चिठ्ठी भाग 6

Submitted by चिन्नु on 4 January, 2020 - 21:26

चिठ्ठी भाग 5: https://www.maayboli.com/node/72891

"सुमाताई! "
नीलू अनुला सायकलवर घेऊन आली होती. तिला पाहून सुमाला आश्चर्य वाटले.
"अगं बाई, तुला सोडायला लावलं होय यानी. काय रे अनु?"
अनुने सायकल वरून खाली उडी मारली. काही कळायच्या आत हातात काहीतरी सावरत 'काकुआज्जी!' असं म्हणत समोर पळाला. सुमा आणि नीलू 'अरे सावकाश..' असं म्हणतच राहिल्या.
"बघा ना ताई. मी त्याला वाण्याकडून वहीपेन आणायला सांगितले. ते आणल्यावर माझ्या जुन्या वहीतली कोरी पाने घेतली आणि मला घरी सोड म्हणून मागंच लागला. मला बाहेर जायचा कंटाळा आला म्हणून सांगूनही ऐकत नव्हता. म्हणे पोलीसताई आहेस तू म्हणून मला सोडलंच पाहिजे!", नीलू फणकारून म्हणाली.
"वांड आहे गं. ऐकत नाही अजिबात. बरं तू जेवलीस का? मेथीची फळं केलीत. तुला आवडतात ना?"
"मला न डब्यातच घालून द्या थोडं. आताच अनु आणि मी आईने केलेला शिरा चापून आलोय. आता नाही थांबत. थोडा अभ्यास करते घरी जाऊन"
सुमानं दिलेला डबा घेऊन नीलू निघाली सायकल घेऊन. जाता जाता सहज तिने शोभाताईंच्या घराकडे पाहिलं. तुळशीकडे लावलेल्या दिव्याचा प्रकाश पसरला होता. तिथंच अंगणात बसून अनु कोर्या कागदांवर काहीतरी लिहत होता. ती कौतुकाने हसून मार्गाला लागली.

अनु कागदपेन्सिल घेऊन पळतच आला होता. तुळशीकडे दिवा पाहून तो थबकला.
'काकुआज्जी आणि मुग्धा ताई पोथी वाचायला बसले असतील. आपण इथंच अंगणात बसून काम फत्ते करू '-असा विचार करत त्याने तुळशीसमोर बसकण मारली आणि कागदं बाहेर काढली.
'काय म्हणाली बरं मुग्धा ताई, कशी चिठ्ठी लिहायची बरं', अनु विचार करत होता.
'काकुआज्जी म्हणतात तसं पहिली चिठ्ठी देवबाप्पाला लिहू या!'
अनुने तुळशीला नमस्कार केला आणि कागदावर श्री काढला. त्याला खरंतर श्रीगणेशाय नमः किंवा गजानन प्रसन्न असंच काही लिहायचं होतं पण एवढं सगळं कोण लिहिणार!
आता देवबाप्पाला काय लिहायचं बरं? बाप्पाला तर सगळं काही ठाऊक असतं. काय काय घडतं ते सर्व. मग अजून काय लिहिणार? तेच लिहू या. देवबाप्पा इकडे काय काय घडत आहे' - अनुच्या विचारांची गाडी भरधाव चालली होती.
'उम्म्म.. देवबाप्पाला हिंदी येत असेल काय? सूटबूट काकांसारखं?', असा विचार येताच थबकला अनु. त्यानं पटकन काहीतरी लिहिलं आणि त्या खाली स्वतःकडे निर्देश करणारा बाण काढला. एकदा त्या कागदाकडे डोळे भरून पाहिलं त्याने. मग त्याची घडी केली व तुळशीच्या समोरच्या रांगोळीत ठेवून त्याने नमस्कार केला.
अनुला लिहायला अजिबात आवडत नसे. तो नुकताच पहिलीत गेला असला तरी शोभाताईंनी त्याला थोडंफार शिकवायचा प्रयत्न केला. कितीही प्रयत्न केले तरी त्याचं अक्षर मात्र त्या नीट गिरवून घेऊ शकल्या नाहीत. फार कंटाळा करायचा तो. तेवढं एक सोडलं तर अनु हुशार होता अभ्यासात. त्याच्या सर्व शिक्षकांची गाडी त्याच्या लेखनावर अडायची. कितीदा सांगितले अक्षर सुधारायला तरी एका जागी बसून लिहिणार तो अनु कसला!
पण आज गोष्ट वेगळी होती. आज त्याला चिठ्ठी लिहायची होतीच. चिठ्ठी की चिठ्ठ्या? कारण एकापाठोपाठ एक करत त्याने 3-4 कागदांवर खरडले होते. काहीतरी विचार करून तो पटकन उठला. हातातल्या कागदांपैकी एका कागदाची नीट घडी केली. ती वरच्या खिशात ठेवली. इतर कागदं तिथं तुळशी वृंदावनाच्या कडेला ठेवून त्यावर एक दगड ठेवला वजन म्हणून आणि धावत सुटला.
चिठ्ठी भाग 7: https://www.maayboli.com/node/72952

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सोना Happy
नौटंकी आणि सोना, आधी रेसिपीचा धागा काढून पोस्ट करणार होते, पण फार काही मोठी process नसल्यामुळे इथंच लिहितेय-
मेथीची फळं-
काही मेथीची पानं, लसूण, हिंग, मिरची, फोडणीसाठी तेल, 2 वाटी पाणी, तयार पोळी किंवा न भाजलेल्या चपातीच्या पट्ट्या कापून, मीठ
गॅसवर कढई तापत ठेवा. तेल घालून फोडणी करावी. त्यात हिंग, लसणाचे तुकडे, मिरची चुरडून घालावी. जीरंमोहरी वगैरे आवडत असल्यास घालावे. थोडं परतायचं. लसूण लाल झाली की मेथीची भाजी घालून परतावे. पाणी घालून उकळू द्यावे. त्यात मीठ घालावे. तयार पोळीचे तुकडे घातल्यास थोड्या वेळाने गॅस बंद करा. न भाजलेल्या चपातीचे असतील तर ते शिजवून घेऊन गॅस बंद करा. गरमागरम ओरपा. थोडं तेल किंवा तूप तसंच कोथिंबीर बारीक चिरून सजवता येईल.

धन्यवाद नौटंकी. नक्की करून बघा. नुसते पाणी करून भाकरीबरोबरही मस्त लागते. लिंबू पिळला तर सूपच! Happy
कथेतील वर्णन वाचून तुम्हाला रेसिपी मागावीशी वाटली याचाही आनंद झाला!