कळावे, लोभ असावा...

Submitted by कुमार१ on 30 September, 2019 - 05:15

सुमारे ३५ वर्षांपूर्वीचा काळ. संगणकाशी माझा अद्याप परिचय झालेला नव्हता. मोबाईल फोन तर तेव्हा स्वप्नातही नव्हते. तेव्हा संदेशवहनासाठी दोन मुख्य साधनांचा वापर प्रचलित होता – एक स्थिर-फोन आणि दुसरे पत्र. फोनचे दर हे आजच्यासारखे किरकोळ नव्हते. त्यामुळे फोनचा वापर विचारपूर्वक आणि मर्यादित असे. परदेशी फोन तर फक्त अत्यावश्यक किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत केले जात. पत्रलेखन विविध कामांसाठी बरेच होई, जसे की व्यक्तिगत, कार्यालयीन, विविध आमंत्रणे, जाहिराती, पत्रमैत्री, इ. महाविद्यालयीन जीवनात मी माझ्या परगावी आणि परदेशात असलेल्या आप्तस्वकीयांना हटकून पत्रे लिहीत असे. अशीच पत्रे लिहीता लिहीता मला त्या लेखनाची गोडी लागली. हे लेखन मी आवडीने आणि अगदी भान हरपून करीत असे. तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे माझी पत्रे प्राप्तकर्त्या व्यक्तींना आवडत असत. त्यांपैकी काही तसे पत्रोत्तरातून कळवत तर काही समक्ष भेटल्यावर सांगत. अशा प्रोत्साहनातून माझी ती आवड वाढतच गेली आणि तो आयुष्यातील एक छंद झाला.

post card.jpg

सुरवातीचे पत्रलेखन हे आप्तस्वकीयांपुरते मर्यादित होते. पुढे वृत्तपत्रांतून पत्रलेखन चालू केले. तरीसुद्धा या लेखनाची भूक अजून भागत नसे ! मग त्याची व्याप्ती वाढवू लागलो. त्या काळी छापील पुस्तकांचे वाचन बऱ्यापैकी असे. त्यात अभ्यासाची पुस्तके आणि साहित्य या दोन्हींचा समावेश होता. अभ्यासाच्या पुस्तकात काही वेळेस मुद्रणदोष तर कधी घोडचूका सापडत. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. ते पाहून मी बेचैन होई. मग नुसते स्वस्थ न बसता संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवू लागलो. परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत.

साहित्यवाचन करता करता काही विशिष्ट लेखक जास्त आवडू लागले. मग त्यांची पुस्तके वाचल्यावर त्यांना पत्राने अभिप्राय कळवू लागलो. सुरवातीस फक्त ‘पुस्तक खूप आवडले’ असे कळवत असे. पण हळूहळू त्यातल्या काही नावडल्या गोष्टींबद्दलही लिहू लागलो. माझ्या पत्रांना काहींची उत्तरे येत तर काहींची नाही. नमुन्यादाखल काही लेखकांचा उल्लेख करतो. रणजित देसाईना ‘राधेय’ आवडल्याचे कळवले होते. त्यांनी सामान्य वाचकांना उत्तरांसाठी स्वतःचे नाव-पत्ता छापलेली पोस्टकार्डे तयार ठेवलेली होती. त्यावरील त्यांच्या हस्ताक्षरातील चार ओळीदेखील बहुधा ठराविक असाव्यात. पण तरीही, “आपल्यासारख्या जाणकार वाचकांची पत्रे लेखकाला नेहमीच समाधान देतात”, हा मजकूर त्या वयात मला नक्कीच सुखावून गेला.

सुनीता देशपांडेंचे पत्रोत्तर चक्क मजेशीर होते. तेव्हा त्यांचे ‘आहे मनोहर तरी’ वाजतगाजत होते. मी अगदी मन लावून वाचले होते ते. पुस्तकातल्या महत्वाच्या विषयाखेरीज त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत सवयी, आवडी वगैरेबद्दलही काही लिहीले होते. घरी केलेल्या ताकावरील लोण्यापासून जास्तीत जास्त तूप काढण्यात त्यांचा हातखंडा आहे, असे त्यांनी लिहीले होते. त्यावर माझे कुतूहल चाळवले गेले कारण माझेही ते आवडीचे काम होते. मग काय, उचलले पेन आणि त्यांना “सांगा बरं, तुमची जादू काय आहे”, अशा आशयाचे पत्र लिहीले. नंतर विसरूनही गेलो होतो. त्यांच्या या पुस्तकासंदर्भात त्यांना बऱ्याच पुलं-भक्तांची खरमरीत पत्रे (आणि पुस्तक आवडल्याची देखील) त्याकाळी गेलेली होती. त्या पुस्तकावर अनेक चर्चा व परिसंवाद घडत होते. तेव्हा माझ्या या क्षुल्लक पत्राची त्या दखलच घेणार नाहीत असा माझा अंदाज होता. किंबहुना आपण तो ‘पुलं’ विषय सोडून काहीतरी वेगळे लिहावे हा माझा उद्देश होता. पण काही दिवसांनी त्यांचे उत्तर आले. माझे पत्र वाचल्यावर त्यांना क्षणभर हसू आले होते. पुढे पत्रात त्यांनी, त्यांची तुपाबद्दलची पद्धत पत्रातून नाही सांगता येणार पण प्रत्यक्ष भेटीत प्रात्यक्षिक जरूर दाखवेन, असे लिहीले होते.

हमो मराठेंच्या काही कादंबऱ्यात पात्रांच्या संवादांत इंग्रजी वाक्यांचा अतिरेक झालेला होता. शेवटी मी वैतागून त्यांना लिहीले की मराठी पुस्तकात हे जरा अतिच होतंय. याची दखल घेणारे त्यांचे उत्तर आले. त्यांनी स्पष्टीकरण असे दिले होते. आपण सगळे उच्चशिक्षित सध्या ‘हिंग्लिश/ मिंग्लिश/ इंग्राठी/ मिंदी’ अशा प्रकारची भेसळ भाषाच बोलत आहोत. त्यामुळे कादंबरीतील पात्रेही तशीच बोलणार !

माझ्या या साहित्यिक पत्रव्यवहारात वपु काळेंचा अनुभव अनोखा आहे. त्यांच्या लेखन कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यातील एक पुस्तक वाचले होते. त्याचे नाव आता आठवत नाही. त्या पुस्तकात शुद्धलेखनाच्या असंख्य चुका झाल्या होत्या. त्या पाहून मी खूप अस्वस्थ झालो. एखाद्या नामवंत लेखकाच्या पुस्तकातील अशा चुकांमुळे लेखकाची प्रतिमा डागाळली जाते. त्या चुका नक्कीच लेखकाच्या नसून मुद्रितशोधनातील दुर्लक्षामुळे झाल्या असणार याची मला खात्री होती. आता वपुंना लिहू का नको या संभ्रमात होतो. पण त्या आधी त्यांचे ‘प्लेझर बॉक्स’ पुस्तक वाचले होते. त्यात त्यांनी सुमारे पन्नास हजार वाचकांच्या पत्रांना स्वहस्ताक्षरात उत्तरे लिहिल्याचे नमूद केले होते. मग अजून काय पाहिजे ? म्हटलं, आपणही लिहायचे बिनधास्त. बघू काय होतंय ते. मग एक अंतर्देशीय पत्र त्यांना लिहीले. “अशा गोष्टी प्रकाशकांना लिहून फारसा उपयोग होत नाही, असा अनुभव आहे. मात्र लेखक अधिक संवेदनशील असल्याने तुम्हाला हे कळवत आहे”, असे मी लिहीले. त्यावर सुमारे ३-४ महिने गेले. काही उत्तर नव्हते. म्हटलं ठीक आहे. वयोपरत्वे ते आता थकले असतील. मला पत्रोत्तर आले नाही पण पुढे एक सुखद प्रसंग घडणार होता. एव्हाना मी त्या पत्राबद्दल विसरूनही गेलो होतो. अशात एका रविवारी सकाळी बायकोशी निवांत गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात घराची बेल वाजली. दार उघडून पाहतो तर समोर एक अनोळखी गृहस्थ. त्यांना आत बोलावले. त्यांनी लगेच खुलासा केला. त्यांच्या पिशवीतून एक पुस्तक काढून ते म्हणाले, “ मी मुंबईहून आलोय, मला वपुंनी पाठवलंय. तुमच्यासाठी हे पुस्तक भेट दिले आहे त्यांनी”. ते पुस्तक होते ‘चिअर्स’. त्याच्या पहिल्या पानावर खुद्द वपुंची लफ्फेदार सुंदर स्वाक्षरी आणि ‘प्रेमादरपूर्वक’ असा उल्लेख ! तेव्हा मला झालेला आनंद काय सांगू? हे त्यांचे एक जुने पुस्तक होते. त्याचा माझ्या पत्रातील पुस्तकाशी काही संबंध नव्हता. मग ते गृहस्थ मला म्हणाले, “ तुमची तक्रार वपुंनी प्रकाशकाला कळवली आहे. तुमच्या पत्रात जर तुमचा फोन क्रमांक असता तर वपुंना तुमच्याशी बोलायची इच्छा होती”. असा हा आगळावेगळा आणि सुखद अनुभव.

काही लेखकांनी पत्रोत्तर देण्यासाठी लेखनिक ठेवलेले होते. हे मी कसे ओळखले ते सांगतो. त्यांच्या पत्रातील मजकूर अगदी सुवाच्य आणि नीटनेटका दिसे आणि त्याखाली असलेली लेखकाची सही अगदी वेगळ्या धाटणीत आणि स्पष्टपणे वेगळ्या शाईत केलेली दिसे. अरुण साधूंचे असे एक पत्र माझ्याकडे आहे.

अशा छान अनुभवांतून पत्रलेखनाची नशा वाढतच जाई. मग या यादीत उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, संपादक, उद्योगपती, काही सत्कारमूर्ती यांचीही भर पडली. त्या सर्वांचीच उत्तरे येत नसत पण त्यांना लिहीण्याचा आनंद काही औरच असे. उद्योगपतींत राहुल बजाज आणि फिरोदिया यांचे अनुभव सुखद आहेत. त्या काळी मी बजाज-चेतक ही स्कूटर वापरत होतो. ती वापरणाऱ्या लोकांना साधारण जे मायलेज मिळे त्याच्यापेक्षा तब्बल २० किमी मला जास्त मिळत होते. ‘टू- स्ट्रोक’च्या जमान्यात हे एक भलतेच नवल होते. खूप मित्रांना त्याचे आश्चर्य वाटे. एकाने तर माझ्याशी त्यावर चक्क पैज लावली होती आणि प्रात्यक्षिक झाल्यावर तो ती हरला होता ! मग काय, माझे हात शिवशिवू लागले आणि लिहीले पत्र बजाज यांना. पत्ता जरी कंपनीचा घातला होता तरी ते त्यांना नावाने लिहीले होते. पत्रात अर्थातच त्यांचे कौतुक आणि मी या अतिरिक्त मायलेजवर जाम खूष असल्याचा मजकूर. तसेच एखादीच स्कूटर असा अत्युत्तम अनुभव कसा देऊ शकते, याचे स्पष्टीकरणही मी विचारले होते. पंधरवड्यातच त्यांचे सुरेख उत्तर आले. इलेक्ट्रोनिक टाईपरायटरवर टाईप केलेलं. त्याकाळी सरकारी आणि सामन्य टंकलेखन साध्या टाईपरायटरवर होत असे. मोठ्या खाजगी उद्योगांची पत्रे नुकतीच इलेक्ट्रॉनिक यंत्रावर येऊ लागली होती आणि ते टंकलेखन पाहणे हेही डोळ्यांना सुखद वाटे ! बजाज यांच्या त्या उत्तरापाठोपाठ त्यांच्या तांत्रिक व्यवस्थापकाचेही मायलेजचे स्पष्टीकरण देणारे वेगळे पत्र आले – ते मात्र साध्या टाईपरायटरवर टंकलेले होते.

फिरोदियांचा अनुभव जरा वेगळ्या प्रकारचा आहे. त्या काळी ‘कायनेटिक’ची एक दुचाकी खूपच गंडली होती. ती गाडी खरेदीच्या पहिल्याच वर्षात सतत दुरुस्त्या काढी. मुख्य म्हणजे ती सुरु होतानाच रुसायची ! त्यांच्या सेंटरला खेटे मारून जाम वैताग आला होता. तिथल्या ‘अधल्यामधल्यांना’ भेटून काही उपयोग झाला नाही. मग सरळ कंपनी मालकांनाच सविस्तर पत्र लिहून आता ‘दुसरी नवी गाडीच बदलून द्या’ असे लिहीले. त्यावर उत्तर नाही आले पण तीनच दिवसात कंपनीचा एक अभियंता आमच्या दारात हजर ! मग त्यांनी ती गाडी थेट त्यांच्या कारखान्यात नेली व दुरुस्त करून शून्य बिलासह यथावकाश घरपोच केली. अर्थात नंतर ते मॉडेलच कंपनीने बंद केले. उद्योग जगतात कागदी घोड्यांपेक्षा तातडीच्या कृतीला किती महत्व असते, हे या प्रसंगातून दिसून आले.

मराठीतून दीर्घ पत्रलेखन करतानाचा एक विशेष अनुभव नोंदवतो. त्या काळी लेखनासाठी बॉलपेन आणि फौंटनपेन असे दोन्ही पर्याय प्रचलित होते. जातिवंत लेखक फौंटनपेन वापरत. आपण जर का बराच मोठा मराठी मजकूर बॉलपेनने लिहिला तर बोटे दुखून येत. इंग्रजी मजकूर लिहिताना मात्र ती तेवढी दुखत नसत. याचे कारण म्हणजे देवनागरी अक्षरांना बऱ्यापैकी गोलाई असते. याचा अनुभव घेतल्यावर मराठी लेखन कटाक्षाने फौंटनपेनने करू लागलो.

पत्रलेखनातील अजून एक मुद्दा सांगतो. मी जेव्हा पत्र लिही तेव्हा त्यावर वरच्या कोपऱ्यात दिनांक घालायचे हमखास विसरत असे. एकदा मी 'सकाळ' च्या तत्कालीन संपादकांना एक तक्रारपत्र लिहीले होते. त्याचे उत्तर देताना त्यांनी “तुमचे (दिनांक नसलेले) पत्र मिळाले..” अशी सुरवात केली होती. त्यानंतर दिनांक हटकून लिहायची मला सवय लागली.

असेच पत्रलेखन जोशात चालू होते. मग एकदा असे वाचनात आले की देशातला कोणीही नागरिक थेट पंतप्रधानांना पत्र लिहू शकतो आणि त्याची दखल घेण्याची यंत्रणा असते. म्हटलं, चला आता ही पण हौस पुरी करू. तत्कालीन पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. मग त्यांना लिहीले एक कौतुकाचे पत्र. मनाशी विचार असा केला. जर आपण तक्रारीचे पत्र लिहीले तर त्यांचे सचिव स्वतःच्या पातळीवरच त्याला केराची टोपली दाखवतील ! त्यापेक्षा कौतुकाचेच लिहा ना, म्हणजे बहुतेक ते सचिवांच्या चाळणीतून पुढे सरकेल आणि योग्य त्या टेबलावर पोहोचेल. बस्स, माझ्याकडून मी ते टपालपेटीत टाकले खरे. पुढे ते पोचले की नाही, पोचले असल्यास चाळणीतून पुढे सरकले का टोपलीत गेले हे कळण्यास काही मार्ग नाही.

सन २००० उलटले आणि हळूहळू आपल्याकडे संगणकाचा वापर वाढू लागला. त्याचबरोबर हाताने पत्र लिहिण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागले आणि आजची परिस्थिती तर आपण जाणतोच. संगणकाच्या सुरवातीच्या दिवसात ‘इ-मेल’ चे कौतुक आणि अप्रूप होते. त्यामुळे त्या माध्यमातून पत्रलेखन करीत राहिलो. विशेषतः परदेशी पत्रव्यवहारासाठी ते फारच स्वस्त आणि मस्त माध्यम होते. पत्रकार आणि लेखक अशोक जैन यांची मला आलेली एक इ-मेल संस्मरणीय आहे.

अजून एक मुद्दा नमूद करतो. हस्तलेखनात एकाच हाताच्या तीन बोटांना खूप ताण येतो. संगणकलेखनात तो ताण दहा बोटांमध्ये विभागता येतो, हा फायदा नक्कीच महत्वाचा.
गेल्या ५ वर्षांत मात्र या छंदाला ओहोटी लागली आहे. ऐन तारुण्यात आपण जोशपूर्ण असतो. तेव्हा मी पाठवविलेल्या पत्रांपैकी निम्म्यांना जरी उत्तरे आली तरी मी खूष असे. इ-माध्यमांचा प्रसार वाढल्यावर वास्तविक पत्रोत्तर देणे हे सोपे झाले होते. पण व्यक्तिगत अनुभव मला तरी उलटाच येऊ लागला. उत्तराचे प्रमाण जुन्या जमान्यापेक्षा काहीसे कमीच होऊ लागले. तक्रार किंवा शंका विचारली असताही पत्राकडे दुर्लक्ष होऊ लागले. तेव्हा आता हौसेच्या पत्रलेखनाला मुरड घालावी हे बरे. उत्तर न आल्याने होणारा विरस आता अधिक जाणवतो. तेव्हा उगाचच आपणहून (कुठलेही व्यावहारिक काम नसताना) लिहिणे टाळलेले बरे, ही भावना बळावली आहे. एखादे वेळीस जर पत्र लिहिण्याची उर्मी आली तरी “जाऊदे, मरूदे, बास झाल्या लष्कराच्या भाकऱ्या”, असे म्हणणारे दुसरे मन वरचढ होत आहे. कालानुरूप आपण बदलत राहावे हे बरेच. लिखित जमान्यात आलेली पत्रोत्तरे मात्र व्यवस्थित जपून ठेवली आहेत. ती जाडजूड फाईल अधूनमधून चाळणे हे सुरेख स्मरणरंजन असते खरे ! ती चाळतानाच हा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली.
.......
हे होते माझे अनुभवकथन. तुमचेही असे काही अनुभव असल्यास जरूर लिहा. वाचण्यास उत्सुक.
*********************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलय.

इयत्ता चौथी मधे असताना शाळेत पोस्ट कार्डावर स्वतालाच पत्र लिहून शाळेसमोरच्या पोस्टाच्या लाल डब्ब्यात टाकल होत आणि मग ते पत्र
घरी आल्यावर झालेला आनंद आठवतो.

अहमदाबादला रहाणार्या मावशीची येणारी आणि तिला लिहीलेली पत्र आणि येणारी दिवाळी भेटकार्डे आठवली.

ओल्ड मेमरीज.

मस्त आठवणी आहेत.
>>>>शाळेत पोस्ट कार्डावर स्वतालाच पत्र लिहून शाळेसमोरच्या पोस्टाच्या लाल डब्ब्यात टाकल होत आणि मग ते पत्र >>>
अगदी सेम ! आम्हाला दोन उपक्रम होते. एकात शेजारी बसणाऱ्या मुलाला पत्र आणि दुसरे आपल्य्लालाच लिहायचे. घरी ते पत्र आल्यावरची धमाल आठवते.

छान अनुभव...
मला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर राम जोशी यांचे पत्र आले होते. ते अमेरिकेत निवृत्तीनंतर गांधी या विषयावर कुठल्यातरी विद्यापिठात लेक्चर देण्यासाठी जाणार होते. तेव्हा मी त्यांना लिहिले की गांधी आम्हालाही अद्याप नीट कळले नाहीत . अमेरिकेपेक्षा भारताला त्याची जास्त गरज आहे. त्या पत्राचे त्यांनी उत्तर दिले होते की मी तात्पुरता जात आहे.

छान लेख व आठवणी. भारत सोडल्यावर घरी, मैत्रिणींना मोठ्ठाली म्हणजे ८-८ पाने मागेपुढे भरुन लिहिली होती. लहानपणी चाळीत रहायचो, नंतर समोरच फ्लॅटमधे गेलो पण चाळीचे प्रेम संपले नव्हते, सर्व चाळ मिळुन एकच कुटुंब होते. त्यामुळे माझे पत्र घरी पोचले की त्यात काही फार खासगी मजकुर नसायचा म्हणुन चाळीत सामुहीक वाचनास जायचे. Happy सर्वात पहिले पत्र असेच भारतातुन प्रवास सुरु झाल्यापासुन इथले पहिल्या महिन्यातले अनुभव असे सर्व सविस्तर लिहिले होते. ते तर इतक्या जणांनी वाचले की एका काकांनी ते उचलले व वर्तमानपत्राच्या संपादकासमोर नेऊन टाकले Happy व दुसर्‍या दिवशी ते छापुन आले. Happy असली लाज वाटली होती. पण तेव्हा भारत सोडणे आमच्या चाळीत, छोट्या गावात ओळखीपाळखीत फारफार कमी जणांनी केले होते म्हणुन सगळ्यांनाच कुतुहल. मुंबई, पुण्यात सर्रास जात होती तेव्हाही :).
आता घरटी एक जातो म्हणुन अपुर्वाई संपलीये. तेव्हा आलेली सगळ्यांची पत्रे जपुन ठेवलीत.
आता एक पान लिहीले तर बोटं भरतात.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

सर्वांनीच आठवणी पोटभर आणि मनमोकळ्या लिहिल्या आहेत. त्यामुळे आनंद वाटला.

आपला संगणक वापर वाढल्यापासूनचे एक निरीक्षण असे आहे. हाताने लिहिणे खूप कमी झाल्याने आता हस्ताक्षर देखील बिघडत आहे. पानभर देवनागरी मजकूर लिहिला तर नक्कीच बोटे दुखतात.
इंग्लीश लेखन तुलनेने बरे राहते.

बँकेतली सही पण क्वचित करावी लागते. त्यामुळे तिचा सराव कमी. वयानुसार तीही बिघडते आहे.

लेख आणि प्रतिसाद उत्तम आहेत.. जुन्या आठवणी जाग्या। झाल्या..
" मला तुमची खूप आठवण येते, आम्ही इकडे मजेत आहोत. यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत भेटून धमाल करू. " ही वाक्ये माझ्या भावंडाना पाठवलेल्या पत्रात नेहमी असत.

मी पहिले पत्र माझ्या गावच्या आजोबांना लिहिले. त्यांनी ते मिळताच आजुबाजुच्यांना, घरी येणार्‍या सर्वाना दाखवले. हे ऐकुन तेव्हा खुप आनंद झाला होता. माझ्या भाच्याने त्याला लिहिता येऊ लगल्यावर मला एक पत्र लिहिले होते. त्यात एकाही शब्दाला वेलांटी नव्हती. मी अनेक वर्षं ते जपुन ठेवले होते. आता त्या भाचाचे लग्न झाले आहे. पण ही आठवण आम्ही भेटलो की नक्की निघते!

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
छान आठवणी.
...
पोस्टकार्डाच्या निमित्ताने ‘जोडकार्ड’ पण आठवले. समजा एक साधे कार्ड १५ पैशाला होते तेव्हा जोड २५ पैसे असे काहीतरी होते. जे लोक पत्रोत्तर द्यायला आळशी (किंवा चिक्कू !) असत त्यांना जोडकार्ड हमखास पाठवावे लागे.

तसेच मासिकाला लेख पाठवला असेल तर निर्णय त्यांनी कळवण्यासाठी आपण आपला पत्ता लिहिलेले कार्ड लेखाला जोडावे लागे.

वाह! मस्त आठवणी. जोडकार्ड आठवते. छान वाटायचे लहान लहान अक्षर काढायला सांगायची आई कि जास्त मजकूर बसेल.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

पत्रलेखनाचा एक अनोखा उपक्रम माझ्या माहितीतील एक गृहस्थ गेली २५ वर्षे राबवत आहेत. रोज सकाळी आकाशवाणीवर ‘चिंतन’ कार्यक्रम असतो. ते तो न चुकता ऐकतात. त्यांचा मुलगा परगावी असतो. त्याच्या व्यग्र जीवनशैलीत तो काही हा कार्यक्रम ऐकत नाही. हे गृहस्थ रोज त्या कार्यक्रमाचा सारांश एका पोस्टकार्डावर लिहितात आणि ते पत्र मुलाला रोज पाठवतात. तो सवडीने वाचतो.

त्यांची ही दीर्घ चिकाटी पाहून त्यांचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंदवले गेले आहे !

माझ्या मामाच्या मुलीनं तिच्या लग्नानंतर वडीलांना पत्र लिहिले. सुरुवात - तिर्थरुप दादांना माझे अनेक उत्तम आशीर्वाद.
पत्र वाचून मामाने कपाळावर हात मारुन घेतला.

अहा!! मस्त लेख. आजोबा आणि आजीकडे एकटीच बरेच वेळा एस टीने जायचे. ठरावीक २ /३च एस्ट्या होत्या. परत येतांना आजोबा पोहोचवायला यायचे. शंभरदा सांगायचे पोचल्याच पत्र पाठव. मग आल्यावर ताबडतोब कार्ड पाठवायचे. ते त्यांना तिसर्‍या दिवशी मिळे. नेहमीचा मजकुर , "ति सौ आजीला सा न वि वि. मी इथे सुखरुप पोहोचले. गाडीला विशेष गर्दी नव्हती. पप्पा शनिवारी येणार आहेत. तु तब्येतीची काळजी घे. दगदग करुन घेवून नकोस. तब्येतीला जपा. वगैरे ". दुपारी पोस्टमन यायच्या वेळी आजोबा घराच्या बाहेर रस्यावर उभ राहून पत्राची वाट बघत बसायचे. एक दिवस जरी लेट झाला पत्र मिळायला कि पुढच्यावेळी गेलं कि हमखास सांगायचे.
आत्या खुप पत्र लिहायची मला. अंतर्देशीय वर. अभ्यास करण्याविषयी, नीट खाण्याविषयी. आपल घराण उच्च आहे . घराण्याची मान खाली घालण्यासारखे कृत्य करू नको असले अगदी फिल्मी हायली इमोशनल डायलॉग. आदर्श वाग, उलट बोलु नको , दररोज तेल लाव हे तर हमखास असायचेच. आत्या त्याकळी बी ए झालेली आणि पहिली आलेली त्यामुळ अगदी साहित्यिक लिहायची. Happy

छान लेख आणि प्रतिसाद तर उत्तमोत्तम आहेत....
माझा जन्म झाला आणि जेव्हा तेव्हा पत्र जवळपास बंदच झाले होते.... कारण सगळ्यांच्या हातात फोन आले होते.

पण एक आठवण आहे, माझी आत्या आमच्या बरोबर राहायची. कारण काका जम्मू ला होते. आर्मी ऑफिसर म्हणून. दर महिन्याला त्यांची एक तार यायची. तार म्हणजे पत्रच पण अती तातडीच्या निरोपासाठी पाठवले जायचे. पोस्टमन काका दारामध्ये आले रे आले, की पळत जाऊन पत्र घ्यायची. आमच्या कोणाच्याही हातात लागु ही देत नसे. Bw

ऑफिसर म्हणून. दर महिन्याला त्यांची एक तार यायची
>>>>>>>

‘तार’ वरून काही जुने प्रसंग आठवले. माझे दोन काका आणि मामा परगावी होते. त्या चौघांनाही अकाली मरण आले. दोघे अपघातात गेले तर अन्य दोघे आजाराने. या सर्व प्रसंगी ती दुखद बातमी आम्हाला तारेनेच आली होती. त्यामुळे माझ्या आईने ‘तार’ शब्दाचा धसकाच घेतला होता. त्यामुळे कुणाच्याही घरी रात्री अपरात्री ‘तार’ असे ऐकले की ‘अरेरे, कायतरी वाईट बातमी’, असे मनात समीकरण झाले होते.

पुढे मोठेपणी लोकांना नोकरीच्या मुलाखतीचे बोलावणे तारेने येताना पहिले. मात्र कुठल्याच आनंदाच्या प्रसंगी तार आल्याचे माझ्या पाहण्यात नाही.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

पत्राच्या अनुभवांच्या जोडीला वर तारेचा उल्लेखही रोचक वाटला. वर स्वप्नील आणि साद म्हणतात त्याप्रमाणे ‘तार = वाईट बातमी’ हे बरेच अनुभवले आहे.

त्या काळी दर दिवाळीला पोस्टमन जसे ‘दिवाळी मागायला’ येत तसे हळूच तारवाली मंडळीही येत. मग ज्यांच्या घरी ३-४ वर्षांत तार आलीच नसे असे लोक त्यांच्याशी ‘कसली दिवाळी’ म्हणून हुज्जत घालत ! त्यावर एकदा एक तार कर्मचारी असे म्हणाले, “अहो काका, आम्ही कधी वाईट बातमी घेऊन आलो नाही हीच तुमच्यासाठी आनंदाची बातमी नाही का ? “

“अहो काका, आम्ही कधी वाईट बातमी घेऊन आलो नाही हीच तुमच्यासाठी आनंदाची बातमी नाही का ? “
Submitted by कुमार१ on 2 October, 201
>> हे वाचून हसावं की रडावं असं वाटलं.

भारतातील तारखाते २०१३मध्ये बंद झाले. कारण मोबाईल प्रसारामुळे त्याची गरज संपली होती. मात्र काही प्रगत देशांत ते अजून चालू ठेवले आहे.

रशिया, कॅनडा आणि काही युरोपीय देशांत ते चालू आहे. स्वीडन आणि यु.के. तील काही हौशी लोक त्याचा वापर गम्मत म्हणून करत असतात.

लेख आणि प्रतिसाद छान आहेत.

त्याकाळच्या स्पॅम पोस्टकार्डांचा उल्लेख कोणी कसा नाही केला अजून? कोणत्यातरी देवीच्या नावाने १० जणांना 'ब्ला ब्ला ब्ला' मजकूर असलेले कार्ड पाठवा, नाहीतर शाप लागेल वगैरे...

अमी,
धन्यवाद.

तुम्ही म्हणता तो उल्लेख मी यापूर्वीच माझ्या “१/१/२१०२, स.न. वि. वि.’ या लेखात केला आहे:
https://www.maayboli.com/node/59966
त्यात ‘टपालाचा’ इतिहास वगैरे सर्व आले आहे.
प्रस्तुत लेख व्यक्तिगत पत्रलेखनाचा छंद या हेतूने लिहिला आहे.

तुम्हांला पत्रलेखनाची दांडगी आवड होती असं लेखातून दिसतंय. आणि त्याला तसाच प्रतिसाद मिळाला हे छान !

यावरून आठवलेल्या काही गोष्टी - आकाशवाणी (मुंबई ब) वर श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम- कृतानेक नमस्कार- असे. त्यात आणि आपली आवड साठी काही श्रोत्यांची नावं नेमाने ऐकून पाठ झाली होती.
विविधभारतीवर अजूनही पत्रापत्री चालते. महिलांसाठीच्या 'सखी सहेली' या कार्यक्रमात देशभरातल्या . विशेषतः ग्रामीण भागातल्या स्त्रियांची जिव्हाळ्याने भरलेली पत्रं असत.
वृतपत्रांच्या वाचक पत्रांतही काही नावे नियमित असतात.

अभिप्रायाची (आणि शुद्धलेखनाच्या / व्याकरणाच्या / तपशिलाच्या चुका) दाखवणारी (इ)पत्रं सुद्धा अनेकदा आळसामुळे डोक्यातच राहून जातात. क्वचित लिहिलीत तेव्हा त्यांची दखल घेतली गेली. एका दिवाळी अंकावर संपादकांना सविस्तर अभिप्राय पाठवल्यावर त्यांचा फोन आला. एका साहित्य संमेलनात त्यांची भेटही झाली.

वृत्तपत्र - पुरवणीत सदर लिहिणार्‍या एका अभिनेत्रीने ईमेलला आवर्जून उत्तर दिलं. पुढे त्यांच्या एका जुन्या मालिकेतल्या कपडेपटाबद्दल शंका विचारल्याचं मात्र त्यांना फारच लागलं.

आता इथे लिहिण्याचं कारण म्हणजे आताच नववी- दहावीच्या मुलांना सहामाही परीक्षेसाठी पत्रलेखनाबद्दल सांगितलं. तर त्यांच्याकडूनच नवी माहिती कळली.
पत्ता, मायना, दिनांक इ.साठी राखीव गुण अस ल्याने मुलांना हा प्रश्न आवडतो. तसंच कोणतं पत्र येणार हेही आधीच सांगितलेलं असतं.
तर एका गटात ल्या मुलांनी पोस्टाने येणारे पत्र पाहिलेच नाही, असं लक्षात आलं. मग त्यांना असं पत्र नेऊन दाखवलं. विंडो एन्व्हलप कसं वापरतात तेही. पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र, पोस्टाचं पाकीट कसं असतं ते चित्र काढून दाखवलं.

नववीच्या मुलांसाठी फळ्यावर पत्राचा आराखडा दाखवायला सुरुवात करताच त्यातली अनेक , एका सुरात म्हणाली की यावर्षीपासून ते सगळं बदललंय. हा आराखडा आठवीपर्यंत होता. आता सगळे भाग डाव्या समासाला चिकटूनच लिहायचे . तसंच तारीख प्रेषकाच्या पत्त्याच्या आधी येते. हा बदल कधी , कसा झाला , कोणी केला ते कळलं नाही. पाठ्यपुस्तकात त्याचा उल्लेख नाही. पण सगळ्या गाइड्समध्ये मात्र हा नवा आराखडाच वापरलाय. यंदापासून पाकीट आणि तिकीटही काढायचं नाही.

इतरांनी आपल्याला लिहिलेली पत्रे प्रकाशित करण्यासंबंधाने
- माझ्या नात्यातल्या एका ( लेखक, प्रवचनकार) व्यक्तीने त्यांना आलेल्या पत्रांचे संकलन प्रकाशित केले होते. त्यात त्यांनी पाठवलेले ( स्वलिखित) पुस्तक मिळाल्याची पोच, अभिप्राय, मुलाच्या मृत्यूनंतर आलेली दुखवटापत्रे यांचा भरणा होता. यात प्रकाशित करण्यासा रखे काय आहे, असा प्रश्न मला पडलेला.

दुखवट्याची पत्रे लिहिणे कठीण. घरोघरी फोन नसलेल्या काळातली हकीगत. आईचे काका वारले तेव्हा चुलतभावाला दुखवट्याचे पत्र पाठवायचे होते. बाबांचा पत्राशी संबंध फक्त पानेवाला (त्यांना त्यांच्या भाच्यांकडून आणि धाकट्या दोन भावंडांकडून येणार्‍या पत्रांना हौशी साहित्यकृती म्हणता आले असते) इतकाच. त्यांनी ऑफिसमधल्या सहकार्‍याकडून पत्र लिहून आणले, ते पूर्ण फॉर्मल होते. मी कॉलेजात असेन, पण शिंगं फुटलं होती. हे पत्र पाठवायचं नाही, असं म्हणून मी आईलाच पत्र लिहायला सांगितलं आणि तिने तिला जे वाटतंय ते शब्दांत उतरवलं.

भरत,
धन्यवाद. तुमचे अनुभव छान आहेत.

पत्ता, मायना, दिनांक इ.साठी राखीव गुण असल्याने मुलांना हा प्रश्न आवडतो.

>>
हे वाचून आनंद वाटला.

अरेच्चा, हा लेख कसाकाय सुटला होता माहीत नाही पण बर्‍याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
मला डेन्मार्कच्या एका मुलीकडून सर्वप्रथम पत्र आले होते आणि मग मी उत्तर दिले, अशी आमची पत्रमैत्री सुरू झाली. शाळेत असताना मला ३२ पत्रमित्र होते (पाकिस्तानमधील १ मित्र आणि बाकी सगळ्या मैत्रिणी). इंग्रजीत पत्र लिहिण्याचा सराव होईल म्हणून वडिलांनी पण प्रोत्साहन दिले. शिवाय घरी १ मराठी आणि टाइम्स ऑफ ईंडिया अशी २ वर्तमानपत्रे येत असत. टाइम्सच्या संपादकाला नेहमी पत्र लिहिणारी १ व्यक्ती लक्षात आहे, त्यांची पत्रे मी आवडीने वाचत असे. (नाव बहुधा पी. वॉरियर का एम. वॉरियर असे काहीतरी होते, आता लक्षात नाही.) नंतर हॉस्टेलला राहताना घरी पोस्टकार्ड लिहिले जात असे.

तारेवरून १ प्रसंग आठवला. आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल बाबुराव नाईक होते. परीक्षेआधी मित्र सुट्टीसाठी घरी गेला होता. परीक्षेची तारीख जाहीर झाली की त्याला तार करून बोलवायचे होते. कमी पैसे खर्च व्हावेत म्हणून कमीत कमी शब्द वापरून तेव्हा मी त्याला तार केली होती Baburao dead, Start immediately. (मयताची तार रेग्युलर पैशात पण अर्जंट म्हणून जाते या कारणास्तव).

लेखात HAM रेडिओबद्दल काही लिहिलेले नाही, पण तो प्रकारपण मस्त होता. Victor Uniform 2 असे फोनेटिक बोलताना मजा येत असे कारण भारतातल्या सगळ्या कॉल साइन VU2 ने सुरू होणार्या असतात. शिवाय शॉर्टवेव्ह रेडिओवर वेगवेगळी स्टेशन्स ऐकून त्यांना पत्र लिहून मग QSL कार्ड मिळवणे हा पण गमतीशीर छंद होता.

जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आता पत्र पाठवून जुन्या पत्रमित्र/मैत्रिणींना परत शोधता येते का ते बघतो. Happy

उ बो ,
छान पत्रमैत्री. मजा आली असणार नक्की !

मयताची तार रेग्युलर पैशात पण अर्जंट म्हणून जाते या कारणास्तव).
>>>>
मस्तच, धमाल झाली असेल तेव्हा.
जरूर शोधा जुने मित्र !
..
माझे पत्रमित्र सुरवातीस ३-४ होते. पण, दीर्घकाळ (सुमारे २० वर्षे) मैत्री फक्त एकांशीस टिकली. आम्ही दोघेही वृत्तपत्रलेखक असल्याने असेल. गंमत म्हणजे आजपर्यंत आम्ही दोघे एकमेकाला भेटलेलो नाही पण एकमेकाची खडानखडा माहिती दोघांना आहे. पुढे इ-माध्यम आल्यावर काही काळ इ-मेल्स झाल्या. त्यानंतर त्यांना ‘कायप्पा ग्रुप’ मध्ये रस असल्याने आणि मला नसल्याने सध्या तरी ती लिखित मैत्री थांबली आहे.

तार म्हणजेच वाईट बातमी यावरून आठवले आमच्या गावी कोण वारले तर मजकूर अर्ध्या पोस्टकार्डवर दोन ओळीचा असायचा. त्यामुळे अर्धे कार्ड म्हणजे कोण तरी वारले असा ठोकताळा होता.

दत्तात्रय,
अगदी अगदी. आठवताहेत अशी पोस्टकार्डे लहानपणी पाहिलेली
...........

सामाजिक पत्रलेखन जेव्हा बहरात होते त्या काळी पुढील वाक्य खूप प्रसिद्ध होते :
‘पत्र हे संवादाचे सोपे, स्वस्त आणि प्रभावी माध्यम आहे’.

त्यावरून पत्र आणि फोन यांची अशी तुलना करता येते:
१. पत्र लिहिणारा स्वतःच्या मोकळ्या वेळात ते लिहितो. ते संबंधितास पोचल्यावर तो त्याच्या मोकळ्या वेळातच ते वाचतो. त्यामुळे हे दोघेही एकमेकाच्या वेळेवर आक्रमण करीत नाहीत. पत्रातील एखाद्या मुद्द्याचे उत्तर शांत विचार करून लिहीता येते.

२. फोनचे तसे नाही. फोन करणारा त्याच्या सोयीच्या वेळात करतो. पण, तेव्हा फोन घेणारा मोकळा असतोच असे नाही. त्याला तो व्यत्यय वाटू शकतो.

.. जेव्हा संदेशवहन तातडीचे नसेल तेव्हा पत्र हे सुरेख माध्यम ठरते.

Pages