गेल्या दहा दिवसांत तीन सिनेमे पाहीले.
1. इज लव्ह इनफ ? "सर"
2. द लास्ट कलर
3. द ग्रेट इंडिअन किचन.
पहिले दोन सिनेमे आवडले ...
तिसरा सिनेमा.. (Neestream -मल्याळी भाषेतला इंग्रजी सबटायटल्सवाला) पाहून मात्र त्रास झाला. एक सण्णसणीत मुस्काटात बसली. हा चित्रपट संपत नाही. तो मानगुटीवर बसतो आणि छळतो. "अगदी फ्रंट ऑफ द माईंड" छळत रहातो. स्वैपाकघर आणि स्वैपाक ह्या विषयातले बारीक सारीक तपशील टिपून त्यावर एका पुरुषानं हा सिनेमा बनवलाय,त्याला साष्टांग प्रणाम.
Spoiler alert - ज्यांना पहिल्या धारेचा सिनेमा बघायचाय त्यांनी इथून पुढे वाचू नये. पण लवकर बघा...
(एक डिस्क्लेमर - मी अजिबातच स्त्रीवादी नाही. स्वतः राबून घर सजवणं, स्वच्छ आणि सुंदर ठेवणं, छान छान पदार्थ बनवून दुस-याला खाऊ घालणं हे मला आवडतं. मी माझ्या आवडीसाठी ते करते, तरीसुद्धा सिनेमा पाहून मी गोंधळले आणि भांबावले आहे)
लास्ट अॅलर्ट!!!
ह्यापुढचं लेखन प्रचंड उत्कट असेल. ते कदाचित असंबंद्धही होईल, पण विचारांचं घोंघावीकरण न थोपवता आणि त्याचं अजिबात सुबकीकरण न करता ते जसे येतील तसे ते इथे येतील.
एखाद्या व्यक्तीला कोणी सपासप आसूडाचे फटके मारत असेल तर त्याच्या वेदना पाहून बघणाराही कळवळतो. पण ती व्यक्ती जर खूषीत ते फटके खात असेल तर? .... आनंदानं हे फटके खाणं म्हणजेच आपल्या आयुष्याची सार्थकता, कृतार्थता, परीपूर्णता असं तिला आणि तिच्या सर्व जिवलगांना वाटत असेल तर ?
आणि....... मीही त्यातलीच एक असेन तर?????
मीच काय, निरक्षर ते डाॅक्टरेटपर्यंत शिकलेल्या, गरीब ते गडगंज श्रीमंतीत लोळणा-या माझ्या परिचयायल्या सर्वच्या सर्व स्त्रिया दिसतायत् मला आत्ता डोळ्यापुढे. हे सगळं आमच्या, आपल्या हाडीमाशी इतकं रुजलंय आणि तुम्ही आम्ही सर्वांनी ह्या प्रचंड प्रचंड भीषण वर्णव्यवस्थेला किती सहजपणे आत्मसात केलंय...आणि आणि "आज" एक पुरुष बोलतोय त्यावर..हॅट्स ऑफ टू हिम.
हा सिनेमा पितृसत्ताक पद्धतीतल्या "स्त्री" ह्या सो काॅल्ड "देवीच्या" कर्तव्यांवर, तिच्या अधिकारांवर, सुखी आणि संपन्न आयुष्याच्या परंपरेनं रुजवलेल्या कल्पनांवर, व्याख्यांवर आणि "घरगुती हिंसाचाराच्या प्रकारांवर बोलतो. चित्रपट पहाताना एकापाठोपाठ एक एक सण्णसणीत कोरडे बसत रहातात अंगावर खण्णं..खण्णं..खण्णं करत !!!! पण तो थांबत नाही, वेगवान बनतो आणि बोलतच रहातो, बोलतच रहातो. मी ..पहातच रहाते....कण न् कण् एका क्षणी "पेटत" असतो आणि पुढल्या क्षणी "विझत" असतो. एक मोठ्ठी हतबलता साचून रहाते. हे सगळं बदलण्यासाठी आपण फार फार दुबळे आहोत असं वाटतं. पटो...न...पटो.... मी तीच वाट पुढे चालणार असते.
हा चित्रपट फार महत्वाचा आहे. पहायलाच हवा असा. रोजच्या जगण्यातल्या ब-याच बेसिक गोष्टींचं भान देतो तो. मानवता शिकवतो. आपल्या मायेच्या माणसांच्या आणि प्रेमाच्या कल्पना, जेवणाचे, वागण्याचे मॅनर्स, म्हातारपणापर्यंत बाळगलेल्या आणि कौतुकानं जोपासलेल्या नाठाळ आणि त्रासदायक सवयी आणी चवी-ढवी ह्या सगळ्यावर प्रश्न उभे करतो.
चित्रपटाची सुरुवात.. , केरळमधल्या एका गावात एक लग्न ठरतंय. मुलगी काळीसावळी, स्मार्ट, हसरी, टिपिकल दाक्षिणात्य सुंदर काळेभोर बोलके डोळे आणि दाट कुरळे केस. तशी पहिल्यांदा पाहताना ती सुंदर वगैरे नाही वाटत पण हसली की फार गोड दिसते. नृत्याची आवड आहे तिला. नैपुण्यही आहे त्यात. हसरी, खेळकर फुलपाखरी आयुष्य जगणारी ही मुलगी. बघायला येणारं स्थळही तालेवार असावं. मुलीची आई भरपूर उत्साहानं राबते आहे, गोड आणि तिखट असे भरपूर तळीव पदार्थ (घरातच) बनवते आहे. सुंदर मोठ्ठा "आधुनिक" आणि कलात्मक पद्धतीनं सजवलेला दुमजली बंगला आहे त्यांचा. संपन्नता जाणवते सगळीकडे. वडील गल्फमधे नोकरी करत असल्याचं गप्पांमधून समजतं. नातेवाईक, हास्यविनोद, गप्पा........ छान आनंदाचं वातावरण आहे.
बघण्याचा कार्यक्रम पार पडतोय. दोन्ही बाजूंचे लोक सधन वाटतात आणि खुशीत दिसतायत्. मुलामुलीला एकट्यानं एकमेकांशी काही बोलायचं तर बोला अशी परवानगी देऊनही घरच्या सगळ्यांनी फिल्डींग लावली आहे. अशा परिस्थितीत संकोचल्यामुळे मुलामुलीचा फार संवाद होतच नाही. स्वभाव, विचार-आचार जाणून घेणं वगैरे काही घडताना दिसत नाही. पण दोघंही एकमेकावर अनुरक्त वाटतात.
छान थाटामाटात लग्न होतं. हुंड्यात मिळालेली एक अलिशान कार ही दिसतेय दारात. लाजत मुरडत नव्या नवरीचा कौतुकाचा गृहप्रवेश. प्रेमळ व शांत स्वभावाचे सासूसासरे आणि नवरा. सासरचं घर किती सुंदर!!! वडिलोपार्जित असणार. टुमदार, कौलारू, खूप मोठ्ठं पण जुन्या पद्धतीचं. दोन मजली, मागेपुढे भलं मोठ्ठं अंगण, जुन्या पद्धतीची कडी-कोयंडे असलेली लाकडी दारं, शिसवी लाकडाचं फर्निचर, पितळी मोठी मोठी छान छान भांडी, मागेपुढे भरपूर झाडं. स्वैपाकघर मोठ्ठं, मात्र अंधारं आणि साधं आहे. तिथं माॅड्युलर किचन नाहीये. साधा कडप्याचा ओटा, अॅल्युमिनीयमची भांड्यांची मांडणी, भिंतीवरचं ताटाळं, फळीवरचे डबे. स्वैपाकघरातच अजून एका भिंतीशी अजून एक ओटा आहे आणि त्यावर चक्क एक ढणढणती चूल आहे. वर वखारीची लाकडं रचलेली दिसतात. चुलीवर (केरळमधे) भात शिजवतात ते भाताचं डेचकं. इतर भांडी आणि भात ढवळायचा मोठा डाव. बाकी स्वैपाक गॅसच्या शेगडीवर होतो पण भात मात्र अजूनही चुलीवरच शिजतो. मिक्सर आहे, पण वाटण मात्र पाट्यावरच होताना दिसतं. कायमचा फिक्स केलेला एक मस्त मोठ्ठा पाटा दिसतो.
मुलीच्या संसाराचा पहिला दिवस. नवरा चांगला वाटतो. सासूही प्रेमळ, शांत आणि कामसू आहे. मुलीला हळूहळू रुळूदे. लगेच कुठे कामं सांगायची? सासराही शांत आहे. घरात फारसा बोलतही नाही.
भांडी घासणं, उष्टं खरकटं काढणं, केरवारे, फरशी, अंगण झाडणं, पुसणं , भरपूर भाज्या, निवडणं, चिरणं, फोडणीस टाकणं....मोठ्या अलीशान पाट्यावर भरपूर नारळ वाटणं, चटणी, सांबार बनवणं. मांसाहारी पदार्थ बनवणं. वेळेवर डायनिंग टेबलवर सगळं अन्न मांडणं, गरमागरम सर्व्ह करणं.... विविधरंगी, विविध चवींचा, सुग्रास, तृप्त करणारा स्वैंपाक.. गृहलक्ष्मीनं, अन्नपूर्णेनं घर सांभाळावं, सजवावं, ते उबदार ठेवावं, कुटुंबाला छान खाऊ पिऊ घालून सुखात ठेवावं. जेवताना स्वैपाकाचं आवर्जून कौतुक करणारी घरची माणसं. पुरुषाच्या ह्दयाचा मार्ग पोटातूनच तर जातो ना....ह्या संसारला सुखी संसारच तर म्हणतात ना?
रोज सकाळी बिडाच्या तव्यावरचे गरमागरम डोसे, इडिअप्पम, पुट्टु आणि कडला करी, सांबार, पदार्थाला लाल मिरच्या, उडीद डाळ, भरपूर कढीपत्याची खमंग फोडणी. दुपारच्या जेवणातल्या वेगवेगळ्या भाज्या, भात... हळूहळू डोळ्यातून ती चव आपल्या डोक्यात, मनात, आणि मग जिभेवर उतरायला लागते. चायला, आपण फूड चॅनेल बघतोय का काय असं वाटतं.
घरच्यांच्या आवडीनिवडी आणि चवीढवींचा विचार करत करत रोजचा स्वैपाक करणं, सकाळी दूध येण्यापासून सुरू झालेला दिवस, रात्रीची जेवणं झाली की ओटा टेबल आवरून, भांडी घासून मग श्रांत तनामनानं दिवा बंद करून बिछान्यावर अंग टाकणं ही त्या गृहलक्ष्मीची आनंदाची, सार्थकतेची, तृप्तीची कल्पना. लग्नानंतर सुरुवातीला नवरा व सासरच्यांचं सगळं व्यवस्थित करणा-या ह्या घरोघरीच्या नायिका, नंतर मुलंबाळं, नातवंडं ह्यांच्यासाठी अविरत झिजतच असतात......झिजतच रहातात....मरेपर्यंत. आणि आपण म्हणतो...माझी आई/आजी फार फार प्रेमळ होती. माझ्यासाठी खूप केलं तिनं. तो तिच्यासाठीही सन्मानच असतो.
कथानायिकाही लग्नानंतर सासूच्या बरोबरीनं सर्व जबाबदा-या उचलायचा प्रयत्न करताना दिसते. एक आदर्श सून, बायको बनण्याचा प्रयत्न करताना दिसते. हे सर्व करताना तिला मजा येते आहे, आत्मिक समाधान मिळतं आहे. पण ते निभवताना तिची दमछाक होतेय.
घरातला पुरुषवर्ग शांत, अबोल....पैसे मिळवून आणणं आणि बाहेरची कामं करणं हे पुरुषांचं काम. ते किचनमधे ढवळाढवळ करत नाहीत. आणि अचानक सासूला मुलीच्या बाळंतपणासाठी परदेशी जावं लागतं. आणि संपूर्ण घराची संपूर्ण जबाबदारी सुनेवर धाप्पकन् येऊन पडते. माहेरी
फारशी स्वैपाकघरात न वावरलेली ही मुलगी, पटापट सगळं शिकून अपेक्षांना उतरायच्या प्रतिक्षेत.
सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, भांडी घासणं, केरवारे, अंगणाची झाडलोट, फरश्या पुसणे, जिने पुसणे..... न संपणारी आणि मारूतीच्या शेपटाप्रमाणं सतत वाढत जाणारी कामं आणि अपेक्षा. सास-यांना चुलीवरचाच भात, पाट्यावरची चटणी प्रिय आहे. कुकर, मिक्सरमधे ती चव येत नाहीये. ते प्रेमानं तिला सुचवू पहातात. तीही त्यांच्या मताचा आदर राखते, एक एक दिवस पुढे सरकतो तशी वेगवेगळ्या प्रसंगातून तिला येत जाणारी जाण, येणारा मानसिक आणि शारिरीक थकवा, फ्रस्टेशन्, पुरुषांच्या प्रायोरिटीज, एकत्र कुटुंबपद्धतीतल्या अपेक्षा, रोज येणारी वेगळी वेगळी आव्हानं. त्यावर मात करण्यासाठीची तिची ओढाताण आणि ह्या सगळ्यावर त्यावर तिनं दिलेलं उत्तर....ह्यावर बोलतो हा सिनेमा.
गरमागरम डोसे करून वाढायचे म्हणजे बरोबरीनं ती जेवू नाही शकत बाकीच्यांबरोबर. सगळ्यांचं खाणं झाल्यावर टेबलवर ताटाबाहेर काढून टाकलेल्या शेवग्याच्या शेंगांची सालं आणि इतर खरकटं उचलताना तिला ढवळतं. जेवायला सुरुवात करताना नवरा व सास-यासाठी हिनं सुबकपणे मांडलेलं टेबल आणि आता ती आणि सासू जेवायला बसतानाचं टेबल ह्यात जमीन अस्मानाचं अंतर. सासू सरावलीये. तिला ह्याचं काहीच नाही वाटत. उलट ती नव-याच्या उष्ट्या ताटातच घेते वाढून. मुलीला मात्र हे जड जातंय. हाॅटेलमधे टेबल मॅनर्स पाळणारा नवरा घरात का पाळू शकत नाही? सतत भांडी घासण्याचा आणि उष्ट- खरकटं आवरण्याचा सीन येत रहातो. किती घरांमधे तुंबलेल्या सिंकमधे हात घालायचा प्रसंग घरच्या मुलांवर/ पुरुषांवर येत असेल? दुस-या घरातनं आलेल्या मुलीनं मात्र हे पट्कन् आत्मसात करण्याची अपेक्षा ठेवली जाते.
घरोघरी नव-याच्या हातात डबा, रुमाल, पाकिट, मोबाईल देणा-या बायका आपण पहातोच की. त्यात कुठं काय वावगं वाटतं? नाॅर्मलच तर आहे की हे..
रांधा वाढा उष्टी काढा ह्यात तर मागच्या अनेक पिढ्या संपल्या. ह्यात काय एवढं मोठं? नाॅर्मलच आहे की हे सगळं.. "ह्याच" गृहितकांकडे हा सिनेमा परत एकदा नव्यानं बघायला लावतो. त्या गृहीतकांना मानवतेच्या निकषांवर परत एकदा तपासायला लावतो. मारहाण किंवा शिवीगाळ म्हणजेच काही घरगुती हिंसाचार नाही फक्त. खूप व्यापक आहे ती कल्पना. पिढ्या न् पिढ्यांपासून होत असलेले काही अन्याय आता परंपरेच्या नावानं इतके मान्यताप्राप्त झाले आहेत की मानवतेनच्या दृष्टीकोनातूनही ते दूर करू शकत नाहीये आपण. म्हणून ही अस्वस्थता येते. ही अस्वस्थता कधी जाईल, कशी जाईल ते माहीत नाही पण सिनेमाचा प्रेक्षक आपल्या ताटातलं उष्टं दुस-या कुणाला तरी साफ करायला टाकताना दहा वेळा तरी विचार करून टाकेल हे सुद्धा ह्या सिनेमाचं यशच म्हणावं लागेल.
किती खरं आहे त्यात दाखवलेलं..
किती खरं आहे त्यात दाखवलेलं.....
घरोघरी हेच तर चालतं...कमी अधिक प्रमाणात...
खूप मनातला विषय आहे हा...afterall, स्त्रीचं अख्खं आयुष्य पणाला लागलेलं असतं...
असेच जगायचे...की vegali वाट शोधायची..हा निर्णय योग्य वेळी घेता येणं महत्त्वाच.....
मराठीत हा सिनेमा केला तर
मराठीत हा सिनेमा केला तर रिंकू राजगुरु मस्त करेल
<<
अगदी सेम मी हेच म्हंटलं
तिला बघून पहिल्या फ्रेम पासून रिंकुन्राजगुरु आठवत होती.
बाकी वरचे अनेक पर्सनल अनुभव वाचून, आयॅम ब्लेस्ड टु बॉर्न अँड रेझ्ड इन माय प्रोग्रेसिव फॅमिली असं वाटतं कायम !
अरे खरेतर मला ह्याच गोष्टीचा
अरे खरेतर मला ह्याच गोष्टीचा खूप राग येतो की घरातली पुरुष मंडळी 'हे दे ते दे' का करतात? जरा पाणी दे, कॉफी करून दे, जरा टेबल वरून पेन आणून दे, मोबाईल जरा चार्जे ला लाव. हे फक्त माझ्या घरी आहे का सगळ्यांच्या?>>>>
हे सगळीकडेच आहे. पण हे फक्त स्त्री पुरुष असे मर्यादीत नसून, लहान- मोठे, गरीब- श्रीमंत, बॉस- एम्प्लॉयी वगैरे सगळीकडे तसे आहे. आपल्या पेक्षा लहान, कनिष्ठ जे समजले जातात त्यांना सहजपणे अशी कामे सांगितली जातात.
हो. मला शेवट फार म्हणजे फारच
हो. मला शेवट फार म्हणजे फारच आवडला.
हे कधीही बदलणे शक्य नाही, अशा बकर्या मिळतच रहाणार आणि ही वर्चस्ववादी परंपरा अखंड चालू रहाणार. तुम्हाला आनंदी रहायचं असेल तर ते तुम्ही रहा. उगा सिस्टिम बदलण्याचे अचाट प्रकार करण्यात आपल्या आयुष्याची आहुती वगैरे देत बसू नका.
उगा सिस्टिम बदलण्याचे अचाट
उगा सिस्टिम बदलण्याचे अचाट प्रकार करण्यात आपल्या आयुष्याची आहुती वगैरे देत बसू नका.
<<
+१
वर मैत्रेयीने मेन्शन केलय तसं ‘उष्टं खरकटं लाइफस्टाइल’ किती डिप्रेसिंग , किती भयंकर आहे हे जाणीव करून देण्यासाठी हे सगळे छोटे छोटे प्रसंग आहेत !
खरकटं तुंबत जाणे आणि तिची मनःस्थिती /पेशन्स तुंबत जाणे हे दिग्दर्शकाने फार प्रभावीपणे दाखवलय !
ज्यांना हिन्दु चालीरितींना उगीच टार्गेट केलय असं वाटतय , आता आपल्या देशात सिनेमा बनतोय म्हंटल्यावर मेजॉरीटी हिन्दु चालिरीतींनाच टार्गेट केलं जाणार ना ? उलट या सिनेमात इतके चपखल बसले आहेत ते सगळे धार्मिक थोतांड वाले प्रसंग , अजिबात पॉलिटिक्स घुसावायला हवे म्हणून टाकले नाहीयेत !
इतर देशातले सिनेमे बनतात तिथे त्या त्या धर्मसंस्थेला टार्गेट करतातच !
हे सगळीकडेच आहे. पण हे फक्त
हे सगळीकडेच आहे. पण हे फक्त स्त्री पुरुष असे मर्यादीत नसून, लहान- मोठे, गरीब- श्रीमंत, बॉस- एम्प्लॉयी वगैरे सगळीकडे तसे आहे. आपल्या पेक्षा लहान, कनिष्ठ जे समजले जातात त्यांना सहजपणे अशी कामे सांगितली जातात
>> हे पटले
ते शेवटी ती लहान मुलीला
ते शेवटी ती लहान मुलीला बाहेरून दाराला कडी लावायला सांगते ते काही समजले नाही, कोणीतरी उलगडून सांगा.
अजून काही गोष्टी ज्या notice केल्या.
सासू US मध्ये गेल्यावर साडीतून ड्रेस मध्ये येते ....
लग्न झाल्यावर नवीन जोडपे त्याच्या मित्राकडे tapioca बिर्याणी ( हा प्रकार काय आहे बर बघायला हवा) खाऊन घरी येतं. सासू अजून किचन मधेच भांडी कुंडी करत असते, ही तिला विचारते कि मदतीला येऊ का, सासू म्हणते - नको, जाऊन झोप, काम होतंच आलाय. त्यानंतर ही , सासू खूप वेळ किचन साफ करताना दिसते. थोड्या दिवसांनी तो आगाऊ पाहुणा येतो, आणि त्याची बायको पण हाच प्रश्न विचारते, मदत करू का? खरेतर जवळपास १-२ तासाचे काम बाकी असते, भांड्याचा ढिगारा, सिंक, खरकटे काढणे, गॅस पुसणे, कचरा फेकणे, सगळी टेबल्स पुसणे, केर काढणे, सिंक खाली नवीन लादी पुसणे ठेवणे. पण ही सांगते, नको मदत तू जा झोपायला. दोन प्रसंग, पण मार्मिक दाखवले आहेत.
त्या बाईला पायाला लागलंय असा
त्या बाईला पायाला लागलंय असा संदर्भ आलाय आधी. त्यामुळे बरं वाटलं नसावं. पण तसं नसतं तर मदत हवीच होती तिला.
लहान मुलगी मागील दाराला
लहान मुलगी मागील दाराला बाहेरून कडी घालते. ही सून स्वैपाकघराला बाहेरून कडी घालून बाहेर पडते. म्हणजे ते दोघे आत कोंडले जातात आणि बाहेरच्या मंत्रघोषात त्यांचा आरडाओरडा लवकर कुणाला ऐकू गेला नसणार.
तिला तयार होऊन बाहेर
तिला तयार होऊन बाहेर जाण्यापुरता वेळ हवा असतो.
म्हणून.
हा चित्रपट फायनली युट्युब वर
हा चित्रपट फायनली युट्युब वर फ्री आहे, तो नुकताच पाहिला. अक्षरशः कित्तेक प्रतिकिया आठवल्या मला इकडच्या.
खूप प्रभावी आणि अॅप्ट बनवलाय सिनेमा. एका पुरूषाने बनवलाय त्याला हॅट्स ऑफ!
जेवताना खरकटं ताटा बाहेर न काढता बाजू ला ठेवावं आणि ताट सिंक मधे ठेवताना घन कचरा कचरापेटीत टाकून मग भांडं बेसिन ला धुवायला ठेवावं इतका सेन्स आला तरी खूप झाले..टू बीगीन विथ!
तमिळमधे रिमेक येतोय...सुडल
तमिळमधे रिमेक येतोय...सुडल वेबसीरीज ची नायिका ऐश्वर्या राजेश मुख्य भुमिकेत.. पदार्थ वेगळे असतील इकडं..
याचा हिंदी रिमेक आलाय. Mrs.
याचा हिंदी रिमेक आलाय. Mrs. फेसबुक ट्विटरवर बर्याच तिखट प्रतिक्रिया दिसताहेत. हिंदीत हे अपेक्षितच होतं म्हणावं का?
Mrs movie आल्यापासून social
Mrs movie आल्यापासून social media वर बरीच उलटसुलट चर्चा सुरुये.
ट्रेलर पाहून मी मनात म्हटलं अरे हे काय मायबोलीवर कधीच चर्चून झालंय
उशीर केला ह्यांनी
कोणी बघितला का तो? मला कंटाळा
कोणी बघितला का तो? मला कंटाळा आला आणि बंद केला. मल्याळमची सरच न्हवती.
मल्याळमची सरच न्हवती.>>+१००
मल्याळमची सरच न्हवती.>>+१००
मल्याळम मधे असलेलं कुटुंब पारंपरिक, जुन्या मतांच होतं हे सहज मान्य करता येत होतं. पण mrs मधे डॉक्टर कुटुंबात एकही मदतनीस नाही..., गळक्या सिंक कडे कुणी लक्ष देणार नाही... हे समजून घेणं अवघड आहे.
मल्याळम नंतर तमिळ पण येऊन
मल्याळम नंतर तमिळ पण येऊन गेला.
उलट नॉर्थ मधे स्त्री ला अजून
उलट नॉर्थ मधे स्त्री ला अजून च तूच्छ लेखतात. प्रकांडपंडीत लोक डोळ्यांवर कातडं ओढून असतात.
हिंदी थ्रू का होइना अनेक लोकांपर्यंत ही जागरूकता पोहोचतेय हे पण महत्वाचे आहे. ते काम चित्रपटाने चांगले केलेय..
सान्या गुणी नटी आहे.
मी सिनेमा पाहिला नाही. पण
मी सिनेमा पाहिला नाही. पण ट्रेलर आणि रील्स पाहून सगळ्यात जास्त चीडचीड झाली ती कंवलजीतच character पाहून. एकंदरीत त्याचा अवतार , सतत कावलेले अलिप्त भाव एकदम भारी. मस्त बेअरींग पकडलय
मल्याळम चित्रपट एवढा जबरदस्त
छान लिहिलेय धाग्यात आणि प्रतिसादही छान लिहिलेत.
मुळात मल्याळम चित्रपट एवढा जबरदस्त पोचला असताना हिंदीतून काढायची काय गरज नव्हती चित्रपट तितका प्रभावी वाटत नाही अश्या काहींच्या सोशलमीडिया वर प्रतिक्रिया आहेत पण उलट या चित्रपटाचे रिमेक सगळ्या भाषेतून व्हावेत अगदी मराठीतूनही असंच मला वाटतं ,जेणेकरून चित्रपटाचा विषय आणि त्याची गंभीरता लोकांपर्यंत पोचावी विशेषतः स्त्रियांच्या ,कारण अजूनही काही स्त्रियांना वाटतं ,काय होतंय त्याच्यात ,थोडाफार ऍडजस्ट करावंच लागतं ,राबलो कुटूंबासाठी तर काय होतंय ,ते अगदी स्वत्व विसरण्यापासून ते स्वताची स्वप्न ओळख धुळीला मिळताना हतबलतेने पाहात राहण्यातही जेव्हा काही वाटेनासे होते तेव्हा अश्या चित्रपटांची फार गरज आहे असे वाटते .भाषेची मर्यादा असूनही द ग्रेट इंडियन किचन अतिशय प्रभावीपणे पोचतो त्याचप्रमाणे हिंदीत उलट भाषा ओळखीची असल्यामुळे आणखी जास्त समजायला सोपा जातो उत्तरेकडील राज्यांची स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी पाहता या चित्रपटाची गरज जास्तच आहे .कथा तीच आहे थोडाफार संस्कृती पद्धतींचा फरक सोडला तर चित्रपट सेमच आहे .पण सान्या मल्होत्रा ने फार छान काम केलंय .फार गुणी अभिनेत्री आहे .तिनेही मानसिक कुचंबणा त्यातून येणारी निराश भावना चढत जाणारी आणि आतून धुमसणारी आणि शेवटच्या क्षणाला भावनिक स्फोट होऊन त्यातून बाहेर पडणारी रितू छान साकारली आहे .हेडफोन लावून जेवण करतानाचा सीन तर मलाही रिलेट झाला कारण मी पण जेवण करताना आणि भांडी घासताना हेडफोन्स लावते फक्त यावरून मी आमच्या घरात वाद घालते इतकंच
विशेष नमूद करण्यासारखा सीन म्हणजे जेव्हा ती नोकरी (डान्स शिकवण्या साठी)करण्यासाठी बाहेर जात असते तेव्हा तिला सासरे काय गरज नाही व चिडक्या चेहर्याने परंतु शांतपणे हे कसं गरजेचं नाही हे बोलतात .हे सर्वात डेंजर .म्हणजे कुठलाही आरडा ओरडा नाही की रागावणं नाही फक्त समोरच्या व्यक्तीला पटवून देनं की हे तू जे करतोय ते चुकीचं आहे किंवा गरजेचं नाहीये.हल्लीच MTG (manipulative/ toxic/ gaslighter) चा धागा आलाय त्यातल्या मेनीपुलॅटिव्ह ,टॉक्सिक ,नारसिस्ट लोकं थोडक्यात आतल्या गाठीच्या लोकांचं उत्तम उदाहरण म्हणजे कवलजीत यांनी साकारलेले सासरे ,त्यासीन मधेही ती त्यांचं बोलणं संपल्यावर थांबून राहते काय करू यासाठीच्या उत्तरासाठी, तर ते शांतपणे निघून जातात ह्यावरूनच त्यांना तिला हे पटलेले आहे त्यांनी गृहीत धरलेय हेही समजते. अश्या कॅरेक्टर चा राग येणार नाही तर मग काय . शेवटचा सीन जो ती घरी जाते भावाविषयी त्यालाही काम करू दे हे आईवर ओरडून बोलण्याचा प्रसंगही प्रभावी झालाय. शेवटचं गाणं मात्र अजून छान लिहिता करता आलं असतं .लक्षातही राहत नाही व तितकं खास नाही .तरीही हा चित्रपट एकदा तरी पाहावा असा आहे.
मराठीतून जर का चित्रपट निघाला तर हिरोईन म्हणून रिंकू राजगुरू लाच घ्यावं. ती चांगल्या प्रकारे न्याय देईल अश्या रोलला .
मल्याळम मधे असलेलं कुटुंब
मल्याळम मधे असलेलं कुटुंब पारंपरिक, जुन्या मतांच होतं हे सहज मान्य करता येत होतं. पण mrs मधे डॉक्टर कुटुंबात एकही मदतनीस नाही... >>>> मदतनीस नाही म्हणजे त्यांच्याकडे त्यांच्या ऑर्थोडोक्स वागण्यामुळेच कामवाली टिकत नसते हे बोलताना एकीला दाखवलंय.
आणि डॉकटर सुशिक्षित अशिक्षित असं काही नसतं मी अश्या अनेक सुशिक्षित आणि श्रीमंत लोकांना अडाण्यांच्या वरताण चालीरीती शिवाशिव आणि ऑर्थोडोक्स गिरी करताना पाहिलं आहे
अगदी सुशिक्षित इंजिनियर शिक्षक कुटूंबात वंशाला दिवा हवा ह्या हव्यासापोटी दोन मुलींवर तिसरा मुलगा जन्माला घालताना पाहिलाय .
सुशिक्षित लोक सुसंस्कारी
सुशिक्षित लोक सुसंस्कारी असतातच असे काही नाही, शिक्षण आणि विचारांनी पुढारलेले असणे या २ गोष्टींचा काहीही संबंध नाही.
तलगु लोकांमधे उलट आजही जितका मुलगा उच्चशिक्षित तितका त्याला हुंडा जास्तं मिळतो.
त्यामुळे डॉक्टर कुटुंबीय म्हणून पुढारलेले असतील असे वाटत असतील तर गैरसमज आहे, शेल मधून बाहेर या.
कितीतरी नॉर्थिंडियन घरात आजही आपल्या आज्जीच्या काळातली मेन्टॅलिटी अनुनही दिसते, आमच्या ओळखीच्या नॉर्थ इंडियन काकू दुसर्यांकडे आल्या तरीही किचनमधे स्वतःच्या हाताने बनवून खातात, अजुनही कोणाच्या हातचे खात नाहीत, मराठी लोकां मधे माझ्या ओळखीत अशा फॅमिलीज पाहिल्या नाहीत पण या धाग्यावरची सुरवातीची चर्चा वाचून आपल्याकडेही अशी कुटुंबं आहेत हे वाचलच आहे !
मिसेस चांगला प्रयत्नं आहे रिमेकचा.. पॅसिव्ह अॅग्रेसिव टॉर्च्॑र हे जास्तं डेंजरस आहे, समाजात हे लोक प्रतिष्ठित , मृदुभाषी असतात , कवलजीतने मस्तं केलय काम, सानियाने पण , छोट्या रोल मधे वरुण बडोदराने परफेक्ट चिड आणणारा एम्सीपी साकारलाय.
तर या रिमेकच्या निमित्तने सगळ्या भाषेतल्या बायका निदान चर्चा तरी करतायेत !
ओजि मल्याळी सिनेमात जास्तं इन्टेन्स दाखवला होता इश्यु, साबरीमाला वगैरे एकदम अॅप होते .
इथेही करवाचौथ फेस्टिवल तसा बरोबर फिट होतो तिच्या फ्रस्टेशन मधे !
वरुण बडोदराने परफेक्ट चिड
वरुण बडोदराने परफेक्ट चिड आणणारा एम्सीपी साकारलाय.>>> हो जाताना तिने त्या शिकंजिवाल्याला थोडं तरी बदडून जावं असंही वाटतं.
दीपांजलीच्या वाक्यावाक्याशी
दीपांजलीच्या वाक्यावाक्याशी सहमत.
तुम्ही डॉक्टरची बायको म्हणताय.. ती स्वतः डॉक्टर नसते.
नवरा बायको दोघेही डॉक्टर असूनही त्यातील बायकोला लग्नानंतर कोणकोणते छळ सोसावे लागले हे मी स्वतःच्या डोळ्यांनी जवळून पाहिलेले आहे एक नाही तीन तीन मराठी कुटुंबात. यातल्या तिघींपैकी दोघींचे आईवडील इतर कशाही बाबतीत सपोर्ट खूप करतात पण "आम्ही तुझ्या सासरच्या मॅटर मध्ये पडणार नाही आणि तुला घटस्फोटही घेऊ देणार नाही" यावर ठाम आहेत.
शेल मधून बाहेर या +१२३
हल्लीच MTG (manipulative/
हल्लीच MTG (manipulative/ toxic/ gaslighter) चा धागा आलाय>>> मायबोली वर आहे का? लिंक प्लीज
यातल्या तिघींपैकी दोघींचे
यातल्या तिघींपैकी दोघींचे आईवडील इतर कशाही बाबतीत सपोर्ट खूप करतात पण "आम्ही तुझ्या सासरच्या मॅटर मध्ये पडणार नाही आणि तुला घटस्फोटही घेऊ देणार नाही" यावर ठाम आहेत. >>>>>>>
सिरियसली???? काय उपयोग या बायांच्या शिक्षणाचा? अडाणी बाया दुसरा मार्ग नाही म्हणुन सहनशील बनतात,शिकलेल्या बायका सपोर्ट नाही म्हणुन सहनशील बनतात.
स्वतः आर्थिकदृष्ट्या सबला असुनही त्रास सहन करत राहायचा, मुलांसाठी घरासाठी म्हणुन मुग गिळुन गप्प बसायचे आता तरी बंद करावे बायांनी. आधी स्वतःसाठी जगायला सुरवात करा. मुले, आईबाप सगळे आपल्या जागी महत्वाचे आहेत पण आपण खंबीर तर जग भले.
MTGhttps://www.maayboli.com
धोकेदायक MTG त्रिकुट
https://www.maayboli.com/node/86310
Pages