाली, देवळात कायम प्रवेश मिळाला तरी येनकेनप्रकारेण जीवनशैली न बदलण्यासाठी या चित्रपटात दाखवलेल्या सासरा आणि नवर्‍याला हजार कारणं मिळतील, नाही शोधतीलच ते. तरीही मला वाटतं चित्रपटात शबरीमालाचा मुद्दा हवाच कारण तो मुद्दा _आहे_. आणि तो ऐरणीवर आहे. तापलेला आहे तेव्हाच घाव मारणे हे बदलासाठी कधीही श्रेयस्कर.

(कबुली)
मला सारखं लॉकडाऊन मध्ये 'आई आज डिनर ला काय, लंच ला काय , नाश्त्याला काय विचारल्यावर माझाही एक दोन वेळा हल्क झालाच.इथे ऑफिसमध्ये व्हर्च्युअल काम करा, मग मीटिंग मुळे दिवसभर काम नाही झालं तर रात्री स्कैप अदृश्य ठेवून गुपचूप काम करा, आणि मध्येमध्ये लोक एखाद्या हॉटेल मध्ये आल्यासारखे सारखं 'आज काय स्पेशल' विचारतायत.त्यांनी मदत केली, कधीतरी स्वतःच स्वयंपाक पण केला.तरीही इतकं स्नॅप व्हायला झालं या प्रश्नांनी.सासऱ्याला हातात ब्रश नेऊन देणारी, निकर धुणारी, नवऱ्या कडून 'फॉरप्ले ला मला काही वाटायला पाहिजे ना' ऐकणारी आणि इतकी कामं करणारी स्त्री इतके महिने शांत कशी राहिली हेच नवल.

कदाचित ती शांत यासाठीच होती की ती थोडी काँफुज असणार, अगदी तिची आई सुद्धा शिळं तर मीच खाते नेहमी,चोरून अँप्लिकेशन कर ,etc etc टिपिकलच सल्ले देत होती,
नायिकेचे मेंटल कंडिशन करण्याचाच एक प्रकार तो,डबा सुद्धा नवऱ्याने डायरेक्ट न मागता आईमार्फत सांगितले,काय गरज होती,सरळ तिलाच सांगता आले असते पण नाही, offc मध्ये बायको नवीन आहे तिला रुळायला वेळ द्यायला हवा असं डबा न आणण्याच कारण देऊन आणि नंतर आईकरवी डब्याच सांगवून त्याने दुटप्पीपणा अधोरेखित केला आहे,
म्हणूनच मला तो fb व्हिडीओ मुद्दा महत्वाचा वाटतो, निदान व्हिडीओमधील मते तरी तिच्याशी मिळती जुळती आहेत,नायिकेला तिचा सल नक्की पकडता येत नव्हता,जवळपास सगळ्या बायका असंच तर वागतात म्हणजे चूक नक्की आपली की समोरच्याची हेच तिला समजत नसेल,म्हणून ती शांत आहे असे असू शकेल,मात्र जेव्हा तीने ठाम निर्णय घेतला त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही तिने,हेच आवडलं मला या चित्रपटात,
उगाच so called गुडीगुडी शेवट दाखवण्यासाठी नवऱ्या सासर्यात अचानक झालेले बदल दाखवले नाहीत,कारण हे बदल असे अचानक होतच नाहीत कद्धीच,
चूक काय नि बरोबर काय यात ती थोडी भंजळली होती पण अखेर तिने तिच्यासाठी योग्य मार्ग निवडला

अमितव, दुसरा परिच्छेद अगदी पटला.
कोथिंबीर वडीची गोष्ट सांज या आयडीची आहे Happy

जाई, तुझ्या प्रतिसादातलं 'भव्य काही करण्यासाठी दिंडोरा पिटायची गरज नाही. एक छोटेसे पाऊलही पुरेसे आहे.' हे वाक्य अगदी पटलं.
मी वर जे (अलंकारिक भाषेत) लिहिलं आहे की आपल्याला जमतील, झेपतील, तसे घाव घालत राहणं हेच आपल्या हातात आहे. झाडाचं मूळ खोड शोधायला गेलो तर त्या जंजाळात हरवून जाऊ, त्यात मला हेच म्हणायचं होतं.

सेपियन्स पुस्तकात वाचलं आहे की माणूस शेती करायला लागला, किमान तेव्हापासून पुरुषसत्ताक पद्धती अस्तित्वात आली (त्या आधीपासूनच असू शकते, पण तेव्हापासून नक्की)
धर्मांचा उदयही त्यानंतर हळूहळू झाला.
याचा अर्थ या पुरुषसत्ताक पद्धतीला धर्मांनी बळ दिलं असणार आणि ती आणखी पक्की केली असणार, पण ती मुळात होतीच असं मला वाटतं. पण तरी, समजा, असं असलं की धर्मांनीच पुरुषसत्ताक पद्धती लादलेली आहे, तरीही या चित्रपटातली नायिका किंवा खऱ्या आयुष्यातली एखादी सून, जिला हे सगळं असह्य होतंय, ती नवऱ्याला आणि सासऱ्याला धर्म कसा अन्यायकारक आहे हे पटवून देण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात आनंद कसा निर्माण होईल ते पाहील. मग एखादी या नायिकेसारखी त्यांच्या तोंडावर सांडपाणी फेकून बाहेर चालती होईल आणि स्वतःला आवडेल त्या क्षेत्रात पाय रोवून उभी राहील, तर एखादी गोडीगुलाबीने नवऱ्याला दुसरीकडे वेगळं रहायला भाग पाडेल, कुणी अजून काही करेल. यात अर्थात समोरची माणसं कशी आहेत, ती स्वतः किती स्वावलंबी आहे, ठाम आहे यावरही अवलंबून आहे.

भरत, जाऊ द्या हो कोथिंबीरवडी. किचनच्या गोष्टींचा त्रास नसतो मला, त्रास असतो तो नाही सोसायचं ते ही सोसलं म्हणून गौरव होण्याचा... तशा प्रतिक्रिया मी तिथे दिल्या होत्या. ड्रोन शॉट्स लावल्यावर का होईना वाटतोय सगळ्यांना इश्यू तर बरंच आहे की. जहाँ जागो वहीं सवेरा, उगीच परत मागची चर्चा कशाला.
त्या बाबतीत धागाकर्तीचे खूप कौतुक आहे. प्रांजळपणे लिहीले आहे. आवडलं!

Aadoo mast pratisad..

Shabarimala - seems very natural in d movie. There is no reason for it not to be in d movie.

In my earlier response i was referring to real life where i anyway wouldnt want to visit shabarimala. I doubt how many really care -

What i wrote that time abt shani mandir
https://www.maayboli.com/node/58225

नवरा तिलाच डायरेक्ट सांगतो की डब्याचं, आईला कुठे सांगतो?
सासू-सासरे आणि हे नवरा बायको यांचे पॅरेलल कॉल्स दाखवले आहेत ना?

तिलाच डायरेक्ट सांगतो की डब्याचं, आईला कुठे सांगतो>>>मी बघितला तेव्हा नवरा फोनवरून आईला आणि त्याची आई फोनवरून सुनेला डब्याबद्दल सांगते असं झालं होतं...त्याने डायरेक्ट सांगितलं असेल तर मी मिसल असणार,असंही सब टायटल वाचून वाचून काही सवांद समजलेत,बाकीचे बरेच सवांद समजायला सब टायटल ची गरजच लागली नाही,फक्त प्रसंगच आणि हावभावच बोलके होते

धन्यवाद वावे. कुणाला हव्या असतील तर कोथिंबीर वड्या. https://www.maayboli.com/node/77503
कथेची मांडणी वगैरे छानच वाटले. मी नायिकेला आणखी थोडे पॉझिटिव्ह/ लेव्हल हेडेड ठेवले असते आणि तिच्या मुलाला स्वयंपाक शिकवला असता, पण ते बारके भेद झाले. मूळ कथेचा उद्देश छान मांडला आहे. हे तिकडे लिहितोच. पण आधी (ज्युसी) प्रतिसाद वाचतो Wink

हेच ते , हेच ते , हेच ते
हेच ते पॅटर्न माबोचे

हिंदी असल्याने वाचवत नाही आणि मल्याळी सिनेमे पूर्ण बघून होतात.

अजून एक खटकेलेली गोष्ट म्हणजे,ती नायिका ओल्या कचऱ्याच्या डब्याला पिशवी लावत नाही,सकाळी तो घाण वास मारणारा कचरा नेऊन खड्ड्यात ओतला की (बहुतेक डबा धुवून पण न सुकवता) तसाच किचन मध्ये पुन्हा कचरा घ्यायला सज्ज Sad

हिंदी असल्याने वाचवत नाही आणि मल्याळी सिनेमे पूर्ण बघून होतात.>>>हा चित्रपट मराठी चित्रपट बघायचाय म्हणून tv लावून त्यात ढिगाने मल्याळम सवांद असलेला चित्रपट असता तर मी तो पाहिला देखील नसता,
पण मी मल्याळी आहे हे माहीत असताना पाहिला आणि sub टायटल वर काम चालवून घेतलं,

२ दिवसांपूर्वी हा मूव्ही पाहिला होता.मूव्हीपेक्षाही इथले प्रतिसाद जास्त आवडले.सुनिती,आदू,वावे ,मी अनु आणि बरेच जणांनी छान प्रतिसाद दिले आहेत.चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धागाकर्तीचे विशेष आभार.

जाताजाता>.. ते अँटीक्लॉक वाईज डोशांबाबत इथले प्रतिसाद वाचले नसते तर कळलेही नसते.

आदू ,डस्टबिन ला पिशवी न लावणं मलाही झेपत नाही.पण जुन्या घरात नसेल पद्धत.ज्याने एकदोन वेळा तो रिकामा डस्टबिन घासून धुतला आहे तो कधीही बिन धुता, बिन पिशवी बदलता नवा कचरा टाकणं चालू करत नाही Happy

ते खड्ड्यात कपोस्टिंग करताहेत. पिवशी कशी चालायची? ते तुम्हा झेंटलमन लोका समजू नको? लायनर लावतील फारतर.
डबल रच्याकने, तो दोन तासात कचऱ्याची माती करणारा प्रकार आवडलेला आहे. पैसे खर्च करायची उबळ आली की नक्की घेणार आहे. (घरच्या लोकांनी: 'सिटी कंपोस्टिंग चा कचरा उचलते आहे तरी तुझ्याच्याने तो वेगळा करणे जमत नाही, ही उगा जागा अडेल, मला दुसरा आयपी हवाय तर जागा नाहीये ना?' असली वाक्ये फक्त आय रोल ने सांगितली. )

गावाला आम्हीही नाही लावत पिशवी डब्याला. कचरा खड्ड्यात टाकल्यावर त्या पिशवीचं आणि काय करायचं? धुतला डबा की झालं. ती नवीन नवीन आहे म्हणून पार वास यायला लागेपर्यंत कचरा टाकत नाही. सवय झाली की रोजच्या रोज टाकला जाईल आणि वास येणार नाही.

Pages