अळूची पातळ भाजी/ फदफदं/ फतफत आणि एक कथा

Submitted by 'सिद्धि' on 24 June, 2019 - 08:36

अळूची पातळ भाजी/अळूच फदफदं/ फतफत :-

अळूची पातळ भाजी हे नाव बहुतेक सगळ्यांना माहीत आहे, मात्र अळु भाजीच्या बुळबुळीतपणा या गुणधर्मावरुन अळूचं फदफदं हे नाव ठेवल गेल आहे.
अळू भाजीची पाने ही थोडी पातळ आणि पोपटीसर रंगाची असतात.
IMG_20190624_103351.jpg

तर अळू वडीसाठी थोडी जाडसर अन् गडद हिरवी, वरती मोठ्या गडद शीरा असणारी पाने वापरली जातात.
हा या दोघांमधील फरक आहे.
IMG_20190624_103303.jpg

अळूपासुन शरीरास मिळणारे फायदे:-
अळूच्या पानांमध्ये अ व क जीवनसत्त्वे असतात तसेच झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न आणि पोटॅशियम ही भरपूर प्रमानात आहे.
रक्त वाढवणे, ताकद वाढवणे यासाठी अळू भाजी उपयोगी ठरते.

एक कथा:-
मामाच्या गावी गेल्यावर केव्हा-केव्हा हा अळूच्या फदफद्याचा बेत अजुनही होतो. आणि आजीचा "भात भाकरी आहे हो. खुपच आवडल म्हणुन नुसत फदफदंयावर भागवु नका" असा टोला पण असतोच. आजी अस का म्हणते ग ? नेहमी अस विचारताच ती तिची नेहमीचीच, पुर्वापार चालत आलेली कथा रंगवून सांगत असते. मला ही तिच ती कथा परत-परत ऐकायला आवडत. विषय अळुचा आहे म्हणुन ती कथा मी इथे टाकत आहे.

तर कथा अशी आहे.... "एक नवविवाहीत जावई बायको सोबत तिच्या माहेरी जेवणासाठी आलेला असतो, घरी अठराविष्व दारिद्र्य, धान्य नाही, जावयाचा पाहुणचार कसा करावा ? हा सासुबाईंना पडलेला प्रश्न. मनाशी काही तरी ठरवुन त्या गाठीशी असलेले पेलाभर तांदुळ शीजत घालतात. परसातील कोवळी अळुची पाने काढुन भरपुर प्रमानात अळूचं फदफदं बनवतात. जावई जेवायला बसल्यावर पापड-कुर्ड्या, भात आणि फदफदं असा बेत पानामध्ये वाढला जातो. जावईबुवा भातावरती यथेच्छ पसरवलेल फदफदं समपवुन "वा छान झाल आहे फदफदं" अस म्हणत खाली असणार्या भाताला हात लावणार तेवढ्यात सासुबाई " आवडल ना मग घ्या अजुन लाजू नका" अस म्हणत वरती प्रेमानेच(?) अजुन फदफदं वाढत.
आता फदफदं खाउन तृप्त (?) झालेला जावईबुवा पानात लावलेलाच भात कसाबसा संपवुन सासुरवाडीचा प्रेमभावे निरोप घेतो. वरती अजुन फदफदं वाढत असताना सासुबाईच्या तोंडुन सारख बाहेर पडणार एक वाक्य मात्र तो कायमचच लक्षात ठेवतो. "भात भाकरी आहे हो. खुपच आवडल म्हणुन नुसत फदफदंयावर भागवु नका.""
आजीची कथा संपली की आम्ही पोट धरुन हसतो, आणि तितकच वाईट ही वाटत.
तर "अळूची पातळ भाजी,अळूचं फदफदं किवा अळूचं फतफत " काहीही म्हणा याची मी करत असलेली पाककृती मी इथे पोस्ट करत आहे.

साहित्य:
अळूची पाने ५-६,
शेंगदाणे व चणाडाळ दोन्ही छोटी अर्धी वाटी.
1561375766492.jpgफोडणीसाठी साहित्य:
तेल ४ टेबल स्पून ,१ छोटा चमचा मोहोरी ,हिंग चविनुसार (ऐच्छिक), १/२ चमचा हळद व तितकाच गरम मसाला , १ चमचा लाल तिखट,अर्धा कादा आणि टोमटो(ऐच्छिक), लसुन २-३ पाकळी, मिठ चविनुसार, १ चिंच किवा कोकमाची साल, १ तमालपत्र (ऐच्छिक), 2-4 मेथ्याचे दाणे (ऐच्छिक).
गोडा मसाला २ मोठे चमचे.
IMG_20190624_102204.jpgकृती:
शेंगदाणे/चणाडाळ ४ तास पाण्यात भिजत ठेवावा, अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. देठं वरिल पातळ आवरन काढुन घ्यावे. नंतर पाने व देठंही बारीक चिरून घ्यावे. हे सर्व प्रेशर कुकरमध्ये पाहीजे तेवढे पाणी घालुन १ शिट्टी करून शिजवून घ्यावे. (नंतर फोडणीमध्ये वरुन पाणी घालु नये)
1561373629223.jpg
कढईत तेल गरम करून फोडणीसाठी साहित्याच्या दिलेल्या क्रमनुसार फोडणी करून घ्यावी. यात चिरलेली अळूची पाने आणि देठं घालावीत. झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवावे.
1561366496062.jpg
वरुन भुरभुरायला आवडत असेल तर थोडस ओल खोबर घालु शकता.
गावठी तांदळाचा भात किवा भाकरी बरोबर खायला घ्या, पावसाळ्यात एक मस्त बेत होउन जाईल.
1561373659880.jpg टिप:
१) अळूत ऑक्झॅलिक अ‍ॅसिड असल्यामुळे खाताना घशाला खाज सुटते, त्यासाठी चिंच, कोकम किवा आमसूल घालावा लागतो.
अळू चिरताना हातालाही खाज सुटते, त्यासाठी हाताला चिंचेचा कोळ लावून, अथवा साधे प्लास्टिकचे ग्लोज घालुन ते चिरावं लागत.
२) शिजवून घेतलेला अळु मिक्सर करुन किवा मस्त पैकी घाटुन घेतला की भाजी मिळुन येते.
३) अळूच्या देठा पासुन देठी हा रुचकर पदार्थ ही बनवता येतो.

( एक कथा आणि पाककृती दिन्ही समाविष्ट असल्याने मी हा धागा "कथा आणि पाककृती" दोन्ही विभागात टाकत आहे याची नोंद घावी.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या अळूच्या भाजीत कांदा, लसूण, टॉमेटो, लाल तिखट वगैरे नसतं. तेलाच्या फोडणीला मोहरी, जिरं, हिंग, कढिलिंब, हिरव्या मिरच्या, थोडी भिजवलेली चणाडाळ. अळूची पानं बारीक चिरून शिजवून घोटून फोडणीस घालणे. थोडंसं बेसन कालवून घालणे. त्यावर चिंचेचा कोळ व शिजवलेले शेंगदाणे घालणे. चांगली उकळी आली की मीठ, थोडासा गोडा मसाला व गूळ घालून ढवळणे. गूळ विरघळला की गॅस बंद करून टाकणे.

वडीच्या अळूला डार्क बॉर्डर असते. ती हमखास ओळखायची खूण आहे.

सेम हिअर अश्विनी के.. त्यामुळेच तर नवरात्र किंवा श्रावणात चालते ही. (कांदा लसुण नसते)

अळूची भाजी -- यम्म्मी .
सगळ्यात बेश्ट - ऋशीची भाजी .
मला स्वताला नुसती वाटीत घेउन खायला आवडते .
माहेरी पाच दिवसा गणपती असतात.
रुशीची भाजी , माझी आई/मावशी/आजी यांच जॉईन्ट वेन्चर असतं - गणपतीत Happy
आमच्या कडे काही ठरावीक नातेवाईक खास गणपतीच्या दूसर्या तिसर्या दिवशी जेवायला येतात .
आई डबे भरून बाजूला काढून ठेवते .

माझ्याकडे फक्त वडी चा अळू आहे. त्याची भाजी/ फदफदं नाही का करता येणार?
नवीन Submitted by Hemakamat on 10 May, 2020 - 16:47

- वडीच्या अळू मध्ये तितकासा बिळबिळीतपणा नसतो. आग्या१९९० यानी सांगीतल्याप्रमाने एकजीव होत नाही. तशी चवही नाही. त्यामुळे तिची भाजी किवा फतफते करत नाहीत.

छान.
नका करू. कितीही शिजवले आणि घोटले तरी एकजीव होत नाही, चवीलाही बेचव लागते.>>> आता कळलं माझा काय प्राब्लेम होत होता ते.

Pages