स्नानांतर

Submitted by अनिंद्य on 7 September, 2020 - 09:36

प्रसंग अगदी काल घडलाय असा डोळ्यासमोर आहे...

"बाबू, ई नदिलोनि पवित्र जलालधु स्नानम चेसरा... जलालो मुनीगी रा.." नदीकाठावरच्या आणि पलीकडे गुडघाभर पाण्यात उभ्या आईच्या मातुल कुटुंबातील नातेवाईक मंडळींनी कृष्णेच्या 'पवित्र' पाण्यात मी स्नान करावे, असा एकच घोषा लावला होता. स्नानाला कधीही एका पायावर तयार असणारा मी ठामपणे 'नाही' म्हणत असल्याचे दुर्लभ दृश्य बघून आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हसू एकाच वेळी झळकत होते. अखेर बळेबळेच मला त्या गढूळ पाण्यात ओढण्यात आले आणि कृष्णा नदीतीरी दर बारा वर्षांनी भरणाऱ्या 'कृष्णापुष्करम' उर्फ 'दक्षिण कुंभ' मेळाव्यात आमचे घोडे न्हाले! 'न आवडलेले' असे आयुष्यातील ते दुर्मीळ स्नान. अन्यथा आंघोळ करणे हे माझ्या जीवनातील सर्वाधिक आनंददायक काम होते आणि आहे.

Bath is to body what laughter is to soul असे कोणीतरी म्हटलेच आहे, नसेल म्हटले तर मी म्हणतो. जन्माला आल्यावर सर्वप्रथम नर्सबाई काय करतात, तर नवजात बाळाला आंघोळ घालून स्वच्छ करतात. त्याशिवाय खुद्द आईबाबांना तरी दाखवतात का ते बाळ? जन्मल्याबरोबर जे काम आपल्याला चिकटते तेच 'आवडते' काम असेल, तर मग त्याचा मन प्रफुल्लित करणारा सोहळा होतो. त्याचे सर्व टप्पे फार आनंददायक होतात आणि हे स्नानसोहळे स्मृतींमध्ये अलगद जाऊन बसतात.

50234869068_c813f078fb_c.jpg

आज पाच दशके भूतलावर काढल्यानंतर कुणी आयुष्याच्या सर्वात आनंदी प्रसंगांबद्दल विचारले, तर मला माझा स्नानप्रवास आठवतो. सकाळी शाळेत जाण्याआधी गारेगार पाण्याने केलेले सचैल स्नान, कडाक्याच्या हिवाळ्यात ऊन-ऊन पाण्याने अंग शेकणारे स्नान, सुट्टीच्या दिवशी आईने खसाखसा घासूनपुसून लख्ख करीत घातलेली आंघोळ, बाबांसोबत जलतरण तलावात केलेले स्नान, सणासुदीचे - प्रसंगविशेष स्नान, आजोळी स्वच्छ नदीपात्रात डुंबत केलेले स्नान... एक ना हजारो आनंदक्षण स्नानाशी जोडले गेले आहेत.

घरी आईचा दिवस सर्वात आधी सुरू होई. तिच्या माहेरी फार धार्मिक वातावरण होते, स्नान केल्याशिवाय ती काही खात-पीत नसे. आम्ही भावंडे अर्धवट झोपेत असताना आईचे स्नान आटोपत असे. हळू आवाजात तिचे गायत्री मंत्राचे पठण ऐकू येत असे. मग चहा-दूध तयार झाले की मला पूर्ण जाग येई. शाळा सकाळची, त्यामुळे आवरून आंघोळ करूनच शाळेत जायचे, असा नियम होता. शेजारीपाजारी सर्व मुलांमध्ये आंघोळ करून वेळेत तयार होण्यात माझा नंबर नेहेमी वर असे. घरी हिरव्या रंगाचा 'हमाम' साबण आम्हा भावंडांचा सामायिक होता. हो, तेव्हा प्रत्येकाला वेगळ्या साबणाची चंगळ नव्हती. त्यामुळे कोरडा साबण मिळावा म्हणून मीच पहिला नंबर लावत असे. ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेला शुद्ध हिंदुस्तानी 'लोकल' हमाम साबण आजही ३०० कोटी रुपयाचा ब्रँड आहे! आतासारखे 'आयुर्वेदिक', 'नैसर्गिक', ‘इको-फ्रेंडली’ साबणाचे काही खास कौतुक नव्हते. त्या वेळेपासून (१९३१) नीम, तुळस, एलोवेरा अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर हे हमामचे वैशिट्य टिकून आहे हे खास. आधी टाटा आणि आता हिंदुस्थान युनिलिव्हर बनवतात. आजही महिन्याला काही कोटी हमाम साबण विकले जातात भारतात.

हिवाळ्यात गरम पाण्यासाठी स्टोव्हवर वेगळा हंडा तापत ठेवलेला असे, त्यातले हवे तेवढे गरम पाणी काढून तेवढेच गार पाणी त्या हंड्यात परत उकळण्यासाठी ठेवले जाई. जुन्या आठवणीत हमखास असणारा पाणी तापवण्याचा बंब मात्र आमच्या घरी कधीच वापरात नव्हता. नळाला पाणी ठरावीक वेळी असल्याने आणि शाळेसाठी उशीर होणे लाजिरवाणे समजले जात असल्याने टाइम वॉज ऑलवेज ऍट प्रीमियम... त्यामुळे आंघोळीची खरी मजा रविवारी असे. त्या दिवशी भरपूर पाणी आणि साबण वापरून मनसोक्त आंघोळ करायला कोणाची ना नसे. फक्त त्याआधी 'केस धुणे' हा गंभीर अत्याचार होत असे. केसांसाठी वेगळ्या 'शिकेकाई' साबणाचा प्रवेश आमच्या घरी झाला नव्हता. रोजच्याच साबणाने किंवा कधी तर सर्फसारख्या पावडरींनी आमचे 'मळके, घाण, चिपचिप' केस स्वच्छ केले जात. साबणाचे पाणी हमखास डोळ्यात जात असल्याने हे मला फार त्रासदायक वाटत असे. एकदा हे झाले की हवा तेवढा वेळ पाण्यात खेळायला परवानगी असे. आम्ही भावंडे एकमेकांवर पाणी उडवून, एकमेकांना ढकलून, दंगामस्ती करत रविवारची सकाळ सार्थकी लावत असू. कधीकधी बाबाही आमच्या कंपूत सामील होत आणि आमच्या जलपंचमीला उधाण येत असे.

उन्हाळ्याच्या सुटीत आमच्या मूळ गावी आणि आजोळी विभागून जात असू. दोन्ही ठिकाणची स्नानवैशिष्ट्ये वेगवेगळी होती. आमच्या गावी पाण्याचे दुर्भिक्षच. घरात विहीर नव्हती. गावातल्या दोन विहिरींनाच काय ते पाणी आणि उन्हाळा म्हणजे तिथेही पाणी कमी. आमचा घरगडी लच्छू विहिरीतून हंडे भरून आम्ही घरचे, गडीमाणसे, जनावरे सर्वांसाठीच पाणी आणीत असे. पाणी जपून वापरावे लागे, आंघोळीसाठी काटकसर करावी लागे. तरी त्या घरी स्नान आवडायचे, कारण विहिरीचे थंडगार पाणी आणि 'लाइफबॉय' साबण. गुलाबी रंगाचा, चौकोनी. बाबांच्या लहानपणापासून तोच एकमेव साबण गावात विक्रीला असे. लाइफबॉय आता सुमारे शंभर वर्षे भारतात विकला जात आहे, अगदी मागच्या एका वर्षातच २००० कोटी रुपयांचे लाइफबॉय साबण विकले गेले भारतात! म्हणजे आजही वट असलेला हा खरा सुपरब्रॅंड! पुढे 'लाइफबॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहाँ' या जिंगलचे मराठी भाषांतर 'लाइफबॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास मारी' असे करून खिदळणे अनेक वर्षे चालले.

Lifebauy.jpg

* * *

तिकडे आजोळी वेगळीच तर्‍हा. दररोज पहाटे साधारण ५च्या सुमारास ...

नंदिनी नलिनी सीता मालती च महापगा
विष्णुपदाब्जसंभूता गंगा त्रिपथगामिनी
भागीरथी भोगवती जान्हवी त्रिदशेश्वरी
द्वादशैतानि नामानी यत्र यत्र जलाशये
स्नानोद्यत: स्मरेनित्यं तत्र तत्र वसाम्यहं…….

सर्व जण साखरझोपेत असताना बाहेर आजोबांचे मोठ्या आवाजात स्तोत्रपाठांसह स्नान सुरू असायचे. आता थोड्याच वेळात दिवस उगवणार आणि आपल्याला बिछाना सोडावा लागणार, हे दुष्ट सत्य हळूहळू मनाला स्पर्श करू लागे. बाहेर पेटवलेल्या बंबाच्या धुराचा, गरम पाण्याचा, मैसूर चंदन साबणाचा, अग्निहोत्रात टाकलेल्या अर्धवट पेटलेल्या गोवऱ्यांचा, पूजेसाठी आणवलेल्या ताज्या फुलांचा एक मिश्र दैवी सुवास पसरत असे.

त्यांच्याकडे एक जादुई कुलूपबंद कपाट होते - फक्त साबणांचे! त्यात वेगवेगळ्या ब्रँडचे अनेक साबण हारीने रचलेले असत. लांबचा प्रवास करून जबलपूरला आजोळघरी पोहोचल्यावर ते कपाट उघडून आम्हा भावंडांना प्रत्येकी एकप्रमाणे हवा तो साबण घेता येई, फक्त मैसूर संदल वगळता. मैसूरवर आजोबांचा एकाधिकार होता आणि तो अन्य कोणालाही वापरायला मिळत नसे. त्याचा राग येई.

Sandal jpg.jpg

पुढे अनेक वर्षांनी बंगळुरूला कर्नाटक स्टेट सोप फॅक्टरीत एका कामासाठी गेलो, तेव्हा तेथे मैसूर संदल साबण आणि त्याचे अनेक नवनवीन प्रकार सुंदर वेष्टनात विकायला होते. आजही पूर्वीसारखेच चंदनाचे शुद्ध तेल वापरतात त्यात. मी अधाशासारखे विकत घेतले, स्वतः भरपूर वापरले आणि घरी-दारी-मित्रांना भेट म्हणून दिले. 'छोटा बच्चा' म्हणून मला नाही म्हणतात म्हणजे काय? ते एक सोडले तर भेडाघाट, ग्वारीघाट अशा नर्मदेच्या वेगवेगळ्या घाटांवर स्वच्छ गार पाण्यात तासनतास केलेले स्नान ही आजोळची सर्वोत्तम आठवण.

सौंदर्यतारकांचा म्हणून नावाजलेला 'लक्स' साबण फार प्रसिद्ध होता. मध्यमवयीन-मध्यमवर्गीय स्त्री-पुरुष आधी फारसा वापरत नसत. शेजारपाजारच्या कॉलेजकुमारी-कुमार मात्र तो साबण खास वापरत. त्यांचा हेवा वाटत असे. मी साधारण १० वर्षांचा होतो, तेव्हा केसांसाठी वेगळा साबण दिसू लागला. श्रीमंत नातेवाईक स्त्रिया 'केशनिखार' साबण वापरत. गोदरेज आणि विप्रो ब्रँडचे 'शिकेकाई' साबण आले आणि मग केशनिखार चे कौतुक संपले. शिकेकाई साबण पुरुष मंडळी मात्र वापरत नसत, आम्हा मुलांनासुद्धा केसांसाठी शिकेकाई साबण वापरणे फार 'गर्ली' वाटत असल्यामुळे आम्ही रोजचाच साबण केसांना फासत असू.

Kesh Nikhar  .jpg

मग काही वर्षांनी 'सनसनाती नींबू की ताजगी' देणारा लिरिल, 'सुपर फ्रेश' सिंथॉल आणि नीम की गुणवत्ता लिये 'मार्गो' असे अनेक ब्रँड बाजारात दिसू लागले. टीव्ही रंगीत झाला आणि जाहिरातीत दिसणारी बिकिनीतली सचैल लिरिल कन्या सर्वत्र चर्चेचा विषय झाली. पुढेही अनेक वर्षे लक्सचे 'फिल्मी सितारों का सौंदर्य साबुन' हे स्थान आणि लोकप्रियता कायम राहिली. ९०नंतर विप्रोच्या संतूर साबणाने लक्सच्या इंद्रासनाला बऱ्यापैकी झटके दिले. 'आप की त्वचा से आप की उमर का पता ही नही चलता' हे फार गाजलेले कॅम्पेन. पण तो 'गर्ली' आहे हे माझे मत काही बदलले नाही. आम्हा पुरुष मंडळींसाठी विशेष वेगळे साबण फारसे नव्हते. लाइफबॉय, सिंथॉल आणि ओके याच साबणांना 'पुरुषांसाठी' म्हणून मान्यता होती. पुढे सुपरस्टार शाहरुख खानने 'लक्स'साठी टबबाथ घेत हे बदलण्याचा एक प्रयत्न केला. त्यामुळे लक्स फक्त बायका वापरतात हा समज थोडा कमी झाला.

फेब्रुवारी १९८२ ह्या महिन्यात माझ्या स्नानप्रेमासाठी एक नवे युग अवतरले. आम्ही स्वतःच्या मोठ्या घरात राहायला गेलो. ह्या घरात वेगळे मोठे भिंतभर टाइल्सची सुखद रंगसंगती असलेले कोरे करकरीत स्नानघर होते. पूर्ण बंद होणारा दरवाजा, उत्तम सूर्यप्रकाश आणि मुख्य म्हणजे डोक्यावर भरपूर जलधारांचा 'शॉवर' होता! आजवर स्नान म्हणजे बादलीत किंवा घंगाळात असलेले पाणी अंगावर घ्यायचे असे स्वरूप बदलून जलौघाचे रेशमी तुषार अंगावर झेलत सचैल स्नान करायचे, असा सुखवर्धक बदल झाला. माझे आंघोळीचे तास वाढले. आमचे शहर उन्हाळ्यात प्रचंड तापत असे, पाणीटंचाई मात्र नव्हती. त्यामुळे दिवसातून दोनदा स्नानाचे सुख लुटले जाई. पुढे काही वर्षांनी पाणी तापवायला गीझर आला, गरम पाण्याचा हिवाळी स्नानसोहळा जास्तच लांबल्यामुळे पूर्ण स्नानघरात वाफेचे धुके पसरत असे. त्यातून बाहेर पडताना आपण ढगातून बाहेर पडून जमिनीवर पाय ठेवत आहोत असा फील येत असे.

१९८०पासूनच शाम्पूच्या बाटल्या आमच्या शहरातल्या दुकानांत दिसू लागल्या होत्या. हे महागडे प्रकरण आपल्यासाठी नाही असे सर्वच मध्यमवर्गीय लोक समजत, त्यामुळे ते काही आमच्या घरी आणले गेले नाही. शाम्पू प्रकरणात खरी क्रांती 'Chik' नामक शाम्पूच्या सॅशे पॅकने घडवली. १ रुपया अशी माफक किंमत, तीव्र सुगंध, भरपूर फेस असे सर्व काही त्यात होते. बहुतेक १९८३ साल असावे. हे झाले आणि मग मात्र वेगवेगळ्या सर्वच ब्रॅण्ड्सचे शाम्पू असे सॅशेमध्ये मिळू लागले, जास्त आवाक्यात आले. २-५ वर्षांतच ते स्नानाचा अविभाज्य भाग बनले. आज तर देशातील एकूण शाम्पूविक्रीपैकी ७५% विक्री फक्त 'सॅशे पॅक'ची असते.

माझ्या स्नानसोहळ्यातही शाम्पूचे कौतुक वाढतेच राहिले. साधारण १० वर्षांनी त्याचा धाकटा भाऊ 'कंडिशनर' बाजारात आला. कंडिशनरचा जन्म मात्र पुरुषांच्या गरजेपोटी झाला आहे, 'ब्रिलियंटाइन' ह्या दाढी-मिश्या चमकदार करणाऱ्या उत्पादनाचे दुसरे रूप म्हणजे कंडिशनर. काही ब्रॅंड्सनी आधी शाम्पूसोबत कंडिशनर मोफत वाटले आणि पुढे त्याची सवय कधी लागली ते समजलेच नाही.

* * *
१९९४पासून नोकरीधंद्याला सुरुवात झाली, शहर बदलले. सर्व साबण, शाम्पू स्वतःच्या आवडीचे घेता येऊ लागले. याच वेळी लिक्विड सोपचे पेव फुटले. एकापेक्षा एक सरस सुगंध असलेले हे द्रवरूपी नावीन्य, त्याचा फेसच फेस आणि त्यासाठी वेगळे 'लूफा' असा जामानिमा. एकदम राजेशाही. मुंबईतील अनेक छोट्या घरात राहिलो. इथे जागा कमी आणि बाथरूम तर मी जेमतेम उभा राहून ओला होऊ शकेन एवढीच जागा असलेले. बाहेर घाम आणि प्रदूषण भरपूर, त्यामुळे दिवसातून दोनदा स्नान हा शिरस्ता कायम राहिला, तरी स्नानसुखात व्यत्यय मात्र आला.

तोवर खास पुरुषांसाठी म्हणून साबण आणि स्नानप्रावरणे भारतीय बाजारात दिसू लागली होती, त्यांचा लाभ घेण्याएवढी ऐपत आली होती. 'एक्स्ट्राव्हॅगंटली मेल' अशी खास टॅग लाइन असलेला 'आरामस्क' साबण दिल्लीच्या दिवान वाधवा ग्रूपने आणला. तो आम्हा तरुण मुलांमध्ये फारच लोकप्रिय झाला. वेगळा, थोडा तीव्र सुवास आणि वेगळाच आकार, साबणाच्या वडीवर एक डौलदार A अक्षर कोरलेली पट्टी असे ते आकर्षक प्रॉडक्ट होते. नीश की काय म्हणतात तसे. तो अनेक वर्षे मी वापरला. पुढे क्रेझ ओसरली आणि तो ब्रँड विस्मृतीत गेला. एका मराठी मुलीने ब्रँड रिव्हायव्हल शीर्षकाखाली ह्या साबणावर शोधप्रबंध सादर केला, इतकी त्याची लोकप्रियता. जुन्या गाण्यांचे जसे रिमेक बाजारात येते, तसे काही खास ब्रॅंड्सचे व्हायला पाहिजे.

दिवाळीचा सण आणि 'मोती' साबणाने स्नान हे अद्वैत तर वर्षानुवर्षे उपभोगतोच आहे. तो सुवास आणि दिवाळी एकमेकांना पर्यायवाची जणू. मोती साबण आणि दिवाळी निदान महाराष्ट्रात तरी एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत.

Moti .jpg

पितृत्व लाभले, तेव्हा स्नानप्रेमामुळेच नवजात बाळाला आंघोळ घालायची जबाबदारी सहज स्वीकारली आणि पार पाडली. जसजसे वय वाढत गेले, तसतसे साबण आणि आइसक्रीमच्या जाहिराती सारख्याच होत गेल्या - मलाई, बदाम, फळांचे रस दोहोंत असल्याचे कानीकपाळी सांगण्यात येऊ लागले. साबणातून 'नैसर्गिक' सुगंध हळूहळू कमी होत गेला आणि साबण 'दिसायला' सुंदर होऊ लागले. आता 'खादी'सारखी दर्जेदार (आणि महाग) उत्पादने सोडली, तर 'खरे' सुवास दुष्प्राप्य झाले आहेत.

Khadi.jpg

पुढे कामानिमित्त देशभर-जगभर प्रवास करता आला. आलिशान-गेलिशान सर्वच प्रकारच्या गेस्ट हाउस, लॉज, तारांकित-बिनतारांकित अशा हॉटेलातून राहण्याचे प्रसंग वाढले. जणू एक नवीन स्नान-दालन पुढ्यात आले. तेव्हा आणि आताही रूमचा ताबा मिळाला की सर्वात आधी तेथील बाथरूमचे निरीक्षण-परीक्षण करणे आणि तिथले शॉवर-तोट्या उघडबंद करण्याचे विशेष तंत्र समजून घेणे हे प्रचंड आवडीचे काम आहे. त्यामुळे नंतर होणारी फजिती होत नाही हा मोठा फायदा. त्यातही प्रचंड वैविध्य असते हे कळले. उंची हॉटेलातून स्नानागारांच्या रचनेवर भरपूर मेहनत घेतलेली दिसून येई, स्वच्छतेचा, सौंदर्याचा आणि स्नानानुभव समृद्ध करण्यासाठी लागणाऱ्या वातावरण निर्मितीवर भर दिलेला असे. स्नानाचा आनंद शतगुणित होत गेला.

वेगवेगळ्या शहरात मुक्कामात बाथ टब, बाथ सॉल्ट, बाथ बॉम्ब्स आणि बबल बाथ यासारखे नखरेल प्रकारही पुरेपूर अनुभवले. Wash away your troubles with some bubbles हे ध्येयवाक्य ठेवून स्टीम बाथ, सौना बाथ, व्हिटॅमिन फिल्टर लावलेले शॉवर, पाठीच्या कण्याला सुखद मसाज देणारे प्रेशर शॉवर, जाकुझी असे शरीराचे चोचले करण्यात मागे राहिलो नाही. अत्याधुनिक स्नानगृहांमुळे काहीदा फजितीही झाली. जपानी हॉटेल्समधली स्पेस कॅप्सुलसारखी अरुंद स्नानगृहे आणि माझे सहाफुटी धूड हे व्यस्त प्रमाण सहन न झाल्यामुळे त्यात असलेल्या असंख्य तोट्या-बटणे-रिमोट-अलार्म यांनी वात आणला होता. स्वीडन आणि जपान दोन्हीकडे पारंपरिक बाथहाउसचा अनुभव घ्यायला म्हणून गेलो असता तिथल्या 'दिगंबर ओन्ली' अटीमुळे काही क्षण अवघडलो होतोच.

Loofah .jpg

सिंगापूरच्या मरीना बे सँडच्या सर्वोच्च मजल्यावर माझ्या छोट्या पिल्लाला सोबत घेऊन खिदळत केलेलं जाकुझी स्नान, गोव्यात थोड्या अप्रसिद्ध शांत समुद्रकिनाऱ्यावरचे रात्रीच्या चांदण्यातले स्नान, भोपाळला ३०० वर्षे जुन्या कादिमी हम्माम मध्ये केलेला नवाबी गुसल, धबधब्याखाली केलेली तुषारस्नाने, मे महिन्याच्या प्रचंड उकाड्यात पटियाला-अमृतसर मार्गावरील अनोळखी गावातल्या एक निर्जन ट्यूबवेलवर मनसोक्त केलेले स्नान, कडाक्याच्या थंडीत मित्रांच्या पैजेखातर तिस्ता नदीच्या उथळ पात्रात केलेले, ब्रह्मपुत्रेच्या घनगंभीर पाण्याकाठी घाबरत केलेले, सोरटी सोमनाथला समुद्राच्या प्रचंड खारट पाण्यात केलेले, उज्जयिनीत क्षिप्रा 'नदी' म्हटल्या जाणाऱ्या ओघळात जेमतेम पाय बुडवून केलेले, पुष्करच्या ब्रह्मसरोवरात भल्यापहाटे केलेले, मालदीवच्या रिसॉर्टमध्ये खाली काचेतून समुद्र आणि वर मोकळे आकाश दिसणाऱ्या राजेशाही स्नानागारात केलेले.. अशा एक ना अनेक स्नानस्मृती माझ्या मनाला आजही भिजवून काढतात. Life is a long bath, the more you stay, the more wrinkled you get हे पुरेपूर पटलंय.

स्नानमाहात्म्यात एक अध्याय टॉवेलचाही आहे. सुती पांढरा पंचा, मग थोडे बरके कोइम्बतूरच्या 'मोती' ब्रँडचे जाडसर टॉवेल, मग सुखसंवर्धक टर्किश टॉवेल, मग खास बांबूच्या/केळीच्या तंतूंपासून बनवलेले अतिमुलायम टॉवेल्स, जुन्या सिनेमातील व्हिलन मंडळी वापरीत तसले स्टायलिश बाथरोब असे सर्व चोचले पुरवायला मिळाले. तो प्रवासही आनंददायक ठरलाय.

* * *
सर्वच स्नानप्रवास आनंदी झाला असेही नाही. प्रयाग-वाराणसीला भेटी घडल्या, पण गंगास्नानाचे आलेले योग बरेचदा पाण्याच्या अस्वच्छतेमुळे नाकारले आहेत - डोक्यावर पाण्याचे शिंतोडे घेऊन प्रतीक-स्नान करून वेळ मारून नेली आहे. गंगेच्या कुशीत स्वच्छ नितळ पाण्यात स्नान करायला मिळाले, तोही प्रसंग अगदी कालच घडल्यासारखा वाटतो.

….. कुरु कृपया भवसागरपारम् ...... तीर्थपुरोहित जुळे भाऊ पंडित सुदीक्षित सुभिक्षित मंत्रपठण करीत आहेत. त्यांच्या कानात हिऱ्यांच्या कुड्या चमचमत आहेत. मावळतीचा सूर्य, नोव्हेंबर महिन्याची कडाक्याची थंडी आणि गंगेच्या स्वच्छ बर्फगार पाण्याचा तीव्र प्रवाह, त्यात भिजत उभा मी. मनाची भावविभोर अवस्था. त्यांचा आवाज टिपेला पोहोचतो ...

तव चेन्मातः स्रोतःस्नातः
पुनरपि जठरे सोऽपि न जातः
नरकनिवारिणि जाह्नवि गंगे
कलुषविनाशिनि महिमोत्तुङ्गे …..

सुदीक्षित मृदू आवाजात म्हणतात, "अनिंद्यजी, माताजी को अंतिम प्रणाम कीजिये, अस्थियों को अब गंगार्पण कीजिये..." आणि त्या एका क्षणातच आईचा हात नेहमीसाठी सुटल्याचे आलेले भान... हरिद्वारचे एकमेव गंगास्नानही कधीच न विसरता येण्यासारखे.

* * * समाप्त * * *

इतरत्र पूर्वप्रकाशित. काही चित्रे जालावरून साभार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय! विषय आणि त्याचा विविधांगी विस्तार आवडला. शेवट वाचताना चटका जाणवला.

तुम्ही कधी बागेत पाईपमधून पडणारं धबधब्यासारखं पाणी थेट डोक्यावर घेऊन आंघोळ केली नाही का? Happy

छान लिहिलय.

शैम्पूचा धाकटा भाऊ कंडिशनर Lol
लेखातले थोडे साबण ओळखीचे नाहिएत,जुने असावेत.
बाकी दिवाळी आणि मोती साबण एकदम खरय.
लिरिल साबण आणि लालालाला म्हणून पाण्यात नाचणारी मुलगी.
लाईफबोय माहित नाही असे तर कुणीच नसावे.

सुरुवातीचे पहिले वाक्य तेलुगु आहे न।

मस्त लेख.
वरील बहुतेक ब्रँड माहितीचे आहेत.
आमचं लहानपण सनसिल्क शाम्पूतच गेलं. त्याचे सॅशेतले केशरी, गुलाबी, काळा असे रंग अजून आठवतात.
साबणांमध्ये गोदरेजने गंगा नावाचा साबण आणला होता. तो निळ्या-आकाशी रंगाचा असल्याने त्याचं अप्रूप वाटलं होतं. कारण तोपर्यंत साबण म्हणजे हिरवे, लाल, गुलाबी. Happy त्या गंगा साबणाच्या जाहिरातीत ऋषी कपूर होता बहुतेक .

लेख खूप छान लिहिला आहे. बाथरूम्स, साबण, शॅम्पू, टॉवेल्स ....आंघोळीविषयी सगळं काही. Happy

अंघोळीच्या अतीव आवडीबाबत आपण ट्वीन्स

साग्रसंगीत आंघोळ माझ्याही आवडीची पण शाम्पू पेक्षा उटणं जवळचं.
मालदीव, वेळीअवेळी गोव्याचा समुद्र, हृषीकेशला पहाटवेळचे गंगास्नान, जपानी ओनसेन माझंही झालंय जुन्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या वाढीव उल्लेखनीय अंघोळी म्हणजे दुधसागर धबधब्याच्या खाली आणि मानस सरोवर.

टर्किश हमाम मात्र राहिलाय.

छानच लिहिलंय पण शेवट मात्र चुटपुट लावून गेला

<<उल्लेखनीय अंघोळी म्हणजे दुधसागर धबधब्याच्या खाली आणि मानस सरोवर.>> हर्पेन, मी पण मी पण!
शेवट वाचून चरकायला झालं. नक्की काय भावना मनात आल्या, ते शब्दात मांडता येईल असं वाटत नाही.

छान लेख अनिंद्य. शेवट ह्रद्य. लेखात आलेले सगळेच साबण ओळखीचे आहेत. आम्ही लाईफबॉय वापरत असू, दगडच एक प्रकारचा. आजोळी हमाम. हमामला वास तरी होता लाईफबॉयला तो पण नाही. सकाळची शाळा असल्याने फार निवांत अंघोळ नसायचीच. वरच्या लाईफबॉयच्या चित्रात अजून एक टिपिकल वेष्टण असायचं ते नाहीये. (तेवढं ते वास करी करा लेखात ) कधीतरी सिंथॉल वापरलाय. मिड 90ज मध्ये पिअर्स ची पण जोरदार ऍड असायची. वाण्याकडे एक 'पॅरिस' साबण द्या अशी मागणी केली होती ते आठवते मग त्याने पिअर्स दिला , भयानक उग्र Happy मैसूर सँडल पण वापरलाय बरेचदा. 90ज मध्येच मेडिमिक्स ची पण ऍड येई, 'हरवला राया मेडिमिक्स साबणाच्या फेसात' असे काहितरी जिंगल चे शब्द होते. एक 'जय' साबण पण होता त्याचं जिंगल मस्त होतं ' पेहला प्यार लाए जीवनमें बहार, पेहला प्यार'. बेंद्रे बाईंचा ' तुम हुसन परी तुम जाने जहाँ तुम सबसे अलग तुम सबसे जुदा, सौंदर्य साबून निरमा' Happy आणि एक लाईफबाय गोल्डची ऍड यायची त्यात ती कार्टी ' किटानू' असं एकदम अकसेन्ट मध्ये म्हणायची Happy वर ' गंगा' चा उल्लेख आला आहेच, त्याला मस्त वास होता आणि कलर पण भारी पण तो बंद पडला. त्याचं जिंगल पण मस्त होतं, 'पुरब पश्चिम में गंगा उत्तर दक्षीन में गंगा , गंगा का स्वागत करलो गंगा से लो स्नान करलो.. गंगा साबून है' ह्याचं आम्ही संस्कृत दिनाला संस्कृत रूपांतर केलं होतं 'गंगा फेनकम अस्माकम ' असं काहीतरी... Happy ह्यात ब्रीझ, लिरील, संतूर इ आहेतच . शाम्पू सॅशेला पण +111

खूप मोठा प्रतिसाद झाला , तुमच्या लेखामुळे ही सारी जिंगल आणि साबण आठवले, त्या काळची जिंगल पण किती श्रवणीय होती Happy

अजून एक क्रिकेट मॅचच्या मधे जाहिरात लागायची.. निमा रोज निमा रोज .. रोज रोज निमा रोज.. ती जिंगल आणि त्यातल्या मॉडेल्सही छान होत्या.
लाईफबॉयचा वास बदललाय!

आज वाचलेले सर्वोत्तम लिखाण... खूप सुंदर... एकही शब्द किंवा ओळ स्कीप करावी वाटली नाही...खूप खूप धन्यवाद...
Life is a long bath, the more you stay, the more wrinkled you get
वाह..

छान फिलगुड धागा आहे म्हणून सकाळी अंघोळ करून फ्रेश होऊन प्रतिक्रिया देऊ म्हणलं.
आमच्याकडेही म्हैसूर सॅन्डल आणि केरळचा चंद्रिका साबण आजोबांपासून चालत आला आहे. पाळण्यात असल्यापासून त्यांची सवय असल्याने मधल्या कॉलेज फेजमध्ये त्यांच्याबद्दल अतिपरिचयात अवज्ञा झाली होती पण आता पुन्हा त्यांच्याकडेच परतलो आहे. साबणाबद्दल आजोबांच्या नाही काही आठवणी पण त्यांनी तीसेक वर्षांपूर्वी म्हैसूरवरून लिटरभर चंदन तेल आणि गणेश- सरस्वतीच्या चंदनमुर्त्या आणल्या होत्या. ते चंदन इसेन्शिल ऑइल अजूनही चमत्कारिकपणे टिकून आहे.

@ जिद्दु ,

... सकाळी अंघोळ करून फ्रेश होऊन प्रतिक्रिया देऊ म्हणलं..... Happy

मैसूरचा चंदन आणि केरळची चंद्रिका .... दक्षिण भारतात 'नैसर्गिक' सुगंधाचं वेड थोडे जास्त आहे असे मला वाटते.

प्रतिसादाबद्दल आभार.

@ च्रप्स,

.. एकही शब्द किंवा ओळ स्कीप करावी वाटली नाही.....

That's one huge compliment, thank you !

Mast!!

छान लेख!
लहानपणी मला जय साबणाची क्रेझ होती.डाळिंबी रंगाचे चमकते रॅपर्,त्यावर जाईची फुले असे काहीसे होते.आमच्या शेजारचा माणूस्,संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर आंघोळीला जायचा.अक्षरशः जायचाच.कारण बायको पाणी नेऊन ठेवायची,नंतर रिकामी बादली परत आणायची.तर काय म्हणत होते,तो न्हाऊन आल्यावर इतका सुवास पसरायचा की बास.आमच्याकडे मात्र हमाम्,रेक्सोना,क्वचित लाईफबॉय असायचे.नंतर चंद्रिका आला.पण सगळे हे उग्र वासाचे होते.दिवाळीला मात्र दी गोल्ड मिस्ट की नुसताच गोल्ड मिस्ट असायचा.अतिशय सुरेख साबण होता.अ‍ॅव दी कलोनच्या वासाचा साबण होता. काय झाले माहित नाही नंतर फारसा मिळत नव्हता की आमच्याकडे आणला गेला नाही.नंतर कधीतरी जय साबण वापरला,पण तितका सुवास आल्यासारखा वाटला नाही.
म्हैसोर सँडलवुड ही चैन होती.त्याच्याबरोबरीने महाराणी साबण म्हणून चंदनाचा सुवास असणारा साबण होता.आईच्या हातात केस होते त्यावेळी बहुतेक शिकेकाई साबण असावा.नंतर मात्र सनसिल्क तोही ऑरेंज असायचा.
नंतर संतूर ,लिरिल वगैरे मंडळी आली.त्यात लिरिल फक्त पहिल्यांदाच वापरायला आवडायचा.मग नाही.माझा भाऊ,साबण वापरून झाल्यावर काय बिशाद साबणाला हात लावायची,इतका फेसाचा डोंगर करायचा.मला खूप घाण वाटायची तसा साबण वापरायला.तो साबण व्यवस्थित धूवून वापरात यायचा.मग वडलांची बडबड सुरु व्हायची.तेव्हापासून माझा वेगळा साबण ठेवायला लागले.

आज हा लेख वाचताना जय साबणाचा वास मनात दरवळला.लेखाबद्दल धन्यवाद ,अनिंद्य ! लेखाचा शेवट चटका लावून गेला.

दिवाळीला मोती सॅंडल साबण नसेल तर feel च येत नाही.
माझ्या सासरी दिवाळी ला pears होता,(हा सांस्कृतिक धक्का) मी म्हटलं, दिवाळीचा मोती कुठेय, तर हे म्हणाले हा त्यापेक्षा महाग आहे.
मी म्हटलं महाग असो वा स्वस्त, मोती पाहिजे.
उटणं तर खूप आवडतं मला. एरवीही कधी कधी असतं.
समजतंय तेव्हापासून संतूर वापरलाय. आईला आणि मला तेव्हा सगळे जण संतूर मॉम आणि बेटी म्हणायचे.
(मला कोणी म्हणत नाही पण लेकिसोबत पाहून Lol )
पतंजली साबणाचा उल्लेख नाय केला कोणी?
त्यांचा lemon and honey छान आहे.
-----
आई2 केस2 धुवून द्यायची शाळेत2 असताना तेव्हा silkesha ही शिकेकाई पावडर आणली जात असे. तेव्हा केस दाट, भरगच्च आणि लांब होते, clg ला जायला लागल्यापासून hair management माझ्याकडे आलं आणि त्यांची वाट लागली

आणखी एक बाहेर कुठेही कितीही फिरून या, शाही bathrrom मध्ये स्नान करा.
पण घरी आल्यावर घरच्या स्नानगृहात स्नान केल्यानंतर जे वाटतं ना, अहा, अगदी स्वच्छ झाल्यासारखं Happy
मागे बहुतेक स्वप्ना ने हा उल्लेख केला होता, लेखामध्ये, जे अगदी।माझ्या मनातलं आहे.

लेख भारी लिहीला आहे हे सांगायचं राहिलं Happy

आता परदेशी ब्रँड शक्यतो replace करण्याचा प्रयत्न करत आहोत.
Wipro चं liquid detergent, गोदरेज no1 bath साबण, भांडी घासण्यासाठी पितांबरी dishwash बार असं वापरत आहोत.
Baby products हिमालया चे आणलेत.
Baby soap चा, तिच्या पावडर चा आणि नंतर वेखंड पावडर चा सुवास सध्या चा best feel देणारा सुवास आहे

पतंजली साबणाचा उल्लेख नाय केला कोणी?>>>>>माझ्यासकट सारे लहानपणात गेले ग.त्यावेळी पतंजली नव्हता ना! त्यांचा मोगरा मस्त आहे.
दिवाळीला नंतर काय, आताही लेकाच्या फर्माईशीने मोती साबणच.पिअर्स कॉलेजमधले वेड होते.सिंथॉल कोलन किंवा काळ्या रॅपरमधला आवडतो.
अरे हो हिमालयाचा अमंड+रोझ साबण वापरला. तोच तो वास जय साबणाचा. अगदी मला हरवून गेला.

@ वावे,

पहिल्या प्रतिसादासाठी थँक्यू!

@ mrunali.samad,

... पहिले वाक्य तेलुगु आहे न....

होय, तो प्रसंग विजयवाडा आंध्रप्रदेशात घडलाय. कोंचम कोंचम तेलुगू येते मला Happy

@ वर्षा,
... वरील बहुतेक ब्रँड माहितीचे आहेत.....
म्हणजे हे स्नानांतर तुम्हीपण अनुभवले तर.

@ मीरा.. ,
... अंघोळीच्या आवडीबाबत आपण ट्वीन्स...... द्या टाळी Happy

@ उमा,
@ आस्वाद,
@ ए_श्रद्धा,
@ वावे
@ किल्ली

आभारी आहे हो !

छान लेख आहे. आंघोळीशिवाय सकाळी घराबाहेर पडणे न रुचणाऱ्यांपैकी मी एक. लॉकडाऊन मध्ये सकाळी नऊपर्यंतच दुकाने उघडी असल्याने काही ओळखीची मंडळी खरेदी करून मग घरी येऊन सोवळ्यात यायची. Proud Proud पण मला हे मानवत नसे.
आंघोळ आवडीचा विषय व लेखही आवडला.

छान लेख आहे. एक स्नान प्रेमी ,सुगंध प्रेमी म्हणून तर फारच आवडला. मेरा बस चले तो मै रोजं अभ्यंगस्नान करूंगी , असंय माझं तर. महाभारतातील द्रौपदीच्या स्नानाचा दूध, चंदन ,गुलाब पाकळ्या एपिसोड बघून हेवा वाटला होता Lol .

हे हमाम साबण वडिलांचे आवडते असल्याने ते वापरतच लहानाचे मोठे झालो. दुसऱ्या मुली लक्स वापरताना अन्याय वाटायचा हा. दिवाळी = मोती , तो सुगंध दिवाळीचा म्हणून फिट झालायं , नवरा म्हणाला एवढे आवडते तर वर्षभर वापरू तर तेही पटले नाही मगं त्या आठवणीची कदर रहाणार नाही असे काही वाटून.....
आजोळी मोठे एकत्र कुटुंब असल्याने आजन्म दगड लाइफबॉय, हा मला manly वाटतो अजूनही , तुमच्यासारखंच Happy मामाला समजवून सांगितले पण त्याला ही अंधश्रद्धा वाटली. मी तर साबण बनवून लेखही टाकलायं इथे खूप मस्त अनुभव होता.
तुमचा लेखं सुभाषितांनी व फोटोंनी अजून सुरेख झालायं.

छान लिहिलेत... अगदी बालपणापासुन आठवणी जाग्या झाल्या. हमामचा फोटो द्यायला हवा होता.. शिवाय लेसांसी साबण पण मधेच येऊन भाव खाऊन गेला तो त्याच्या त्या लंबुळक्या आकारामुळे.. ज्या वेगात एंट्री झाले त्याच वेगात तो नाहीसा झाला.

@ हर्पेन,
@ अनया,

मानस सरोवरात स्नान माझं खूप दिवसांचं अपूर्ण स्वप्न आहे, बघूया कधी पूर्ण होतंय ते Happy

@ प्राचीन,

थँक्यू !

@ मी_अस्मिता,

तुमचं बरोबर आहे, मोती रोज वापरला तर मग दिवाळीला स्पेशल वाटणार नाही Happy

सुंदर प्रतिसादासाठी सर्वांचे आभार !

@ देवकी,

जय ची जिंगल छान होती. गोल्ड मिस्ट आठवत नाही मला. लिरिलचा लिंबाचा सुवास आधी तीव्र होता तो नंतरच्या बॅचेसमध्ये सौम्य करण्यात आला हे नक्की. मैसूर तर राजस सुकुमार होताच आणि आहे, त्याचा स्पर्श सुद्धा मखमली आहे.

तसेही साबण नवीन असला की जेवढा छान सुवास येतो तो थोडा वापरून झाला की येत नाही. कदाचित त्यामुळेच वापरलेल्या-थोडे झिजलेल्या साबणाची रवानगी 'तिकडचे' हात धुण्यासाठी होत असे. त्यासाठी हॅन्ड वॉश बराच नंतर आला Happy

Pages