कळावे, लोभ असावा...

Submitted by कुमार१ on 30 September, 2019 - 05:15

सुमारे ३५ वर्षांपूर्वीचा काळ. संगणकाशी माझा अद्याप परिचय झालेला नव्हता. मोबाईल फोन तर तेव्हा स्वप्नातही नव्हते. तेव्हा संदेशवहनासाठी दोन मुख्य साधनांचा वापर प्रचलित होता – एक स्थिर-फोन आणि दुसरे पत्र. फोनचे दर हे आजच्यासारखे किरकोळ नव्हते. त्यामुळे फोनचा वापर विचारपूर्वक आणि मर्यादित असे. परदेशी फोन तर फक्त अत्यावश्यक किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत केले जात. पत्रलेखन विविध कामांसाठी बरेच होई, जसे की व्यक्तिगत, कार्यालयीन, विविध आमंत्रणे, जाहिराती, पत्रमैत्री, इ. महाविद्यालयीन जीवनात मी माझ्या परगावी आणि परदेशात असलेल्या आप्तस्वकीयांना हटकून पत्रे लिहीत असे. अशीच पत्रे लिहीता लिहीता मला त्या लेखनाची गोडी लागली. हे लेखन मी आवडीने आणि अगदी भान हरपून करीत असे. तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे माझी पत्रे प्राप्तकर्त्या व्यक्तींना आवडत असत. त्यांपैकी काही तसे पत्रोत्तरातून कळवत तर काही समक्ष भेटल्यावर सांगत. अशा प्रोत्साहनातून माझी ती आवड वाढतच गेली आणि तो आयुष्यातील एक छंद झाला.

post card.jpg

सुरवातीचे पत्रलेखन हे आप्तस्वकीयांपुरते मर्यादित होते. पुढे वृत्तपत्रांतून पत्रलेखन चालू केले. तरीसुद्धा या लेखनाची भूक अजून भागत नसे ! मग त्याची व्याप्ती वाढवू लागलो. त्या काळी छापील पुस्तकांचे वाचन बऱ्यापैकी असे. त्यात अभ्यासाची पुस्तके आणि साहित्य या दोन्हींचा समावेश होता. अभ्यासाच्या पुस्तकात काही वेळेस मुद्रणदोष तर कधी घोडचूका सापडत. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. ते पाहून मी बेचैन होई. मग नुसते स्वस्थ न बसता संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवू लागलो. परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत.

साहित्यवाचन करता करता काही विशिष्ट लेखक जास्त आवडू लागले. मग त्यांची पुस्तके वाचल्यावर त्यांना पत्राने अभिप्राय कळवू लागलो. सुरवातीस फक्त ‘पुस्तक खूप आवडले’ असे कळवत असे. पण हळूहळू त्यातल्या काही नावडल्या गोष्टींबद्दलही लिहू लागलो. माझ्या पत्रांना काहींची उत्तरे येत तर काहींची नाही. नमुन्यादाखल काही लेखकांचा उल्लेख करतो. रणजित देसाईना ‘राधेय’ आवडल्याचे कळवले होते. त्यांनी सामान्य वाचकांना उत्तरांसाठी स्वतःचे नाव-पत्ता छापलेली पोस्टकार्डे तयार ठेवलेली होती. त्यावरील त्यांच्या हस्ताक्षरातील चार ओळीदेखील बहुधा ठराविक असाव्यात. पण तरीही, “आपल्यासारख्या जाणकार वाचकांची पत्रे लेखकाला नेहमीच समाधान देतात”, हा मजकूर त्या वयात मला नक्कीच सुखावून गेला.

सुनीता देशपांडेंचे पत्रोत्तर चक्क मजेशीर होते. तेव्हा त्यांचे ‘आहे मनोहर तरी’ वाजतगाजत होते. मी अगदी मन लावून वाचले होते ते. पुस्तकातल्या महत्वाच्या विषयाखेरीज त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत सवयी, आवडी वगैरेबद्दलही काही लिहीले होते. घरी केलेल्या ताकावरील लोण्यापासून जास्तीत जास्त तूप काढण्यात त्यांचा हातखंडा आहे, असे त्यांनी लिहीले होते. त्यावर माझे कुतूहल चाळवले गेले कारण माझेही ते आवडीचे काम होते. मग काय, उचलले पेन आणि त्यांना “सांगा बरं, तुमची जादू काय आहे”, अशा आशयाचे पत्र लिहीले. नंतर विसरूनही गेलो होतो. त्यांच्या या पुस्तकासंदर्भात त्यांना बऱ्याच पुलं-भक्तांची खरमरीत पत्रे (आणि पुस्तक आवडल्याची देखील) त्याकाळी गेलेली होती. त्या पुस्तकावर अनेक चर्चा व परिसंवाद घडत होते. तेव्हा माझ्या या क्षुल्लक पत्राची त्या दखलच घेणार नाहीत असा माझा अंदाज होता. किंबहुना आपण तो ‘पुलं’ विषय सोडून काहीतरी वेगळे लिहावे हा माझा उद्देश होता. पण काही दिवसांनी त्यांचे उत्तर आले. माझे पत्र वाचल्यावर त्यांना क्षणभर हसू आले होते. पुढे पत्रात त्यांनी, त्यांची तुपाबद्दलची पद्धत पत्रातून नाही सांगता येणार पण प्रत्यक्ष भेटीत प्रात्यक्षिक जरूर दाखवेन, असे लिहीले होते.

हमो मराठेंच्या काही कादंबऱ्यात पात्रांच्या संवादांत इंग्रजी वाक्यांचा अतिरेक झालेला होता. शेवटी मी वैतागून त्यांना लिहीले की मराठी पुस्तकात हे जरा अतिच होतंय. याची दखल घेणारे त्यांचे उत्तर आले. त्यांनी स्पष्टीकरण असे दिले होते. आपण सगळे उच्चशिक्षित सध्या ‘हिंग्लिश/ मिंग्लिश/ इंग्राठी/ मिंदी’ अशा प्रकारची भेसळ भाषाच बोलत आहोत. त्यामुळे कादंबरीतील पात्रेही तशीच बोलणार !

माझ्या या साहित्यिक पत्रव्यवहारात वपु काळेंचा अनुभव अनोखा आहे. त्यांच्या लेखन कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यातील एक पुस्तक वाचले होते. त्याचे नाव आता आठवत नाही. त्या पुस्तकात शुद्धलेखनाच्या असंख्य चुका झाल्या होत्या. त्या पाहून मी खूप अस्वस्थ झालो. एखाद्या नामवंत लेखकाच्या पुस्तकातील अशा चुकांमुळे लेखकाची प्रतिमा डागाळली जाते. त्या चुका नक्कीच लेखकाच्या नसून मुद्रितशोधनातील दुर्लक्षामुळे झाल्या असणार याची मला खात्री होती. आता वपुंना लिहू का नको या संभ्रमात होतो. पण त्या आधी त्यांचे ‘प्लेझर बॉक्स’ पुस्तक वाचले होते. त्यात त्यांनी सुमारे पन्नास हजार वाचकांच्या पत्रांना स्वहस्ताक्षरात उत्तरे लिहिल्याचे नमूद केले होते. मग अजून काय पाहिजे ? म्हटलं, आपणही लिहायचे बिनधास्त. बघू काय होतंय ते. मग एक अंतर्देशीय पत्र त्यांना लिहीले. “अशा गोष्टी प्रकाशकांना लिहून फारसा उपयोग होत नाही, असा अनुभव आहे. मात्र लेखक अधिक संवेदनशील असल्याने तुम्हाला हे कळवत आहे”, असे मी लिहीले. त्यावर सुमारे ३-४ महिने गेले. काही उत्तर नव्हते. म्हटलं ठीक आहे. वयोपरत्वे ते आता थकले असतील. मला पत्रोत्तर आले नाही पण पुढे एक सुखद प्रसंग घडणार होता. एव्हाना मी त्या पत्राबद्दल विसरूनही गेलो होतो. अशात एका रविवारी सकाळी बायकोशी निवांत गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात घराची बेल वाजली. दार उघडून पाहतो तर समोर एक अनोळखी गृहस्थ. त्यांना आत बोलावले. त्यांनी लगेच खुलासा केला. त्यांच्या पिशवीतून एक पुस्तक काढून ते म्हणाले, “ मी मुंबईहून आलोय, मला वपुंनी पाठवलंय. तुमच्यासाठी हे पुस्तक भेट दिले आहे त्यांनी”. ते पुस्तक होते ‘चिअर्स’. त्याच्या पहिल्या पानावर खुद्द वपुंची लफ्फेदार सुंदर स्वाक्षरी आणि ‘प्रेमादरपूर्वक’ असा उल्लेख ! तेव्हा मला झालेला आनंद काय सांगू? हे त्यांचे एक जुने पुस्तक होते. त्याचा माझ्या पत्रातील पुस्तकाशी काही संबंध नव्हता. मग ते गृहस्थ मला म्हणाले, “ तुमची तक्रार वपुंनी प्रकाशकाला कळवली आहे. तुमच्या पत्रात जर तुमचा फोन क्रमांक असता तर वपुंना तुमच्याशी बोलायची इच्छा होती”. असा हा आगळावेगळा आणि सुखद अनुभव.

काही लेखकांनी पत्रोत्तर देण्यासाठी लेखनिक ठेवलेले होते. हे मी कसे ओळखले ते सांगतो. त्यांच्या पत्रातील मजकूर अगदी सुवाच्य आणि नीटनेटका दिसे आणि त्याखाली असलेली लेखकाची सही अगदी वेगळ्या धाटणीत आणि स्पष्टपणे वेगळ्या शाईत केलेली दिसे. अरुण साधूंचे असे एक पत्र माझ्याकडे आहे.

अशा छान अनुभवांतून पत्रलेखनाची नशा वाढतच जाई. मग या यादीत उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, संपादक, उद्योगपती, काही सत्कारमूर्ती यांचीही भर पडली. त्या सर्वांचीच उत्तरे येत नसत पण त्यांना लिहीण्याचा आनंद काही औरच असे. उद्योगपतींत राहुल बजाज आणि फिरोदिया यांचे अनुभव सुखद आहेत. त्या काळी मी बजाज-चेतक ही स्कूटर वापरत होतो. ती वापरणाऱ्या लोकांना साधारण जे मायलेज मिळे त्याच्यापेक्षा तब्बल २० किमी मला जास्त मिळत होते. ‘टू- स्ट्रोक’च्या जमान्यात हे एक भलतेच नवल होते. खूप मित्रांना त्याचे आश्चर्य वाटे. एकाने तर माझ्याशी त्यावर चक्क पैज लावली होती आणि प्रात्यक्षिक झाल्यावर तो ती हरला होता ! मग काय, माझे हात शिवशिवू लागले आणि लिहीले पत्र बजाज यांना. पत्ता जरी कंपनीचा घातला होता तरी ते त्यांना नावाने लिहीले होते. पत्रात अर्थातच त्यांचे कौतुक आणि मी या अतिरिक्त मायलेजवर जाम खूष असल्याचा मजकूर. तसेच एखादीच स्कूटर असा अत्युत्तम अनुभव कसा देऊ शकते, याचे स्पष्टीकरणही मी विचारले होते. पंधरवड्यातच त्यांचे सुरेख उत्तर आले. इलेक्ट्रोनिक टाईपरायटरवर टाईप केलेलं. त्याकाळी सरकारी आणि सामन्य टंकलेखन साध्या टाईपरायटरवर होत असे. मोठ्या खाजगी उद्योगांची पत्रे नुकतीच इलेक्ट्रॉनिक यंत्रावर येऊ लागली होती आणि ते टंकलेखन पाहणे हेही डोळ्यांना सुखद वाटे ! बजाज यांच्या त्या उत्तरापाठोपाठ त्यांच्या तांत्रिक व्यवस्थापकाचेही मायलेजचे स्पष्टीकरण देणारे वेगळे पत्र आले – ते मात्र साध्या टाईपरायटरवर टंकलेले होते.

फिरोदियांचा अनुभव जरा वेगळ्या प्रकारचा आहे. त्या काळी ‘कायनेटिक’ची एक दुचाकी खूपच गंडली होती. ती गाडी खरेदीच्या पहिल्याच वर्षात सतत दुरुस्त्या काढी. मुख्य म्हणजे ती सुरु होतानाच रुसायची ! त्यांच्या सेंटरला खेटे मारून जाम वैताग आला होता. तिथल्या ‘अधल्यामधल्यांना’ भेटून काही उपयोग झाला नाही. मग सरळ कंपनी मालकांनाच सविस्तर पत्र लिहून आता ‘दुसरी नवी गाडीच बदलून द्या’ असे लिहीले. त्यावर उत्तर नाही आले पण तीनच दिवसात कंपनीचा एक अभियंता आमच्या दारात हजर ! मग त्यांनी ती गाडी थेट त्यांच्या कारखान्यात नेली व दुरुस्त करून शून्य बिलासह यथावकाश घरपोच केली. अर्थात नंतर ते मॉडेलच कंपनीने बंद केले. उद्योग जगतात कागदी घोड्यांपेक्षा तातडीच्या कृतीला किती महत्व असते, हे या प्रसंगातून दिसून आले.

मराठीतून दीर्घ पत्रलेखन करतानाचा एक विशेष अनुभव नोंदवतो. त्या काळी लेखनासाठी बॉलपेन आणि फौंटनपेन असे दोन्ही पर्याय प्रचलित होते. जातिवंत लेखक फौंटनपेन वापरत. आपण जर का बराच मोठा मराठी मजकूर बॉलपेनने लिहिला तर बोटे दुखून येत. इंग्रजी मजकूर लिहिताना मात्र ती तेवढी दुखत नसत. याचे कारण म्हणजे देवनागरी अक्षरांना बऱ्यापैकी गोलाई असते. याचा अनुभव घेतल्यावर मराठी लेखन कटाक्षाने फौंटनपेनने करू लागलो.

पत्रलेखनातील अजून एक मुद्दा सांगतो. मी जेव्हा पत्र लिही तेव्हा त्यावर वरच्या कोपऱ्यात दिनांक घालायचे हमखास विसरत असे. एकदा मी 'सकाळ' च्या तत्कालीन संपादकांना एक तक्रारपत्र लिहीले होते. त्याचे उत्तर देताना त्यांनी “तुमचे (दिनांक नसलेले) पत्र मिळाले..” अशी सुरवात केली होती. त्यानंतर दिनांक हटकून लिहायची मला सवय लागली.

असेच पत्रलेखन जोशात चालू होते. मग एकदा असे वाचनात आले की देशातला कोणीही नागरिक थेट पंतप्रधानांना पत्र लिहू शकतो आणि त्याची दखल घेण्याची यंत्रणा असते. म्हटलं, चला आता ही पण हौस पुरी करू. तत्कालीन पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. मग त्यांना लिहीले एक कौतुकाचे पत्र. मनाशी विचार असा केला. जर आपण तक्रारीचे पत्र लिहीले तर त्यांचे सचिव स्वतःच्या पातळीवरच त्याला केराची टोपली दाखवतील ! त्यापेक्षा कौतुकाचेच लिहा ना, म्हणजे बहुतेक ते सचिवांच्या चाळणीतून पुढे सरकेल आणि योग्य त्या टेबलावर पोहोचेल. बस्स, माझ्याकडून मी ते टपालपेटीत टाकले खरे. पुढे ते पोचले की नाही, पोचले असल्यास चाळणीतून पुढे सरकले का टोपलीत गेले हे कळण्यास काही मार्ग नाही.

सन २००० उलटले आणि हळूहळू आपल्याकडे संगणकाचा वापर वाढू लागला. त्याचबरोबर हाताने पत्र लिहिण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागले आणि आजची परिस्थिती तर आपण जाणतोच. संगणकाच्या सुरवातीच्या दिवसात ‘इ-मेल’ चे कौतुक आणि अप्रूप होते. त्यामुळे त्या माध्यमातून पत्रलेखन करीत राहिलो. विशेषतः परदेशी पत्रव्यवहारासाठी ते फारच स्वस्त आणि मस्त माध्यम होते. पत्रकार आणि लेखक अशोक जैन यांची मला आलेली एक इ-मेल संस्मरणीय आहे.

अजून एक मुद्दा नमूद करतो. हस्तलेखनात एकाच हाताच्या तीन बोटांना खूप ताण येतो. संगणकलेखनात तो ताण दहा बोटांमध्ये विभागता येतो, हा फायदा नक्कीच महत्वाचा.
गेल्या ५ वर्षांत मात्र या छंदाला ओहोटी लागली आहे. ऐन तारुण्यात आपण जोशपूर्ण असतो. तेव्हा मी पाठवविलेल्या पत्रांपैकी निम्म्यांना जरी उत्तरे आली तरी मी खूष असे. इ-माध्यमांचा प्रसार वाढल्यावर वास्तविक पत्रोत्तर देणे हे सोपे झाले होते. पण व्यक्तिगत अनुभव मला तरी उलटाच येऊ लागला. उत्तराचे प्रमाण जुन्या जमान्यापेक्षा काहीसे कमीच होऊ लागले. तक्रार किंवा शंका विचारली असताही पत्राकडे दुर्लक्ष होऊ लागले. तेव्हा आता हौसेच्या पत्रलेखनाला मुरड घालावी हे बरे. उत्तर न आल्याने होणारा विरस आता अधिक जाणवतो. तेव्हा उगाचच आपणहून (कुठलेही व्यावहारिक काम नसताना) लिहिणे टाळलेले बरे, ही भावना बळावली आहे. एखादे वेळीस जर पत्र लिहिण्याची उर्मी आली तरी “जाऊदे, मरूदे, बास झाल्या लष्कराच्या भाकऱ्या”, असे म्हणणारे दुसरे मन वरचढ होत आहे. कालानुरूप आपण बदलत राहावे हे बरेच. लिखित जमान्यात आलेली पत्रोत्तरे मात्र व्यवस्थित जपून ठेवली आहेत. ती जाडजूड फाईल अधूनमधून चाळणे हे सुरेख स्मरणरंजन असते खरे ! ती चाळतानाच हा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली.
.......
हे होते माझे अनुभवकथन. तुमचेही असे काही अनुभव असल्यास जरूर लिहा. वाचण्यास उत्सुक.
*********************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुमार जी. छान लेख. पोस्ट कार्ड पाहिल्यावर बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. पत्र लेखन खरोखरीच माणसांना जोडणारी कला आणि पूर्वी असलेली यशाची गुरकिल्ली आहे होय. आता संपर्कव्यवस्थेतील क्रांतीमुळे पत्रलेखनाचे महत्व थोडे कमी झालेले दिसते .
माझी पण पत्रे मित्रांना खूप आवडायची.पण तुमच्यासारखा या कलेचा छान सदुपयोग करून घेण्याचे डोक्यात नाही आले. Happy

सुंदर लेख. मला सुद्धा सई परांजपे, आणि अजून एक दोन मोठ्या लेखकांची माझ्या मेलला उत्तरं मेलवर आली होती. मी माझ्या कौतुकासाठी लोकांना सांगत सुटलो. तर एका जळकुट्यानं " या लोकांना वेळ नसतो, त्यांच्या हाताखालील लोकं उत्तर देतात" अशी मल्लीनाथी करून माझ्या आनंदात मिठाचा खडा टाकला.

मस्त खुसखुशीत लिहिले आहे. आवडले.
इमेल्सच्या जमान्यात उत्तरे यायची कमी झाली याचे एक कारण खूप इमेल्समध्ये काही इमेल्स बघून जायच्या राहून जात असाव्यात हे असेल.

आधी फोन नव्हते तेव्हा गावी दर महिन्याला दोन्ही आजोळी पत्र लिहून इथल्या आम्हा सर्वांची खुशाली कळवायची जबाबदारी माझया गळ्यात होती. मी साधारण एकाच मजकुराची पत्रे दर महिन्याला पाठवीत असे त्याची आठवण झाली.

पत्रलेखनातील एक गमतीदार किस्सा माझ्या एका कलीगने मला सांगितलेला. ब्रिटिश माणसाने चालवलेल्या एका शाळेतल्या हॉस्टेलमध्ये त्याचे बालपण गेले. शाळेतील बराच स्टाफ व प्रिन्सिपल ब्रिटिश होते. सगळे कडक शिस्तप्रिय. दर महिन्याला घरच्यांना पत्र लिहायला हवेच हा एक नियम होता. याला घरी पत्र लिहायचा कंटाळा. शिवाय एक चुलतभाऊही सोबत शिकत असल्यामुळे खुशाली तर कळायचीच. मग याने देशोदेशी पत्रे पाठवायला सुरवात केली. प्राईम मिनिस्टर ऑफिस असे लिहून देशाची राजधानी व देश लिहून द्यायचे टाकून. असेच एकदा इंग्लंडच्या राणीला काहीतरी लिहिले आणि तिचे चक्क उत्तर शाळेच्या पत्त्यावर आले. प्रिंसिपलने याला ऑफिसात बोलावणे पाठवले. आणि अतिशय सन्मानाने ते पत्र याच्या स्वाधीन केले. इतर स्टाफ असा वागत होता जणू पत्र नाही खुद्द राणीच अवतरलीय शाळेत. महिनाभर याचीच चर्चा होती शाळेत. Happy Happy

आवडले लिखाण

असाही एक काळ होता ज्यावेळी देशोदेशीच्या माणसांशी पत्रमैत्री करणे ह्या प्रकाराला खूप ग्लॅमर होते आणि पोस्टाची तिकीटे साठवणे ह्या छंदाला प्रतिष्ठा

वरील सर्वांचे आभार !

* पत्र लेखन खरोखरीच माणसांना जोडणारी कला आणि पूर्वी असलेली यशाची गुरकिल्ली >>> अगदी , +१११

** अशी मल्लीनाथी करून माझ्या आनंदात मिठाचा खडा टाकला.

>>>> आपल्याला झालेला आनंद महत्वाचा. असतातच असे लोक.

*** इंग्लंडच्या राणीला काहीतरी लिहिले आणि तिचे चक्क उत्तर शाळेच्या पत्त्यावर आले.
>>>> भारीच, आवडला किस्सा !

लेख खूप आवडला. मलाही अशीच आवड होती. ही सवय मला माझ्या आईने लावली. अगदी माझ्या वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी तिने शेजारी बसून आणि प्रसंगी पेन्सिल आणि माझी बोटे स्वत:च्या हातात धरून तीन चार ओळीचे पत्र माझ्या शब्दांत लिहवून घेतलेले आठवते. अर्थात या पत्रांचे नातेवाईकांमध्ये खूप कौतुक होई. त्यामुळेच कदाचित पत्रे लिहिण्याचा माझा उत्साह वाढला असावा. पुढे काही काळ पेन फ्रेन्ड्स केले, त्यात त्या मैत्रीपेक्षा वेगवेगळे लिफाफे आणि वेगवेगळी पोस्टाची तिकिटे मिळण्याचा आनंद जास्त होत असे !

हर्पेन, हीरा
धन्यवाद व सहमती.

*ही सवय मला माझ्या आईने लावली. अगदी माझ्या वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी तिने शेजारी बसून आणि प्रसंगी पेन्सिल आणि माझी बोटे स्वत:च्या हातात धरून तीन चार ओळीचे पत्र
>>>>
आई, थोर तुझे उपकार !

मस्त खुसखुशीत लिहिले आहे. आवडले. >> +७८६

देशोदेशीच्या माणसांशी पत्रमैत्री करणे ह्या प्रकाराला खूप ग्लॅमर होते >>>> बरोबर. बरेच तरूण पत्रमैत्रिणी पण मिळवत असत. त्यात ‘ती’ परदेशातील मिळाली असेल तर मग अजूनच हवेत असायचे !

आवडला लेख.
मलाही माझी आजी पत्रे लिहायला लावत असे. मग मी कधी माझ्या आत्याला नाही तर मामाला वगैरे लिहित असे. त्यातले 'बाकी सर्व ठिक' हे शेवटी लिहीत असे. मग थोरांना नमस्कार हे वाक्य. लहानांस आशिर्वाद असे मला कधीच लिहिता आले नाही कारण माझ्यापेक्षा लहान कोणीच नव्हते. पत्राची सुरुवात ||श्री|| अशी, उजव्या कोपर्‍यात दिनांक. शेवटी एक ता.क. आणि एखादे वाक्यपण लिहित असे. तेव्हा बहुतेक माझी अशी समजूत होती की 'ता.क.' असे प्रत्येक पत्रात लिहायचेच असते.
पुढे शाळेत काही वर्षे घरापासून दूर घालवली होती. तेव्हाही पत्रे लिहित असे. फोन रविवारी सकाळी काही मिनिटांकरीता यायचा.
मग काही वर्षे पत्रमैत्री केली. एक तुर्कस्तान आणि एक जर्मनीतील असे दोन पत्रमित्र जोडले. पुढे ते ही मागे पडले.

आता 'कागदावर' पत्र लिहून जमाना लोटला.

इमेल मात्र अजूनही करतो. पुस्तक आवडले तर लेखकाला (बरेचदा प्रकाशकाच्या पत्त्यावर त्या पाठवल्या जातात), वर्तमानपत्रांच्या संपादकांना वगैरे. फारच कमी वेळा उत्तर येते.

छान लिहिलंय. मलाही बर्‍यापैकी लहानपणापासून पत्रं लिहायची आवड आणि सवय होती - किंवा लावण्यात आली असं म्हणेन. माझे वडील, काका, मोठी चुलत भावंडं फार छान छान पत्रं लिहीत असंत. त्यांची सुंदर आणि नेटकी हस्ताक्षरं आणि समोर बसून गप्पा मारल्यासारखी अकृत्रिम शैली यांचा फार मोठा प्रभाव माझ्यावर होता आणि आहे. मी अजून ती पत्रं जपली आहेत.
पत्राखाली 'ताजा कलम' वगैरे लिहिण्यातली गंमतही हळुहळू कळायला लागली. सहसा माझ्या पत्रांत त्यात काहीतरी 'इन्सायडर' जोक किंवा संदर्भ असायचा.
'ता.क. म्हणजे पत्र लिहून झालं, पण लिहिणार्‍याचं मन अजून त्या संवादात रमलं आहे याची खूण' असं कुठेतरी वाचलं होतं आणि खूप आवडलं होतं असंही आठवतं.

शालेय वयात तुम्ही लिहिलंय तशी सेलेब्रिटीजनाही पत्रं पाठवली होती आणि बहुतेकांनी अगत्याने दखलही घेतली होती.

शाळेतदेखील भाषा शिकवताना एक भाग पत्रव्यवहारांचा असायचा हे आठवतंय. त्यात फॉर्मल आणि इन्फॉर्मल पत्रं, 'तुम्हाला तुमच्या वर्गाची सहल अमुक ठिकाणे न्यायची असून तिथे दोन रात्री मुक्काम करायचा आहे, तर लॉजिंगच्या मालकाला तिथल्या सोयीसुविधा आणि दर यांची सविस्तर चौकशी करणारं पत्र लिहा' अशा प्रकारच्या असाइनमेन्ट्स असायच्या.

                                                                                                    ||श्री||
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                ३० सप्टेंबर २०१९
रा. रा. कुमार१ यांस,
स.न.वि.वि.
आपला पत्रलिखाणाबद्दलचा सुरेख लेख आत्ताच वाचला. तुमच्या या अशा पत्रलेखनाच्या छंदाबद्दल वाचून बरं वाटलं. पत्रोत्तराचे गंमतीशीर अनुभव आवडले. घरच्या मंडळींशी माझा बराच पत्रव्यवहार व्हायचा पण त्यापलिकडे फारशी पत्रं पाठवली नाहीत. "माझ्या पत्राची दखल तरी घेतली जाईल का?" या शंकेपोटी मला वाटतं माझ्यासारखे बरेच जणं असतील जे अशी पत्रं पाठवायचा विचार करतात आणि तो शेवटी नुसता विचारच रहातो! बर्‍याच उशीरा का होईना पण एकदा लक्षात आलं की दखल घेवो अथवा न घेवो, पण ज्या व्यक्तीला पत्रं लिहायचा मानस आहे तिला तुमचे विचार कळवणं - विशेषतः कौतुकपर असले तर - हे जास्त महत्वाचं. त्यामुळे आता शक्यतोवर फिडबॅक देतो - जसा हा तुम्हाला देतोय Happy अजून कोणाची उल्लेखनीय पत्रोत्तरे आली असली तर जरूर त्याबद्दल लिहा. टंकलेखनामुळे आता "अक्षरास हसू नये" लिहायची जरूर नाही पण "शुद्धलेखनाबद्दल रागावू नये" हे मात्र लिहीणं भाग आहे! क.लो.अ.,
आपला कृपाभिलाषी,

ता.क. जेमतेम महिन्याभरापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर नव्याने ओळख झालेल्या एका परिचिताना, "....फोन करणार होतो पण चटकन डोक्यात आलं की पन्नास वर्ष मागे असतो तर फोन-बिन नाही, पिवळं पोस्टकार्ड धाडलं असतं!! .... " अशी सुरूवात करून पुढे कार्डासारखा मजकूर लिहिला होता! ह्या तुमच्या लेखात ते पिवळं पोस्टकार्ड भेटलं Happy पण '६ नये पैसे'? हे तुम्ही घेतलंय तरी कधी??

२०१०च्या मराठी दिनानिमित्त 'सप्रेम नमस्कार' हा पत्रलेखनाचा उपक्रम घेतला गेला होता - त्याची घोषणा आणि तिथल्या प्रवेशिका वाचनीय आहेत.

पेनफ्रेंड नावाचा एक प्रकार एके काळी बराच प्रसिद्ध होता. वेगळ्याच कुठल्यातरी देशातली एखादी व्यक्ती तुमची पत्रमित्र / मैत्रिण होणं वगैरे कल्पनाच जबरदस्त होती. (इंग्रजी ची एक अडचण होती बेटी!).

परिक्षेत सुद्धा पत्रलेखनाचा प्रश्न असायचा. त्यात योग्य तो मायना लिहीणं, मजकूर, पत्राचा आकृतीबंध (स्ट्रक्चर) ह्या गोष्टींना मार्क असायचे.

स्टँप गोळा करण्याच्या छंदाचा वर उल्लेख झालाच आहे.

परगावी रहाणार्या नातेवाईकंना पत्रं लिहीणं हा एक आनंदाचा भाग असायचा.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

इमेल मात्र अजूनही करतो. बरेचदा प्रकाशकाच्या पत्त्यावर त्या पाठवल्या जातात), वर्तमानपत्रांच्या संपादकांना वगैरे. फारच कमी वेळा उत्तर येते.
>>>> + १११ . भारतात तर अगदीच.

** 'ता.क. म्हणजे पत्र लिहून झालं, पण लिहिणार्‍याचं मन अजून त्या संवादात रमलं आहे याची खूण'
>>>. सही, पटले !

तुमच्याकडे ही पत्रं असली तर फोटो पण द्या.
>>>>> जरा स्पष्ट करणार का? हे तुम्ही माझ्या लेखातील पत्रांबाबाबत म्हणताय का? मुळात खाजगी पत्रव्यवहार त्याच्या फोटोसह जाहीर करण्याचे नियम असतात का, ते मला माहिती नाही. मार्गदर्शन व्हावे.

@ मायाबोली,
सुंदर पत्रोत्तर ! पूर्ण गुण द्यायला हवेत !

*पोस्टकार्ड भेटलं पण '६ नये पैसे'? हे तुम्ही घेतलंय तरी कधी??

>>>>> मी नाही घेतले, पण माझ्या आजोबांनी आणलेले पहिले आहे. अगदी ‘आणा’ लिहिलेले पण. तसेही अजून गणेशोत्सवाच्या ‘जुने ते सोने’ च्याच मूडमध्ये आहे मी अजून ! म्हणून मुद्दाम तो फोटो घेतला.

फेफ , सहमत.

ओह, खाजगी असेल तर नका देऊ फोटो
असेच एखादे लक्षात ठेवण्या योग्य लेखकाचे उत्तर असले तर फोटो.छान वाटेल
अर्थात गुप्तता असेल तर नाही दिला तरी चालेल फोटो.

पुर्वी तार आली तर कोणीतरी गेले म्हणून रडारड सुरू व्हायची. मी पत्र पाठवताना पत्रास कारण की, कोणतंच कारण नाही, लिहावेसे वाटले म्हणून लिहीत आहे अशी सुरुवात करुन विचित्रपणा करीत असे. काही लोक संक्रांतीच्या वेळेस पोस्ट कार्डाला तिळगुळाची पुडी स्टेपल करून पाठवित. मग पोस्टमन पत्र घेणारा कडून दंड वसूल करत असे. नोकरी च्या नेमणुकीच्या पत्रांना खूप महत्त्व असे.

अनु,
मला खरे तर लेखात १-२ ते फोटो द्यायची इच्छा होती. पण, त्याचे नियम माहित नसल्याने मी तो मोह टाळला आहे. खरेच कोणी माहितगाराने सांगावे ही विनंती. त्यात संबंधित लेखक हयात /दिवंगत असल्यास फरक पडतो का?

फारच छान लेख खूप आवडला. साधना, हीरा व अनेकांचे प्रतिसाद खूप आवडून गेले. पेनफ्रेंड हा गंमतीशिर प्रकार होता खरा.
ता क बद्दल कोणीतरी फार मार्मिक नीरीक्ष ण नोंदवले आहे. पटले.

सुरुवातीला नुसतं शिर्षक वाचल्यावर डॉक्टरसाहेब सबॅटिकल घेतायत कि काय अशी शंका मनाला चाटुन गेली, पण लेख वाचुन हायसं वाटलं. Happy

सेलेब्रेटिजना पत्र पाठ्वण्याचा, संग्रह करण्याचा अनुभव नाहि. पण हा छंद एखाद्याला मल्टाय्मिल्यनेर करु शकतो हे इथे आल्यावर कळलं. प्रसिद्ध लेखकांची खाजगीत लिहिलेली दुर्मिळ पत्रं "कलेक्टर्स आय्टम" च्या नांवाखाली दर्दी माणसांकडुन हौसेने विकत घेतली जातात. अर्थात, इथेहि फोर्जरीचा धोका असतोच, पण फोर्जरी फार काळ टिकाव धरु शकत नाहि. बाय्दवे, अशाच एका कथानकावर मलिसा मॅकार्थीचा एक सुंदर चित्रपट (कॅन यु फर्गिव मी?) आहे. एका लेखिकेच्या (ली इझ्रेल) रियल लाइफ स्टोरीवर आधारीत; जमल्यास जरुर बघा...

अनु,
पत्राच्या फोटोच्या मुद्द्यावरून एक अनुभव लिहितो. १९८४मध्ये मी एक hmt चे घड्याळ घेतले होते. ते खूप लोकांना प्रचंड आवडले होते. मग मी कंपनीला त्याबद्दल कौतुकाचे पत्र लिहीले होते. त्यावर त्यांचे असे उत्तर आले,

“ धन्यवाद. आपले पत्र आवडले. आम्ही ते आमच्या कंपनी-मासिकात छापू इच्छितो. तरी तुम्ही त्यास परवानगी द्यावी”.

मी ती दिल्यावर त्यांनी ते छापले.
....... म्हणूनच मला याचे नियम जाणून घ्यायचे आहेत.
(लेखात मी नावानिशी उल्लेख केलेत पण सर्वांबद्दल चांगलेच लिहीले आहे म्हणून हरकत नसावी असे वाटते).

मस्त आठवण!

घरचा व्यवसाय आहे त्यामुळे लहानपणी मी दर आठवड्याला देणेदारांना थकबाकीच्या वसुलीसाठी धमकीची पत्रे पाठवत असे. Proud
ह्या पत्रांचा एक फिक्स मसुदा असे.

दिनांक
श्रीमान ----------- यांस
सनविवि
पत्रास कारण की -- थकबाकी त्वरित अदा करणेसंबंधी

आम्ही आपणास आमची व्यवसायदेवता श्री व्यंकेटेश्वराच्या साक्षीने परमेश्वरासमान माणून ग्राहक धर्माला जागत मालपाणी ऊधार दिधले. आपण ह्या ग्राहकधर्माचा मान ठेऊन आपली ऊरलेली थकबाकी रुपये ---पैसे--- त्यावरील व्याजासहित (व्याजाची रक्कम) त्वरित अदा करण्याची तजवीज करावी. अन्यथा आम्हाला नाहक
मग खाली वसुलीसाठी दिवाणी न्यायालय वगैरे करावे लागले तर असा एक कीचकट मजकूर असे, जो आता मला नीटसा आठव्त नाही.

दर रविवारी सिनेमा बघतांना अशी धमकीची पोस्टकार्डे लिहून ठेवणे हे माझे कामच होते. मग अशा ब्लॅकेट धमकी लिहिलेल्या पोस्ट कार्डात थकबाकीदाराचे नाव आणि रक्कम तेवढी भरायची आणि शंभर स्टँपची जी एक चळत/गठ्ठा येत असे त्यातून स्टँप फाडून चिकटवायचे.

अशी शेकडो धमकी पत्रे मी लिहून पाठवली असतील. Lol

देणेदाराने थकबाकी दिली की हे आपल्या धमकीमुळेच झाले असे वाटून कोण आनंद होई. काही देणेदारांना सलग पाच सहा आठवडे पोस्ट कार्ड पाठवावे लागे आणि तरीही थकबाकी न आल्यास, दुकानातला मुनीम पर्सनली जाऊन धमकी देऊन येई. Proud

एकदा तर असेच धमकी पत्र आम्हालाच आले. मुनीमने पत्र पाठवणार्‍याला शिवी देत माझ्यासमोरच ते फाडून टाकले (काही तरी डिस्प्युटचा मामला होता). तेव्हापासून माझा ही धमकी पत्रे लिहायचा मूडच गेला.

@ राज,

सुरुवातीला नुसतं शिर्षक वाचल्यावर डॉक्टरसाहेब सबॅटिकल घेतायत कि काय अशी शंका ….>>>>>
अगदी ! अहो, असे कुणाला तरी वाटू शकेल, ही शंका मलाच आलेली होती. पण म्हटलं, राहू दे हेच शीर्षक. तशा उत्सुकतेने जरी कोणी धाग्यावर आले तरी चालेल ! Bw
पूरक माहितीबद्दल धन्यवाद !

पुन्हा एकवार सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

माझ्या एका मित्राने एल आय सी एजंटचं काम करायला सुरुवात केली होती पण इतर कामांमुळे त्याला वेळ मिळत नव्हता. तो म्हणाला बापू ही पोस्टकार्डं आणि ही यादी. सगळ्यांना हप्ता थकला आहे, रक्कम जमा करा असे पत्रं लिहा व पोस्टात टाका. मी यादीप्रमाणे सगळ्या लोकांना पत्रं टाकली तर बरेच लोक आमचा हप्ता थकलेला नाही याची तक्रार मित्राकडे करू लागले.

पत्राला सुरुवात करताना पहिला मोठ्ठा श्री, मग वयानुसार ती.रा. रा., सौ., असे मायने आई लिहून घेई. त्याचा अर्थ कळत नसे. पण ती रा रा लिहिताना हटकून एक रा अधिक लिहिला जाई. एकदा आईने नेहमीचे मायने सोडून ती. गं. भा. असे लिहायला सांगून गोंधळात पाडले होते. मात्र, तिरारा पेक्षा तिगंभा हा नादमय शब्द अधिक आवडला होता आणि तेव्हापासून लक्षात राहिला. एकदा त्या काळी लंडनला गेलेला चुलतभाऊ परत यायचा होता तेव्हा काकांना पत्र लिहिताना आईने भावाची खुशाली विचारायला सांगितले. आधीच्या पत्रांतून खुशाल हा शब्द माहीत झाला होता.(अर्थ कळत नव्हता तरी) पण खुशाली विचारायची म्हणजे काय करायचे ते कळेना. मग आईनेच ' लंडनचा दादा कसा आहे असे लिही ' म्हणून सांगितले. पण लंडन लिहिताना चांगलीच फजिती झाली. मधला 'ड' 'इ' सारखा येऊ लागला. सुधारता सुधारता लंडनडंडडंडन असे लिहिल्याचे आठवते. आता लहान मुलांना अक्षरे गिरवताना बघताना ती किती एकाग्रतेने जीभ काढत, पेनसिलीचे टोक तोडत एक एक अक्षर लिहीत असतात आणि त्यांना मागल्या अक्षराची आठवण राहात नाही हे पाहिले की मला माझ्या त्या पत्रलेखनाची आठवण येते. कधी मूड नसला तर अक्षर मोठ्ठे येई आणि पाच शब्दांतच ते कार्ड भरून जाई. तरी तेव्हाची पोस्ट कार्डे आताच्या दीडपट आकाराची असत. टीचभर आकाराची नसत.
एकदा प्रथमच स्टॅंप्स आणायला जवळच्या पोट ऑफिसात पाठवले. रस्त्यावर धोका नव्हता, मुले पळवणारी टोळीबिळी नव्हती आणि पोस्टमास्टरसकट सर्व कर्मचाऱ्यांना मुलांचे कौतुक होते. पोस्ट कर्मचाऱ्याने मायेने कुठली तिकिटे हवीत, रेवेन्यू की साधी असे विचारले. आता पंचाईत. मग बघितले तर रेवेन्यूवर राणीचा मानेपर्यंतचा मुकुटासहित चेहेरा होता. या आधी पोस्टाच्या डब्यात पत्रे टाकली होती त्यांवर वेगळ्या प्रकारचे तिकीट असे. पण ती साधी तिकिटे; अर्थात रेवेन्यू म्हणजे काहीतरी भारी असणार आणि साधी तिकिटे घरी कशी चालतील अश्या काहीशा बालसुलभ मोठेपणातून आणि आगाऊपणातून रेवेन्यू आणली . पण घरी कोणी रागावले मात्र नाही. उलट कारणमीमांसेसह तो एक कौतुकाचा किस्साच झाला. त्या राणीच्या मानेच्या तिकिटांचा वापर अनेक वर्षे चालू होता.

मला निनावी पत्र लिहून खळबळ उडवण्याची सवय होती. भ्रष्ट लोकांची लफडी निनावी पत्र लिहून उघड करण्याचे उद्योग केले होते. डाव्या हाताने मुद्दाम लिहीत असे.

Pages