अळूची पातळ भाजी/ फदफदं/ फतफत आणि एक कथा

Submitted by 'सिद्धि' on 24 June, 2019 - 08:36

अळूची पातळ भाजी/अळूच फदफदं/ फतफत :-

अळूची पातळ भाजी हे नाव बहुतेक सगळ्यांना माहीत आहे, मात्र अळु भाजीच्या बुळबुळीतपणा या गुणधर्मावरुन अळूचं फदफदं हे नाव ठेवल गेल आहे.
अळू भाजीची पाने ही थोडी पातळ आणि पोपटीसर रंगाची असतात.
IMG_20190624_103351.jpg

तर अळू वडीसाठी थोडी जाडसर अन् गडद हिरवी, वरती मोठ्या गडद शीरा असणारी पाने वापरली जातात.
हा या दोघांमधील फरक आहे.
IMG_20190624_103303.jpg

अळूपासुन शरीरास मिळणारे फायदे:-
अळूच्या पानांमध्ये अ व क जीवनसत्त्वे असतात तसेच झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न आणि पोटॅशियम ही भरपूर प्रमानात आहे.
रक्त वाढवणे, ताकद वाढवणे यासाठी अळू भाजी उपयोगी ठरते.

एक कथा:-
मामाच्या गावी गेल्यावर केव्हा-केव्हा हा अळूच्या फदफद्याचा बेत अजुनही होतो. आणि आजीचा "भात भाकरी आहे हो. खुपच आवडल म्हणुन नुसत फदफदंयावर भागवु नका" असा टोला पण असतोच. आजी अस का म्हणते ग ? नेहमी अस विचारताच ती तिची नेहमीचीच, पुर्वापार चालत आलेली कथा रंगवून सांगत असते. मला ही तिच ती कथा परत-परत ऐकायला आवडत. विषय अळुचा आहे म्हणुन ती कथा मी इथे टाकत आहे.

तर कथा अशी आहे.... "एक नवविवाहीत जावई बायको सोबत तिच्या माहेरी जेवणासाठी आलेला असतो, घरी अठराविष्व दारिद्र्य, धान्य नाही, जावयाचा पाहुणचार कसा करावा ? हा सासुबाईंना पडलेला प्रश्न. मनाशी काही तरी ठरवुन त्या गाठीशी असलेले पेलाभर तांदुळ शीजत घालतात. परसातील कोवळी अळुची पाने काढुन भरपुर प्रमानात अळूचं फदफदं बनवतात. जावई जेवायला बसल्यावर पापड-कुर्ड्या, भात आणि फदफदं असा बेत पानामध्ये वाढला जातो. जावईबुवा भातावरती यथेच्छ पसरवलेल फदफदं समपवुन "वा छान झाल आहे फदफदं" अस म्हणत खाली असणार्या भाताला हात लावणार तेवढ्यात सासुबाई " आवडल ना मग घ्या अजुन लाजू नका" अस म्हणत वरती प्रेमानेच(?) अजुन फदफदं वाढत.
आता फदफदं खाउन तृप्त (?) झालेला जावईबुवा पानात लावलेलाच भात कसाबसा संपवुन सासुरवाडीचा प्रेमभावे निरोप घेतो. वरती अजुन फदफदं वाढत असताना सासुबाईच्या तोंडुन सारख बाहेर पडणार एक वाक्य मात्र तो कायमचच लक्षात ठेवतो. "भात भाकरी आहे हो. खुपच आवडल म्हणुन नुसत फदफदंयावर भागवु नका.""
आजीची कथा संपली की आम्ही पोट धरुन हसतो, आणि तितकच वाईट ही वाटत.
तर "अळूची पातळ भाजी,अळूचं फदफदं किवा अळूचं फतफत " काहीही म्हणा याची मी करत असलेली पाककृती मी इथे पोस्ट करत आहे.

साहित्य:
अळूची पाने ५-६,
शेंगदाणे व चणाडाळ दोन्ही छोटी अर्धी वाटी.
1561375766492.jpgफोडणीसाठी साहित्य:
तेल ४ टेबल स्पून ,१ छोटा चमचा मोहोरी ,हिंग चविनुसार (ऐच्छिक), १/२ चमचा हळद व तितकाच गरम मसाला , १ चमचा लाल तिखट,अर्धा कादा आणि टोमटो(ऐच्छिक), लसुन २-३ पाकळी, मिठ चविनुसार, १ चिंच किवा कोकमाची साल, १ तमालपत्र (ऐच्छिक), 2-4 मेथ्याचे दाणे (ऐच्छिक).
गोडा मसाला २ मोठे चमचे.
IMG_20190624_102204.jpgकृती:
शेंगदाणे/चणाडाळ ४ तास पाण्यात भिजत ठेवावा, अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. देठं वरिल पातळ आवरन काढुन घ्यावे. नंतर पाने व देठंही बारीक चिरून घ्यावे. हे सर्व प्रेशर कुकरमध्ये पाहीजे तेवढे पाणी घालुन १ शिट्टी करून शिजवून घ्यावे. (नंतर फोडणीमध्ये वरुन पाणी घालु नये)
1561373629223.jpg
कढईत तेल गरम करून फोडणीसाठी साहित्याच्या दिलेल्या क्रमनुसार फोडणी करून घ्यावी. यात चिरलेली अळूची पाने आणि देठं घालावीत. झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवावे.
1561366496062.jpg
वरुन भुरभुरायला आवडत असेल तर थोडस ओल खोबर घालु शकता.
गावठी तांदळाचा भात किवा भाकरी बरोबर खायला घ्या, पावसाळ्यात एक मस्त बेत होउन जाईल.
1561373659880.jpg टिप:
१) अळूत ऑक्झॅलिक अ‍ॅसिड असल्यामुळे खाताना घशाला खाज सुटते, त्यासाठी चिंच, कोकम किवा आमसूल घालावा लागतो.
अळू चिरताना हातालाही खाज सुटते, त्यासाठी हाताला चिंचेचा कोळ लावून, अथवा साधे प्लास्टिकचे ग्लोज घालुन ते चिरावं लागत.
२) शिजवून घेतलेला अळु मिक्सर करुन किवा मस्त पैकी घाटुन घेतला की भाजी मिळुन येते.
३) अळूच्या देठा पासुन देठी हा रुचकर पदार्थ ही बनवता येतो.

( एक कथा आणि पाककृती दिन्ही समाविष्ट असल्याने मी हा धागा "कथा आणि पाककृती" दोन्ही विभागात टाकत आहे याची नोंद घावी.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!
आम्ही ओल्या खोबऱ्याचे कापही टाकतो.
माझ्या फेव्हरेट डिशच्या यादीतील पदार्थ आहे हा. आता श्रावण सुरु झाला की धमाल.
वड्यांसाठीदेखील पहिल्या फोटोतील पानेच आम्ही वापरतो. दुसऱ्या फोटोतील पाने पुण्यात आल्यावर प्रथमच पाहीली.

कथा झकासच आहे. मी हा अनुभव घेतला आहे. ठरवून नाही केले अर्थात कुणी.
ताटातली न आवडणारी भाजी मी प्रथम संपवतो. एकदा कुणाकडेतरी जेवायला गेलो होतो. सवयी प्रमाणे नको असलेली भाजी संपवली. आता जेवणाचा मनासारखा आस्वाद घेणार तर वाढणाऱ्याला वाटले मला भाजी आवडली. मी तिनदा वाढलेली भाजी संपवली व शेवटी नाद सोडला व मुख्य पदार्थाकडे वळलो. पण तोवर पोट भरले होते. आजही हा किस्सा आठवतो कधी कधी. Lol

आजीची गोष्ट वाचून हहपुवा झाली. खूप हसले.
मला ही भाजी कधीच आवडली नाही,पण वाचनात सारखी कुठे ना कुठे येतच असते.
आजी छान विनोदी, रसिक वाटल्या.

भाजी आवडतेच. गोष्टपण आवडली!
अळूच्या देठांना आमच्याइथे ' देटी ' असं म्हणतात. या देटीचं दही घालून भरीत करतात. देटी सोलताना नखं काळी होतात मात्र.

मस्त पाकृ ! आणि गोष्ट !
या देटीचं दही घालून भरीत करतात>> त्यालाच आमच्याकडे 'देठी ' म्हणतात .. मला फार काही नाही आवडत ..

शाली- तुमचा अनुभव भारीच.

JayantiP - धन्यवाद.

वावे - देटी सोलताना नखं काळी होतात मात्र.
-अगदी हात पण थोडे कोरडे अन् काळसर होतात.

anjali_kool - देटीचं दही घालून भरीत करतात>> त्यालाच आमच्याकडे 'देठी ' म्हणतात .
- आमच्याकडे देठी म्हणजे एक सांबारचाच प्रकार. नुसत डिश मध्ये ओतुन सुरररररके पिओ टाइप. देठांचे जवळपास एक इंच तुकडे करून थोड ओल वाटणं आणि अजुन काही-काही additional करून हे सांबार बनवण्यात येत.
छान टेस्ट असते.
- तुम्ही म्हणताय ते अळू देठाच भरीत वेगळ आहे.
कदाचित अळु देठापासून बनवल्या जाणाऱ्या या सगळ्या पाककृती ना common देठी हे नाव पडलं असावं.

सिद्धी खूप छान माहिती, गोष्ट आणि पाककृती.
गोष्ट ऐकून तर खरंच मन हेलावल, पूर्वी पैसा नव्हता, मात्र प्रसंगावधान भरपूर होतं हेही प्रकर्षाने जाणवतं.

गोष्ट सुंदर आहे.साबांची आयडियाची कल्पना आवडली.

मला नाही आवडत अळुचं फदफद. पण घरात सगळ्यांना आवडते.

महाश्वेता- पूर्वी पैसा नव्हता, मात्र प्रसंगावधान भरपूर होतं हेही प्रकर्षाने जाणवतं.
- अगदी खरी गोष्ट.

गणेश काजरेकर
- वाल घालून केलेली भाजी खाल्ली आहे मी. मस्त लागते.

अंजली_१२,Namokar,मन्या ऽ,जाई.
सगळ्यांचे मनापासुन आभार.

खासच आहे रेसेपी सिध्दि. मी नेहमी करते. तुम्ही जे जे ऐच्छीक सांगितले आहे त्यातले एकही मी घेत नाही कधी.
हा पदार्थ काहींना एक तर खुप आवडतो किंवा अजिबात आवडत नाही. मला आवडते खुप.

गोष्ट ऐकून तर खरंच मन हेलावल, पूर्वी पैसा नव्हता, मात्र प्रसंगावधान भरपूर होतं हेही प्रकर्षाने जाणवतं.>>>अगदी खरे आहे महाश्वेता. त्यावेळी या अभावाचे फारसे वाईटही वाटत नसे कुणाला. प्रसंग कसा साजरा करायचा या पेक्षा 'प्रसंग साजरा करायचा' याला महत्व होते.

वेगळी पद्धत! मस्त वाटतेय.
लसूण आणि मोहोरी यांच्या फोडणीवर शिजवून घोटलेले अळू(शेंगदाणे,हि.मि.) घालणे.ओले खोबरे+चिंच वाटून त्घालते.वर चिमटीभर साखर घालणे.

चांगली वाटतेय भाजी.
मला दोन्ही अळू फोटो सारखे वाटले.काहीतरी सूक्ष्म फरक असेल.नीट बघते.
पुण्यात एक प्रसिद्ध केटरर आहेत.त्यांची अळू भाजी जबरदस्त असते.

अळुची भाजी अन वडी दोन्ही खास एकदम, आम्ही पानांचा रंग बघुन नाही देठ बघुन ओळखतो कि भाजीची पाने कोणती अन वडीची कोणती.
ही पाक्रु खुप वेगळी आहे, आम्ही टोमॅटो , शेंगदाणे, चनाडाळ नाही घालत, हिरवे-काळे वटाणे, हिरवे-काळे चणे घालुन करतो फद्फदे , अन तेल, लसुण तिखट - मीठ सगळेच बिल्कुल कंजुशी न करता घालुन करायचे, खुप मस्त लागते.

अवांतर - श्रावणात जेव्हा नॉन-व्हेज खायचे नसते तेव्हा हे फद्फद, मसुर आमटी, हिरवे-काळे वटाणे भाजी-कढन , मटणाची हौस भागवतात

भाजीची अळूला काही ठिकाणी राजाळू म्हणतात व तिची पाने पातळ ,कागदासारखी असतात. आदिवासी भागात पावसाळ्याच्या सुरुवातीला एक मोठा वरंबा करतात व शेणाने वरुन जाड लेप देतात व त्यात कंद लावतात. पावसाळाभर खूप सुंदर पाने मिळतात. नंतर कंद भरपूर मिळतात, ते वर्षभर भाजीसाठी वापरतात.
इतर ठिकाणी बहुतेक सांडपाण्यावर अळू वाढलेली मला आढळली आहे.

छान लिहिलंय. पाककृ आणि गोष्ट दोन्ही छान आहेत.
माझी आजी पण अशा बर्‍याच गोष्टी सांगायची.
आम्ही अळुच्या फदफद्याला तेरी म्हणतो. Happy
वाल घालुन करतो.

Chhan aahe goshtha.
mala matra fakt alu chya wadyach aavadtat.
Sasri matra saglyana hi bhaji khup avadate

अळूच्या भाजी शिजताना त्यात चुक्याची पान घालतात. त्यामुळे अळू, शेंगदाणे, डाळ, सगळचं छान शिजतं आणि एकजीव होतं. वाट्ल्यास थोडं डाळीचं पीठही लावू शकता भाजीला.
कोकणस्थ घरात ह्या भाजीत तिखट-मीठाच्या जोडीला गुळही सढळ हाताने घालतात. Happy

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार.

आमच्याकडे तेरी हे अळूचच एक नाव आहे.
तेरी करायची म्हणजे अळुचीच भाजी करायची. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते.
तसच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळया नावाने त्याला ओळखलं जात असाव.

याला आम्ही आंबट चुक्याची महणतो... >>> ओह्ह्, आठवले आता, ही पण माझी आवड्ती भाजी , शेंगदाणे अन लसुन घालुन छान होते, अगदी अंबाडीच्या भाजीसारखी

ब्राह्मणी शुभकार्यात आणि लग्नसमारंभात अळूची भाजी असतेच असते. खरं तर असायची म्हणायला हवं कारण आता डाळिंब्याची उसळ आणि पनीर वगैरे मराठी समारंभात अलगद शिरले आहेत आणि अळूची भाजी मराठी डेलिकसीमध्ये जाऊन बसली आहे, जी खरं तर मुबलक उपलब्धतेमुळे उठसूट बनवली जायची.

मी स्वतः क्वचित एखाद्या समारंभात आणि मोस्टली श्रेयस हॉटेलमधेच खाल्ली आहे. ब्राह्मणी भाजीमध्ये टोमॅटो नसतो, त्याऐवजी आंबट चुका घालतात. आणि कांदा लसूण तर नाहीच नाही. ती अशी लाल दिसत नाही. हिरवी पिवळी दिसते. गरम भात आणि अळूची भाजी यम्म लागते.

Pages