तू तो आमुचा सांगात

Submitted by पुरंदरे शशांक on 16 June, 2020 - 01:10

तू तो आमुचा सांगात

भंडार्‍याच्या माथ्यावर
नाम घेत बैसे तुका
त्याचे एकतानपण
विठू निरखे कौतुका

नाम घेता तुकयाची
मावळली देहबुद्धी
नाम, विठू आणि तुका
एकरुप हो त्रिशुद्धी

विठ्ठलासी मोठा घोर
कैसे सांभाळावे यासी
स्वये बैसोनी दुकानी
चालवितो संसारासी

आवलीसी कळेना हे
बैसे दुकानी हे कोण
विक्री बहु होत तेथ
सारे वाटे विलक्षण

बुवा येती सांजच्याला
पुसे आवली तयाला
कोण गडी हो ठेविला
काही कळेना मजला

बुवा जाती राऊळात
पायी मस्तक ठेवित
कपाळाला तेल मीठ
काय घडे विपरित

बुवा बोलती स्त्रियेला
कोण गडी हा कुठला
सांग सत्वर मजला
घोर जीवाला लागला

सांगे आवली बुवांना
दिसभर येथे होता
तुम्ही येण्यापूर्वी तर
माल देतघेत मोठा

नाव पुसिता सांगतो
सावळा म्या चाकणचा
बुवांनीच ठेवोनिया
घेतले की चाकरसा

बुवा उमगले सारे
थेट जाती राऊळात
काय शिणलासी देवा
सेवा दुकानी करीत

देव हासोनी गालात
खांद्यावरी ठेवी हात
गेले गेले देवपण
तू तो आमुचा सांगात

ऋण भक्तीचे हे मोठे
मज साहवेना झाले
नामरुप होता कोणी
मज व्यक्ता येणे झाले

एकमेव सखा तूचि
वाटतसे धन्य धन्य
तुकाराम नाम घेता
होई मजसि अनन्य

.....................................................

भंडारा .... देहू जवळील एक छोटी टेकडी जिथे तुकोबा एकांतात परमार्थ साधनेला जात असत ते ठिकाण

सांगात ....... सखा

घोर...... चिंता

आवली..... तुकोबांची द्वितीय पत्नी

पुसणे...... विचारणे

चाकरसा....... चाकर म्हणून

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप आवडली.
विठ्ठलासी मोठा घोर
कैसे सांभाळावे यासी
स्वये बैसोनी दुकानी
चालवितो संसारासी>>>>>> किती गोड देवाची माया, आईच जणू !

किती सुंदर!
'त्याचे एकतानपण विठू निरखे कौतुका | '
नाम, विठू आणि तुका एकरूप हो त्रिशुद्धी|
असा भक्त दुर्मिळ. विठूला कौतुक वाटणारच आपल्या बाळाचे!