डिप्रेशन .. जगण्याचा कंटाळा

Submitted by radhanisha on 14 October, 2020 - 11:16

हल्ली मधूनमधून किती दिवस राहिले असावेत असा विचार मनात येतो .. 20 वर्षं धरली तर 7300 दिवस .. 40 वर्षं धरली 14600 दिवस ..

40 वर्षं किंवा 20 वर्षं म्हटलं की धडकीच भरते .. त्यामानाने दिवस बरे वाटतात .. तेवढाच काळ असला तरी .. 40 वर्षं म्हणजे साडेतीन लाख तास होतील .. नको .. दिवसच बरे , एकेक दिवस तसा पटकन संपतो .. तास खूप वाटतात ..

आतापर्यंत 25 वर्षं म्हणजे 9100 च दिवस झाले आहेत फक्त आणि खूप .. खूप .. म्हणजे खूपच जगून झाल्यासारखं वाटतं . खूप बघितलं , खूप अनुभवलं , खूप सोसलं असं वाटतं .. खरं तर जगाच्या दृष्टीने ज्याला सोसणं म्हणता येईल तसं काहीच वाट्याला आलं नाही ... तरी इच्छा नसलेले खूप अनुभव आले असं वाटतं , जे चूझ करायचं स्वातंत्र्य असतं तर नक्कीच निवडले नसते अनुभवण्यासाठी ...

आणखी आयुष्य अनुभवण्याची हौस संपल्यासारखी वाटते .. भरपूर जगून झालं , आता पुरे झालं तरी चालेल असं वाटतं .. जनरल आयुष्य चांगलं चाललेल्या लोकांमध्ये जी जगण्याची असोशी असते , आशा , आकांक्षा , इच्छा , त्या पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याची तयारी असते - ह्या सगळ्याच गोष्टींची क्वांटीटी मनात खूप कमी झाल्यासारखी वाटते . शिवाय पुढचीही भीती वाटते .. एवढ्याशा आयुष्यात इतका मनस्ताप देणारे अनुभव आले , आता डोळे मिटण्यापूर्वी आणखी काय काय बघावं लागणार .. पुरेसं जगून झालं आहे , आणखी जगावं लागलं नाही तर देवाचे उपकार होतील असं वाटणं हे नॉर्मल समजलं जातं नाही ... लाईफ इज गॉड्स गिफ्ट असे क्वोट्स वाचले की आयरॉनीने हसू येतं .. घे बाबा तुझं गिफ्ट वापस प्लिज ..

70 - 80 - 90 वयाच्या माणसांचेही शक्य तेवढे उपचार केले जातात .. अनेकदा त्यांच्या विरोधाला भीक न घालता .. आजारपण सहन करत , सतरा पथ्यं पाळत का होईना त्यांना जगायला लावायचं असतं .. कारण आम्हाला तुम्ही अजून हवे आहात हे कारण असतं .. शिवाय बऱ्याच केसेस मध्ये त्या पेशंटलाही एवढ्यात मृत्यू नको असतो .. they enjoy life and it's great and everything . तेव्हा 25 व्या वर्षी पुरे , खूप जगून झालं म्हटलं तर डिप्रेशनच्या गोळ्या आणि कौन्सिलिंग सुरू करण्यापलीकडे काही होणार नाही .. जगणं पुरे असं वाटणं ही कन्सेप्टच समजू शकत नाही ... बहुतेक ती हेल्दी माईंडचं लक्षणही नाही ...

हा डिप्रेशनचा परिणाम आहे की कंटाळा आहे की नुसताच आळस आहे माहीत नाही .. डिप्रेशन बरंच कमी झालं आहे .. रोज रडू केव्हाच बंद झालं आहे .. क्वचित आठवडा पंधरवड्यातून एखाद दुसरेवेळीच रडू येतं ... दिवस मजेत जातो , कसा संपला ते कळत नाही ... घरातली कामं करते , वाचते भरपूर .. म्युजिक ऐकते .. सिरिअल्स बघते .. आयुष्य छान चाललं आहे म्हणायला कोणतीच आडकाठी नाही ... पण existence आणि non-existence अशा दोन चॉइसेसचा विचार केला तर नॉन एक्सिस्टेन्स नेहमीच प्र चं ड अपिलिंग वाटतो ... Oh , how much I would love to rest .. सतत अखंड चालू असलेले विचार नाहीत , आठवणी नाहीत , अस्तित्वाची जाणीव नाही .. शांत झोप .. स्वप्नं सुद्धा नसलेली .. अस्तित्व संपूर्ण पणे पुसलं गेलेलं असेल या विश्वाच्या पटावरून ... its beyond tempting ..

लोक आजारी पडल्यावर जिवंत राहण्यासाठी किती आटापिटा करतात जीवाचा ... wow .. मला जर डॉक्टरांनी सांगितलं , " सॉरी अब आपके पास सिर्फ दो ही महीने बचे है , हम कुछ नहीं कर सकते " तर मला लिटरली हर्षवायू होईल ...

आत्महत्या करण्याची हिंमत नाही .. जगण्याचा मोह असा नाही पण नॉन एक्सिस्टेन्सची काही खात्री नसल्याने .... पुनर्जन्मावर विश्वास आहे ... त्यामुळे धडधाकट शरीर दिलं होतं ते टाकून आलीस , जा आता हात - पाय किंवा डोळे नसणं कसं असतं ते अनुभवून बघ म्हणून जन्म मिळाला तर काय घ्या .... किंवा चांगली परिस्थिती सोडून आलीस जा आता दारिद्र्य , संधीचा अभाव कसा असतो ते अनुभव म्हणून पोटाला अन्न नसलेल्या , शिक्षणाची संधी नसलेल्या घरात पाठवलं तर काय करणार ... 18 - 20 ला लग्न आणि 2 पोरं पदरात .. ( shudders ) त्यापेक्षा आहे ते सोन्यासारखं आयुष्य म्हणता येईल .... पण नॅचरल डेथ आली तर वाईट ठिकाणी पाठवणार नाहीत .... त्यामुळे नॅचरल रिजन्सनी पटकन काहीतरी होऊन जीव जावा अशी एक इच्छा मनाच्या कोपऱ्यात असतेच कायम .....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झंपी , बाबा आहेत ना ... ते बाकी सगळं सांभाळून घेतात , मुड्स , आळस , कंटाळा .. कुठल्याच कामाची सक्ती नाही .. कसलीच अपेक्षा नाही .. पण मरावसं वाटतं असं कधी म्हटलं की ते चिडतात , मला निगेटिव्ह काही ऐकायचं नाही म्हणतात .. He thinks it's momentary whim .. त्यावर बोललं नाही की ते माझ्या मनातही नसेल, आणि बोललं किच फक्त निगेटिव्ह विचार होतो आहे , असं त्यांना वाटत असावं कदाचित ... पण बोललं नाही तरी विचार सतत किंवा खूप वेळ तरी असतोच हे त्यांना माहीत नाही म्हणा किंवा काही सोल्युशन नसल्याने शक्यतो दुर्लक्ष करून निदान स्वतःचा तरी मनस्ताप टाळत असावेत .... मी दोष नाही देत आहे .. He is the best father I could have asked for , far better than I deserve . बाकी प्रोफेशनल काऊन्सिलिंगला जाणं नको वाटतं .. अनोळखी डॉक्टर कडे सगळं रामायण वाचून दाखवा आयुष्याचं .. एकदा झालं तेवढं पुरे झालंसं वाटतं ... मायबोली वरचे लोक समहाऊ अनोळखी वाटत नाहीत म्हणून इकडे मन मोकळं केलं ..

कारवी , थँक्स .. एवढं कळकळीने आज कोण कुणा अनोळखी माणसाला सांगतं ... प्रत्येक मुद्दा सावकाश परत परत वाचेन मी आणि वागण्यात , दृष्टिकोनात फरक पाडण्याचा प्रयत्न करेन ..>> राधानिशा तुम्हाला मनापासून शुभेच्छा.. तुम्ही सारे प्रतिसाद , विचार मनापासून वाचता आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देता ह्यासाठी तुमचं मी नक्कीच कौतुक करेन.. तुमचे विचार मुळात चांगलेच असणार याची मला खात्री आहे.

बाकी प्रोफेशनल काऊन्सिलिंगला जाणं नको वाटतं .. अनोळखी डॉक्टर कडे सगळं रामायण वाचून दाखवा आयुष्याचं >>>
तुम्ही फक्त समुपदेशकाकडे जाता की सायकीयट्रिस्ट कडे?
सायकीयाट्रीस्ट नसाल गेलात तर जा. समुपदेशन + औषध दोन्हीची गरज असू शकते (आहे की नाही हे ते सांगतील.)
सगळं रामायण एकदा सांगावं लागतं, प्रत्येकवेळी मागचं रिपीट करायची गरज नाही. तेव्हा तेवढं तर करावं लागेल.
जर फार समस्या नाही कधी कुठे थोडं मन मोकळं करायचं आहे म्हणुन माबोवर येऊन केलं मोकळं, मग बरं वाटतंय तर गोष्ट वेगळी.

कारवी यांचे प्रतिसाद आवडले.
राधानिशा तुम्हाला आनंदी जीवनासाठी व उत्तम आरोग्यासाठी खूप शुभेच्छा. निराशा व भीती यांचा बागुलबुवा वाढवला तितका वाढतो , कामात /छंदात मन गुंतवून त्यावर थोडी फार मात करता येते. तुम्ही या विचारांवर मात करालच.... काळजी घ्या. लिहीत रहा. Happy

कारवी यांचे प्रतिसाद सेव्ह करून ठेवावे इतके सुंदर आहेत.

वेमा / अ‍ॅडमीन.. हा धागा उडवु नका प्लीज.

असा विचार मनात येणारे अनेकजण असतात आसपास.
फक्त त्यांना व्यक्त होता येत नाही / व्यक्त होण्याची भीती वाटते / प्लॅटफॉर्म उपलब्ध नसतो.
राधानिशा यांनी वरचे सर्व अडथळे पार करुन निदान इथे ते सगळे जमेल तसे लिहिले आहे.
हा धागा नैराश्याच्या उंबरठ्यावर असलेल्या कोणाला आत्महत्या करण्यास प्रव्रुत्त करेल असे वाटत असेल तर उलट लेखाखाली आलेल्या प्रतिक्रिया नैराश्याने ग्रासलेल्या (किंवा न ग्रासलेल्या व्यक्तीलाही) चैतन्य देतील.

मीही यातून गेलेय. पण कुठेच व्यक्त होता आले नाही. त्यावेळी इतक्या सुंदर पद्धतीने आणि कळकळीने कोणी समजावले नाही.
अगदी मी ज्यांच्याकडे गेले त्या समुपदेशकांनीही नाही. तेव्हा हा धागा ठेवाच. प्लीज. ___/\___

कारवी, खूप सुंदर प्रतिसाद....
आत्महत्या करण्यास प्रव्रुत्त करेल असे वाटत असेल तर उलट लेखाखाली आलेल्या प्रतिक्रिया नैराश्याने ग्रासलेल्या (किंवा न ग्रासलेल्या व्यक्तीलाही) चैतन्य देतील.>>>>>> +१

सगळ्या माबो कुटुंबाला धन्यवाद. मला वाटले नव्हते इतके लंबे-चौडे लिखाण इतरही वाचतील....
radhanisha तुम्ही वाचलत, बरं वाटलं. वेळ घ्या, विचार करा. पटलं नाही तर सोडून द्या, हरकत नाही.
पण नको त्या मार्गावर जाणारे एक पाऊल थांबले तर सार्‍यांनाच खूप आनंद होईल.

बघा, इतके सगळे तुमचे हितचिंतक आहेत. प्रत्येकजण मदत करेल लागेल ती. फक्त तुमचा निर्धार डळमळू देऊ नका.
गिरगिटली पाटी धुवून पुसून पुन्हा श्री लिहा. सगळे ठीक होईल. ही २५ आठवणारही नाहीत इतकी पुढची वर्षे चांगली जावोत ही शुभकामना.

स्वामी श्री सवितानंद यांचे स्तोत्र मंत्राचे विज्ञान नावाचे एक फर्स्ट हॅण्ड अनुभव कथन करणारे पुस्तक आहे, त्यात एक आत्महत्या करण्यासाठी तयारीत आंरया एका शिक्षिकेचा अनुभव आहे तो वाचा तिला वेळीच मदत मिळाली आणि जगण्याची उमेद उत्साह परत आला.. हेप्रत्यक्ष लिखित अनुभव आहेत...बुद्धिवादी व्यक्तींनी पटत नसल्यास सर्व खोटे म्हणून दुर्लक्ष करावे ...

नवीन Submitted by स्वाती२ >>>> धन्यवाद स्वाती; तुम्ही अनुभवी केअरगिवर आहात हे मी कालच वाचले. माझी फक्त थिअरी आहे. अनुभव आहे पण इतका टोकाचा नाही. तेव्हा तुम्हीच काही चुकले किंवा असा पेशंट करूच शकणार नाही असे काही सुचवले गेले तर सुधारा प्लीज.

कारवी, सुंदर प्रतिसाद. कारवीचा प्रतिसाद सकारात्मकतेने घेतला म्हणून एकच गोष्ट लिहून इथे यायचे थांबवेनः

कधीतरी एका बाईंनी कॉलेजात सांगितले होते - What happened to you doesn't matter, what you did with what happened to you matters. उदा: सुनीतावर बलात्कार झाला तर खचून न जाता ती 'प्रज्वला' सारखी संस्था उभी करते. जेव्हा मी स्वतः काही दु:खाच्या प्रसंगात होते तेव्हा बाईंनी असे what happened to you doesn't matter म्हणणे फार लागलं. पण बाई माया करतात, आपलं भलंच सांगत असतील अशाने ते मनात राहिले. पुढे जेव्हा दु:खाचे, मनस्तापाचे शल्य कमी झाले तेव्हा झालेल्या मनःस्तापाचे विश्लेषण केले (का झाला, मी काय वेगळं करायला हवं होतं, माझ्या कुठल्या समजूतींमुळे असे घडले इ). मग पुढे शहाणपणाचे निर्णय घेत गेले. ही मला जमलं अशी बढाई नाही तर हाही एक मार्ग असू शकतो असा पर्याय तुझ्यापुढे ठेवत आहे.

तुझ्यात लेखनाची ताकद आहे. तुझ्या वाचकांना मारवासारख्या गोष्टींबद्दल अजूनही उत्सुकता असेल. जे जमणार नाही (केयर गीव्हींग इ) त्यापेक्षा जे जमतं त्यावर लक्ष पक्कं ठेवाव.

कारवी जबरदस्त प्रतिसाद.
.
बाबा आहेत ना ... ते बाकी सगळं सांभाळून घेतात , मुड्स , आळस , कंटाळा .. कुठल्याच कामाची सक्ती नाही .. कसलीच अपेक्षा नाही >>
आय थिंक, हे बदलायला हवे.
तुमच्या पुढे कुठलेही ध्येय नाही. कुणाच्याही (अगदी तुमच्या ही ) स्वतःकडून काहीच अपेक्षा नाहीत. त्यामुळे स्वतःकडून काहीतरी चांगलं आउटपुट यावं म्हणून झटण नाही.
This work towards a goal keeps you fresh and happy.
Routine has a great power.

मला उत्तम नोकरी आहे. काही वर्षांपूर्वी काम मात्र अजिबात चॅलेंजिंग नव्हते. दिवसभर वेळ घालवायला लागायचा ऑफिस मध्ये , पण काम नव्हते तसे. तसं होते. मधून मधून घरूनही काम करायचे ,त्यामुळे मुलीबरोबर वेळ मिळायचा . पण ऑफिस मधल्या वेळात काय? इतकं नकोस झालं, मी नोकरी सोडली.
मुलीबरोबर पूर्णवेळ मिळावा हा हेतू होताच.
पण मग office ne वर्षभर सुट्टी दिली. हे वर्ष मी आणि माझ्या मुलींनी खूप एन्जॉय केले. मला तिच्याबरोबर विविध गोष्टी करता आलिया.
वर्ष संपताना पुन्हा काम करावे वाटायला लागले.

दुसरे बाळ झाल्यावर, ठरवून चॅलेंजिंग काम घेतले .
लॉक डाऊन, बायका नाहीत, नुकतचं ऑफिस सुरू झालेले मार्चमध्ये, इम्पलेमेंटेशन प्रोजेक्ट, नवीन टेक्नॉलॉजी and wfh - पार वाट लागली सुरुवातीला.
पण मजा देखील खूप आली.
My productivity is at all time high.. I dont have time to think any negative thoughts. And time with kids + work is keeping me happy.

They say , all work and no play makes jack a dull boy. I say all play and no work makes jack even more dull , boring and bored guy!

धन्यवाद सार्‍यांना

बाबा आहेत ना ... ते बाकी सगळं सांभाळून घेतात , मुड्स , आळस , कंटाळा .. कुठल्याच कामाची सक्ती नाही .. कसलीच अपेक्षा नाही >>
आय थिंक, हे बदलायला हवे. तुमच्या पुढे सद्ध्या कुठलेही ध्येय नाही. >>>>>>
हेच वाटलं होतं त्यांचे प्रतिसाद वाचून. समुपदेशन पालकांचेही व्हावे का?

समुपदेशन पालकांचेही व्हावे का?>>
मानसिक आजारात रुग्णापेक्षाही जास्त मार्गदर्शनाची गरज घरातील इतर व्यक्तींना असते. या आजारात घरातील व्यक्तींचा आधार हा फार महत्वाचा. मात्र आधार देणे म्हणजे पांगुळगाडा होणे नव्हे तर रुग्णाला या व्याधीसह शक्य तितके प्रॉडक्टिव लाईफ जगता येण्यासाठी प्रयत्न करणे, रिसोर्सेस शोधणे, तुला हे नक्की जमेल हा विश्वास देणे. इतर आजारात जसे की डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आकड्यांची नोंद होते, इथे रुग्णाच्या वर्तनाची नोंद महत्वाची असते आणि जोडीला घरातील इतर व्यक्ती कसे वागतात तेही महत्वाचे असते. प्रत्येक रुग्ण वेगळा, कौटुंबिक स्थिती वेगळी. साधारण लक्षणांत समानता असली तरी मानसिक आंदोलन हे त्याचे स्वतःचे असे युनिक असते. त्रयस्थ नजरेने ते टिपणे आणि डॉक्टरांना सांगणे हे घरच्यांनी केले तर उपचार करताना मदत होते. मानसिक आजारात, आपल्या घरातील व्यक्तीला डिप्रेशन, अँक्झायटी अशी काही व्याधी आहे, त्यामुळे हे असे वर्तन होत आहे हेच बरेचदा लक्षात येत नाही. निदान झाले तरी त्या भोवती जो स्टिग्मा आहे त्यातून आजार नाकारणे आणि लपवणेही होते. औषधोपचारांबद्द्ल गैरसमज आहेत. त्यामुळे औषध नको नुसतेच समउपदेशन करा असाही हट्ट असतो. उपचार घेतले आणि लगेच बरे वाटले असे नसते, रिलाप्सचाही धोका असतो. या व्याधीसह कसे जगायचे हे रुग्णासह आख्ख्या कुटुंबालाच शिकावे लागते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सपोर्ट ग्रुपमधे सहभागी व्हावेच , शिवाय आजार लपवून न ठेवता एक्स्टेंडेड फॅमिली, मित्र-मैत्रीणी, विश्वासू शेजारी वगैरे आधाराचे वर्तुळ हळूहळू वाढवत नेले तर रुग्णासाठी सेफ्टीनेट बळकट होत जाते.

स्वाती-२ अगदी बरोबर.
आपल्याला काही मानसिक समस्या आहे हे रुग्णाला बहुतेकदा कळत नाही / त्याचा स्वीकार करत नाही. आणि अनेकदा कुटुंबियांनाही कळत नाही. रुग्ण मानसोपचार घेण्यास तयार होणे हेच बहुतेक वेळा मोठे दिव्य असते. तेव्हा रुग्ण त्यास तयार होई पर्यंत त्याला कसे सांभाळावे, त्याच्याशी कसे वागावे इथुन सुरवात करावी लागते, त्यासाठी रुग्णाला तज्ञांकडे जाण्या आधीच अनेकदा घरच्या सदस्याला जावे लागते/ जाणे योग्य.
रुग्ण तयार झाला तरी त्याच्या मनात एक मोठा अडथळा असतो हे सगळं डॉक्टरांना कसं सांगायचं/किंवा काय ते सगळं सांगत बसायचं, त्यासाठी सुद्धा घरच्या सदस्यांचा योग्य तो महत्वाचा हातभार लागतो.
तेव्हा घरच्या सदस्यांचे समुपदेशन हे रुग्णास घेऊन जाण्या आधीपासून लागु शकते.

कारवी,
विचारातल्या/संकल्पनेतल्या त्रुटी, गुंता यथायोग्य पोस्टमार्टेम करुन परखडपणे आणि त्याचवेळी अतिशय संतुलितपणे आणि त्याचवेळी अतिशय कळकळीने, आपुलकीने मांडणारा अतिशय उत्तम, व्यवहार्य प्रतिसाद.. +++1111111111111111
जिज्ञासा.. तुमचाही प्रतिसाद आवडला.

राधानिशा,
आपला देह आपण निर्माण केलेला नाही. कुणीतरी तो आपल्याला दिलेला आहे. कशासाठी? तर त्याची निगा राखण्यासाठी, त्याला जपण्यासाठी, त्याचे संवर्धन, जोपासना करण्यासाठी. आपण त्याचे मालक नसतो तर ट्रस्टी, विश्वस्त असतो. मुळात आपल्या मालकी च्याच नसलेल्या वस्तूचा गैरवापर करावयाचा, तिला इजा करायची हे आपल्या अधिकारात बसत नाही. तिचा विध्वंस किंवा नाश करणे हा तर कायद्याने गुन्हा आहे . जीवनपरांगमुख ( शब्द लिहिता येत नाही) होणे हे अध्यात्माला पूरक नाही. इथे अनेकांनी सुंदर प्रतिसाद लिहिले आहेत. तुम्ही अध्यात्माच्या अंगाने काही उत्तम लिखाण इथे मायबोलीवर केले आहे म्हणून हे लिहिले

मला स्तोत्रे वाचता वाचता आयुष्य पुरणार नाहीये. कविता व स्तोत्रे ....... अतिशय ओढ आहे दोन्हींची. डोळे फक्त शाबूत रहावेत तसेच कानही. शेवटपर्यंत वाचता-ऐकता यावे बस. हां आणि कॉग्निशन शाबूत रहावे रे देवा!!! बस्स!

मी मागे एका प्रतिसादात लिहले तसे भीतीमुळे माणुस फ्लाईट् /फाईट किंवा फ्रिज अशा तीन अवस्थेत जाऊ शकतो.नैराश्यामध्ये सुप्त वा जागृत भीतीमुळे सतत फ्रिज या अवस्थेत अशी व्यक्ती असते. फ्रिज अवस्थेत शरीर पुर्णपणे बंद होतं. एखाद्या हिस्त्र श्वापदाने हल्ला केल्यास अजिबात हलचाल न कराणारे प्राणी जिवंत राहिले ,त्यातून फ्रिज रिस्पॉन्स डेवलप झाला आहे.
नैराश्यग्रस्त व्यक्ती ही बर्याचा अंशी फ्रिज स्टेटमध्ये असते.याच्या एका लक्षणाला dissociation असे मानसशास्त्रात म्हणतात. मानसिक धक्का किंवा इतर तीव्र नकारात्मक विचाराने व्यक्ती बधीर झाल्यासारखे वागतो.
यातून बाहेर पडायचे असल्यास मेडीटेशन,मेडीकेशन,सायकोथेरपी असे उपाय आहेत.
Polyvagal theory असे गुगलून त्यावरुन बरेच उपाय करता येतात पण पेशंश हवेत .

@ radhanisha ---
पुन्हा एकदा मीच...आतापर्यंत फिलॉसॉफी झाली / झाडली; आता यावर काही करता येईल का ते बघू.

** लटांबर झालेय शब्दांचे पण मला शॉर्ट अँड क्रिस्प नाही लिहीता येत.
** काही गोष्टी मी अंदाजाने लिहील्यात. जे लागू पडत नाही त्याकडे दुर्लक्ष करा प्लीज.
** हे करा, हे हवे, हे नको -- वाक्यरचना असली तरी आज्ञार्थी नाही. सुचवणीच आहे. अंतिम निर्णय तुमचाच.
** जे गरजेचे वाटते ते करायचे, या प्राथमिकतेत तुम्हाला, घरच्यांना अपमानास्पद काही लिहीले गेले त्यासाठी क्षमा मागते. पण मुद्दा लक्षात घ्या जमल्यास. मला विसरा. माझे शब्दही विसरा.
** काही ठिकाणी प्रश्नार्थक आहे लिखाण, त्याची उत्तरे मला नकोत, तुम्ही शोधावीत असे सुचवेन फक्त .

तुमचा आधीचा धागा (स्वार्थी, ग्रजेस ठेवता वगैरे) वाचला होता, पण खूपच उशीरा. जुनापुराणा झाल्यवर. मग प्रतिसाद नाही दिला कारण खूप चांगल्या आणि योग्य सूचना / उपाय दिले होते सार्‍यांनी. तर तिथून सुरूवात करू.

तुम्ही म्हणताय त्यावरून --- तुम्हाला शारीरिक त्रास आहेत, मानसिक त्रास आहेत. ते वागण्यात रिफ्लेक्ट झाल्याचा गिल्ट आहे. समाजात वावरताना भीती वाटते. शैक्षणिक पात्रता अपुरी वाटते. असफल प्रेम अनुभवले आहे. भविष्य फार आश्वासक दिसत नाही म्हणून भविष्याकडे न जाणे हा मार्ग तुम्हाला सुचतोय. आणि जायचे ठरवले तर डिप्रेशन दमवतेय. तेव्हा, मरण हे सोल्यूशन वाटते. असा एकूण प्रवास दिसतो आहे. अजून शेअर न केलेले प्रॉब्लेम असू शकतील.

भाग १ -- बाह्य उपचार
शारीरिक त्रासापासून सुरूवात करू. वेदना थांबल्या की विचार करायला त्राण येईल.

पाळीचा त्रास कॉमन आहे. पण तुम्हाला खूप होतो. यात अनुवंशिकता, हार्मोन्स, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव याचा प्रभाव असतो. अनुवंशिकता सोडून देऊ. स्त्रीरोगत्ज्ज्ञांकडून तपासणी आणि उपचार घेऊन हार्मोन्स मार्गी लावता येतील. थायरॉईडमुळेसुद्धा पाळीचा त्रास उद्भवू शकतो. अ‍ॅमीनी सुचवल्याप्रमाणे थायरॉईड न्यूनता / आधिक्य याची टेस्ट करून शहानिशा केलीत का? अजून नसेल केली तर केल्यास उत्तम.

आहारात तयार पदार्थ / मैद्याचे, बेकरी प्रोडक्ट्स / अतिथंड पदार्थ, कोल्ड्रिंक / साखर, मीठ, फॅट्स, प्रिझरवेटिव्ज, खाद्यरंग याचा अतिवापर केलेले पदार्थ असतील तर कमी करावे लागतील. थोडक्यात जिभेला लुभावणारे कमी खायचे आणि घरचे ताजे, सकस अन्न उत्तम.

भुकेच्या वेळेवर + प्रमाणात खायचे. एकट्याने रूममध्ये जेवण्यापेक्षा शक्य असेल तेव्हा कुटुंबाबरोबर जेवा. खाताना पुस्तक, मोबाईल, टीव्ही नको. मानसिक स्वास्थ्य न बिघडवणार्‍या गप्पा चालतील. जे करत असाल तिथे लक्ष हवे. याने मन ताळ्यावर यायलाही मदत होईल.

पाळीच्या पोटदुखीसाठी विटॅमिन B1 चांगला गुण देते. ९०च्या दशकात पुण्यात एका स्त्री डॉक्टरनी प्रयोगांती हे सिद्ध केले होते. मला संदर्भ मिळाला की देते. तुमच्या फॅमिली डॉ शी बोलून सुरू करता येईल. काय डोस, किती दिवस सलग आणि कुठल्या वेळी घ्यायचे --- हे तुमचे शरीरमान + तुमच्या बाकी औषधांशी contraindication आहे/नाही हे पाहून ठरवावे लागेल. तेव्हा विटॅमिन असले तरीही डॉ चा सल्ला घ्यावा. स्वप्रयोग नकोत.

आहारातून विटॅमिन B1 हे पिठातील कोंडा, पॉलीश न केलेला तांदूळ, सालीसकटच्या डाळी व कडधान्ये यातून मिळते. थोडक्यात धान्ये, कडधान्ये, डाळी याच्या टरफलात. अजून कशात (भाज्या, फळे, मांसाहार) जास्त असते ते बघावे लागेल. हे आहारात ठेवले तर गोळ्यांचे प्रमाण नंतर कमी करता येईल.

जेव्हा त्रास नसेल तेव्हा हलका पण नियमित व्यायाम केला तरीही पोटदुखीत फरक पडेल. सुरूवातीला योगासने + कमरेचे व्यायाम. + (नंतर काही दिवसांनी) शरीर थोडे तापेल, घामेजेल इतका व्यायाम करावा. डिप्रेशनमुळे थकवा, अंगदुखी असेल तर नॉर्मल स्पीडने चालण्यापासून सुरू करा. न थकता जाऊन परत येता येईल इतकेच चाला वेळ (१०+ १० मिनीटे असे) लावून.

मोबाईल सोबत ठेवा कॉन्टॅक्टसाठी पण कानात बुचे घालून गाणी ऐकायची नाहीत. चालायच्या वेळी चालण्यावर लक्ष. आजूबाजूला बघा, निसर्ग, कुत्री/मांजरी, बाबागाडीतली बाळं, लगबगीने जाणारी माणसं... काहीही.

आठवड्याने अंतर वाढवा. मग आठवड्याने वेग थोडा वाढवा. २ महिन्यात ब्रिस्क वॉक जमू शकेल. झेपतेय, गळून जायला होत नाही हे कळले की रनिंग, दोरीउड्या, बाकी एरोबिक्स वगैरे तुमच्या वयोगटाचे व्यायाम करता येतील. पण शरीराला अतिताण न देता टप्प्याटप्प्याने पुढे जायचे. म्हातार्‍यासारखे वाटते वगैरे डोक्यात आणायचे नाही. Slow and steady.

मानसिक त्रास :

पाळीचा त्रास आणि मानसिक त्रास एकमेकांशी (कारण हार्मोन्सशी) संबंधित असू शकतात. तुमचे डिप्रेशन, भावनिक आंदोलने, चिडकेपणा हा PMS / PMDD चा त्रासही असू शकतो. नेहमीचे फॅमिली डॉ / स्त्रीरोगतज्ज्ञांशी बोलावे लागेल. मी याबाबतीत अचूक वैद्यकीय माहिती देऊ शकणार नाही.

मानसिक त्रास / डिप्रेशनसाठी औषधे + समुपदेशन योग्य तज्ज्ञंच्या देखरेखीखाली चालू ठेवावे लागेल. त्याला पर्याय नाही. पूरक म्हणून बाकी काही करू शकतो आपण. उदा --
1 योगासने करताना दीर्घ श्वास + प्राणायाम
2 ध्यान ( मी_अस्मितानी सांगितलेय आधी दुसर्‍या धाग्यावर)
3 स्वतःला गुंतवून ठेवणे. जे आवडेल त्याच्यात. गाणी चित्रकला बागकाम स्वयंपाक अभ्यास कोडी काहीही. जे करताना तुम्ही रमता, उत्साही होत जाता असे काहीही.

4 मोबाईल, टीव्ही शक्यतो कमी. त्यातही हिंसाचार, नकारात्मक बातम्या चर्चा टाळायचे. आपण अंगठा वर केल्याने गोष्टी घडत नाहीत / खाली केल्याने थांबत नाहीत. तुमची तब्येत पहिली मग दुनियादारी. बर्‍या व्हा नि करा काय ते.

5 वाचन / म्युझिक / सिरिअल्स --- काय बघता, त्याचा तुमच्यावर तुमच्याही नकळत परिणाम होतो. वाचल्या - पाहिल्यावर शीण वाटत असेल तर निवड बदलावी लागेल. डिप्रेशनवर इलाज म्हणून काही राग आहेत. ते ऐकू शकता. खास बसून नाही, आजूबाजूला वाजते ठेवायचे.

6 अरोमा थेरपी वापरून रिलॅक्स होता येईल. यात essential oils चा massage, bath, inhaling करता येईल.

7 डॉ बाख (Dr Edward Bach) यांची फ्लॉवर थेरपी वाचा. त्यातील तज्ज्ञ किंवा तुम्ही स्वतः ही औषधे निवडू शकता. तुमची लक्षणे नीट तपासून, अभ्यासून काय घ्यायचे ठरवता येईल. फक्त ही औषधे इतर औषधांपेक्षा वेगळ्या वेळेला घ्यायची. जेणेकरून केमिकल्स क्लॅश होणार नाहीत. मॉडर्न मेडिसीनचे डॉ यात पडत नाहीत. आपल्या जबाबदारीवर घ्यावी लागतात. कोणी होमिओपॅथीचे डॉ ओळखत असाल तर ते मदत करू शकतील.

8 काहीतरी creative करता येईल. आवडीप्रमाणे --- लेखन, चित्रकला, रंगकाम सुचवलेय बर्‍याच जणांनी, नृत्य, ओरीगामी, भरतकाम, विणकाम, क्रोशा, शोभेच्या वस्तू, फॅब्रिक पेंटिंग, इत्यादि. यात हात बसला तर पुढे व्यवसाय म्हणूनही करता येईल. नृत्य हा छंद, व्यायाम आणि इलाज असा तिहेरी फायदा देईल.

9 घरात किंवा शेजारी लहान मुले असतील तर त्यांच्याशी खेळणे. लहान म्हणजे २ वर्षापर्यंत जी केवळ स्पर्शातून प्रेम अनुभवतात. (कुरकुरे, चॉकलेट, मोबाईल साठी लाडीगोडी लावणारी मोठी नाहीत) त्यांच्या आपल्या अंगाखांद्यावर बागडण्याने मोठ्यांचा स्ट्रेस, शीण नाहीसा होतो. किंवा मग कुत्रा वगैरे. पण याची आवड असेल तर.

10 स्वतःच्या तक्रारी विसरण्याचा मार्ग म्हणजे जे आपल्यापेक्षा जास्त त्रासलेले, underprivileged आहेत त्यांना मदत करणे. आर्थिक नव्हे सोशल हेल्प. उदा --- आता शाळा बंद आहेत. ज्यांना ऑनलाईन शिकता येत नाही, ट्यूशन परवडत नाही अशा मुलांना शिकवणे. हॉस्पीटलमध्ये ओपीडीचे काही तास स्वयंसेवक म्हणून काम करणे. (मुंबईत असाल तर टाटाला जाऊ शकता. प्रचंड गरज असते.) वृद्धाश्रमात जाऊन काही करता येईल.

अशा ठिकाणी जाणे काहींना रूचत / जमत नाही. मग सोसायटीत / ओळखीत कोणा आजीआजोबांना मदत करता येईल. गप्पा मारणे, पोथी/पुस्तक वाचून दाखवणे, आजारी बेडरीडन पेशंटसोबत ३-४ तास थांबणे. ते आपल्याला डायपर बदलायला नाही सांगत, चिंता नको की कसे जमायचे....

पण आपण ३-४ तास दिल्यावर अहोरात्र काम करणारा केअरगिवर स्वतःचा थोडा निवांत वेळ अनुभवू शकतो. बाहेरची कामे, कोणाला भेटून येणे, बँकेत जाणे हे उरकू शकतो. पेशंटची कधीही हाक येईल याची काळजी सोडून निवांत २ घास खाऊन थोडा झोपू शकतो. हे त्यांच्यासाठी खूप अनमोल असते. इतक्या positive waves मिळतील त्यांच्या नजरेतून. एकदा जरूर करून बघा.

थोडे सोपे करायचे तर -- मुलं सोबत नाहीत आणि आजीआजोबा सणवार- रीतभात सगळं पूर्वीसारखं करतायत अशावेळी त्यांची प्रचंड दमछाक होते. त्यांना भाज्या निवडून-चिरून देणे, मसाले वाटून देणे, पूजेच्या तयारीला मदत करणे, फराळ बनवायला मदत करणे... हे करता येईल. आपल्याला २ तासाचे काम पण त्यांना खूप रिलीफ मिळतो. खूप समाधान मिळते आपल्याही मनाला. करत गेलात की सुचत जाईल.
तत्व एकच, आपण तरूण सक्षम आहोत तर मदतीचा हात जरूर पुढे करावा.

क्रमशः

कारवी, सुंदर प्रतिसाद... वेगळा धागा का नाही काढत? राधानिशासाठी असले तरी इतरांनाही उपयोग होईल आणि ह्या प्रतिसादाची शोधाशोध नाही करावी लागणार.

धन्यवाद सार्‍यांना ....
सीमंतीनी --- पण काय मुद्द्यावर धागा काढायचा..... हे इलाज / विश्लेषण केसगणिक बदलते. आणि त्यावर पुढे प्रश्न आले तर मी प्रोफेशनल सल्ला नाही देऊ शकणार. ते माझे अधिकार क्षेत्र / कौशल्य नाही. मग गांजलेल्यांना अर्ध्यात हात सोडल्यासारखे होईल.

Pages