आंबा/फणस/केळं/तवसं/भोपळा पातोळी(हळदीच्याच पानावरच वाफवलेली). :)

Submitted by देवीका on 5 August, 2019 - 23:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खरे तर ह्याची कसली आलीय कृती. पण काल नागलंचमीला बर्‍याच वर्षांनी आंब्या आणि फणसाच्या केल्या म्हणून लिहितेय.

111627B8-2C60-4D66-AB48-E4A118BFA4FF.jpeg

१ वाटी घरगुती केलेल्या तांदूळाची पीठी,
३/४ वाटी पाणी,
मीठ
१/४ घरगुती आंब्याचा मावा( आटीव रसाचा गोळा), हा जर नसेल तर तयार आंब्याचा रस जरासा आटून घ्या.
फणसाच्या पातोळी करणार असेल तर फणसाचा ताजा गर.

हळदीची पाने( नाही मिळाली तर ह्याच्याशिवाय करुच नका),

चवः नेहमीसारखाच ताजं खोवलेले खोबरे, गुळ, भाजलेली खसखस १ चमचा, भिजवलेल्या अक्रोडची खडाबडीत पूड, वेलची, केसर आवडीप्रमाणं, चवीला मीठ

क्रमवार पाककृती: 

-नेहमीप्रमाणेच उकड करायची पण पाणी ३/४ घ्यायचे एका वाटीला. जर आंब्याच्या करायच्या असतील तर शेवटच्या स्टेप्सला गॅस बंद करून आंबा मावा घालून उकड मउसूत करून घ्या. लगेच झाकून ठेवा.
-फणसाच्या करणार असाल तर गॅस अगदी कमी करून, फणसाचा गर घालून घोटून घ्या. पाणी आळले की, मळून लगेच झाकून घ्या. मी पाव भाजीचा मॅशर घेते जरासे तेल लावून. उकड एकजीव होते.
- हळदीची पाने धूवून घ्यावी. आधी पाण्याचा हात लावून उकड पानाच्या लांबट मध्य शीरेच्या वर थापून कडेकडेने पातळ करत एकाच जाडीची थापावी, चव आडवा भरावा. पान आडवे बंद करावे.
- सर्व पाने भरून झाली की, मोदक उकडतो तसेच मोजून १२ मिनिटे वाफवावे वाफेच्या जाळीला जरासे तेल लावून. पान काळसर झाले की समजायचे पातोळी शिजली. थंड झाले की पान आपोआप सुटते. घरच्या लोणच्या बरोबर खावे.
नोटः आम्ही पान आडवे बंद करतो व हि आमच्या घरची पद्धत आहे.
अतिशय सुंदर लागते पातोळी. आंबा, हळदीचा सुवास आणि खोबर्‍याचा चव अप्रतिम लागते.

आता हि कृती कशी सुचली:

बर्‍याच जणांनी विचारलेय की मला कसे सुचले. पण खरे तर ह्याचे श्रेय माझी सुगरण आई आहे , तिची क्रीयेटीवीटी आणि पारंपरीक गोवन कोंकणी रेसीपीमध्ये केलेले बदल आहे. ती बरेच प्रयोग करे मुळच्या रेसीपीत आम्हा मुलांना खुष करायला. खाण्याच्या बाबतीत.,अतिशय कटकटी अशी मुलगी मी आहे/होती.

पारंपारीक कोंकणी(गोव्याच्या) रेसीपीमध्ये, तवसं पातोळी अगदी अशीच करतात. त्यात एक कारण असे असते की, मुलांची सांडलवंड होत नाही सर्व एकत्र कालवून वाफवल्याने.
त्याची पद्धत अशी आहे.
तवसं पातोळी: पावसाळ्यात येणारी मोठी काकडी(तवसं) कीसून त्याच पाण्यात ओले खोबरं, तांदूळ पीठी, गुळ घालून केनवायचं(एकत्र करायचं). मग हळदीच्या पानात वाफवायचं.

ह्यावरून आंबा /फणस पातोळी करायची आई लहानपणी. मला एकेकाळी फणस अजिबातच आवडत नसे. मग आई असा फणस खायला घालायची. . आई भोपळ्याची पातोळी अशीच करते. भोपळा असाच उकडून तांदूळाच्या उकडमध्ये एकत्र कालवून, मग मध्ये चव भरून हळदीच्या पानात वाफवणे. अतिशय अप्रतिम अशी भोपळ्याची पातोळी लागते.
गावठी राजेळी केळ्याची सुद्धा अशीच पण एकत्र कालवून करतात. हि पण अप्रतिम लागतात. रव्याची सुद्धा करते तांदूळ पीठी नसेल तर. पावसाळ्यात अश्या निरनिराळ्या पदार्थांची रेलचेल असते कोकणी घरात. कराल तितके प्रयोग कोकणी स्त्री/आई करते/आहेत.
पुर्ण श्रावण, वेवेगळ्या चवी मिळायच्या जरी वरून तोच पदार्थ दिसला तरी. ह्यात दुमत नाहीच.

अधिक टिपा: 

खास टिपः शिर्षक बदलले आहे त्यावरून कळेल की, हळदीचे पान हे नायिका आहे व त्याला पर्याय नाही. Happy त्यामुळे, कर्दळीची पानं, सोनटक्काची पानं, आले पानं, वगैरे पानं चालतील का विचारू नये. हि सर्व पानं एकाच जातकुळीतील आहे पण वेगवेगळी चव आणि उपयोग आहे.:). आपल्या जबाबदारीवर करून पहा. ( ह. घ्या.)

माहितीचा स्रोत: 
अम्मा/आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मल्लू लोकं , चक्का अडा मध्ये सगळं एकत्र कालवून केळीच्या पानात वाफवतात. हे असेच दिसतय प्रकरण. फक्त मध्ये सारण भरलय.

काय सुरेख दिसतय! सातकापे घावन सारखाच आहे का हा प्रकार. तांदूळ पिठी, ओला नारळ, गुळ असलेले सर्वच पदार्थ फ्फार आवडतात.

काय भारी रेसीपी आहे. अतिशय टेम्पटिंग !
आमच्याकडे एक कोकणस्थ आजी स्वयंपाक करायला यायच्या, त्या हळदीच्या पानातली पातोळी खूप मस्त बनवायच्या. -पण ही आंबा किंवा फणसाची कधी ऐकली सुद्धा नव्हती. मला दोन्ही फ्लेवर्सची अतिशय आवडतील. देविका तुला कशी सुचली? या रेसीपी साठी तुझं खूप कौतुक. आणि ते उकड मळण्यासाठी पावभाजी मॅशरची आयडिया पण एक नंबर. मी उकड मळण्यासाठी एवढं मोठं फूड प्रोसेसरचं भांड खराब करते.

जर हळदीची पान कुठे मिळाली तर मी ही रेसिपी ट्राय करण्याची हिंमत करेन.

मस्त कल्पना!.

सातकापे घावन सारखाच आहे का हा प्रकार. .>>>>>>तो प्रकार वेगळा.मोदकासारखा प्रकार आहे.

ते उकड मळण्यासाठी पावभाजी मॅशरची आयडिया पण एक नंबर. >>>>>> +१.

मंजुताई आटवलेल्या रसाचे जास्त छान टेस्टी होतील असं मला वाटतं.

मला फार काही पातोळे आवडत नाही, पानांचा सुवास खूप आवडतो आणि आटवलेला रस प्रचंड आवडतो, नुसताच खायला.

मस्त रेसिपी आहे.
मी फक्त गुळ ओल खोबर घालुन पातोळी बनवते.
आंबा/फणस याच सांदणं बनवल आहे, आता अशी पातोळी पण करुन बघेन.

छान आहे रेसिपी.
आमच्या घरी पण फक्त गुळ ओल खोबर घालुन पातोळी बनवतात.
अशी पातोळी करून बघेन.

छान आहे पा. कृ. साहित्य उपलब्ध झाल्यावर करून बघेन.
पातेळ्यांसंबधित आहे म्हणून एक प्रश्न इथेच विचारते. कोणाला माहित असेल तर सांगा.
कर्दळीची पाने विषारी असतात का? हळद / केळीच्या पानांना पर्याय म्हणून ती या पा. कृ. साठी वापरता येतील का?
हळदीची पाने नाही मिळाली तर ह्याच्याशिवाय करुच नका>>> असं स्पष्ट लिहिलं आहे खरं तर. माझ्या हळदीच्या बाळरोपाला जेमतेम ४ पानं आहेत सद्ध्या. तेव्हा हळदीचे पान नाही वापरता येणार इतक्यात.

पालघाट(पलक्कड) हे केरळमध्ये पण तमिळ लोक फार. तर त्यांचे अडाई खाल्ले आहे (भयपूर तूप ओतून खातात)थोडेसे वेगळे. गोड मोदक आवडणाऱ्यांना नक्की आवडेल.

मस्त आहे पदार्थ एकदम. ईथे जो फणस मिळतो तो थोडा कमी मऊ असतो. पण प्रयोग म्हणुन करून बघेन.
देविका, इथेच सांगते आता, तुझी काडा प्रशाद ची रेसीपी पण मला जमली. गहू डायरेक्ट भाजुन घेवून मग त्याचे पीठ केलेले आणि ते परत भाजलेले होते . धन्यवाद.

>>>पालघाट(पलक्कड) हे केरळमध्ये पण तमिळ लोक फार. तर त्यांचे अडाई खाल्ले आहे (भयपूर तूप ओतून खातात)थोडेसे वेगळे. गोड मोदक आवडणाऱ्यांना नक्की आवडेल.<<

मी हेच वरती लिहिलय की, केरलाईट बनवतात फणसाचे पण त्याला ‘अडा‘ म्हणतात हो. अडाई नाही.
आणि केळिच्या पानात थापतात नाहितर लवंग नाहितर तेजपत्ता. आमच्या शेजारी द्यायचा. भारीच गोड्मिट्ट प्रकरण.

वरचे कर्दळी वाचून मीच सांगते. लहानपणी मला मार्केटात नेहमीच फसवत. आणि नेहमी मी घरी ओरडा खायची इतकी अक्कल नाही तुला( घरातील व्यक्ती).
कर्दळीच्या पानाने फार काही नाही होणार, ज्यास्त खाल्ले तर फार फारतर हग** होइल. Wink विषारी वगैरे नाहिये. शिवाय हळदीचा सुवास नसेल पदार्थाला.

देवीका, सॉरी जरा गम्मत करतेय तुमच्या पानावर.

पातोळे हळदीच्या पानांवरच करायला हवेत, त्याची जागा कर्दळ, केळ यांचं पान घेऊ शकत नाही. त्या पानांचा स्वाद आणि सुवास हाच महत्वाचा, त्याची सर दुसऱ्या कशालाही नाही.

पानं जरा मोठी होऊदेत मग करा, चंद्रा.

रेसिपी छान आहे, करुन बघायला पाहीजे, हे सांगायचं राहिलंच की. आणि वरती सीमा ह्यांनी म्हंट्ल्यानंतर मी कडाह प्रशाद च्या धाग्यावर जाउन बघितलं, काय मस्त रेसिपीआहे ती पण . Happy

@धनुडी, अंजू
सहमत. पटतय तुम्ही दोघी म्हणताय ते.
दुधाची तहान ताक म्हणून कोणता पर्याय भागवेल त्याचा शोध घेत होते Happy
@झंपी,
बरं केलंत कर्दळीचे पान विषारी नाही ते सांगितलंत. जालावर कुठल्यातरी पा. कृ. त वापरल्याचे आठवत होते. कसे वापरले होते ते आता मुळीच आठवत नाही. ( त्या वेळी माझ्याकडे कर्दळ नव्हती! आता मस्त फोफावली आहे.) एखाद-दुसरे पान वापरून प्रयोग करून बघेन.
सर्वांना धन्यवाद!

शक्यतो नका वापरु कर्दळ.
एका माहितीत, कर्दळीची पानांची पेस्ट औषध म्हणून लावतात हेच माहितीय.
केळीचे वापरा ना, बेस्ट आहे .

पान बंद करावे,

मग ते उकडून घ्यायचे का ? म्हणजे आधी उकड , मग पुन्हा सारण भरून पुन्हा पान उकडायचे का ?

Pages