भ्रम

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 00:58

पहाटे पहाटे करीम बाजल्यावरून उठला। घराच्या आत झोपण्यापेक्षा त्याला घरच्या गच्चीवर मोकळ्या हवेत झोपायला आवडायचं. सूर्याच्या पहिल्या किरणांनी वाळूवर रेघा मारायला सुरुवात केली कि त्याला आपसूक जाग यायची. त्यानंतर तो थोडा वेळ गच्चीवरच हात-पाय पसरून शरीराचे स्नायू मोकळे करून घ्यायचा. गच्चीवरून खाली उतरून त्याने हात-तोंड धुतलं आणि चबुतऱ्यावर बैठक मारली. सवयीप्रमाणे त्याने डोक्याला मुंडासं बांधलं आणि अंगावर बंडी चढवली. कमरेची लुंगी त्याने बदलली आणि शेवटी अंगावर गुढघ्याच्या जरा खाली जाणारा अंगरखा घातला. सूर्य आता क्षितीजाच्या रेघेपासून वर आला होता आणि सवयीप्रमाणे आग ओकायची तयारी करायला लागला होता.

घरचे बाकीचे लोक हळू हळू सकाळची आन्हिकं उरकायला लागले होते. बायकांनी कोळसे घालून चूल पेटवली आणि खापरीवर खारवलेले मासे भाजायला घेतले. उंटिणीचं दूध, मासे, खजूर अशी छान न्याहारी आल्यावर सगळे जण हातात मातीच्या थाळ्या घेऊन उकिडवे बसले आणि आपापला वाटा खायला सुरु केला. थोड्याच वेळात अब्रा ( अरबी पद्धतीची लाकडी होडी ) पाण्यात सोडून ते ४-५ पुरुष समुद्रात जाणार होते. त्यातले अनुभवी असलेले करीम, नसीम, तमिम खोल पाण्यात बुडी मारून मोतीशिंप हुडकण्यात पटाईत होते.उरलेले दोघे हळू हळू आपल्या वडिलांकडून आणि मोठ्या भावांकडून ती कला शिकत होते आणि त्याबरोबरच मासे पकडून घरच्या जेवणाची सोय करण्याचं अधिकच कामसुद्धा करत होते.

त्या दिवशी खोल बुडी मारूनही आणि बराचसा भाग धुंडाळूनही ना धड मोती मिळाले, ना मासे. उन्हं कलती झाल्यावर त्यांना दिवसभर केलेल्या मेहेनतीनंतर हाती काहीच ना आल्याची भावना अस्वस्थ करत होतील. करीम सारखा अल्लाहची करुणा भाकत बुडी मारत होता आणि रिकामा परत येत होता. शेवटी सूर्यास्तानंतर हात हलवत ते पाचीही जण परत आले. हातात छोट्या टोपलीत त्या दिवशीच्या संध्याकाळच्या जेवणात पुरतील इतकेच मासे बघून करीमची बायको तडकली. सगळ्यांना शिव्यांच्या लाखोल्या वाहत ते छोटे मासे तिने भाजायला घेतले. आजचा त्या पाची जणांचा रिकामा यायचा पंधरावा दिवस होता. त्यात इराणहून खास मोत्यांचे व्यापारी गावच्या सूकमध्ये ( बाजारात ) येणार असल्याची वर्दी गावाला मिळालेली होती, त्यामुळे जो तो आपल्या हातात जास्तीत जास्त मोती कसे दिसतील याच ध्यासाने रोज काम करत होता.

करीम बायकोची कटकट ऐकून कसाबसा जेवून छतावर गेला. हताश होऊन आकाशाकडे बघत त्याने अल्लाहला स्मरून दोन-चार आसव गाळली आणि बाजल्यावर अंग टाकलं. त्या दिवशी रात्र होऊनही त्याला झोप लागत नव्हती. अचानक काहीतरी अंगात संचारल्यासारखा तो उठला, पायात चामडी सपाता चढवल्या आणि थेट समुद्राकडे जायला लागला. रात्री सगळे सजीव झोपलेले असतात आणि म्हणून रात्रीच्या वेळी शिकार, मासेमारी किंवा शिंपले गोळा करणं निषिद्ध मानलं गेलं आहे, तरीही उद्वेगाने तो आज रात्री बाहेर पडला होता. त्याने आपली अब्रा पाण्यात ढकलली आणि एकटाच समुद्रात निघाला. अब्रा घालवा - दोन घालवा समुद्रात नेली ( घालवा - अंतर मोजायचा अरबी परिमाण ). नाकाला चिमटा लावला, कमरेला पखाल लावली, छोटी शिंपले गोळा करायची टोपली खांद्यावर डकवली आणि अल्लाहचा नाव घेऊन त्याने पाण्यात उडी मारली.

पाण्यात खोल गेल्यावर त्याने शिंपले धुंडाळायला सुरु केलं आणि त्याच्या नकळत त्याची पखाल एका कपारीत अडकली. भरून घेतलेला श्वास हळू हळू जायला लागला होता. झटापट करून कशीतरी स्वतःची सोडवणूक करावी म्हणून त्याने खूप हालचाल केली, आणि अखेर त्याच्या छातीत भरलेली हवा संपली.डोळ्यासमोर अंधारी आली. छातीत पाणी जायला लागलं आणि करीमने शेवटची हाक म्हणून अल्लाहकडे पुन्हा एकदा करुणा भाकली. शेवटी सगळं शांत झालं. शरीर तरंगायला लागलं आणि आजूबाजूच्या निजलेल्या प्राणीसृष्टीला पुढचे काही दिवस पुरेल इतकं अन्न आपोआप मिळून गेलं.

तोंडावर पाण्याचा हबका पडावा आणि गाढ झोपेतून जाग यावी अशी करीमला एकदम जाग आली. आपला मृत्यू झालाय आणि आपण आता अल्लाहच्या दरबारात आलो आहोत अशी त्याची खात्री पटली. आजूबाजूला बघून त्याने कोणी दिसतंय का याचा कानोसा घेतला. तितक्यात समोरून त्याला एक हिरव्या रंगाची, डोक्यावर रेशमी टोपी घातलेली आणि पायाच्या जागी नुसती शेपटी असलेली आकृती येताना दिसली. त्या आकृतीने करीमच्या जवळ येऊन त्याला आपल्याबरोबर यायला सांगितलं.

करीम आता एका वाळूच्या डोंगरावर बसलेला होता. ती आकृती त्याच्या बाजूला आली आणि तिने करीमला आपली ओळख दिली. ' मी अल्लाहने तुझ्या मदतीला पाठवलेला जीन आहे। तू अनेक वेळा पक्ष्यांना भाजलेले मासे खायला दिले आहेत, त्यामुळे तुला खूप पुण्य मिळालेल आहे. त्यामुळेच तू अल्लाची करुणा भाकली तेव्हा मला तुला समुद्रातून काढायची आज्ञा अल्लाहने केली.'

त्या जिन्नाने त्याला सांगितलं, 'तू माझ्याकडे ३ गोष्टी मागून घे. मी त्या देईन आणि निघून जाईन'

करीमला घरी जाऊन सगळ्यांना भेटायची उत्सुकता होती, त्यामुळे त्याने ' मला आधी घरी ने....' अशीं इच्छा व्यक्त केली. पुढच्याच क्षणाला ते घरच्या गच्चीवर होते. करीमने त्या जिन्नाला आपल्या कमरेच्या अत्तराच्या डबीत जाऊन बसायला सांगितलं. पुढच्या दोन इच्छा नंतर सांगेन असं त्याने जिन्नाला वचन दिलं. आता नेहेमीप्रमाणे पाहात झाली आणि घरच्या लोकांनी आपापली नेहेमीची कामं सुरु केली.बायकोने अहमद आणि बाकीच्या चारी मुलांना ' आज जर मोती आणले नाहीत, तर घरात येऊ नका' असं सज्जड दम देऊन घराबाहेर काढलं. आपल्या २ सुनांना तिने बकऱ्यांना चारापाणी द्यायला पिटाळलं आणि स्वतः घरामागे तयार केलेल्या पडवीत बांधून ठेवलेल्या आपल्या लाडक्या कुत्र्याला रात्रीचे उरलेले माशांचे तुकडे आणि हाडं द्यायला गेली.

करीम आपल्या अब्रा मध्ये चढला आणि मुलांना वल्ही सांभाळायची आज्ञा करून तो अब्राच्या खालच्या भागात उतरला. त्या जागेची उंची जेमतेम चार फूट असल्यामुळे उकिडवा होऊन तिथे जायला लागे. कोणीही आपल्याला बघत नाही, हे ताडून त्याने हळूच जिन्नाला डबीतून बाहेर काढलं. जिन्ना बाहेर आल्यावर त्याने करीमला दुसरी इच्छा विचारली आणि करीम म्हणाला, ' आज मी पाण्यात बुडी मारेन तेव्हा माझ्या टोपलीत आणि पिशवीत मोठे शिंपले येऊ दे, त्यातला एक एक मोती आकाशातल्या टपोऱ्या ताऱ्यासारखा तेजस्वी असू दे आणि तशा प्रत्येक मोत्याचं वजन गावातल्या कोणाच्याही मोत्यांपेक्षा जास्त असू दे'. जिन्नाने त्याला वरदान दिलं, आणि पुन्हा डबीत जाऊन तो पुढच्या इच्छेची वाट बघायला लागला.

त्या दिवशी १०० टपोरे दुर्मिळ काळे मोती, ८-१० मोठे मोठे मासे आणि टोपलीभर छोटे मासे इतकं सगळं घेऊन ते पाचीही जण दुपारीच घरी आले. बायकोने करीमच्या हातात ते सगळं बघितलं आणि ती हरखून गेली. ते मोती विकून त्यांना मोठा पक्का घर, २-३ उंट, भरपूर शेळ्या-मेंढ्या आणि कुत्रे घेता येणार होते.इराणी व्यापाऱ्यांकडून केशर आणि मसाले घेऊन चविष्ट जेवता येणार होतं. गावात करीमची ही माहिती वार्यासारखी पसरली आणि जो तो येऊन करीमचा अभिनंदन करू लागला. या सगळ्यात एकाच गोष्ट अनाकलनीय होती, ती म्हणजे घरच्या कुत्र्याचा अखंड भुंकणं आणि रडणं.करीमच्या बायकोने २-३ दिवसात ते असह्य होऊन आवडता कुत्रा गावात विकून टाकला आणि बदल्यात एक काळ्या रंगाचा खुनशी दिसणारा कुत्रा घरी आणला.

पुढच्या २-३ आठवड्यात सौदे होऊन करीम आणि त्याचं कुटुंब गावातल्या मोठ्या घरात राहायला गेलं. घरात मातीची भांडी जाऊन धातूची भांडी आली. रोज गावाच्या खाटकाकडून एक अक्खा बकरा भोजनाला घरी येऊ लागला. करीमच्या बायकोने धाकट्या दोन मुलांची थाटामाटात लग्न लावून दिली आणि स्वतः घरात राणीसारखी राहून इतरांना ती कामं करायचा फर्मान सोडायला लागली.

एके दिवशी लाडाने तिने करीमला बाजूला बसवला, भरपूर फळं आणि दूध त्याच्यासमोर ठेवलं आणि हळूच मनातलं कुतूहल त्याच्याकडे बोलून दाखवलं.' आजपर्यंत कोणालाच मिळालं नाही इतकं मोठं घबाड आपल्याला कसा मिळालं?' करीमने भोळसटपणाने सगळी कहाणी तिला ऐकवली. ऐकून म्हातारीचे डोळे लुकलुकले, मनाला पुढच्या वैभवाची चाहूल लागली आणि तिने करीम झोपल्यावर ती डबी हळूच काढून घेऊन घराबाहेर पोबारा केला.एका शांत जागी खडकावर बसून तिने डबी उघडली आणि जिन्ना तिच्यासमोर आला. हरखून जात तिने जिन्नाला आपली ओळख दिली आणि करीमने शेवटची इच्छा सांगायची जबाबदारी आपल्याला दिली असल्याची थाप ठोकून दिली.

' सांग, काय हवाय तुला?' जिन्नाने प्रश्न केला.

' माझा नवरा जिथे आहे, त्याच्या आजूबाजूची परासंगभर (१ परासंग = साडेपाच किलोमीटर ) जागा आमच्या मालकीची व्हावी आणि मी, माझी मुलं , त्यांची बायका-पोरं आणि नवरा - आम्ही सगळे तिथले सम्राट होवोत.'

क्षणार्धात वीज चमकली आणि समुद्राच्या तळाशी नवऱ्याच्या कलेवराच्या बाजूला ती म्हातारी अख्या कुटुंबासहित पोचली आणि पाण्यामुळे श्वास अडकून ओरडायचा प्रयत्न करायला लागली. मुलंबाळं आणि इतर मंडळी अकस्मात हे काय झाल म्हणून भांबावली आणि पाण्यात असल्यामुळे काहीही बोलता न येत असल्यामुळे बावचळली. पुढच्या पाच मिनिटात सगळ्यांचे बुडलेले मृतदेह कुठे कुठे अडकून तरंगायला लागले आणि आजूबाजूच्या मोठ्या परिसरात असलेले सगळे सजीव क्षणार्धात नाहीसे झाले.

तो जीन अल्लाहने नाही, तर सैतानाने पाठवला होता. सैतानाच्या दुसऱ्या एका जीनने करीमच्या शरीरात प्रवेश करून त्याच्या आत्म्याचा ताबा मिळवत त्या घरात पाय ठेवला होता. रात्री झोपलेल्या शिंपल्यांना त्रास द्यायचं पातक करीमकडून घडलं होता आणि त्याचमुळे त्याला आणि त्याच्या घरच्यांना शिक्षा मिळावी म्हणून शिंपल्यांच्या राजाने सैतानाच्या जीनांची मदत मागितली होती. घरच्या कुत्र्याला या सगळ्याचा सुगावा लागल्यामुळे त्याने भुंकायला सुरु केल्यावर करीमच्या बायकोची मती भ्रष्ट करून सैतानाने आपला कुत्रा पाठवला होता. त्या कुत्र्याला करीमचं कुटुंब नष्ट झाल्यावर त्याच्या घरायल्या सगळ्या शेळ्या, मेंढ्या आणि बकऱ्या मेजवानीला मिळणार होत्या.

सकाळी गाव जागं झाल्यावर करीमचं घर रिकामं दिसल्यामुळे सगळीकडे हाहाक्कार उडाला. गावकऱ्यांनी शोधाशोध केली, नंतर तो नाद सोडला. जे जे लोक त्या घरात जाऊन काहीबाही लुटून घेऊन आले त्यांच्या घरातले लोक सुद्धा असेच नाहीसे झाले. शेवटी समुद्रात काहीही मिळत नाही आणि गावात असे प्रकार या सगळ्या कारणांनी ते गाव ओसाड पडलं. आज सुद्धा त्या गावाकडे जो जातो, त्याला वेशीवर एक काळा कुत्रा तोंडात बकरीचं पिल्लू घेऊन उभा दिसतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून जो त्या गावात पाऊल ठेवतो, तो नाहीसा होतो.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.

https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/