द ग्रेट इंडिअन किचन

Submitted by मेधावि on 1 February, 2021 - 07:00

गेल्या दहा दिवसांत तीन सिनेमे पाहीले.
1. इज लव्ह इनफ ? "सर"
2. द लास्ट कलर
3. द ग्रेट इंडिअन किचन.

पहिले दोन सिनेमे आवडले ...

तिसरा सिनेमा.. (Neestream -मल्याळी भाषेतला इंग्रजी सबटायटल्सवाला) पाहून मात्र त्रास झाला. एक सण्णसणीत मुस्काटात बसली. हा चित्रपट संपत नाही. तो मानगुटीवर बसतो आणि छळतो. "अगदी फ्रंट ऑफ द माईंड" छळत रहातो. स्वैपाकघर आणि स्वैपाक ह्या विषयातले बारीक सारीक तपशील टिपून त्यावर एका पुरुषानं हा सिनेमा बनवलाय,त्याला साष्टांग प्रणाम.

Spoiler alert - ज्यांना पहिल्या  धारेचा सिनेमा बघायचाय त्यांनी इथून पुढे वाचू नये. पण लवकर बघा...

(एक डिस्क्लेमर - मी अजिबातच स्त्रीवादी नाही. स्वतः राबून घर सजवणं, स्वच्छ आणि सुंदर ठेवणं, छान छान पदार्थ बनवून दुस-याला खाऊ घालणं हे मला आवडतं. मी माझ्या आवडीसाठी ते करते, तरीसुद्धा सिनेमा पाहून मी गोंधळले आणि भांबावले आहे)

लास्ट अॅलर्ट!!!
ह्यापुढचं लेखन प्रचंड उत्कट असेल. ते कदाचित  असंबंद्धही होईल, पण विचारांचं घोंघावीकरण न थोपवता आणि त्याचं अजिबात सुबकीकरण न करता ते जसे येतील तसे ते इथे येतील.

एखाद्या व्यक्तीला कोणी सपासप आसूडाचे फटके मारत असेल तर त्याच्या वेदना पाहून बघणाराही कळवळतो.  पण ती व्यक्ती जर खूषीत ते फटके खात असेल तर? .... आनंदानं हे फटके खाणं म्हणजेच आपल्या आयुष्याची सार्थकता, कृतार्थता, परीपूर्णता असं तिला आणि तिच्या सर्व जिवलगांना वाटत असेल तर ?

आणि....... मीही त्यातलीच एक असेन तर?????
मीच काय,  निरक्षर ते डाॅक्टरेटपर्यंत शिकलेल्या, गरीब ते गडगंज श्रीमंतीत लोळणा-या माझ्या परिचयायल्या सर्वच्या सर्व  स्त्रिया दिसतायत् मला आत्ता डोळ्यापुढे. हे सगळं आमच्या, आपल्या  हाडीमाशी इतकं रुजलंय आणि तुम्ही आम्ही सर्वांनी ह्या प्रचंड प्रचंड भीषण वर्णव्यवस्थेला किती सहजपणे आत्मसात केलंय...आणि आणि "आज" एक पुरुष बोलतोय त्यावर..हॅट्स ऑफ टू हिम.

हा सिनेमा  पितृसत्ताक पद्धतीतल्या "स्त्री" ह्या सो काॅल्ड  "देवीच्या" कर्तव्यांवर, तिच्या अधिकारांवर, सुखी आणि संपन्न आयुष्याच्या  परंपरेनं रुजवलेल्या कल्पनांवर, व्याख्यांवर आणि "घरगुती हिंसाचाराच्या प्रकारांवर बोलतो. चित्रपट पहाताना एकापाठोपाठ एक एक सण्णसणीत कोरडे बसत रहातात अंगावर खण्णं..खण्णं..खण्णं करत  !!!!   पण तो थांबत नाही, वेगवान बनतो आणि बोलतच रहातो, बोलतच रहातो. मी ..पहातच रहाते....कण न् कण् एका क्षणी  "पेटत" असतो आणि पुढल्या क्षणी "विझत" असतो. एक मोठ्ठी  हतबलता साचून रहाते. हे सगळं बदलण्यासाठी आपण फार फार दुबळे आहोत असं वाटतं.  पटो...न...पटो.... मी तीच वाट पुढे चालणार असते.

हा चित्रपट फार महत्वाचा आहे. पहायलाच हवा असा.  रोजच्या जगण्यातल्या ब-याच बेसिक गोष्टींचं भान देतो तो. मानवता शिकवतो. आपल्या मायेच्या माणसांच्या आणि प्रेमाच्या कल्पना, जेवणाचे, वागण्याचे  मॅनर्स, म्हातारपणापर्यंत बाळगलेल्या आणि  कौतुकानं जोपासलेल्या  नाठाळ आणि त्रासदायक सवयी आणी चवी-ढवी ह्या सगळ्यावर प्रश्न उभे करतो.

चित्रपटाची सुरुवात.. , केरळमधल्या एका गावात एक लग्न ठरतंय. मुलगी काळीसावळी, स्मार्ट, हसरी, टिपिकल दाक्षिणात्य सुंदर काळेभोर बोलके डोळे आणि दाट कुरळे केस. तशी पहिल्यांदा पाहताना ती सुंदर वगैरे नाही वाटत पण हसली की फार गोड दिसते. नृत्याची आवड आहे तिला. नैपुण्यही आहे त्यात. हसरी, खेळकर फुलपाखरी आयुष्य जगणारी ही मुलगी.  बघायला येणारं स्थळही  तालेवार असावं. मुलीची आई भरपूर उत्साहानं राबते आहे, गोड आणि तिखट असे भरपूर तळीव पदार्थ (घरातच) बनवते आहे. सुंदर मोठ्ठा "आधुनिक" आणि कलात्मक पद्धतीनं सजवलेला दुमजली बंगला आहे त्यांचा. संपन्नता जाणवते सगळीकडे. वडील गल्फमधे नोकरी करत असल्याचं गप्पांमधून समजतं.  नातेवाईक, हास्यविनोद, गप्पा........ छान आनंदाचं वातावरण आहे.

बघण्याचा कार्यक्रम पार पडतोय. दोन्ही बाजूंचे लोक सधन वाटतात आणि खुशीत दिसतायत्. मुलामुलीला एकट्यानं एकमेकांशी काही बोलायचं तर बोला अशी परवानगी देऊनही  घरच्या सगळ्यांनी फिल्डींग लावली आहे. अशा परिस्थितीत संकोचल्यामुळे मुलामुलीचा फार संवाद होतच नाही. स्वभाव, विचार-आचार जाणून घेणं वगैरे काही घडताना दिसत नाही. पण दोघंही एकमेकावर अनुरक्त वाटतात. 

छान थाटामाटात लग्न होतं. हुंड्यात मिळालेली एक अलिशान कार ही दिसतेय दारात.  लाजत मुरडत नव्या नवरीचा कौतुकाचा गृहप्रवेश. प्रेमळ व शांत स्वभावाचे सासूसासरे आणि नवरा.  सासरचं घर किती सुंदर!!! वडिलोपार्जित असणार. टुमदार, कौलारू, खूप मोठ्ठं पण जुन्या पद्धतीचं.  दोन मजली, मागेपुढे भलं मोठ्ठं अंगण, जुन्या पद्धतीची कडी-कोयंडे असलेली लाकडी दारं,  शिसवी लाकडाचं फर्निचर, पितळी मोठी मोठी छान छान भांडी, मागेपुढे भरपूर झाडं. स्वैपाकघर  मोठ्ठं, मात्र अंधारं आणि साधं आहे. तिथं माॅड्युलर किचन नाहीये. साधा कडप्याचा ओटा, अॅल्युमिनीयमची भांड्यांची मांडणी, भिंतीवरचं ताटाळं, फळीवरचे डबे. स्वैपाकघरातच अजून एका भिंतीशी अजून एक ओटा आहे आणि त्यावर चक्क एक ढणढणती चूल आहे. वर वखारीची लाकडं रचलेली दिसतात.  चुलीवर (केरळमधे) भात शिजवतात ते भाताचं डेचकं. इतर भांडी आणि भात ढवळायचा मोठा डाव. बाकी स्वैपाक गॅसच्या शेगडीवर होतो पण भात मात्र अजूनही चुलीवरच शिजतो. मिक्सर आहे, पण वाटण मात्र पाट्यावरच होताना दिसतं. कायमचा फिक्स केलेला एक मस्त मोठ्ठा पाटा दिसतो.

मुलीच्या संसाराचा पहिला दिवस. नवरा चांगला वाटतो. सासूही प्रेमळ, शांत आणि कामसू आहे. मुलीला हळूहळू रुळूदे. लगेच कुठे कामं सांगायची? सासराही शांत आहे. घरात फारसा बोलतही नाही.

भांडी घासणं, उष्टं खरकटं काढणं, केरवारे, फरशी, अंगण झाडणं, पुसणं , भरपूर भाज्या, निवडणं, चिरणं, फोडणीस टाकणं....मोठ्या अलीशान पाट्यावर भरपूर नारळ वाटणं, चटणी, सांबार बनवणं. मांसाहारी पदार्थ बनवणं. वेळेवर डायनिंग टेबलवर सगळं अन्न मांडणं, गरमागरम सर्व्ह करणं.... विविधरंगी, विविध चवींचा, सुग्रास, तृप्त करणारा स्वैंपाक.. गृहलक्ष्मीनं, अन्नपूर्णेनं घर सांभाळावं, सजवावं, ते उबदार ठेवावं, कुटुंबाला छान खाऊ पिऊ घालून सुखात ठेवावं.  जेवताना स्वैपाकाचं आवर्जून कौतुक करणारी घरची माणसं.  पुरुषाच्या ह्दयाचा मार्ग पोटातूनच तर जातो ना....ह्या संसारला सुखी संसारच तर  म्हणतात ना?  

रोज सकाळी बिडाच्या तव्यावरचे गरमागरम डोसे, इडिअप्पम, पुट्टु आणि कडला करी, सांबार, पदार्थाला लाल मिरच्या, उडीद डाळ, भरपूर कढीपत्याची खमंग फोडणी. दुपारच्या जेवणातल्या वेगवेगळ्या भाज्या, भात... हळूहळू डोळ्यातून  ती चव आपल्या डोक्यात, मनात, आणि मग जिभेवर उतरायला लागते. चायला, आपण फूड चॅनेल बघतोय का काय असं वाटतं.

घरच्यांच्या आवडीनिवडी आणि चवीढवींचा विचार करत करत रोजचा स्वैपाक करणं, सकाळी दूध येण्यापासून सुरू झालेला दिवस, रात्रीची जेवणं झाली की ओटा टेबल आवरून, भांडी घासून मग श्रांत तनामनानं दिवा बंद करून बिछान्यावर अंग टाकणं ही त्या गृहलक्ष्मीची आनंदाची, सार्थकतेची, तृप्तीची कल्पना. लग्नानंतर सुरुवातीला  नवरा व सासरच्यांचं सगळं व्यवस्थित करणा-या ह्या घरोघरीच्या नायिका, नंतर मुलंबाळं, नातवंडं ह्यांच्यासाठी अविरत झिजतच असतात......झिजतच रहातात....मरेपर्यंत. आणि आपण म्हणतो...माझी आई/आजी फार फार प्रेमळ होती. माझ्यासाठी खूप केलं तिनं. तो तिच्यासाठीही सन्मानच असतो.

कथानायिकाही लग्नानंतर सासूच्या बरोबरीनं  सर्व जबाबदा-या उचलायचा प्रयत्न करताना दिसते.  एक आदर्श सून, बायको बनण्याचा प्रयत्न करताना दिसते.  हे सर्व करताना तिला मजा येते आहे, आत्मिक समाधान मिळतं आहे. पण ते निभवताना तिची दमछाक होतेय.

घरातला पुरुषवर्ग शांत, अबोल....पैसे मिळवून आणणं आणि बाहेरची कामं करणं हे पुरुषांचं काम. ते किचनमधे ढवळाढवळ करत नाहीत. आणि अचानक सासूला मुलीच्या बाळंतपणासाठी परदेशी जावं लागतं. आणि संपूर्ण घराची संपूर्ण जबाबदारी सुनेवर धाप्पकन् येऊन पडते.  माहेरी
फारशी स्वैपाकघरात न  वावरलेली ही मुलगी, पटापट सगळं शिकून अपेक्षांना उतरायच्या प्रतिक्षेत.

सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, भांडी घासणं, केरवारे, अंगणाची झाडलोट, फरश्या पुसणे, जिने पुसणे..... न संपणारी आणि मारूतीच्या शेपटाप्रमाणं सतत वाढत जाणारी कामं आणि अपेक्षा. सास-यांना चुलीवरचाच भात, पाट्यावरची चटणी प्रिय आहे. कुकर, मिक्सरमधे ती चव येत नाहीये. ते प्रेमानं तिला सुचवू पहातात. तीही त्यांच्या मताचा आदर राखते, एक एक दिवस पुढे सरकतो तशी वेगवेगळ्या प्रसंगातून तिला येत जाणारी जाण, येणारा मानसिक आणि शारिरीक थकवा,  फ्रस्टेशन्, पुरुषांच्या प्रायोरिटीज,  एकत्र कुटुंबपद्धतीतल्या अपेक्षा, रोज येणारी वेगळी वेगळी आव्हानं. त्यावर मात करण्यासाठीची तिची ओढाताण आणि ह्या सगळ्यावर त्यावर तिनं दिलेलं उत्तर....ह्यावर बोलतो हा सिनेमा.

गरमागरम डोसे करून वाढायचे म्हणजे बरोबरीनं ती जेवू नाही शकत बाकीच्यांबरोबर. सगळ्यांचं खाणं झाल्यावर टेबलवर ताटाबाहेर काढून टाकलेल्या शेवग्याच्या शेंगांची सालं आणि इतर खरकटं  उचलताना तिला ढवळतं. जेवायला सुरुवात करताना नवरा व सास-यासाठी हिनं सुबकपणे मांडलेलं टेबल आणि आता ती आणि सासू जेवायला बसतानाचं टेबल ह्यात जमीन अस्मानाचं अंतर. सासू सरावलीये. तिला ह्याचं काहीच नाही वाटत. उलट ती नव-याच्या उष्ट्या ताटातच घेते वाढून. मुलीला मात्र हे जड जातंय. हाॅटेलमधे टेबल मॅनर्स पाळणारा नवरा घरात का पाळू शकत नाही? सतत भांडी घासण्याचा आणि उष्ट- खरकटं आवरण्याचा सीन येत रहातो. किती घरांमधे तुंबलेल्या सिंकमधे हात घालायचा प्रसंग घरच्या मुलांवर/ पुरुषांवर  येत असेल? दुस-या घरातनं आलेल्या मुलीनं मात्र हे पट्कन् आत्मसात करण्याची अपेक्षा ठेवली जाते.

घरोघरी नव-याच्या हातात डबा, रुमाल, पाकिट, मोबाईल देणा-या बायका आपण पहातोच की. त्यात कुठं काय वावगं वाटतं? नाॅर्मलच तर आहे की हे..
रांधा वाढा उष्टी काढा ह्यात तर मागच्या अनेक पिढ्या संपल्या. ह्यात काय एवढं मोठं? नाॅर्मलच आहे की हे सगळं..  "ह्याच" गृहितकांकडे हा सिनेमा परत एकदा नव्यानं बघायला लावतो. त्या गृहीतकांना मानवतेच्या निकषांवर परत एकदा तपासायला लावतो. मारहाण किंवा  शिवीगाळ म्हणजेच काही घरगुती हिंसाचार नाही फक्त. खूप व्यापक आहे ती कल्पना. पिढ्या न् पिढ्यांपासून होत असलेले काही अन्याय आता परंपरेच्या नावानं इतके मान्यताप्राप्त झाले आहेत की  मानवतेनच्या  दृष्टीकोनातूनही ते दूर करू शकत नाहीये आपण. म्हणून ही अस्वस्थता येते. ही अस्वस्थता कधी जाईल, कशी जाईल ते माहीत नाही पण  सिनेमाचा प्रेक्षक आपल्या ताटातलं उष्टं दुस-या कुणाला तरी साफ करायला टाकताना  दहा वेळा तरी विचार करून टाकेल  हे सुद्धा ह्या सिनेमाचं यशच म्हणावं लागेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सिंक खालच्या जागेत ठेवलेल्या डस्ट बिन ला बिन लायनर लावत नाही. व साधारण पणे अश्या घरात मोठ्या प्रमाणावर भांडी पडतात तर मागील अंगणात मोरी व नळ आणि भांडी घासायची व्यवस्था असते हे मी आंध्रात तरी बघितले आहे. केरळात काही वेगळी सिस्टिम असावी.

दुसरे म्हणजे पुरु श एका प्रकारे कचरा करतात पण बायकांचे पण ते महामूर कुर ळे केस अस्तात त्याचे गुंतवळ ही जागो जागी पडलेले असतात. मी त्रिसूर मध्ये एका ठिकाणी राहायला असताना त्या गुंतवळांचा पण वैताग आला होता.

अशी राहणी व बॅक वॉटर्स आजू बाजूला असणे , दमट हवा ह्या मुळे केरळ मध्ये कायम तापाच्या साथी, व्हेक्टर बोर्न आजार जसे की डेंग्यु. निपा वगिअरे चालू असतात. गॉड्स ओन्कंट्री फोटो व फिल्म्स मध्ये हे दिसत नाही. ही टीका नव्हे . सामाजिक व भौ गोलिक फरक फक्त.

त्यामानाने आंध्रा तेलंगणा रायलासीमा मध्ये हवा भयानक कोरडी, मोठे मोठे उष्णता परावर्तित कर णारे दगड - बंडे. आंध्रातले लोक जास्त
भांडकुद ळ, खूपच अकड असलेले रेड्डी, इथल्या लोकांचे आजार म्हणजे उ ष्णतेचे विकार. इथल्या फ्युडल सिस्टिम मध्ये चाकराला
पडचाकर सिस्टिम आहे व घरातली मेन बाई काही काम करत नाही. दो रसानी बनून सूचना देत राहतात.

मी ही बघितलाच हा शेवटी, मला तर असे वाटले की हे सगळ्या घरात होते, माझ्याही होतेच. अगदी इतके अति नसेल पण काही फार प्रमाणात तर होतेच.
साधा नवऱ्याचा वाढदिवस साजरा करताना बाईने खपून काही गोष्टी घरात कराव्यात ही अपेक्षा, खरतर तीच हौसेहौसेने काहीबाही प्लॅनिंग करते, तेच बायकोचा वाढदिवस असेल तर मात्र तो हॉटेलला नेईल सर्वांना, म्हणजे काय त्याने स्वतः काही करावे अशी अपेक्षा नाहीच कोणाची.
हे सगळे पाहिल्यावर अचानक लख्खपणे आपली जबाबदारी वाढली आहे हे लक्षात आले.

कामाला बाई लावली तरी "सूनबाई, माझे कपडे तेवढे तूच धूत जा, माझी ताटवाटी तूच घास, माझी खोली तेवढी तूच झाडून पुसून घे" अशा प्रेमळ विनंत्या होऊ शकतातच Wink

चांगली चर्चा.
मला इथे पाण्यात पोहणार्या बेडकाची गोष्ट आठवली. जर पाण्याचं तापमान हळूहळू वाढवत नेलं तर बेडकाला नक्की काय चालू आहे ते कळत नाही आणि तो मरतो. पण जर ऑलरेडी उकळत्या पाण्यात टाकलं तर तो लगेच धोक्याबद्दल जागृत होतो आणि टुणकन उडी मारून स्वतःला वाचवतो.

तसं इथे जर तिला थोडेफार कन्सेशन्स मिळत राहिले असते तर ती पहिल्या बेडकाप्रमाणे अडकली असती. पण तिच्या बाबतीत दुसऱ्या बेडकासारखा प्रकार सासू परदेशी गेल्यामुळे झाला आणि ती स्वतःला वाचवू शकली.
अशी काही उदाहरणे पाहिली आहेत. मेजर काही abuse झाला तर बाई बाहेर पडते पण लहानसहान बाबतीत त्रास होत असला तर ती सहन करत राहते.

धार्मिक बाबींवर चित्रपटात फोकस असला तरी मला अनेक नास्तिक किंवा नॉन-हिंदू कुटूंबेही माहीत आहेत जिथे स्त्रियांची स्थिती अशीच वाईट आहे. सो धार्मिक अंधश्रद्धा चूकच पण त्यांच्यामुळे फक्त स्त्रियांवर अन्याय होतो असं नाही- तो इन जनरल मानसिकतेवर अवलंबून असतो. याउलट मी माझ्या नात्यात असंही उदाहरण पाहिलं आहे की कट्टर धार्मिक कुटूंब- पण कुटूंबात पूर्ण डेमोक्रॅसी- सर्व सुनांना करियरच्या बाबतीत आणि एकूणच पूर्ण स्वातंत्र्य, घरातील कामाची समान वाटणी. देवाधर्माचं काही जर सुनांना करायचं नसेल- वेळ नाही किंवा रस नाही म्हणून- तर तेही अगदी मान्य. त्या कुटूंबात जेव्हा एका आजींची तब्येत बिघडली तेव्हा आईची देखभाल करण्यासाठी म्हणून त्यांच्या मुलाने आपला जॉब सोडला. (माझ्या आईची सेवा करण्यासाठी तू जॉब सोड असा दबाव बायकोवर आणला नाही.) आणि हा रोज एक तास सोवळ्याने पूजाअर्चा करणारा मुलगा. पण बायको त्याच्यावर मुलं, किचन आणि घर सोपवून 15 दिवस कॉन्फरन्सला जाऊ शकते आणि तो स्वतःच्या आईसोबत तिच्या पालकांनाही हवं नको ते बघतो.
त्यामुळे या दोन गोष्टींना मिक्स करायला नको.

आमच्याकडे मावशींना काचेची भांडी घासायला द्यायची नाहीत, पाण्याचे ग्लास आणि चमचे घासायला दयायचे नाहीत असे बरेच हायजीन नियम होते.मग मी आल्यावर ते आपोआप धाब्यावर बसले आणि मी आणि आमच्या मावशी दोघी मिळून काचेची भांडी फोडू लागलो Happy
आता फक्त मीच महिन्याला एक फोडते(म्हणजे ते काही कारणाने फुटतं)

ते बेडकाचं उदाहरण परफेक्ट आहे. काही गोष्टी इतक्या अंगवळणी पडत जातात की त्या चुकीच्या आहेत हे लक्षात यायला पण वेळ लागतो कधी कधी! हे मी स्वानुभवातून बोलते आहे. लहान वयात (अगदी कॉलेजमधे जाईपर्यंत) आपली आई ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे ही जाणीव इतकी प्रकर्षाने नसायची. आमच्या घरी कोणालाच मुळा आवडत नाही म्हणून मुळ्याची भाजी केलीच जायची नाही पण मला आईने आत्ता काही वर्षांपूवी सांगितलं की तिला केळ्यामुळ्याचं सांबार प्रचंड आवडतं. मग तू करत का नाहीस? तर तिचं उत्तर, एकटीसाठी कुठे करू?!
हे असं होत जातं नकळत. आता हे बहुतेक जी व्यक्ती स्वयंपाक करत असेल तिच्या वाट्याला येत असेल कदाचित त्यात स्त्री/पुरूष असं काही नसावं कदाचित. का नवऱ्याच्या, मुलाबाळांच्या, कुटुंबियांच्या आवडीनिवडीला गृहिणीने झुकते माप देणे हे एक चुकीचे गृहीतक आहे काय माहित.

अमा, तुमचं observation करेक्ट आहे. भांड्यांची मोरी बाहेर असायला पाहिजे. म्हणजे असते normally अशा मोठ्या घरांत....
कुरळे केस तर हिचेही किती दाखविले आहेत!
नवऱ्याला किती राग येतो..manners नाहीत म्हटले तर!!
तुमची तब्येत कशी आहे आता? ठीक आहात ना? घरीच ना आणि?

ऐय्यप्पाचं व्रत नक्की काय माहित नाही पण भयंकर कडक धार्मिक आहे! ते चालु असताना अर्थात त्यांची पूजाआर्चा, ते काळं सोवळं सगळीकडे जाताना नेसतात, नो चप्पल , बाइक सुद्धा अनवाणीच चालवतात आणि नो सेक्शुअल अ‍ॅक्टिव्हिटीज असं ऐकलय हैदराबाद पब्लिक कडून !

अयप्पा व्रत कडक असतं.आणि केरळी लोक अतिशय भाविकपणे करतात.आमच्या ऑफिसमध्ये केरळी लोक एखाद्या केरळी सणाला, ओणम वगैरे, चिप्स वाटतात आणि त्यांचा तो ड्रेस कोड करून येतात.शक्यतो स्त्री चं तोंड बघायचं नाही, चटईवर झोपायचं, जमल्यास स्वतः करून खायचं असे बरेच नेम पाळतात.माझ्या एका भावाने शेजारच्या केरळी मित्राबरोबर केलं होतं(त्यानंतर ऑनसाईट मिळालं असं सर्वांचं मत आहे.)

आता हे बहुतेक जी व्यक्ती स्वयंपाक करत असेल तिच्या वाट्याला येत असेल कदाचित त्यात स्त्री/पुरूष असं काही नसावं कदाचित. >>>>

हो. यात स्त्री/ पुरुष असे होत नाही. नैसर्गिकरित्या होत असावे. आपण आपल्या पेक्षा मुलांच्या, आई वडीलांच्या आवडीनिवडीला प्राधान्य देतो.
शिवाय आपण स्वयंपाक केला आणि तो सर्वांना पुरला नाही असे होऊ नये, असे वाटत असते. भले त्यात स्वतःला चार घास कमी पडले तरी चालतील. त्यामुळे सर्वांचे जेवण झाल्यावर आपण जेवणे आणि तरी भूक भागली नाही तर ताक वगैरे पिऊन झोपणे असे होते. बायकोने स्वयंपाक केला काय किंवा मी केला काय हे बर्‍याचदा घडते.

एकटीसाठी कुठे करू?! >> This!!
एकटीसाठी नाही सगळ्यांसाठी मुळ्याचं सांबार करायचं. एक दिवस रागाने आवडत नाही म्हणून मुलांनी/इतर प्रौढांनी हात नाही लावला तर नाही लावला. More for me.... झोपले उपाशी तर झोपले, खाल्ले कॉर्नफ्लेक्स तर खाल्ले, केला स्वतः मऊ भात तर केला .... माझी खानावळ आज मूळाच वाढणार !! ...... पण आई झाल्यावर असं वागलं तर कैकयी ठरू ना!! पुरेसं अन्न नसताना त्याग करावा लागला तर समजू शकतं. आईच काळीज स्वतः उपाशी राहणार. पण चारी ठाव अन्न उपलब्ध असताना इतरांनी अजिबात अ‍ॅडजस्ट करायचं नाही ह्याला काय अर्थ आहे.
(जि, हे तुझ्या आईला किंवा घराला उद्देशून नाही. आमच्या माहितीतील सर्व माऊल्या अशाच आहेत!!)

एकटीसाठी नाही सगळ्यांसाठी मुळ्याचं सांबार करायचं >>> परफेक्ट! असा अप्रोच ठेवला तर बर्‍याच घरांमधे किमान मुलं चांगली घडतील. आमच्या ओळखीत एक उदाहरण आहे. नावडती भाजी असली की आयदर ते अमुक पण कर ना असं आईला फर्मान सोडलं जातं नाहीतर स्वतःच मॅगी/पास्ता असं काहीतरी करून खाल्लं जातं. खरंतर ती आई हे चालवून घेते हे ही चुकीचंच. त्याने चुकीचा पायंडा पडतो.

सनव, आस्तिक नास्तिकचा प्रश्नच नाही. वैयक्तिक आयुष्यात नास्तिक माणुस पेट्रिआर्कल असुच शकतो व धार्मिक मनुष्य सहृदय असुच शकतो. परंतु जात, धर्म हे पेट्रिआर्कल व्यवस्थेचे दोन खांब आहेत यात वाद नाही. मुलांना बाय डिफॉल्ट बापाचाच धर्म, जात मिळतात म्हणून कुठलाही धर्म असला तरी तो पुरूषांना जास्त प्रिविलेजेस देतोच (कारण पुरूषच धर्म, जातीची संख्या वाढवतात). एकही धर्म अपवाद नाही. त्यामुळे आजघडीला जगभर पेट्रिआर्कल समाज आहे.
तुम्ही मागे त्या उडालेल्या धाग्यावर माझ्याविषयी फार वाईट बोललूया होत्या पण तरीही मी तुम्हाला उद्देशून लिहीत आहे कारण हे लिहीले नाही तर तुम्ही लिहीलेल्या "वरवर बिनतोड, पण तात्विकदृष्टूया फोल" विचाराला प्रतिवाद नाही असा इतर वाचकांचा समज होईल.

आताच पहिला चित्रपट अगदीच प्रभावी आणि अंगावर येणारा
घरात त्यांनी बायको/सून न आणता मोलकरीण आणलीय जी रात्री पण सुख देईल या डबल अपेक्षेसह
भयावह वाटलं आणि ज्यांना आउटडेटेड वाटलाय त्यांना सांगू इच्छितो की असले प्रकार फक्त गावाकडे नाही तर चांगल्या शहरात, सुशिक्षित घरात देखील होतात
एका मैत्रिणीची बहीण लग्न होऊन गेली, घरचे अगदी सुखवस्तु आणि देवाचे पुजारीपण घराण्यात
त्यामुळे सकाळी उठून काकडआरती, पूजा, नैवैद्य अगदी यथासांग
सुरुवातीला तिने केलं, घरातली सून म्हणून नंतर मग मूल झाल्यावर हे सगळं जाच होऊ लागला
मुलगा रात्री जगावयाचा, त्याला मांडीवर घेऊन थोपटून झोपवा आणि परत पहाटे उठून नैवैद्याचे करा याने ती अक्षरशः इतकी टेकीला आली
बर देवाचे म्हणजे घरातल्या स्त्री नेच करायचे हा दंडक
ती चक्क एक दिवस मुलाला उचलून माहेरी निघून आली
यात कुठेही सासरकडे अब्युजीव नव्हते, नवरा आयटी मध्ये चांगल्या पगारावर
पण त्यांचा स्टॅण्ड असा होता की इतकीच तर काय अपेक्षा होती अस आम्ही काय मोठं करायला सांगत होतो
ही गोष्ट 2020 मधली आणि पुण्यात घडलेली
त्यामुळे काही आउटडेटेड वगैरे काही वाटलं नाही

आमच्याकडे सुदैवाने आईने लहानपणापासून या सगळ्या कामाची सवय लावली आहे आणि त्यात काही वेगळं विशेष आहे असं आम्हालाही वाटत नाही
संडास घासणे, सिंक साफ करणे, खरकटी काढणं, जेवण झाल्यावर टेबल आवरणे, पुसणे, आणि बाकी इतर अनेक केलंच जातं
अर्थात तरीही आपल्याकडून बायकोला किती गृहीत धरलं जातं हे फिलिंग आलेच
त्यामुळे पुन्हा एकदा अंतर्मुख होऊन विचार करावा वाटला
आणि आपल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या कदाचित आजवर खटकल्या नसतील त्या बायकोला त्रासदायक झाल्या असतील का आणि आता तसे होऊ नये यासाठी काय करावं लागेल यावर विचार मंथन सुरू आहे
फार बरे वाटले हा चित्रपट बघून
प्रत्येक स्त्रीने आपल्या घरच्यांना सोबत बसवून हा चित्रपट बघावा
निदान एक टक्का तरी आपल्यात बदल घडला तरी चित्रपट यशस्वी ठरला असे म्हणता येईल

सुनीती, मी तुम्हाला वाईट बोलले नव्हते तर तुम्ही मला उद्देशून इतरत्र ज्या पर्सनल पोस्ट्स करत होतात व ट्रोल करत होतात ते नमूद केलं होतं. एरवी मी तुमच्या पोस्ट्स इग्नोअरच करत असते. जर सभ्यपणे, पर्सनल न होता आणि मुद्द्याला धरून चर्चा करू शकलात तर नक्कीच चर्चा करायला आवडेल.

एकही धर्म अपवाद नाही. त्यामुळे आजघडीला जगभर पेट्रिआर्कल समाज आहे.//

मी तेच लिहिलंय. जगभर हीच जर धार्मिक पितृसत्ताक सिस्टीम आहे तरी जगभरात स्त्रियांची स्थिती सारखी नाही.
सो निदान पाश्चात्य देशांइतपत तरी भारतीय स्त्रियांची स्थिती बरी असावी अशी इच्छा असेल तर त्या दिशेने activism असावा.
जात धर्म विरोधी चळवळीला माझा विरोध नाही, शुभेच्छाच आहेत. पण त्या चळवळीचं बाय प्रॉडक्ट म्हणून कदाचित स्त्रियांची स्थिती सुधारेल- पण त्याची खात्री नाही. ज्या धर्मात 'जाती' नाहीत उदा नॉन हिंदू रिलीजन तिथे काय परिस्थिती आहे? जिथे धर्म नाही अशा कम्युनिस्ट रशिया वगैरे मध्ये स्त्रियांची काय अवस्था आहे? अनेक नास्तिक पुरुष स्त्रियांचं शोषण करतातच.
सो जात धर्म विरोधी चळवळ सेपरेटली जरूर असावी पण तो फेमिनिस्ट चळवळीचा फोकस असू शकत नाही. फोकस स्त्रियांची स्थिती सुधारण्यावर असावा.
निदान अमेरिका युरोपइतपत तरी स्थिती भारतात असावी असं मला वाटतं. आणि युरोप अमेरिकेत स्त्रियांनी हे तिथल्या धार्मिक पितृसत्ताक सिस्टीममध्येही मिळवून दाखवलं आहे.

मी कुठेही असभ्य बोलत नाही. खवचट शक्य आहे. जिथे पटत नाही, तिथेच लिहीले जाते.
युरोप अमेरिकेत स्त्रियांची स्थिती बरी आहे असं मला वाटत नाही. भारत, पाकिस्तान, बांगलादेशने अनेक दशकांपुर्वी स्त्री पंतप्रधान निवडले पण अमेरिकेत अजुनही त्यावर उलटसुलट चर्चा होते हे त्यांच्याकडच्या वेगळ्या प्रकारच्या मागासलेपणाचं लक्षण आहे. तो विषय वेगळा म्हणून इथे सोडून देऊया. तरी जे काय स्वातंत्र्य युरोप अमेरिकेतल्या स्त्रियांना मिळालेय ते फ्रेंच रिवोल्युशनमधून आलेल्या liberty, equality, fraternity या त्रिसुत्रीच्या आधाराने. तिथल्याहि धर्मसंस्थांना हे आजही आवडत नाहीच. भारताची घटनाही याच मुल्यांवर आधारीत आहे आणि मूहणूनच आपल्याकडच्या धार्मिक पक्षांना नकोशी आहे.
मी आधीही म्हटलेय की तुम्ही मनुष्य आणि समाजव्यवस्था यात गफलत करीत आहात. नास्तिक पुरूष हा स्त्रियांबाबतीत आदर्श असेलच असं नाहि किंवा धार्मिक पुरूष वाईट असेल असंही नाही. पण पितृसत्ताक व्यवस्था जातधर्माच्रा माध्यमातून बळकट होते आणि वाइस वर्सा.

पण पितृसत्ताक व्यवस्था जातधर्माच्रा माध्यमातून बळकट होते आणि वाइस वर्सा.///
मान्य आहे. धर्माचा वापर स्त्रियांना बंधनात ठेवण्यासाठी होतोच. पण ज्या धर्मात जाती नाहीत , आणि कम्युनिस्ट देश जिथे धर्माला स्थान नाही तिथेही स्त्रियांची स्थिती ही अशीच आहे. त्यामुळे जात धर्म यावर फोकस न करता प्रॅक्टिकली स्त्रियांची स्थिती सुधारण्यावर स्त्रीवादी चळवळीचा फोकस हवा असं मला वाटतं.

बाकी मला फ्रान्सचं तुम्ही दिलेलं उदाहरण पटलं आणि आवडलं. Happy

सी, रमड, खरं आहे! आमच्या घरी काही फार आधुनिक किंवा फार पारंपरिक वातावरण नव्हतं. पण आई chose to just let go of her liking than force us to eat her favorite dish. आम्हाला आणि तिलाही यात काही वावगं वाटलं नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. We are blinded and insensitive to many such norms.
सुधारणेचं वारं आजवर घराबाहेरच जास्त वाहीलं आहे. जोपर्यंत ते घराघरात वाहत नाही तोपर्यंत खरी समानता दूरच राहील.

जाती नसलेल्या धर्मातही महीलांवर बंधनं आहेत हे बरोबर आहे कारण आधी म्हटव्याप्रमाणे मुळात सर्व "धर्मच" पितृसत्ताक आहेत. कम्युनिस्ट देशातली परिस्थिती नक्की माहीत नाही पण काही दशकांपुर्वी तरी रशियात महीलांची परिस्थिती बाकी जगापेक्षा चांगली होती असं ऐकुन आहे. चीनमधे कम्युनिस्ट हे समाजसुधेरणा, धर्मसुधेरणा वगैरे पंचायतीत न पडता फक्त सत्तेचं केंद्रीकरण यापुरते फोकस ठेवून आहेत आणि चीनी संस्कृती हजारो वर्षांपासून महीलांना दाबण्यासाठी प्रसिद्थ आहे, त्यामुळे त्याचेही प्रतिबिंब आहे की तिथे महीलांची परिस्थिती आजही फारशी चांगली नाही. म्हणजे discriminatory समाज आहे.

दुसरा मुद्दा.. फेमिनिझम चे ठाम सामाजिक व राजकीय सिद्धांत, भुमिका आहेत. त्याविषयी वाचा असं सुचवते. कारण फेमिनिझमचा फोकस काय असावा, नसावा हे आधीपासुनच क्लिअर आहे. ज्या ज्या गोष्टी स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीचे समजण्यास, हक्क देण्यास नकार देतात त्या सर्वच गोष्टी बदलण्यावर फोकस आहे. धर्म निर्मुलन करावा असं म्हणणं नसून त्यातील अनिष्ट, discriminatory प्रथांचं निर्मुलन व्हावं हा उद्देश आहे. म्हणूनच फेमिनिस्ट, एलजीबीटी, कम्युनिस्ट, सोशलिस्ट, अंधश्रद्धा निर्मुलनवाले, प्रोग्रैसिव लिबरल विचारवंत/कलाकार/साहित्यिक हे सर्व एका बाजुला आणि धर्माचा व्यापार, राजकेरण करणारे दुसरूया बाजुला असा सामना आहे. यात कम्युनिस्ट सोडता कोणीही धर्मच बाद करा म्हणत नाही तर तयातील discriminatory परंपरा दूर करायचा उद्देश आहे. पर्स नली यातले अनेक लोक थोड्याफार प्रमाणात धार्मिक असतात (घरी पुजा, लग्न-बारसं वगैरे संस्कार करणारे) पण सामाजिक लेवलला धर्माचा व्यापार, राजकारण, बळकटीकरण करण्याला विरोध असतो कारण त्यातून पेट्रिआर्कि, जातीव्यवस्थ (असली तर) गहरी होत जाते.

जिज्ञासा +11,मुळात काही गोष्टी मनावर बिंबविल्या गेल्या आहेत की त्यात काही वावगं असू शकत हेच मनात येत नाही,वर सांगितल्या प्रमाणे माझ्याही बाबतीत पूर्वी जेवण कमी पडणं झालं होतं,
मी ,मुलगा हाताने खूप वेळ जेवत बसायचा म्हणून नेहमी दोन्ही मुलांना आधी भरवून घ्यायचे नंतर मी आणि नवरा एकत्रच बसायचो जेवायला,
काही वेळा भाजी किंवा एखादा पदार्थ जास्तच आवडला म्हणून मुलं व्यवस्थित खायची आणि माझा अंदाज गडगडायचा,अशावेळी मी काहीतरी कारण काढून नवऱ्यासोबत जेवायला बसत नसे,नंतर काहीतरी शेव,पोहे ,दूध वगैरे घ्यायचे,आणि चक्क मला त्यात चुकीचं काहीच वाटायचं नाही
3 4 वेळा असं झाल्यावर नवऱ्याच्या लक्षात ही गोष्ट आली,आणि त्यानंतर त्याने तो प्रकार बंद करायला लावला,
आताही कधीतरी अंदाज चुकतोच पण आता पर्यायी व्यवस्थेसाठी भागीदार आला आहे Lol

जीझस यांची एक अनुयायी मेरी माग्दालिन ह्यांना जीझसने तोरा वर आधारित पवित्र ज्ञान का शेअर केले म्हणून जी झस च्या बाकी अनुयायांचा विशेष करून पीटर चा राग होता. एका बाई ला पवित्र ज्ञान जाणून घ्यायचा अधिकारच नव्हे अशीच त्यांची भूमिका होती. जी अगदी क ट्टर ज्यू धर्मियांमध्ये अजूनही आहे. ह्यामुळे मेरी माग्दालिन ह्यांच्या चारित्र्यावर ठपका ठे वुन अपमानित केले गेले.

जीझस ह्यांचे पुनरुत्थान झाल्यावर ते पहिले मेरी ला दिस ले त्यामुळे काही काळ ती स्वतःच चर्च होती व पवित्र ज्ञान इतरांना देत होती. हे ही त्यांना बघवले नही व हळू हळू तिची पीछे हाट करत सर्व धर्म पुरुष सत्ताक करून टाकला. राज सत्तेला धर्म सत्तेचे पाठबळ असतेच . राजा देवाचा अव्तार व घरात पति पर्मेश्वर अशी विभाग णी आहेच.

अशी किती घरे असतील ज्यात सकाळी उठल्यापासून उद्या परेन्त काय काय चहा कॉफी नाश्ता जेवणे उपहाराचे रेडी पदार्थ ह्याचे प्लॅनिन्ग व प्लेटा भरलेल्या टेबलावर ठेवणे कप हातात देणे हे घरातले बाप्ये करतात? ते बाईनेच करायचे व काही त्यात फेल गेल्यास तिनेच सुधारायचे.
कमी पडल्या स मॅनेज करायचे हे सर्व सोशल क्लासेस मध्ये आहे. असे का? हा कमावून आणतो म्हणून? नाही बाय जेंडर तो सुपीरीअर आहे म्हणून ते अध्यार्हुत आहे सोशल कंडिशनिन्ग मध्ये. ते चुकीचे आहे असेच कोणा ला वाटत नाही बायकांना सुद्धा.

कमी पडल्यास मॅनेजः
कधीकधी स्वतः केलेल्या पदार्थाचा/प्रॉडक्ट चा इतका अभिमान असतो की त्यातले सर्व चांगले दिसणारे, प्रसन्न करणारेच कन्झ्युमर च्या (मी कस्टमर च्या म्हणत नाहीये) डोळ्याला दिसले पाहिजे, पोटात गेले पाहिजे, वाईत दिसणारे पुरावे नष्ट झाले पाहिजेत या आग्रहातून फुटलेल्या पुरणपोळ्या स्वतः खाणे, स्वतःला मोडलेली पॅटिस ठेवणे, चिकटलेले तुकडे झालेले गार डोसे ठेवणे असे प्रकार घडतात. पण असे स्वतःला वागवू नये हे हळूहळू कळत जाते. इतरांना वाफाळते डोसे वाढले तर शांतपणे 'आता मला गरम डोसे करुन घाला, मी बसते' म्हणून स्वतःही गरम, न तुटलेले ताजे डोसे खाता यावे. खाणं हा पोट, डोळे, मन सगळ्याचा सम प्रमाणात भाग आहे.तुम्ही नुसतं पोट 'भरुन' (एखाद्या पिशवीत पटापट कांदे भरल्यासारखं) ते तृप्त होत नाही.
आणि हे जेव्हा स्वतःला कळतं, पटतं तेव्हा ओट्याशी उभं राहून घाईत ४ घास कोंबणे, तुकडे डोसे खाणे, कामं करत गार झालेला चहा २ मिनीटात मटकवून पुढच्या कामाला पळणे हे कमी होत जातं. आपण खूप छान माणूस (किंवा बाई आहोत), आपण खूप कामं बर्‍यापैकी चांगली करतो. आणि आता खूप कामं बर्‍यापैकी चांगली करण्याचं ज्ञान इतरांनाही (म्हणजे फक्त घरातली मुलगी नाही, नवरा/भाऊ/ मुलगा पण) देऊ शकतो, आपण सुद्धा बसल्या जागी चांगल्या गोष्टी मिळवायला लायक आहोत. (आता पेप टॉक पुरे कामाला जाते)

धर्मात सुधारणा व्हायला हवी हे मान्य आहे.

फेमिनिस्ट, एलजीबीटी, कम्युनिस्ट, सोशलिस्ट, अंधश्रद्धा निर्मुलनवाले, प्रोग्रैसिव लिबरल विचारवंत/कलाकार/साहित्यिक हे सर्व एका बाजुला///
यातले अनेकजण - अनेक स्त्रीपुरुष - हे फेमिनिस्ट असतीलच असं नाही. LGBT /कम्युनिस्ट/ सोशालिस्ट /स्वघोषित लिबरल व्यक्ती किंवा विशिष्ट समूहाच्या हक्कांसाठी चळवळ करणारा व्यक्ती हा बाय डिफॉल्ट फेमिनिस्ट धरता येणार नाही.
स्त्रीवादी चळवळ यांच्यापैकी कोणावर अवलंबून न राहता जिथे स्वयंपूर्ण झाली तिथे यशस्वी झाली. उदा- अमेरिकेत स्त्रीवादी चळवळीत डाव्या उजव्या दोन्ही राजकीय पक्षाच्या स्त्रिया एकत्र काम करत होत्या. त्यामुळे स्त्रियांना डाव्याउजव्या गटात विभागून भांडण लावणे आणि मूळ मुद्द्याला बगल देणे अवघड होते. सरकार कोणाचंही आलं तरी स्त्रीवादी दबाव गट तिथे असणारच होता.

हे जेव्हा स्वतःला कळतं, पटतं तेव्हा ओट्याशी उभं राहून घाईत ४ घास कोंबणे, तुकडे डोसे खाणे, कामं करत गार झालेला चहा २ मिनीटात मटकवून पुढच्या कामाला पळणे हे कमी होत जातं. ">>>exactly, आधी हे चुकीचंच आहे हे कळलं आणि मुळात वळलं पाहिजे,
मलाच ही गोष्ट समजत नसेल तर माझ्या पुढच्या पिढीला मी अत्यंत चुकीचा संदेश देत आहे असं होणार,
शिळपाक,उरलेलं,तुटक फुटलं मी 10वेळा घेतलं तर 11 व्या वेळी ती डिश/पदार्थ माझ्यासाठीच राखीव राहणार,मग नंतर मी टिपं गाळून काय उपयोग की हे असलं माझ्याच वाट्याला का आलं म्हणून??

बरोबर आदू. मुळात मुलं हे पाहत मोठी नाही झाली पाहिजेत की शिळ्य भाताचा फोडणीभात करुन आई एकटीच खात असे. (मग ही मुलं मोठी होऊन मुक्तपीठ मध्ये 'आई/आजी सण वाराच्या काळात दुपारी ४ला कशीबशी जेवत असे, तिचा चेहरा कोमेजून जात असे, डोकं दुखत असे पण सर्वांच्या चेहर्‍यावरील आनंद
बघूनच तिचं पोट भरत असे' वाले गहिवरलेले लेख लिहीतात.)
त्यापेक्षा सगळे मिळून कालच्या भाजीच्या थालीपीठाचा किंवा फोडणीभाताचा एक एक घास नाश्ता करताना खा किंवा 'खाणं नासतं ,पैसे वाया जातात' वगैरे डायलॉग न टाकता ते कंपोस्ट च्या पोटी घाला.

जर घरातील मोठ्या सदस्यांना (स्त्री पुरुष दोघेही) या प्रकारच्या गोष्टी चालत/आवडत असतील तर मग या गोष्टी अशाच पुढे चालू राहतात. जिथे शक्य आहे तिथे हे अनावश्यक लाड बंद केले पाहिजेत.

दुसरी एक मजेशीर गोष्ट मला जाणवते ती म्हणजे माझे भाऊ किंवा मित्र ज्यांना मुली आहेत त्यांचे त्यांच्या मुलींशी खूप छान नाते आहे. They are like buddies. ते आपल्या मुलींचे भरपूर लाड, कौतुक करत असतात. पण हे पाहीले की मला चिंता वाटते. कारण इतक्या लाडात वाढलेल्या मुलीला बाई झाल्यावर करायला लागणाऱ्या compromises मध्ये फारसा फरक पडलेला नाहीये. मुलीचे लाड आणि आई किंवा बायकोला गृहीत धरणे हा एक नवीन ट्रेंड रूळताना दिसतो. या पद्धतीने वाढवल्या जाणाऱ्या मुलींच्या मनावर आपण मुलगी या रोलमध्ये आहोत तोवर लाड होतात आणि बायको किंवा आईच्या रोलमध्ये आपल्याला फारसा say नसतो असं कुठेतरी बिंबवलं जातंय की काय याची भीती वाटते. जे चुकीचे आहे.

Pages