अळूची पातळ भाजी/ फदफदं/ फतफत आणि एक कथा

Submitted by 'सिद्धि' on 24 June, 2019 - 08:36

अळूची पातळ भाजी/अळूच फदफदं/ फतफत :-

अळूची पातळ भाजी हे नाव बहुतेक सगळ्यांना माहीत आहे, मात्र अळु भाजीच्या बुळबुळीतपणा या गुणधर्मावरुन अळूचं फदफदं हे नाव ठेवल गेल आहे.
अळू भाजीची पाने ही थोडी पातळ आणि पोपटीसर रंगाची असतात.
IMG_20190624_103351.jpg

तर अळू वडीसाठी थोडी जाडसर अन् गडद हिरवी, वरती मोठ्या गडद शीरा असणारी पाने वापरली जातात.
हा या दोघांमधील फरक आहे.
IMG_20190624_103303.jpg

अळूपासुन शरीरास मिळणारे फायदे:-
अळूच्या पानांमध्ये अ व क जीवनसत्त्वे असतात तसेच झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न आणि पोटॅशियम ही भरपूर प्रमानात आहे.
रक्त वाढवणे, ताकद वाढवणे यासाठी अळू भाजी उपयोगी ठरते.

एक कथा:-
मामाच्या गावी गेल्यावर केव्हा-केव्हा हा अळूच्या फदफद्याचा बेत अजुनही होतो. आणि आजीचा "भात भाकरी आहे हो. खुपच आवडल म्हणुन नुसत फदफदंयावर भागवु नका" असा टोला पण असतोच. आजी अस का म्हणते ग ? नेहमी अस विचारताच ती तिची नेहमीचीच, पुर्वापार चालत आलेली कथा रंगवून सांगत असते. मला ही तिच ती कथा परत-परत ऐकायला आवडत. विषय अळुचा आहे म्हणुन ती कथा मी इथे टाकत आहे.

तर कथा अशी आहे.... "एक नवविवाहीत जावई बायको सोबत तिच्या माहेरी जेवणासाठी आलेला असतो, घरी अठराविष्व दारिद्र्य, धान्य नाही, जावयाचा पाहुणचार कसा करावा ? हा सासुबाईंना पडलेला प्रश्न. मनाशी काही तरी ठरवुन त्या गाठीशी असलेले पेलाभर तांदुळ शीजत घालतात. परसातील कोवळी अळुची पाने काढुन भरपुर प्रमानात अळूचं फदफदं बनवतात. जावई जेवायला बसल्यावर पापड-कुर्ड्या, भात आणि फदफदं असा बेत पानामध्ये वाढला जातो. जावईबुवा भातावरती यथेच्छ पसरवलेल फदफदं समपवुन "वा छान झाल आहे फदफदं" अस म्हणत खाली असणार्या भाताला हात लावणार तेवढ्यात सासुबाई " आवडल ना मग घ्या अजुन लाजू नका" अस म्हणत वरती प्रेमानेच(?) अजुन फदफदं वाढत.
आता फदफदं खाउन तृप्त (?) झालेला जावईबुवा पानात लावलेलाच भात कसाबसा संपवुन सासुरवाडीचा प्रेमभावे निरोप घेतो. वरती अजुन फदफदं वाढत असताना सासुबाईच्या तोंडुन सारख बाहेर पडणार एक वाक्य मात्र तो कायमचच लक्षात ठेवतो. "भात भाकरी आहे हो. खुपच आवडल म्हणुन नुसत फदफदंयावर भागवु नका.""
आजीची कथा संपली की आम्ही पोट धरुन हसतो, आणि तितकच वाईट ही वाटत.
तर "अळूची पातळ भाजी,अळूचं फदफदं किवा अळूचं फतफत " काहीही म्हणा याची मी करत असलेली पाककृती मी इथे पोस्ट करत आहे.

साहित्य:
अळूची पाने ५-६,
शेंगदाणे व चणाडाळ दोन्ही छोटी अर्धी वाटी.
1561375766492.jpgफोडणीसाठी साहित्य:
तेल ४ टेबल स्पून ,१ छोटा चमचा मोहोरी ,हिंग चविनुसार (ऐच्छिक), १/२ चमचा हळद व तितकाच गरम मसाला , १ चमचा लाल तिखट,अर्धा कादा आणि टोमटो(ऐच्छिक), लसुन २-३ पाकळी, मिठ चविनुसार, १ चिंच किवा कोकमाची साल, १ तमालपत्र (ऐच्छिक), 2-4 मेथ्याचे दाणे (ऐच्छिक).
गोडा मसाला २ मोठे चमचे.
IMG_20190624_102204.jpgकृती:
शेंगदाणे/चणाडाळ ४ तास पाण्यात भिजत ठेवावा, अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. देठं वरिल पातळ आवरन काढुन घ्यावे. नंतर पाने व देठंही बारीक चिरून घ्यावे. हे सर्व प्रेशर कुकरमध्ये पाहीजे तेवढे पाणी घालुन १ शिट्टी करून शिजवून घ्यावे. (नंतर फोडणीमध्ये वरुन पाणी घालु नये)
1561373629223.jpg
कढईत तेल गरम करून फोडणीसाठी साहित्याच्या दिलेल्या क्रमनुसार फोडणी करून घ्यावी. यात चिरलेली अळूची पाने आणि देठं घालावीत. झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवावे.
1561366496062.jpg
वरुन भुरभुरायला आवडत असेल तर थोडस ओल खोबर घालु शकता.
गावठी तांदळाचा भात किवा भाकरी बरोबर खायला घ्या, पावसाळ्यात एक मस्त बेत होउन जाईल.
1561373659880.jpg टिप:
१) अळूत ऑक्झॅलिक अ‍ॅसिड असल्यामुळे खाताना घशाला खाज सुटते, त्यासाठी चिंच, कोकम किवा आमसूल घालावा लागतो.
अळू चिरताना हातालाही खाज सुटते, त्यासाठी हाताला चिंचेचा कोळ लावून, अथवा साधे प्लास्टिकचे ग्लोज घालुन ते चिरावं लागत.
२) शिजवून घेतलेला अळु मिक्सर करुन किवा मस्त पैकी घाटुन घेतला की भाजी मिळुन येते.
३) अळूच्या देठा पासुन देठी हा रुचकर पदार्थ ही बनवता येतो.

( एक कथा आणि पाककृती दिन्ही समाविष्ट असल्याने मी हा धागा "कथा आणि पाककृती" दोन्ही विभागात टाकत आहे याची नोंद घावी.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
आमच्याकडे अळूची 'भाजी' च म्हणतात आणि पद्धत थोडी वेगळी आहे..

अळू नुसत्या पाण्यात आधी शिजवून घेतात आणि घोटून घेऊन त्याला थोडं बेसन पीठ लावतात. शिजतानाच त्यात थोडे शेंगदाणे, भिजवलेली चण्याची डाळ (एक चमचा), थोडे सुक्या खोबर्‍याचे काप घालतात. हे सगळे प्रकार दाताखाली आले की मस्त लागतात. मग त्यात चिंच-गूळ, काळं तिखट आणि मीठ घालतात. आणि वरून फोडणी. फोडणी सोबतच लाल तिखट घालायचं..म्हणजे रंग छान येतो..ही भाजी आवडते आमच्याकडेही खूप सगळ्यांना.

मीरा,सस्मित धन्यवाद.

शरी - मस्त रेसिपी सांगितली आहे.
वरून फोडणी केली की छानच रंग येतो.
कश्मिरी मिरची पावडर घालायची अजुन छान रंग येतो.
पण बेसन पीठ का लावतात समजल नाही?

ब्राह्मणी शुभकार्यात आणि लग्नसमारंभात अळूची भाजी असतेच असते. >>>>> मला अश्याच शुभकार्यातील भाजी प्रचंड आवडते. खुप प्रय्त्न करुनही घरी अशी चव साधता येत नाही.

कोकणातली आणि देशावरली (घाटावरची) पध्दत यात बराच फरक आहे. आमचे आळूचे फदफदे पिवळसर हिरवे होते. टोमॅटो, कांदा घालत नाहीत. शेंगदाने, डाळ आणि खोबऱ्याचे काप घालून करतो. बेसनपिठ लावतो थोडेसे. चिंच असते. भाजी शिजत आली की मग वरुन गोडा मसाला, आणि भरपुर गुळ घालून झाकण लावायचे. भाताबरोबर खायचे असेल तर शिजताना भाजीत मुळा टाकतो. मस्त लागते. या भाजीत वाल टाकतात हे माहीत नव्हते. कसे टाकायचे? कोणते?

वावे धन्यवाद.

वैशालीताई सफेद-पिवळे मध्यम आकाराचे वाल आम्ही पण घालतो .
छोटे कडवे वाल नाही घालत.
वालाला पावटे असंही म्हणतात आमच्याकडे.

वैशाली, तुमची आणि आमची पध्दत सारखी दिसतेय!

सिद्धी, बेसन पीठ मिळून येण्यासाठी!! जवळपास सगळ्या पालेभाज्या अशा बेसनपीठ लाऊन पातळसर करता येतात..अळूला चिंच गूळ लावावा लागतो नाहीतर खाज येते..

अळूला चमकोरा सुद्धा म्हणतात काही भागात. ह्यातल्या 'च' चा उच्चार चहा मध्ल्या च सारखा करतात.

पुण्यात एक प्रसिद्ध केटरर आहेत.त्यांची अळू भाजी जबरदस्त असते.

Submitted by mi_anu on 25 June, 2019 - 07:06

केटरर चे नाव सांगितलेत तर तो अब्रू नुकसानी चा दावा ठोकेल का madam?
किमान कोणत्या कार्यालयात त्याचे केटरिंग असते ते तरी सांगा Happy

तेरें किंवा तेरं ही खायच्या अळवाची एक मध्यम दर्जाची जात आहे. ह्याची पाने पोपटी आणि देठही फिकट पोपटी रंगाचे असतात. ह्याचे कंद जमिनीतून फार भराभर पसरतात त्यामुळे हे खूप पसरते. देठ फार मांसल नसतात. काड्या म्हणता येईल असे असतात. उलट भाजीचे अळू गडद हिरव्या म्हणजे काळसर हिरव्या रंगाचे जराश्या जाड पानांचे आणि काळसर देठांचे असते. हे अळू तेर्‍यापेक्षा चविष्ट असते. वडीचे अळू वेगळेच असते. देठाकडे पानांची टोके त्रिकोणी आकारात असतात. साध्या अळवाची गोलसर असतात. वडीच्या अळवाच्या पानांचा रंग पोपटी कधीच नसतो, आणि गडद हिरवाही नसतो. पानांवर शिरा उठून दिसतात. पाने बाहेरच्या बाजूने पांढरट असतात. हे अळू कमी पसरते.
अळवाच्या अनेक जाती आहेत. पण आजकाल तेरेच खूप मिळते. भाजीच्या अळवामध्येदेखील तेरे खूप माजते. त्यामुळे विकण्यासाठी कापताना दोन्ही तर्‍हांची पाने एकत्र होतात. चवीतला फरक सरसकट सगळ्यांना कळण्यासारखा नसतो. भाजीच्या अळवाला पाणी कमी पडले तर त्याची पानेही तेर्‍यासारखी फिकट आणि देठ पांढरट होतात.
आणखी एक माडाळू म्हणून जात असते. त्याचे कंद मोठे असतात. हे फारसे पसरत नाही त्यामुळे कंद जपून ठेऊन पुन्हा लागवड करावी लागते. उंदीरघुशी नसल्या तर जमिनीतही राहू शकतात. ह्याची पाने मांसल, आकाराने बरीच मोठी, काळपट हिरवी असतात. हे जवळजवळ छातीइतके उंच रसरशीत वाढते. म्हणून माडाळू. हे अतिशय चविष्ट असते. मांसलपणामुळे पटकन मिळून येते. बाजारात अगदी क्वचित दिसते.
अळवाची भाजी अनेक प्रकारे करतात. कोणी तूर किंवा मसूर डाळ भिजवून शिजवून त्यात घालतात, कोणी आंबट चुका, मुळ्याचे तुकडे, सुके खोबरे घालतात, कोणी चिंच घालतात, काजू, शेंगदाणे घालतात. काहींना यात सोललेले वाल हवेतच तर काहींना काळे वाटाणे. फणसाच्या बियांचे तुकडेही घालतात. काही लोक एक छोटासा अक्खा कांदा निखार्‍यावर भाजून वाटून घालतात. काही लोक धुवून बारीक चिरलेली पाने आणि देठ कढईत थोड्या तेलावर गोळा होईपर्यंत परतून घेतात. यामुळे खाज येत नाही असे म्हणतात. लसूण फोडणीची प्रथा बहुतेकांकडे आहे. गोवा कारवारकडे खोबरे भाजून घालतात. मिरे, धनेही असते. हे अळू चवीला अगदी वेगळेच लागते. (इथे लसूण नसते.) टोमॅटो घातलेला मात्र फार पाहिला नाही.

केटरर जोशी-गोखले बहुतेक
मित्र मंडळ आणि ज्ञानल कार्यालयात लग्न असेल तेव्हा यांचे केटरिंग असते.सध्या जवळपास कोणीच लग्न करत नसल्याने रिसेन्ट डाटा माहीत नाही ☺️☺️☺️

हीरा, खूप छान माहिती!

गोवा कारवारकडे खोबरे भाजून घालतात. मिरे, धनेही असते.>>>> हे नवे आहे माझ्यासाठी! मूगागाठी करताना अशी करतात,मिरी वगळून!

जोशी-गोखले सुपर्ण हॉललाही केटर करतात बहुधा. Happy ज्ञानलवाले ते हेच की वेगळे ते माहीत नाही. जेवण चविष्ट असतं सुपर्णचंसुद्धा.

मस्तच.

शरी, विनीता देशपांडे सगळ्यांचे धन्यवाद.

हीरा - छान माहीती .
फणसाच्या बियांचे तुकडेही घालतात. काही लोक एक छोटासा अक्खा कांदा निखार्‍यावर भाजून वाटून घालतात. काही लोक धुवून बारीक चिरलेली पाने आणि देठ कढईत थोड्या तेलावर गोळा होईपर्यंत परतून घेतात.
- हे सगळं पहिल्यांदाच ऐकते. ही नवीन माहिती मिळाली आहे.

मला अळुच फदफद प्रचंड आवडते. मी एकटाच राहत असल्याने ईच्छा होऊनही आवर घालावा लागतो, कारण 2-3 दा केले पण जास्त झाल्याने उरले.
पुण्यात किंवा महाराष्ट्राच्या अनेक भागात शुभ प्रसंगी अळुच फदफद करतात असे ऐकून होतो (आमच्या नागपूरला बहुधा पालकाचीच पातळ भाजी असते). मात्र पहील्यांदाच पुण्यात व तेही सुपर्ण मध्ये लग्नास जाण्याचा प्रसंग आला. तिथे जेवणातील ईतर पदार्थांशिवाय अळुच्या फदफद्याची अप्रतिम चव जीभेवर अजूनही रेंगाळते आहे. मी किती वाट्या ओरपल्या हे नीटस् मला आठवत नाही, पण अजूनही पुण्यास गेलो की सुपर्णची आठवण येते. तस फदफद ईतर ठिकाणी अद्यापतरी भेटले नाही.
धन्यवाद सिद्धी (पाककृतीसाठी), अनु व वावे (सुपर्णतील अळुच्या फदफद्याची आठवण जागवल्याबद्दल).

फदफदे कू इत्ने चाह्नेवाले? बात हजम नही हुई.

नवीन Submitted by JayantiP on 27 June, 2019 - 10:37 >>> अहो खुप छान असते ते चवीला, झणझणीत केले तर अहाहा, नसेल खाल्ले तर कधी तरी चव चाखाच याची

VB एकदाच खाल्लं पण आचाऱ्याला बहुतेक जमलं नसेल, तेव्हा आवडलं नव्हतं. >>> ओह्ह, जर कधी गटग ठरले एखादे अन मी येणार असेल न तर मी आणेन फदफद, मटण रस्स्यापेक्षा भारी लागते चवीला

ओह्ह, जर कधी गटग ठरले एखादे अन मी येणार असेल न तर मी आणेन फदफद, मटण रस्स्यापेक्षा भारी लागते चवीला.
- मग होउदे गटग आम्ही पण येऊ.

सिद्धी , डन ☺️

<<<<पण मी आलो तर आवडेल का लोकांना>>>> का नाही आवडणार? इकडचे रुसवे फुगवे , भांडणे मनावर घ्यायची नाही, ती इथली इथेच सोडून द्यायची☺️

Pages