डिप्रेशन .. जगण्याचा कंटाळा

Submitted by राधानिशा on 14 October, 2020 - 11:16

हल्ली मधूनमधून किती दिवस राहिले असावेत असा विचार मनात येतो .. 20 वर्षं धरली तर 7300 दिवस .. 40 वर्षं धरली 14600 दिवस ..

40 वर्षं किंवा 20 वर्षं म्हटलं की धडकीच भरते .. त्यामानाने दिवस बरे वाटतात .. तेवढाच काळ असला तरी .. 40 वर्षं म्हणजे साडेतीन लाख तास होतील .. नको .. दिवसच बरे , एकेक दिवस तसा पटकन संपतो .. तास खूप वाटतात ..

आतापर्यंत 25 वर्षं म्हणजे 9100 च दिवस झाले आहेत फक्त आणि खूप .. खूप .. म्हणजे खूपच जगून झाल्यासारखं वाटतं . खूप बघितलं , खूप अनुभवलं , खूप सोसलं असं वाटतं .. खरं तर जगाच्या दृष्टीने ज्याला सोसणं म्हणता येईल तसं काहीच वाट्याला आलं नाही ... तरी इच्छा नसलेले खूप अनुभव आले असं वाटतं , जे चूझ करायचं स्वातंत्र्य असतं तर नक्कीच निवडले नसते अनुभवण्यासाठी ...

आणखी आयुष्य अनुभवण्याची हौस संपल्यासारखी वाटते .. भरपूर जगून झालं , आता पुरे झालं तरी चालेल असं वाटतं .. जनरल आयुष्य चांगलं चाललेल्या लोकांमध्ये जी जगण्याची असोशी असते , आशा , आकांक्षा , इच्छा , त्या पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याची तयारी असते - ह्या सगळ्याच गोष्टींची क्वांटीटी मनात खूप कमी झाल्यासारखी वाटते . शिवाय पुढचीही भीती वाटते .. एवढ्याशा आयुष्यात इतका मनस्ताप देणारे अनुभव आले , आता डोळे मिटण्यापूर्वी आणखी काय काय बघावं लागणार .. पुरेसं जगून झालं आहे , आणखी जगावं लागलं नाही तर देवाचे उपकार होतील असं वाटणं हे नॉर्मल समजलं जातं नाही ... लाईफ इज गॉड्स गिफ्ट असे क्वोट्स वाचले की आयरॉनीने हसू येतं .. घे बाबा तुझं गिफ्ट वापस प्लिज ..

70 - 80 - 90 वयाच्या माणसांचेही शक्य तेवढे उपचार केले जातात .. अनेकदा त्यांच्या विरोधाला भीक न घालता .. आजारपण सहन करत , सतरा पथ्यं पाळत का होईना त्यांना जगायला लावायचं असतं .. कारण आम्हाला तुम्ही अजून हवे आहात हे कारण असतं .. शिवाय बऱ्याच केसेस मध्ये त्या पेशंटलाही एवढ्यात मृत्यू नको असतो .. they enjoy life and it's great and everything . तेव्हा 25 व्या वर्षी पुरे , खूप जगून झालं म्हटलं तर डिप्रेशनच्या गोळ्या आणि कौन्सिलिंग सुरू करण्यापलीकडे काही होणार नाही .. जगणं पुरे असं वाटणं ही कन्सेप्टच समजू शकत नाही ... बहुतेक ती हेल्दी माईंडचं लक्षणही नाही ...

हा डिप्रेशनचा परिणाम आहे की कंटाळा आहे की नुसताच आळस आहे माहीत नाही .. डिप्रेशन बरंच कमी झालं आहे .. रोज रडू केव्हाच बंद झालं आहे .. क्वचित आठवडा पंधरवड्यातून एखाद दुसरेवेळीच रडू येतं ... दिवस मजेत जातो , कसा संपला ते कळत नाही ... घरातली कामं करते , वाचते भरपूर .. म्युजिक ऐकते .. सिरिअल्स बघते .. आयुष्य छान चाललं आहे म्हणायला कोणतीच आडकाठी नाही ... पण existence आणि non-existence अशा दोन चॉइसेसचा विचार केला तर नॉन एक्सिस्टेन्स नेहमीच प्र चं ड अपिलिंग वाटतो ... Oh , how much I would love to rest .. सतत अखंड चालू असलेले विचार नाहीत , आठवणी नाहीत , अस्तित्वाची जाणीव नाही .. शांत झोप .. स्वप्नं सुद्धा नसलेली .. अस्तित्व संपूर्ण पणे पुसलं गेलेलं असेल या विश्वाच्या पटावरून ... its beyond tempting ..

लोक आजारी पडल्यावर जिवंत राहण्यासाठी किती आटापिटा करतात जीवाचा ... wow .. मला जर डॉक्टरांनी सांगितलं , " सॉरी अब आपके पास सिर्फ दो ही महीने बचे है , हम कुछ नहीं कर सकते " तर मला लिटरली हर्षवायू होईल ...

आत्महत्या करण्याची हिंमत नाही .. जगण्याचा मोह असा नाही पण नॉन एक्सिस्टेन्सची काही खात्री नसल्याने .... पुनर्जन्मावर विश्वास आहे ... त्यामुळे धडधाकट शरीर दिलं होतं ते टाकून आलीस , जा आता हात - पाय किंवा डोळे नसणं कसं असतं ते अनुभवून बघ म्हणून जन्म मिळाला तर काय घ्या .... किंवा चांगली परिस्थिती सोडून आलीस जा आता दारिद्र्य , संधीचा अभाव कसा असतो ते अनुभव म्हणून पोटाला अन्न नसलेल्या , शिक्षणाची संधी नसलेल्या घरात पाठवलं तर काय करणार ... 18 - 20 ला लग्न आणि 2 पोरं पदरात .. ( shudders ) त्यापेक्षा आहे ते सोन्यासारखं आयुष्य म्हणता येईल .... पण नॅचरल डेथ आली तर वाईट ठिकाणी पाठवणार नाहीत .... त्यामुळे नॅचरल रिजन्सनी पटकन काहीतरी होऊन जीव जावा अशी एक इच्छा मनाच्या कोपऱ्यात असतेच कायम .....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप चांगला प्रतिसाद.
एक काम करता येईल की एक भलामोठा धागा काढून इथल्या कारवी च्या आणि इतर मदतीच्या माहितीपूर्ण प्रतिसादांचं कंपायलेशन करता येईल. लेख मोठा होईल हे खरं पण गरज असेल तो/ती नक्की वाचेल. मायबोलीच्या मुख्य पानावरही यावा. एका चांगल्या आशावादी हेडर सह (मी उंटावरुन शेळ्या हाकतेय, सध्या मी हे काम करु शकणार नाहीये.)
खरं तर आशावादी (फेक रंगीत फुले/ फॉरीन लोकेशन / गेट ड्रंक आणी प्युक टाईप्स आशावादी नाही, खरंच एखादा संदेश देणारं आशावादी) वेब सिरिज आणि पिक्चर्स जास्तीत जास्त बनावे, लोकांनी पहावे.

कारवी, काय सुंदर सल्ले दिले आहेत! फार आवडली पोस्ट. ॲडमिनना विनंती करून तुमच्या दोन्ही पोस्ट्स धाग्याच्या प्रतिसादात पिन करून ठेवता येतील का ते पाहायला हवे. धाग्याच्या शब्दखुणांमध्ये डिप्रेशन शब्द घालता येईल का?

माझ्या मनातही हेच आले होते. सहमत अनु व जिज्ञासा.
शीर्षक सकारात्मक काही तरी हवं आणि शब्दखुणा नैराश्य /डिप्रेशन.

कारवी, मला मराठी शब्द आता आठवत नाही पण तू लिहीलेलं सर्व ७ Domains of well-being मध्ये मोडते. त्या अनुषंगाने शीर्षक इ देता येईल. जाऊ दे, इथे लिही. शोधणारे शोधतील Happy

मात्र मानलं बॉस मायबोलीकरांना, सुरूवातीला सगळं अस्वस्थ करणारं होतं. धागा बंद केला तर बरं असं झालं. पण मग सगळ्यांनी इतक्या सकारात्मक, माहितीपूर्ण पोस्टी टाकल्या की पार नूर बदलून घेला धाग्याचा...

@ radhanisha ---
पुन्हा एकदा मीच...आतापर्यंत फिलॉसॉफी झाली / झाडली; आता यावर काही करता येईल का ते बघू.

भाग २ -- मनाला / परिस्थितीला हाताळणे

तुमच्या पोस्ट + प्रतिसादात जाणवते की सद्ध्या कुठल्याही गोष्टीतला निगेटिव्ह भाग तुमचे मन चटकन, प्रामुख्याने टिपते. त्याला +ve व -ve दोन्ही टिपायची सवय लावणे.... मग -ve च्या प्रभावाखाली कमी येणे.... मग -ve मध्ये काही +ve आहे का शोधायला शिकणे यासाठी टप्प्याटप्प्याने वळण लावायला लागेल.

मनात विचारतरंग तर येतच रहाणार. जुन्या आठवणी वर येतात तेव्हा अप्रिय, त्रासदायक प्रसंग मनात घोळत रहातात जास्त करून. तर अशावेळी जाणीवपूर्वक प्रयत्नाने काही आनंदी, आशादायक, हलकेफुलके प्रसंगही re-live करायचे. पुढे हेच जास्त re-live होतील हे पहायचे. पुन्हा तशाच काही कुटुंब भेटी / इन्फॉर्मल घरगुती समारंभ साजरे करायचा घाट घालायचा. तयारी, आमंत्रणे, आगतस्वागत मुख्यत्वे तुम्ही करायचे. बाकी घरचे मदतीला घ्यायचे.

प्रोफेशनल काऊन्सिलिंगला जाणं नको ....... एकदा झालं तेवढं पुरे झालंसं वाटतं --- म्हणजे औषधे समुपदेशन काही सुरू नाहीये का आता? मग कशा बाहेर याल? मान्य आहे त्यांनी तुम्हाला अधिक खोलात जाऊन, हळुवारपणे समजून घ्यायला हवं होतं. तुम्हाला दुखर्‍या मनाला सांभाळून करता येईल अशा टास्क सुचवायला हव्या होत्या.

मी त्यांना जस्टीफाय नाही करत पण त्यांचीही काही बाजू असेल --- त्यांचा स्वभाव - रडणार्‍या मुलाला दोन दणके घालून सोबत गप बस म्हणायचं // खूप यशस्वी म्हणून बिझी असल्याने वेगात केसेस हातावेगळ्या करायच्या // अननुभवी असल्याने चूक झाली // पुरूष-स्त्री यांची विचारप्रणाली वेगळी असते, टीनएजर मुलगी काय कसा विचार करते या रोलमध्ये ते शिरू शकले नाहीत // तुमच्यासाठी हेच योग्य याची खात्री असावी..... अनेक शक्यता...

तुम्ही त्यांच्या मुलगी नाही ही आनंदाची बाब नाही का? फक्त पेशंट होतात, निघून तरी येऊ शकलात. २४ तास त्यांच्याबरोबर, एका चांगल्या समुपदेशकाची मुलगी हे लेबल घेऊन, रहावे लागले असते तर..... असो.
एका मार्गदर्शकाबरोबर ट्यून नाही झालात म्हणून त्या प्रोफेशनवरच काट मारू नका. दुसरा बघा.
सई केसकरांचा लेख वाचलाय का --- https://www.maayboli.com/node/61313

सॉरी टू से, पण थोडी चूक तुमच्या पालकांचीही दिसते.

तुम्ही म्हणताय खूप जपलं पण प्रत्यक्षात त्यांनी नकळत नुकसान केलेय. वडिल विशेष करून?....आईचा उल्लेख आला नाही तुमच्या उत्तरांत. कदाचित त्या शिस्तीच्या असाव्यात आणि बाबांनी पाठीशी घातल्याने हतबल असाव्यात. असो....

जी कामे करू दिली नाही म्हणताय ( भाजी खरेदी, लाईट बिल भरणे, अकाऊंट मध्ये पैसे भरणे, गॅस पेटवणे) ती खरंच इतकी कठीण / धोक्याची होती की १४-१५ वर्षाच्या झाल्यानंतरही तुम्ही करू शकला नसतात? त्यामुळे मी हे करू शकते हा आत्मविश्वास कमी पडतोय आता ठायीठायी. कारण आयुष्य यापेक्षा कितीतरी अधिक चॅलेंजिंग कृती करण्याची अपेक्षा ठेवते आपल्याकडून. न जमणारी गणितं / शास्त्राची उत्तरे / शाळेचे प्रोजेक्ट्स तेच पूर्ण करून देत होते का?

रोप वाढवायचे तर कुंडी मांडीवर घेऊन बसत नाही आपण. ते बाहेर मोकळ्या हवेत, उन्हातही ठेवावे लागते. छाटावे लागते. कीड लागली तर औषध फवारावे लागते. खरे खोटे माहीत नाही पण मोगर्‍याचे पाणी तोडतात म्हणे फेब्रुवारीत. असा ताण दिला की तो मार्च-एप्रिलमध्ये बहरतो. आयुष्य बहरायचे तर माफक स्ट्रेस + कठोरता हे ह वे च. रोपाला खत पाणी अति झाले तरी ते पिवळे पडते.

पक्षी अंडी घालतात, उबवतात, शत्रूंपासून जपतात, पिलांना चारा-किडे-दाणे भरवतात. एका लिमीटपर्यंत. मग उडायचे त्यांनी आणि आपले अन्नपाणी मिळवायचे. शिकवतात आईबाप, नाही उडाली तर चोचीने ढोमसून घरट्याबाहेर काढतात. कायम पंखाखाली नाही ठेवत. का? पक्षी पिलांवर प्रेम करत नाहीत? स्वावलंबन हा निसर्गनियम आहे.

घरातले सदस्य काहीही (भले रास्त असेल) करताना, बोलताना-- माहितीये ना तिला आवडत नाही, माहितीये ना ती चिडते याने, माहितीये ना ती त्रास करून घेते -- हा निकष लावतात का? जेणेकरून तुम्हाला मनस्ताप होणार नाही... हा त्यांचा चांगुलपणा त्या प्रसंगापुरता क्षणिक फायदा देईल. पण तुमच्या तनामनाची ही चुकीची बडदास्त सरतेशेवटी नुकसान करायची शक्यताच जास्त.

कारण यात तुम्ही विरोध सहन करणे, अप्रिय अनुभव पचवणे, समोरच्याने दाखवलेली चूक खिलाडूपणे स्वीकारणे या अनुभवाला मुकता. अशाने आयुष्याचा / व्यावहारिक जगाचा जो खाक्या आहे की -- 'आहे हे असं आहे, असच राहील, तुला जुळवून घ्यावे लागेल' -- त्यासाठी आपल्याला तयार करणारे, घरातून मिळणारे छोटे कडू डोस मिस होतायत.

सोशल ऍन्कसायटी आहे , पीपल ड्रेन मी , ओळख करून घेणं , मैत्री वाढवणं , जनरल संवाद हे सगळं एक्जहॉस्ट करतं -- याची मुळंही भूतकाळात आहेत का बघा. लहान मुलं बिचकतात अनोळखी माणसांना, आईबापाच्या आडोशाने बोलतात, चॉकलेट घेतात. मग आईवडिल प्रयत्न करतात त्याचे बुजरेपण, घाबरणे कमी करायला. तुमचं ते तसच राहून गेलय.

पीपल ड्रेन यू , ओळख करून घेणं , मैत्री वाढवणं , जनरल संवाद जमत नाही कारण काय्/कसं बोलावं परक्यांशी याचा सराव नाही मनाला? मी चुकणार तर नाही, लोक हसणार तर नाही, मला हे हे येत नाही ते त्यांना कळेल, नको मी नको पपा बोलतील/बघतील हे सगळे खयाली बागुलबुवे मागे ओढतात तुम्हाला?

किती काळ हे कराल अजून, करू शकाल ...असे वाटते? ज्या बाबांची ढाल करून जगताय ती ढाल जवळ नाहीये आणि कसोटीचा क्षण समोर आहे तर त्याक्षणी तुमचा निर्णय, कृती तुमचीच असणारे. असावीच लागणारे. कसे जमवाल? ढाल लढताना बचावासाठी असते तलवार म्यानात सोडून देण्यासाठी नाही. स्वतः लढायला सुरूवात करा radhanisha, it's high time. की बाबा मग भाऊ मग नवरा मग मुलगा असा अखिल आयुष्य ढाल संकलनाचा बेत आहे?

जे झालं ते झालं. त्यांचं चुकलं ते तुम्ही सुधारा. आता छोट्या छोट्या गोष्टी स्वबळावर करायला सुरूवात करा. चुकेल, लाज वाटेल की २५व्या वर्षी हे येत नाही...पण आता नाही केलत तर ५०व्या वर्षी हे येत नाही... या लाजेपेक्षा आजची लाज कमीच असेल.

सुरूवातीला कोणालाच येत नसतं, भीती सगळ्यांना वाटते, चुका सगळ्यांच्या होतात, तुम्ही काही वेगळ्या नाही. करून करून येतं, भीती जाते, चुका कमी मग शून्य होतात. कदाचित पहिल्या प्रयत्नात जमेलही मग वाटेल की अरे, उगाच घाबरत होते, इतकच तर होतं करायचं.....

विचारून करा, कोणाला सोबत घेऊन करा पण करायचं तुम्हीच, चुकलं तर निस्तरायच तुम्हीच, गरज असेल त्या लोकांशी बोलायचं तुम्हीच, त्यांचे प्रश्न / विरोध / नकार तुम्हाला जमेल तसे फेस करायचे. मैदान सोडायचे नाही. लोक हसले / विचित्र नजरेने बघितले दुर्लक्ष करायचं. आपल्याला उभे रहायचेच आहे आता, उद्या हीच लोकं मॅडम ग्रेट आहेत म्हणत सलाम ठोकतील. आणि हो, नेहमीच्या सवयीने बाबा मधे पडू लागले तर त्यांना थांबवायचे तुम्हीच.

शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागेपर्यंत मला इंग्रजी बोलता येत नव्हतं. भीती फक्त... चुकलं तर? तोपर्यंत सगळे मराठी आजूबाजूला. गरज नाही पडली. मुलाखत पण मराठीतच घेतली. माझ्या मॅडम साऊथ इंडियन. लिहायची असाईनमेंट दिली. ह्या एव्हढ्या चुका झाल्या. त्यांनी ग्रामर टेस्ट दिली मला. पैकीच्यापैकी मार्क. म्हणाल्या, ग्रामर येतंय तर एका वाक्यात ३ टेन्स का घेतेस? मग लिहीणे + proof reading करवून लिखाण सुधारले.

मग बोलण्याचा नंबर. त्या नाशिकला वाढलेल्या त्यामुळे मराठी उत्तम. म्हणाल्या 'आता मीही तुझ्याशी मराठीत बोलले तर तू कधीच शिकणार नाहीस. तेव्हा आपण इंग्रजीतच बोलायचे'. भाषा येत होती, भीती जाऊन सराव यायला महिना गेला. मग त्यांनी इमेल केला सगळ्यांना *** या विषयावर लेक्चर देणार आहे. तीन टप्प्यात दर शनिवारी. मला माहीतच नाही. खडूस लोक कँटीनम्ध्ये 'so, we will listen to a new speaker coming saturday, hmm' म्हणाले तेव्हा मी थंडगार. मॅडम आपण त्या गावच्याच नाही अशा बघतायत.

नाही जमणार म्हणायचा माझा स्वभाव नाही. केली तयारी विषयाची + बोलायची + OHP स्लाईड्स वगैरे. दोन तीन महिन्यात लिहीणे, बोलणे, लोकांसमोर बोलणे टप्पे पार झाले. आपल्या आत तयार असतं सगळं radhanisha, फक्त पहिला धक्का मिळावा लागतो. दुसर्‍याने दिलेला किंवा मग स्वतःच मारून घ्यायचा.

क्रमशः

@ radhanisha ---
भाग २.२ -- मनाला / परिस्थितीला हाताळणे ( पुढे चालू)

बाबा आहेत ना ... ते सगळं सांभाळून घेतात.... यापुढेही घेतील... या भूमिकेतून बाहेर यायची गरज आहे. तुम्ही स्वप्रयत्नावर काही करा. काहीही करा. मार्गदर्शन करायला, धीर द्यायला, चुका सुधारायला, अपयश पचवताना सोबत ... बाबा आहेत ! हा विश्वास ठेवा. ते ठीक. ते आहेतच. पण बाबा माझे हरी, radhanisha बैसे खाटल्यावरी हे चित्र नको.

कुठल्याच कामाची सक्ती नाही .. कसलीच अपेक्षा नाही .. या तुमच्या म्हणण्यावर नानबांनी फार योग्य उत्तर दिलेय. 'देवाच्या दयेने आपल्याला काही कमी नाही. तू काहीही केले नाहीस तरी अडणार नाही, तुझा बाप तुला आयुष्यभर फुलासारखं जपायला समर्थ आहे' असं काही ऐकलं असाल घरातून.... तर ते आचरणात नसतं आणायचं. तो 'तुझ्यामागे आम्ही सदैव आहोत' हा अ‍ॅश्युरन्स असतो. मुलांच्या आयुष्यभराच्या निष्क्रियतेचे लायसेन्स नव्हे.

आता ते शरीरा-मना-पैशाने सक्षम आहेत तोवर हे चालेल. तुम्ही अशाच रहाल, त्याची सवय होईल, चटक लागेल. हो, लागते.... पण त्यांचे एकदा वय झाले की आपल्यामागे हिचे काय हा प्रश्न त्यांना सतावेल. तेव्हा उत्तर शोधायला फार उशीर झालेला असेल. त्यांना तुमचा प्रॉब्लेम तात्पुरता वाटतोय पण तो तुमच्या तनामनाला कसा व्यापतोय तुम्हाला तर माहीत आहे? मग या विळख्यातून बाहेर यायला हालचाल करायची जिम्मेदारी कोणाची आहे?

मरणाचा विचार सतत किंवा खूप वेळ तरी असतोच त्यावर काही सोल्युशन नसल्याने ...... असे का म्हणताय??
इथल्या इथे १०० पर्याय दिलेत माबोपरिवाराने. कोणीतरी, च्रप्स बहुतेक, कधीपासून लिहीतायत, घराबाहेर पडा, जगाचा अनुभव घ्या, तुमचे प्रॉब्लेम सुटायला / स्वभाव निवळायला मदत होईल. केलत ते एकदा तरी?

तुमच्या २-३ धाग्यांवरचे आलेले सारे प्रतिसाद पहा. नोट्स बनवा. समस्येचे मूळ शोधणे, सोल्यूशनचे पर्याय आणि अमलात कसे आणायचे यावर खूप सांगितलेय सर्वांनी. आता प्रत्यक्ष करायचा टप्पा आहे .....तु म्हा ला करायचेय. तिथे आम्ही किंवा काउन्सेलर / डॉ / पालक नाही काही करू शकणार. सपोर्ट करू शकतो प्रयत्न सुरू झाल्यवर.

तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन -- जो काहीही श्रम करायला न लागता, सगळी उपभोगाची साधने पुरवतोय --- सोडवत नाहीये का? तर तो कम्फर्ट झोन नसून एका उत्तम व्यक्तिमत्त्वाचा कणाकणाने नाश करणारा शत्रू आहे. हे जितक्या लौकर लक्षात घ्याल तितके बरे.

प्रोफेशनल काऊन्सिलिंगला जाणं नको वाटतं ..... त्याची कारणं तुम्ही म्हणताय ती असावीत + कुठेतरी असे मुद्दे / सल्ले येत असावेत तिथे, जे अमलात आणायचे तर कम्फर्ट झोन सोडावाच लागणार. मग योग्य कृती v/s कम्फर्ट झोन च्या झगड्यात कम्फर्ट झोन जिंकतो. पुढच्या सिटींगला जाताना योग्य कृती केलेली नाही. काय कारण देणार..... गृहपाठ न केल्यामुळे मग शाळेला (= सेशनला पर्यायाने काउन्सेलर व्हिजीट्सना) बुट्टी.
असे होत नसेल तर मला माफ करा. चुकीचे लिहून मी तुमचा अपमान केलाय. असे होत असेल तर काय, माझा नि:शब्द नमस्कार.

काउन्सेलरचा विषय आहेच तर आनंदिनी या मायबोलीकर आयडीनी ----- भीती / anxiety वर लिहीलेले लेख वाचायची आठवण करते पुन्हा. मायबोलीवर मोकळं व्हायला संकोच वाटत नाही तर त्यांच्याशी बोलताही येईल संपर्क साधून. As YOU wish, कारण हा तुमचा वैयक्तिक आणि confidential प्रश्न होतो.

तुम्ही म्हणाल प्रतिसादाला उत्तर देताना काही लिहीले तर ही बया त्यातली खाजगी माहिती घेऊन पोस्टमॉर्टेम करतेय. पण आपल्याला खरोखरच चांगले काही हाती यायला हवे तर परिस्थितीचा सगळ्या बाजूने विचार होणे गरजेचे असते. जखम मांडीला मलम शेंडीला होऊन चालणार नाही. तुम्ही आम्हाला सांगताय ती लक्षणे आहेत, परिणती आहे. मनाचं असं का झालय त्याची कारणे कुठेतरी खोल आहेत, अज्ञातही असतील, हे कारण आहे हे लक्षातही येणार नाही इतके कॅजुअल समजले गेलेले काहीतरी असेल. सगळे तुकडे उलटे पालटे केल्याशिवाय पूर्ण चित्र स्पष्ट होणार नाही. बाकी तुमच्या खाजगी बाबीत टिप्पणी करण्याचा ना माझा उद्देश आहे ना अधिकार.

क्रमशः

@ radhanisha ---
भाग २.३ -- मनाला / परिस्थितीला हाताळणे ( पुढे चालू)

हा तुमचा प्रॉब्लेम जन्मजात तर नसावा. काही वयानंतर / घटनेनंतर / वारंवार मनावर कोरल्या जाणार्‍या निगेटिव्ह स्वयंसूचनांमुळे हळूहळू तुमचा आत्मविश्वास, उमेद, परिस्थितीला भिडण्याची जिगर खच्ची होत गेली. For whatever reasons त्याला सावरायला जमले नाही. त्यातून नवीन चुका झाल्या, अपयश बघावे लागले, त्रास अनुभवायला लागला.....मग मानसिक ताकद अजून दुबळी झाली. असा negative feedback loop तुम्हाला आजच्या स्थितीत घेऊन आलाय?

सो आपल्याला आता negative (-ve) वरून neutral (0) आणि मग positive (+ve) असा प्रवास करायचा आहे. नंबर लाईन लक्षात घ्या. negative बाजूला जितक्या जास्त जाल तितका positive पर्यंत पोचायचा वेळ + श्रम वाढणार आहेत. तेव्हा जितकी लौकर सुरूवात कराल ते उत्तम. जे घडलेय त्याच्या बरोबर उलटी प्रोसेस करायची आहे. तुमच्या मनाला positive स्वयंसूचनांचा + कृतीचा feedback देत रहायचा आहे.

डॉ आर्थर अ‍ॅशकिन. आठवतायत? ९६ वर्षांचा माणूस.... अजून किती रे बाबा बाकी आहे? कशाला ठेवलयस अजून मला? असं देवाला विचारण्याच्या वयातले. स्वप्नरंजन / 'आमच्या काळात'चे उसासे वाल्या पिढीतले. जागतिक महायुद्धाच्या झळा त्यांनाही लागल्याच असतील; अभावाचे, चिंतेचे, शिक्षण/नोकरीच्या ठिकाणी राजकारण असे दिवस त्यांनीही पाहिलेच असतील? सगळं एका क्लिकवर पायाशी हजर असा काळ नसताना उत्तम संशोधन करताना किती टप्प्यांवर अपयशी / अडखळले / नाउमेद झाले असतील? तरी संशोधन चालूच आहे....

अशा माणसाकडे 'जुन्या गोष्टी साजर्‍या करायला वेळ नाही' !! साजर्‍या करायला हं....
मग आपण ऐन पंचविशीत बर्‍याचश्या गोष्टी अनुकूल असताना 'जुन्या गोष्टी पुनःपुनः उकरा-पुरा' प्रोजेक्ट का हाती घेतलाय? हाताला माती, मनाला त्रास. बाकी काही निष्पन्न झाले का त्यातून? बबलगम सारखे ---
< बिगीन>
स्टेप १ दु:ख चघळा, चावा,
२ फुगा काढा,
३ फुगवून मोठा करा,
४ म्हणा -- 'बापरे! किती मोठे दु:ख माझे' (? फुग्यात हवा आपणच भरतोय बायदवे ?),
५ मग त्याला आत घ्या,
६ गालात ठेवून द्या पुन्हा फुगा काढण्यासाठी.
७ गो टू स्टेप १
<?? एन्ड ??>
थुंका ते बबलगम बाहेर....
हा एन्डलेस लूप प्रोग्रॅम मेंदूच्या सॉफ्टवेअरमधून काढून टाका जमेल तितक्या लौकर, प्लीssजच.

कशी काढू? जी घटना / वातावरण जुन्या कटु आठवणींना ट्रिगर करते ती शोधून काढायची. त्यातल्या कुठल्या आठवणी जास्त / कमी त्रासदायक ते तपासा. पुन्हा एकदा त्यावर विचार करा. टाळी एका हाताने वाजत नाही. जे मनस्तापाचे प्रसंग घडले त्यात काही अंशी जबाबदारी तुमचीही आहे ( भले १%), काही दुसर्‍या व्यक्तीची, काही परिस्थितीची. तर आपले जे चुकले ते स्वतःशी मान्य करून त्या चुका आता टाळायच्या.

मनातही दोषारोप, त्रागा, दुसर्‍या व्यक्तीच्या तेव्हाच्या वागण्याची उजळणी करायची नाही. हा माझ्या आयुष्यातील प्रसंग -- हा मी घेतलेला धडा इतकाच मतलब ठेवायचा. जो विचार आपण सतत, तीव्रतेने करतो तो त्याच तर्‍हेची अजून स्पंदने आकर्षून घेतो. कुढाल, हताश व्हाल तर अजून मनस्ताप चालून येईल; समाधानी रहाल तर समाधानाचे क्षण येत रहातील.

आता तुम्ही जाऊन भूतकाळ बदलू शकणार नाही. पुन्हा ते प्रसंग तुमच्या अनुकूल घडवू शकणार नाही, मग ते कोळसे फेकून द्या, उगाळू नका.क मी त्रासदायक आठवणींचा ठसा पुसटला की जास्त त्रासदायकवाल्या निपटायला घ्यायच्या. वेळ लागेल पण जमेल. negative चा निचरा झाला की positive साठी जागा होईल.

गळू झालं, ठणका लागला तर ते कुरवाळून, लपवून, झाकून फायदा नसतो. त्याला कापून, आतले टाकाऊ वाहून घालवून, स्वच्छ करून मलमपट्टी केली की निसर्ग पुन्हा त्वचा पहिल्यासारखी करून देतो. कापायची आणि झोंबरं औषध लावायची हिंमत एकदाच करायची आणि आराम अनुभवायचा..

त्याचवेळेला आता तुमच्या आजूबाजूला जे घडतेय त्यातले चांगले टिपायचा प्रयत्न करा. लिहून काढा चक्क. घरात, परिसरात काही उत्साहजनक घडत असेल तर त्यात सहभागी व्हा, दार लावून स्वतःला वेगळे काढू नका. सहभागी मनापासून व्हा. शरीर तिकडे आणि मन निर्जीव याने मनाला positive inputs मिळणार नाहीत. स्वतः काहीतरी करा. तुम्हाला आनंद देणारे. फक्त शरीराला सुखावणारे नव्हे, मनाला टवटवी देणारे.

काय ते तुम्हाला ठरवावे लागेल. या गोष्टी व्यक्तिपरत्वे बदलतात. दुसर्‍याला त्याच्या अडचणीत मदत करा आणि त्याचा समाधानी चेहरा बघा. उन्हातून सामान घेऊन चाललेल्या व्यक्तीला स्कूटीवर लिफ्ट देण्याइतकी साधी गोष्टसुद्धा मस्त फीलिंग देते. एक दाणा पेरला तर निसर्ग कणीस देतो. तेच आनंदाचेही आहे. Gift a smile (to self & others) and you will get back plenty... हाच तो positive feedback loop जो तुम्हाला डिप्रेशन पूर्वीच्या तुमच्या रूपाकडे घेऊन जाईल.

तुमचे प्लस पॉईंट्स ---

१. तुम्ही विचार करू शकताय. मन सुन्न नाहीये. गुंता, गोंधळ करत का होईना पण भरपूर विचार करता येतोय. तो विचार -- सोल्यूशन दिसत नाही, मरूया हे उत्तम या दिशेने नेण्यापेक्षा, ---- मला यातून बाहेर यायचेय. वाट्टेल ते करून. काय आहे माझा प्रॉब्लेम, कुठे, कधी सुरू झाला; कसा सोडवू; काय पर्याय; त्यातले मला काय जमेल --- असा नेता येईल.

२. वडील (एकूणच कुटुंब) सांभाळून घेणारे आहेत. कुठल्याही अपेक्षा / बंधनात / नियमात तुम्हाला रोखून ठेवणारे नाहीत. तेव्हा जे कराल त्याला मुक्त आणि सहकार्याचे वातावरण मिळणार आहे. तुमच्या सकारात्मक कृतीला दाही दिशा मोकळ्या आहेत.

३. पंचविशीत आहात. अल्लड, अविचारी वयात घेतलेले निर्णय चुकू शकतात, ते टळेल.
४. वाचन चांगले आहे तेव्हा एकदा ठरवलत की स्वतःचा मार्ग शोधण्यासाठी आवश्यक तो पाया वाचन करून उभारू शकताय.

५. तुम्हाला प्रत्याक्ष न भेटलेले तरीही तुमच्याविषयी जेन्युईन प्रेम, आस्था, काळजी असणारे, आभासी अस्तित्वाचे सही, पण कितीतरी लोक असे आहेत ज्यांना radhanishaचे वेडे विचार अस्वस्थ करतात. Please realize your worth and respect your life.

६. सगळ्यात महत्त्वाचे -- आपल्याला प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला कळलेय, पटलेय (denial mode नाहीये); काय प्रॉब्लेम - माहिती आहे (known devil); काही करू शकण्याइतक्या तुम्ही सक्षम आहात. फक्त नेटाने आणि सातत्याने प्रयत्न करायचे आहेत ( patience + perseverance).

मला जे मुद्दे पोचवायचे होते ते लिहून झालेत. सद्ध्या इथे थांबू. तुमच्या मनाचे हेलकावे कमी होऊन स्थिरावले की मग पुढचे प्रश्न घेता येतील. अनारोग्य घेऊन करीअर, जोडीदार, भविष्याचे आराखडे याला योग्य न्याय देताही येणार नाही. नवरात्र-दिवाळीचे छान दिवस आहेत. पाऊस गेला थंडी आलेली नाही असे मस्त ताजेतवाने करणारे वातावरण आहे. करा सुरूवात एका नव्या उमेदीने.

आता सगळ्या माबोपरिवाराचे प्रतिसाद अभ्यासून, त्यावर विचार करून कृती करायचा / न करायचा निर्णय + स्वातंत्र्य तुमचे असेल. आयुष्य तुमचे, निर्णय तुमचा, परिणामांची स्वामिनीही तुम्हीच.

*** खूप शुभेच्छा. ***

जबरदस्त कारवी , मन:पूर्वक आभार. नीट वाचणार.
राधानिशा उत्तर द्या प्लीज , थोडी काळजी वाटतेयं.
हे माझे दोन आणे , चांगले सुविचार मी गोळा केलेले , कुणाला पटले/आवडले तर ...

१.Don't focus on anything else except for the 24 hours in front of you, and do what you can to get closer to where you want to be.

२.Most people barely know themselves,
So what does it matter what they think of you.

~ Jmstorm

३. Sometimes it takes an overwhelming breakdown to have an undeniable breakthrough.

४. Your diet is not only what you eat,
It is what you watch, what you listen to,
What you read, the people who surround you.
Be mindful of what and who you allow into your space, emotionally, spiritually and physically. Your environment influences your experience.

५.Do the things you used to talk about doing but never did. Know when to let go and when to hold on tight. Stop rushing. Don't be intimidated to say it like it is. Stop apologizing all the time. Learn to say no, so your yes has some oomph. Spend time with the friends who lift you up, and cut loose the ones who bring you down. Stop giving your power away. Be more concerned with being interested than being interesting. Be old enough to appreciate your freedom, and young enough to enjoy it.

६.One day you will realize that material things mean nothing. All that matters is the well being of the people in your life.

७.Sometimes the universe shows you what people from your past are doing now, so you can see how far you have grown. Those who were once a frequency match, are now energetically a million miles away. Evolution and truth is a beautiful thing.

८.We either make ourselves miserable or we make ourselves strong. The amount of work is the same.

मला आवडतात म्हणून शेअर केले बस.... Happy

पोस्टस सल्ले एकत्र करायचा विचार चांगला आहे. त्यामागचा उद्देशही....
पण मला इतके टेक्निकल काही जमणार नाही. तुम्ही कोणी / अ‍ॅडमिनने केले तर मला काही प्रॉब्लेम नाही.
radhanishaनाही विचारावे लागेल... बर्‍याच अंशी त्यांचा स्पष्ट संदर्भ येतोय.

बाकी सार्‍यांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. मला खरंच वाटलं नव्हतं की इतक्या बारकाईने इतकेजण वाचतील. स्वतःला गरज नसताना तेही.... लईच मारूतीचं शेपूट झालय.

<<लईच मारूतीचं शेपूट झालय.>>

अहो, मारुतीच्या शेपटानेच भिमाची बदललेली मानसिक स्थिती योग्य जागी आली होती...

प्रत्येकाचे सब्जेक्टीव्ह फिलिंग वेगवेगळे असते.लोकांना असे वाटते की मानसिक रोग्याला कुणी सल्लए देत नाही वा उपचार करत नाही.पण तसे नसते .अनेकांना अनेक वर्ष उपचार चालू असतो.

Karvi some of the best writing ever. Very enriching. I am saving all your posts. Paya padun namaskar

केशव तुलसी +11
योग्य औषधे कदाचित अज्ञानीपणामुळे दिली जात नसतील पण सल्ले भरपूर मिळत असतात. सद् हेतूनेच पण जिथे न्यावे तिथे सल्ल्यांचा भडीमार होतो. अर्थात हे स्वाभाविक आहे आणि कळकळी पोटी होते.

कारवी, सुंदर लिहिलंत.
कधी सुचलंच नसतं हे सगळं. माझ्यासाठी खुप उपयुक्त आहेत तुमचे प्रतिसाद. धन्यवाद.

>> मला आवडतात म्हणून शेअर केले बस....
>> Submitted by मी_अस्मिता on 20 October, 2020 - 19:06

Wonderful collection! शेअर केल्याबद्दल धन्यवाद

राधानिशा तुमच्या साठी एक सिनॅरिओ लिहिते. माझ्या मुलीचे वडील ती आठ वर्शांची असताना तडका फडकी हार्ट एटेक ने वारले. तिचे शिक्षण उत्तम पार पडले आहे. अनेक भावनिक चढ उतार तिने एकटीने निभवले आहेत. माझा सपोर्ट होताच. पण माझ्या मनात एक जाणीव सुद्धा होती की ते वडील जरी बेड रिडन खितपत असते तरी आम्हाला त्यांचा आधार होता. व घर, बिझनेस मी त्या वर चालवले असते. ते अतिशय लोकांना उपयोगी पड णारे होते. त्यांच्या एका मित्राचे वडील वारले तेव्हा तीन तासांच्या नोटीशीवर कार मधून त्या मित्राला सोलापूर परेन्त रात्री कार चालवत घेउन गेले होते. कार मधून कितीही डिटोर करून सोडायला नेहमी तयार व हजर असत. स्टेशन वरून/ एअर्पोर्ट वरून आणणे सोडणे ही कामे कधीही आनंदाने करत.

आता ह्या वर्शी मुलीचे शिक्षण संपले पण करोना मुळे अचानक मार्च मध्ये लॉकडाउन लागला व मुले नेसत्या वस्त्रानिशी फक्त हँड बॅगेज घेउन घरी आली. सप्टें बर मध्ये कॉलेज चा मेसेज आला की तुमचे सामान घेउन जा. तिने मेरु कॅब बुक केली व पुण्या च्या आउट स्कर्ट वर हॉस्टेल आहे तिथे जाउन प्रवासात सर्व करोना काळजी घेउन सामान एकटीने पॅक केले ८ डाग होते क्याब लोड केली. अजून एका मैत्रीणीचे सामान पण बंगलोरला बुक केले . सर्व क्लोज करून तिथल्या त्यांच्या पेट कुत्र्याला इमोशनल गुड बाय म्हणून परत आली .

करोना मुळे मी घरीच थांबले होते नाही तर प्रत्येक वर्शी ह्या सामान चेंज ओव र, आणणे सोडणे ह्याला मी सोबत असते. तिथे काही म्हणजे काही मदत मिलत नाही. हाउस कीपिन्ग कडून मदत घ्यायची परवानगी नाही. व अगदी तिसर्‍या मजल्यावर रूम असली तर साहा सात जिने एक एक जड बॅग, अनेक पिशव्या व सॅक्स, एखादे वाद्य अमेरिकन स्टाइलने स्वतःच उचलून ने आण करावी लागते.

मग घरी आल्यावर ते सामान घरी पण लोड केले. तिचे व डील इतके लोकांना मदत करणारे व समाजोपयोगी कार्ये करणारे पण लेकीला
जेव्हा मदत हवी होती तेव्हा मात्र घरची कार( जी ते असेपरेन्त होती. मुंबईत आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट च वापरतो) व हक्काचा बाबा उपलब्ध नव्हता. ह्याचे इमोशनल लोड येते ना पण ते घेउनच फिजिकल जगातली कामे, जबाबदार्‍या उरकाव्या लागतात.

आता करोना मुळे आईला काही झाले तर ह्या काळजीने ती व्यग्र असते व मला समजूत घालावी लागते पण ह्या सर्वा बरोबरच आम्ही घर्ची बाहेरची कामे, करीअर मध्ये पुढे जायला कामे व संपर्क हे नेटाने करत राहतो. इमोशनल डाउन फेज आली तर वेळ देउन रिक्व्हर होउन कामाला लागतो.

तुम्ही तसे करावे असे नाही. पण असे ही जगता येते. हे कळविण्या साठी पोस्ट.

खरं आहे अमा. आपण सर्वांना मदत केली म्हणून वेळेवर आपल्याला मदत मिळेलच असं नाही. पुन्नी ला सर्व एकट्याने करावं लागलं. त्रास झाला पण यातून शिकली.

आई वडिलांचे करण्या बाबतः माझे दत्तक आई वडील दत्तक घेतले तेव्हाच वडील निवृत्त झाले होते . १९८९ मध्ये ते आमच्याकडे राहायला आले व वडील दोन वर्से बेड रिडन होते. तेव्हा मी कॅथे टर बदलणे, बेड सोअर ड्रेसिन्ग करणे रोग्याचे नर्सिंग इतर स्वच्छता ही कामे केली आहेत. त्यांचा राग व वैफल्य सहन केले आहे. वडिलांचे तर अंत्य संस्कार व दहनही मी केले आहे. मध्ये एका बाईंनी धागा काढला होता त्यावर लिहायचे होते पण माझी परिस्थिती वेगळी होती. तसेच ते काही मी पॉइंत मिळवाय्ला केले नव्हते. अंगावर आलेली परिस्थिती सावरली इतकेच.

नंतर आई पण आजारी असे व मुंबईचे लहान घर, त्यात तान्हे बाळ : एकेक दिवस मी फक्त शी शू साफ करणे पोछा मारणे व नवरा ऑफिसा तोन घरी येइपरेन्त घर नीट नेटके कसे राहील असा विचार करून पूर्ण वेळ गृहिणी पद निभावले आहे. आई पण शेवट चे तीन महिने बेड रिडन होती. तिचे मूल नसल्याने तिला फ्रस्ट्रेशन यायचे. व तिला तिरूपतीला जायचे होते आमचे कुलदैवत. पण ते काही जमले नाही. त्यामुळे ती रागा वलेली असे. हे अगदी नैसर्गिक आहे.

म्हातार्‍या आई वडिलांचे करणे हे आपण काही आपले रेटिंग वर जावे म्हणून करत नाही. एक जबाबदारी कर्तव्य म्हणून करतो. जमणार नसेल तर पूर्ण वेळ ची कामाची नर्स / नर्सोबा किंवा त्यांना ओल्ड एज होम मध्ये शिफ्ट करणे करता येइल.

आमचे सर्व नातेवाइक पुण्याला होते त्यामुळे ते फक्त हे दोघे वारल्यावर एक चक्कर टाकून गेले.

हे सर्व तुम्ही करावे असे आजिबात म्हणणॅ नाही. फक्त जीवनात जे पत्ते आपल्या हातात येतात तो डाव खेळून संपवावा. मध्येच सोडून जाण्यात काय पुरु षार्थ/ स्त्री अर्थ / व्यक्तिअर्थ!!
दोन्ही प्रति साद हे सिंपथी टूर ह्या अर्थाने लिहिलेले नाहीत व ते तसे घेउ नयेत केवळ एक ऑब्जेक्टिव्ह उदाहरण म्हणून लिहीले आहे.

Throughout their illnesses I was also holding one job plus freelance work to keep the brain functioning. Started a private limited company .

Now it feels ridiculous to work from home, play mobile games and walk the dog Happy

कारवी तुमचे प्रतिसाद खूप छान. अमा तुम्ही पण खूप छान लिहिले आहे. शेवटी वेळ आली तर माणूस निभावून नेतोच. राधानिशा पण त्यांच्यावर वेळ आली तर नक्कीच निभावून नेतील. सध्या त्या आयुष्यात ज्या गोष्टी अजून घडल्याच नाहित त्यावर जास्त विचार करत आहेत. विचार करतो तसे आयुष्यात प्रत्यक्ष घडतेच असे नाही. कधी कधी विचार केला नसतना बर्याच गोष्टी घडतात.

अमा मस्तच
एकदा तुमचे जॉब प्रोफाईल, बिझनेस याबद्दल लिहा.(आता आयपी राईटच्या मर्यादा असतील तर रिटायरमेंट नंतर.). तुमच्याकडे सांगण्या सारखे बरेच आहे.

थोडे ज्ञान पाजळतो.
मेंदूचा बाहेरील भाग ज्याला कॉर्टेक्स म्हणतात तो विचारी मेंदू असतो.तो विचार करतो.नंतर त्याच्या आतला मेंदूचा गाभा ज्याला लिंबिक वा इमोशनल ब्रेन असे म्हणतात तिथे राग आनंद दुख ,भुक ,सेक्स या भावना जन्म घेत असतात. कॉर्टेक्स व लिंबिक ब्रेन यांना जोडणारे अनेक कनेक्शनस असतात.नॉर्मल व्यक्तीमध्ये कॉर्टेक्स टू लिंबिक आणि लिंबिक टू कॉर्टेक्स असे दोन्ही कनेक्शन्स असतात. म्हणजे भावनेचा विचारांवर व विचारांचा भावनेवर सारखाच प्रभाव पडत असतो.
मानसिक रोगांमध्ये कॉर्टेक्स टू लिंबिक कनेक्शनस खूप कमी असतात याउलट लिंबिक टू कॉर्टेक्स कनेक्शन्स खूप स्ट्राँग असतात.यामुळे अशा व्यक्तींनी पॉझिटिव्ह विचार केला तरी भावना पॉझिटिव्ह होत नाहीत कारण विचारी मेंदूचा भावनिक मेंदूवर ताबा नसतो.अशा व्यक्ती खूप भावनिक असतात.कधी खूप आनंदी व कधी खूप दुखी असतात.सध्याच्या धकाधकीच्या जीवनात निगेटिव्ह इमोशन्स जास्त तयार होतात व ती व्यक्ती फक्त इमोशन्ल ब्रेनच्या आधारे जगू लागते.
यावर फारसा उपाय नाही पण मेडीटेशनने कॉर्टेक्स टू लिंबिक कनेक्शनस स्ट्रॉग होऊ शकतात.

विचारी मेंदू <-->भावनिक मेंदू, मेडीटेशनने कॉर्टेक्स टू लिंबिक कनेक्शनस स्ट्रॉग होऊ शकतात. ---- यावर सद्ध्या डॉ यश वेलणकर लिहीतायत लोकसत्तेत. छोटे सदर आहे (मनोवेध, पान ६ वर येते). पुढे आपण वाचू शकतो शोधून हवा असलेला टॉपिक. मागच्या वर्षी डॉ श्रुती पानसे लिहायच्या (मेंदूशी मैत्री, पान तेच ६) तेही छान होते.

केशव तुलसी --- तुम्ही मानसिक अनारोग्य आणि मेडीटेशनचे परिणाम --- यावर काही लिहा ना. म्हणजे एक कृती / संस्कार म्हणून ते करणार्‍या आम्हाला त्याचा शास्त्रीय भाग कळेल.

@ अमा --- तुमच्या सगळ्या पोस्ट्सना मिळून एकच प्रतिसाद देते.
नमस्कार वगैरे नकोच. तुमचा आयूष्याचा अनुभव आणि त्यातून आलेला अधिकार खूप मोठा आहे. इथे वयाचा प्रश्न नसतो. अनुभवाचे शहाणपण सगळ्यात उत्तम आणि ते तिशीतही एखाद्यात असू शकते.

२-३ मुद्दे तुम्ही लिहीलेत. उरलेला हिमनग दिसला नाही तरी असणार नक्की.
आनंदा-अडचणीच्या क्षणी पालकांची सावली असणं हा खूप मोलाचा भाग मुलांसाठी; पण नसला आपल्या वाट्याला तर इलाज आहे का? आणि असे कसोटीचे प्रसंग त्यांना फेस करावे लागतील त्यासाठी त्यांना तयार करणं हाच पाल़कांचा रोल. बाकी आपण त्यांना जपतोच जमेल तितके. जोपर्यंत फिरस्ता मोडमध्ये आहोत तोवर आपल्या एकट्याच्याने उचलवेल इतकेच सामान जमा करून त्यात भागवायचे हा मुद्दा शिकून पुढे जायचे.

बाकी आजारपण निभावणे हा खूप काही शिकवणारा प्रसंग असतो. आर्थिक, मानसिक, नातेवाईक विश्लेषण, निर्णयक्षमता, खंबीरपणा, एकहाती लढाई --- सगळ्या बाबतीत कस लावणारे ट्रेनिंग. पूर्ण वेळ मदतनीस किंवा ओल्ड एज होम याला अर्थिक बळही लागतेच. परत त्या सोल्यूशनचे स्वतःचे असे काही प्रश्न उभे रहातात. तेव्हा कुठल्याही रस्त्याने गेले तरी जगण्याचे प्रश्न चुकणारे नाहीत. बदलतात फक्त. डोके शांत ठेवून ते सोडवावे हे उत्तम. आणि जेव्हा स्वतःला ते प्रश्न नसतात तेव्हा असे प्रशन सोडवणार्‍यांना बघून / मदत करून आपला अभ्यास तयार ठेवायचा.

तुमची बिझनेस, गुंतवणूक याबद्दलची जाण इतरत्र तुमच्या प्रतिसादातून जाणवते. सुगंधी द्रव्यांबद्दलही तुमचा चांगला अभ्यास असावा. त्याबद्दलही लिहीलत (वेळ मिळेल तेव्हा आणि तुमचे व्यावसायिक गोपनीयतेचे नियम बघून) तर वाचायला आवडेल. खूप दिवसापासून मनात होते. बाकीचे सुचवतायत तर मीही मम म्हणते.

प्रतिसाद आवडल्याचे सांगणार्‍या सार्‍यांना धन्यवाद.

@ मी_अस्मिता --- सुविचार सुरेख आहेत. दोन आणे नाहीत, खरोखरच लक्षात ठेवून अमलात आणावे असे मुद्दे आहेत. आधी पोस्ट केले असतेत तर..... radhanishaना सारे जरूरीचे, थोडक्यात एका पोस्टमध्ये वाचता आले असते.

Business article is already there check in my lekhan udyojak vibhag. Keep this thread for dear radha. Sending lots of positive energy and some happy tail wags

Pages