मन कशात लागत नाही

Submitted by सई केसकर on 5 January, 2017 - 10:56

बरेच दिवस, "तू खंबीर आहेस. तुला कुठल्याही मदतीची गरज नाही. ही एक फेज आहे, जाईल." अशी स्वतःची समजूत घालून कंटाळल्यावर एक दिवस मी तो निर्णय घेतला. युनिव्हरसिटीच्या वेबसाईटवर प्रत्येक कर्मचाऱ्याला मानसिक समुपदेशनाचे काही तास होते. त्यातून मी अपॉइंटमेंट घेतली. २०११ चा हिवाळा होता. तो देखील मिशिगन मधला. सकाळी उठल्यावर खिडकीबाहेर रात्रभर हळुवार पडलेल्या बर्फाची पाऊलखुणारहित गादी दिसायची. कौन्सिलरला कामाच्या वेळेच्या आधी भेटायचं म्हणून मी सहा वाजताची बस पकडायचे. त्यामुळे त्या गादीवर सगळ्यात आधी पाऊलखुणा बनवण्याचा मान मलाच मिळायचा. पहिल्या दिवशी मला तिथे जाताना अगदी रडू येत होतं. आपल्या इथपर्यंतच्या आयुष्याचा काहीच उपयोग नाही आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी कुठलीच दिशा नाही ही मनाशी ठामपणे ठरवलेली गोष्ट नक्की त्या माणसाला कशी सांगायची या विचारानेच रडू येत होतं. त्यात तो बर्फ, सभोवताली पसरलेला, कुठे कुठे काळामिट्ट झालेला तर कुठे कुठे थरावर थर बसून अक्राळविक्राळ झालेला. बसने गेल्यामुळे मी अर्धा तास आधीच पोहोचले, म्हणून मग तिथेच असलेल्या स्टारबक्समध्ये माझी आवडती कॉफी घेऊन पुन्हा खिडकीतून बाहेर बघू लागले.
"खरंतर असं कौन्सेलरकडे वगैरे जाण्यासारखं काहीच नाहीये. आपल्याला अशा काय जबाबदाऱ्या आहेत. मिळालेला पैसा आपण भारी भारी स्नो बूट्स नाहीतर जीन्स घेण्यात उडवतो. इथे अशी हवी तशी कॉफी घेऊन कुठल्यातरी दुःखाचं पोस्ट मॉर्टम करायची वाट बघतोय. रिडिक्यूल्स!"

पुन्हा तेच विचारचक्र सुरु झाले. मोठ्या माणसांकडून कित्येक वेळा ऐकलं होतं. "काही जबाबदाऱ्या नाहीत ना म्हणून येतं हे असं डिप्रेशन."
"तुमच्या पेक्षा कितीतरी खडतर आयुष्य जगणारे लोक आहेत. त्यांच्याकडे बघा"
हे सगळे आवाज हळू हळू माझाच आतला आवाज बनून गेले होते. एक क्षण वाटलं नकोच ते. असंच परत जावं. पण आपण कुणालातरी सकाळी सात वाजता या अशा थंडीत आपल्यासाठी बोलावलं आहे. त्यामुळे असं पळून नाही जायचं, असा विचार करून मी त्या बिल्डिंगमध्ये गेले.

जॉनथन च्या ऑफिस बाहेर लांबच लांब कॉरिडॉर होता. ठोकळ्यासारख्या बिल्डिंगमध्ये तो करडा चौकोनी कॉरिडॉर अजूनच खच्ची करत होता. मधेच आपल्याला जे वाटतंय तो या गावाचा तर परिणाम नाही ना, असाही विचार डोकावून गेला मनात. तेवढ्यात त्या लांबलचक कॉरिडॉर च्या दुसऱ्या टोकाला एक उंच माणूस खांद्यावर सायकल लटकवून येताना दिसला. जशी जशी त्याची आकृती जवळ आली तशी मी त्याला कधीही पाहिलेलं नसताना देखील हा तोच आहे अशी मला खात्री पटली. त्यानीदेखील मला ओळखलं असावं, कारण माझ्याशी हस्तांदोलन करायच्या खूप आधीच, लांबूनच माझ्याकडे बघून तो हसला. त्या निर्मळ आणि खुल्या हास्याच्या आठवणीचा देखील मला खूप आधार वाटतो.

पुढचे सात आठवडे येणाऱ्या प्रत्येक गुरुवारची मी अतिशय आतुरतेने वाट बघू लागले. जॉनाथन चूक बरोबर अशा पठडीतून माझ्याशी कधीच बोलला नाही. त्याच्या बरोबर बोलून नेहमीच हलकं वाटायचं आणि त्यानी दिलेले होमवर्क करण्यात प्रचंड मजा यायची. थोडेच दिवसांत नुसतं त्याला भेटण्याबद्दल नाही, तर त्या सकाळच्या बर्फात पाऊलखुणा उमटवण्यापासून ते अर्धा तास आधी पोचून, कॉफी पिण्याबद्दलदेखील मला प्रेम वाटू लागलं. आणि ज्या गोष्टीमुळे मला जॉनाथनकडे जावं लागत होतं, त्या आयुष्यात घडल्याबद्दल कुठेतरी थोडीशी कृतज्ञतादेखील वाटू लागली. हा योग्य शब्द आहे नाही माहिती नाही, पण आपण इंग्रजीमध्ये ज्याला 'बीइंग ग्रेटफूल' असं म्हणतो तसं काहीसं.

हे सगळे प्रसंग मी "डिअर जिंदगी" हा सिनेमा बघताना (रडत रडतच) पुन्हा जगले. सिनेमा बघताना रडण्यात माझा आधीपासूनच हातखंडा आहे. आणि यावर्षी पिंक, डिअर जिंदगी, दंगल असल्या सिनेमांनी माझ्या या स्वभावाला खच्चून प्रोत्साहन दिले आहे. हा काही डिअर जिंदगीचा रिव्यू नाही. पण ज्या सिनेमानी एका दर्शकाला आपला अनुभव लिहायला असं प्रोत्साहित केलं त्याचा रिव्यू वगैरे लिहायची काहीच गरज नाही.

आयुष्यात कधीही भरकटल्यासारखं वाटलं की आपली पहिली धाव मित्र मैत्रिणींकडे असते. पण मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक कितीही जवळचे असले तरी ते जवळचे आहेत हाच यातला मोठा अडथळा असतो. आणि आपल्या अडचणीच्या काळात, आपल्या अडचणीच्या पलीकडे बघणे फारसे जमत नाही. त्यामुळे जवळच्या माणसांना आपल्याला सावरण्याची आणि त्यांचं स्वतःचं मन प्रसन्न ठेवण्याची कसरत करावी लागते. अशा वेळी कधी कधी मैत्रीदेखील धोक्यात येते. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीकडून काही सत्य ऐकण्याची आपली तयारी नसते, आणि कधी कधी त्यांची मतं त्यांच्या आपल्या बरोबर आलेल्या संपर्कातून आणि त्यांच्या बायस मधून तयार झालेली असतात. अशावेळी गरज असते ती कुणीतरी आपलं ऐकून घेण्याची आणि अगदी अलगदपणे आपल्याला आपल्या निर्णयापर्यंत नेण्याची. मग ते निर्णय अतिशय सोपे किंवा प्रचंड अवघड असू शकतात. पण तिथपर्यंत भीती बाजूला ठेऊन पोचायला कौन्सेलरची नक्कीच मदत होते.

अशी मदत न घेण्याची कित्येक कारणं आपल्याकडे असतात. पण अशी मदत घेऊन आपण कमकुवत आहोत किंवा छोट्या छोट्या गोष्टींना अतिमहत्त्व देत आहोत असा समज करून घेणे धोक्याचे आहे. दुसऱ्यांची आपल्यापेक्षा मोठी दुःख बघून आपल्या त्रासाला कमी लेखणे देखील योग्य नाही. एखाद्या श्रीमंत माणसाला झाला काय किंवा गरीब माणसाला झाला काय, मनःस्ताप दोघांनाही सारखाच असतो, कारण तो पैसे ओतून कधीही झटकन दूर करता येत नाही. आणि कित्येक मानसिक द्वंद्व अशी असतात जी अशी गणितासारखी सोडवता येत नाहीत.

अमेरिकेतल्या त्या काही आठवड्यांमध्ये मी आयुष्यभर पुरतील एवढ्या गोष्टी शिकले. परत येत असताना, मनात अनेक विचार होते. आणि कदाचित आपला हा सकारात्मक दृष्टिकोन फार टिकणार नाही अशीदेखील भीती होती. पण माझ्या नशिबाने (आणि थोड्याश्या प्रयत्नांनी) तो अजून टिकून आहे. आणि त्यासाठी इतर बऱ्याच लोकांबरोबर मी जॉनाथनची आभारी आहे. नुकत्याच हार्वर्ड युनिव्हर्सिटीत झालेल्या एका प्रयोगाबद्दल वाचनात आलं. १९३९ पासून हार्वर्ड मध्ये दोन गटांचा अभ्यास होतो आहे. ७५० तरुण मुलांचा हा अभ्यास होता. त्यातील कित्येक आज हयात नाहीत. आणि जे आहेत ते सगळे नव्वदच्या उंबरठ्यावर आहेत. अभ्यास होता, "आनंदी, समाधानी जीवनाचे रहस्य काय?". आणि तरुणपणी सगळ्यांनी, "मला भरपूर पैसे किंवा प्रसिद्धी मिळाली तर मी आनंदी होईन" अशी उत्तरे दिली होती. आता मात्र जे खरंच आनंदी आहेत त्यांनी आनंदी जीवनाचे (आणि दीर्घायुष्याचे) रहस्य हे त्यांची जवळची नाती असल्याचे सांगितले आहेत. आपल्या आजूबाजूचे जवळचे लोक आपल्या आनंदाचा प्राणवायू असतात. आणि तसेच आपणही त्यांच्या आनंदाचा असतो. त्यामुळे आपण आनंदी आणि समाधानी राहणे ही चैन नसून एक जबाबदारी सुद्धा आहे.
त्यामुळे जर कुणी मी पहिल्या अपॉइंटमेंटच्या आधी तळ्यात मळ्यात होते तसं असेल, तर त्यांनी आपल्या आतल्या त्या नको म्हणाऱ्या आवाजाला बंद करून जरूर झेप घ्यावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते माझं मत म्हणून मी तिथे लिहिले नाहीये. तो त्या अभ्यासाचा भाग आहे ज्याचा रेफरन्स दिलाय. अभ्यासात भाग घेणाऱ्यांची जन्म भूमीच अमेरिका होती!!

http://www.ted.com/talks/robert_waldinger_what_makes_a_good_life_lessons...

ही लिंक बघा.

मस्त लिहिलंयस सई. काउन्सिलिंगच्या आवश्यकते/उपयोगितेबद्दल मनात काहीशी शंका होती ती फिटली. Happy

अवांतर : आत्ता वयाच्या आणि अनुभवाच्या ज्या स्टेजला मी आहे त्यात शेपटीवरचे बरेच हट्ट सरळ (आभारः संदीप खरे) होत चालले आहेत. एका टप्प्यावर कमालीची नास्तिक आणि कर्मकांडांच्या विरोधात होते - आता त्यांमागचे काही अर्थ दिसतात. प्रसंगी पड खाण्यातला शहाणपणा कळतो. बॅटल्स चूज करणं का महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. एकेकाळी आपल्या 'प्रिन्सिपल्स'शी प्रामाणिक राहणं म्हणजे थोर वाटायचं, आता मुळात प्रिन्सिपल काय आहे आणि व्हॉट अ‍ॅट द कॉस्ट ऑफ व्हॉट याचे निराळेच हिशोब ठळक होतात.
क्लीशेज मुळात क्लीशेज का बनतात त्यालाही कारण असतं!

या सगळ्या गोष्टी समोर असतातच नेहमीच - आपल्याला बघायची दृष्टी अजून आलेली नसते वा आपण बघायचं टाळत असतो. वय वाढतं तसा कलाय्डोस्कोप फिरतो. फिरावा. त्यासाठी मदत लागली तर मागण्यात कमीपणा नाही आणि तशीच ती दुसर्‍याला ऑफर करण्यात थोरवीही नाही. वी आर ऑल इन धिस टुगेदर! Happy

अवांतर२ : मागल्या पिढ्यांच्या मानाने आपल्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य लवकर येतं हे खरं आहे. त्याचे बरेवाईट दोन्ही परिणाम इनएव्हिटेबल आहेत. त्यातून मार्ग निघेपर्यंत काही पिढ्या चाचपडतील. (आणि तोवर नवीन प्रश्न निर्माण होतील! Happy ) चालायचंच.

ये सहारा जो ना रहे, तो परीशाँ हो जाएं
मुश्किलें जान ही ले लें अगर आसाँ हो जाएं! Happy
- राहत इंदोरी

(एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जयहिंद! :P)

आपल्या जवळच्या व्यक्तीकडून काही सत्य ऐकण्याची आपली तयारी नसते, आणि कधी कधी त्यांची मतं त्यांच्या आपल्या बरोबर आलेल्या संपर्कातून आणि त्यांच्या बायस मधून तयार झालेली असतात. अशावेळी गरज असते ती कुणीतरी आपलं ऐकून घेण्याची आणि अगदी अलगदपणे आपल्याला आपल्या निर्णयापर्यंत नेण्याची. मग ते निर्णय अतिशय सोपे किंवा प्रचंड अवघड असू शकतात. पण तिथपर्यंत भीती बाजूला ठेऊन पोचायला कौन्सेलरची नक्कीच मदत होते.>>> हे अगदी पटलंय. खूप छान लेख सई.

खुप छान लेख ! काउन्सिलिंगच्या उपयोगी असते आणि त्याचा टॅबु न बनवता त्याची मदत घेतली तर आयुष्यात पुढे जायला आणि आनंदाने जगायला मदतच होते हे अगदी चांगले लिहीले आहे.

आपल्या जवळच्या व्यक्तीकडून काही सत्य ऐकण्याची आपली तयारी नसते, >> हे अगदी पटले. त्यामुळे खरंच जेव्हा गरज असेल तेव्हा कौन्सेलरची मदत घ्यावी.

अशावेळी गरज असते ती कुणीतरी आपलं ऐकून घेण्याची आणि अगदी अलगदपणे आपल्याला आपल्या निर्णयापर्यंत नेण्याची. मग ते निर्णय अतिशय सोपे किंवा प्रचंड अवघड असू शकतात. >>>>>> पूर्णपणे पटलं. अवघड काळात असं ऐकून घेण्याऱ्या कानांची जास्त गरज असते.

आवडलं लिखाण . ज्याला ज्या ज्या वेळी गरज भासेल त्या त्या वेळेस जोनाथन मिळोत

सही. जिव्हाळ्याचा विषय. खरंच, आधी आपल्याला मदतीची गरज आहे हे कबूल करण्यातच खूप वेळ जातो...आणि मग आपली आपण कारणं शोधायचे प्रयत्न - खरं तर हे करणं अनावश्यक असतं.

मला वाटतं जर काही महत्वाचं असेल तर ते म्हणजे ज्या क्षणी डिप्रेशन ची चाहूल लागेल त्या क्षणी ते पळवून लावायचे स्टेप्स घेणं. मग त्या स्टेप्स म्हणजे व्यायाम असू शकतो, किंवा आई-वडिलांशी थोड्या गप्पाअ मारणं किंवा आवडती गाणी ऐकणं..

मागे एकदा एक क्लिप बघितली होती. त्यात त्यांनी डिप्रेशन ची तुलना मोठ्या scary black dog बरोबर करून छान illustrate केलं होतं. शोधून इथे अ‍ॅड करते.

सई,

छान लिहीलं आहेस.

मदतीची गरज आहे हे स्वतः आणि जवळच्या लोकांनी ओळखणं ही महत्वाची स्टेप आहे. इथे एका जवळच्या मित्राच्या मुलाचे हाल बघितले आहेत. आणि अशी मानसिक गरज लागणं यात भारत किंवा अमेरीकेत असणं याचा संबंध नाही. अमेरीकेत जास्त जाणवतं कारण लोकांमधून उठून इकडे येतो. मित्र होईपर्यंत वेळ जातो. हिवाळा डिप्रेसिंग असतो अशी अनेक कारणं आहेत. भारतात असणार्‍या लोकांची कारणं वेगळी असू शकतात, पण परीणाम तोच असतो.

माझ्याबाबतीत म्हणायचं तर नविन आले असताना आमच्या त्या छोट्याशा गावात आणि या देशात सेटल व्हायला मायबोलीची मदत झाली होती!

सई, सुंदर लेख. लिंक बद्दल धन्यवाद.
सकारात्मक दृष्टीकोनाबद्दल शिकलेल्या गोष्टीतून काही लेख लिहिता आला तर वाचायला आवडेल.

स्वातीचा प्रतिसादही आवडला. चूजिंग बॅटल्स आणि अ‍ॅट द कॉस्ट ऑफ व्हॉट हे मस्त लिहिलंय.

>>देश न सोडताही हे वाटायला हवे. कोणी जोनाथनने हे सांगावे हे महान आहे.

मला वाटतं की देश सोडल्यावर्/मुळे असं वाटलं यापेक्षा स्वतःचा कंफर्ट झोन सोडल्यावर ह्या गोष्टी जाणवायला मदत होते. आणि त्यात एखाद्या त्रयस्थ, प्रोफेशनल व्यक्तीची अनमोल मदत होऊ शकते, आणि ती घेण्यात कमीपणा वाटून घेऊ नये हा जास्त महत्वाचा मुद्दा वाटतो लेखाचा. हे कुठेही होऊ शकतं! सईताईंच्या बाबतीत ते दुसर्‍या देशात आणि जोनाथन सारख्या व्यक्तीमुळे झालं, ही केवळ एक वस्तुस्थिती आहे.

छान! वाचतानाच पहिल्या चार ओळीतच डिअर जिंदगी आठवला, आणि जोनाथन लांबून येताना लिहिलेय त्या जागी शाहरूखच माझ्या नजरेसमोर आला. मलाही फार आवडला आहे तो चित्रपट. फक्त फरक ईतका मी स्वतःला पलीकडे म्हणजे शाहरूखच्या जागी ठेवून बघितला. मला पर्सनली असे फार वाटते की माझे आयुष्य आनंदी आहे आणि माझ्या आजूबाजूला जर कोणी त्रासलेला वैतागलेला जीव दिसला तर त्यालाही आनंदी करावे. फार सोपा असतो आनंदी राहायचा फॉर्म्युला आणि त्यात आपल्या आवडीचे जगणे एवढेच येते. पैसाच हवा, किंवा मित्रच हवेत असे फॉर्म्युलाईज करणे हेच मुळात चूक आहे. तुम्हाला तुमच्या आनंदामागच्या कारणाचे विश्लेषण खरे तर करताच नाही आले पाहिजे. ते करता आले तर तुम्ही त्या गोष्टीमागे धावायला सुरुवात कराल आणि त्यात तो आनंद गमावून बसाल.

आपल्या आजूबाजूचे लोक आपला प्राणवायू असतात आणि आपणही त्यांचा हे काय कोणी कौन्सेलर जोनाथनने सांगायला हवे का? >>> जोनाथन सांगितले म्हणून बिघडले कुठे? त्याची मदत झाली हे महत्वाचं ना? भारतात असताना अनेक गोष्टी गृहीत धरल्या जातात, लांब गेलं की त्याची किंमत कळते. आजूबाजूची माणसं हे त्यातलं एक उदाहरण. ते क्लिअर करायला जोनाथननं मदत केली असेल.

सईला जे सांगायचे आहे ते ती सांगेलच पण तुमचे प्रश्न वाचून लिहावसं वाटलं.

आपल्या
आजूबाजूचे जवळचे लोक आपल्या आनंदाचा प्राणवायू असतात.
आणि तसेच आपणही त्यांच्या आनंदाचा असतो. त्यामुळे आपण
आनंदी आणि समाधानी राहणे ही चैन नसून एक जबाबदारी
सुद्धा आहे.>>>>>>>> इस बात के लिए आपको सौ गाँव इनाम...

>>>>जोनाथन सांगितले म्हणून बिघडले कुठे? त्याची मदत झाली हे महत्वाचं ना? भारतात असताना अनेक गोष्टी गृहीत धरल्या जातात, लांब गेलं की त्याची किंमत कळते. आजूबाजूची माणसं हे त्यातलं एक उदाहरण. ते क्लिअर करायला जोनाथननं मदत केली असेल. <<<<

भारतातील माणसांना लांब गेलेल्या माणसांची किंमत कळावी हे जोनाथनने सांगावे?

जोनाथनने सांगितले तर बिघडले कुठे?<<<< आपले आई वडील जोनाथनसारखे कौन्सेलर बनून पैसे उकळत नाहीत.

त्याची मदत झाली हे महत्वाचे ना?<<<< अच्छा, अमेरिकेत गेल्यावर कोणाचीतरी मदत मिळेल लांब येऊन आपल्या माणसांना लांब केल्यामुळे आलेल्या मानसिक प्रॉब्लेम्सवर, असे गृहीत धरून लांब जातात का लोक?

काय राव अंजलीताई, !!!!

काय राव अंजलीताई,>>> त्यात काय राव वगैरे???

बेफिकिर, तुम्हाला मुद्दा कळला नाहीये का? का तुमचा मुद्दा मला कळत नाहीये?

अमेरीकेत आलेल्या भारतियांनी पैसे उकळतात म्हणून काऊंसलरकडे जाऊ नये असं म्हणताय का?

सई, छान लिहीलयस!

बेफि, काहीतरी गोंधळ होतोय.
>>>>>>अमेरिकेतल्या त्या काही आठवड्यांमध्ये मी आयुष्यभर पुरतील एवढ्या गोष्टी शिकले. परत येत असताना, मनात अनेक विचार होते. आणि कदाचित आपला हा सकारात्मक दृष्टिकोन फार टिकणार नाही अशीदेखील भीती होती. पण माझ्या नशिबाने (आणि थोड्याश्या प्रयत्नांनी) तो अजून टिकून आहे. आणि त्यासाठी इतर बऱ्याच लोकांबरोबर मी जॉनाथनची आभारी आहे.
*नुकत्याच हार्वर्ड युनिव्हर्सिटीत झालेल्या एका प्रयोगाबद्दल वाचनात आलं. १९३९ पासून हार्वर्ड मध्ये दोन गटांचा अभ्यास होतो आहे. ७५० तरुण मुलांचा हा अभ्यास होता. त्यातील कित्येक आज हयात नाहीत. आणि जे आहेत ते सगळे नव्वदच्या उंबरठ्यावर आहेत. अभ्यास होता, "आनंदी, समाधानी जीवनाचे रहस्य काय?". आणि तरुणपणी सगळ्यांनी, "मला भरपूर पैसे किंवा प्रसिद्धी मिळाली तर मी आनंदी होईन" अशी उत्तरे दिली होती. आता मात्र जे खरंच आनंदी आहेत त्यांनी आनंदी जीवनाचे (आणि दीर्घायुष्याचे) रहस्य हे त्यांची जवळची नाती असल्याचे सांगितले आहेत.*
आपल्या आजूबाजूचे जवळचे लोक आपल्या आनंदाचा प्राणवायू असतात. आणि तसेच आपणही त्यांच्या आनंदाचा असतो. त्यामुळे आपण आनंदी आणि समाधानी राहणे ही चैन नसून एक जबाबदारी सुद्धा आहे.<<<<
* ते * हार्वर्ड मधील प्रयोगाची माहिती आहे. सईचे स्वतःचे मत त्यानंतरचा शेवटचा भाग. आनंदी रहाणे याकडे एक चैन्/चोजले म्हणून न पहाता , नात्यातील आनंदाची जी देवघेव आहे त्यातली आपली जबाबदारी पार पाडता यावी यासाठी तरी गरज पडल्यास मदत घ्या. त्याचा देश सोडण्याशी संबंध नाही. ते जोनाथनने सांगितलेले नव्हे. जोनाथनने हे चूक हे बरोबर असे काहीच सांगितले नाही. तिला सकारात्मकता मिळवण्यासाठी मदत केली असे सईने आधीच्या पॅरात लिहिलयं.
सॉरी, अगदीच राहवले नाही म्हणून लिहिले.

सई, छान लेख.

स्वाती_आंबोळे,
प्रतिक्रिया भयानक पटली आणि आवडली.

सई, लेख आवडला.

टॅबू म्हणून किंवा नाही, पण मला अजूनही प्रोफेशनल काउन्सेलींग आपल्या मित्र/नातेवाईक इत्यादींपेक्षा कमी /जास्त महत्वाचा वाटत नाही. मानसिक आधाराची गरज ओळखून तो वेळीच शोधणे हे मात्र अतिशय महत्वाचं आहे. कोणाला तो आजूबाजूच्या मित्र/परिवारातून मिळेल तर कोणाला प्रोफेशनल काउन्सिलर कडून. ह्या प्रत्येक बाबतीत ज्या प्रकारचा आधार मिळेल त्याचे प्लसेस आणि मायनसेस असतील.

लेखाचा फोकस (प्रोफेशनल) काउन्सेलींग कसं उपयुक्त आहे, असा वाटला म्हणून हे मत व्यक्त करत आहे. जसं नातेवाईक रक्ताचे म्हणून अमुक एक सल्ला/मत देण्यास बांधील, मित्र (ना रक्ताचे ना आर्थिक संबंध असलेले) म्हणून अमुक एक विचार देतील तसंच हे "प्रोफेशनल" काउन्सिलर सुद्धा आर्थिक किंवा दुसर्‍या कुठल्या मेकॅनिजम ने बांधील म्हणून अमुक एक सल्ला देतील. शेवटी आपल्या मनाला काय पटतं, उमगतं तेच आपण करू.

स्वाती२,

सॉरी, ह्या परिच्छेदामुळे गोंधळ झाला.

>>>>अमेरिकेतल्या त्या काही आठवड्यांमध्ये मी आयुष्यभर पुरतील एवढ्या गोष्टी शिकले. परत येत असताना, मनात अनेक विचार होते. आणि कदाचित आपला हा सकारात्मक दृष्टिकोन फार टिकणार नाही अशीदेखील भीती होती. पण माझ्या नशिबाने (आणि थोड्याश्या प्रयत्नांनी) तो अजून टिकून आहे. आणि त्यासाठी इतर बऱ्याच लोकांबरोबर मी जॉनाथनची आभारी आहे.<<<<

हे सई केसकरजी ह्यांनी लिहिलेले नसून हॉर्वर्ड मधील प्रयोगाची माहिती आहे हे आता कळले.

Happy

सई, छान लेख! अमित नी लिहिलय तसं सकारात्मक गोष्टींबद्दल वाचायला आवडेल.

बाई, वेल सेड. Happy

अमुक एक विचार देतील तसंच हे "प्रोफेशनल" काउन्सिलर सुद्धा आर्थिक किंवा दुसर्‍या कुठल्या मेकॅनिजम ने बांधील म्हणून अमुक एक सल्ला देतील. शेवटी आपल्या मनाला काय पटतं, उमगतं तेच आपण करू.>>>>>> काउन्सेलर किंवा थेरपिस्ट लोकांबद्दल प्रचलित असलेल्या इमेज मुळे तसं वाटू शकतं पण ते आजिबातच बरोबर नाहीये. आपले नातेवाईक, आई, वडिल कितीही जवळचे असले तरी सईनी लिहिलं आहे तसं त्यात त्यांच्या (आपल्या आप्तांच्या) विचार, मनस्थिती ह्यावर सुद्धा सल्ल्याची क्वालिटी अवलंबून असते. वरकरणी सोपा सल्ला वाटला तरी तो समोरच्याला पटणे/रुचणे फार महत्वाचे असते. आणि त्या करताच परत सई नी लिहिलय तसं, अशी व्यक्ती हवी असते जी तुम्हाला एखाद्या निर्णया पर्यंत पोहोचवते. काय निर्णय घ्यावा हे सांगत नाही नेसेसेरिली. आणि त्या करता मला वाटलं स्कील आणि अनुभव लागतो. अनबायस्ड, इमपार्शल असा दृष्टिकोन लागतो, जो आपल्या आप्तांकडे दर वेळी असेलच असं नाही.
बेफिकिरांच्या पोस्टींवरुन भारतात ह्या विषयाला अनुसरुन केवढी ओवरसिंप्लिफिकेशनची भावना आहे हे दिसून येतं.

>> आपले नातेवाईक, आई, वडिल कितीही जवळचे असले तरी सईनी लिहिलं आहे तसं त्यात त्यांच्या (आपल्या आप्तांच्या) विचार, मनस्थिती ह्यावर सुद्धा सल्ल्याची क्वालिटी अवलंबून असते. वरकरणी सोपा सल्ला वाटला तरी तो समोरच्याला पटणे/रुचणे फार महत्वाचे असते. आणि त्या करताच परत सई नी लिहिलय तसं, अशी व्यक्ती हवी असते जी तुम्हाला एखाद्या निर्णया पर्यंत पोहोचवते

बुवा, सहमत पण अशी व्यक्ती जी त्रयस्थपणे आपल्याला सांगेल, आपण नक्की काय मार्ग अनुसरावा, ही कुठलीही असू शकते. प्रोफेशनल काउन्सिलर कधीतरी खूप तिर्‍हाईत असू शकतात (टू डिटॅच्ड) आणि नातेवाईक खूप जवळचे, इन्व्हॉव्ह्ल्ड, स्वतःचे नातेसंबंध जपणारे. म्हणून हे ठाऊक असणं अत्यंत महत्वाचं की ही प्रत्येक कॅटेगरी फक्त मतप्रदर्शन, मार्गदर्शन करेल त्यांच्या त्यांच्या पॉइण्ट ऑफ व्ह्यू ने. ह्यामुळे आपल्याला आपला निर्णय घेणं अतिशय सोपं होऊ शकतं, त्याकरता ही प्रत्येक कॅटेगरी फॅसिलिटेट करेल त्यांच्या त्यांच्या परीने. पण आपण कुठल्या परिस्थितीत अडकलो आहोत ते आपल्यापेक्षा जास्त कोणालाही ठाऊक नसेल. म्हणून "आपल्या मनाला काय पटतं, उमगतं तेच आपण करू" ह्यावर माझा ठाम विश्वास आहे.

(असंही असू शकेल की ह्या विश्वासाला तडा जाईल अशा परिस्थितीत मी कधी अडकले नाहीये. तशी वेळ आलीच (देव न करो) तर सई चा लेख नक्कीच आठवेल :))

असंही असू शकेल की ह्या विश्वासाला तडा जाईल अशा परिस्थितीत मी कधी अडकले नाहीये. तशी वेळ आलीच (देव न करो) तर सई चा लेख नक्कीच आठवेल >>>>> एग्जॅक्टली! अजून मी काही बोलायची गरजच नाही. Happy

सॉरी, समूपदेशक अनावश्यक आहे असे म्हणायचे नाही.

लेखातील अनुभव स्वतःचा आहे हे धागाकर्त्या मान्य करत नाहीत हा आक्षेप आहे. (हा आक्षेप असणे हा एक मुद्दा आहे)

दुसरा मुद्दा असा आहे की त्यावर पैसे देऊन मिळालेला सल्ला हा भारतात मुळातच शिकवला जातो.

तिसरा मुद्दा असा आहे की 'पैसे देऊन समूपदेशकाला भेटणे हे काही गैर नाही' इथपर्यंत चर्चा मुळात उगीचच पोचलेली आहे.

सशल ह्यांचे हे वाक्य पटले:

>>>>कोणाला तो आजूबाजूच्या मित्र/परिवारातून मिळेल तर कोणाला प्रोफेशनल काउन्सिलर कडून.<<<<

वैद्यबुवांचा प्रतिसाद वाचून दोन मुद्दे मनात आले.

१. बुवांचे एक म्हणणे बरोबर आहे की खास आपल्यासाठी (आर्थिक मोबदला घेऊन) आपल्या भल्यासाठी सल्ला देणारा वेगळा!

२. एक पैसाही न घेता आपल्या भल्यासाठी बोलणारे, वागणारे कुटुंबीय असतात हे मान्य केले जात नाहीये. ह्याचे कारण हे कुटुंबीय त्यांच्या भल्यासाठी आपल्याला विशिष्ट पद्धतीने वागण्यास भाग पाडूही शकत असतील असे गृहीतक असावे.

त्यागावर आधारीत कुटुंबव्यवस्था प्रामुख्याने राबवणार्‍या देशातील नागरिकांना 'अशी कुटुंबव्यवस्था तुम्हाला सुटेबल आहे' हे इतर देशातील समूपदेशकाने सांगणे हे इथे सगळ्यांना एक 'सुयोग्य मानसोपचार' का वाटत आहे हे समजत नाहीये.

>>>>आपण कुठल्या परिस्थितीत अडकलो आहोत ते आपल्यापेक्षा जास्त कोणालाही ठाऊक नसेल. म्हणून "आपल्या मनाला काय पटतं, उमगतं तेच आपण करू" ह्यावर माझा ठाम विश्वास आहे.<<<<

+१

"आपल्या मनाला काय पटतं, उमगतं तेच आपण करू" >> सहमत. आपल्या विचारला वेगळी कदाचित सकारात्मक दिशाच फक्त कौन्सेलर देऊ शकतात. (हा फक्त दिशेला आहे कौन्सेलरला नाही) वाटेवरून चालणे आणि निर्णय अर्थात आपला. हेच मलाही वाटतं.
अरे धागा वाहता झालाय. admin बाध घाला कृपया.

Big hug sai. Counselling offers impartial third person perspective. And counsellors are professionally trained . Which really offers a better platform to put across one's issues. The process of airing ones issues logically itself can lead one to the solutions. Relatives may act supportive but they may have hidden agenda and can colour your issues with their views. They also add their own drama. And

Pages