खेळकर आणि खोडकर मांजरांचं विश्व.. (यूट्युब आणि इंन्स्टा)

Submitted by अ'निरु'द्ध on 19 May, 2020 - 23:43

खेळकर आणि खोडकर मांजरांचं विश्व..
(यूट्युब आणि इंन्स्टा)

आमच्या टारझन बोक्यावर "टारझन द वंडर कॅट" हा पहिला भाग लिहिला आणि बऱ्यापैकी मांजरप्रेमींची ओळख झाली.
नंतर अमेरिकेत कुत्रा किंवा मांजर पाळण्यावर धागा आला आणि त्यावरही मांजरांबद्दल बऱ्यापैकी माहिती आली आणि प्रश्नही आले.
आमचा टारझन घरी येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही मांजरांची वेडी असलेली माझी लेक त्यांचे व्हिडिओज् युट्युब आणि इंन्स्टा वर बघायची मला पाठवायची.
मांजरप्रेमी मायबोलीकरांनी हे व्हिडिओज् पहावेत हा मुख्य उद्देश आणि बहुतेक असा धागा मायबोलीवर नाही हे पाहून हा सबकुछ मांजरांसाठी असलेला धागा काढतोय.

मांजरप्रेमींनी यात वेळोवेळी भर घालावी ही विनंती.
यात युट्युब, इंन्स्टाच्या लिंक द्यायलाही हरकत नाही आणि घरच्या मांजरांचे व्हिडिओ, फोटोज् असतील तर फारच उत्तम..
पाळणाऱ्यांनी त्यांच्या काही आठवणी दिल्या आणि जाणकारांनी माहिती दिली की फावल्या वेळी कधीही इथे येऊन रमायला हरकत नाही.
हा धागा मांजरप्रेमीना तर आवडावाच पण इतरांसाठी स्ट्रेसबस्टर म्हणून उपयोगी पडेल असं वाटतं कारण मांजरं विशेषतः त्यांची पिल्लं हा एकंदरीतच भयंकर क्यूट प्रकार आहे..

सुरुवातीला धाग्यामधेच काही छान व्हिडिओजच्या लिंक्स देतोय..

https://youtu.be/bw5WtZmU-i0

https://youtu.be/MLhesmKn4Cs

https://youtu.be/okOVxfuSYPk

https://youtu.be/bhpP8jEm5ic

बाकीच्या प्रतिसादात येतीलच...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर उपक्रम . टारझन चा व्हिडीओ पाहायला आवडेल .
बाई दवे तो 1100 मांजरीवाला व्हिडीओ जबरी आहे Happy

बरे झाले असा धागा सुरु केला. आजवरचा जो काही मांजर पालनाचा अनुभव आहे त्यावरून मांजराविषयी काही रोचक गोष्टी/निरीक्षणे मनात आहेत. या धाग्यामुळे ती लिहून काढण्यास उद्युक्त झालो. हि माझी सध्याची मांजर. हे जुने व्हिडिओज. आता ती मोठी झालीये. फक्त जेवायला घरी येते. बाकी सगळा वेळ सोसायटीत उंडारत असते.

हे तिचे काही गमतीशीर व्हिडिओज:

https://www.youtube.com/watch?v=itoMDEM_e9Q
https://www.youtube.com/watch?v=UOSDNcuHdnA
https://www.youtube.com/watch?v=3zQcF9vRIfo

कटप्पा, पहिल्या प्रतिसादाबद्दल आभार..
तो अकराशे मांजरांचा व्हिडिओ पाहून सर्व मांजरप्रेमी हक्काबक्का होणार आहेत बहुतेक..

atuldpatil, व्हिडिओज् जरा सावकाशीने पहातो.
पण तुमचे मांजरपालनाचे अनुभवही येऊच देत..
आमचा टारझनही जेवायला, खायलाच घरी येतो.
कधीकधी निवांत झोपायला..
बाकी तोही दिवसभर, खरंतर रात्रभर सोसायटीत ऊंडारत असतो..
(टारझनच्या दुसऱ्या आगामी भागाचं नावंच आहे "घराबाहेरचा राजस मवाली")

मस्त धागा......

सध्या माझ्या घरात मांजर नाही पण मांजरांच्या सुंदर आठवणी आहेत. मांजराला बघून फुटबॉलला किक मारतात तशी एक किक मारावी असे मला गेल्या जन्मी वाटायचे. पण मांजरे म्हणे माणसांवर काळ्या जादूच्या वशीकरण मंत्राचा प्रयोग करतात. मी त्या काळ्या जादूला बळी पडले आणि मांजरांना माझ्या अंगावर लोळू देऊन वर त्यांच्याशी बोबडे बोलण्यापर्यंत माझी अधोगती करून घेतली.

अगदीच काम नसेल तर हेVideos बघायला आवडतात. माझा फावेटा म्हणु शकेल मी.

अवांतर :
तिनदा मांजर पाळलंय घरात. एकदा बोका आणि दोनवेळा मांजर! मांजरांमधे unique personality नसते. अस मला त्या अनुभवावरुन वाटत. कारण कुठलंही मांजर घेतल तर त्याच आपण झोपल्यावर कुशीत /पायापाशी येऊन झोपण. अंघोळीच्या वेळी मोठमोठ्यान आवाज करण. लहान जागेत सामावण्याचा प्रयत्न करण, बाहेरच्या माणसांना लाजण! वैगेरे सगळ्या सवयी सेमच वाटतात.

एक मात्र आहे मांजरांच्या बाबत दोनच प्रकारचे लोक असतात. एक त्यांचा पूर्ण तिरस्कार करणारे, मांजराला पाहताच घाबरणारे ओरडणारे हाकलणारे वगैरे. किंवा मांजराचे भरपूर लाड करणारे. व्याघ्रकुळातली असूनही काही माणसांचे प्रेम संपादन करण्यात मांजर भलतीच यशस्वी होताना दिसतात. काळ्या जादूच्या वशीकरण थियरी खरी असू शकते (ह. घ्या.) Lol

>>>सध्या माझ्या घरात मांजर नाही पण मांजरांच्या सुंदर आठवणी आहेत. मांजराला बघून फुटबॉलला किक मारतात तशी एक किक मारावी असे मला गेल्या जन्मी वाटायचे. पण मांजरे म्हणे माणसांवर काळ्या जादूच्या वशीकरण मंत्राचा प्रयोग करतात. मी त्या काळ्या जादूला बळी पडले आणि मांजरांना माझ्या अंगावर लोळू देऊन वर त्यांच्याशी बोबडे बोलण्यापर्यंत माझी अधोगती करून घेतली.<<<

@ साधना, ह्या ट्रान्सफाॅर्मेशन बद्दल नक्की इथे लिहा..

>>>तिनदा मांजर पाळलंय घरात. एकदा बोका आणि दोनवेळा मांजर! मांजरांमधे unique personality नसते. अस मला त्या अनुभवावरुन वाटत.<<<
@ मन्या ऽ
मांजरांबद्दल असं म्हणतात की संपूर्ण उत्क्रांती मधे अंगभूत गुणधर्म आणि सवयी कमीतकमी बदललेला प्राणी म्हणजे मांजर.
त्यामुळे पुरातन काळापासून तसंच, सारखंच वागणं हीच त्याची Unique Personality..

@ atuldpatil, वेल सेड अबाउट कॅट लव्हर्स एन हेटर्स..

आमच्या मांजराचं नाव आहे गुंडू . त्याला आम्ही इथल्या RSPCA नावाच्या संस्थेतून ऍडॉप्ट केला आहे. त्याला घरी आणले तेंव्हा सोबत खूप सारी माहितीपत्रके  होती आणि त्यात मांजर संगोपनाविषयीचे नियम होते. त्या कागदपत्रातून पहिल्यांदाच हे समजले कि मांजरे ही obligate carnivore (पूर्णतः मांसाहारी प्राणी) असून त्यांना दूध पचवता येत नाही. हे वाचून खरंतर त्या कागदपत्रांवर कितपत विश्वास ठेवावा अशी शंका उत्पन्न झाली कारण लहानपणापासून जी मांजर आसपास होती त्यांचा मुख्य आहार दूधच! पण पुढे आम्ही असा निष्कर्ष काढला कि इथल्या मांजराची तर्हा निराळी  दिसते, इथे बाजारात मांजरांसाठी विशेष लॅक्टोस फ्री दूध देखील मिळत! असो 
दुसरा महत्वाचा मुद्दा होता कि मांजरांना अज्जीबात घराबाहेर सोडायचे नाही. ह्याची अनेक करणे आहेत पण मुख्य कारण म्हणजे मांजर हा शिकारी प्राणी आहे पण तो केवळ पोट  भरण्यासाठी शिकार करत नाही, तो खेळ म्हणून देखील शिकार करतो. आणि त्या खेळात येथील स्थानिक प्राणी मारले जातात. असे म्हणतात कि दरवर्षी ऑस्ट्रेलियामध्ये भटक्या मांजरांमुळे करोडो लहान प्राणी , सरडे, पाली, पक्षी मारले जातात. त्यामुळे इथे महानगर पालिका वेळोवेळी भटक्या मांजरांना पकडून घेऊन जाते आणि मारून टाकते. त्यामुळे आमचा गुंडू कायम घरातच राहतो! 
https://www.environment.gov.au/biodiversity/invasive-species/feral-anima...

41305916_10155925936014211_5470603430936444928_n_0.jpg92104854_10157364716534211_6325826218088202240_n_0.jpg96290487_10157492852544211_3918359704216010752_o_0.jpg

बाकी जनावरांनी स्वतःला बदलले माणसांसाठी.... कुत्रा तर अगदीच कामातून गेला, शेपूट हलवत उभा राहतो, लाळ गाळत.. म्हणून काही माणसांना कुत्रा म्हणून शिवी द्यायची उर्मी येते.

मांजरांचे तसे नाही. त्यांनी कौशल्याने माणसाला बदलले, त्यांना हवे तसे करून घेतले आणि आपण माणसाळलोत असा आभास माणसाच्या मनात निर्माण करून माणसांवर राज्य केले. मांजरांचा इतिहास बघितला तर प्रचंड रंजक माहिती हाती येते.

जगाचे राजे मांजरे असल्यामुळे ती कधीही जमिनीवर बसत नाहीत. जमिनीच्या तुलनेत काहीतरी उंच असेल तर त्यावर बसतात. अगदीच जमिनीवर बसावे लागले तर खड्ड्याशेजारच्या जमिनीवर बसतील, खड्ड्यापेक्षा ती उंच. सोफ्यावर बसणार नाहीत, सोफ्यावर बसलेल्या माणसाच्या मांडीवर बसतील. Happy

तो केवळ पोट भरण्यासाठी शिकार करत नाही, तो खेळ म्हणून देखील शिकार करतो>>>

हो, हलणारी वस्तू दिसली की केवळ उत्सुकता म्हणून मांजर डावली मारून बघते व त्यात त्या प्राण्याचा जीव जातो. आमच्या इथे एकदा मी व मुलगी खिडकीत बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असताना अचानक समोरच्या झाडावरून एक मुनियाचे पिल्लू जमिनीवर उतरलेले आम्हाला दिसले. मुनिया जोडपे तारेवर बसून ओरडत होते. आम्ही ते दृश्य बघत असताना आमचा बोकाही तेच दृश्य माझ्या मांडीवर बसून पाहात होता. बोक्याला बाजूला आपटून आम्ही दोघीही धावत खाली गेलो. पिल्लु जरा मोठे असल्याने त्याला पकडायला गेलो तर ते पुढे जायला लागले. पण आम्ही काही करायच्या आत आमचा बोकाही आमच्या मागून आला व त्याने पिल्लाची मानगूट पकडली. पुढे काय झाले ते सांगण्यासारखे नाही. पण पिल्लू फुकट मेले कारण आमच्या बोक्याला अशी शिकार करून खायचे कसे हे माहीत नव्हते.

सध्या माझ्या घरात मांजर नाही पण मांजरांच्या सुंदर आठवणी आहेत. मांजराला बघून फुटबॉलला किक मारतात तशी एक किक मारावी असे मला गेल्या जन्मी वाटायचे. पण मांजरे म्हणे माणसांवर काळ्या जादूच्या वशीकरण मंत्राचा प्रयोग करतात. मी त्या काळ्या जादूला बळी पडले आणि मांजरांना माझ्या अंगावर लोळू देऊन वर त्यांच्याशी बोबडे बोलण्यापर्यंत माझी अधोगती करून घेतली >>>>>> हीच अवस्था माझ्या नवर्याची झालेली मी अनुभवलेली आहे.

मांजरांना वशीकरण मंत्र येतो. ते मानवी मेंदूत काहीतरी गडबड करतात ज्यायोगे माणसे त्यांची गुलाम होतात. मला मांजरांचा प्रचंड तिटकारा होता. नवरा लोकांच्या मांजरांचे लाड करायला लागला की मी रागाने तोंड फिरवून दुसरीकडे बघायचे. पण मुलीच्या हट्टामुळे घरात बोका आला व त्याने माझी सक्सेसफुल ब्रेन सर्जरी केली. आता माझ्या कपाळावर 'श्वान-मार्जार गुलाम' असे स्पष्ट लिहिलेले आहे जे मांजर व कुत्रे वाचू शकतात व मी त्यांना सापडले की माझ्याकडून त्यांचे लाड करून घेतात. मी कुत्र्यांना प्रचंड घाबरायचे. पण मांजराने मेंदूत गडबड केल्यानंतर कुत्र्यांची भीती गेली. आता रस्त्यावरचे भटके कुत्रेही माझ्याशी प्रेमाने हाय हलो करतात.

माझ्या एका मित्राच्या थियरी नुसार मांजरांनी लहान मुलाच्या केविलवाण्या रडण्याचा आवाजाची नक्कल करून माणसाच्या मनात स्वत:विषयी दया आणि सहानुभूती निर्माण करण्यात यश मिळवले. त्याद्र्वारे ते माणसांकडून अन्न मिळवू लागले. त्याच्या मते मांजर हे मुळात "हिंस्र श्वापद" आहे. त्यामुळे म्यांव हा त्याचा मुळचा आवाज नसून डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार तो आवाज म्हणजे मार्जारकुळाने सर्वायवल साठी केलेली निवड आहे. जी मांजरे असा आवाज काढू शकली नाहीत ती काळाच्या ओघात नामशेष झाली असे त्याचे म्हणणे.

या थियरीला कुठे अधिकृत मान्यता आहे कि माहित नाही. पण हे ऐकल्यानंतर मी प्रचंड हसलो होतो. मला हि थियरी खूप रोचक वाटली. मी कल्पना केली कि खरेच असे असेल तर कसे झाले असेल हे सुरवातीला? आदिमानव गुहेत राहत असताना एखादे जंगली मांजर तिथे आसपास घुटमळत असावे. आदिमानवाने शिकार करून आणलेले खाद्य किंवा तो पाळत असलेल्या गाईम्हशीचे दुध यावर चोरून ताव मारून किंवा उरलेसुरले खावून ते कसेबसे उदरनिर्वाह करत असावे. एक दिवस हे उपाशी मांजर जांभई वगैरे देताना चुकून "ब्यांऽऽ" "ट्यांऽऽ" वगैरे काहीतरी आवाज आला असेल. बाळाच्या रडण्यासारखा तो आवाज ऐकून आपला पूर्वज लगेच पाघळला. त्याने गुहेतले थोडे दुध त्याला दिले असणार. अजून काही वेळा असे झाल्यावर "ब्यांव केल्यावर दुध मिळते" असा शोध त्या बोकोबा/मांजरीला लागला असणार. काय केले असता अन्न मिळते हे समजण्याची निसर्गदत्त देणगी प्रत्येक जीवाकडे असतेच. मग झाले सुरु. पुढे त्यांची बाळे पण तेच करू लागली. भूक लागली कि माणसाजवळ यायचे आणि "ब्यांऽऽ" Biggrin Lol Lol

Atuldpatil, हे असेच आहे. मांजराने माणसांना मांजराळावलेय आणि त्याच्या डोक्यात हेही भरले की त्याने मांजरांना माणसाळावलेय Lol

बाकी मांजर हे हिंस्त्र श्वापद आहे याच्याशी सहमत. मांजर तुमच्या अंगावर लोळून तुमचे बोबडे बोल ऐकून घेत असले तरी तुम्ही त्याला कोपचीत घेतले तर ते गुरगुरतेच. कुत्रा कधीही असे करणार नाही. तो मालकाचा गुलाम असतो.

मस्त प्रतिसाद!
माझ्या माहेरी १३ मांजरे झाली.अगदी एकावेळी नाही,एकापाठोपाठ अशी.कारण मांजर गाभण राहिली की आमची आजी,पांडूगड्याला सांगून तिची रवानगी मासळीमार्केटात करवायची.पहिले मांजर पांढरे होते.माऊ नाव होते.पूर्वी दूरदर्शनवर रविवारी सिनेमा असायचा.त्या सिनेमात आम्ही रंगलो की बरोबर ७.२०- ७.२५ च्या मानाने स्वयंपाकघरातून भांडे पडल्याचा आवाज यायचा.माशाची आम्टी खाली पडलेली असायची आणि त्यातले तुकडे ही मांजर मटकवायची.
सालाबादप्रमाणे ती गाभण राहिली आणि हाकलली गेली.तिचीच मुलगी छान सोनेरी पिवळी होती,गुणी होती.
सकाळी झोपेत असताना मधेच छातीवर दाब आल्यामुळे जाग यायची तर माऊ बसलेली असायची.हिचे घुर्र घुर्र चालू असायचे तर कधी पायात अंगाची कोलंबी करून झोपायची.ही मांजर वयात आलेली, मी व माझा भाऊ दोघांनी पाहिली.तीही अम्हाला सोडत नव्ह्ती.आम्ही गादीवर बसलो तर तीही गादीवर झोपली.शेवटी तिच्या कमरेखाली जुने फडके घातले.नंतर मात्र कधीच असे पाहिले नाही.
तसेच तिला पिल्ले होताना आम्ही दोघांनी पाहिली.आम्ही तिच्याकडे पहात असताना आणि धीर देत असताना,ती उडी मारून गादीवर आली.शेवटी आम्ही खाली उतरलो तशी ती उतरली आणि आमच्या सोबतीने २ पिल्ले जगात आणली.थोड्या वेळात आमची आई शाळेतून घरी आली आणि जेवायला बसली.तिला हे सगळे सांगत असताना माऊ परत आली.आईच्या पुढ्यात तिसरे पिल्लू जन्माला आले.कदाचित तिला कोणाची तरी सोबत हवी असेलही.कारण आधीची पिल्ले एका खोलीत तशीच टाकून स्वयंपाकघरात आमच्याबरोबर आली होती.पुढे त्यातला एक बोका राहिला आणि आईसकट बाकीची पिल्ले, व्हिलनने मा.मा.मधे पाठवली.
नंतर फारसे असे मांजरवेड राहिले नसावे कारण घरी कुत्रा आणला होता.तो असला अवलादी निघाला की तो ज्यावेळी गेला त्यावेळी आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला.

अरे वा मस्तच धागा. माझ्याकडे खूपच मटेरिअल आहे. लॉक डाऊण जसाच सुरू झाला प्राण्यांना बाहेर टाकलेले फेकलेले अन्न मिळणे एकदम बंद झाले. मुंबईत दोन प्रकारची लोक भेटली. कुत्र्यांचा अतीव व पॅशनने तिरस्कार करणा री. आणि त्याचे दुसरे टोक. तर तसे आमच्या काँप्लेक्स मध्ये पण आहेत. आम्ही तिथे राहायला गेल्याव्र काळू , चिवडी व प्रश्न!! ह्यांच्याशी आमच्या कुत्र्याची मैत्री झाली. काळू ग्रूप लीडर व प्रथम अति भयानक तोंड करून अंगावर धावुन यायचा व घाबरवायचा. आमच्या आधीच्या काँप्लेक्स मध्ये फारच श्रीमंत व उद्दाम लोक राहात व दोन कुत्रे पाळून मी भरपूर शिव्या खाल्लेल्या त्यामुळे इथे अनुभवाने शाहाणे होउन पब्लिक पासून कधीपण दूर पॉलिसी आहे. पण काळ्या चिव डी शी मैत्री झाली. प्रश्न ह्याचे नक्की लिंग काय कधीच कळले नाही. तो गायबच झाला.

मग हळू हळू जानी दोसती झाली. मागील वर्शी खूपच पाउस पडल्यावर हे दोघे गायब झाले होते. व परवा लॉक डाउन मध्ये काळू एकदम आसन्न मरण अवस्थेत बेसमेंट मध्ये दिसला. मग मी पहिले ढसा ढसा रडोन त्याला खायला दिले. अगदी लहान मुलांचा घोडा असतो तसा हलका झाला होता व चालता पण येत नव्हते. त्याच्यावर इतर कुत्र्यांनी अत्याच्यार केलेले दिसले. कान चावलेला फोडलेला. पायाची हाडे मोडून सांधलेली वगैरे. मग त्याला खायला घालायला नेमाने सुरू केले. दूध, चिकन पेडिग्री चा जोर लावला व एक बाटली पाणी. आता महाशय एकदम टुण टुणीत झाले आहेत व बालका सारखे बागडतात. एवढे नमन का तर बेसमेंट मध्ये मांजर व बोके आहेत. आज बघितले तर सात आठ आहेत.

एक माउ पोटुशी आहे. एक किटन आहे. एक एक आंख वाला बोका आहे. ह्याचे माझे प्रेम जमले. मी ह्याला बंड्या नाहीतर एक्काजी राव म्हण ते.
लॉक्डाउन मुळे हे पब्लिक उपाशी होते व मी काळ्याला घालत होते ते अन्न खायचा प्रयत्न करी. पहिले माझे कुत्रे धावून जात असे पण ते ही आता
माउला सरावले आहेत.

एकु णात काय मी व्हिस्काज कॅट फुड व पेडिग्री चिकन मिल्क एक दोन पसे रोज फिरायला जाताना खाली नेते. मूठ मूठ सर्वांना घालते.
हे खाउन मग मांजरे फार मजा करतात. एक्कोजी राव तर घरी यायला टपला आहे

मांजरे फार प्रेमळ असतात. पण सेल्फ कंटेंड. कुत्र्यांचे म्हणजे आय वाँट टु नो एव्हरी थिंग. माउचे आय नो एव्हरी थिंग. हा फरक आहे.
आमचे कुत्रे हर्ट होईल म्हणून मी इतर पेट घरात आणत नाही. नाहीतर बंड्या नक्की शुअर एंट्री आहे. बेस्ट फोटो मटेरिअल मांजरे म्हणजे.
आमच्याकुत्र्याच्या बेल्ट शी बंड्या खूप खेळतो. पोट भरले की पायातच लोळ्ण घेतो. व चावायला बघतो. मी ह्या सर्व पब्लिकला घडपडून एकदा पड् णार आहे. फोटो फोन वरून टाकेन.

मी लिफ्ट मधून कुठेतरी जाते हे त्यांनी शोधून काढले आहे. व म्हणून एकदा लिफ्ट पाशीच धरणे धरून बसले होते आठ जन. ह्यातले एक कपल आहे. एक किटन आहे. बंड्याचे काही ह्यात लक्ष नसते.

@ पल्वली, छान आहे तुमचा गुंडू..
आमचा टारझनही फक्त कच्चे मासे आणि कच्चे चिकन खातो.
मटण खिमा मात्र थोडा उकडून देतो. आणि रोज थोडसं ड्राय कॅटफूड.. शिजवलेलं अन्न मात्र अजिबात खात नाही.

@ atuldpatil, मस्त थिअरी आहे. Rofl

आत्ता तुमचे तिन्ही व्हिडिओ बघितले.. सगळेच मस्त..
आणि मन्या ऽ म्हणतात तसं... सगळीच मांजरं सारखीच वागतात.. आमचाही अगदी असाच..

अमा, छान अनुभव..

हा मांजरासाठी बांधलेला एक Catio.
मांजरांसाठी अशी घरं डिझाईन करणं आणि बांधणं हा ही एक छान व्यवसाय आहे. यात मांजरांच्या हालचाली, त्यांच्या गरजा यांचा विचार करुन हा Catio डिझाईन केला जातो.

https://youtu.be/_tbNowSmXiU

मी लिफ्ट मधून कुठेतरी जाते हे त्यांनी शोधून काढले आहे. व म्हणून एकदा लिफ्ट>>>>. अरे! मी एकदा लिफ्तमधे शिरताना एक बोका (बहुतेक) आत शिरला.आम्ही दोघेच लिफ्टमधे.लिफ्टची बटणे कोणीतरी आधी दाबली असावीत जव्हा लिफ्ट २ मजल्यावर थांबली तेव्हा हे महाशय वास घेऊन परत पाठी आले. तिसरा मजला आल्यावर मी उतरले. माझ्या आधी बोकोबा लिफ्टमधून उतरले.कसे काय कोण जाणे आपल्याला याच मजल्यावर जायचे आहे ते कळले.

चार पाच वर्षांपूर्वी एक मांजर घरात घुसली आणि घर बळकटवले. ती चांगली वयात आलेली मांजरी होती आणि कॉलनीत बोके भरपूर होते. तरीही तिने वर्षभर 'खानदानकी इज्जत' सांभाळून ठेवलेली बघून तिला पोरे होणार नाहीत असा निष्कर्ष मी काढला. पण मला फसवून तीने कुठेतरी शेण खाल्ले आणि तिचे पांव भारी झाले. आमची ऐशु तर भयंकर खुश झाली. योग्य वेळ येताच तिच्यासाठी छज्यावर जागा वगैरे केली. तिची डिलिव्हरी जवळ आली तेव्हा तिला छज्यावरच्या जागेत नेऊन सोडले. पण त्या बयेला तिथे पिल्ले घालायची नव्हती. प्रसूतीच्या दोन तास आधी त्या बयेने छज्यावरून खाली उडी मारली, म्हणजे जवळपास नऊ फुटावरून खाली. माझा तर श्वास अडकून गेला होता तिला उडी मारायच्या तयारीत बघून. ऎशूने लगेच पर्यायी व्यवस्था केली आणि बयेने 4 तास लागून 4 पिल्ले घातली. पिल्ले जन्मतःच ऎशूने त्यांना हाताळायला सुरवात केली. बयेला अज्जिबात आवडायचे नाही पिल्लांना हात लावलेले. पण ती दुर्लक्ष करायची. मात्र एक पिवळे जिंजर होते त्याला उचलले की लगेच तरातरा तिच्या ढोलीतून बाहेर येऊन 'आमच्यात अज्जीब्बात असले चालत नाही' म्हणत पिल्लू हातातून खेचून घेऊन जायची. ती 4 पिल्ले म्हणजे फुल्ल टिपी होता आम्हाला. मोठी, जिंजर, काळू व केजरी अशी नावे ठेवली होती, कारणे विचारू नका Happy Happy पिल्ले मोठी झाल्यावर इतका धुमाकूळ घालायला लागली की नको नको झाले मला. एकतर ऑफिसमधून आल्यावर सोफा, खुर्ची कुठेही बसायची सोय उरली नाही, चार पोरे व आई सगळी जागा बळकटऊन पसरलेली असायची. आणि त्यांनी माझी पूर्ण गच्ची व त्यातल्या कुंड्याची हालत 'होल वावर इज आवर, रोज नवी कुंडी टॉयलेटसाठी वापरायची असे करून सोडले. त्यात दिवसाला त्या कुटुंबाला अर्धा ते 1 लिटर दुध आणि 6-6 चपात्या खुराक म्हणून जायला लागले. शेवटी चारही पिल्लांना मासळी बाजार दाखवला.

पुढच्या वेळेस पिल्ले कुठे घातली देवाला ठाऊक. तिच्या पिल्लांना जन्मतःच हाताळलेले तिला आवडले नव्हतेच. एक आठवड्याची झाली तेव्हा घरी घेऊन आली. पुढच्या आठवड्यात शेजारच्या घरात घेऊन गेली. त्या बाईने लगेच तिला हाकलली तेव्हा परत पोरे घेऊन आली. येताना एक पिल्लू तिच्याकडे विसरून आली, ते मला जाऊन आणावे लागले. त्यामुळे नक्की तीनच पिल्ले घातली की कुठे अशीच विसरून आलीय पिल्ले की काय अशी काळजी वाटायला लागली. पण ही बया निवांत. पोरे मोठी झाल्यावर परत नेहमीचा धुमाकूळ सुरू झाल्यावर आईसकट मासळीबाजार दाखवला.

नंतर एकेकटी मांजरे आणली. ती मात्र शिकवल्यासारखी बाथरूम वापरायची. कित्येक वेळा सकाळी उठल्यावर बाथरूममध्ये कोण जाणार यावर ऐशु व मांजरामध्ये स्पर्धा लागायची. Happy Happy

माझा पण कॅट फूड वर एकदमच जास्त खर्च झाला आता मी पेडिग्री डॉग फूड व व्हिस्काज कॅट फूड मिक्स करून त्यांना खायला घालते.

आत्ताच खाली गेले होते तर धावत पळत अकरा मांजरे आले. एक पोटुशी ती लीडर वाट्टे. बोके मांजर्‍या व एक बारकुसे ़ किटन घाबरत घाबरत आले. मी नेले होते ते कमीच पडले, काळ्याला काहीच उरले नाही. मग त्याला बिस्किटे चारली( हे आपले उगीच) त्याचे मेन अन्न पेडिग्री दूध व चिकनच आहे. बिस्क्टे कुत्र्यांना देउ नयेत हे मला म्हाइत आहे.

मला एकदम एस वेंचुरा पेट डिटेक्टिव्ह सारखे वाटत आहे. घरी कावळॅ कबुतरे साळुंक्या, खाली कुत्रे मांजरे एक झूच तयार झाले आहे माझ्या
भोवती. इतका दंगा करतात की फोटो घेउच देत नाहीत.

भारी धागा!
मी फनी कॅट किंवा कॅट वि. डॉग असे जास्त एन्जॉय करते.
कॅट जिना किंवा दरवाजा अडवून बसलेली असते आणि कुत्रा शेजारुन जाऊ शकत नाही (संकोच ? Proud किंवा घाबरतो) या विषयावर तर बरेच आहेत (डॉग यू शल नॉट पास)
https://www.youtube.com/watch?v=S7znI_Kpzbs&t=28s
आणि काकडी आणि मांजरांचे व्हिडिओ पाहिले की नाही? Lol
https://www.youtube.com/watch?v=ZZliK29DXWg

अरे नंबर वन विनर विडीओ बॉर्डर कोली वॉक हा आहे जरूर जरूर बघा. मी वारले की माझा आत्मा ह्या कुरणात पाच कुत्र्यांबरोबर विहरणार हे पक्के आहे. माझा ऑटाफे.

https://www.youtube.com/watch?v=jaLor7d7NEs

अरे वा निरू मस्त धागा, टारझन च्या आगामी भागाची वाट बघतेय. बाकिच्यांचे प्रतिसाद पण मस्त . खास करून साधना, देवकी अतुल पाटील यांचे जास्त आवडले.
आमच्या कडे माझ्या लहानपणापासून मांजरं आहेत. आमच्या मांजरांची नावं पण मजेमजेशीर होती. एका मांजरीला मीना टी म्हणायचो तिचे डोळे मोठ्ठे काजळ घातल्यासारखे होते. तिची एक गंमत लिहीते. आम्ही सगळे उन्हाळ्यात नदीवर पोहायला जायचो. (डालडा चे डबे लाउन, शिकत होतो पोहायला तेव्हा) घरी येताना मीना टी साठी छोटे मासे घेउन यायचो नदीवर च्या मासेमारांकडून. आम्ही ते डबे लटकवून घेउन यायचो आणि त्याचा आवाज यायचा मीना टी आमची वाट बघायची. तिने डबे वाजण्याचं आणि मासे मिळण्याचं समिकरण बसवलं होतं, एकदा घरात असताना चुकून पोहण्याचा डबा उचलला तर त्याचा आवाज आला. तर ही आली सैरभैर होउन, म्याव म्याव थांबेच ना तिची ! तिला मासा हवा Lol
किती मांजरं पाळलीत याची गिनती च नाहीये. दादरला काकांकडे ही आम्ही मांजरं पाळायला लावायचो. तिथल्या मांजराचं नाव होतं " चसप्पू" , मांजरांच्या पिल्लावरून आम्हा बहिणींमध्ये भांडणं पण व्हायची. वाटणी झालेली असायची कुठलं तुझं, कुठलं माझं. (आम्ही चार बहिणी)
लहानपणी माझ्या हातून मांजरांचा छळ पण झाला असेल कारण आम्ही खुप हाताळायचो मांजरांना . सारखं मांडीवर घेउन बसायला आवडायचं. आणि खेळवायला. माउ मांडीवर बसण्यासाठी पण किती भांडणं व्हायची आमची ! मी आणि माझी धाकटी बहिण , मांजर कोणाकडे येतय यांच्या वरून भांडणं Lol

Pages