सूट - भाग 7

Submitted by चिन्नु on 1 February, 2019 - 21:34

सूट भाग 6-
https://www.maayboli.com/node/68942

तिलुु आपल्याच विचारात मग्न होती. चुकार दिवस आज खूपच रेंगाळला होता. खिडकीतून दिसणारा आकाशाचा तुकडा डोळ्यात साठवत ती विनूची वाट पाहत होती. नुकतेच अपग्रेड मिळून ते आता वरच्या मजल्यावरील suite मध्ये शिफ्ट झाले होते. हा सरंजाम खरंतर विनूला कंपनीने आधीच करून दिला होता. पण ते आले तेव्हा काही कारणाने कोणताच suite उपलब्ध नव्हता.
आता wi-fi रूममध्येच असल्याने तिलुला खाली रिसेप्शनमधल्या इंटरनेटवर विसंबून रहायची गरज नव्हती. तसंच टीव्ही आणि काही मुव्ही चॅनल्स असल्याने ती सुखावली होती. त्यातही आदल्या रात्री क्लासिक्समध्ये चक्क डीडीएलजे लागला होता! कैक वेळा तो पाहूनही इतक्या दिवसांनी अमेरिकेत आल्यावर तो चित्रपट पाहताना खास वाटलं तिला. मधून मधून विनूच्या घोरण्याची साथ होतीच!
भाॅक! म्हणत विनूनं तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिलु मागं वळून मंद हसली.
'काय राणी सरकार घाबरल्या नाहीत आज? काय विशेष?'
'काही नाही. काल देशात जाऊन आले ना!'
'देशात? अरे वा! ते कसं काय?', विनुने चेहरा धुवत विचारलं.
'अरे डीडीएलजे नाही का पाहिला काल टीव्ही वर. तेव्हढंच देशात फिरून आले मनानं. खूप मस्त वाटलं!
लहानपणी मी वाचलं होतं की टिळक आवर्जून सिंहगडावर जात असत. जाऊन आल्यावर ती हवा त्यांना आठवडाभर तरी पुरत असे म्हणे. आपली दुधाची तहान ताकावर! निदान असं तरी आपल्या मातीचं दर्शन घडलं. तेव्हढं पुरे मला'.
'हे छान झालं तिलु. मी उगाच देशात जायला टिकीट्स पाहत होतो. आठवण आली की डीडीएलजे पाहून घे तू'. विनू हसत म्हणाला.
'काहीही!', विनुच्या आवाजातला खोचक सूर ऐकून मान झटकली तिलुने. विनूने तिलुकडे पाहिलं. तिलु एकेक पाकळी उमलत होती जणू.
'तसं नाही रे, आपल्या माणसांमध्ये किती आश्वस्त असतो आपण. एक विश्वास असतो मनात की काहीही वाईट होणार नाही. समजा काही झालं तरी आपली माणसं आपल्या बरोबर आहेत हा दिलासा खूप मोठा असतो. विशेषतः देशाबाहेर आपल्या माणसांपासून दूर आल्यावर फार प्रकर्षाने जाणवतं ते'.
तिलु अधोमुख होऊन गंभीरपणे बोलत होती.
तिला तसं पाहून विनूला काय करावं कळेना झालं. लगेच त्याने हातातला टाॅवेल भिरकावला आणि तिच्यासमोर किंचित झुकत नाटकीपणाने उभा राहिला.
'मोहतरमा! आपको किसीने याद किया'
'माहीत्ये, दादाचा फोन आला नं?', तिलु हसत म्हणाली.
'तुला कसं कळलं?'
'अरे, दादा ताई आणि मी- एकाच पुस्तकाची पानं!'
'हे बरंय', विनु म्हणाला. 'और अगर कोई आप से कहता की आपका कोई अजिज आया था तो आप कहती कौन विनित? कहांका विनित?'
त्याच्या आविर्भाव पाहून हसू आवरलं नाही तिला. 'दुनिया में और कुछ याद रहे ना रहे, इस प्यारे अजिज को कैसे भुलेंगे हम?'. त्याच्या गळ्यात आपल्या हातांनी माळ गुंफून तिनं त्याच्या छातीवर डोकं टेकवलं.
'काय म्हणाला दादा?'. तिलुने विचारलं.
'हम्म. कसलंतरी गिफ्ट दिलं होतं का तुला मुंबईहून येतांना? आवडलं का तुला म्हणून विचारत होता', विनू केस विंचरत म्हणाला.
तिलु हातातला कंगवा ड्रेसरवर टाकून धावतच सुटकेसकडे आली. आतल्या कप्प्यातून गिफ्ट बाहेर काढलं. रॅपर काढेपर्यंतही तिला धीर धरवत नव्हता.
'मी अशी कशी विसरले!', मान हलवत गिफ्ट उघडलं तिलुने. तिच्या हातात सुंदर घड्याळ होतं. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या पट्टया आणि डायल्सपण होती. तिलुच्या डोळ्यात आनंद मावत नव्हता.
'खास लोकांना खास गिफ्ट! मस्तच आहे हे'. विनूनं घड्याळ तिच्या मनगटावर ठेवलं.
तिलु ओठावर मंद हास्य पाहून तो म्हणाला, 'आवडलं?'
'हो. लक्षात आहे त्याच्या अजून'
'काय ते?'
'माझ्या आईला बाबांनी असंच घड्याळ घेऊन दिलं होतं त्यांच्या लग्नानंतर. आई सांगायची त्या घड्याळाबरोबर सोळा सुंदर डायल्स होती आणि किती तरी वेगवेगळ्या डिझाईन असलेल्या पट्टया. आई बाबा फिरायला कुठे बाहेर जात असले की आई ती नेसलेल्या साडीला मॅचिंग डायल आणि पट्टी निवडून घालायची. खूप मस्त दिसत दोन्ही. अगदी त्या काळातले राॅयल कपल जणू! माझ्या मामांनी त्यांचं सुरेख पेंटींग काढलं होतं. अजूनही आहे ते पेंटींग पण घड्याळ मात्र गेलं कुठं तरी..'
तिलूने मोठा सुस्कारा सोडला.
'आता तू हे घड्याळ घाल म्हणजे आपण पण राॅयल कपल होणार. काय?', विनुने तिच्या खांद्यावर थोपटत म्हटलं.
'चला हसल्या तरी राणी सरकार. येणार का शिकारीला?'
'कुणाची शिकार?', तिलु घड्याळ ड्रेसरवर ठेवत म्हणाली.
'कुणाची कशाला? आमचीच शिकार केली ना या नजरेनेच'.
'हो का?'
दोन्ही हसत बाहेर आले.
'ए चालत जाऊ या?', लिफ्ट कडे वळणार्या विनूला थांबवत ती म्हणाली.
तसं विनूनं तिला अलगद उचललं आणि तो पायर्या उतरू पण लागला. 'अरे काय करतोयस' असं म्हणत तिनं त्याचा खांदा धरला. त्याची अर्धवट उगवलेली दाढी तिच्या गालावर घासत होती. तिनं डोळे गच्च मिटून घेतले. दोन तीन पायर्या उतरून होत असतांनाच कुणी तरी मागून आल्याचा आवाज आला. ती व्यक्ती धावतच पायर्या उतरून खाली आली. तशी तिलुने घाईघाईने विनूच्या हातातून निसटून खाली उडी मारली. ती व्यक्ती त्यांना पाहत पुढे जाऊन थांबली. तिलुही धडाधड पायर्या उतरून खालच्या मजल्यावर येऊन थांबली. विनू मात्र गोरामोरा झाला. त्याच्या बुटाची लेस बांधत तो वरच थांबला.
ती व्यक्ती लुना होती. नेहमी प्रमाणेच तिने तिचा चेहरा कोरा करून तिला विचारलं, 'व्हाट आर यू गाईज् डुईंग हियर? वर सगळे महागडे suites आहेत'.
'आम्हाला ना अपग्रेड मिळाला. आम्ही आता वर शिफ्ट झालो. तू कशी आहेस? दिसली नाहीस?'
तिलूने माहिती पुरवत विचारलं. पण लुनाचं लक्ष वरून येत असलेल्या विनूकडे गेलं तशी ती घाईघाईने निघून गेली. उत्तर न देताच!
तिलुला तिच्या वागण्याचं खूप आश्चर्य वाटलं. वर शिफ्ट झाल्यापासून एकदाही लुना तिला दिसली नव्हती. आज इतक्या दिवसांनी दिसली तरी ती अशी का वागली? तुम्ही लोकं इथे काय करताय म्हणजे काय? आपण कधी suite मध्ये राहू असं तिला वाटलं नसावं? का? तिची मदत करणारी, गप्पा मारणारी, दिलेली फळं गपगुमान नेणारी लुना आज किती विचित्र वागली. हिला आपण जास्तच सूट तर नाही दिली ना?'
तिलु लुना गेली त्या दिशेने पाहत उभी राहिली.

सूट भाग 8-
https://www.maayboli.com/node/68984

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतेय Happy

तिलुने डोळे मोठे केले. दोन्ही हसत बाहेर आले. >> हे वाक्य जरा बदलाल का? भयानक वाटतेय वाचतांना Happy

धन्यवाद मंडळी!
विनिता, वाक्य बदललं आहे. पेशल धन्यवाद Happy