आपण असू लाडके : मुलाखत(२)

Submitted by स्वाती_आंबोळे on 20 February, 2019 - 12:32

या मालिकेतील माहितीपर लेखः
१. गुलाबी त्रिकोणात कैद
२. इंद्रधनुष्यात किती रंग?
३. समज आणि गैरसमज

सर्वप्रथम या उपक्रमात सहभागी होत असल्याबद्दल अनेक आभार.
लैंगिक अल्पसंख्यांकांचे अनुभव, अडचणी, संघर्ष यांबद्दलची माहिती वाचकांना व्हावी आणि त्यांना समजून आणि सामावून घेण्याकडे त्यांची वाटचाल सुरू व्हावी असा या मुलखतींमागचा हेतू आहे.
यातल्या काही अनुभवांबद्दल बोलणं कदाचित नकोसं, त्रासदायक असू शकतं याची आम्हाला कल्पना आहे. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणं या किंवा अन्य कुठल्याही कारणाने अवघड वाटत असेल तर तो प्रश्न तुम्ही वगळू शकता.
मुलाखती प्रकाशित करताना तुमची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.

अ. पार्श्वभूमी

१. तुमच्या कुटुंब कुठल्या देशातलं / संस्कृतीतलं आहे?
- व्हाइट अमेरिकन

२. घरी कोणकोण असतं? तुम्हाला भावंडं किती?
- आईवडील घटस्फोटित आहेत. घरात दोन सख्ख्या बहिणी आणि वडिलांच्या दुसर्‍या लग्नापासूनची तीन सावत्र भावंडं आहेत.

३. आईवडील कोणत्या क्षेत्रांत काम करतात?
- वडील शेफ आहेत, आई पॅरालीगल

४. तुमचं वय काय?
- १९.

५. तुम्ही काय करता?
- कॉलेजमध्ये अ‍ॅनिमेशन शिकत आहे.

६. तुमचं शारीरिकदृष्ट्या लिंग (sex) कोणतं?
- स्त्री

७. तुमचा वेगळेपणा लक्षात येण्याआधी तुमचा घरच्यांशी खुला संवाद होता असं म्हणता येईल का?
- हो, खुला संवाद होता.

ब. वेगळेपणाविषयी:

१. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लैंगिकतेचं भान येण्याआधी तुमच्या ओळखीतलं कोणी लैंगिक अल्पसंख्यांकांपैकी असल्याचं माहीत होतं का? तेव्हा तुमचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय होता?
- आमच्या कुटुंबात कोणी नव्हतं, पण आईवडिलां मित्रपरिवारात गे व्यक्ती होत्या.

२. तुम्ही लैंगिक अल्पसंख्यांकांच्या कुठल्या प्रकारात येता?
- मी लेस्बिअन आहे.

३. आपण अशा प्रकारचे आहोत हे तुमच्या कधी आणि कसं लक्षात आलं?

४. सुरुवातीला हे कळल्यानंतरची तुमची प्रतिक्रिया काय होती? भीती? कुतुहल? शरम?
- खूप गोंधळून गेले आणि बराच काळ स्वतःशीही याबद्दल विचार करायचं टाळलं. (Confused and in denial for a long time.)

५. तुम्ही याबाबात अधिक माहिती मिळवायचा प्रयत्न केला का? कसा?
- नाही केला, हळूहळू स्वतःच स्वतःला उमगत गेले.

६. याबद्दल मोकळेपणाने बोलता येईल, मानसिक आधार वाटेल असं कोणी तेव्हा तुमच्या आयुष्यात होतं का?
- हो, अगदी जिवाभावाच्या काही मित्रमैत्रिणी.

७. घरी कधी सांगितलंत?
- घरी अजून सांगितलेलं नाही.

८. घरच्यांची प्रतिक्रिया काय होती?

९. याबाबतीत डॉक्टरचा सल्ला प्रयत्न केला होता का? काय सल्ला मिळाला?

१०. या नवीन माहितीचा घरातल्या वातावरणावर काही परिणाम झाला का?
- माझाच घरातला वावर पूर्वीइतका सहज राहिलेला नाही. आपल्या सहजसाध्या बोलण्यातूनही कोणाला कसली शंका येईल की काय याबद्दल आता सतत जागरूक आणि तणावात असते. डेटिंग वगैरे संदर्भात घरी बोलायचंच टाळते आणि सहजसुद्धा कुठल्याही विषयावर पूर्वीप्रमाणे मोकळेपणी मत देत नाही, कशाबद्दलही खर्‍याखुर्‍या भावना व्यक्त होऊ देत नाही.

११. जवळच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणाशी यासंदर्भात बोललात का? त्याचा काय परिणाम झाला?
- होय. त्त्यांनी अगदी सहज या वस्तुस्थितीचा स्वीकार केला.

१२. यामुळे आपण वाळीत टाकले जाऊ अशी भीती कधी वाटली का?
- हो.

१३. कधी एकटं पडल्याची भावना आली का?
- हो.

१४. चारचौघांपेक्षा निराळं असल्याबद्दल स्वत:चीच चीड आली का?
- हो.

क. शिक्षण/व्यवसायसंबंधी

१. शिक्षणाच्या वा नोकरीव्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या लिंगभावाविषयी किंवा लैंगिक कलाविषयी माहिती होती का? त्यामुळे कधी भेदभाव, संधी नाकारली जाणं असं काही घडलं का?
- नाही, कारण मुळात अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींव्यतिरिक्त हे कोणाला माहीतच नाही.

२. यावरून कधी कुठल्या प्रकारचा त्रास किंवा छळवणूक यांना तोंड द्यावं लागलं का?
- नाही, कारण मुळात अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींव्यतिरिक्त हे कोणाला माहीतच नाही.

३. वरील दोन्हीपैकी कुठल्याही संदर्भात संबंधित अधिकार्‍यांकडे दाद मागायची वेळ आली का? त्यावर योग्य ती कारवाई केली गेली का?

ड. व्यक्तिगत

१. तुम्हाला तुमचा जोडीदार भेटला आहे का?
- नाही.

२. या जोडीदाराची भेट कशी झाली?

३. तुम्ही जोडीदार-सूचक संकेतस्थळं (डेटिंग साइट्स) किंवा तत्सम अन्य कुठली सुविधा कधी वापरली आहे का? तो अनुभव कसा होता?
- हो, पण बहुतांशी विरंगुळा म्हणूनच. (mostly for fun)

४. तुम्ही STD/HIV चाचण्या केल्या आहेत का? नियमीतपणे करता का?
- नाही.

५. कोणाशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याआधी ती व्यक्ती वरील चाचण्या केलेली आणि सुरक्षित आहे याची पडताळणी करता का?
- हो.

६. लैंगिक अल्पसंख्यांकांत गणल्या जाणार्‍या जोडीदाराकडून कधी वाईट अनुभव आला असं झालं का?
- नाही.

७. तुम्हाला लग्न करावं, आपली मुलं असावीत असं वाटतं का?
- हो, लग्न करायची इच्छा आहे, शक्य झाल्यास मूल दत्तक घेऊन त्याचं संगोपन करायलाही आवडेल.

८. या सर्व प्रवासात अशी कुठली घटना आहे ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते?
- माझ्या मित्रमैत्रिणी, ज्यांनी माझं वेगळेपण सहज स्वीकारलं.

९. अशी कुठली घटना आहे जी शक्य असतं तर तुम्ही स्मृतीतून पुसून टाकली असतीत?

इ. तुम्ही आणि समाज

१. तुम्ही लैंगिक अल्पसंख्यांकाच्या कुठल्या चळवळीत सहभागी आहात का?
- नाही.

२. तुमच्या वेगळेपणाविषयी तुम्ही खुलेपणाने बोलता की फक्त अगदी आवश्यक असेल तरच आणि तितकंच बोलता?
- मित्रमैत्रिणींशी खुलेपणाने बोलते, वर्गात अश विषयांवर खरी मतं मांडते.

३. याबद्दल समाजात जागृती व्हावी असं तुम्हाला वाटतं का? त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करता का?
- हो, लोकांना माहिती व्हायला हवी असं वाटतं, पण सध्या मी त्याबाबत काही करत नाहीये.

४. आदर्श समाजाबद्दलची तुमची कल्पना काय आहे?
- ज्या जगात लैंगिक अल्पसंख्यांकांना तुच्छतेने आणि हेटाळणीने वागवलं जाणार नाही.

तळटिपा :
१. कोणतंही उत्तर गाळण्याचा किंवा त्याबद्दल विस्ताराने न बोलण्याचा मुलाखतदात्या व्यक्तीला पूर्णपणे अधिकार आहे, ज्याचा आदर बाळगला गेला आहे. कोणत्याही माहितीसाठी कुठल्याही प्रकारचा आग्रह मुलाखत घेताना केलेला नाही.
२. मूळ मुलाखत इंग्रजीत आहे, माझ्यापरीने मराठी भाषांतर केलं आहे. जिथे रूढ मराठी शब्द सुचले नाहीत तिथे ओढाताण करण्यापेक्षा मूळ इंग्रजी शब्दच वापरले आहेत.

साहाय्य : मुलाखत घेण्यासाठी आणि शब्दांकित करण्यासाठी सायुरी सप्रे हिचे मनःपूर्वक आभार.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आतापर्यन्तच्या दोन्ही मुलाखतींमधे "समवयस्क मित्र मैत्रिणींनी वेगळेपण सहज समजून घेतलं" मित्र मैत्रिणींच्यामुळे भावनिक आधार मिळाला हे मुद्दे आलेत असे दिसतंय (जी चांगली गोष्ट आहे.)

हो, पण दोन्ही मुलाखतींत घरी सांगितलेलं नाही असंही आलंय, विशेषत: या मुलाखतीत घरी आधी खुला संवाद असूनही - हे मला फार बोलकं आणि दुर्दैवी वाटलं. या मुलीचं घरी वागणंच बदलून गेल्याचं ती सांगते - असं जगणं किती अवघड आहे!

अर्थात, या दोन्ही मुलाखती अमेरिकेतील होत्या - ही मुलगी कॉलेजच्या वसतिगृहात राहाते, तेव्हा आता कदाचित घरच्यांशी रोज/सतत संपर्क असेल असं नाही. भारतात, जिथे कुटुंब, शेजारीपाजारी, नातेवाईक हे सगळे दैनंदिन आयुष्याचा मोठा भाग असतात तिथे कसं मॅनेज करत असतील असाही विचार मनात आला.

<<< १. शिक्षणाच्या वा नोकरीव्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या लिंगभावाविषयी किंवा लैंगिक कलाविषयी माहिती होती का? त्यामुळे कधी भेदभाव, संधी नाकारली जाणं असं काही घडलं का?
- नाही, कारण मुळात अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींव्यतिरिक्त हे कोणाला माहीतच नाही.

२. यावरून कधी कुठल्या प्रकारचा त्रास किंवा छळवणूक यांना तोंड द्यावं लागलं का?
- नाही, कारण मुळात अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींव्यतिरिक्त हे कोणाला माहीतच नाही. >>>

हे असंच पाहिजे. मुळात तुमचा लैंगिक कल काय आहे, याच्याशी इतरांना काही देणेघेणे नाही आणि त्याची जाहिरात करायची पण गरज नाही. Honestly, nobody cares most of the time. पण होतं काय की बर्याचदा LGBTQ कम्युनिटी स्वतःचे व्यवस्थित मार्केटिंग करते आणि इतरांनी आम्हाला समजून घेतले पाहिजे असा त्रागा करते. एकंदरित ही लेखमाला पण याच मार्केटिंग प्रकरातली वाटतेय मला तरी.

वाचतोय.

उपाशी बोका, कामाचं/ शिक्षणाचं ठिकाण हेही सामाजिक आयुष्याचा एक भाग आहेतच की. तिथे फक्त कामाबद्दल /शिक्षणाबद्दलच बोलणी होतात असं नाही. या वयातली मुलं तर आ पल्या जोडीदाराबद्दल(बॉयफ्रेंड्/गर्लफ्रेंडबद्दलही बोलतच असणार.
कामाच्या ठिकाणी ही कौटुंबिक गोष्टींची चर्चा होते. संबंध कलीग्जच्या कु टुंबापर्यंतही पोचतात.

तिथेही त्या व्यक्तीने घरी जसं कोणाला काही सांगितलं नाही, असंच राहावं का?

आता कामाच्या ठिकाणी कोणीच इतरांशी कामापलीकडे जाऊन काही बोलणार नसेल, तर कोणालाच फरक पडणार नाही. पण असं होतं का? मग त्यातून फक्त LGBTQ व्यक्तींनाच वगळायचं का?

LGBTQ कम्युनिटी स्वतःचे व्यवस्थित मार्केटिंग करते आणि इतरांनी आम्हाला समजून घेतले पाहिजे असा त्रागा करते. एकंदरित ही लेखमाला पण याच मार्केटिंग प्रकरातली वाटतेय मला तरी.
Submitted by उपाशी बोका on 21 February, 2019 - 09:25

सहमत.

ही लेखमाला पण याच मार्केटिंग प्रकरातली >>>> मार्केटिंग ??? म्हणजे लेखिका " हे आहेत LGBTQ असण्याचे फायदे! त्वरा करा!! आजच कन्वर्ट व्हा" असे काही म्हणतेय असे कुठे जाणवले का? Uhoh

योग आणि उपाशी बोका, 'आपण असू लाडके' या मालिकेतील माहितीपर लेखांचे दुवे आता वरती दिले आहेत. तुमच्या शंकांची उत्तरं त्यात मिळू शकतील असं मला वाटतंय म्हणून ते वाचायचा आग्रह मी तुम्हाला करेन. त्यानंतरही जर प्रश्न पडले तर जरूर विचारा, मी माझ्या माहिती आणि कुवतीनुसार उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करेन. Happy

मार्केटिंग >>
असं वाटत नाही. भरत +१

निदान आपल्या भारतीय समाजात या विषयी किती नाकं मुरडली जातात. मायबोलीच्याच या लिंक्स थोड्या चाळल्या तर या चर्चा पुन्हा पुन्हा होण्याची किती गरज आहे हे लक्षात येईल.
https://www.maayboli.com/node/9629
https://www.maayboli.com/node/47299
https://www.maayboli.com/node/63942

गेल्या काही वर्षांत बर्‍याच लोकांची मते बदलली असतील अशी आशा आहे. आणि ही प्रक्रीया सुरु ठेवण्यासाठी या मुलाखतींची आणि अशा प्रश्नांची गरज आहे.

@ स्वाती_आंबोळे,
प्रत्येक वेळी प्रतिसाद देत नसले तरी असे वेगळे आणि महत्वाचे लेख मी आणि बरेच लोक रोमात वाचत असणार. तुम्ही छान उपक्रम हाती घेतला आहे. पुढचे लेख आणि मुलाखतींसाठी शुभेच्छा!

उपाशी बोका,
>>>
हे असंच पाहिजे. मुळात तुमचा लैंगिक कल काय आहे, याच्याशी इतरांना काही देणेघेणे नाही आणि त्याची जाहिरात करायची पण गरज नाही. Honestly, nobody cares most of the time.
<<<
मला तुमच्या पोस्टमधील 'जाहिरात' आणि 'मार्केटिंग' या शब्दांमुळे काही गोष्टी क्लीअर व्हायला हव्या आहेत की काय असं वाटलं. Happy

सहजसरळ आयुष्य जगता येण्यात आवडीनिवडी, मतं मांडता येणंही येतं. मायबोलीवर आपण अनेक विषयांवर मतं देतो. इतरांना त्यांच्याशी देणंघेणं आहे किंवा नाही याची काळजी न करता. ती काही जाहिरात नसते, सहज उर्मी असते. ती प्रत्येकवेळी दाबावी लागणं काही चांगलं नाही. मग याच मुलांचे आईवडील त्यांना भिन्नलिंगी व्यक्तींशी लग्न वगैरे करायचा आग्रह किंवा जबरदस्ती करतील तेव्हा त्यांनी काय करायचं? ट्रान्सजेन्डर्सनी काय करायचं? इतकं सोपं नाही ना ते.
असो - मला तुम्हाला काही विकायचं नाहीये, तुम्ही या विषयाशी देणंघेणं नसतानाही मुलाखत वाचलीत हीसुद्धा चांगली स्टेप समजते मी. Happy

पीनी, धन्यवाद! माझा हुरूप वाढवलात तुम्ही! Happy

mar·ket·ingDictionary result for marketing
/ˈmärkədiNG
noun
the action or business of promoting and selling products or services, including market research and advertising.
मार्केटिंग आणि sales ( विक्री) यात फरक आहे.

<<<
या विषयाशी देणंघेणं नसतानाही मुलाखत वाचलीत हीसुद्धा चांगली स्टेप समजते मी. Happy >>>
स्मायली टाकण्याची कला छान आहे. ही घ्या माझ्यातर्फे एक स्मायली Happy

धन्यवाद, तुम्ही दिलेल्या व्याख्येत 'अ‍ॅन्ड सेलिंग' असेही शब्द दिसत आहेत, पण ते महत्त्वाचं नाही. हे लेख आणि मुलाखती ही कसली जाहिरात/मार्केटिंग असू शकतं हे काही माझ्या ध्यानात येत नाही. पण तसं असेल तर तुम्ही त्याला बळी पडला नाहीत ही चांगली गोष्ट आहे. Happy
स्मायली द्यायची कला शिकलात हीदेखील चांगलीच गोष्ट आहे. Happy

असो - तुमचं मत समजलं, त्याचा आदर आहे. यापुढे या चर्चेत एकतर मी तेच ते लिहीन किंवा विषय भरकटेल - त्यामुळे थांबते.

ही प्रश्नोत्तर सिरीज मी काल वाचली पण प्रतिसाद द्यायचा राहून गेला. घरी मोकळं वातावरण असूनही मुलांना मित्रमैत्रिणींशिवाय बाकी कुणाशी बोलावंसं वाटत नाही हे जरा दुर्दैवी आहे नक्कीच.

मला हे मार्केटिंग वाटलं नाही तसंच या व्यक्तींबद्दल पूर्ण ओपन माईंड आहे पण या वयातील (१५-१७) नॉर्मल स्ट्रेट मुलामुलीनाही लग्न करायचंय का, मुलं हवी आहेत का या प्रश्नाचं उत्तर माहित नसेल किंवा ते उत्तर त्याक्षणी काही दिलं तरी मेबी १० वर्षांनी खूप वेगळं असेल त्यामुळे या प्रश्नाचं प्रयोजन कळलं नाही.

बाकी हल्ली भारतात याबद्दल खूप ओपननेस आला असावा असं वाटतं. लीगल चेंजेसही झाले आहेत.
सुरेश : आई, मला रमेशशी लग्न करायचंय
आई: ते शक्य नाही
सुरेश: पण का? आता तर कायद्याने पण गुन्हा नाही
आई: पण रमेश कोकणस्थ नाही

असा जोक मला व्हॉट्सअपवर आला होता!

अहो सनव Uhoh वॉट्सॅप इतकं सिरियसली घेऊ नका. एक जोक म्हणूनच बघा पण भारतात ओपननेस आलाय म्हणून हे उदाहरण वगैरे देऊ नका प्लीज.

घरी मोकळे वातावरण असुनही पालकांशी याबाबत संवाद साधला गेला नाहीये हे वाचून वाईट वाटले. आतून किती एकटे वाटत असेल या मुलामुलींना!
भरत +१
>>ही लेखमाला पण याच मार्केटिंग प्रकरातली >>>> मला हे विधान वाचून फार खेद वाटला.

>>>
हे असंच पाहिजे. मुळात तुमचा लैंगिक कल काय आहे, याच्याशी इतरांना काही देणेघेणे नाही आणि त्याची जाहिरात करायची पण गरज नाही. Honestly, nobody cares most of the time>>

जाहिरात करायचा प्रश्नच नाही , मुळात कल लपवून ठेवायला लागतो, मुखवटा लावून वावरावे लागते हीच समस्या आहे. कल असा आहे कळले की आजही अनेक स्तरावर अडवणूक, नाकारणे, आक्षेप घेणे सुरु होते. छळवणूकीचे प्रसंग वाट्याला येवू लागतात. त्यामुळे नोबडी केअर्स वगैरे कृपया म्हणू नका. जिथे लिगल आहे तिथेही स्वाभाविकपणे जगण्यात अडचणी येतात , ज्या ठिकाणी कायद्याने बंदी आहे तिथली परीस्थिती तर अजूनच बिकट असते.

>>> जाहिरात करायचा प्रश्नच नाही , मुळात कल लपवून ठेवायला लागतो, मुखवटा लावून वावरावे लागते हीच समस्या आहे
अगदी नेमकं!!

सनव,
>>> स्ट्रेट मुलामुलीनाही लग्न करायचंय का, मुलं हवी आहेत का या प्रश्नाचं उत्तर माहित नसेल किंवा ते उत्तर त्याक्षणी काही दिलं तरी मेबी १० वर्षांनी खूप वेगळं असेल

अगदी हेच उत्तर आहे तुमच्या प्रश्नाचं- त्यांची स्वप्नं, आशा आकांक्षा त्यांच्याच वयाच्या इतर मुलांसारखीच आहेत आणि त्यांना त्यात निर्वेध रमता यायला हवं.
'अजून तो विचार केलेला नाही' असंही उत्तर ही १९ वर्षे वयाची मुलगी देऊ शकली असतीच, पण तिला संसार मांडायची इच्छा आहे हे वाचल्यावर तो मांडता येण्यात किती अडचणी येऊ शकतात हे जाणवून जीव तुटतो.