द ग्रेट इंडिअन किचन

Submitted by मेधावि on 1 February, 2021 - 07:00

गेल्या दहा दिवसांत तीन सिनेमे पाहीले.
1. इज लव्ह इनफ ? "सर"
2. द लास्ट कलर
3. द ग्रेट इंडिअन किचन.

पहिले दोन सिनेमे आवडले ...

तिसरा सिनेमा.. (Neestream -मल्याळी भाषेतला इंग्रजी सबटायटल्सवाला) पाहून मात्र त्रास झाला. एक सण्णसणीत मुस्काटात बसली. हा चित्रपट संपत नाही. तो मानगुटीवर बसतो आणि छळतो. "अगदी फ्रंट ऑफ द माईंड" छळत रहातो. स्वैपाकघर आणि स्वैपाक ह्या विषयातले बारीक सारीक तपशील टिपून त्यावर एका पुरुषानं हा सिनेमा बनवलाय,त्याला साष्टांग प्रणाम.

Spoiler alert - ज्यांना पहिल्या  धारेचा सिनेमा बघायचाय त्यांनी इथून पुढे वाचू नये. पण लवकर बघा...

(एक डिस्क्लेमर - मी अजिबातच स्त्रीवादी नाही. स्वतः राबून घर सजवणं, स्वच्छ आणि सुंदर ठेवणं, छान छान पदार्थ बनवून दुस-याला खाऊ घालणं हे मला आवडतं. मी माझ्या आवडीसाठी ते करते, तरीसुद्धा सिनेमा पाहून मी गोंधळले आणि भांबावले आहे)

लास्ट अॅलर्ट!!!
ह्यापुढचं लेखन प्रचंड उत्कट असेल. ते कदाचित  असंबंद्धही होईल, पण विचारांचं घोंघावीकरण न थोपवता आणि त्याचं अजिबात सुबकीकरण न करता ते जसे येतील तसे ते इथे येतील.

एखाद्या व्यक्तीला कोणी सपासप आसूडाचे फटके मारत असेल तर त्याच्या वेदना पाहून बघणाराही कळवळतो.  पण ती व्यक्ती जर खूषीत ते फटके खात असेल तर? .... आनंदानं हे फटके खाणं म्हणजेच आपल्या आयुष्याची सार्थकता, कृतार्थता, परीपूर्णता असं तिला आणि तिच्या सर्व जिवलगांना वाटत असेल तर ?

आणि....... मीही त्यातलीच एक असेन तर?????
मीच काय,  निरक्षर ते डाॅक्टरेटपर्यंत शिकलेल्या, गरीब ते गडगंज श्रीमंतीत लोळणा-या माझ्या परिचयायल्या सर्वच्या सर्व  स्त्रिया दिसतायत् मला आत्ता डोळ्यापुढे. हे सगळं आमच्या, आपल्या  हाडीमाशी इतकं रुजलंय आणि तुम्ही आम्ही सर्वांनी ह्या प्रचंड प्रचंड भीषण वर्णव्यवस्थेला किती सहजपणे आत्मसात केलंय...आणि आणि "आज" एक पुरुष बोलतोय त्यावर..हॅट्स ऑफ टू हिम.

हा सिनेमा  पितृसत्ताक पद्धतीतल्या "स्त्री" ह्या सो काॅल्ड  "देवीच्या" कर्तव्यांवर, तिच्या अधिकारांवर, सुखी आणि संपन्न आयुष्याच्या  परंपरेनं रुजवलेल्या कल्पनांवर, व्याख्यांवर आणि "घरगुती हिंसाचाराच्या प्रकारांवर बोलतो. चित्रपट पहाताना एकापाठोपाठ एक एक सण्णसणीत कोरडे बसत रहातात अंगावर खण्णं..खण्णं..खण्णं करत  !!!!   पण तो थांबत नाही, वेगवान बनतो आणि बोलतच रहातो, बोलतच रहातो. मी ..पहातच रहाते....कण न् कण् एका क्षणी  "पेटत" असतो आणि पुढल्या क्षणी "विझत" असतो. एक मोठ्ठी  हतबलता साचून रहाते. हे सगळं बदलण्यासाठी आपण फार फार दुबळे आहोत असं वाटतं.  पटो...न...पटो.... मी तीच वाट पुढे चालणार असते.

हा चित्रपट फार महत्वाचा आहे. पहायलाच हवा असा.  रोजच्या जगण्यातल्या ब-याच बेसिक गोष्टींचं भान देतो तो. मानवता शिकवतो. आपल्या मायेच्या माणसांच्या आणि प्रेमाच्या कल्पना, जेवणाचे, वागण्याचे  मॅनर्स, म्हातारपणापर्यंत बाळगलेल्या आणि  कौतुकानं जोपासलेल्या  नाठाळ आणि त्रासदायक सवयी आणी चवी-ढवी ह्या सगळ्यावर प्रश्न उभे करतो.

चित्रपटाची सुरुवात.. , केरळमधल्या एका गावात एक लग्न ठरतंय. मुलगी काळीसावळी, स्मार्ट, हसरी, टिपिकल दाक्षिणात्य सुंदर काळेभोर बोलके डोळे आणि दाट कुरळे केस. तशी पहिल्यांदा पाहताना ती सुंदर वगैरे नाही वाटत पण हसली की फार गोड दिसते. नृत्याची आवड आहे तिला. नैपुण्यही आहे त्यात. हसरी, खेळकर फुलपाखरी आयुष्य जगणारी ही मुलगी.  बघायला येणारं स्थळही  तालेवार असावं. मुलीची आई भरपूर उत्साहानं राबते आहे, गोड आणि तिखट असे भरपूर तळीव पदार्थ (घरातच) बनवते आहे. सुंदर मोठ्ठा "आधुनिक" आणि कलात्मक पद्धतीनं सजवलेला दुमजली बंगला आहे त्यांचा. संपन्नता जाणवते सगळीकडे. वडील गल्फमधे नोकरी करत असल्याचं गप्पांमधून समजतं.  नातेवाईक, हास्यविनोद, गप्पा........ छान आनंदाचं वातावरण आहे.

बघण्याचा कार्यक्रम पार पडतोय. दोन्ही बाजूंचे लोक सधन वाटतात आणि खुशीत दिसतायत्. मुलामुलीला एकट्यानं एकमेकांशी काही बोलायचं तर बोला अशी परवानगी देऊनही  घरच्या सगळ्यांनी फिल्डींग लावली आहे. अशा परिस्थितीत संकोचल्यामुळे मुलामुलीचा फार संवाद होतच नाही. स्वभाव, विचार-आचार जाणून घेणं वगैरे काही घडताना दिसत नाही. पण दोघंही एकमेकावर अनुरक्त वाटतात. 

छान थाटामाटात लग्न होतं. हुंड्यात मिळालेली एक अलिशान कार ही दिसतेय दारात.  लाजत मुरडत नव्या नवरीचा कौतुकाचा गृहप्रवेश. प्रेमळ व शांत स्वभावाचे सासूसासरे आणि नवरा.  सासरचं घर किती सुंदर!!! वडिलोपार्जित असणार. टुमदार, कौलारू, खूप मोठ्ठं पण जुन्या पद्धतीचं.  दोन मजली, मागेपुढे भलं मोठ्ठं अंगण, जुन्या पद्धतीची कडी-कोयंडे असलेली लाकडी दारं,  शिसवी लाकडाचं फर्निचर, पितळी मोठी मोठी छान छान भांडी, मागेपुढे भरपूर झाडं. स्वैपाकघर  मोठ्ठं, मात्र अंधारं आणि साधं आहे. तिथं माॅड्युलर किचन नाहीये. साधा कडप्याचा ओटा, अॅल्युमिनीयमची भांड्यांची मांडणी, भिंतीवरचं ताटाळं, फळीवरचे डबे. स्वैपाकघरातच अजून एका भिंतीशी अजून एक ओटा आहे आणि त्यावर चक्क एक ढणढणती चूल आहे. वर वखारीची लाकडं रचलेली दिसतात.  चुलीवर (केरळमधे) भात शिजवतात ते भाताचं डेचकं. इतर भांडी आणि भात ढवळायचा मोठा डाव. बाकी स्वैपाक गॅसच्या शेगडीवर होतो पण भात मात्र अजूनही चुलीवरच शिजतो. मिक्सर आहे, पण वाटण मात्र पाट्यावरच होताना दिसतं. कायमचा फिक्स केलेला एक मस्त मोठ्ठा पाटा दिसतो.

मुलीच्या संसाराचा पहिला दिवस. नवरा चांगला वाटतो. सासूही प्रेमळ, शांत आणि कामसू आहे. मुलीला हळूहळू रुळूदे. लगेच कुठे कामं सांगायची? सासराही शांत आहे. घरात फारसा बोलतही नाही.

भांडी घासणं, उष्टं खरकटं काढणं, केरवारे, फरशी, अंगण झाडणं, पुसणं , भरपूर भाज्या, निवडणं, चिरणं, फोडणीस टाकणं....मोठ्या अलीशान पाट्यावर भरपूर नारळ वाटणं, चटणी, सांबार बनवणं. मांसाहारी पदार्थ बनवणं. वेळेवर डायनिंग टेबलवर सगळं अन्न मांडणं, गरमागरम सर्व्ह करणं.... विविधरंगी, विविध चवींचा, सुग्रास, तृप्त करणारा स्वैंपाक.. गृहलक्ष्मीनं, अन्नपूर्णेनं घर सांभाळावं, सजवावं, ते उबदार ठेवावं, कुटुंबाला छान खाऊ पिऊ घालून सुखात ठेवावं.  जेवताना स्वैपाकाचं आवर्जून कौतुक करणारी घरची माणसं.  पुरुषाच्या ह्दयाचा मार्ग पोटातूनच तर जातो ना....ह्या संसारला सुखी संसारच तर  म्हणतात ना?  

रोज सकाळी बिडाच्या तव्यावरचे गरमागरम डोसे, इडिअप्पम, पुट्टु आणि कडला करी, सांबार, पदार्थाला लाल मिरच्या, उडीद डाळ, भरपूर कढीपत्याची खमंग फोडणी. दुपारच्या जेवणातल्या वेगवेगळ्या भाज्या, भात... हळूहळू डोळ्यातून  ती चव आपल्या डोक्यात, मनात, आणि मग जिभेवर उतरायला लागते. चायला, आपण फूड चॅनेल बघतोय का काय असं वाटतं.

घरच्यांच्या आवडीनिवडी आणि चवीढवींचा विचार करत करत रोजचा स्वैपाक करणं, सकाळी दूध येण्यापासून सुरू झालेला दिवस, रात्रीची जेवणं झाली की ओटा टेबल आवरून, भांडी घासून मग श्रांत तनामनानं दिवा बंद करून बिछान्यावर अंग टाकणं ही त्या गृहलक्ष्मीची आनंदाची, सार्थकतेची, तृप्तीची कल्पना. लग्नानंतर सुरुवातीला  नवरा व सासरच्यांचं सगळं व्यवस्थित करणा-या ह्या घरोघरीच्या नायिका, नंतर मुलंबाळं, नातवंडं ह्यांच्यासाठी अविरत झिजतच असतात......झिजतच रहातात....मरेपर्यंत. आणि आपण म्हणतो...माझी आई/आजी फार फार प्रेमळ होती. माझ्यासाठी खूप केलं तिनं. तो तिच्यासाठीही सन्मानच असतो.

कथानायिकाही लग्नानंतर सासूच्या बरोबरीनं  सर्व जबाबदा-या उचलायचा प्रयत्न करताना दिसते.  एक आदर्श सून, बायको बनण्याचा प्रयत्न करताना दिसते.  हे सर्व करताना तिला मजा येते आहे, आत्मिक समाधान मिळतं आहे. पण ते निभवताना तिची दमछाक होतेय.

घरातला पुरुषवर्ग शांत, अबोल....पैसे मिळवून आणणं आणि बाहेरची कामं करणं हे पुरुषांचं काम. ते किचनमधे ढवळाढवळ करत नाहीत. आणि अचानक सासूला मुलीच्या बाळंतपणासाठी परदेशी जावं लागतं. आणि संपूर्ण घराची संपूर्ण जबाबदारी सुनेवर धाप्पकन् येऊन पडते.  माहेरी
फारशी स्वैपाकघरात न  वावरलेली ही मुलगी, पटापट सगळं शिकून अपेक्षांना उतरायच्या प्रतिक्षेत.

सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, भांडी घासणं, केरवारे, अंगणाची झाडलोट, फरश्या पुसणे, जिने पुसणे..... न संपणारी आणि मारूतीच्या शेपटाप्रमाणं सतत वाढत जाणारी कामं आणि अपेक्षा. सास-यांना चुलीवरचाच भात, पाट्यावरची चटणी प्रिय आहे. कुकर, मिक्सरमधे ती चव येत नाहीये. ते प्रेमानं तिला सुचवू पहातात. तीही त्यांच्या मताचा आदर राखते, एक एक दिवस पुढे सरकतो तशी वेगवेगळ्या प्रसंगातून तिला येत जाणारी जाण, येणारा मानसिक आणि शारिरीक थकवा,  फ्रस्टेशन्, पुरुषांच्या प्रायोरिटीज,  एकत्र कुटुंबपद्धतीतल्या अपेक्षा, रोज येणारी वेगळी वेगळी आव्हानं. त्यावर मात करण्यासाठीची तिची ओढाताण आणि ह्या सगळ्यावर त्यावर तिनं दिलेलं उत्तर....ह्यावर बोलतो हा सिनेमा.

गरमागरम डोसे करून वाढायचे म्हणजे बरोबरीनं ती जेवू नाही शकत बाकीच्यांबरोबर. सगळ्यांचं खाणं झाल्यावर टेबलवर ताटाबाहेर काढून टाकलेल्या शेवग्याच्या शेंगांची सालं आणि इतर खरकटं  उचलताना तिला ढवळतं. जेवायला सुरुवात करताना नवरा व सास-यासाठी हिनं सुबकपणे मांडलेलं टेबल आणि आता ती आणि सासू जेवायला बसतानाचं टेबल ह्यात जमीन अस्मानाचं अंतर. सासू सरावलीये. तिला ह्याचं काहीच नाही वाटत. उलट ती नव-याच्या उष्ट्या ताटातच घेते वाढून. मुलीला मात्र हे जड जातंय. हाॅटेलमधे टेबल मॅनर्स पाळणारा नवरा घरात का पाळू शकत नाही? सतत भांडी घासण्याचा आणि उष्ट- खरकटं आवरण्याचा सीन येत रहातो. किती घरांमधे तुंबलेल्या सिंकमधे हात घालायचा प्रसंग घरच्या मुलांवर/ पुरुषांवर  येत असेल? दुस-या घरातनं आलेल्या मुलीनं मात्र हे पट्कन् आत्मसात करण्याची अपेक्षा ठेवली जाते.

घरोघरी नव-याच्या हातात डबा, रुमाल, पाकिट, मोबाईल देणा-या बायका आपण पहातोच की. त्यात कुठं काय वावगं वाटतं? नाॅर्मलच तर आहे की हे..
रांधा वाढा उष्टी काढा ह्यात तर मागच्या अनेक पिढ्या संपल्या. ह्यात काय एवढं मोठं? नाॅर्मलच आहे की हे सगळं..  "ह्याच" गृहितकांकडे हा सिनेमा परत एकदा नव्यानं बघायला लावतो. त्या गृहीतकांना मानवतेच्या निकषांवर परत एकदा तपासायला लावतो. मारहाण किंवा  शिवीगाळ म्हणजेच काही घरगुती हिंसाचार नाही फक्त. खूप व्यापक आहे ती कल्पना. पिढ्या न् पिढ्यांपासून होत असलेले काही अन्याय आता परंपरेच्या नावानं इतके मान्यताप्राप्त झाले आहेत की  मानवतेनच्या  दृष्टीकोनातूनही ते दूर करू शकत नाहीये आपण. म्हणून ही अस्वस्थता येते. ही अस्वस्थता कधी जाईल, कशी जाईल ते माहीत नाही पण  सिनेमाचा प्रेक्षक आपल्या ताटातलं उष्टं दुस-या कुणाला तरी साफ करायला टाकताना  दहा वेळा तरी विचार करून टाकेल  हे सुद्धा ह्या सिनेमाचं यशच म्हणावं लागेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

भारतात पुरुषांचे वर्चस्व असते बहुतेक घरात. >>> ते कोणी नाकारले आहे? मी तपशीलांबद्दल बोलतोय. तुमच्या बाकी उत्तराबद्दल you are preaching to the choir इतकेच म्हणतो.

माझ्या घरात व्हायचं, माझी सासू द्यायची बूट आणून >> धन्यवाद. हेच विचारत होतो. मी माझ्या आजूबाजूला ते पाहिले नव्हते. पण संत्र्यांचे उदाहरण ऐकल्यापासून असले प्रकार होत असतील यात शंका नव्हती.

मिठाचा किस्सा अफाट आहे Happy

मला त्यांचा मलबार पराठा आणि वेज कुर्मा प्रचंड आवडतो. मी एकदा पद्मनाभस्वामी टेंपलमधे गेले होते. धा वर्षापुर्वी त्येन्व्हा घेतलेले मसाल्ये अजून आहेत माझ्याकडे इतके घमघमतात!!! अहाहा! मी फार मसालेदार खात न्हाही पण अधनमधन वापरते. सगळ सामान की एक एक किलो आणलं होत. अर्धही अजून संपलेलं न्हाही. इतके वर्ष किडबिड काहीही लागलेली नाही. उलट कपाटात लवंगा ठेवल्यामुळे किटकुल शिरतचं नाही किचनमधे माझ्या.

वावे, अनु +१
फा, पुणे हे नाही म्हटलं तरी शहराच्या जवळपास मोडत असेल ना? तिकडे बुरसटलेल्या - गावंढळ चालीरिती आणि परंपरा आहेत यात दुमत नाहीच पण तरी बाहेरुन आलेल्या माणसांनी आणलेल्या बदलांना कॉपी करायच्या हेतूने का असेना पुणं बदलतंय. कुणीसं म्हटलंय ना, आमच्या पुण्यात जुन्या नव्याचं चांगलं मिश्रण आहे. जुनी संस्कृती नव्या संस्कृतीत मिसळली पाहिजे ना! Wink

पण मला काय वाटतं हे सगळं नंतर सुरू झाले..ती डे वन पासून अजिबात इंटरेस्टेड वाटली नाही स्वंयपाक करायला..

Submitted by mrunali.samad on 20 April, 2021 - 21:09>>
बायकोने 'डे वनपासून स्वयंपाक करायला इंटरेस्टेड' असलं पाहिजे अशी अपेक्षा आहे? स्वयंपाक करण्याची नोकरी धरली आहे का तिने? आणि नवऱ्याने डे वनपासून कशात इंटरेस्टेड असलं पाहिजे ?
(तरीही, ती सासूला स्वयंपाकघरात मनापासून मदत करताना दाखवलेली मला तरी दिसली. )

मृणाली, तुझा प्रतिसाद उपहासात्मक असेल तर उपहास न कळल्याबद्दल क्षमस्व.

घाणेरडे किचन ठेवते??? ती रोज रात्री सगळं कीचन घासुन पुसुन स्वच्छ करते, केर काढते. सकाळ दुपार रात्री सगळं जेवणाचं पान भरेल इतका विविध प्रकारचा स्वयंपाक केला की किती कचरा होतो आणि हे काम किती रिपीटेटिव्ह, कंटाळवाणे, आणि मेहेनतीचे आहे! ड्रेनेज पाईप गळका निघाला यात तिची काय चूक? बाकी दिवसभर जिने पुसणे, सासर्‍याच्या चड्ड्या हाताने धुणे, पाट्यावर चटणी वाटणे, चुल पेटवुन त्याचा धुर छातीत भरत भात करणे ही थँकलेस कामं आहेतच.
रात्री सगळा कचरा एकटीने स्वच्छ केल्याशिवाय झोपत नाही, हाताला वास येतोय, अंगाला वास येतोय ...म्हणून आंघोळ करायची सोय नाही. लगेच नवर्‍याबरोबर बेड शेअर करायचं काम आहे!

मलाही तो पाणी फेकून मारण्याचा सीन बटबटीत वाटला.तिच्या उद्रेकाचा स्फोट दाखवला गेलाय कबूल .तरीही.

शुजिता म्हणतेय ते काही खोटे नाही. माझ्या आत्याने नवर्‍याला, दाढीसाठी पाणी आणि शेव्हिंग कीट आणून डायनिंग टेबलवर दिलेले पाहिले आहे.त्याहीवर कडी म्हणजे आतोबा दाढी करून नंतर सरळ आंघोळीला गेले.हिने बाकीचे सारे पाणी वगैरे निस्तरले.मला खूप विचित्र/किळसवाणे वाटले होते.माझे वय फक्त ९-१० एवढेच होते.असले काही आमच्या घरात कधी पाहिले नव्हते.

माझ्याही सासूने नवर्‍याचे पान (जेवणासाठी) घेणार का म्हणून विचारले होते.असं कधी पाहिले/ ऐकले नव्हते(कादंबर्‍या सोडून) .त्यामुळे ई मी नाही घेणार म्हणून तटकन सांगितले होते.बर्‍याचदा बायकाच घालीन लोटांगण करतात आणि 'माझ्याशिवाय कसं घरच्यांचे अडते" या काल्पनिक बबलमधे रहातात.

अमितव
सहमत अगदी.

जसं तिने ते गटारी पाणी सासर्‍या नवर्‍याला प्यायला देणं हे ओव्हर रिअ‍ॅक्शन आहे तसंच नवर्‍याने खरकट्याचा विषय एकदा निघाल्यावर प्रत्येक विषय त्याच्याशी जोडून 'तुला वेस्ट शी फारच प्रोब्लेम दिसतोय' वगैरे टोमणे मारुन प्लंबर च्या कामाचे साधे हो न म्हणता, किमान तिला 'हा या एरियातला अमुक नंबर' इतकेही न सांगता निघून जाणं पण ओव्हर रिअ‍ॅक्शन आहे. म्हणजे थोडक्यात रात्री साठी बायको एक रिसोर्स. या रिसोर्स ला दिवसा काही काम नाही म्हणून स्वयंपाक आणी साफसफाई चे आयते काम. बाकी गोष्टीत तिने एक शब्दही जास्त काढला की लगेच पूर्ण कोरडी वागणूक.

सासर्‍याने ' घरातल्या स्त्री ने घरी असणं हे सर्वात ऑस्पिशियस काम' असं सांगून तिला मख्खपणे रोज आपल्या चड्ड्या धुवू देणं हेही बटबटीतच.
(आमचं घर तसं अगदी ट्रेडिशनल वगैरे अजिबात नाही, पण तरीही सुरुवातीला घडलेले काही प्रसंग आठवले. आणि हे पटलं की खेडेगावात हे बदलणं, लोकांच्या इगोवर पाय न देता आपलं म्हणणं पटवणं खूपच कठीण असेल.अनेक बायकांच्या यात आहुती पडल्या असतील. अनेकींनी सून आल्यावर सुनेला वाईट वागवून आपली पॉवर प्ले ची भूक पूर्ण केली असेल.)

खेडेगावात हे बदलणं, लोकांच्या इगोवर पाय न देता आपलं म्हणणं पटवणं खूपच कठीण असेल..>>>>>

अनु, अग खेडेगावातच काय, शहरातही उच्चशिक्षित घरी होतं हे. मुख्य म्हणजे मुलगी घरी आली की ती कामाला वाघ, दिसायला देखणी, शिकलेली अशा कित्येक अपेक्षा असतात. मुलीला मात्र सासरच्यांकडून काही अपेक्षा करायची सोय नाही. केल्या की लगेच ती वाईट... जाऊ दे. विषय सिनेमाचा आहे. भरकटेल उगाच Happy

आपल्या भारतात किती पुरुष स्वत:च्या हातानी वाढून घेतात? किती ताट उचलून सिंक मधे ठेवतात? किती पुरुष बायकोला जेवायला वाढतात? तिचे ताट धुतात? तिचे कपडे वाळवत घालतात? खरचं असं उलट होताना कधी बरे पहायला मिळेल? !!!>>>>>>>>

शुजिता, अशीही घरं आहेत. माझ्या सासरी पुरुष सगळ्या कामात मदत करतात बायकांना. हे सगळं घराघरावर नि संगोपनावर अवलंबून असतं बरंचसं.

माझ्या भावाला देतो आम्ही संत्री सोलून. त्याला खायला बरोबर दिलं असेल तर तो विसरतो की काय माहिती नाही पण ते बॅगेतच सडून जातं. घरी पण त्याला स्वयंपाक या विषयी काहीही प्रशिक्षण नाही. घरी असताना संत्री सोलून देणे हे लाड. जेवायला वाढून द्यायला आम्ही उठलो की तो म्हणतो कशाला उठता, मी घेतो पण समोर असलेल्या चार पैकी तीनच पदार्थ तो घेईल, एक पदार्थ घेणारच नाही कारण त्याला तो दिसणारच नाही, वरण भातावर तूप घेणारच नाही, अशी काहीतरी धांदल उडते म्हणून आम्हीच वाढतो त्याला. केलेलं सगळं त्याला मिळावं म्हणून. बाकी बेसिनचं पाणी खालून बाहेर येत असेल तर खाली बसून साफ सफाई करून पावडर टाकतो. त्याला कसलाही इगो नाही पण त्याला लहानपणीपासून या विषयी काहीच शिकवलेलं नाही आणि त्याला ते आपसूक येतही नाही जशी ईतर कामं जमतात. जेवणात जे असेल ते खातो त्यात काही नाटक नाही.

हा विषय खूप गहन आणि खोल आहे. काही स्वानुभव.

हा अनुभव मी एक दोनदा घेतलाय, जेव्हा माझ्या मुली आणि पुतणे खेळत असतात, एकत्र जेवत असतात, बरेच वेळा घरातील मोठी माणसे (बायका आणि पुरुष दोन्ही - काका काकू मामा type), फक्त माझ्या मुलींनाच कामाला लावतात - जरा पाणी आणून दे, जरा स्वयंपाक घरातून मीठ आणून दे, हा पाण्याचा तांब्या भरून आण इत्यादी इत्यादी. अशा वेळी, मी सांगायला पाहिजे - चला सर्व मुले पाळीपाळीने कामे करा, माझ्या जावेने त्याला समर्थन द्यायला पाहिजे की सर्व मुलांनी कामे करावी, फक्त मुलींनीच नाही. पण जाऊ फुरंगटून बसते कि माझ्या मुलाला कामाला लावले. आपण बायकांनीच एकमेकांना खूप साथ द्यायला हवी.

अजून एक गोष्ट
अरे खरेतर मला ह्याच गोष्टीचा खूप राग येतो की घरातली पुरुष मंडळी 'हे दे ते दे' का करतात? जरा पाणी दे, कॉफी करून दे, जरा टेबल वरून पेन आणून दे, मोबाईल जरा चार्जे ला लाव. हे फक्त माझ्या घरी आहे का सगळ्यांच्या? ह्या लोकांना स्वतःचे स्वतः नाही का उठता येत? ह्यांची कामे करायला आपल्या हातातील कामे सोडून जावे लागते. असुदे. कसे समजवायचे हे? हा जाच नाही वाटला कधी पण inconvenience नक्कीच वाटला. हा सिनेमा बघून वाटते की नक्कीच बदल घडायला हवा, हसून साजून घरच्यांना समजवायला हवे, कि स्वतःची कामे जरा स्वतः करा पण कसे सांगू ते कळत नाहीये.

मराठी भाषेतील एका लोकमान्य वेब साईट वर आपल्या सिनेमाचे इतके विच्छेदन (म्हणजे मराठीत डिसेक्शन) झाले आहे हे कदाचित दिग्दर्शकाला माहित हि नसेल. Happy

चंपा - ते वेगळे. संत्री सोलून देणे हे एक isolated उदाहरण म्हणून नाही. त्या मित्राकडून त्यांच्या घरी/नातेवाईकांत सगळी कामे स्त्रिया करतात याचे उदाहरण म्हणून त्याने सांगितले होते. तुमच्या उदाहरणात तसे दिसत नाही.

अरे खरेतर मला ह्याच गोष्टीचा खूप राग येतो की घरातली पुरुष मंडळी 'हे दे ते दे' का करतात? जरा पाणी दे, कॉफी करून दे, जरा टेबल वरून पेन आणून दे, मोबाईल जरा चार्जे ला लाव. हे फक्त माझ्या घरी आहे का सगळ्यांच्या? ह्या लोकांना स्वतःचे स्वतः नाही का उठता येत? ह्यांची कामे करायला आपल्या हातातील कामे सोडून जावे लागते. >>>>>>

मोसा, मी वर म्हटल्याप्रमाणे हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. माझ्या वडिलांना कामावर जाताना चष्मा, रुमाल, पेन सारे आईने हातात आणून दिलेले हवे असे. ते बघत मी लहानाची मोठी झाले. माझ्या लग्नानंतर जेव्हा सुट्टी संपून दोघांचा ऑफिसला जायचा दिवस आला तेव्हा मी तयार होण्याआधी नवर्‍याला विचारले की "तुमच्या वस्तू आणून देऊ का आधी?"
यावर तो चकित होऊन म्हणाला- 'मी काय लहान मुलगा आहे की काय? माझी तयारी मला करता येते. तू तुझे बघ आणि जा ऑफिसला.'
सासरी काही अलिखित नियम आहेत. नारळ फोडणे, खवणे, भाज्या निवडायला मदत करणे, पाणी भरणे हे सारी पुरुषमंडळी न सांगता करतातच- पण इतरही अनेक कामात मदत असते. अर्थात जेव्हा त्यांना वेळ नसतो तेव्हा बायकाही करतात. थोडक्यात घर सर्वांचं आहे ना? मग मिळूनच कामे व्हायला हवी असा कटाक्ष असतो. एकमेकांना पूरक असले म्हणजे पुरेसे आहे. मग त्याने डोसे घातले काय- नि तिने तुंबलेले सिंक साफ केले काय- काय फरक पडतो?

सासरी गेल्यावर पहिल्याच दिवशी मी पोहे केले. डिशमधे भरले. बाहेरच्या खोलीत नवरा, दीर वगैरे बसले होते. ट्रे मधे घेऊन बाहेर जायला लागले तर माझ्या सासूबाई झटकन पुढे आल्या आणि त्यांनी प्रत्येक डिशमधल्या मिरच्या आणि कढीपत्याची पाने काढून टाकली. पोहे करताना सगळं घालायचं पण देते वेळी काढून टाकायचं. जेवायच्या आधी त्या आमटीमधील मिरच्या कढीपत्याची पानं आणि आमसुलं पण काढून टाकतात.

असे तर किती तरी अनुभव गाठीशी आहेत, साबा, साबू वाईट आहेत असे नाही पण मुलगा आणि मुलगी यात फरक करतातच. अगदी नवरा आजारी असला तर त्याला रोज नाष्टे वेगवेगळे कधी गरम शिरा, उपमा, अजून काहीकाही. कधी कधी एकमेकांच्या वासाने ताप येतो तसा आला तर आपल्याला औषध घ्यायचं आहे म्हणून, फोडणीची पोळी, भात, फार छान म्हणजे उरले सुरले ढकलून केलेले थालीपीठ. भातावर तूप बीप तर विसरायचेच.
अगदी काहीही काम सांगायचे असेल, म्हणजे काही आणायचे वैगरे असेल तर कायम सून, कचरा टाकायचा तर सून. आणि सुनेने मुलांच्या वाढदिवसाला केलेले डेकोरेशन कोणी केले असे बाहेरच्याने विचारले किंवा सुनेने केले वाटते असे म्हणाले तर माझ्या नवऱ्याला वेळ कुठे आहे अशी टिपणी.

मी शेवटी काल अन परवा बघून संपवला. खरोखर वेल मेड मूव्ही!
तिचे सतत काम, तेच तेच रांधा वाढा उष्टी काढा, जिने पुसा हे प्रसंग पुन्हा पुन्हा आल्याने नीट ठसतात मनावर. तिची बेड वर अंग टाकायची वेळ येईपर्यन्त ते काम नुस्ते बघून आपल्यालाच थकायला होतं! अन या सगळ्यात नवरा आणि सासर्‍यांचा अलिप्तपणा बघून संताप येतो.
मला वाटले ते साबरीमला प्रकरण, त्यावरचा व्हिडिओ तिने फेबु वर शेअर करणे हे फक्त तिला तो बंड करण्याचे धाडस येण्याचा, किंवा आपण विचार करतोय ते योग्य आहे हे समजण्याचा आणि तिने निर्णय घेण्याचा क्षण म्हणून वापरलेय. काही वेळा कोणतीही लहानशी गोष्ट एखादा कौल देऊन जाते तसे. काही पोलिटिकल अजेन्डा घुसडण्याचा प्रकार नाही वाटला.
ते तिडीक येऊन तिने घाण पाणी चहा म्हणून ठेवते तो तिचा उद्रेक असतो. पण त्यानंतर नवरा तिला थोबाडित मारायला पुढे येत असतो तेव्हा ती ते पाणी अंगावर फेकते तो सेल्फ डीफेन्स चा अ‍ॅक्ट होता. त्या आधी पण तिला त्याने एक दोनदा धमकी दिलेली असते. मी तिकडे आलो तर बघ, इथे राहायचे असेल तर ... वगैरे. सो मला तिच्या या दोन रिअ‍ॅक्शन काही वावग्या वाटल्या नाहीत.
शेवटी घरी येते तेव्हा एक छोटा प्रसंग खूप सांगून जातो - भाऊ बाहेरून येऊन पाणी मागतो, बहीण त्याला पाणी द्यायला उठते तर ही एकदम ओरडते. बस खाली! तुला आपले आपण घेता येत नाही का रे पाणी?! मस्त आहे हा सीन!!
मराठीत हा सिनेमा केला तर रिंकू राजगुरु मस्त करेल Happy

अगदी मैत्रेयी
माझ्या डोक्यात निमीषा ला पाहिल्यावर पहिले रिंकूच आली होती.

पण रिंकू निदान सैराटमध्ये तरी कायम आत्मविश्वासपूर्ण, धीट, बिनधास्त, दे धडक दिसते. इथली ही नायिका शंभरातल्या नव्व्याण्णवजणींसारखी साधी आहे. सुरुवातीपासून बंडखोर नाहीये ती. त्यामुळेच ती कथा खरी, शक्य कोटीतली वाटते.
अर्थात रिंकू राजगुरू अभिनयातून साधेपणा दाखवू शकतेच, पण तिची प्रतिमा चटकन अशी साधी म्हणून डोळ्यासमोर येत नाही.

मराठीत हा सिनेमा केला तर रिंकू राजगुरु मस्त करेल >> +१
अर्थात रिंकू राजगुरू अभिनयातून साधेपणा दाखवू शकतेच, पण तिची प्रतिमा चटकन अशी साधी म्हणून डोळ्यासमोर येत नाही. >>> तेच चॅलेंज असेल. स्वॅगर ती सहज दाखवेल सैराट मधे सुरूवातीच्या सीन मधे दाखवला तसा.

काल अजून १०-१५ मिनीटे पाहिला. आता हे (शब्दशः) रिन्स अ‍ॅण्ड रिपीट किती वेळ चालणार असे वाटले, कारण पॉज करून बघितले तर अजून एक तास बाकी आहे. पण वरच्या वर्णनावरून पुन्हा लक्षात आले की अजून बरेच नाट्यपूर्ण प्रसंग बाकी आहेत.

मधेच तो म्हातारा स्वतःच चपला घालून बाहेर पडलेला दाखवला आहे. यावेळेस कोणी न आणून दिल्याने असेल. पण यात बदल दाखवायचा होता की काय माहीत नाही.

फा असे १०-१० मिनिटे बघून डिसकनेक्टेड वाटत असावे. कारण मला ते सीन्स पुन्हा पुन्हा येतात ते जाणवले पण त्यामुळे त्याचा एक ओवरऑल परिणाम होतो त्या मुलीशी रीलेट व्हायला. मी २ भागात बघितला सिनेमा.

पूर्ण सिनेमात पात्रांना नावे नाहीत हा मास्टर स्ट्रोक होता - हा प्रकार कमी अधिक प्रमाणात किती कॉमन आहे अजूनही समाजात हे त्यातून दाखवले असे वाटले.
तीचे ट्रांझिशन - सुरूवातीचा कामाचा उत्साह, घरच्या लोकांनी छोट्या छोट्या गोष्टी तिच्यावर ढकलणे , तिच्या आवडींना/ मतांना दुर्लक्ष करत तिला हव्या त्या चैकटी मधे फिट करायचा प्रयत्न (ती फॅमिली फोटो फ्रेम मधे बघत जाते ते) , तिचा साचत जाणारे फ्रस्ट्रेशन नि शेवटचा संतापाचा उद्रेक हे एव्हढ्या छोट्या रिपीटेड घटनांनी परफेक्ट अधोरेखीत होत जाते.
शेवटच्या तिच्या नवर्‍याचा नव्या बायकोशी तोच संवाद नि हिचा डान्स बघणे हा चपखल एंड होता.

कारण मला ते सीन्स पुन्हा पुन्हा येतात ते जाणवले पण त्यामुळे त्याचा एक ओवरऑल परिणाम होतो त्या मुलीशी रीलेट व्हायला >> +१

मला ते फरशी पुसण्याचे प्रसंग बघताना हे जाणवत होतं की कामं तीच आहेत पण प्रत्येक वेळेस ती काम करणारी स्त्री बदलत आहे. कधी ती मुलगी कधी कामवाली बाई, मग ती आत्या वगैरे. काहीही झाले तरी पुरुष ते काम करत नाहीत. अगदी त्या मुलाची आत्या माहेरी येऊन ती कामे करते पण प्रत्येक वेळेस फक्त स्त्रीच ती काम करत आहे.

मधे एका प्रसंगात सगळ्या जोडप्यांच्या फोटो फ्रेम्स वरुन कॅमेरा फिरतो आणि बॅक ग्राऊंडला फक्त किचन मधल्या कामांचे आवाज आहेत.

मी माझ्या आजुबाजूला कधी चप्पल वगैरे आणून देणे वगैरे पाहीले नाही. पण पाकीट, बेल्ट, सॉक्स वगैरे समोर काढून आणून देणे वगैरे ऐकले आहे.

चित्रपट पाहून झाल्यावर अचानक मला माझ्या, मुलांच्या अंगवळणी पडलेल्या घरातल्या अनेक गोष्टी/ सवयी नजरेला बोचायला लागल्या.

शिवाय वरील चर्चेत आलेला स्वयंपाक / घरकामात 'मदत' करणे आणि त्याची जबाबदारी घेणे, यातला ईतकी वर्षे न जाणवलेला फरक पण लक्षात आलेला आहे. ईतके दिवस मी पण जमेल तसं स्वयंपाक्/घरकामात मदत याच कॅटेगिरी मधे होतो/आहे. जवाबदारी घ्यायला हवी हे कळलं आहे.

Pages