चिठ्ठी भाग 7

Submitted by चिन्नु on 5 January, 2020 - 06:26

चिठ्ठी भाग 6:
https://www.maayboli.com/node/72947

आकाशात चंद्र उगवला होता. जरासे थंडच होते वातावरण. अनु सैरावैरा धावतच होता. तो थेट सूटबूट काकांच्या घरासमोर आला आणि त्याच्या पायालगतचे काल्पनिक ब्रेक दाबल्यासारखं करून तो थांबला.
त्यानं हळूच कानोसा घेतला. बाहेर कुणीच नव्हतं. आतून संथ स्वरातली धुन ऐकायला येत होती. तो आत जायचं की नाही या संभ्रमात असतांनाच त्याला काही आवाज ऐकायला आले. कुणीतरी बोलत होतं. पण नक्की काय ते कळत नव्हतं. मग दुसरा आवाज कानी पडला. तो ऐकताच अनु झटकन गेटच्या बाजूला झाला आणि भिंतीशी लपला.
तो चिंगीच्या वडीलांचा आवाज होता. अनुने आत जायचं रद्द केलं. एवढ्या वेळातही त्याने वरचा खिसा गच्च धरून ठेवला होता. त्याने खिशातून घडी केलेला कागद काढला. आत भिरकावयाची action केली. पण गेटबाहेरून किंवा समोरच्या भिंतीवरून कितीही जोरात फेकलं तरी तो कागद काही आत पोहोचणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्याने आजुबाजुला पाहिलं. त्याला काटक्यांमध्ये एक जरा लांब काडी दिसली. ती दिसताच अनुला आनंद झाला. त्याने बाजूला पसरलेल्या मायाळूच्या वेलीला ओढून काढले. हातातला कागद नीट त्या वेलीच्या टोकाला बांधून ती वेल एका बाजूने काडीला बांधून लटकावली. आता ती काडी भिंतीवरून आत घातली. त्याच्या अंदाजानुसार ती वेल आणि चिठ्ठी आतल्या बाजूला लटकू लागली.
आतून सुटबूट काका आणि चिंगीचे वडील बोलत बोलत बाहेर आले. त्यांच्या मागे एक मोठी बाहुली काखेत मिरवत परीदेखील बाहेर आली. अनुला आता घोडामैदान जवळ दिसू लागलं. तो हातातली काडी घेऊन भिंतीच्या बाहेरून परीच्या दिशेने सरकू लागला.
परीची मात्र भिंतीला पाठ होती. शिवाय मध्ये असलेली हिरवळ. त्यामुळे परीला तो किंवा काडी दिसणं कठीणच होतं जरा. तरी अनुने काडीला हेलकावे देऊन पाहिले. पण कुणाचंच तिकडे लक्ष गेलं नाही.
"परीबेटा, आप अंदर जाओ. यहाॅ ठंड है बहोत"
"अच्छा अंकल", असं म्हणत परी आत जाऊ लागली. अनुने दात ओठ खाऊन काडी हलवली. त्याची उंची बरोबर त्या तात्पुरत्या भिंतीएवढी असल्यामुळे त्याला काडी हलवतांना दम लागला व तो थांबला. पुढच्याच क्षणी त्यानं बाजूचा दगड धरून परीच्या बाजूच्या भिंतीकडे भिरकावला. पण..पण परी आत निघून गेली होती.
कट्कन आवाज आला तसं चिंगीचे वडील ओरडत भिंतीकडे आले.
"कोण आहे तिकडे"
अनुची पार बोबडी वळली आणि त्याच्या हातातून काडी निसटून आत पडली. वेल चिंगीच्या वडीलांच्या वहाणात अडकला व त्यांचा तोल गेला. ते आपटणार होते पण त्यांना भिंतीचा आधार मिळाला व ते तसेच दोन्ही हात भिंतीवर टेकून उभे राहिले. त्यांनी वहाण जोरात आपटली. ती वेल तुटली व काडीच्या वरच्या भागाबरोबर विलग होऊन हिरवळीत भिरकावली गेली. तोपर्यंत सुटबूट काका त्यांच्या जवळ धावत आले.
"अरे अरे! आपको लगी तो नही?", त्यांनी विचारलं.
चिंगीच्या वडीलांनी नकारार्थी मान हलवली आणि वहाणात अडकलेली काडी काढून त्वेषाने बाहेर फेकली.
अनु तिथंच खाली थरथरत बसला होता. काडी बरोबर त्याच्या बाजूला येऊन पडली तसा तो धुम पळत सुटला.
शोभाताईंचं गेट ओलांडून तो सुसाट धावत आतमध्ये आला. घामाने पार निथळत होता तो. त्याने आतल्या दिशेने पाहिलं. मुग्धा ताई कुठलंसं भजन गात होती. तो ओट्याजवळच्या पायरीवर बसला.
मग त्याला त्याने तुळशीकडे ठेवलेल्या कागदांची आठवण झाली. तो उठून तुळशीकडे गेला. त्याने हळूच दगड बाजूला करत खालचे कागद झटकले. तसं त्याचं लक्ष रांगोळीत ठेवलेल्या कागदाकडे गेलं. चंद्राच्या प्रकाशात तो कागद लख्ख दिसत होता. मंद वार्यामुळे हळूहळू फडफडत होता. त्याने त्या चिठ्ठीकडे पाहिलं आणि काय आश्चर्य! त्या चिठ्ठीचं कबुतरात रूपांतर झालं आणि ते कबुतर त्याच्या हातातल्या इतर कागदांवर येऊन बसलं. आता ते उडून जाईल की काय या भीतीने तो हळूहळू दबकत दबकत ओट्यापाशी आला. ते कबूतर त्याच्याकडे टक लावून पाहत होतं की त्याला भास झाला! बघता बघता अनु पायर्यांवर कोसळला!

चिठ्ठी भाग 8 - https://www.maayboli.com/node/73169

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिन्नू, मस्त लिहित आहेस. खट्याळ अनु अगदी छान उभा राहतो डोळ्यापुढे. आता पुढे काय याची उत्सुकता...

खूप खूप खूप धन्यवाद मामी. तुमच्या प्रोत्साहनामुळे अजून छान लिहावंसं वाटतं _//\\_
पुढचा भाग लवकरच Happy