आठवणी... पहिल्यांदा काही केल्याच्या/अनुभवल्याच्या

Submitted by अतुल. on 2 February, 2021 - 01:50

पहिले प्रेम, पहिला पगार, पहिला पाऊस, नोकरीचा पहिला दिवस... ह्या आणि अशा अनेक गोष्टी पहिलेपणाच्या न विसरण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

पण ह्या व्यतिरिक्त अनेक "पहिल्या" अविस्मरणीय गोष्टी असतात कि ज्या आपण कधीतरी पहिल्यांदाच केलेल्या, पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या असतात. आणि तेंव्हा हे पहिल्यांदाच असल्याने आपल्याला त्याविषयी काही माहित नसते त्यामुळे कधी थरार तर कधी गोंधळ अशा गमतीजमती घडत असतात. आणि आता आपण जेंव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा ह्या मजेशीर आठवणी आपल्याला गालातल्या गालात हसायला लावतात. इथे अशाच काही मजेशीर आठवणी आपण शेअर करूया...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिफ्टचा पहिला अनुभव:

ह्या गोष्टीला बरीच वर्षे झाली. पण अजूनही आठवले कि मला हसायला येते.

माझे बालपण खेडेगावात गेले. तेंव्हा जवळच्या शहरातसुद्धा लिफ्ट आली नव्हती. पण एके वर्षी या शहरात एका बिल्डिंगमध्ये (commercial complex) लिफ्ट बसवली गेली. माझ्या माहितीनुसार ती त्या शहरातली पहिलीच लिफ्टवाली इमारत होती.एक दिवस त्या इमारतीत वर एका दवाखान्यात मला जायचे होते. म्हटले चला लिफ्टने जाऊ. बरेच ऐकले आहे लिफ्टविषयी, आज अनुभव घेऊ.

लिफ्टपाशी पोहोचलो तेंव्हा तिथे लिफ्टमन नव्हता. पण माझे शाळकरी वय होते त्यामुळे फाजील आत्मविश्वास होता. लिफ्टमध्ये पहिल्यांदाच जात असूनही मला तेंव्हा लिफ्टमनची गरज वाटली नाही. झाले. त्या तेंव्हाच्या जुन्या लिफ्ट, तुम्हाला माहितीच आहेत. त्याला बाहेर लाकडी दार आणि आत लोखंडी ग्रिलचे दार. ते दोन्ही दरवाजे उघडून मी ऐटीत आत गेलो. दार व ग्रिल बंद केली. बटनांचा बोर्ड दिसला. मिस्टर बीन सारखे त्या बोर्डकडे पाहिले. आणि कॉमन सेन्स वापरून आपल्या मजल्यासाठीचे बटन दाबायचे असा विचार करतोय न करतोय तोच खाड्डकन आवाज झाला आणि लिफ्ट हलली. आपसूकच सुरु होऊन ती वेगाने वर जाऊ लागली. माझे थोबाड बघण्यासारखे झाले. अरे? काही न करताच आपोआप कशी सुरु झाली? बिघडली तर नसेल ना? मी घाबरलो. माझी पाचावर धारण बसली. माकडाने फांदीला धरावे तसे तिथल्या दांडीला घट्ट धरून मी कसाबसा उभा राहिलो. अक्षरशः मिस्टर बीन झाला होता माझा.

वास्तविक झाले असे होते कि मी बटण दाबायच्या आतच वरून कोणीतरी लिफ्ट बोलवली होती. त्यामुळे ती अचानक सुरु होऊन वर जाऊ लागली. पण तेंव्हा पहिल्यांदाच लिफ्टचा अनुभव, ते सुद्धा एकटाच. त्यामुळे तेंव्हा हे लक्षात आले नाही. लिफ्ट अचानक सुरु झाली म्हणजे काहीतरी बिघाड झाला असेल अशी समजूत झाल्याने मी घाबरलो. घशाला कोरड पडली. दरवाजाकडे लक्ष होते. ग्रिल मधून एकेक मजल्याचा आकडा खाली जाताना दिसत होता. तिथे बटणांच्या बोर्डवर खाली "Stop" लिहिलेले लाल बटन होते. माझा मजला येताच मी घाईघाईने ते बटन दाबले. तुम्हाला धमाल चित्रपटातला तो प्रसंग आठवतोय ना?

"वहां एक ऱेड बटन है?"
"हां है. दबा दिया. आगे बोलो..."
"नही दबाना था! वो बटन दबाने से मेन इंजिन बंद हो जाता है"

माझे अगदी तसेच झाले. लाल बटन दाबल्याने लिफ्ट मध्येच बंद पडली. ना धड वर ना खाली. मला जायचे त्या मजल्याचा दरवाजा अर्धाच दिसत होता. मी विचार केला, लिफ्ट थांबली बरे झाले. दोन्ही दारे उघडून ढेंग टाकून वर जाऊ. पण कसचे काय? आतले ग्रीलचे दार उघडले खरे, पण बाहेरचे लाकडी दार उघडायला काही तयार नाही. अर्थातच ते लॉक झाले होते. लिफ्ट अर्ध्यात असल्यास बाहेरचे दार उघडत नसते हे आता माहित झाले आहे. पण तेंव्हा कुठे आलेय हे माहित असायला? मी जीवाच्या आकांताने तो लाकडी दरवाजा हाताने ढकलून उघडायचा आटोकाट प्रयत्न करू लागलो. आणि आतले ग्रील उघडे असल्याने लिफ्ट जागच्या जागी थिजली होती. वरच्या खालच्या मजल्यावरचे लोक लिफ्टचे बटन दाबून लिफ्ट बोलवायचा प्रयत्न करत होते. पण लिफ्ट ढिम्म. कोणालाच काय झालेय कळत नव्हते. मी विविध बटने दाबून प्रयत्न करत होतो. पण ग्रील उघडे असल्याने लिफ्ट जागची हलत नव्हती (हे आता कळते). अखेर मी मदतीसाठी अलार्म चे बटन दाबले. त्यासरशी कुठेतरी किरर्र आवाज झाला खरा. पण नंतर काहीच नाही. मला घाम फुटला. बाहेर लोक येऊन दार उघडायची धडपड करून जात आहेत हे मला जाणवत होते. पण लिफ्ट हा प्रकार तेंव्हा तिथे नवीन असल्याने बहुतेक लोकांना नक्की काय झालेय कळत नव्हते.

मी अक्षरशः रडकुंडीला आलो होतो. काय करावे सुचेना. बाहेरून कसले कसले आवाज येत होते. ओरडून कोणीतरी मला कि अन्य कुणाला काहीतरी सूचना सांगत होते. पण मला मात्र काहीच कळत नव्हते. अखेर बऱ्याच बऱ्याच वेळाने कोणीतरी वयस्क आजोबा लिफ्टच्या दरवाजापाशी आले व मोठ्याने ओरडून त्यांनी मला आतले ग्रील घट्ट लाऊन घ्यायला सांगितले. मी तसे करताच त्यांनी बाहेरून लिफ्टचे बटन दाबले. त्यासारखी लिफ्टबाई आनंदाने नाचत ठुमकत वर सरकली आणि त्या मजल्यावर थांबली. मी लिफ्टला मनातल्या मनात चार शिव्या घातल्या. पण दरवाजा उघडल्यानंतर जी सुटका झाली तिचे वर्णन काय करावे महाराजा! कोंडलेल्या खोलीचे दार उघडल्या उघडल्या बोका पळून जावा तशी मी धूम ठोकली. Lol ते आजोबा पाठीमागून माझ्याकडे बघत होते पण मी कसला थांबतोय. दवाखान्यातून परत येताना मात्र जिन्यानेच धाड धाड धाड धाड सात का आठ मजले उतरून खाली आलो.

आजच्या काळात लिफ्ट जवळजवळ सगळीकडे आहे. व दिवसागणिक कित्येकदा आपण तिचा वापर करतो. पण इतक्या वर्षांनी सुद्धा जेंव्हा लिफ्टचा हा पहिला वापर मला आठवतो तेंव्हा अजूनही मला हसायला येते.
Biggrin

Rofl धमाल किस्सा आहे. तुम्ही इथे लिफ्ट चा किस्सा लिहीलात, पण इकडे माझ्या की बोर्डवर जादू झाल्याप्रमाणे कर्सर लिफ्टसारखा खाली वर सरकु लागला. Proud प्रतीसादच लिहीता येईना. Proud

Lol मस्त अनुभव लिफ्टचा. मला दुसरा एक व्हिडिओ आठवला. दोन स्कॉटिश लिफ्टमध्ये अडकलेले असे नसतात, पण लिफ्ट त्यांचं 'ऐकत' नसते. Wink

https://youtu.be/TqAu-DDlINs

छान धागा.
मी जेव्हा प्रथम परदेशात गेलो तेव्हाचा तिथल्या रुग्णालयातील पहिल्या दिवसाचा हा अनुभव.

तेव्हा माझे संगणकाचे ज्ञान अगदी जुजबी होते. तिथे गेल्यावर लक्षात आले की रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाच्या सर्व नोंदी त्यांनी मध्यवर्ती संगणकीय प्रणालीमध्ये ठेवलेल्या होत्या. भारतात मला याचा काही अनुभव नव्हता. त्यामुळे आता पहिल्या दिवशी ती सर्व प्रणाली शिकणे आले. एक मध्यमवयीन कॉकेशियनवंशीय बाई मला ते शिकवणार होत्या. पहिल्या दिवशी तिथे गेलो आणि एकदम या स्कर्ट घातलेल्या बाई मला शिकवायला सज्ज झाल्या.

आम्ही संगणकासमोर बसलेले आणि ही प्रणाली वगैरे भानगड माझ्यासाठी पूर्ण नवीन. आणि त्यात शेजारी या स्कर्ट घातलेल्या बाई. त्यामुळे चित्त विचलित होऊ लागले. सुमारे अर्धा तास त्या मला काही काही सांगत होत्या आणि मी फक्त ‘हं, हं’ करत होतो. ते त्यांच्या लक्षात आले असावे. मग त्यांनी “आता आपण ब्रेक घेऊ” असे म्हणून आजचा धडा संपवला.
स्पष्ट सांगायचे तर मला काही सुधरले नव्हते. माझा बराचसा वेळ संगणकापेक्षा त्यांच्याकडे कुतूहलाने बघण्यातच जात होता ! Bw

आठवडाभरात त्या गोष्टीवर प्रभुत्व आले हा भाग वेगळा. पण अजूनही तो पहिला दिवस आठवला की स्मरणरंजन होते.

माझा थोडा विचित्र अनुभव आहे. कॉलेजमध्ये असताना २०१२ हा जगबुडीवरचा सिनेमा आला होता. आम्ही तीन मित्र नाईट शोला अलका थेटरात गेलो. मला जवळ असल्याने मी कायम सिटीप्राईड कोथरुडलाच जायचो पण ह्या एका वेळी गेलो होतो अलकाला त्यांच्याबरोबर. इंटर्वलमध्ये हलके होण्यास गेलो तर तिथे भली मोठी गर्दी आणि फार कमी बुथ होते त्यामुळे रांग लागलेली होती. पण त्याचवेळी महिलांच्या सेक्शनला मात्र कोणीच नव्हते कारण बाहेरून कडी तशीच होती बहुतेक का काय नक्की आठवत नाही आता. रांगेतले दोन जण धाडस करून तिकडे गेले आणि आमच्यापैकी एक युपीचा मित्रही त्यांच्यामागे गेला. आता आमचाही दम सुटत चालला होता मग आम्हीही मागे गेलो त्यानंतर थोड्या अवधीतच पण आमच्यामागे मात्र कुणीही येण्याचे धाडस केले नाही. इकडे आधीचे तिघे बाहेर पडले आणि आमचा मित्र आम्हा दोघांसाठी द्वारपाल म्हणून थांबला बाहेर. तोवर बऱ्याच महिला आल्या तिथे आणि त्याला भरमसाठ शिव्यांची लाखोली वाहून सगळ्या खानदानाचा उद्धार केला त्याच्या. बाहेर वातावरण तंग झाले होते कारण कोणीतरी सेक्युरिटीला बोलवले होते बहुतेक. हा सगळा तमाशा ऐकत असताना कुणाचे तोंडही न पाहता आम्ही दोघे जे सुसाट वेगात बाहेर पडलो थेट सिनेमाला येऊन बसलो परत. तो बिचाराही सगळ्यांची माफी मागून गयावया करून आला मागून आमच्या. पुन्हा असल्या फ़ंदात नाही पडलो आणि तशी गरज नाही पडणार अशी काळजी घेतो आता. तसे पहिल्या अनुभवांचे बरेच किस्से आहेत भन्नाट पण ते NSFW टाईप आहेत.

@रश्मी. : Lol हो खरे आहे. होते असे कधीकधी. एकदा तर मी असा कर्सर अनुभव "अमानवीय" मध्ये लिहिता लिहिता थांबलोय Wink

@वावे: मस्त आहे व्हिडीओ Lol .. आधुनिक काळातल्या व्होईस कमांडवाल्या लिफ्टचा "पहिला" अनुभव.

@कुमार१: कुमार सर अगदी अगदी... Lol माझा पण पहिला कॉम्पुटरचा अनुभव असाच काहीसा आहे. या निमित्ताने आठवला. जो मी लिहीन थोड्या वेळात इथे

@जिद्दु ... खरेच वेगळा अनुभव आहे. असे अनुह्भ्व सुद्धा कधी न कधी येतात कि जे पहिले आणि शेवटचेच असतात

@ललिता-प्रीति: वाह Happy काय मस्त दृष्टीकोन दिलात. खरोखरच नकारात्मक घटनांकडे "पहिला अनुभव" म्हणून पाहिला तर किती हलके वाटते. तुम्हाला मी धन्यवाद देतो कारण मी अलीकडे अशाच एका नकारात्मक अनुभवातून गेलोय व तो कटू प्रसंग विसरायचा प्रयत्न करतोय. पण आता त्याकडे "असेही अनुभव असतात व हा बस्स एक पहिला अनुभव" असा विचार करतो तेंव्हा खूप हलके वाटते Happy ग्रेट आर्टिकल. शेअर केल्याबद्दल धन्यवाद

कॉम्पुटर्सचा पहिला अनुभव:

कॉम्पुटर्स नवीन आले होते तेंव्हाची गोष्ट. तेंव्हा ते अतिशय नाजूक होते. त्यांना एसी रूम लागायची. धुळीचा कण सुद्धा चालत नसे, म्हणून पादत्राणे बाहेर काढून मंदिरात जावे तसे कॉम्पुटर असलेल्या विभागात अनवाणी जावे लागायचे (तुम्हाला सुद्धा आठवतात का ते दिवस?). तेंव्हा मी ज्युनिअर कॉलेजात होतो. थोरला भाऊ मात्र बेंगलोरला जाऊन त्याच्या कामासाठी लागणारे कॉम्पुटर्सचे शिक्षण घेऊन आला होता. त्यामुळे त्याच्या कॉलेजात कॉम्पुटर विभाग त्यालाच सांभाळायला दिला होता. मी आपला कधीमधी "कॉम्पुटर कसला असतो ते" बघण्यासाठी त्याच्यासोबत जाऊन त्याच्यामागे बसून तो काय करतो ते नुसते बघत बसायचो (काय दिवस होते ते!).

तर एकदा भाऊ काम करत होता. कॉलेजच्या त्याच्या कामाचे एक डॉक्युमेंट तो कॉम्पुटरवर बनवत होता आणि मी नेहमीप्रमाणे मागे बसून पाहत होतो. अचानक भावाला काही कामासाठी खोलीबाहेर जावे लागले. तर तेवढ्या वेळात इकडे तिकडे पाहताना असेल कि काय, कसा कोण जाणे, पण माझा कीबोर्डला धक्का लागला. त्यामुळे स्क्रीनवरची अक्षरे वरखाली झाली. एका रेषेत होती ती शिस्त बिघडली. ते पाहताच मी घाबरलो. डोक्याला हात लावून बसलो. मला काय करावे सुचेना. वाटले भावाने केलेले सगळे काम बोंबलले. आता ओरडा खायला लागणार. बराच वेळ नुसताच स्क्रीनकडे बघत बसलो.

थोड्या वेळाने भाऊ आला. माझ्याकडे पाहून "काय झाले?" विचारले. मी त्यांना स्क्रीनकडे बोट दाखवत सांगितले अचानक अक्षरे हलली आणि माझी काही चूक नाही. त्यावर "अच्छा ते होय" असे म्हणून दोन तीन बटने त्याने खट खट बडवली आणि एका सेकंदात सगळे पूर्वपदावर आणले. ते बघून माझ्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. भावाचे कोण कौतुक वाटले. हि इज सिम्पली ग्रेट अशी भावना मनात दाटून आली.

आज कॉम्पुटर आणि सॉफ्टवेअर व्यवसायात मध्ये इतकी वर्षे काढूनही तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो. भावाने तेंव्हा फक्त Ctrl+Z दोन तीन वेळा दाबून Undo Undo Undo केले होते हे सुद्धा मला आता कळते. पण मीच जेंव्हा कॉम्पुटर समोर पांडू होतो तेंव्हा हे अनडू मला कसे कळणार होते? Lol
---

कॉम्पुटरचा असाच अजून पहिला अनुभव प्रशिक्षण घेत असतानाचा. तेंव्हा संगणक प्रशिक्षण संस्था जोमात होत्या. आणि त्यात शिकवणारे प्रशिक्षक टेचात होते. तर अशाच एका संगणक प्रशिक्षण संस्थेत मी शिकत होतो. आम्हाला प्रशिक्षक डॉस (Disk Operating System) शिकवत होते. Dos च्या मुलभूत आज्ञा मध्ये DIR (डिरेक्टरी) हि अगदी मुलभूत आज्ञा. अनेकांना माहित असेल. तर प्रशिक्षकांनी DI असे टाईप केले व कुणाचा फोन आला म्हणून ते बाहेर निघून गेले. त्यांना यायला पंधरा वीस मिनटे गेली. तेवढ्या वेळेत आम्ही दोघे तिघे त्या DI कडे नुसतेच बघत बसलो होतो. प्रशिक्षक परत आल्यानंतर त्यांनी R टाईप केला व एंटर केले. अशा रीतीने कॉम्पुटरवरच्या फाईल्स कशा पहायच्या याचे पहिल्यांदा शिक्षण मिळाले Lol DIR मधल्या DI कडे नुसतेच बघत बसण्याच्या प्रसंगाची आजही जुन्या मित्रांत आठवण निघते.

भारीए धागा..
माझी पण एक गंमत आठवली..
पहिल्या जॉबमधे असताना पहिल्यांदाच एकटीने विमान प्रवास केला होता. इंडिगो ने पुणे ते दिल्ली.
दिल्लीत लँड झाल्यावर ऐयरपोर्ट शटल बस मधे सगळे प्रवासी चढले... मी गोंधळात म्हणजे मला माहितीच नव्हते कि अशी बस पण असते ..सहप्रवाशाला विचारले हि बस कुठे जाते..त्याने काहिच नाही सांगितले... मग दोन तीन मिनटांत एयरपोर्ट वर उतरल्यावर माझ्या लक्षात आले कि ती बस फक्त इथपर्यंतच असते Happy

संगणकाचे किस्से भारीएत..
अतुल..DI चा स्पेशली Lol
लिफ्टवाला किस्सा पण मजेशीर आहे..

वावे.. विडिओ भारीए Rofl

@मृणाली धन्यवाद. एअरपोर्ट वर Lol माझे पण एअरपोर्टवरचे पहिले अनुभव असेच आहेत. सांगेन नंतर एकेक.

@लावण्या धन्यवाद Happy

खरंय , एअरपोर्ट अनुभवासाठी वेगळा धागा हवा Lol

"वहां एक ऱेड बटन है?"
"हां है. दबा दिया. आगे बोलो..."
"नही दबाना था! वो बटन दबाने से मेन इंजिन बंद हो जाता है"
असंच काहीस पहिल्यांदा दुचाकी वर बसले तेव्हा झालं होतं. मी दहावीत होते आणि स्कुटी ES तेव्हा एकदम प्रसिद्ध होती. माझ्या आत्याने नवीन च घेतली होती. ती कुठेतरी बाहेर गावी जाणार होती .त्यांच्या बिल्डिंग मध्ये सीट कव्हर वर ब्लेड मारायचे कार्यक्रम चालायचे , त्यामुळे १५ २० दिवस गाडी आमच्या कडे असणार होती.
तिच्या बस सुटण्याच्या ठिकाणावरूनच आम्ही गाडी पिक अप केली . मी सहज बसून बघितलं आणि विचारलं हे पिवळं बटन कसलंय ? बाबा म्हणाले गाडी सुरु करायच आणि झालं मी ते दाबलं, गाडी सुरु झाली, accelerator घट्ट धरून ठेवल्यामुळे पुढे गेली, तिकडून आत्या बस मधून बघतेय, इकडे बाबा ओरडत होते ब्रेक दाब ब्रेक दाब, मला काहीच सुधरत नव्हतं शेवटी गाडी एका झाडावर आपटली. मला काहीच झालं नाही पण गाडीचं नुकसान झालं
घरच्यांनी इतकं झापलं कि विचारू नका ,पुढे गाडी शिकाय साठी पण दुसऱ्याची गाडी चालवायची हिम्मत झाली नाही

हो हे स्कूटीचं माझ्या बाबतीतही झालंय एकदा. पण आपटले नव्हते. मैत्रिणीची गाडी होती. मला सवय नव्हती. जवळच जायचं होतं आणि वेळ नव्हता म्हणून घेऊन गेले होते आणि कंट्रोलच होईना. एक मुलगा बाजूला उभा होता तो ओरडला, ब्रेक दाबा, ब्रेक दाबा. तेव्हा एकदम डोक्यात प्रकाश पडला आणि ब्रेक दाबला. Lol

यावरून आठवलं, माझ्या बहिणीने नवीन एम80 घेतली होती. तेव्हा मुली एम80 किंवा लुना चालवायच्या. स्कूटी/स्पिरिटपूर्वीचा काळ. तर त्या एम80 ला गाडी बंद करण्यासाठी एक बटण असायचं. हे सुरुवातीला काही दिवस बहिणीला माहितीच नव्हतं. Lol गाडी बंद करायची वेळ आली, की ती गाडी गिअरमध्ये ठेवूनच क्लच, ब्रेक सगळं जोरात दाबायची की गाडी बंद पडायची Wink एकदा सिग्नलवर गाडी चालू स्थितीत, न्यूट्रलवर अशी थांबलेली असताना मागे बसलेल्या मैत्रिणीने विचारलं, हे बटण कसलं आहे? बहीण म्हणाली, काय माहिती.. आणि तिने ते बटण दाबलं आणि गाडी बंद झाली. तिला मोठाच शोध लागल्याचा आनंद झाला Lol

>> हे पिवळं बटन कसलंय ?

नही दबाना था! वो बटन दबाने से मेन इंजिन शुरू हो जाता है Lol

>> हे बटण कसलं आहे? बहीण म्हणाली, काय माहिती..

दबाना था! वो बटन दबाने से मेन इंजिन बंद हो जाता है Lol

दोन्ही किस्से भारी आहेत Happy

एअरपोर्ट बाहेरच्या टॅक्सिचा अनुभव आहे. मी लंडनमध्ये पहिल्यांदा उतरल्यावर काळ्या टॅक्सित सामान कोंबून गन्तव्यस्थळी पोहोचलो आणि ४८ पौंडचे भाडे आले. अर्थातच भारतातील स्वस्तातमस्त रिक्षा आठवली आणि इथूनपुढे शिस्तीत पैसे खर्च करावे लागतील हा धडा मिळाला.

छान किस्से आहेत.
मी एकदा पंधरा वर्षाचा असताना मला एकदा विजापूरला जावे लागले आजी आजोबांना आणायला, नागपूर जवळील आमच्या गावावरून. गावा वरून दौंड पर्यंत ट्रेन होती, दौंडला ट्रेन बदलून सोलापूर आणि सोलापूर वरून विजापूरला बस असा प्रवास होता. आमच्या गावी ऑटो रिक्षाही नव्हत्या, म्हणजे शेअरिंग वाल्या सुद्धा नाही. बाबांनी सांगितले होते सोलापूर स्टेशन वरून बस स्टँडला जायला काय मिळते पहा, शेअर रिक्षा असेल तर ठीक नाही तर मीटर प्रमाणे घेऊन चला म्हणुन सांग, नाही तर काही लोक जास्तीचे पैसे सांगतात. एकतर एवढ्या लांबचा आणि नविन ठिकाणी एकट्याने पहिलाच प्रवास होता. सोलापूर स्टेशन ते बस स्टँड पर्यन्त ऑटो रिक्षानेही पहिलाच प्रवास होता. तिथे शेअर रिक्षा नव्हती, एके ठिकाणी रिक्षांची रांग होती. त्या रांगेत गेलो आणि माझा नंबर आल्यावर मीटरनेच पैसे देणार सांगितले. ऑटो वाला हो रे बस म्हणाला. बस स्टँडला येई पर्यंत मी मीटर मध्ये पळणारे आकडे पहात होतो बस स्टँड दिसायला लागलं आणि मीटर मध्ये दिसत होते पाच रुपये काही पैसे. मनात म्हटलं काही फार नाही. उतरल्यावर मी मीटर प्रमाणे मोजून पाच रुपये आणि वरून एक रुपया काढला द्यायला, तोवर ऑटोवल्याने एक कार्ड काढले आणि सांगितले काही तरी वीस रुपयांच्यावर. मी म्हणालो मीटर तर एवढेच दाखवतंय. तरी त्याच्या लक्षात आले नाही आणि तो म्हणाला हो ना त्याप्रमाणेच एवढे होतात बघ. मला वाटले हा मला लुबाडतो आहे कसलेसे कार्ड दाखवून. मी हे कसले कार्ड दाखवताय म्हणालो तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणाला कुठून आलास, पहिल्यांदा रिक्षात बसलास का? मला अजून वाटले हा लुबाडतो आहे त्यासाठी असे काही बोलतो आहे, याने मी नवीन आहे आधीच ओळखले असेल.
मी हुज्जत घालायला लागलो. त्याने कपाळाला हात मारला, दुसऱ्या एका रिक्षावाल्याला म्हणाला सांग रे याला समजावून. दोन तीन ऑटोवाले आले आणि कोणी मला सांगायचा प्रयत्न करू लागले तर कोणी कुठून कुठून येतात वगैरे बोलु लागले. कुणी हसत होते. मी पार गोंधळून गेलो. खरं सांगताहेत की मला फसवताहेत. तेवढ्यात एक ट्राफिक पोलिसच आला, जवळून जात असावा कुणी ऑटोवल्यानेच हाक मारली असावी बहुतेक. मग त्याने मला सांगितले की ऑटोवाला बरोबर सांगतोय मीटर जूनं असतं, ऑटोचे भाडे वाढले की मीटर आपोआप ते दाखवणार आहे का? म्हणुन हे कार्ड असतं.
मग मी चांगलाच वरमलो. माफी मागून पैसे देऊन अक्षरशः पळत बस स्टँड मध्ये शिरलो.

@जिद्दु , @मानव Lol दोन्ही किस्से भारी आहेत. पहिल्यांदा आपल्याला माहित नसते किंवा जिथे माहित नसते तिथे आपण काही गोष्टी गृहीत धरतो.

पंख फुटलेल्या वयात जेवणाचा डबा (टिफिन) घेऊन थेट एका हॉटेलमध्ये बसल्याचा अनुभव मला आठवला. मला तेंव्हा माहित नव्हते कि हॉटेलमध्ये बाहेरचे खाणे आणून खायचे नसते. मी आपला बिनधास्त गेलो आणि कोपऱ्यातला एक मोकळा टेबल बघून निवांत डबा उघडून खाऊ लागलो. तर वेटर तणतणत आला. इथे डबा खायचा नाही म्हणाला. मला आश्चर्य वाटले कारण इथे डबा खाण्यात गुन्हा काय हेच उमगत नव्हते Lol मला वाटले हा उगीच धतींगगिरी करतोय आपल्यावर. मी म्हणालो, "का खायचा नाही ते आधी सांग. तसाही टेबल मोकळाच होता ना? मी बसून डबा खाल्ला तर तुम्हाला काय नुकसान आहे मग?" हा माझा तात्त्विक मुद्दा होता Biggrin पण त्याला कुठे आलेय तत्व कळायला. त्याने मालकाला बोलवले. त्याने दरडावून सागितले आमच्या हॉटेलात बाहेरचे खायचे नाही. अत्यंत हिरमुसला होऊन तिथून बाहेर पडलो. घरी येऊन तक्रार केली म्हणालो तुम्ही चलाच जरा माझ्यासोबत जाब विचारू त्यांना. त्यावर घरात सगळे हसायला लागले. त्यांनी मग समजून सांगितले. म्हणाले कोणत्याच हॉटेलमध्ये डबा खायला परवानगी नसते. सगळे असे आपापले डबे बाहेरून आणून खात बसले तर त्यांचे हॉटेल कसे चालेल? हा युक्तिवाद मात्र मला पटला Happy

भारीच किस्से एकेक Lol
का खायचा नाही ते आधी सांग. तसाही टेबल मोकळाच होता ना? मी बसून डबा खाल्ला तर तुम्हाला काय नुकसान आहे मग? >>>>>> बापरे एवढं डेअरींग Lol

लहानपणी ची गोष्ट आहे. एकदा सगळे फॅमिली हॉटेल मध्ये जेवायला गेलो होतो. जेवण झाल्यावर पप्पानी बिलबुक बघून त्यात पैसे ठेवले. उरलेले पैसे आणून वेटर ने ते बुक परत समोर ठेवले. त्यातले 5 रुपये ठेऊन पप्पांनी बाकीचे पैसे उचलले व ते निघू लागले, तर मी ते पैसे पप्पा विसरले असावेत असे समजून उचलून आणले. सगळ्यांना समजल्यावर सगळे हसायला लागले. तेव्हा टीप बीप कुठली माहीत असायला. अजून सगळे जमले की मला चिडवतात.

आज दृष्यावरून धाग्यावर जी आठवण निघाली ती इथे टाकणे बरोबर ठरेल. आशिकी मधलं धीरे धीरे से गाणं खूप आवडतं पण सिनेमा तसा जुना असल्याने नंतर यूट्यूबवर गाणे बघितले गेले. त्यात अनु अगरवालचा चर्च मधला एक शॉट इतका जबरदस्त लक्षात राहिला होता - लायटींग, काँपोझिशन इ साठी! (दृष्यावरून धाग्यावर भाग्यश्रीने हा शॉट दिलेला आहे). मग चर्चमध्ये कधी नंतर जाण्याचा योग आला तर "असाच्च" एक फोटो काढायचा होता. पण तो प्रीस्ट आला नि इथे नाही यायचं अशा छापाचं काही सांगू लागला. तरी चोरून काढला Wink एवढा एकच फिल्मी फोटो माझ्याकडे आहे. बाकी सगळे पटेल छाप टूरिस्टी फोटो लाईफमध्ये ..... पहिल्यांदा काढलेला फिल्मी फोटो. (अजून तरी तसा दुसरा फिल्मी कुठला काढलेला नाही म्हणून तोच शेवटचा)

छे, फोटो शेयर करावा इतका खास नाही. मूळ गाण्यातील लायटींग इ सगळं कुठे आपल्याला जमण्यासारखं, त्यात परत त्या प्रीस्टचं तंत्र... पण तुका म्हणे त्यातल्यात्यात प्रकार.

Pages